Sunday, 21 June 2015

कोष्ठबद्धता - श्री.शरच्चंद्र पटवर्धन

       
                                      
      पार्किन्सन्सच्या पेशंटबाबतीत कोष्ठबद्धता ही इतकी सर्वसामान्य समस्या आहे,की कोष्ठबद्धता हे पार्किन्सन्सचे लक्षण मानण्याकडे लोकांचा कल होतो आहे.पार्किन्सन्सचा आजार नसलेल्या अनेक लोकांना,विशेषतः वृद्धांना कोष्ठबद्धता ही समस्या असते.त्या इतराना ही समस्या का जाणवते,त्यासाठी कोणते उपाय अवलंबिले जातात.ते पाहू आणि पार्किन्सन्सच्या पेशंटच्या बाबतीत काही वेगळी कारणे आहेत का तेही पाहू.
             कोष्ठबद्धता म्हणजे काय?
             बहुधा सर्व भारतात किमान  महाराष्ट्रात तरी, एक विचार संस्कारासारखा आपल्या मनावर ठाकून ठोकून रुजवला गेला आहे,की मलविसर्जन दिवसातून एकदा तरी व्हायलाच हवे,आणि तेही शक्यतो उठल्याउठल्या पहिल्याप्रथम.आता हा जो उत्तरार्ध आहे तो पूर्वी घरात संडास नसायचे,मलविसर्जानासाठी परसाच्या कडेला किंवा रानात जायला लागायचे.त्यामुळे दिवसा त्याकामासाठी बाहेर जायला वाटणार्‍या संकोचामुळे असेल,पहाटेपहाटे हे काम उरकण्याची गरज पूर्वी भासत असेल; पण हल्ली सकाळी उठल्याउठल्या मलविसर्जनासाठी जातो असे शहरातील कितीजण म्हणू शकतील? उठल्यानंतर अर्धा पाउण  तासानंतर जायचे ही सरासरी वेळ.पुष्कळाना सकाळचा नाश्ता झाल्यानंतर जाणे सोयीचे वाटते.
            एखाद्या दिवशी मलविसर्जन झाले नाही,तर शरीर प्रकृतीत बिघाड झाला असे मानायची गरज नाही. डॉक्टरही सांगतात, की नॉर्मल-धडधाकट प्रकृती असलेले लोकही कित्येकवेळा आठवड्यातून तीनदा किंवा दोनदाच मलविसर्जन करतात.इतकी कमी वारंवारताही अयोग्य किंवा अस्वाभाविक मानली जात नाही; परंतु प्रत्येक व्यक्तीची याबाबतीतील प्रमाण वारंवारता वेगवेगळी असेल हेही मान्य करावे लागेल.
           कोष्ठबद्धता टाळण्याच्या दृष्टीने कोणते उपाय सुचविले जातात?
            १) पुरेसे घन अन्न खाणे.- भात वरण,भाजी,भाकरी,पोळी,फळे अशा प्रकारचे पुरेसे घन अन्न पोटात जाऊ द्या.चावण्याचा किंवा गीळण्याचा त्रास असेल,तर कुटून,वाटून,मिक्सरमध्ये बारीक करून,लापशी स्वरूपात खावे; पण घन अन्न पोटात जायलाच हवे.या घन अन्नाचाच काही अंश मल म्हणून शरीराबाहेर पडतो.
           २) शरीराची हालचाल होत राहू  द्या - शक्य तितकी जास्त स्वत:ची,अन शक्य तर घरातील दुसर्‍यांचीही कामे करा.नाही तर बागकाम,चालणे,खेळणे,व्यायाम करा.नुसते बैठे काम करणार्‍याला कोष्ठबद्धतेचा त्रास होण्याची संभाव्यता जास्त असते.भूक लागण्यासाठीही हालचालीतून घडणारा व्यायाम आवश्यकच  आहे.रात्री व्यवस्थित झोप लागण्यासाठीही हालचालीतून घडणारा व्यायाम आवश्यकच  आहे.रात्री झोप लागण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे.आणि चलनशिलता टिकवण्यासाठीही फायदेशीर आहे.
अगदी पायाचे हाड मोडले म्हणून चालता येत नाही,अशी स्थिती असली तरी अंथरुणात निजल्यानिजल्या करण्याजोगे व्यायाम असतात,ते करावेत,खुर्चीत बसूनही करण्याजोगे व्यायाम असतात,ते करावेत.
