Monday, 11 October 2021

3. पार्किन्सन्स मित्रमंडळाचा अजून एक आधारस्तंभ " झाकल माणिक " - - आशाताई उर्फ विजयालक्ष्मी रेवणकर

 

3.
पार्किन्सन्स मित्रमंडळाचा अजून एक आधारस्तंभ
" झाकल माणिक " - - आशाताई उर्फ विजयालक्ष्मी रेवणकर
कार्यवाह, पार्किन्सन्स मित्रमंडळ.
मित्रहो,नवरात्राच्या निमित्ताने मंडळाच्या कार्यकारिणीतील एकेकीच्या कामाची आणि थोडीशी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्याची कल्पना शोभनाताईंना सुचली.आज,तिसरी माळ. आज आपण ओळख करुन घेणार आहोत ती आशाताई रेवणकर यांची. खर तर अगदी नुकतेच सप्टेंबर अखेरीस, आपण त्यांच मनोगत ऐकले. आशाताईंची ताकद,धैर्य, प्रसंगावधान, संयम, मनोबल हे सारं आपण पाहिलं.शोभनाताईंनी त्यांची ओळख करुन देताना
त्यांना "झाकल माणिक " म्हटलं ते अगदी खर आहे.
अभिमानाने मिरवावे असे अनेक गुण अंगी असताना, त्या कुणाला त्याची कल्पनासुद्धा येऊ देत नाहीत. एका संपन्न सुशिक्षित कुटुंबात जन्म, तश्याच कुटुंबात विवाह ,अस सारं असतानाच रेवणकर काकांचा पार्किन्सन्स पाहुणा म्हणून कायमचाच त्यांच्या घरात आला.याबाबतीत आपण सारेच सहप्रवासी आहोत!! आशाताई, रेवणकर काकांच्या तब्येतीच्या चढऊतारांचा कसा सामना करतात हे साक्षात त्यांच्याकडून आपण ऐकलेच आहे.त्या पार्किन्सन्स मित्रमंडळात कामसुध्दा त्याच तडफेने करतात. तितकेच बारकाईने आणि काळजीपूर्वक करतात. एखाद्या ठिकाणी आमच्यासारख्या नवख्यां बरोबर आशाताई आहेत म्हटल्यावर श्यामलाताई आणि शोभनाताई निश्चिंत होतात.
याचे कारण,संस्था म्हटल्यावर सारासार विचार, संयम, ठेवून सेफ निर्णय घ्यावे लागतात. ते कसब त्यांच्याकडे आहे. भावना आणि कर्तव्याचा सुंदर मिलाफ, त्याला त्यांच्या बहुभाषिकतेची मिळालेली जोड
यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधे असलेला ठामपणा आपल्या मित्रमंडळाच्या वाढीसाठी पोषक आहे.
2008,सालापासून, आपल्या मंडळाबरोबर जोडलेले त्यांचे नाते,उत्तरोत्तर इतके द्रुढ होत चालले आहे, की पुण्यातील अनेक नामांकित डाॅक्टर्स त्यांना सपोर्ट ग्रुप च्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून आदराने ओळखतात. आणि ही सारी डाॅक्टर मंडळी आशाताईंच्या शब्दावर आपल्यासाठी उपलब्ध होतात.डाॅ.प्रयाग,डाॅ.राहुल कुलकर्णी,डाॅ.अमोल रेगे,डाॅ. अमोल तळवलीकर ,डाॅ. फडके ,डाॅ.पराग ठुसे हे सारे आशाताईंचे, कार्यकर्त्यां म्हणून डाॅक्टरांशी असणार्या ओळखीचे फलित आहे.
सपोर्ट ग्रुप मधे,आशाताई अक्षरशः Jack of All आहेत . बँकेचे व्यवहार, स्मरणिका निर्मिती,लेखांचे अनुवाद,कार्यक्रमांचे सूत्र संचालन,शुभार्थींचा विचार करून नियोजन करणे मग ते वार्षिक सहल असो वा जागतिक पार्किन्सन्स दिनाचा कार्यक्रम असो त्यासाठी सोईचे ठिकाण ठरविणे ,प्रमुख वक्त्यांची ऊठबस.,ऐनवेळी उद्भवणारे प्रसंग हाताळणे.....आणि घरामधे रेवणकर काकांसारखे शुभार्थी! हे सारे सांभाळणारी ही बुध्दीवादी सखी ,मंडळाची शान आणि प्रेरणा आहे...तिला मनःपूर्वक सलाम!
शब्दांकन : मृदुला कर्णी

No comments:

Post a Comment