Wednesday 26 February 2014

पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत - प्रतिक्रिया

                                                            
पार्किन्सन्स डिसीज असे निदान झाल्यावर त्याबाबतचे अज्ञान,अपुरे ज्ञान आणि चुकीचे ज्ञान यामुळे पहिली प्रतिक्रिया असते भीतीची,त्यामागोमाग नैराश्य,एकटेपणा अशा नकारात्मक भावना सुरु होतात.पार्किन्सन्सला स्वीकारण्यासाठी त्याबाबत यथार्थ माहिती आवश्यक आहे. म्हणून पार्किन्सन्स मित्रमंडळाने पार्किन्सन्स साक्षरता हे सुरुवातीपासूनच उद्दिष्ट ठेवले.मराठीतून या विषयावर साहित्य निर्माण करणे हा याचाच भाग.५मे२०१४ला श्री.शेखर बर्वे लिखित पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत हे पुस्तक प्रकाशित झाले.वैद्यकीय क्षेत्रातिल व्यक्ती,शुभंकर,शुभार्थी या सर्वांकडून याचे स्वागत झाले.काहींनी आवर्जून लेखी प्रतिक्रिया दिल्या.त्याचे थोडक्यात संकलन पुढे देत आहे.
डॉक्टर ह.वी.सरदेसाई यांनी आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून पुस्तक संपूर्ण वाचून दिलेली  प्रतिक्रिया आमच्या साठी मोलाची आहे.

डॉक्टर ह.वि.सरदेसाई यांचा अभिप्राय :
     
 " पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत हे पुस्तक संपूर्ण वाचले.एखादा वैद्यकीय व्यावसायिक देखिल या विषयावर इतकी सखोल माहिती देणारे पुस्तक लिहू शकेल किंवा कसे; असे वाटावे इतक्या कौशल्याने आपण हे पुस्तक लिहिले आहे. इतर कुठेही न मिळणारी म्हणजे, इतर उपद्धतीची ओळख त्यांची काय मदत मिळू शकेल या संदर्भातील मार्गदर्शन आहे. पार्किन्सन डिसिज हा आजार अधिकाधिक वाढत असलेला आढळू लागला आहे. लोकसंखेत वाढत्या वयाचा गट अधिकाधिक जास्त संख्येचा होत चालला आहे.त्याचा हा नैसर्गिक परिणाम असावा. पार्किनसन्स झालेल्या रुग्णानी हे पुस्तक तर अवश्य वाचावे. परंतु सर्व कुटुंबियानी, आधार देणा-यांनी देखिल वाचाले पाहिजे.असे हे पुस्तक आहे.या कार्याबद्दल मी आपले अभिनंदन
करतो."

इतर प्रतिक्रिया:

           
वैद्य आश्विनी टोंगे लिहितात. " पुस्तक खूपच माहितीपूर्ण आहे लक्षणे, त्यासाठीची चिकित्सा,व्यायामाचे प्रकार,दैनंदिन जीवनात येणार्या अडचणी आणि त्या सोडविण्यासाठी दिलेल्या उपाययोजना यामुळे रुग्ण आणि त्यांची काळजी घेणारे याना एक प्रकारचा आधार आहे'.

डॉक्टर शिला कुलकर्णी या शुभार्थिनी पुस्तकातील रोगाच्या लक्षणा बरोबर सहज व सरळ भाषेत सांगितलेले उपाय,होमिओपाथी,आयुर्वेद,युनानी असे इतर इतर उपचार पद्धतीतील उपचारउपयोगी पत्ते आणि सुचना या पुस्तकाच्या वैशिष्ट्याबद्दल लिहून "हे पुस्तक वाचनीयच नाही तर संग्रही ठेवण्यासारखे आहे' असे मत नोंदवले आहे.

शुभार्थीश्रीकांत जोशींच्या मते, 'हे पुस्तक म्हणजेशुभार्थीना दीपस्तंभ/अंधारातील वाटाड्या असेच आहे.डॉक्टर नसताना तुम्ही सर्वांगीण माहिती देऊन तुमचे काम केले आहे.आम्हा रुग्णांना ते आचरणात आणायचे आहे.'

नांदेडचे प्राध्यापक सी.व्ही.खानापुरे लिहितात, 'नांदेडसारख्या ठिकाणी या रोगाबद्दल माहिती अजिबात नाही आपले पुस्तक त्यामुळे ह्या रोगाकरता उत्तम मार्गदर्शक आहे'

प्रभाकर लोहार यांनी सुंदर भेटकार्ड पाठून आपल्या भावना व्यक्त केल्या.आणि 'पुस्तकाच्या माध्यमातून आपण पार्किन्सन्स पेशंटच्या अंतरात्म्याचा आवाज प्रगट केला अशी पुस्ती जोडली.'

मो.ची काशीकर या शुभार्थीनी आपल्या दीर्घ प्रतिक्रियेत लेखकाचे आभार मानत आणि अभिनंदन करत' नव्या जुन्या रुग्णांना ते खूपच उपयोगी पडेल 'अशी आशा व्यक्त केली आहे.अत्यंत बारकाईने वाचन करून स्पेलिंग,शुद्धलेखन शब्द योजना याबाबत भाष्य  केले आहे तसेच अभ्यासपूर्ण सुचना दिल्या आहेत.योग्य त्या सूचनांचा पुढील आवृत्तीत   विचार केला जाईल.

जानेवारी मधील मंडळाच्या सभेत शुभार्थी श्री अशोक पाटील यांनी 'पुस्तकात दिलेले व्यायाम मी रोज करतो त्याचा मला खूप फायदा झाला' असे मत व्यक्त केले.

 माझ्या मते, ' पिडिविषयीचे ज्ञान येथे शास्त्रीय भाषेचा किचकटपणा टाळून सोप्या भाषेत येते.लक्षणावर नियंत्रण ही पिडिच्या मैत्रीपूर्ण लढतीतील मोठ्ठी चाल आहे.वैद्यकीय उपचार ही हेच करतात  पुस्तकात विविध लक्षणे आणि त्याबाबत मौलिक सुचना विस्ताराने आहेत. पिडिबरोबर येणार नैराश्य याला नामोहरम करणं हा लढतीतील महत्वाचा भाग आणि तो आपल्या कक्षेतला.पुस्तकातील मानसिक आघातावरील प्रकरण या दृष्टीने महत्वाचे.हे प्रकरण वाचले तरी पार्किन्सन्सशी लढाई निम्मी जिंकता येइल.

तुम्ही एकटे नाही आहात; असा दिलासा देणारे स्व-मदत गटावरील प्रकरण,मित्र,तत्वज्ञ,मार्गदर्शक अशी काळजीवाहकाची भूमिका,रोजच्या जगण्यातील सहाय्य उपकरणाचीतील बदल ,काही उपयुक्त सूचना या सर्वच पिडि शुभंकर शुभार्थींसाठी एकदा वाचण्याच्या बाबी नाहीत तर पुस्तक संग्रही ठेऊन पुन्हःपुन्हः वाचण्याच्या आहेत.पार्किन्सन्सग्रस्तांसाठी हे गीता बायबल आहे.'

एका शुभंकरांनी  माझी पत्नी पोथी वाचल्यासारखे रोज पुस्तक वाचते अशी माहिती पुरवली.आणि माझ्या यां म्हणण्याला दुजोरा मिळाला.



No comments:

Post a Comment