Friday, 25 December 2015

phulgav sahal

      १० डिसेंबर २०१५ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल,फुलगाव येथील' इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट'येथे  गेली होती.४० वर्षापासून ते ८२ वर्षापर्यंतच्या .३६ शुभंकर शुभार्थिनी  सहलीत सहभाग घेतला यावर्षी  प्रथमच दिवसभराची सहल होती.अश्विनी हॉटेलमध्ये नऊ वाजताच मंडळी जमायला सुरुवात झाली.श्री दत्तात्रय जोशी यांनी सोनचाफ्याच्या फुलापासून तयार केलेले खास नैसर्गिक अत्तर सर्वाना लावले आणि वातावरण सुगंधित केले.अरुंधती जोशी,अंजली महाजन. सर्वाना बिल्ले देण्याचे काम करीत होत्या. प्रफुल्ल उपलप अंजली उपासनी या नव्याने  सामील झालेल्या स्वयंसेवकानी. अगदी वेळेत आलेल्या व्यक्तीना बसमध्येच बसवले आणि त्यांच्यापर्यंत बिल्ले पोचवले.
बसमध्ये माईक असल्याने सूचना देणे सोपे गेले. दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा रामचंद्र करमरकर यांनी सांगितली.सुरुवातीला आणि प्रत्येक थांब्यावर हजेरी घेण्याचे काम अंजली करत होती.वय आणि पार्किन्सन्स विसरून सर्वांनी सहलीचा आनंद लुटा.हे अंजलीचे आवाहन सर्वांनी मनावर घेतेले.अंत्याक्षरी खेळता खेळता कधी फुलगाव आले समजलेच नाही.
तेथे चहाची व्यवस्था केलेली होती.शुभार्थी सुशील श्रॉफ यांच्या पत्नी प्रथमच मंडळाच्या उपक्रमात सामील झाल्या होत्या.त्यांनी ढोकळा करून आणला होता.सर्वाना देण्यासाठी द्रोणही चहापान करून लगेचच तुळापुर येथील संगमेश्वर मंदिर आणि संभाजीची समाधी  पाहण्यासाठी सर्व रवाना झाले.केशव महाजन हे फुलगाव येथेच थांबले. त्यांच्या बरोबर प्रफुल्ल उपलप थांबल्याने अंजली महाजन तुळापुरला येऊ शकल्या.भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमावर असल्याने येथील शिवमंदिराला संगमेश्वर मंदिर नाव पडले.देऊळ प्राचीन आणि हेमाडपंती शैलीतील आहे.परिसर सुंदर आहे.नव्वद सालानंतर निरगुडकर फौंडेशनने मंदिराचा जीर्णोद्धार  केला.संभाजीमहाराजांची समाधी त्या भोवती ऐतिहासिक दृश्ये दाखवणारी पेंटिंग होती.खाली पायर्या उतरून गेल्यावर नदीचा संगम आहे.ज्याना शक्य आहे ते सर्व तेथे जाऊन आले.परिसरात ताक,ताज्या भाज्या विकावयास बसले होते. स्वस्त ताज्या भाज्या अनेकांनी घेतल्या.
जेवणासाठी सर्व मुळ मुक्कामी आले.पाने वाढून तयारच होती.भाकरी,पोळ्या,भरल वांग,झुणका,शेवग्याच्या शेंगा घातलेली आमटी,भाजलेला पापड,दाण्याची चटणी आणि गुलाबजाम असा बेत होता.गरम गरम चुलीवरून ताटात भाकर्या येत होत्या.प्रेमाने आग्रहाने वाढले जात होते.
जेवणानंतर हॉलमध्ये खेळ आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था केलेली होती.गाडीनेच तेथे सर्वाना सोडण्यात आले.जेवणाच्या ठिकाणी आणि या हॉलमध्येही शुभार्थीसाठी आमच्या मागणीनुसार संस्थेने चार कॉट  तयार ठेवल्या होत्या.अनेकाना अशी गरज लागेल असे वाटले होते. परंतु केशव महाजन आणि डीबीएस सर्जरी झालेले सुरेश सिधये वगळता कोणाला आडवे पडण्याची गरज वाटली नाही.
खेळण्यास सुरुवात झाली.शुभार्थी श्री. चंद्रकांत दिवाणे आणि विजया दिवाणे यांनी लेखक ,कलाकार ओळखा असा खेळ तयार करून आणला होता.कागदावर उत्तरे लिहायची होती.सर्वांनी उत्साहाने भाग घेतला.शरच्चंद्र पटवर्धन याना प्रथम आणि शोभना तीर्थळीयाना द्वितीय क्रमांक मिळाला.

स्वत:च्या हस्ताक्षरात खेळ तयर केल्याने प्रथम द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांबरोबर दिवाणेनाही बक्षीस देण्यात आले.यानंतर मोडक यांनी रिंग टाकण्याचा खेळ आणला होता पाच बक्षिसेही आणली होती.त्यातही सर्व शुभार्थिनी सहभाग घेतला.महेंद्र शेंडे प्रथम,शिल्पा कुलकर्णी द्वितीय,shri गायाल तृतीय,यशवंत एकबोटे आणि विजया मोघे याना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.शरच्चंद्र पटवर्धन यांनी यानंतर ओरीगामिसाठी तयार करून आणलेले कागद देण्यात आले.शैलजा कुलकर्णी आणि विजया दिवाणे यांचा पहिला आणि दुसरा क्रमांक आला.
अंजली महाजनने काही शुभंकर शुभार्थीवर कविता करून आणल्या होत्या.त्या व्यक्ती ओळखायच्या होत्या.या खेळानेही गंमत आणली.आता चहा आला होता.चहा घेता घेतां करमणुकीचे कार्यक्रम करण्यात आले.
विजया मोडक यांनी भक्तीगीत,अंजली महाजनने विडंबन गीत,श्रद्धा भावे आणि आशा रेवणकर,रमेश घुमटकर यांनीही विनोदी कविता चुटके सांगितले.अंजली उपासनी यांनी केळीच्या पानात जेवण्याचे विशेषत: पीडी पेशंटना होणारे फायदे सांगितले नोव्हेंबर महिन्यातील मंडळाच्या कार्यक्रमासाठी विठ्ठलाची गाणी कार्यक्रम सादर केलेले महेंद्र  शेंडे सहलीस आवर्जून आले होते.त्यांच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. गीताला सर्वांनी साथ दिली.
परतीची वेळ झाली होती. वाटेत स्वरूपानंद यांचा आश्रम आहे.तो पाहून बस पुण्याकडे परतली.परतताना अंत्याक्षरीऐवजी श्री. मोडक यांनी जुनी हिंदी गाणी आणली होती.ती लावली.ठेका धरायला लावणाऱ्या त्या गाण्यावर अंजली महाजन आणि अंजली उपासनी यांची पावले चालत्या बसमध्येच थिरकायला लागली.सहल संपत आली तरी मने अजून मागेच रेंगाळत होती.अनेक दिवसांसाठी उर्जा घेऊन मावळतीच्या  आतच सर्व पुण्यात पोहोचले.
तस 
लतर 






Friday, 4 December 2015

पार्किन्सन्स न देखे सान पार्किन्सन्स न देखे थोर

           

                                      
                                          पार्किन्सन्स न देखे सान (बालवयातील पार्किन्सन्स )
                           नुकतेच  बालवयात पीडी झालेल्या एलीसाचे अनुभव दिले होते.पार्किन्सन्स मित्रमंडळात काम करतानाही बालवयात पीडी झालेले पेशंट आढळले. 

                            ११ एप्रिल च्या पार्किन्सन्स दिनानिमित्त मी दैनिक केसरीमध्ये 'पार्किन्सन्सला दिली ओसरी' नावाचा लेख दिला होता.तो वाचून दिवाकर सोनावणे नावाच्या मुलाच्या आईचा फोन आला होता.त्या शेतकरी कुटुंबातील होत्या.दिवाकरला १२व्या वर्षापासून पार्किन्सन्स आहे अस त्या म्हणत होत्या.त्यांचा फोन मी लिहून घेतला होता.त्या पुंण्याला होणार्‍या सभेला येणार होत्या.स्वारगेटपासून कस यायचं हेही त्यांनी विचारून घेतलं होत.त्या आल्याच नाहीत.त्यांनी दिलेल्या फोनवर फोन लागत नाही.परंतुत्यांच्याकडे माझा फोन असल्याने कधीतरी पुन्हा फोन येईल म्हणून मी वाट पाहतेय.
                          बालवयात पीडी झालेली एक मुलगी मात्र बाबा आमटेंच्या आनंदवनात प्रत्यक्ष भेटली.तीच नाव मंजुळा वारकूजी झिंगटे.डॉक्टर भारती आमटे यांनी तिची गाठ घालून दिली.आनंदवनातील शिलाई विभागात ती काम करत होती.पाहिल्यावर पेशंट वाटलीच नाही.आनंदवनात आली तेंव्हा तिचे सर्व अंग हलत होते.भारती ताईनी इथ आलीस तेंव्हा कशी होतीस सांग अस म्हटल्यावर तिने थोडे वाकून सर्व अंग हलवून दाखवले.तिच्या आईवडिलांनी कसलीतरी बाधा झाली असावी या कल्पनेने अंगारे धुपारे केले.काही फरक पडण शक्यच नव्हत. मग अपंग म्हणून इथ आणून सोडले.भारतीताईनी तिला वर्ध्याला सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये पाठवल तेंव्हा तिथल्या एम.एम.पाटील या न्युरॉलॉजिस्टनी पार्किन्सन्सच निदान केल.तिला लगेच सिडोपाच्या गोळ्याही सुरु केल्या.तीच अंग थरथरण थांबल.मंजुळाच्या मते आधी तिला खूप गोळ्या होत्या.डॉक्टर म्हणाले तुला आयुष्याबर गोळ्या घ्यायच्या आहेत तेंव्हा हळूहळू गोळ्या कमी करत आता ११० mg ची सिंडोपाची एक गोळी आहे.मला विश्वासच बसत नव्हता.तिने सेवाग्रामच प्रिस्क्रिप्शन दाखवलं.तिच्या डॉक्टरांना याबाबत नीट विचारावस वाटलं पण ते बदली होऊन दुसरीकडे गेले होते.मंजुळाच्या सांगण्यावरून ते तिच्या केसमध्ये  खूपच रस घेत होते.
                  आज .मंजुळा २९ वर्षाची आहे तीला १२व्या वर्षी पीडी झाला असे गृहीत धरल्यास तिला १७ वर्षे पीडी आहे.ती १८व्या वर्षापासून म्हणजे११ वर्षे गोळ्या घेते.पण अजूनही १च गोळी आहे.गोळ्या वाढलेल्या नाहीत.आनंदवनातल्या वातावरणात मिळणार्‍या सकारात्मक उर्जेचा परिणाम असावा का? असे मला वाटून गेले.मंजुळाचा आनंदवनच्या ऑर्केस्ट्रात काम करणार्‍या मुलाबरोबर प्रेमविवाह झाला.काही दिवसांनी तिच्या नवर्‍यानी आनंदवन सोडलं हीपण त्याच्याबरोबर सासरी गेली.आनंदवनाच्या वातावरणात वाढलेली ती सासरी रमू शकली नाही.ती एकटीच आनंदवनात परतली.इथ तिच्यावर योग्य औषधोपचार होतात.
                   मला मंजुळाचा फोटो काढायचा होता.ती म्हणाली ताई उद्या काढा ना.फाईलही दाखवायला आणीन.दुसर्‍या दिवशी ती नटूनथटून आणि असतील नसतील तेवढी कागदपत्रे घेऊन आली.पुनःपुन्हा ती तिच्या अपंगत्वाचा दाखला दाखवत होती.अपंगत्वाच्या नावाखाली तिला येथे प्रवेश मिळाला होता प्रत्यक्ष पाहताना मात्र ती अपंग वाटत नव्हती.कदाचित अपंग नाही म्हणून जा म्हणतील अशी तिला भीती वाटत असावी मंजुळाचा मोबाईलवर काढलेला फोटो सोबत दिला आहे.
               

