मृदुला कर्णी आमच्या सख्यांमधील एक भक्कम असा मंडळाचा आधारस्तंभ !
विल्यम शेक्सपियर ने म्हटलंय नावात काय आहे ?पण आमच्या या सखीच्या नावात मृदूता आहे,तिच्या वाणीत मृदूता आहे,आचरणात मृदूता आणि तिच्या सर्व कृतीत मृदूता भरलेली असते.
अश्विन महिन्याचा प्रारंभ शक्तीरुपाच्या उपासनेत होतो, म्हणून मंडळाने "स्त्री शक्तीचा जागर "हा उपक्रम राबविला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की,मला मृदुला ताई बद्दल लिहिण्याची खूप छान संधी मिळाली आहे.
खरं सांगू तिचं कौतुक करायला शब्द कमी पडतील इतके तिच्या मध्ये उत्तम गुण आहेत पहिला गुण म्हणजे ती उच्च शिक्षित असूनही अतिशय विनम्रपणे वागते.मंडळाच्या कोणत्याही कामात ती लगेच सहभागी होते. मला एकदा शोभना ताईंचा फोन आला "अंजली संस्थेचे कागद पत्रांचे कपाट आवरायला तू येऊ शकतील का " त्यावेळी मृदुला मंडळात नुकतीच येऊ लागली होती ,माझा तिचा कोणत्या तरी कारणाने फोन झाला व माझ्याकडून तिला कपाट आवरायला मी शोभना ताईंकडे जाणार सांगितले गेले त्यावर तिने ही माझ्या बरोबर येण्याची स़ंमती दर्शवली आणि इतकं वर्षांचं कागदपत्रांच रेकाॅडॆ कसं लावायच ? हा माझा प्रश्न चुटकीसरशी सोडवला सुंदर हस्ताक्षरात कागद पत्रांवर नावे घालून कपाट उत्तम लावून दिले.
या शिवाय तिचा आणखी गुण म्हणजे ती उत्तम सूत्रसंचलन करते त्याची प्रचिती पार्किन्सन्स मित्रमंडळ घ्या वार्षिक मेळाव्यात आणि निपूण धर्माधिकारी यांच्या मुलाखती वेळी घेतलेली आहे.
मृदुला ची सहकार्य करण्याची भूमिका जबरदस्त आहे .नर्मदा मध्ये सभा असायची त्यावेळी ती मला एवढ्या लांब स्कूटी वर जाऊ नकोस माझ्या येथे गाडी लाव आपण दोघी माझ्या कार मधून जाऊ यात . त्यावेळी आमच्या अधिकाधिक गप्पा व्हायच्या त्या गप्पांमध्ये मला समजले "मृदुला ही व्यक्ती साधी नाही ती प्रचंड हुशार आहे तिला विविध विषयांचे ज्ञान आहे आणि तितकेच अनुभव ही आहेत याची प्रचिती मंडळाला तिचा मंडळात जसजसा सहभाग वाढू लागला तेव्हा आली.
साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वानुसार ती राहते ती फार डामडौल करीत नाही.ती एक उत्तम गृहिणी ही आहे खूप छान स्वयंपाक करते एक-दोन वेळा तिच्या घरी तिच्या हातचे पदार्थ सेवन करण्याचा योग आला आणि मी खरचं तिच्या गुणांच्या प्रेमात पडले .
प्रत्येक गुण तिच्यामध्ये वास करतो आहे उत्तम हस्ताक्षर,निटनेटकेपणा, उत्तम संभाषण कौशल्य, सहकार्य वृत्ती वगैरे अशी गुणांची भलीमोठी यादीच तयार होईल .
मला तिच्याकडे पाहिलं की, एकप्रकारची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळत रहाते तिच्याकडून काही जीवन मूल्ये शिकायला मिळाली आहेत आलेला वाईट प्रसंग कसा हळुवार हाताळायचा ? त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न कसे ?कोणते करायचे ?हे सारं मृदुला कडून शिकण्यासारखे आहे.रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना मिस्टरांची आबाळ होऊ नये म्हणून तिने केलेली उपाययोजना खरचं वाखाणण्याजोगी आहे.हे करत असताना स्वतःचे अध्यापनाचे कामही तिचे अतिशय उत्तम होते.
