*रिसोर्सफुल पर्सन - अरुंधती जोशी*
' पार्किन्सन्स मित्रमंडळाची स्त्रीशक्ती ' या नवरात्रीनिमित्तच्या लेखमालेत आज आपण ओळख करून घेणार आहोत ती अरुंधती जोशी हिची. अरुंधती खरंतर माझ्या मावशीची मैत्रीण. म्हणून माझी पण मैत्रीण. 5- 6 वर्षांपूर्वी सहज आम्ही गप्पा मारताना मी पार्किन्सन्स मित्रमंडळाबद्दल बोलत असताना ती म्हणाली- " मलाही आवडेल असं काही काम करायला " मग काय पुढच्याच आमच्या कार्यकारिणी सभेला ती आली आणि तेव्हापासून कार्यकारिणी सदस्य म्हणून मनापासून कामही करू लागली.
अरुंधती खरोखरच एक रिसोर्सफुल पर्सन आहे. कोणतं काम कुठं आणि कोण चांगलं करू शकतो, एखादी गोष्ट कुठे चांगली मिळते याबाबतची अद्ययावत माहिती तिच्याकडे नेहमी तयार असते. आमच्या वार्षिक सहलींसाठी तिने सुचविलेली अनेक ठिकाणे - मनाली फार्मस्, अभिरुची फार्मस्, फुलगाव- तुळापूर या ठिकाणी ती स्वतः आधी जाऊन आलेली असल्यामुळे पीडी पेशंट्सना घेऊन जाण्यासाठी या जागा सोईस्कर आहेत हे तिला माहित होते. सहलीआधी तिथल्या लोकांशी फोनवर बोलून ती बारीक-सारीक, पण आमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींची पुन्हा पुन्हा खात्री करून घ्यायची. फुलगाव - तुळापूरला प्रथमच पूर्ण दिवसाची सहल गेली होती. ते धाडस अरुंधतीला खात्री होती म्हणूनच शक्य झाले. त्यासाठी आधी ती, तिचे दीर, शोभनाताई, करमरकरकाका हे सगळेजण तिथे जाऊन पाहणी करून आले होते.
आमच्या वार्षिक मेळाव्यात येणाऱ्या लोकांची नोंद ठेवणे, त्यांना स्मरणिका देऊन त्याचीही नोंद ठेवणे, अभिप्राय नोंदवून घेणे अशी कामेही तिने उत्तमप्रकारे केली आहेत. मासिक सभेच्यावेळी चहावाटपाचे काम, सह्या घेण्याचे काम, आयत्यावेळी लागणारी मदत (कारण आधी कितीही परफेक्ट प्लॅनिंग केले तरी ती लागते) हे सर्व ती उत्साहाने करत असते.
' देणे समाजाचे ' या प्रदर्शनात संस्थेने भाग घेतला होता तेव्हा ती तिथे येणाऱ्यांना आमच्या संस्थेबद्दलची माहिती मनापासून सांगायची.
एरवी कधी तिच्या वैयक्तिक अडचणीमुळे तिला एखादे काम जमणार नसेल तर जसे ती स्पष्टपणे- "नाही जमणार "असे सांगते, तसेच अचानक इतर कुणाला काही अडचणीमुळे नेमून दिलेले काम जमत नाहीये असे लक्षात आल्यावर तेही काम आयत्यावेळी करायला ती तत्परतेने पुढे येते हे तिचे विशेष आहे.
आमच्या एका मासिक सभेच्या आदल्या दिवशी कार्यकारिणीची सभा चालू असताना अचानक कुणाच्यातरी लक्षात आले - उद्या मासिक सभेच्या दिवशीच कोजागिरी पौर्णिमा आहे तर आपण सगळ्यांना चहाच्याऐवजी मसाला दूध द्यायचे का? इतक्या ऐनवेळी सुचलेली ही कल्पना तिने उचलून धरली आणि सगळ्यांसाठी घरी स्वतः मसाला दूध तयार करून आणले. सगळेजण या सुखद आणि अनपेक्षित धक्क्यामुळे खुश झाले होते. मसाला दूध भरपूर आहे म्हटल्यावर दोन- दोन कप दुधाचा आस्वाद घेतला होता.
तिच्या नात्यातील एका प्रिंटरने आम्हाला अत्यंत माफक दरात आमची ब्रोशर्स तयार करून दिली होती. हे सगळं ठरवताना ती स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये 1- 2 वेळा आलीही होती.
गंमत म्हणजे तिच्या खात्रीच्या एका दुकानातून आम्ही एकदा आमच्या ट्रीपच्यावेळी ओल्या नारळाच्या करंज्या बसमध्ये नाश्त्यासाठी आणल्या होत्या. त्या इतक्या सुरेख, अगदी तोंडात विरघळतील अशा होत्या की सर्वांनी पुन्हा पुन्हा मागून घेत सगळ्या फस्त केल्या होत्या. मला खात्री आहे यानंतर त्या दुकानाचा खप नक्कीच वाढला असणार.
तर अशी ही आमची अरुंधती - स्पष्टवक्ती, ठाम विचारांची, मदतीला सदैव तयार, सगळ्यांना कौतुकाने खाऊ घालणारी. तिच्या हया स्त्रीशक्तीला मनापासून सलाम !
शब्दांकन : दीपा होनप
No comments:
Post a Comment