                    
                                    





दुसरी २० वर्षापूर्वी पीडी झालेली व्यक्ती म्हणजे राजकुमार जाधव.आज ते ६० वर्षाचे आहेत.ऑफिस बॉय म्हणून एका ठिकाणी काम करतात.२/३ वर्षे मी त्यांना भेटायचा प्रयत्न करत होते.फोनवर नेहमी बोलण व्हायचं.त्यांच्या मते त्यांच्या आईला पार्किन्सन्स होता त्यांनी आईची खूप सेवा केली.१९व्या वर्षी स्वत:ला लक्षणे दिसायला लागल्यावर लग्न न करण्याचा निर्णय घेतला.त्याना कंप आहे.ते कोणताच उपचार  घेत नाहीत.न्युरॉलॉजिस्टलाही त्यांनी दाखवलेला नाही.त्याना पीडीच आहे का याबद्दल मला शंका वाटली.
                       २६ मेच्या TNN मध्ये १५ वर्षाच्या मुलावर DBS सर्जरी केल्याची बातमी होती वडोदराच्या या हितेषु दवे या मुलाला १२ व्या वर्षीच पार्किन्सन्सच निदान झाल होत.
पीडी हा वृद्धांचा आजार अस म्हटलं जात असल तरी बालवयातील आणि तरुण वयातील पीडी केसेस आढळू लागल्या आहेत.आमच्या सभासदत तरुण वयात पीडीझालेल्यांची संख्या २०/२५ तरी आहेच त्यावर ही लिहायचच आहे.

                                  





                        

Sunday, 27 September 2015

आजचा दिवस ऑर्थरायटीसचा सपोर्टग्रुप

२६ - ९ - १५
आजच्या दिवसाची सुरुवातच छान झाली.सुमनताई जोग यांचा सकाळीच फोन आला.खणखणीत आवाज,विचाराची स्पष्टता,रोकठोक बोलण,बोलण्याला कृतीशीलतेची जोड.ही त्यांची वैशिष्ट्य.शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात प्राध्यापकी केलेले अरुण जोग आणि सुमनताई, अरुण जोग याना झालेल्या पार्किन्सन्समुळे आमच्या परिवारात सामील झाले.दोघही सभा,सहली यात उत्साहाने सहभागी व्हायचे.अरुण जोग यांच्या ऐवजी वॉकर घेऊन येणार्या सुमन ताईच पेशंट वाटायच्या.त्याना अनेक आजार आहेत त्यांची वेगवेगळी  ऑप्रशनसही झालेली आहेत.आता तर बर्‍याचवेळा त्यांचा एक पाय घरात आणि एक पाय हॉस्पिटलमध्ये अशी परिस्थिती असते.पण खणखणीत आवाज,आणि काहीतरी करत राहण्याची जिद्द हा स्थायीभाव.
ऋषीकेशच्या  नृत्योपाचारासाठी  सुमन जोग यानी आपली जागा देऊ केली.एक एप्रील २०११ पासुन आठवड्यातून तिन दिवस सकाळी त्यांच्याकडे नृत्यवर्ग चालतो .अरुण जोग स्वतः शुभार्थी असल्याने प्रयोगात सामील ही झाले.मध्यंतरी त्यांचे दु:खद निधन झाले सुमन जोग काही दिवसासाठी अमेरीकेला गेल्या पण नृत्यवर्गासाठी जोगांचे घर खुलेच आहे.आमच्या कार्यकारिणीच्या मिटिंगसाठीही त्यांचे घर केंव्हाही खुले असते.त्यांच्या हॉलमध्ये इतरही उपक्रम चालू असतात.
आज त्यांचा फोन आला होता तो,त्या ऑर्थरायटीसचा सपोर्टग्रुप काढताहेत हे सांगण्यासाठी.याची पहिली सभा ११ ऑक्टोबरला भारतीनिवास हॉलमध्ये होणार आहे.याबद्दलची माहिती मंडळाच्या सभेत द्यावी अशी त्यांची इछ्या होती.याची बरेच दिवस आधी पूर्व तयारी चालू होती.घरातून कोणाच्या मदतीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही,जिला घरातही मदतनिसाची गरज आहे अशी पंचाहत्तरी ओलांडलेली बाई सपोर्ट ग्रुप चालू करायचा विचार करु शकते.मी आवक झाले होते.सुमनताई सलाम तुमच्यातल्या उर्जेला.

Sunday, 21 June 2015

कोष्ठबद्धता - श्री.शरच्चंद्र पटवर्धन

       
                                      
      पार्किन्सन्सच्या पेशंटबाबतीत कोष्ठबद्धता ही इतकी सर्वसामान्य समस्या आहे,की कोष्ठबद्धता हे पार्किन्सन्सचे लक्षण मानण्याकडे लोकांचा कल होतो आहे.पार्किन्सन्सचा आजार नसलेल्या अनेक लोकांना,विशेषतः वृद्धांना कोष्ठबद्धता ही समस्या असते.त्या इतराना ही समस्या का जाणवते,त्यासाठी कोणते उपाय अवलंबिले जातात.ते पाहू आणि पार्किन्सन्सच्या पेशंटच्या बाबतीत काही वेगळी कारणे आहेत का तेही पाहू.
             कोष्ठबद्धता म्हणजे काय?
             बहुधा सर्व भारतात किमान  महाराष्ट्रात तरी, एक विचार संस्कारासारखा आपल्या मनावर ठाकून ठोकून रुजवला गेला आहे,की मलविसर्जन दिवसातून एकदा तरी व्हायलाच हवे,आणि तेही शक्यतो उठल्याउठल्या पहिल्याप्रथम.आता हा जो उत्तरार्ध आहे तो पूर्वी घरात संडास नसायचे,मलविसर्जानासाठी परसाच्या कडेला किंवा रानात जायला लागायचे.त्यामुळे दिवसा त्याकामासाठी बाहेर जायला वाटणार्‍या संकोचामुळे असेल,पहाटेपहाटे हे काम उरकण्याची गरज पूर्वी भासत असेल; पण हल्ली सकाळी उठल्याउठल्या मलविसर्जनासाठी जातो असे शहरातील कितीजण म्हणू शकतील? उठल्यानंतर अर्धा पाउण  तासानंतर जायचे ही सरासरी वेळ.पुष्कळाना सकाळचा नाश्ता झाल्यानंतर जाणे सोयीचे वाटते.
            एखाद्या दिवशी मलविसर्जन झाले नाही,तर शरीर प्रकृतीत बिघाड झाला असे मानायची गरज नाही. डॉक्टरही सांगतात, की नॉर्मल-धडधाकट प्रकृती असलेले लोकही कित्येकवेळा आठवड्यातून तीनदा किंवा दोनदाच मलविसर्जन करतात.इतकी कमी वारंवारताही अयोग्य किंवा अस्वाभाविक मानली जात नाही; परंतु प्रत्येक व्यक्तीची याबाबतीतील प्रमाण वारंवारता वेगवेगळी असेल हेही मान्य करावे लागेल.
           कोष्ठबद्धता टाळण्याच्या दृष्टीने कोणते उपाय सुचविले जातात?
            १) पुरेसे घन अन्न खाणे.- भात वरण,भाजी,भाकरी,पोळी,फळे अशा प्रकारचे पुरेसे घन अन्न पोटात जाऊ द्या.चावण्याचा किंवा गीळण्याचा त्रास असेल,तर कुटून,वाटून,मिक्सरमध्ये बारीक करून,लापशी स्वरूपात खावे; पण घन अन्न पोटात जायलाच हवे.या घन अन्नाचाच काही अंश मल म्हणून शरीराबाहेर पडतो.
           २) शरीराची हालचाल होत राहू  द्या - शक्य तितकी जास्त स्वत:ची,अन शक्य तर घरातील दुसर्‍यांचीही कामे करा.नाही तर बागकाम,चालणे,खेळणे,व्यायाम करा.नुसते बैठे काम करणार्‍याला कोष्ठबद्धतेचा त्रास होण्याची संभाव्यता जास्त असते.भूक लागण्यासाठीही हालचालीतून घडणारा व्यायाम आवश्यकच  आहे.रात्री व्यवस्थित झोप लागण्यासाठीही हालचालीतून घडणारा व्यायाम आवश्यकच  आहे.रात्री झोप लागण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे.आणि चलनशिलता टिकवण्यासाठीही फायदेशीर आहे.
अगदी पायाचे हाड मोडले म्हणून चालता येत नाही,अशी स्थिती असली तरी अंथरुणात निजल्यानिजल्या करण्याजोगे व्यायाम असतात,ते करावेत,खुर्चीत बसूनही करण्याजोगे व्यायाम असतात,ते करावेत.
          ३) आहारात पालेभाज्या,फळे शक्य तितकी जास्त प्रमाणात असू द्यावीत.तंतुमय पदार्थ पोटात जायला हवेत.फळांचे रस प्यावेत;पण शक्य तर न गाळता..तंतुमय पदार्थ पोटात जायला हवेत या दृष्टीनेच ही सूचना.
         ४)आहारात मैद्याचे पदार्थ शक्यतो नकोत,मग ते बेकरीतले असोत वा घरी केलेलेही असोत.जीव्हांलौल्यासाठी खावेसे वाटतातच;पण मग याचे प्रमाण शक्यतो कमी ठेवा.
         ५) सकाळी उठल्याउठल्या तीनचार भांडी गरम पाणी पिण्याचा मलविसर्जनाच्या दृष्टीने फायदा होतो.एकंदरीत दिवसभरात संध्याकाळपर्यंत शक्य तितके पाणी प्यावे.मल व मुत्र दोन्हीच्या विसर्जनासाठी त्याचा फायदा होतो.रात्री सातनंतर पाणी पिण्याचे प्रमाण कमीच असावे.अन्यथा मध्यरात्री मुत्रविसर्जनासाठी.उठावे लागून त्यानंतर झोप लागलीच नाही असा धोका संभवतो.
          ६) पाठीचा कणा ताणणारे व्यायाम, तसेच पोटाची घडी करणारे व्यायाम करावेत.पोटाचे स्नायू आत ओढायचे,ढिले सोडायचे, पुन्हा आत ओढायचे, ढिले सोडायचे,हा व्यायाम पोटाच्या स्नायुना अधूनमधून द्यावा.
            पार्किन्सन्समध्ये इतर स्नायूंबरोबरच आतड्याचे स्नायूही दुर्बल झालेले असतात.त्यामुळे पार्किन्सन्स हे कोष्ठबद्धतेचे आणखीन एक कारण आहे,असे म्हणता येईल.आतड्यांच्या स्नायूंची दुर्बलता याच कारणामुळे रेचकाचा ओव्हरडोस किंवा कडक रेचकाचा परिणाम, क्रियेवर रेचकाचा ताबा न राहता मलमूत्रविसर्जनास सुरुवात होऊ शकते.म्हणून शक्यतो रेचके टाळावीत.अगदीच आवश्यकता वाटल्यास सौम्य रेचकाचा वापर करावा.
            पार्किन्सन्सची काही औषधे कोष्ठबद्धता वाढवितात असा काही पेशंटचा अनुभव आहे; पण त्या औषधांचा फायदा जास्त असेल,तर आपण हा छोटासा साईडइफेक्ट चालवूनही घेऊ शकू.पार्किन्सन्सचा पेशंट किंवा दुसरा कोणी - अंथरुणावरून खुर्चीवर आणि खुर्चीवरून अंथरुणावर इतकीच हालचाल असेल, तर मलावरोध होणे अगदी स्वभाविकच  आहे.म्हणून कार्यशील राहणे हा महामंत्र लक्षात ठेऊन वर सांगितलेल्या सूचनांचा अवलंब केल्यास कोष्ठबद्धता ही समस्या बहुधा जाणवणारच नाही.किमान आटोक्यात राहील,सह्य राहील.
 शरच्चंद्र पटवर्धन  परिचय - शरच्चंद्र पटवर्धन हे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य आहेत.
 १९९२ मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर विविध माध्यामातून बरीच माहिती गोळा केली.डॉक्टर मोहित भट यांचेकडून पार्किन्सन्स फौंडेशन ऑफ इंडियाबद्दल समजल. त्यांचे सभासदत्व घेण्याचा व इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण विशेष प्रतिसाद मिळाला नाही.मग आपणच का असा गट सुरु करायचा नाही या कल्पनेतून २००० मध्ये पार्किन्सन्स स्वमदत गट सुरु केला.आज ८० वर्षाचे होऊनही  ते पूर्वीच्याच जोमाने कार्यरत आहेत.पार्किन्सन्सवरील चालताबोलता कोश असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल.शुभार्थींच्या समस्यांचा बारकाईने अभ्यास करून त्याबद्दल मंडळाच्या सर्वच स्मरणिकेतून त्यांनी मौलिक लेखन केले आहे.
सदर लेख  ११ एप्रिल २०१२ च्या स्मरणिकेतून घेतलेला आहे.