          ३) आहारात पालेभाज्या,फळे शक्य तितकी जास्त प्रमाणात असू द्यावीत.तंतुमय पदार्थ पोटात जायला हवेत.फळांचे रस प्यावेत;पण शक्य तर न गाळता..तंतुमय पदार्थ पोटात जायला हवेत या दृष्टीनेच ही सूचना.
         ४)आहारात मैद्याचे पदार्थ शक्यतो नकोत,मग ते बेकरीतले असोत वा घरी केलेलेही असोत.जीव्हांलौल्यासाठी खावेसे वाटतातच;पण मग याचे प्रमाण शक्यतो कमी ठेवा.
         ५) सकाळी उठल्याउठल्या तीनचार भांडी गरम पाणी पिण्याचा मलविसर्जनाच्या दृष्टीने फायदा होतो.एकंदरीत दिवसभरात संध्याकाळपर्यंत शक्य तितके पाणी प्यावे.मल व मुत्र दोन्हीच्या विसर्जनासाठी त्याचा फायदा होतो.रात्री सातनंतर पाणी पिण्याचे प्रमाण कमीच असावे.अन्यथा मध्यरात्री मुत्रविसर्जनासाठी.उठावे लागून त्यानंतर झोप लागलीच नाही असा धोका संभवतो.
          ६) पाठीचा कणा ताणणारे व्यायाम, तसेच पोटाची घडी करणारे व्यायाम करावेत.पोटाचे स्नायू आत ओढायचे,ढिले सोडायचे, पुन्हा आत ओढायचे, ढिले सोडायचे,हा व्यायाम पोटाच्या स्नायुना अधूनमधून द्यावा.
            पार्किन्सन्समध्ये इतर स्नायूंबरोबरच आतड्याचे स्नायूही दुर्बल झालेले असतात.त्यामुळे पार्किन्सन्स हे कोष्ठबद्धतेचे आणखीन एक कारण आहे,असे म्हणता येईल.आतड्यांच्या स्नायूंची दुर्बलता याच कारणामुळे रेचकाचा ओव्हरडोस किंवा कडक रेचकाचा परिणाम, क्रियेवर रेचकाचा ताबा न राहता मलमूत्रविसर्जनास सुरुवात होऊ शकते.म्हणून शक्यतो रेचके टाळावीत.अगदीच आवश्यकता वाटल्यास सौम्य रेचकाचा वापर करावा.
            पार्किन्सन्सची काही औषधे कोष्ठबद्धता वाढवितात असा काही पेशंटचा अनुभव आहे; पण त्या औषधांचा फायदा जास्त असेल,तर आपण हा छोटासा साईडइफेक्ट चालवूनही घेऊ शकू.पार्किन्सन्सचा पेशंट किंवा दुसरा कोणी - अंथरुणावरून खुर्चीवर आणि खुर्चीवरून अंथरुणावर इतकीच हालचाल असेल, तर मलावरोध होणे अगदी स्वभाविकच  आहे.म्हणून कार्यशील राहणे हा महामंत्र लक्षात ठेऊन वर सांगितलेल्या सूचनांचा अवलंब केल्यास कोष्ठबद्धता ही समस्या बहुधा जाणवणारच नाही.किमान आटोक्यात राहील,सह्य राहील.
 शरच्चंद्र पटवर्धन  परिचय - शरच्चंद्र पटवर्धन हे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य आहेत.
 १९९२ मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर विविध माध्यामातून बरीच माहिती गोळा केली.डॉक्टर मोहित भट यांचेकडून पार्किन्सन्स फौंडेशन ऑफ इंडियाबद्दल समजल. त्यांचे सभासदत्व घेण्याचा व इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण विशेष प्रतिसाद मिळाला नाही.मग आपणच का असा गट सुरु करायचा नाही या कल्पनेतून २००० मध्ये पार्किन्सन्स स्वमदत गट सुरु केला.आज ८० वर्षाचे होऊनही  ते पूर्वीच्याच जोमाने कार्यरत आहेत.पार्किन्सन्सवरील चालताबोलता कोश असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल.शुभार्थींच्या समस्यांचा बारकाईने अभ्यास करून त्याबद्दल मंडळाच्या सर्वच स्मरणिकेतून त्यांनी मौलिक लेखन केले आहे.
सदर लेख  ११ एप्रिल २०१२ च्या स्मरणिकेतून घेतलेला आहे.

No comments:

Post a Comment