Tuesday, 7 February 2023

आठवणीतील शुभार्थी - रमेश रेवणकर

May be an image of 3 people and people standing                                             आठवणीतील शुभार्थी - रमेश रेवणकर

                         शुभार्थी रमेश रेवणकर यांना जाऊन बघता बघता वर्ष झाले.त्यांच्यासारखी असामान्य माणसे पार्किन्सनमित्रामुळे आमच्या जीवनात आली.त्यांच्या बाबतीत मात्र पीडी त्यांचा मित्रही नव्हता आणि शत्रूही नव्हता किंबहुना तो त्यांच्या खिजगणतीतही नव्हता.

                 २००८ सालच्या दिनानाथ हॉस्पिटलमधील मेळाव्याला ते एकटेच गेले होते.त्यानंतर मात्र मंडळाकडे त्यांनी ढुंकूनही पहिले नाही.उलट आपली पत्नी आशालाही म्हणाले तू आली नाहीस तरी काही फार काही मीस केले नाहीस.

                  नंतर न्यूरॉलॉजिस्ट राहुल कुलकर्णी यांनी ग्रुपमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला.सभा अटेंड केल्या. कोणत्याही गोष्टीचे पटकन आकलन होणाऱ्या आशाला परिस्थितीचे पटकन आकलन झाले. आपल्या सहचर्यासारखा  पार्किन्सनही समजायला कठीण,गुंतागुंतीचा, हटके आहे हे लक्षात आले.विवाहाला ३६ वर्षे झाली होती.आपल्या हटके पतीला कसे हाताळायचे हे चाणाक्ष आशाला जमले होते.आता बेभरवशी पीडीला समजून घेण्यासाठी पार्किन्सन मित्रमंडळासारखा स्वमदत गट पीडीसह पतीला हाताळण्यासाठी अधारभूत ठरेल हे तिच्या लक्षात आले. 

                    पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर तिच्यात खंबीरपणा आला. इतर शुभार्थी शुभंकरांना ती खंबीर बनवू लागली.ही प्रक्रिया हळूहळू पण सहजपणे झाली. ती मंडळात सामिल होऊन थांबली नाही तर मंडळाच्या कामात तिने स्वत:ला झोकून दिले.ती ट्रस्टची कार्यवाह बनली.पुढे जाण्याआधी  मी त्याना असामान्य का म्हटले हे सांगणारा रेवणकर यांचा जीवनप्रवास समजून घेऊ.

                    रमेश यांनी डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरिंग केले.त्यानंतर चेन्नई येथून AMIE केले.२२ व्या वर्षापासुन नौकरी ला सुरुवात केली.२८ व्या वर्षी टेलको कंपनी जॉईन केली. J.R.D.Tata त्यांच्यासाठी रोल मॉडेल होते. दैवत होते.रमेश यांच्या घराच्या दिवाणखान्यात त्यांचा फोटो आहे.फोटोबरोबर "No success or achievement in material in material terms is worthwhile unless it serves the need or interest of the country and its people and is achieved by fair and honest means." असे कोटेशन आहे.प्रत्यक्ष आयुष्यात ते असेच जगले.

                  वयाच्या ६० वर्षा नंतर निवृत्त झाले. टेल्कोचे नाव तेव्हां 'टाटा मोटर्स' झाले होते. सुरवातीला मशीन शॉप व नंतर सेफ्टी डिपार्टमेंट मधून निवृत्त झाले.

