Sunday 14 December 2014

खानापूर सहल

 सहल वृत्तांत

                            गुरुवार दि.११ डिसेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल खडकवासला धरणाजवळ डोणजे पानशेत मार्गावरील खानापूर येथील 'सन वर्ल्ड फॉर सिनियर्स' येथे गेली होती.२२ शुभंकर आणि २२ शुभार्थी सहभागी झाले होते.सहा शुभार्थी कोणतीही सोबत न घेता एकटे आले होते.सहा शुभंकर घरात पीडी पेशंट नसताना सहकार्यासाठी सुहृद म्हणून आले होते.
                           दोन वाजता  अश्विनी हॉटेलपासून सहल निघणार होती.दुपारी दिडपासूनच मंडळी जमायला सुरुवात झाली.सर्वांच्या नावाचे बॅच तयार करण्याचे आणि ते सर्वाना देण्याचे काम दीपा होनप करत होत्या अंजली महाजन हजेरी घेत होत्या.शोभना तीर्थळी अजून न आलेले कुठवर पोचलेत हे पहात होत्या.करमरकरांची नेहमीप्रमाणे विविध आघाड्यांवर लगबग चालली होती.सर्व गडबडीत मोबाईल  घरीच विसरले होते.त्यांची मुलगी तो द्यायला आली तर आम्ही बसमधून तिलाच हायजॅक केले.आशा रेवणकर आपले कॉलेजमधील व्याख्यान संपऊन,तर शैलजा कुलकर्णी ऑफिसमधून हाप डे घेऊन थेट आल्या होत्या.सर्व मंडळी आणि बसही वेळेत आली.जसजशी येतील तशी मंडळी बसमध्ये बसत होती.नेहमी बसमध्ये पुढे बसण्यावरून होणारी भांडणे आमच्याकडे कधीच नसतात.बस वेळेत निघाली.ओरिगामीसाठी श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी कागद आणले होते ते सर्वाना देण्यात आले.गाणी ,कोडी अशा गमती करत ३५ किलोमीटर कधी पार केले समजलेच नाही.
 निसर्गाच्या कुशीत वसलेली,सन वर्ल्डची बैठी सुबक देखणी वास्तू स्वागतासाठी तयार होती.गेल्या गेल्या थंड पेयांनी स्वागत झाले.मंडळी स्थानापान्न झाली.डिसेंबर महिन्यातील वाढदिवस असणार्‍या वसुधा बर्वे,शरद सराफ आणि श्री. घुमटकर यांचा हास्याचे फुगे फोडून,हास्याचाच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.अंजलीने त्यांच्यासाठी भेटकार्डे करून आणली होती.सर्वाना सहभागी होता येतील असे विविध बैठे खेळ घेण्यात आले.लगेचच नंबर जाहीर करून बक्षिसे देण्यात आली.
इडली,डोसा,वडा,कॉफी खेळात
 प्रथम क्रमांक  -  शैलजा कुलकर्णी
  द्वितीय क्रमांक -  विजया दिवाणे
 चॉइस बाय मेजॉरीटी हा खेळ शुभार्थी मृत्युंजय हिरेमठ यांनी तयार करून आणला होता.यात
  प्रथम क्रमांक  - अविनाश पानसे
द्वितीय क्रमांक - स्मिता सिधये
ओरिगामी मध्ये
शैला कुलकर्णी - चौफुला
निशिकांत जोशी- विमान
विनया मोडक - शिडाची होडी.
चंद्रकांत दिवाणे - राजहंस
विजय शाळीग्राम - चांदणी
अशा सहा जणांच्या कृती निवडण्यात आल्या.
                     यानंतर' तू बुद्धी दे तू तेज दे ' या शोभना तीर्थळी आणि विनया मोडक यांनी म्हटलेल्या प्रार्थनेने करमणुकीच्या कार्यक्रमाना सुरुवात झाली.केशव महाजन यांनी 'पाकीजा' चित्रपटातील राजकुमारचा आणि 'सौदागर' चित्रपटातील  दिलीपकुमार आणि राजकुमारचे संवाद,'चलरी सजणी' हे गाणे म्हणून टाळ्या मिळवल्या. वसुधा बर्वे यांनी 'खेळ मांडीयेला वाळवंटी घाई'  हा अभंग म्हटला त्या नुकत्याच .संगीताची दुसरी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या म्हणून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.नेहमी वैचारिक आणि माहितीपूर्ण लिहिणार्‍या शेखर बर्वे यांनी स्वरचित कविता म्हणून सर्वाना चकित केले.वसू देसाई यांनी 'प्रत्येक घराला एक दार असत' ही आईच  महात्म्य वर्णन करणारी कविता सादर केली.पद्मजा ताम्हणकर यांनी चारोळ्या म्हटल्या.श्री ताम्हणकरांनी यशवंत देव यानी लिहिलेले विडंबन काव्य म्हटले,मोरेश्वर मोडक यांनीही 'सांग सांग भोलानाथ बायको सुधारेल काय?' आणि पुण्याच्या बारगळलेल्या मेट्रोवरील स्वरचित विडंबन गीते  सादर केली.सौ सराफ यांनी' ईश्वर तुम्हारे साथ हो तो डरनेकी क्या बात है' हे गीत म्हणत आशावाद निर्माण केला.अंजली महाजन यांनी' रुसेन मी भांडेन मी तरी पुन्हा जेवेन मी' हे स्वरचित गीत सादर करत वातावरण थोडे हलके केले.
                     कार्यक्रमाबरोबर बटाटेवडे, ओल्या नारळाच्या करंज्या,चहा असा  अल्पोपाहाराचाही सर्वांनी आस्वाद घेतला.व्यवस्थेमध्ये कुठे कमतरता नाही ना हे पाहण्यासाठी सन वर्ल्डच्या संचालिका रोहिणी पटवर्धन स्वत: जातीने आल्या व उपस्थितांशी संवाद साधला.उगवता सूर्य, कोवळ्या उनातील डोंगर,रात्रीचे पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब अशी निसर्गाची विविध रूपे पाहण्यासाठी मुक्कामाला येण्याचे आमंत्रण दिले.अनेकांनी तशी तयारीही दाखवली.
                     परिसरातला निसर्ग आता सर्वाना खुणावत होता.सातआठ पायर्‍या वर चढून गेल्यावर शंकर हनुमान आणि साईबाबाचे देऊळ आहे.एकदोन शुभार्थी वगळता सर्वजण वर गेले.वरून खडकवासला धरणाच्या  बॅकवॉटरचे विहंगम दृश्य दिसते.संध्याकाळ झाली होती. संथ पाण्यात डोंगरांचे प्रतिबिब दिसत होते.सूर्यदेव  अस्ताला चालले  होते.कोणाचेही पाय हलत नव्हते.पण बुडणारा सूर्याचा लाल गोळा सांगत होता मी चाललो.अंधार होईल तुम्हीही जा सुखरूप. पुन्हा येण्यासाठी.
                     बस आता परतीच्या मार्गाला लागली.सात वाजता अश्विनी हॉटेलपाशी पोचली.सहलीचा थोडा थकवा असला तरी मन ताजीतवानी झाली होती.पुढील काही दिवसांसाठी उर्जा मिळाली.


No comments:

Post a Comment