Monday, 13 January 2025

आठवणीतील शुभार्थी - सुरेश सिधये

                                                         सुरेश सिधये

                 

              सुरेश सिधये हे अगदी सुरुवातीपासूनचे मंडळाचे सभासद आहेत.त्यांचा पार्किन्सन्स सोबतचा  सर्व प्रवास मी प्रत्यक्ष पाहिला आहे. आमच्या घरभेटी चालू झाल्या तेंव्हा आम्ही एक दिवस कोथरूडला राहणाऱ्या भाच्याकडे राहिलो आणि त्या भागात राहणाऱ्या शुभार्थींच्या भेटी घेतल्या, त्यावेळी सुरेश सिधये यांच्याकडेही गेलो होतो. त्याना ४५ व्या वर्षी पार्किन्सन्स झाला.मुली लहन होत्या सर्वच कुटुंबियांना हे स्वीकारणे जड गेले.ते  पहिल्यांदा मिटिंगला आले तेंव्हा ओळख करून देतानाभावना न आवरून  रडू लागले.सभाना येऊ लागल्यावर मात्र त्यांच्यात कायापालट झाला.विविध लेखांद्वारे,स्वत:च्या कृतीतून,शेअरिंग मधून सकारात्मकता वाटण्याचे मोट्ठे काम त्यांनी केले.

                  त्यांच्या घरी आम्ही सकाळी ब्रेकफास्टलाच गेलो होतो.खूप गप्पा झाल्या.त्यांचे मोट्ठे भाऊ ह्यांच्याबरोबर किर्लोस्कर न्यूमॅटिक मध्ये होते.ही ओळख निघाल्यावर जास्तच जवळीक वाटली.पती,पत्नी दोघेच राहत. मुलगी जवळच राहत असल्याने तिचीही मदत होती.दुसरी मुलगीही पुण्यातच.ते इलेक्ट्रीकल इंजिनिअर होते.पोर्टट्रस्टमध्ये काम करत.

                      मंडळाच्या सभासहलीना ते नियमितपणे हजर राहात.एकदा स्मिताताईना सहलीला येणे शक्य नव्हते तर ते केअरटेकर घेऊन आले होते.सभेला ते, पत्नी स्मिताताई, शुभार्थी सुधाकर अनवलीकर हे  एकत्र रिक्षाने येत.कधी समोरच राहणारे शुभार्थी जावडेकर असत.एकदा स्मिताताईंचा रडवेल्या आवजात फोन आला. "सभा संपली का? अजून हे घरी आले नाहीत" त्या विचारत होत्या.त्यादिवशी नेमके त्यानी कोणीतरी सोबत देऊन त्यांना पाठवले होतेव.सभा तर केंव्हाच संपली होती.आम्ही घरी येऊनही बराच वेळ झाला होता.नंतर त्यांचा सिधये घरी आल्याचा फोन आला.रिक्षा न मिळणे रस्त्यातील गर्दी यामुळेच वेळ लागला होता.पण यातून एक फायदा झाला.आपण एकटे बाहेर गेलेल्यावेळी वेळ झाला तर घरच्यांना किती काळजी वाटते हे माझ्या नवऱ्याला समजले.हे बरोबर फोन ठेवायला तयार नसत. या प्रसंगानंतर ठेऊ लागले.
                   सभांप्रमाणे इतर उपक्रमासाठी ते उत्साहाने भाग घेत.गांधी भवन येथे शुभार्थी अनिल कुलकर्णी यांनी झुबेन बलसारा यांच्या ड्रमथेरपीचे प्रात्यक्षिक ठेवले होते.सर्वाना ते आवडले. बलसारा यांनी आर्टबेस थेरपीचे प्राथमिक शिक्षण देण्याचे मान्य केले.दर सोमवारी संध्याकाळी चार  ते सहा क्लास सुरु झाला.सिधये सहभागी झाले होते.झुबेन यांनी प्रत्येकाची ह्रिदम आणि गाण्यांची आवड ओळखून त्या गाण्यावर चालायला लावले.प्रत्येकाच्या चालण्यात लक्षणीय फरक पडला.चालणे न अडखळता वाढत्या गतीने होऊ लागले. सिधयेनी याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यावर लेख लिहून दिला.त्यात ते लिहितात," आपण जेंव्हा निराश होतो तेंव्हा संगीताने उभारी येते. आपल्या आवडीचे एखादे गाणे लावावे.त्या तालावर जमेल तसा न लाजता नाच करावा.कोणाला काय वाटेल  याची अजिबात काळजी करू नये.अल्पावधीत शरीर मोकळे झाल्याची जाणीव होईल.हा प्रयोग रोज करतो.नातवंडेही माझ्याबरोबर नाचतात."
                 हृशिकेशच्या डान्स क्लास मध्येही पती पत्नींचा सहभाग होता.डान्समुळेही पार्किन्सन नियंत्रणात राहण्यास मदत झाली. कोथरूड जेष्ठ नागरिक संघातही त्यांचा सक्रीय सहभाग असे.तेथल्या मासिकासाठी ते लेख देत.
              युरोप सहलीवर ही त्यांनी स्मरणिकेसाठी लेख लिहिला.५ मिनिटे स्थिर उभे राहता येत नव्हते.अशा अवस्थेत एवढा मोठ्ठा प्रवास कसा झेपणार असे वाटत होते.पत्नीने धीर दिला.योग,व्यायाम नियमित सुरु केले.युरोप सहलीचा मनसोक्त आनंद लुटला.इच्छाशक्तीच्या बळावर काहीही करू शकता असा प्रेमळ सल्लाही दिला.

            क्रिकेटची अत्यंत आवड.सामने दूरदर्शनवर पाहिले, किंवा रेडिओवर ऐकले परंतु स्टेडियमवर जाऊन  सामना पाहण्याची ओढ होती. त्यामुळे १२ - १० -१३ रोजी पुण्यात होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत हा एकदिवसीय सामना होता.तो प्रत्यक्ष बघण्याची जबर इच्छा होती
             त्यांची तब्येत रोज बघणाऱ्या घरातील लोकांना त्यांनी हे हे धाडस करू नये असे वाटत होते. घरापासून स्टेडियमचे अंतर खूपच होते त्यातही पार्किंगची जागा मुख्य ग्राउंड पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर होती त्यामुळे एवढे अंतर चालणे तेही खूप गर्दीत शक्य होईल का नाही व त्याचबरोबर एवढा वेळ एका जागी
बसणे जमेल का नाही याची शंका सगळ्यांना होती.परंतु जावयाने, 'जर तुम्हाला सामना पाहण्याची जबरदस्त इच्छा असेल तर तुम्ही चला व मधून उठून जरी यावे लागले तरी मी तुमच्याबरोबर परत येईन' असे सांगितले आणि सामना पाहता आला.इच्छाशक्तीच्या बळावर काहीही करू शकता हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. 

              २०१५ साली त्यांची DBS शस्त्रक्रिया झाली.अर्ध्या गोळ्या कमी झाल्या.शस्त्रक्रियेचा उपयोग झाल्याने ते खुश होते.पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता.दोन वर्षातच ते पडण्याचे निमित्त झाले. खुब्याचे हाड मोडले. शस्त्रक्रिया झाली.यापूर्वी ते अनेकदा पडले तरी त्यातून ते बाहेर आले होते.हे पडणे मात्र जीवघेणे होते.१ एप्रिल १७ ला ते, हे जग सोडून गेले.                 

                सिधये आज आपल्यात नाहीत.तरी त्यांच्यातला उत्साह आणि जिद्द इतर शुभार्थीना प्रेरणा देईल.
            

No comments:

Post a Comment