                   घरातून फॅक्टरीला जाताना बस मध्ये ब्रिज खेळायला सुरुवात झाली आणि दोन वेळा नॅशनल winner झाले.टाटा मोटर्सचे executive डायरेक्ट श्री.प्रकाश तेलंग आणि रमेश वर्षातून एकदा कंपनीच्या वार्षिक tournament मध्ये ब्रिज खेळायचे पण कधीही पाहिल्या तीन क्रमांकाने जिंकणे सोडले नाही.तेलंग त्यांचे फॅमिली फ्रेंडच झाले.
                    टाटा मोटर्स मध्ये ब्रिज या खेळाला प्राधान्य मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न केले व ते तडीस नेलेही .  "फेस ऑफ टाटामोटर्स ब्रिज" म्हणुन त्यांची ओळख झाली.
ऑनलाईन ब्रिज खेळत असताना पार्टनरने बडबड केली तरी ते शांतपणे खेळून डाव संपल्यावर, कुठले सिस्टीम मध्ये कुठल पान, केलेली बिड, त्यावर केलेला कयास सगळ व्यवस्थित आणि शांतपणे समजाऊन सांगत असत.
                    नॅशनल लेव्हलचे tournament असले, उतरलेले हॉटेल वेन्यु पासून लांब असले तर टूर्नमेंट मधे भाग घेतलेल्या बायकांना त्यांच्या बरोबर जायला सुरक्षित वाटते असे त्या त्यांच्या पतीला फोन करून सांगत असत. आणि पती आपल्याला आपल्या पत्नीने ब्रिज खेळायला शिकवले हे ते खूप अभिमानाने सांगत असत.
                        फॅक्टरी मध्ये safety department मध्ये असो की ग्रोथ डिव्हिजन मध्ये ते अजातशत्रू होते. रिटायर्ड झाल्या नंतर देखील बरेच जण कामासाठी सल्ला घेत असत.
कंपनी मध्ये कशा प्रकारच्या अपघात झाला तर आधी माणसाची सुरक्षिततेबाबत काळजी घेऊन नंतर कायदेशीर कारवाई करताना त्यातील शाखा , उप शाखा , त्यात कोणते पॉईंट्स आहेत, हे सगळे त्यांच्या स्मरणात फिट बसलेले असे. 
                       पार्किन्सन्सचे निदान झाले तेंव्हा मित्रांना वाटले आता ते ब्रिज खेळू शकणार नाहीत.पण त्यांची इच्छाशक्ती,जिद्द जबरदस्त होती. पार्किन्सन्स त्यांच्या क्षमतेवर परिणाम करू शकला नाही.पुण्यात आणि .पुण्याबाहेर ते सातत्याने ब्रिज खेळण्यासाठी जात राहिले.
                      रमेश रेवणकर सहभागी आहेत म्हणजे विजय ठरलेला असेच समीकरण या क्षेत्रात होते. हळहळू पुण्याबाहेर खेळण्यासाठी जाणे बंद झाले.पण पुण्यातील Tournaments मध्ये सहभागी होत.ते Tournaments आयोजित करत.परीक्षक म्हणून काम करत.यासाठी मुव्हमेंट कार्ड स्वत: तयार करत.ते जागतिक दर्जाचे असावे म्हणून विशेष अभ्यास करत.यासाठी त्यांना महिनाभराचा काळ लागे.हे किचकट काम ते न कंटाळता करत.
                     प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी ते ब्रिज खेळत. इतर दिवशी रमी खेळत.हेच खेळ ते ऑनलाईनही खेळत.हे विस्ताराने लिहायचे कारण पीडी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची ग्रहण क्षमता,आकलन क्षमता,स्मरणशक्ती,जाणीव क्षमता कमी होते असे नाही हे उदाहरणासह समजावे. 
                       या सर्व काळात पीडी स्वस्थ बसला नव्हता.भास होणे,ब्लडप्रेशर वरखाली होणे,तोल जाणे अशा विविध स्वरूपात तो आपले अस्तित्व दाखवत होता.त्यांचा पीडी समजून घेणे आणि त्याला आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न त्यांच्याही नकळत करणे हे काम आशा शिताफीने करत होती. 
                    रमेश रेवणकर सभेला येत नव्हते. तरी त्यांचा मंडळाशी अप्रत्यक्ष संबंध येतच होता आणि मंडळाच्या कामाला हातभार लागत होता.ते दरवर्षी स्वत: आकाशकंदील बनवत.प्रत्येकवेळी वेगळे डिझाईन असे..कलाकृतीच्या प्रदर्शनात आशा रेवणकर ते ठेवत असे.अनेकांना यातून प्रेरणा मिळे.एका प्रदर्शनात विमानाच्या आकाराचे काठी डिझाईन केले होते.त्यावर्षीच्या प्रमुख पाहुण्या न्यूरॉजिस्ट चारुलता सांखला याना त्याचे फार कौतुक वाटले.