Thursday, 21 May 2015

शेंडे साहेब- डॉक्टर विजय देव

           






             






                    मधुसूदन चिंतामण शेंडे आणि श्यामला मधुसूदन शेंडे या भारदस्त नावाच्या दांपत्याशी माझी ,आमची ओळख नेमकी केंव्हा व कशी झाली ते नेमके आठवत नाही.स्वभाविकच आहे;योगापेक्षा सह्ज योगाने निर्माण झालेले मैत्र 'तिथीबारच न क्षत्र ' प्रमाणे आठवत नाहीच!
                 त्याच अस झाल,की तुळशीबागवाले कॉलनीतील श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या क्रीडांगणाला फेर्‍या मारणार्‍या आम्हा काही मित्रांना शेंडे भेटले ते प्रभात फेरी मारताना.आठवत एव्हढच, की एक उमदा देखणा गृहस्थ ओळख करून घ्यायला आणि द्यायलाही स्वत: पुढे आला.
'मी मधुसूदन शेंडे तुळशीबागवाले कॉलनीतील धोमकर रस्त्यावर 'अमितदीप' या इमारतीत राहतो.ही माझी पत्नी श्यामा.सिव्हील इंजिनीअर म्हणून देशविदेशात चाळीस वर्षे काम केल आणि आता सेवानिवृत्त होऊन मस्त जगायचं ठरवून परत पुण्याला आलो आहे.'
              बहुधा ते वर्ष असाव १९९६ .महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबर.त्या ओळखीनंतर एम.सी.शेंडे याना आम्ही सगळेच शेंडे साहेब म्हणू लागलो.ठरवून नव्हे अगदी सहज.देशविदेशात मोठे आणि महत्वाचे बांधकाम प्रकल्प राबविणारे मधुसूदन शेंडे एखाद्या ब्रिटीश साहेबासारखेच वाटले.
             लवकरच विश्वास बसणार नाही अशी स्वत:विषयीची हकीकत शेंडे साहेबांनीच सांगितली.'मला पार्किन्सन्स डीसिजचा त्रास आहे'.'१९९३मध्ये तो लक्षात आला.'
           खर सांगायचं तर पार्किन्सन्स आणि 'अल्झायमर्स' या  आजारराविषयी केवळ ऐकून होतो.शेंडे साहेबांमुळे पार्किन्सन्स  कळत गेला.माझ्या धाकट्या कन्येने 'अल्झायमर्स'नावाच्या एकांकिकेत तो आजार झालेल्या तरुणीची भूमिका केली होती.प्रेक्षकांच्या ती चांगलीच अंगावर आली होती.
            धरण,रस्ते आणि इमारती रचण्याचा उद्योग कलेल्या शेंडे साहेबाना शरीर रचना शास्त्र बर समजत असाव.कारण मुळात मेंदूचा विकार असलेल्या पार्किन्सन्सचा शरीरावर कसा परिणाम होतो हे त्यांनी तितक्याच सहजपणे सांगितलं.जितक्या सहजपणे बांधकाम प्रकल्पाविषयी सांगत.
           शेंडे साहेब हा तसा गप्पिष्ट माणूस.गोष्टीवेल्हाळ म्हणावा इतका.स्वत:विषयी सांगता सांगता दुसर्‍याविषयी जाणून घ्याव याची खूप हौस असते.त्याना.स्वत: बोलतील आणि दुसर्‍याला बोलत करतील हा त्यांचा स्वभाव.निरनिराळ्या विषयावर इंटर अ‍ॅक्शन झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह.त्यांच्या या स्वभावाचा खरा अनुभव आला तो आमच्या 'हिंडफिरे' गटाच्या सहलीमधून.आम्ही पाच दांपत्ये,दोन साठे,एक कानडे,एक देव आणि एक शेंडे.सहली काढायची टूम काढली तीही बहुता शेंडे साहेबांनीच. केरळ झाल,कर्नाटक झाल,गोवा झाल, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूदेखील झाल.एवढच काय अंदमान आणि चारधाम यात्रा देखील झाली.या सगळ्या हिंडण्याफिरण्यात शेंडे साहेबांचा उत्साह काही औरच म्हणायचा.त्यांचा पार्किन्सन्सचा वाढता आजार त्या दहा वर्षात त्यांनी एखाद्या मित्रासारखा वागवला.अर्थात श्यामाताई त्यांच्याबरोबर 'सावली' सारख्या असायच्या.त्यांच्यामुळेच शेंडेसाहेब स्वावलंबी राहू शकले.
          शेंडे साहेबांचे दोन्ही मुलगे अमेरिकेत स्थायिक आहेत.शिक्षण संशोधन क्षेत्रात नाव लौकीकासह कार्यरत आहेत.शेंडे साहेबांच्या सुनाही तितक्याच मातब्बर.नातवंड प्रगतीपथावर.प्रतिवर्षी अमेरिकेला मुलांकडे जाण्याचा शेंडे दंपतीचा उत्साह दांडगा. अमेरिकेत पार्किन्सन्स-मित्र मंडळी चांगलीच संघटीत.तेथील मुक्कामात शेंडे साहेबांनी या आजारासंबधी जेवढी माहिती मिळवता येईल तेव्हढी मिळविली.काही रुग्णांना ते प्रत्यक्ष भेटले.अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी मला जे काही सांगितलं,दाखवलं त्यात 'पार्किन्सन्स' साहित्याचा भरणा असे.ही माहितीपत्रके,ते अहवाल,ती पुस्तके अस नाना परीच साहित्य.
         अमेरिकेतील पार्किन्सन्स मित्र-परिवाराप्रमाणे  पुणे शहरात पार्किन्सन्स मित्रमंडळ स्थापन करण्याची कल्पना आणि कृती शेंडे साहेबांचीच.अर्थात श्री. शरच्चंद्र पटवर्धन यांच्या पुढाकाराचा मित्रमंडळ सुरु करण्यासाठी फार उपयोग झाला.
         शेंडेसाहेब हे पुणे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य आहेत.मंडळ स्थापन झाल २००० साली पण त्याआधी कितीतरी वर्षे शेंडे साहेबांनी पार्किन्सन्स रुग्णासाठी काम केल आहे.श्यामला शेंडे यांची साहेबाना सतत सक्रीय साथ आहे.पुण्यात असो की परदेशात ते दोघे सतत पार्किन्सन्स या आजारावर विचार करीत आले आहेत.अमेरिकन पार्किन्सन्स,डिसीज असोशिएशनशी संपर्क साधून आहेत.पार्किन्सन्स या एकाच विषयावर त्यांनी माहितीपत्रके,पूरक पुस्तके,उपयुक्त अशा चित्रफिती संग्रहित केल्या आहेत.पुस्तके मराठीतून भाषांतरित करण्याची परवानगी अमेरिकेतील प्रकाशकाकडून मिळवली आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळाने तीन पुस्तकांचे भाषांतर केले ते शेंडे साहेबांच्या सौजन्यामुळेच! विशेष म्हणजे अमेरिकन पार्किन्सन्स,डिसीज असोशिएशन ( APDA ) ने शेंडे दांपत्याला प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.
         शेंडे साहेब एक निष्णात सिव्हील इंजिनिअर.अनेक अभियांत्रिकी संस्थांचे सन्माननीय सभासद.अकराहून अधिक देशात बांधकाम,बांधकाम व्यवस्थापन,बांधकाम विषयक सल्लामसलत इत्यादी महत्वाची कामे पार पडलेला यशस्वी बांधकाम अभियंता.अशा व्यक्तीला  पार्किन्सन्स सारखा झिजवणारा आजार व्हावा या भोगाला काय म्हणावे? बरे शेंडे साहेबांसारखा मनुष्य असा आजार सहज साहून जातो तरी कसा? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे कोण देणार? शेंडे साहेबांसारख्या उमद्या व्यक्तीला पार्किन्सन्स सारखा आजार व्हावा या भोगाला काहीही म्हणता येणार नाही.तो आजार ते कसा निभाऊन नेतात हे महत्वाच.
         शेंडे साहेबांनी आजाराच स्वागत केलय.त्याची लक्षण ओळखली आहेत.त्याचे परिणाम जाणून घेतले आहेत,आपण जे अनुभवल,आपल्याला जे उमगल ते इतराना सांगून समजाऊन घेऊन वेदना आणि दु:ख वाटून घेऊन हलक कराव अस त्याना मनापासून वाटत आल्याच जाणवत.'वेदनेचा जयजयकार' हे तत्वज्ञान
असू शकत प्रत्यक्षात वेदना शमवणारे उपाय आणि औषध याना शरण जाणे जमले तरी पुष्कळ काही घडून येऊ शकत अस शेंडे साहेबांना वाटत असणार  पार्किन्सन्स सारख्या आजारावर ' निवांता साहून जाणे म्हणजे हातपाय गाळून बसणे नाही: तर त्या आजारावर मात करीत म्हणणे,-
मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण |
मोक्ष अथवा बंधन,सुख समाधान इच्छा ते | |
शेंडे साहेब प्रसन्न आहेत.आज आत्ता आणि या क्षणीही.
डॉक्टर विजय देव यांचा परिचय 
 पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या उभारणीच्या काळात डॉक्टर विजय देव आणि विणा देव यांची मोलाची मदत लाभली.विजय देव यांनी एस.पी.कॉलेजमध्ये ३० वर्षे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले.राज्यशास्त्रावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.कौटिल्य आणि मॅकिअव्हेली यांचा तुलनात्मक अभ्यास हा त्यांचा पीएचडीच्या संशोधनाचा विषय होता.गो.नी.दांडेकर दुर्ग साहित्य संमेलनाचे ते प्रवर्तक आहेत.गो.नी.दांडेकर यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचे कार्यक्रम डॉक्टर देव यांच्यासहत्यांचे  सारे कुटुंब करते हे सर्वश्रुत आहे.
त्यांनी आपले मित्र शेंडेसाहेब यांच्यावर लिहिलेला लेख २१ मे या शेंडे साहेबांच्या  वाढदिवसादिवशी प्रसिद्ध करत आहोत.
या लेखानंतर पुढच्याच महिन्यात श्री मधुसूदन शेंडे यांचे निधन झाले.
त्यांनी देहदान केले. 