जिद्द , परिश्रम, आणि त्याच बरोबर आत्मविश्वास यांच्या साथीने जीवन आनंदी कसे जगावे याचे उदाहरण म्हणजे मृदुला !
मृदुलाचे मातृछत्र ज्यादिवशी हरपले त्यांच्या दोन दिवसांनी पार्किन्सन्स मित्रमंडळ च्या एका मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी मृदुला वर होती आम्हाला तिच्या आईच्या निधनाची बातमी जेव्हा समजली तेव्हा आता "कसे होणार म्हणून पर्याय शोधू लागलो पण तेवढ्यात मृदुलानेच आम्हाला धिर देऊन सांगितले काळजी करू नका मी कार्यक्रम सादर करीन.केवढी ही कामाबद्दल निष्ठा स्वतः चे दु:ख बाजूला ठेवून कर्तव्यदक्ष रहाणारी हीच खरी नवदुर्गा होय.
मृदुला ला साहित्य,संगीत यामध्ये ही खूप रुची आहे तिनं आणि मी शिक्षण क्षेत्रात काम केलेले असल्याने आमचे एकमेकींशी सूर जुळायला अजिबात वेळ लागला नाही.तिच्या आईची मैत्रीण ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके या होत्या.त्यांच्या सर्वांगसुंदर गीतरचनांना अनुरूप असे संगीत अनेक संगीतकारांनी दिले या बद्दल ती बोलायला लागली की भरभरून आठवणी सांगते.
मृदुलाचे भाषाविषयक ज्ञान खूप छान आहे स्मरणिका चे काम सुरू झाल्यावर तिने प्रुफरिडींगचे काम खूप वेळ देऊन उत्तम प्रकारे पार पाडले . या शिवाय स्मरणिका प्रकाशन झाल्यावर त्या परगावच्या लोकांना पाठविण्यासाठी ही पाकिटांवर सुंदर, वळणावर अक्षरात पत्ते लिहिण्याचे काम ही अतिशय उत्साहात केले त्याबद्दल ही कितीतरी शुभार्थी शुभंकर हितचिंतक यांचेकडून ग्रुपवर अभिप्राय आले ही तिच्या उत्कृष्ट कामगिरी ची पावतीच नव्हे का !
मला आठवतंय एकदा मी सभेस उपस्थित राहू शकणार नव्हते त्यामुळे वाढदिवसाची भेटकार्ड कशी सभेत पोहोचतील या विचारात मी होते आणि अचानक मृदुला ने फोन करून सांगितले तू भेटकार्ड तयार ठेव मी घेऊन जाईल मला खूप आनंद झाला.तात्पर्य कोणाच्याही मदतीला धावून जाणे , कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी मृदुला खूप दक्ष असते.
मंडळाच्या सभांवेळी मृदुला ने अनेक वक्त्यांची ओळख ओघवत्या वाणीत खूप छान करून दिलेली आहे व आभारही मोजक्या शब्दात छान मानलेले आहेत.
असा आमचा मंडळाचा हा आधार स्तंभ खूप भक्कम आहे कोणत्या ही प्रकारची जबाबदारी, मृदुला अगदी हसत हसत स्वीकारते, आणि अगदी उत्तम प्रकारे सहज पणे पेलते.कोणतेही काम फत्ते करूनच मग मृदुला बाजूला होणार हे तिचे वैशिष्ट्य लक्षात राहण्याजोगेच आहे.
पती व आईचे निधना नंतर लगेचच आपले दु:ख कवटाळीत न बसता मृदुला ने पूर्णपणे मंडळाच्या कामात जी मदत केली आहे त्याला तोड नाही.
अशा माझ्या दिलदार ,कामसू, अभ्यासू वृत्ती असलेल्या सखीला पुढील वाटचालीसाठी आणि मंडळाच्या कामांसाठी ईश्वर अखंड यश देवो,व तिला चांगले आरोग्य लाभो ही जगदंबे चरणी प्रार्थना
शब्दांकन
अंजली महाजन
No comments:
Post a Comment