Monday, 13 January 2025

आठवणीतील शुभार्थी - दिनेश पुजारी

                                            आठवणीतील शुभार्थी दिनेश पुजारी

              आम्ही घरभेटी करत असताना औंध,बाणेर,पाषाण,बावधन  या परिसरात अनेक शुभार्थी राहात.इतक्या लांब ह्यांनी गाडी चालवत जाणे हे माझी मुलगी  सोनाली हिला  काळजीचे वाटत होते.यासाठी तिने पर्याय सुचवला.ती पाषाण बाणेर रोडला राहते. तिच्याकडे आम्ही आठ दिवस राहायचे आणि तिची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन घरभेटी करायच्या.आम्हालाही ते पटले.या काळात आम्ही औंध मध्ये राहणार्या जोत्स्ना आणि दिनेश पुजारी यांच्याकडे गेलो.

       पुजारीना नोकरी चालू असतानाच २००१ मध्ये पीडी चे निदान झाले.ते लाईफ इन्शुरन्स मध्ये होते.त्यांना ऑफिसमधून औषधाचा खर्च मिळत होता.पण त्यांनी त्यावर पाणी सोडले.

            त्यांना आपल्याला पार्किन्सन्स झाला आहे हे कोणाला सांगायचे नसायचे.आमच्याशी बोलता बोलता त्यांना असे लपवणे म्हणजे पार्किन्सन्सचा स्वीकार करण्यातील अडथळा आहे हे लक्षात आले.ह्यांच्याकडे पाहून पार्किन्सन्स न लपवता एक मोठ्या हुद्द्यावरचा शुभार्थी पार्किन्सन्सला मिरवत आहे याचाही त्यांच्यावर परिणाम परीणाम झाला असावा.नंतर दोघेही सभांना सहलींना येऊ लागले.२०१२ पर्यंत ते फोर व्हीलर चालवत होते.म्हणजे पीडी झाल्यावर ११ वर्षे ते कार चालवत होते.

          जोत्स्ना तर उत्तम कार्यकर्ती झाली.जागतिक पार्किन्सन्स मेळावा सुरु झाल्या पासून आजतागायत ती सभेस येणाऱ्या व्यक्तींच्या रजिस्ट्रेशनची जबाबदारी घेते.मासिक सभेचे फोन करते.पुजारीही टेकवडे यांच्या नेत्र शिबिराला एकटे आले होते. स्पीच थेरपीला भारती विद्यापीठात आलेल्या वेळी एकटे आमच्या घरी येऊन गेले.औंधपासून इतक्या लांब एकटे यायचा विचार करणे हेच धारिष्ट्याचे होते.नंतरही एकटे बाहेर जाण्याचा आत्मविश्वास होता.पण जोत्स्नाला आणि इतर कुटूम्बियानाही त्यांचा तोल जात असल्याने एकटे पाठवणे योग्य वाटत नव्हते.

            नंतर पार्किन्सन्स वाढला तसे त्यांचे बाहेर जाणे कमी झाले तरी ते जोत्स्ना बरोबर सभेला सहलीला येत.जोत्स्नाने त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी जीवाचे रान केले.त्यांना व्यायाम करण्याची आवड नव्हती ती मागे लागून करून घेई.अनेकदा पडत.हॉस्पिटलला न्यायची वेळ येत नसे. पॅॅनिक न होता बारा क्षार उपचार ती करत असे.त्यांना घरी बसून सोशल फोबिया येऊ नये म्हणून ती डे केअर सेन्टरमध्ये काही दिवस ठेवत होती.

         त्यांचा पीडी वाढत गेला तसा,ते आनंदी राहावेत त्यांचा पीडी नियंत्रणात यावा यासाठी जोस्नाने आटापिटा केला.रोज काही तरी नवीनच पुढे उभे राहायचे.जोस्ना त्याचे व्हिडीओ काढून डॉक्टरना पाठवायची.त्यांच्याशी करायची त्यांनी सांगितलेले उपाय आणि बाराक्षार या आधारे एकदाही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागले नाही.जोस्नाने कधी आई,कधी मैत्रीण कधी उपचारक तर कधी कडक शिक्षक बनत दिनेश यांच्या पीडी जास्तीत जास्त सुकर कसा होईल हे पाहिले.हे करताना स्वत:ला स्पेस दिली. आणि पार्किन्सन मित्रमंडळाची कामेही केली.दिनेशनाही ही पार्किन्सन्सने अनेक रूपे दाखवत घाबरवले तरी त्यांची जगण्याची उमेद संपली नव्हती.

झुमवरील "भेटू आनंदे" मध्ये या कार्यक्रमात तिने हे तिचे अनुभव सांगितले आहेत.एका शुभंकराची निकराची झुंज कशी असते हे या अनुभवातून समजेल.हे अनुभव सर्वांनी अवश्य ऐकावेत,पाहावेत.

           


No comments:

Post a Comment