       

Friday, 1 May 2015

पार्किन्सन्स आणि भास - शुभार्थींचे अनुभव

                               पार्किन्सन्समध्ये भास हे एक लक्षण आहे हे पार्किन्सन्सविषयक लिखाणातून वाचल होत पण नुसत वाचण आणि प्रत्यक्ष उदाहरणे पाहण यात महद अंतर आहे अस मी घरभेटीत भास होणारे शुभार्थी आणि त्यातील विविधता पाहिली तेंव्हा लक्षात आले.हे अनुभव देऊन मला घाबरून टाकायचं नाही तर यामागच वास्तव समजून घेऊन योग्यवेळी योग्य उपचाराने त्यावर मात करता येते हे सांगायचे आहे इतरांच्या अनुभावातून किती वेगवेगळ्या स्वरूपाचे भास होऊ शकतात हेही निदर्शनास आणायचे आहे.
                           पहिला अनुभव श्री साक्रीकरांच्याकडे आला.त्याना इतरही बरेच आजार होते.ते बेड रीडन होते अनेकांची मदत होत असे.ब्युरोची माणसे होती,व्यायाम करून घ्यायला फिजिओथेरपीचा माणूस यायचा.सर्व सुरळीत चालल होत.भास व्हायला सुरु झाल्यावर मात्र त्याना हाताळण कठीण झाल.त्याना त्यांच्या बहीणीच्या नवर्‍याचे निधन झाले आहे सर्व माणसे जमली आहेत,बहिण रडत आहे असे  दिसत होते.नातेवाईकांना फोनही केले आणि पत्नीने अस काही नाही असे उलट फोन केले.
                     एकाना माणसांचे बोललेले आवाज ऐकू यायचे तर एकाना बेल वाजल्याचा आवाज यायचा आणि कोणी दार उघडत नाही असे वाटायचे.एका शुभार्थीना हॉस्पिटलमध्ये असताना तिच्या पतीने नर्सला धक्का दिला आणि सर्व नर्सनी संप पुकारला आहे तिच्या पतीला मारण्यासाठी ते मागे लागले आहेत असे वाटत होते.
आपल्याबद्दल कट केला जात आहे असे वाटणारेही भेटले.पत्नी, मुलांबद्दल असा संशय निर्माण झाल्यावर तर  फारच अनावस्था प्रसंग ओढवतो.
                      घरभेटी वाढत गेल्या तसे नवनवीन अनुभव लक्षात आले.भासाबद्दल काही माहित नसणारे,काहीतरी बाधा झाले असे समजून देवदेवस्की करतानाही आढळले. त्यांना भासावरील लेख वाचण्यास दिला.
                 ही समस्या सर्वच शुभार्थीना जाणवेल असे नाही.आमच्या सर्वेक्षणातील १५० शुभार्थीपैकी २९ जणाना भासाची समस्या होती.पुढे ती कमी झाली तर सर्वेक्षणाच्यावेळी ज्याना ही समस्या नव्हती त्यातील काहीना नंतर निर्माण झाली.याबाबतची वैद्यकीय माहिती समजावी म्हणून २०१२ सालच्या स्मरणिकेत न्युरॉलॉजीस्ट हेमंत संत यांचा भासावरील लेख दिला गेला.
           एका उच्चशिक्षित शुभंकरानी फोनवर सांगितलं,तिचा पीडीग्रस्त पती तिच्या चारित्र्यावर संशय घेतो.तिच्याकडे कोणीतरी येत आणि ती त्याच्याबरोबर जाते अस त्याना वाटत होत.मला वेड लागायची वेळ आले.अस त्या रडत सांगत होत्या त्याना शांत करत, भासाचे विविध शुभार्थींचे अनुभव सांगितले आणि तातडीने न्युरॉलॉजीस्टकडे जायला सांगितले.असाच अनुभव अनेक शुभंकर आणि शुभार्थी यांच्या भासाविषयीच्या अज्ञानाबद्दल आल्याने एकदा मित्रमंडळाच्या सभेत  याविषयावर चर्चा घडवून आणण्याची गरज वाटली.त्या सभेत सांगितले गेलेले अनुभवही पुढे देत आहे.

