Monday 16 January 2017

गोष्ट छोटीशीच.



                                     गोष्ट छोटीशीच.
                

,ह्यांचा वाढदिवस नोव्हेंबरमधील असल्याने मी  नोव्हेंबरच्या सभेत सर्वांसाठी खांडविच्या वड्या नेल्या होत्या.
बेळगावला आम्ही त्याला खांतोळी म्हणतो.आमचे अनेक शुभंकर,शुभार्थी स्वहस्ते केलेले पदार्थ वाढदिवसासाठी आणतात.माझ्यात एवढा उरक नाही त्यामुळे एरवी मी  विकतची मिठाई नेली असती पण त्यावेळी नुकतीच नोटा बंदी झाल्याने, असलेले पैसे अत्यावश्यक बाबी साठी खर्च करायचे ठरवले होते. गर्दी कमी झाली की जाऊ सावकाश पैसे काढायला असा विचार केला होता.सभा संपल्यावर शुभार्थी उमेश सलगर माझ्याकडे आले आणि म्हणाले,२५ वर्षांनी खांतोळी खातोय. माझी आई करायची.ते  आईच्या आणि बेळगावच्या आठवणीने भावूकही झाले.मला त्यांनी खांतोळी कशी करायची याची कृतीही विचारून घेतली.
आज त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले.त्यावेळी ते म्हणाले,तुम्ही सांगितलेल्या कृतीनुसार मी लगेच खांतोळी केली.दोन ताटे भरून झाली.ऑफिसमध्येही सर्वाना दिली.हालचाली मंदावलेल्या शुभार्थीना स्वयंपाकाच्या अनेक बाबी करताना त्रास होतो. वेगळे काही करावे असा उत्साहही राहत नाही.सलगरनी मात्र असा उत्साह दाखवला.त्यांच्या घरी ते आणि त्यांचा मुलगा दोघेच असतात.त्यांची पत्नी काही वर्षापूर्वी निवर्तली.आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून  त्याच्या आवडीच्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या.हे सगळे सांगताना रडगाण,कुरकुर अशी नव्हती.तर 'आलीया भोगासी असावे सादर' ही वृत्ती होती.पार्किन्सन्सला स्वीकारून असे आनंदी राहणारे शुभार्थी आमचेही मनोबल वाढवत असतात.



No comments:

Post a Comment