अश्विनी दोडवाड यांची पहिली भेट हृशिकेशच्या डान्स फॉर पार्किन्सन या पुणा हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात झाली.त्या माझ्या शेजारीच बसल्या होत्या.त्यांचा मुलगा हृषीकेशचा मित्र होता.मी त्यांना मंडळाची माहिती सांगितली आणि त्या सामील झाल्या.त्यांची मुले त्यांना सभाना आणत.कधी त्या बसने एकट्याही येत.नंतर त्यांनी वारज्याला मुलीच्या जवळ घर घेतल शिक्षिका असल्याने आमचे दोघींचे विशेष मैत्र जमले.एकत्र आनंदवन ट्रीप केल्याने ते अधिकच दृढ झाले.त्यांची मुले ही मंडळाशी सबंध ठेवून आहेत.
त्यांच्या मुलांपैकी ओंकार हे युरोपात आहेत. मुलगी अनुश्रीचे लग्न झाले आहे.आणि धाकटे ऋषिकेश हे आईसोबत असतात. आईला जेव्हा पार्किन्सन्सचं निदान झालं तेव्हा हृषीकेश बारावीत होता. उत्तम शिक्षिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या अश्विनीताई विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका होत्या.माणसांमध्ये मिसळणे, त्यांना निरनिराळे पदार्थ करून खायला घालणे हे आवडायचे.२००७ मध्ये अनुश्रीचा विवाह झाला. आता जावयाला चांगले चुंगले खायला घालायचे होते.त्याच वेळी पार्किन्सन्सचे निदान झाले.
पार्किन्सन्स झाल्यानंतर हे सारे कमी होऊ लागले. मात्र नृत्योपचार आणि पार्किन्सन्स मित्रमंडळातील त्यांचा वावर यामुळे त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक पडला.हृशिकेशच्या पार्किन्सन आणि नृत्योपचार यावर केलेल्या फिल्मच्या अनावरण प्रसंगी याची एक अतीशय गोड आठवण त्यांच्या मुलीने सांगितली.
अश्विनीताईना रव्याचे लाडू उत्तम बनवता येत असत.अनुश्रीच्या मते ती तीची सिग्नेचर डीश होती.ते बनवून लोकांना खाऊ घालण्याची त्यांना हौसदेखील होती.मुलांच्या मित्रमैत्रिणी त्यांच्या स्वयंपाकाच्या फॅन होत्या.पार्किन्सन्सने ते कसब आपल्या हातून हिरावून नेले याची त्यांना खंत वाटत असे. मात्र नृत्योपचार आणि मंडळातील सकारात्मक उर्जा यामुळे त्यांचे हात पुन्हा चालू लागले.त्यांनी रव्याचे लाडू करणे सुरु केले.याचा त्यांना अपार आनंद झाला.आईच्या चेह्ऱ्यावरचा आनंद पाहून आणि बऱ्याच दिवसाने आईच्या हातचे लाडू खाल्ल्याने मुलेही खुश झाली.एकदा अश्विनी लॉजमधील मासिक सभेला त्यांनी ४०/५० जणांसाठी स्वत: उपमा बनवून आणला होता.
त्या मित्रमंडळाच्या अनेक सहलींमध्ये सहभागी झाल्या. पीडी वाढल्यानंतर मात्र सहलीला जाणे त्यांना नको वाटायला लागले होते.एका सहलीला मी त्यांना खूप आग्रह केला त्यांना आनंदवनच्या सहलीची आठवण दिली.तेंव्हाही त्या आधी नाही म्हणत होत्या.त्यावेळी त्यांच्या एका नातलगाचे निधन झाले.विधीसाठी नरसोबाच्या वाडीला गेल्या होत्या तेथे त्यांना गारव्याने सर्दी खोकला झाला.ताप आला या सर्वामुळे थोडा अशक्तपणा आला.त्याहीपेक्षा जास्त त्या मनाने खचल्या होत्या.
मी सहलीला येणार नाही असा त्यांचा फोन आला.सहलीचे पैसे आधीच भरले होते रिझर्वेशन झाली होती.ते रद्द केल्याने जे पैसे मिळतील तेवढेच पैसे मिळणार होते.बाकी पैसे परत मिळणार नव्हते.आनंदवनला मी या आधी एकदा सहलीसाठी आणि एकदा फ्लॉवर रेमेडी शिकावायला १५ दिवस गेले होते.तेथे जाऊन आल्यावर शुभार्थी भरपूर उर्जा घेऊन येणार याची मला खात्री होती.अश्विनीताईनाही सहल झेपणार असे मला वाटत होते.शेवटी त्या तयार झाल्या.त्यांच्या जाऊबाई बरोबर आल्या होत्या.