              श्यामला शेंडे यांनी आपले अनुभव सांगितले. मंडळाचे संस्थापक मधुसूदन शेंडे याना गेली २३ वर्षे पीडी आहे.आठ वर्षापूर्वी सहा साली अमेरिकेत असताना आजूबाजूच्या झाडीत लोक हिंडत आहे असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी सर्वाना उठवल.पण त्यानंतर  काही समस्या नव्हती.११ साली  मात्र अंगावर किडे हिंडतात तोंडातून दोरे निघतात असा वाटायला लागल.कंप आवडत नाही म्हणून स्वत:च त्यांनी गोळ्या वाढवल्या होत्या. भासाच प्रमाण वाढल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल केल.अशा वेळी पेशंट अनावर होऊ शकतो म्हणून ICU ठेवलं.ते त्याना न आवडल्याने ते पळून जाऊ लागले. भासाचाच एक भाग म्हणजे अमेरिकेहून मदतीला आलेला मुलगा, पत्नी,डॉक्टर हे कट करत आहेत असे वाटू लागले.औषधाचे प्रमाण कमी केले.घरच्या लोकांनी सांगितलेले पटत नसल्याने त्यांचे मित्र श्री.शरच्चंद्र पटवर्धन याना बोलावलं.उपचारानंतर भास कमी झाले.पण पार्किन्सनस वाढला.शामला ताईंनी थोडेसे लक्षण दिसल्यास  सुरुवातीलाच तातडीने न्युरॉलॉजीस्टना दाखवावे असा सल्ला दिला
               श्री.पटवर्धन यांनी औषधांच्या उपयोगापेक्षा दुष्परिणाम जास्त झाल्यास डॉक्टरना, कुटुंबियाना तारतम्याने निर्णय घ्यावा   लागतो असे सांगितले.
              आशा रेवणकर यांनी श्री.रेवणकर,दिवंगत मधुकर देशपांडे आणि श्री पद्माकर आठल्ये यांचे अनुभव सांगितले.रेवणकर याना आपले पाकीट जळाले आहे असे वाटत होते.४८ तास ते न झोपता १०/ १० मिनिटांनी  ड्रॉवर उघडून ते पाकीट पहात होते.भासाबद्दल त्यावेळी फारशी माहिती नसल्याने त्या घाबरल्या.त्यांच्या Ameltralच्या तीन ऐवजी दोन गोळ्या केल्यावर त्यांचे भास कमी झाले अर्थात हा निर्णय न्युरॉलॉजीस्टच्या सूचनेवरून घेतला.श्री. आठल्येना चोर आल्याचे वाटत होते ते जवळ काठी घेऊन झोपत.मधुकर.देशपांडेनी तर एकदा पोलीस स्टेशनला फोन करून चोर आल्याचे सांगितले.नातीने हे ऐकले आणि आज्जीस सांगितले.आज्जीने मग पोलीस स्टेशनला फोन करून असे काही नाही असे सांगितले.
                आशा ताई यांच्या अनुभवानंतर मी  त्यावेळी प्रश्नावलीतील  शुभार्थींच्या भास आणि औषधे यांचा काही परस्पर संबंध आहे का हे तपासले होते हे आठवले.पण तो आढळला नव्हता. भास होणारे अनेक जण या गोळ्या घेत नव्हते आणि या गोळ्या घेणार्‍या अनेकाना भास होत नव्हते असे लक्षात आले.होते त्यामुळे विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम व्यक्तीनुसार वेगळे असतात  त्यामुळे औषधांच्या बाबताचा निर्णय स्वत: न घेता न्युरॉलॉजीस्टवर सोपवावा असा सावधानतेचा इशारा येथे द्यावासा वाटतो.
                दीपा होनप यांच्या वडिलाना पीडी होता.आज ते हयात नाहीत तरी त्यांनी वडिलांची ही समस्या हाताळली आहे. वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून या समस्येकडे पहिल्याने आणि प्रत्यक्ष अनुभवाबरोबर पती एम.डी.फिजिशियन असल्याने या समस्येचे यथार्थ ज्ञान त्याना होते.अतिशय संवेदानशिलतेने ही समस्या त्यांनी हाताळली.एक चतुर्थांश शुभार्थीनाच ही समस्या जाणवते परंतु आपणापर्यंत ती येणार आहे की नाही हे समजणे अश्यक्य.त्यामुळे त्याबद्दल माहिती आवश्यक.शुभार्थीला एकटे न ठेवणे, डिप्रेशन येऊ न देणे,भास होऊ लागल्यास न लाजता इतराना सांगणे.या गोष्टी भासावर मात करण्यासाठी थोड्याफार उपयोगी होऊ शकतात.त्यांनी  स्वत: हाताळलेला Socratic reasoning चा प्रयोग सांगितला.यात शुभार्थीच म्हणण खोडायच नाही कारण हे शुभार्थी कधीच स्वीकारत नाही कारण त्यांच्यासाठी  ते सत्यच असते. त्याऐवजी अप्रत्यक्षपणे वेगळेच प्रश्न विचारत जायचं. ज्यातून हळूहळू ते योग्य  विचारापर्यंत येऊ शकतील.त्याचं वडिलांशी असलेल जवळीकीच विश्वासाच नात यामुळेही हे शक्य झाल.अस त्या म्हणाल्या.प्रत्येक शुभार्थिच्या समस्येनुसार तारतम्यानेच डॉक्टर आणि शुभंकरालाही निर्णय घ्यावे लागतात.
            मित्रमंडळाचे हितचिंतक डॉक्टर शशिकांत करंदीकर यांनीही आपल्या विवेचनात अनेक दिवस झोप न झाल्यानेही भास होऊ शकतात.भासाची इतर कारणेही पाहण्याची आवश्यकता सांगितली. LSD 25  सारख्या रसायनाचा एक कण सुद्धा भास निर्माण करतो हिप्पी त्याचा वापर काल्पनिक विश्वात जाण्यास करत.मेंदूतील न्युरॉन्सचे प्रमाण एक बिलियनपेक्षा जास्त असते आणि त्यांची कनेक्शन ८०,००० मिलियन असतात त्याचा कोठे कसा परिणाम होईल याचा अंदाज करणे अत्यंत कठीण. त्यांचे अमेरिकेतील न्युरॉलॉजीस्ट मित्र पुढील ५० वर्षात तरी याबद्दलचे कोणते प्रश्न नक्की सोडऊ शकू हे सांगता येत नाही असे सांगतात असे प्रतिपादन केले.डॉक्टर पेशंटला वेळ देत नाहीत अशा तक्रारीवर पीडी च्या २०/२५ लक्षणांची यादी करून त्यातील नेमकी कोणती त्रास देतात यावर खुणा केल्यास डॉक्टर मदत करू शकतील असे सुचविले
          

            शुभार्थी रमेश घुमटकर यांनी घरी ते एकटेच असतात परंतु घरात माणसे वावरत असल्याचा भास होतो. स्कूटरवरून जाताना कोणीतरी ओव्हरटेक करत असल्याचे भास होतात.फिरायला गेले असता मागून कोणीतरी येत असल्याचे वाटते.पण मी स्वत:ला हे भास असल्याचे पटवतो.
             श्री. शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला भास होत असल्याचे सांगितले.पण हे भास आहेत हे मला समजत होते.पिडीत ते खरे असल्याचे वाटते.
              प्रज्ञा जोशी यांना आपल्या मुलासाठी मुलगी सांगून आले.सर्व पाहुणे मंडळी बाहेर बसली आहेत अस वाटत होत. आपल्या सांगण्याकडे कोणी लक्ष देत नाही याचा राग येत होता.
             सौ.लोढा यांच्या पतिना आपली पत्नी हरवली असे वाटत होते.पत्नीला ते नर्स समजत होते आणि होस्पिटलभर पत्नीला शोधत होते आणि बरोबर मी आहे या सांगण्याच्या प्रयत्नात सौ लोढा. शेवटी मुलांनी फोन करून मम्मी घरी आली आहे अस सांगितलं.आणि यातून मार्ग काढला.
      जागतिक २०१५च्या पार्किन्सन्सदिनाच्या स्मरणिकेत वसू देसाई यांनी त्यांच्या पतीचे अनुभव दिले त्यात भासाविषयीही लिहिले आहे त्याना वेगवेगळे भास होत त्यातील एक उदाहरण त्यांनी दिले आहे.ते त्यांच्याच शब्दात देत आहे."आमच्याकडे घरी तेंव्हा रंगकाम चालू होते आणि हे सांगत आले की आपल्याकडे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले आहेत.व आपल्याला त्यांच्या बरोबर त्यांच्या भावाच्या अंत्ययात्रेला जायचे आहे.ते आपल्याला घेऊन जाण्यासाठी आले आहेत.तु मला पैसे,मोबाइल सगळ दे.अर्धा दिवस ही एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात होती.दुसर काहीही बोलण्याच्या आणि ऐकून घेण्याच्या ते मनस्थितीत नव्हतेच.अशी कितीतरी उदाहरणे घडली ...सासूबाई वय वर्षे ८५.ब्लडकॅन्सर पेशंट.त्याना यांच्या ह्या वागण्या बोलण्याचे खूप दु:ख होत असे."यानंतर त्यांनी नेहमीच्या डॉक्टरना  दाखवले फरक पडला नाही तेंव्हा न्युरॉलॉजीस्टना दाखवले."न्युरॉलॉजीस्टच्या औषधांनी त्याना चांगलेच बरे वाटू लागले." अस त्या पुढे लिहितात.
             या सगळ्या उदाहरणातून भासाच्या समस्येनी घाबरून न जाता ताबडतोब न्युरॉलॉजीस्टकडे जाणे हे महत्वाचे.मानसोपचार तज्ञाकडे जायची गरज असल्यास न्युरॉलॉजीस्ट तसे सांगतात किंबहुना दोघे चर्चेतून निर्णय घेतात.मानसोपचाराची काही औषधे पार्किन्सन्स वाढवतात.त्यामुळे तारतम्यानेच निर्णय घावे लागतात.
            वरील सर्व उदाहरणात उपचाराने भासाची समस्या कमी झाली.

           





 

Sunday, 26 April 2015

भास (Halluciations ) - डॉक्टर हेमंत संत

   


 Inline image 1


डॉक्टर हेमंत संत यांचा परिचय
डॉक्टर हेमंत संत DM न्युरॉलॉजी आहेत.
सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये
न्युरॉलॉजी  कन्सल्टंट म्हणून काम करतात.
न्युरॉलॉजीकल सोसायटी ऑफ पुणेचे ते अध्यक्ष आहेत.