                     आमच्या कार्यकारिणी सदस्यांची सातत्याने फोनाफोनी चालू असते.निरोप घेणे, देणे हे ते न कंटाळता करत.त्यांच्या घरी अनेकवेळा मिटिंग होइ.त्याबद्दल त्यांची नाराजी नसे. घरी असले तर थोड्या गपा मारत.आशा मंडळाच्या कामात बुडून गेलेली असे.त्याबद्दलही त्यांची कधी कुरकुर नसे.तिला त्यांनी कधीच कोणतेही बंधन घातले नाही.
                    त्यांचे पत्नीवर निरतिशय प्रेम होते.अपत्य नाही म्हणून जुन्या पिढीचे लोक दुसऱ्या लग्नाचा सल्ला देत पण त्याला रमेश यांनी अजिबात दाद दिली नाही.माझ्यात दोष असता तर तिचे लग्न करून दिले असते का असे विचारून निरुत्तर करत.युट्रेस काढण्यासाठी शस्त्रक्रिया झाली.शस्त्रक्रियेला त्याला काही कारणाने खूप वेळ लागला.पाण्याचा थेंबही न घेता ते बसून होते. आशाच्या आईने हे तिला नंतर सांगितले. लेकीची योग्य काळजी घेतील याची तिला खात्री वाटत होती.
                 आशाच्या मानसिक अवस्थेत त्यांनी खूप मोठ्ठा आधार दिला आणि बाहेर काढले.एका झूम मिटिंगमध्ये आशाने हे सांगितले होते.आपल्या नंतर तिला त्रास होऊ नये यासाठीही ते सतत विचार करत आणि त्या दृष्टीने त्यांनी व्यवस्थाही केली.
                आशाही  आजारानंतर त्यांची आईच बनली.त्यांच्या हट्टीपणातून ओढवून घेतलेले अपघात आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी झालेले त्रास तिने आईच्या मायेने सोसले.सुरुवातीपासून सहजीवन चांगले असले की एकमेकांचे कठीण प्रसंगात ओझे कधीच होत नाही.
                  पत्नीप्रमाणे कुटुंबीय,त्यांचे गाव कारवर यावरही त्यांचे प्रेम होते.स्वतःला मासे खायला खूप आवडत असल्यामुळे इतरांनाही खाऊ घालण्याची खूप हौस होती़.या दोघांनी अनेक माणसे जोडली.आशाचे भाऊ वहिनी,रमेश यांचे भाऊ,वाहिनी,पुतणे भाचे या सर्वांसाठी त्यांनी केले आणि तेही आशा आणि रमेशच्या मागे अडचणीच्यावेळी खंबीरपणे उभे राहिले आणि राहतात.आशाचा शिष्य वर्गही यात आहेच.आता रमेश यांच्या मागेही आशासाठी ते आहेत.बरेच जण अशी माणसात गुंतवणूक न केल्याने मुले असूनही वृद्धत्वात एकटी पडतात.
                 रमेश याना पर्यटन हेही आवडीचे होते.   दरवर्षी एक परदेश पर्यटन, भारतातील एखादे स्थळ दर्शन,पुण्याजवळच फार्महाऊसवर जावून राहणे,गणपती उत्सवासाठी मुळ गाव कारवारला जाणे, Tournaments च्या निमित्ताने गावोगावी जाणे अशी त्यांची विविधांगी भटकंती सुरु असे.
 पार्किन्सन्स मुळे फिरायला त्रास होत असे पण आपल्या मुळे आशाला त्रास नको म्हणुन सगळीकडे जात असत.बाहेर गेलेल्यावेळी कधीतरी आपल्याला जमणार नाही असे वाटले तर ते हॉटेलवर एकटे राहात आणि आशाला जाऊ देत.
               पीडी असो की अॅक्सिडेंट, कोणत्याही दुखण्याचा कधीही बाउ केला नाही.आशा एकदा म्हणाली होती, 
               ” Some times I worry about his wellness,but after every problem he rises like a Phoenix.That gives me positivity and stop worrying. ..He is patient but he finds his ways to be happy so our life too runs very smoothly.”
                 त्यांचे ब्रिज खेळणे,प्रवास,आकाशकंदिल बनवणे,प्राणायाम,मेडिटेशन आणि माणसांवरील प्रेम हे सर्व त्यांच्या आनंदाच्या मार्गातील आधार होते. २४ वर्षे त्यांनी पीडिला या आधारे दूर ठेवले.आणि चालते फिरते असतानाच या जगाचा निरोप घेऊन पीडीलाच चकविले
                 १३ मेला रमेश यांचा जन्मदिन असतो. आशानी त्यादिवशी हिराबाग येथे सर्व कॅटागरीसाठी  ब्रिजच्या ओपन टूर्नामेंटस ठेवल्या आहेत.त्यांच्यासाठी तीच खरी आदरांजली असणार आहे.
 
 No photo description available.
May be an image of indoor
No photo description available.May be an image of 1 person, balloon, flower and indoor

No comments:

Post a Comment