वर्ध्यापर्यंत रेल्वेचा प्रवास होता.गरीबरथ मधील प्रवास अन्त्याक्षरी,गप्पा,एकमेकिनी आणलेल्या खाण्याची देवाण घेवाण असा मजेचा झाला.माझे सर्व लक्ष अश्विनीताईवर होते.त्या आनंदात दिसत होत्या.वर्ध्याला सेवाग्राम,गांधी आश्रम पाहून पाहून तेथून बसने आनंद्वनला जायचे होते.तेथे जेवण आणि थोडा आराम करून लगेच हेमलकसाला जायचे होते.मी या आधी गेले तेंव्हा दोन दिवस आनंद्वनला राहून नंतर हेमलकसा होते.रात्रीच्या प्रवासाने दमलेल्या शुभार्थीना हे कसे झेपेल याची मला काळजी वाटत होती.
आनंदवनला पोचल्यावर तेथे विकासभाऊंचे व्याख्यान सुरु होते. ते ऐकूनच प्रवासाचा शिण विसरून सर्व चार्ज झाले.जेवण थोडा आराम झाल्यावर हेमलकसाला जाण्यासठी सर्व बसमध्ये बसलो.आणि एवढ्यात डॉ.भारतीताई आमटे आल्या.मी आणि आमच्याबरोबर स्वयंसेवक म्हणून आलेल्या निरूपमला त्या म्हणाल्या,तुम्ही जाऊ नका मी सर्वाना जमवले आहे फ्लॉवररेमेडीच्या फीडबॅक क्लाससाठी.असे सर्वाना अर्ध्यावर सोडून थांबणे मला अपराध्यासारखे वाटत होते.करमरकर पती पत्नी,अंजली,प्रकाश जोशी आणि आमचे अहोही म्हणाले,भारतीताई इतका आग्रह करतात तर थांबा तुम्ही. आम्ही आहोत.मी सहल संयोजक जोत्स्नाला पुन्हा पुन्हा सांगत होते.अश्विनीताईकडे लक्ष दे.
हेमलकसाहून सर्व मंडळी आली.जोत्स्नाने अश्विनी ताईना माझ्यासमोर उभे केले आणि म्हणाली या पहा तुमच्या अश्विनीताई.त्यांच्याकडे पाहून मी थक्क झाले. चेहरा आंनदाने फुलून गेला होता.पार्किन्सन पळून गेला होता.मी त्यांना घट्ट मिठी मारली.दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.शब्दात सांगता न येणारे स्पर्शातून समजले होते.
अनुश्रीनी १०१५ च्या स्मरणिकेत "पार्किन्सन: ओळख, प्रवास व लढाई" असा लेख दिला होता त्यात लिहिले होते आनंद्वांची सहल आईच्या दृष्टीकोनाला कलाटणी देणारी ठरली.कुष्टरोग्यांच्या आजारापुढे आपली तब्येत छान आहे ही भावना झाली.
सहलीनंतरही सभेत भेटी होत.फोनही होत.कधी आनंदी तर कधी निराशेचा सूर असे.त्यांच्या जीवनात आनंदी आनंद देणारा क्षण आला.बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर २०१५ मध्ये अनुश्रीला मुलगी झाली.आता आज्जीबाई बाळंतपण आणि नातीचे कोडकौतुक करण्यात गुंग झाल्या.पार्किन्सन्स पुन्हा पळाला.त्यांच्या नातीला पाहायला जायचे आम्ही कितीतरी वेळा ठरवले.पण ते जमले नाही.फोनवरून त्यांचा आनंदी स्वर ऐकताना आनंद व्हायचा.
मी ज्या सहलीवरून आनंदवन पुराण सांगितले,त्या सहलीला माझे बोलणे ऐकून त्या केअरटेकरला घेऊन आल्या.सहलीचा आनंद लुटला.रात्री अनुश्रीचा फोन आला,"काकू आज किती दिवसांनी मी आईच्या चेहऱ्यावर हसू पहिले. मंडळाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत".