 पार्किन्सन्सच्या आजारात भास होणे ( hallucinations ) हा एक काळजीचा व भीतीदायक प्रकार असतो.
      पार्किन्सन्सचा आजार  असणाऱ्या काही लोकाना भास का होतात?
       साधारणत: पार्किन्सन्सचा आजार झाल्यानंतर काही वर्षानी काही रुग्णांना भास होतात. आजाराच्या सुरवातीच्या काळातही तरूण अथवा वयस्क लोकांना भास होऊ शकतात; पण बरेच दिवस हा आजार असणाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. भास सुरवातीस झाल्यास पार्किन्सन्ससारख्या दुसऱ्या आजाराचाही विचार करावा लागतो. भास होणे हा औषधाचा दुष्परीणामही असू शकतो; परंतु प्रत्येकाला हा दूष्परीणाम होतोच असे नाही. ते औषधाचा प्रकार, त्याचा डोस व घेणाऱ्या व्यक्तीवर अवलबून असते. औषधाचा डोस जास्त असेल, तर भास होण्याचे प्रमाण अधिक असते.
       भास म्हणजे काय?
       भास  म्हणजे प्रत्यक्षात नसताना काही पाहिल्या किवा ऐकल्यासारखे वाटणे, काही वास येणे किंवा काही
चव लागणे. भास आपल्या पचेद्रीयापैकी कोणत्याही इंद्रियावर परिणाम करू शकतो. भासाचे खालीलप्रमाणे वेगवेगळे प्रकार आहेत.
       दृश्य भास - प्रत्यक्षात नसताना व्यक्ती, नातेवाईक, प्राणी, कीटक दिसणे. भासाचा हा सर्वात जास्त घडणारा प्रकार आहे. भास होणारी व्यक्ती त्याचे सविस्तर वर्णन करू शकते. भास थोड्या वेळासाठी ही होऊ शकतो.
       ऐकण्यातले भास - दरवाज्याचा किवा घंटेचा आवाज नसताना ऐकू येणे किंवा बोलणे ऐकल्यासारखे वाटणे.
       स्पर्शाचे भास - आपल्या जवळपास कोणी वावरल्यासारखे वाटणे. 
       वास व चवी भास - काही वास वा चव नसताना त्याची जाणीव होणे:
       ह्या गोष्टी एखाद्या वेळेस घडल्या, तर त्याकडे दुर्लक्ष करावे; पण हे वारंवार घडू लागले, तर डॉक्टराना वेळीच कल्पना देणे आवश्यक असते.
       Illusions - नेहमीच्या गोष्टी वेगळ्या तर्‍हेने दिसणे. उदा. दरवाज्याला लावलेला कोट माणसाप्रमाणे दिसणे.
       Delusions - Delusions म्हणजे वास्तवावर आधारित नसलेले विचार. असे विचार जरी अवास्तव असले, तरी या रुग्णांना ते अगदी खरे वाटतात. हे लक्षण स्वीकारणे रुग्णाला सर्वात जड जाते आणि हे  अवास्तव विचार आपल्या career बद्दल किंवा जवळच्या माणसाबद्दल असले, ते स्वीकारणे, तर फारच अवघड जाते.
       Delusions खालील प्रकार असू  शकतात.
       Paranoia - आपल्याविरूद्ध काही कट केला जातो आहे किंवा आपल्याला कोणी इजा करणार आहे, असे रूग्णाला वाटते.
       Jealousy - मत्सराची भावना वाटणे. आपल्या जवळची व्यक्ती आपला विश्वासघात करणार आहे असे वाटते.
       Extravagance - आपल्याजवळ काही विशेष शक्ती आहे असे वाटणे. परिणामी कधीकधी रुग्णाचे वागणे धोकादायक ठरू शकते.
       Delusions चा रुग्णावर  कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो?
       जेव्हा delusions ची तीव्रता वाढते, तेव्हा वास्तव व अवास्तव वीचारामधील फरक रुग्णाला समजू शकत नाही. अशावेळी रुग्ण अतिशय चिंताग्रस्त व चिडखोर होऊ शकतो. काही वेळा रुग्णाला hallucinations, illusions व delusions या सर्वच गोष्टी होतात. त्यामुळे रुग्णाची मन:स्थिती गोधळलेली रहाते व त्यांचा देनंदिन जीवनावर परिणाम होतो. कधी रुग्णाला असेही वाटते, की औषध देणारी व्यक्ती विनाकारण खूप जास्त औषधे
देते आहे. त्यामुळे रुग्ण औषध व्यवस्थित घेत नाही. यासाठी काय करता येईल?
       १) डॉक्टरांचा  सल्ला घेणे.
        Hallucination / Delusions चा अनुभव आल्यास किंवा त्याची तीव्रता वाढल्यास तज्ज्ञ डॉक्टराचा सल्ला घ्यावा.
       २) इतर कारणामुळे लक्षणे नाहीत ना हे पाहणे.
       Hallucination / Delusions ची Parkinson's सोडून इतरही कारणे असू शकतात. उदा. अधू दृष्टी, अपुरा प्रकाश.
        तज्ज्ञ डॉक्टराबरोबर या लक्षणाविषयी चर्चा कारणे आवश्यक आहे. रक्त/लघवीच्या तपासण्या करून infection मुळे ही लक्षणे नाहीत ना ते ठरवता येते.
       Parkinson's च्या रुग्णात Parkinson's बरोबर स्मरणशक्तीचे विकार, झोपेचे विकार depression व स्मृतीभ्रश हे विकारही असले, तर hallucination / delusions ची तीव्रता वाढते.
       ३) कुटुंबातील व्यक्तीशी चर्चा करणे
        यामुळे रुग्णाच्या आजाराच्या स्वरुपाबद्दल कुटंबातील इतराना कल्पना येते व रुग्णाला त्रास होत असताना त्यांची मदत होऊ शकते. यामुळे रुग्णालाही थोडी मानसिक स्वस्थता लाभू शकते.
       ४) औषधोपचारातील बद्दल
       औषधाच्या dose मधील बदलामुळे किंवा   औषधातील बदलामुळे hallucination / delusions चे प्रमाण कमी होऊ शकते. तरीही उपयोग न झाल्यास मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीने काही औषधे देऊन ही लक्षणे आटोक्यात राहू शकतात.
       ५) पार्किन्सन्सच्या आजारात भास होणे हे जरी काळजीचे कारण असले, तरी बर्‍याच वेळा त्यावर उपाय होऊ शकतात. त्यामुळे या लक्षणाची सुरुवात होतात डॉक्टरांना कल्पना देऊन उपाय करणे आवश्यक आहे.

         






Wednesday, 8 April 2015

एक लोहारकी

                        



                                               शेखर बर्वे यांच्या 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत ' या पुस्तकावर आलेल्या प्रतिक्रियांच मी संकलन करत होते.गुलाबांच्या फुलांच चित्र असलेल एक अभिनंदनाच सुंदर भेट कार्ड दिसलं कोणाच असेल म्हणून उत्सुकतेन उघडल. आतल्या बाजूला कार्डाच्याच आकाराचा कागद चीकटवला होता.त्यावर कडेनी फुलांची सुंदर  नक्षी काढलेली होती.वर स्केच पेननी अभिनंदन पत्र अस लिहील होत.
प्रतिक्रियेवरून सर्व पुस्तक वाचून प्रतिक्रिया दिल्याच दिसत होत.लिहिणारे होते प्रभाकर लोहार.त्यानी आपल्या भावना व्यक्त करताना . 'पुस्तकाच्या माध्यमातून आपण पार्किन्सन्स पेशंटच्या अंतरात्म्याचा आवाज प्रगट केला' अशी सुरुवात केली होती.सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या लोहार यांच्या पुढील मनोगतावरून त्यांनी पीडीला चांगल समजून घेतल आहे हे लक्षात येत होत.पत्रात त्यांनी आजाराची यथार्थ कल्पना देऊन त्याच्याशी लढत देण्याची हिम्मत वाढवल्याबद्दल आणि लढतीसाठी उपायही सांगितले याबद्दल सर्व पीडीग्रस्तांतर्फे आभार मानले होते.
                          लोहार यांच्याबद्दल मला नेहमीच कुतूहल आणि कौतुक वाटत राहील.
 ...भुसावळ येथील ऑर्डीनन्स  फॅक्टरी येथे ते फिटर म्हणून काम करत होते.कार्यकाळातच पीडी झाला.काही दिवस तरीही नोकरी केली.मुलगा नोकरी निमित्त पुण्यात आला.लोहार यांनी दोन  वर्षे आधीच व्ही.आर.एस. घेतली.ते मुलाकडे पुण्याला आले.  त्यांचा मुलगा अपंग आहे. त्याला कशाला शिकवता असे सर्वजण म्हणत होते तरी.त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी मुलाला मोठ्या कष्टाने पदवीधर केले.मुलांनीही त्यानंतर काही कोर्सेस करून सॉफ्ट्वेअरमध्ये शिरकाव केला.वडिलांच्या कष्टाचे चीज केले.स्वत:च्या मनाला पटेल ते ठामपणे लगेच करायचे ही लोहार यांची वृत्ती,त्यांच्या वेळोवेळी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत आणि फोनवरील होणा र्‍या बोलण्यातून जाणवली.त्यांनी DBS सर्जरीचा निर्णय घेतला तेंव्हाही  हेच लक्षात आल.

ते .सभेला सुरुवातीला मोटारसायकलवर यायचे पार्किन्सन्स वाढू लागला तस मोटार सायकल बंद झाली आणि बसनी कधी रीक्षाने .येऊ लागले.सोबत कोणी नसे.आजाराबद्दल कुरकुर मात्र नसायची.अधूनमधून काही शंका विचारणारे फोन यायचे.जनरल चौकशीसाठीही यायचे.त्यांच्या  ९५ वर्षाच्या आईच्या निधनानंतरही त्यांचा फोन आला होता.माझ्याशी दु:ख शेअर केल्यावर त्याना बर वाटलेलं दिसलं.हळूहळू त्यांचा ऑन पिरिएड थोडा वेळ आणि ऑफ पिरिएड जास्त अस होऊ लागला.सिंडोपाच्या गोळ्यांची संख्या १२वर गेली.न्युरॉलॉजीस्टनी DBS सर्जरी सुचवली.शस्त्रक्रिया तशी महागडी धडपड्या लोहार यांची पैसे जमवण्याची खटपट सुरू झाली. ते औषधे सेन्ट्रल गव्हर्मेंटच्या सी.जी.एस.योजने मधून घेतात.शस्त्रक्रीयेसाठीही तिथून काही मिळते का याचे प्रयत्न सुरु झाले
                               .DBS सर्जरी ,.न्युरॉलॉजीस्टनी इतरही काही शुभार्थीना सुचवली..शस्त्रक्रिया,तीही मेंदूची म्हणजे त्याबाबत लगेच कार्यवाही करणारे थोडेच. लोहारनी मात्र प्रिस्क्रिप्शन घेऊन केमिस्ट कडून गोळ्या घ्याव्या तितक्या सहज शस्त्रक्रियेसाठी तयारी सुरु केली. शस्त्रक्रिया झालेल्या शुभार्थीची नावे माझ्याकडून घेतली.त्यांच्याकडे चौकशी केली. आणि पैशाची जमवाजमव करायच्या मागे लागले.
                              प्रथम सी.जी.एस.कडे काय तरतूद आहे ती पाहिली.मित्र मंडळात सेन्ट्रल गव्हर्मेंटमधून निवृत्त झालेले अनेक शुभार्थी आहेत पण सी.जी.एस.च्या योजनेचा फायदा घ्यायचा तर कटकटी फार म्हणून जवळच्या केमिस्टकडून औषधे घेणे त्याना सोयीचे वाटते.लोहाराना मात्र ही कटकट वाटत नाही.त्यांच्या खटपटीला यश आले. सी.जी.एस.कडून त्याना पैसे मिळणार होते. पण ते शस्त्रक्रिया झाल्यावर.
                           एक दिवशी फोन आला ' शोभाताई उद्या ऑप्रशनसाठी  चाललोय मुंबईला.' माहेर सोडल्यापासून मला शोभाताई म्हणणार कोणी नाही.त्यांच शोभाताई म्हणण मला माहेरची आठवण देत. कदाचित म्हणूनच त्यांच्याबद्दल मला जास्त जवळीक वाटते.
                          ऑप्रशन चांगल झाल्याचही फोनवर समजल.पुण्याला आल्यावर मी भेटायला जायचं ठरवलं.
तर फोनवर म्हणाले,तुम्ही नका दगदग करू. बर वाटल की मी येईन सभेला.ते येरवड्याला राहायचे.मला त्यांची शस्त्रक्रिया कशी झाली याबाबत उत्सुकता होती.पण त्याना भेटायला जाण जमल नाही.
एक दिवस त्यांचाच फोन आला.' मुकुंदनगरला सी.जी.एस.च्या ऑफिसमध्ये येतोयतुम्हालाही भेटायला येतोय.तुमचा पत्ता सांगा'.मी पत्ता सांगितला. भिमाले गार्डन दाखवणार्‍या बाणाकडे त्यांनी रीक्षा सोडली.आमच घर तिथून अर्धा किलोमीटर तरी होत.ते तिथून भर उन्हात चक्क चालत आले.त्यांच्यात चांगलीच सुधारणा दिसत होती.पेसमेकर कुठ बसवला. रॉड कसा बसवलाय हे ते उत्साहाने सांगत होते.
                        ऑप्रशननंतर काय फरक झाले अस विचारलं? त्याना सगळ्यात चांगल वाटत होत ते त्यांच्या अनैच्छिक हालचाली कमी झाल्याच.'आता कोण मला दारुडा नाही समजणार बघा.'हे सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता.काहीजणांच पीडीमुळ वजन कमी होत.त्याचं ७४ किलोच ५८ किलो झाल होत. आता ते ६२ किलो झाल.जेवण वाढल..त्यांच्या सिंडोपाच्या गोळ्यांची संख्या बारा वरून दोनवर आली  होती. त्या दोन गोळ्याही अर्ध्या अर्ध्या चार वेळा घ्यायच्या होत्या.आता ते एकटे कुठेही जाऊ शकत होते.आमच्याकडे असताना त्यांचा ऑफ पिरिएड सुरु झाला. ऑप्रशनपूर्वी असा ऑफ पिरिएड तासातासानी यायचा.आता ऑन पिरिएड खुप वेळ टिकत होता..खालील फोटोत ते पाय सोडून बसलेत ते ऑफ पिरिएड मध्ये...


