अंजली महाजन - पंचम आधारस्तंभ
आमची अंजली महाजन म्हणजे उत्साहाचे कारंजे.तिच्या जीवनात दु:खाचे, सत्व परीक्षा घेणारे प्रसंग आले आणि गेले. किंचित काळ अंधारले आणि पुन्हा लक्ख उजेड.तिची ही सकारात्मकता सळसळता उत्साह थक्क करणारी कल्पकता आणि उर्जा, घेऊन ती मंडळात सामील झाली.ती एका शाळेची मुख्याध्यापिका असल्याने ते काम आणि घरी अति जेष्ठ वयस्क सासू आणि पिडी असलेला नवरा हे सांभाळून ती मंडळाची कामे करत होती.
हिच्या नसानसात सामाजिक जाण भरलेली आहे. ती विद्यार्थ्यांपर्यंत तिला पोचवायची असायची मग मंडळाच्या कार्यक्रमात नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने विद्यार्थ्यांना कामाला लावले.जुन्या पत्रिका साठवून त्यातून भेटकार्डे करायला तिने शिकवली.मंडळातील सर्व सभासद ही भेटकार्डे पाहून खुश झाले.संक्रांतीला तिने हलव्याचे बॉक्स करवून घेतले.त्यातून सर्वाना तिळगुळ दिला.निवृत्त झाल्यावर सर्वांच्या वाढदिवसाला ती भेटकार्डे करून आणू लागली.करोनामुळे प्रत्यक्ष सभा बंद होईपर्यंत तिचे हे काम चालू होते. इतरांना अवाक करणारे तिचे अनेक उद्योग
सातत्याने सुरू असतात.निवृत्तीनंतर ती मंडळाला अधिक वेळ देऊ लागली.
साध्यासाध्या गोष्टींचाही ती उत्सव करते वार्षिक मेळावा,सहल यावेळी तर तिच्या उत्साहाला उधाण येते.मेळाव्यासाठी मार्केटयार्डला जावून चाफ्याची फुले आणणे,केशवरावांच्याकडून कलाकृती करून घेणे,ईश्स्तवनात सहभाग घेणे या शिवाय सोपवलेले कुठलेही काम ती सक्षमपणे करतेच.पण आम्हाला कोणालाही न जमणारे एक काम ती करते ते म्हणजे वृत्तपत्राना निवेदने देणे,कार्यक्रमाची बातमी छापून आणणे.मासिकात,वर्तमानपत्रात पार्किन्सनविषयी लेख देणे,आपल्या ओळखीने आमच्याकडून लिहून घेऊन देणे इत्यादी.या साठी उन्हातान्हातून स्वत.वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये ती जायची.तेथे कोणी ना कोणी विद्यार्थी भेटायचे.नंतर मेल वरून देवू लागली. तिचे विद्यार्थी आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात.त्यांचा आमच्या कामासाठी ती उपयोग करून घेते.यात सहलीसाठी बस मिळवणे,बॅनर बनविणे,मेळाव्यात रांगोळी काढणे अशा गोष्टी तिच्या विद्यार्थ्यांनी केल्या.
सहल आनंदवन सारखी मोठ्ठी असो की कि लहान वार्षिक सहल असो,अंजलीशिवाय रंगत नाही.अशावेळी तिच्यातली शिक्षिका बसमध्ये हजेरी घेण्यापासून कामाला लागते आणि सहभागी ही लहान मुले बनतात सहलीचा आनंद घेतात.सगळ्याना या शिक्षिका मग गोळ्या देतात.सहलीत करमणुकीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हा तिचा हातखंडा.बसमध्ये असो की करमणुकीच्या कार्यक्रमात गाणी लागली की तिची पावले थिरकतात.इतरही लाज सोडून हळूहळू सामील होतात.
तिचा लेख नाही अशी एकही स्मरणिका नाही.संपादन,पृफ्र रिडींग यातही ती सहभागी असते.आत्तापर्यंत तिच्यावर मी अनेकवेळा लिहिलेले आहे.तरी लिहायचे राहिले असेही खूप आहे. येथे मी मंडळाच्या कामापुरते लिहिण्याची मर्यादा घालून घेतली आहे.मंडळाच्या कोणत्याही कामासाठी,केंव्हाही हाक मारा ती हजर राहणारच असा आम्हा सर्वाना तिच्याबद्दल विश्वास वाटतो.असा हा मंद्लातले वातावरण आनंददायी ठेवणारा भक्कम स्तंभ.
No comments:
Post a Comment