करोनामुळे लॉकडाऊन झाला आणि समाजात मिसळण्याची हौस असलेल्या अश्विनी ताईना एकटे पडल्यासारखे झाले. अशावेळी अनेकदा पार्किन्सन्स पेशंटना नैराश्य येऊन त्यांचा आजार वाढतो असं दिसलं आहे. त्या काहीवेळा घरातच पडल्या. एक मुलगा घरात, एक बाहेरदेशी, आणि मुलीचे लग्न झालेले. घरात येणार्या काम करणार्या मावशीदेखील लॉकडाऊनमुळे येण्याचे थांबलेल्या.अशावेळी या तिन्ही मुलांनी आईला नैराश्य येऊ नये याची खबरदारी घेतली. यासाठी कामे वाटून घेतली.आईने केलेल्या संस्काराचे हे फलित होते.
सर्वप्रथम अनुश्रीनी आईला तीन वेळचा डबा पाठवण्यास सुरुवात केली. ते घेण्यासाठी ऋषिकेश त्यांच्या घरी येत असे. त्याला आणि अनुश्री यांना वर्क फ्रॉम होम सुरु झाले होते. त्यामुळे फारसा वेळ मिळत नव्हता.आईचे प्रत्यक्ष सारे काही करण्याची जबाबदारी ऋषिकेशने उचलली होती.
त्यात कधी कधी अंघोळ घालण्यापसून सारी कामे तो करीत होता.भूमिका बदलल्या होत्या.तो आता आईची आईच झाला होता.अशावेळी जेव्हा हे दोघे आपापल्या कामात व्यस्त असतील तेव्हा आईचे एकटेपण दूर करण्याची जबाबदारी परदेशात असलेल्या ओंकार यांनी उचलली. ते व्हिडीओ कॉल करून आईशी बोलू लागले. त्यांना सुंदर सुंदर फोटो दाखवणे, आजाराबद्दल सोप्या भाषेत माहिती देणे, इतरही अनेक गप्पा मारणे असे करून त्यांनी आपल्या आईची मनस्थिती सकारात्मक ठेवली.अनुश्रीची मुलगी अभिश्रीही आपल्या आजीशी बोलत असे. अनुश्रीचे पतीदेखील गरज पडेल तेव्हा मध्यरात्रीसुद्धा सासूबाईंच्या मदतील हजर असत.या तिन्ही मुलांचे एकत्रित अनुभव 'भेटू आनंदे" कार्यक्रमात युट्युबवर आहेत ते आवर्जून पाहावेत.
झुमवर डान्स क्लास सुरु झाल्यावर काही काळ त्या सामील झाल्या. पण त्यांचा पार्किन्सन वाढतच गेला.त्या नवीन घर पाहायला या असे सारखे बोलवत होत्या पण जाणे जमले नाही.फोनवर मात्र बोलणे व्हायचे.
शेवटीअस्पिरेशन न्युमोनिया होऊन दोन आठवड्याच्या लढयानंतर त्या आपल्याला सोडून गेल्या.
मुले आणि जावई यांचे अश्विनी ताईंशी शुभंकर म्हणून नाते लोभसवाणे होते.एकमेकातील सामंजस्याने या तिघांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईची सेवा केली.असे उदाहरण विरळाच.
त्यांच्या निधनानंतर अनुश्रीचा एकदा फोन आला.काकू एकदा तुमच्या घरी यायचे आहे.आईची तुम्हाला भेटायला यायची खूप इच्छा होती. आईचे जे जे करायचे राहिले होते ते ते मी करणार आहे.
वृद्धांचे पालकत्व या ग्रुपवर पर्किन्सन्स मित्रमंडळाच्या फेसबुक लाईव्हवर अनुश्री शुभंकर म्हणून उपस्थित होती.तिच्या ऑनलाईन मिटिंग मधून थोडा वेळ काढून ती आली होती.तिने शुभंकर म्हणू करीत असलेल्या भूमिकेबद्दल दिलेली माहिती ऐकून मुलाखत घेणाऱ्या मेधा कुलकर्णी म्हणाल्या,"तुझ्यासारखी मुलगी सर्वाना लाभो." अश्विनी ताई गेल्या तरी आपल्या भावंडांची आई बनणारी,अश्विनीताईंचे संस्कार घेऊन आलेली अनुश्री त्यांची उणिव भरून काढायला आमच्याबरोबर आहे हे थोडे समाधान.