                         परत जायला निघताना ते म्हणाले पत्ता बदललाय तो देतो.त्यांच्या बरोबरच्या पिशवीत त्यांची औषधे,पता ,फोन,मुलाचा फोन असलेली वही होती,बाटलीत पाणी,एक संत्र,DBS सर्जरीची फाईल अस सगळ व्यवस्थित होत.येरवकड्याहुन ते साळुंखे विहारला रहायला आले होते.तिथला फ्लॅट विकून ते भाड्याच्या घरात राहात होते. ऑप्रशनचे पैसे उभारण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा.
                          ११ एप्रिलला जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यात  शुभार्थींच्या कलाकृती ठेवायच्या आहेत. त्याना कार्पेंटरीची आवड असल्याने त्याना काही ठेवायचं आहे का विचारलं तर ते म्हणाले मी डबल बेड खुर्च्या अशा वस्तू केलेत त्यांचे फोटो काढून ठेऊ का? मी चालेल म्हटलं. पीडी असूनही कार्यरत राहणारे पाहून इतराना प्रेरणा मिळावी हेच तर प्रदर्शानामागच उद्दिष्ट आहे.पाहू ते काढून आणतात का फोटो ते.
                          शुभार्थींच्या कलाकृतींच  प्रदर्शन पाहण्यासाठी नक्की आमच्या ११ एप्रिलला होणार्‍या मेळाव्यास जरूर उपस्थित रहा.
                           

स्थळ : लोकमान्य सभागृह,केसरीवाडा,न.चिं.केळकर मार्ग
५६८,नारायण पेठ,पुणे ३०.
दिनांक : शनिवार ११ एप्रिल२०१५
वेळ : दु.४ ते सायं.६.३०
प्रमुख पाहुणे : डॉक्टर अरविंद फडके M.D.
मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल.
                            

Monday, 30 March 2015

पार्किन्सन्स विकार आणि उपचार

      डॉक्टर  चारुदत्त आपटे हे न्यूरोसर्जरी क्षेत्रातील प्रख्यात नाव आहे. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून १९७६ साली तात्काळ झालेल्या  बॅच मधील ते सर्वोत्तम विद्यार्थी होते. पुढे न्यूरोसर्जरीमध्ये त्यानी cmc वेलोर येथून न्यूरोसर्जरीमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते. ते राष्ट्रीय पातळीवरील उत्तम टेनिसपटू होते.
      न्यूरोसर्जरीमध्ये त्यानी मौलिक संशोधन केले आहे.  न्यूरोसर्जरीच्या अनेक गुंतागुतीच्या केसेस त्यानी
यशस्विरित्या हाताळल्या आहेत. आतराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे त्याचे स्वप्न त्यानी  सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणले आहे. पुण्यात आठ ठिकाणी नवी मुंबई, नाशिक, कराड, जालना, गांधीधाम (गुजराथ) इत्यादी ठिकाणी 'सह्याद्री' चा विस्तार आला आहे. या सगळ्या व्यापाबरोबरच 'सहवेदना' सस्थेद्वारे  त्यानी गरजू रुग्णांना सर्व प्रकारची मदत करण्यात वसा घेतला आहे त्याचे कार्यही उत्तम प्रकारे चालू आहे.
      अनेक मान सन्मानानी सत्कारित डॉक्टर चारुदत्त आपटे आज चेअरमन व मनेजिग डायरेक्टर या भूमिकेतून सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स व सलग्न सस्थाना सक्रीय कार्यदर्शन करत  आहेत.

जागतिक पार्किन्सन दिना निमित्त, पार्किन्सन मंडळ पुणे यांनी २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेली स्मरणिके मध्ये माननीय डॉ . चारुदत्त आपटे यांनी लिहिलेला लेख खाली देत आहे. हा लेख इथे टाकण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार 

  
______________________________


  पार्किन्सन्सचा विकार  म्हणजे नक्की काय ?
        जेव्हा आपण म्हणतो की, एखाद्याला पार्किन्सन्सचा विकार झाला आहे तेव्हा त्याला नेमके काय होते ?
ह्या प्रश्नाचे उत्तर दोन पद्धतीनी देता येईल.

    सामान्य माणसाच्या द्रुष्टीतून  पार्किन्सन्सचा विकार होणे म्हणजे एखाद्याचे
    १.     हातपाय कडक होणे, ज्याला  डॉक्टर्स रीजीडीटी  म्हणतात.
    २.     शरीराला कंप सुटणे (म्हणूनच कंपवात हे नाव)
    ३.     हालचाली मदावणे 
          वैद्यकीयशास्त्राप्रमाणे ही फक्त लक्षणे झाली. मूळ रोग हा मेंदूमधल्या बदलांशी निगडित आहे. मध्य मेंदूमेंध्ये सबस्टॅनशिया नायग्रा नावाचा एक पेंशीचा समूह असतो..हा समूह  एक डोपॅमिन नावाचे रसायन तयार करतो. मेंदूत काही इतर केंद्रे आहेत जी  डोपॅमिन तयार करतात. काही अनाकलनीय कारणामुळे सबस्टॅनशिया नायग्रामधील काही पेशी गळून पडतात आणि त्यामुळे मेंदूतील डोपॅमिनचे उत्पादन कमी होते. 'डोपॅमिनच्या कमतरतेमुळे मेंदूत काही बदल घडतात. ते कोणते हे समजणयासाठी डोपॅमिनची नेमकी भूमिका काय हे बघायला हवे.

    डोपॅमिनचा डबल रोल
         डोपॅमिन हे रसायन बहुधा हेमामालिनी किंवा श्रीदेवी फॅन असणार, कारण त्याला डबल रोल करणे अगदी मस्त जमते. एकीकडे पोलिसी- खाक्यात मेंदूतील काही पेंशीच्या उत्पादन क्षमतेला ते काबूत ठेवते,
तर दुसरीकडे आदर्श शिक्षकाच्या भूमिकेत इतर काही पेशींना ते प्रोत्साहन देते, त्यांना उद्दिपीत करते. एखाद्या 
अर्थमंत्र्याने काळ्या पैशाला आळा घालणारा आणी चांगल्या उद्योगांना उत्तेजन देणारा अर्थसंकल्प प्रस्तुत केला,
तर त्याला डोपॅमिन बजेट म्हणायाला हवे !
        पार्किन्सन्सच्या विकारात डोपॅमिनची फौज कमी झाल्यामुळे  कंप निर्माण करणारया पेशींचे चांगलेच फावते. त्या जास्तच काम करू लागतात. मात्र शरीराच्या हालचाली सुलभ आणि सहज करवून देणार्‍या रसायनांचे उत्पादन कमी होते आणि रुग्ण अवयवाचा कंप, कडकपणा आणी हालचालींच्या मंदपणा या भयानक लक्षणांच्या विळख्यात सापडतो. पार्किन्सन्सच्या विकाराची अजूनही काही लक्षणे असतात, पण ही तीन सर्वात त्रासदायक आहेत.
        तर मित्रहो,  पार्किन्सन्स विकार ही शरीराच्या हालचालींशी  निगडित समस्या असली, तरी मुळात तो एक मेंदूचा विकार आहे; म्हणून उपचारही तिथेच केले  पाहिजेत; नाहीतर आग  रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असे व्हायचे.

     पार्किन्सन्सवर उपचार -
          पार्किन्सन्सचा विकार त्याचे वर्णन 'डिजनरेटिंग डिसऑडर' म्हणजे काळाबरोबर शारीरिक र्‍हास घडवून आणणारा विकार असे केले जाते. हा र्‍हास  डोपॅमिनच्या कमतरतेमुळे होतो हे आपण पाहिले, पण
सबस्टॅनशिया नायग्रातल्या पेशी का गळतात हे अजूनही अज्ञातच आहे. रोगाचे मूळ कारण जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत रोगाचा समूळ नाश होऊ शकत नाही. तरीही पार्किन्सन्सवर उपचार आहेत आणि ते खूप यशस्वी झाले आहेत हे आपण जाणता. जे उपचार केले जातात ते रोगावर नसून रोगाच्या लक्षणावर केले जातात; त्यामुळे रोग जरी कायम राहिला, तरी लेव्हाडोपा नावाच्या एका औषधाच्या साहाय्याने कंप, कडकपणा आणि हालचालींचा मंदपणा ह्या तीनही लक्षणांवर  नियत्रण ठेवता येते, त्यांच्यात सुधारणा होऊ शकते. अशा प्रकारच्या उपचार पद्धतीची उदाहरणे द्यायची झाली, तर एक म्हणजे मधुमेह. औषधांनी तो बरा होत नाही, पण रक्तातील साखरेच्या मात्रेवर नियत्रण राहते. दुसरे अगदी रोजचे उदाहरण  म्हणजे चश्मा हा उपचार दृष्टी सुधारत नाही, पण चश्मा घातल्यावर आपल्याला मात्र स्पष्ट दिसायला लागते.


औषध नेमके करते काय ?
     जिथे डी.एच.एल.ही पोहोचू शकत नाही, तिथे जायचे धाडस लेव्हाडोपा हे औषध करते. मोठया शिताफीने हे औषध मध्यमेंदूतील दुर्गम सबनस्टॅशिया नायग्रापर्यंत डोपामिनची कुमक घेऊन जाते. दुष्काळग्रस्त भागाला डोपामिन मिळते आणि रुग्ण सुटकेचा नी:श्वास सोडतो. दुष्काळग्रस्त राज्यातील राजकीय मंडळीनी लेव्हाडोपोचा आदर्श समोर ठेवायला हरकत नाही. नाही का?
     चला, रोग थोडा हट्टी आहे. बरे नाही व्हायचे म्हणतो, पण चोरवाटेने जाऊन आपले औषध रुग्णाचे कंप, कडकपणा आणि हालचालीचा मंदपणा ह्याच्यापासून तर सुटका करून देते. मग असे औषध उपलब्ध असताना शस्त्रक्रियेचा गरज काय ?
शस्त्रक्रिया का करावी ?
     उत्तम औषध असूनही शस्त्रक्रिया हा पर्याय कसा निर्माण झाला? मंडळी, आपल्या झोपेच्या औषधाची किंवा पेनकिलर्सची जी शोकगाथा तीच पार्किन्सन्सवरच्या औषधाची. शरीराला या औषधाची सवय झाली की, त्याची कार्यक्षमता कमी होते. मग त्यांना जास्त परिणामकारक बनवायला त्यांचा डोस वाढवावा लागतो. जो रोजच मयखान्यात दिसतो, त्याला एक-दोन पेगने काय नशा चढणार हो ! औषधाचे डोस  वाढवल्यावर औषधाचे दुष्परिणामही खूप जास्त प्रमाणात होऊ लागतात. जेव्हा दुष्परिणामांचा त्रास असह्य होऊ लागतो, तेव्हा शस्त्रक्रियेचा विचार करावा लागतो.
औषधाऐवजी शस्त्रक्रिया ?
      पार्किन्सन्सवरची शस्त्रक्रिया ही औषधाची जागा घेऊ शकत नाही, पण औषधाचा डोस किंवा मात्रा ती कमी करू शकते. औषध कमी मात्रेत (छोट्या डोसमध्ये) घेतले, तर ते अधिक काळ परीणामकारक राहते. याशिवाय मोठ्या (हाय) डोसाच्या दुष्परिणामांपासून रुग्णाची मुक्तता होते.
      लक्षात घ्यायचा मुद्दा असा की, शस्त्रक्रिया देखील लक्षणावरच उपाय करते, मूळ विकारावर नाही.
शस्त्रक्रिया कोणाची करावी ?
       ज्या रुग्णावर औषधाचा उत्तम परीणाम होतो त्या रुग्णावरच शस्त्रक्रिया केल्याने फायदा होऊ शकतो. एखाद्याला कंप, कडकपणा आणि हालचालींचा मंदपणा ही सगळी लक्षणे असली, पण लेव्होडोपाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसेल, तर त्या रुग्णाला पार्किन्सन्सचा विकार नसून दुसराच काहीतरी विकार आहे हे निश्चित. अशा वेळी पार्किन्सन्सची शस्त्रक्रिया त्याच्यावर करणे म्हणजे दोरीला साप समजून भुई धोपटल्यासारखे होईल.
कोणती शस्त्रक्रिया ?
      शस्त्रक्रिया करायची म्हटल्यावर प्रश्न सूटत नाही, कारण  पार्किन्सन्सच्या शस्त्रक्रियेतही प्रकार आहेत. हे प्रकार समजण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या डोक्यात डोकावून बघायला हवे.
      साठ - एक  वर्षापूर्वी पार्किन्सन्सची पाहिली शस्त्रक्रिया कंप कमी करण्यासाठी केली जायची. ज्या रुग्णामध्ये कंपाची समस्या खूप असे त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली जायची. ही शस्त्रक्रिया मध्यमेंदूत असलेल्या थॅलॅमस या अवयवाशी निगडीत होती. थलमस आणि सबस्टनशिया नायग्रा हे दोन्ही मध्यमेंदूत असतात असे म्हणता येईल.
       हा जो मध्यमेंदूतला कारखाना आहे त्याचे काम रसायनांद्वार शरीरासाठी अवश्यक अशा विद्युत संकेतांचे उत्पादन आणि वितरण होय. थॅलॅमसकडे या संकेतांच्या वितरणाचे काम असते. शस्त्रक्रियेच्या सुरुवातीच्या काळात लक्षात आले की, थॅलॅमसमध्ये जाऊन काही विशिष्ठ पेशी नष्ट केल्या की, पार्किन्सन्सच्या रुग्णाचा कंप थांबतो, पण ही शस्त्रक्रीया आता केली जात  नाही, कारण एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्याच्यापेक्षा  अधिक प्रभावी शस्त्रक्रिया विकसित झाली. ती शस्त्रक्रिया ग्लोबस  पॅलीड्स या पेशीच्या समुहाशी निगडीत होती.
       ग्लोबस  पॅलीड्स हा देखील मगाशी सांगितलेल्या कारखान्याचा एक विभाग. व्हॉलंटरी मुव्हमेंट म्हणजे जाणूनबुजून केलेल्या हालचालीशी याचा संबध असतो. सत्तरीच्या दशकाच्या शेवटच्या काळात शल्यविशारदाच्या (सर्जन्सच्या) लक्षात आले की, शस्त्रक्रीया करून ग्लोबस पॅलिडसमधल्या काही विशीष्ट पेशींना जाळले, तर कंप आणि कडकपणा या दोन्ही लक्षणाना नियत्रीत करता येते. या शस्त्रक्रियेद्वारा हजारो     पार्किन्सन्सच्या रुग्णाचे जीवन सुधारू शकले. मात्र हालचालीच्या मंदपणावर या शस्त्रक्रियेचा परिणाम
होत नाही. ही  शस्त्रक्रीया आजही जगभर प्रचलित आहे.
शस्त्रक्रियेची नवीन वाटचाल
       अनेक वर्षे मेंदूवर केलेल्या प्रयोगांमुळे  मेंदूच्या कार्यपद्धतीबद्दल जरा जास्त प्रगल्भ माहिती वैद्यकीय वैज्ञानिकांना आणि शल्यविशारदांना मीळू लागली आणि वीस-पंचवीस वर्षापूर्वी विचारांचा एक नवीन प्रवाह वाहू लागला. या नवीन प्रवाहाने शस्त्रक्रियेचा एक नवीन प्रकार विकसित केला ज्याला आज 'डीप ब्रेन स्टीम्युलेशन' या नावाने ओळखले जाते. या प्रकारात मेंदूत असलेल्या पेशींना नष्ट करण्यावजी आपल्याला हव्या असलेल्या रसायनांच्या पेशीच्या समूहांना उद्दिपित केले जाते, असे केल्याने रुग्णाच्या दृष्टिने उपयुक्त असे विद्युत संकेत निर्माण होतात.
       पार्किन्सन्स बाबतीत थॅलॅसच्या  खाली असलेल्या सबथॅलॅमिक न्युक्लियस या पेशीच्या समूहाला उद्दिपित केले की, पार्किन्सन्सच्या तीनही लक्षणावर चांगले नियत्रण ठेवता येते.  सबथालामिक न्युक्लियस हा मेंदूत खूप खोलवर असतो आणी हालचालीशी निगडीत संकेतांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते.
         सबथॅलॅमिक न्युक्लियसला उद्दिपित करण्यासाठी एम.आर.आय. च्या साहाय्याने त्याची जागा नक्की केली जाते. मग कवटीवर छिद्र पाडून दोन इलेक्ट्रोडस त्या न्युक्लियसमध्ये बसवले जातात. या इलेक्ट्रोडसना
विद्दुतशक्ती पुरवण्यासाठी छातीच्या वरील भागात एक पेसमेकर किंवा इलेक्ट्रिक टन्स जनरेटर बसवला जातो.
सबथॅलॅमिक न्युक्लियसला किती उद्दिपित करायचे ह्याचे हिशेब जरा किचकट असतात. या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणेही महागडी असतात. म्हणूनच ही  शस्त्रक्रिया खूप महाग असते.
        ग्लोबस पॅलीडसची  शस्त्रक्रिया आणि डीप ब्रेन स्टीम्युलेशन या दोन शस्त्रक्रियेमध्ये डीप ब्रेन स्टीम्युलेशन  केव्हाही श्रेष्ठ. गेली वीस-एक वर्षे पार्किन्सन्सच्या रुग्णाच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यात या शस्त्रक्रियेचा योगदान खूप मोठे आहे; परंतु जुन्या पद्धतीची शस्त्रक्रिया चाळीस-पन्नास हजारात होते, तर डीप ब्रेन स्टीम्युलेशनसाठी सात-आठ लाख रुपयाचा खर्च आहे.
        आपल्या डोक्यातल्या घडामोडीचा अभ्यास करायला मानवाने खूपच डोके खर्च केले आहे. तरीही निसर्ग आपले वर्चस्व राखूनच आहे. अजूनही आपण पार्किन्सन्सच्या लक्षणाशीच झुंजतोय. पार्किन्सन्सच्या विकाराचे कोडे सोडवायचे प्रयोग सातत्याने चालूच  असतात. स्टेम सेल्सचा वापर करूनही काही प्रयोग झाले, पण त्यांना यश आले नाही. तरीसुद्धा असे म्हणता येईल की, आजवर झालेली प्रगतीही विलक्षण आहे. पार्किन्सन्सचे रुग्ण आज पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त चांगले आयुष्य जगू शकतात. मेंदूचे रहस्य जसजसे मानवाला उकलत जाईल, तसतसे अधिक परिणामकारक मार्ग आपल्याला नक्कीच मिळत जातील. 
               - डॉ . चारुदत्त आपटे