पार्किन्सन्स मित्रमंडळ - एक स्वमदतगट
एकमेकाना भेटून अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि व त्यातून शिकण्याची इच्छा असणा-या समान समस्येनी ग्रस्त व्यक्तींचा गट असे ढोबळमानाने स्वमदत गटाबद्दल म्हणता येईल यात घटस्फोट,व्यसनाधीनता,सिंगल पॅरेन्ट अशा सामाजिक समस्या असतील किंवा कर्करोग,एपिलेप्सी पार्किन्सन असे शारीरिक आजार असतील. कोणत्याही शारीरिक आजारावर डॉक्टर उपचार करतात.पण रुग्णानीही काही धडपड केली पाहिजे.ही धडपड म्हणजे स्वमदत.गेल्या काही वर्षात जगभर असे विविध आजार,समस्या यांच्यासाठी स्वमदत गट कार्यरत असलेले दिसत आहेत.यांची उपयुक्तता शास्त्रीय दृष्ट्याही सिद्ध झाली आहे.पार्किन्सन्ससारख्या गुंतागुंतीच्या आजारात तर स्वमदत गटाची गरज आणि उपयुक्तता खूप मोठ्ठी आहे.अशा गरजेतून पार्किन्सन्स मित्रमंडळ या स्वमदत गटाची स्थापना झाली
शुभंकर ( केअर टेकर ) आणि शुभार्थी ( पेशंट )यांनी एकत्र येऊन तयार केलेला हा स्वमदत गट आहे.तो मोफत चालवला जातो.पार्किन्सन्सचे निदान झाले की हा आजार बरा न होणारा आणि वाढत जाणारा आजार आहे असे सांगितले जाते. या आजाराची कंप,मंद् झालेल्या हालचाली स्नायूंची ताठरता इत्यादी लक्षणामुळे रोजच्या जगण्याची गुणवत्ता कमी होते.पेशंट आणि कुटुंबीय हताश होतात.यांना मदतीचा हात द्यायला.पार्किन्सन्स मित्रमंडळ स्वमदत गट पुढे येतो.सध्या पुण्यातील २८० आणि परगावचे ९० असे ३७० शुभार्थी मित्रमंडळाचे सभासद आहेत.पार्किन्सन्ससह आनंदाने जगूया हे मंडळाचे ब्रीदवाक्य आहे.याची स्थापना केलेले स्वत: पेशंट असलेले मधुसूदन शेंडे आणि ज्यांची पत्नी पेशंट होती ते शरच्चंद्र पटवर्धन यांनी स्वत:च्या जगण्याने ते सिद्ध केलेले आहे.
उद्दिष्टे आणि पूर्तता
पार्किन्सन्स साक्षरता हे महत्वाचे उद्दिष्ट आहे.यासाठी पार्किन्सनन्सविषयी भ्रामक समजुती दूर करून यथार्थ ज्ञान देणे गरजेचे आहे.अज्ञानातून भीती,भीतीतून अस्वीकार,अस्विकारातून चुकीच्या मार्गाने जाणे असे दुष्ट चक्र चालू होते.पार्किन्सन्स साक्षरता हे त्यावर उत्तर आहे.
यासाठी लिखित साहित्य यात मराठीतून २ पुस्तके,एक इबुक,१२ स्मरणिका यांचा समावेश आहे.शिवाय प्रसारमाध्यमे,तज्ज्ञांची व्याख्याने,वेबसाईट,ब्लॉग,फेसबुकपेज आणि कम्युनिटी,whats app group,युट्युब चानल,घरभेटी,फोनवरून संवाद इ.चा वापर केला जातो.
पार्किन्सन्सच्या स्वीकारासाठी पार्किन्सन्सशी सामना करण्यासाठी शुभार्थी ( पेशंट) व शुभंकर ( केअरटेकर) याना सहकार्य केले जाते..
अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ पुरविले जाते.
सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली जाते.
शुभार्थीच्या जीवनशैलीचा स्तर उंचावण्यासाठी शारीरिक,मानसिक.सामाजिक कार्यप्रवणता वाढविण्यास विविध उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जातात.यात सहली, खेळ,ब्रेनजीम, जागतिक पार्किन्सनन्स दिनाच्या निमित्ताने शुभार्थींच्या कलाकृतीचे प्रदर्शन,फिजिओथेरपि कार्यशाळा,नृत्योपचार इत्यादींचा वापर केला जातो.या सर्वातून शुभार्थीच्या जगण्याची गुणवत्ता वाढवणे.पार्किन्सन्सच्या लक्षणावर नियंत्रण आणणे हे नक्कीच साध्य होते.हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. या भरीव कार्यामुळे
एप्रिल २०१३ - अमेरिकन पार्कीन्सन्स असोशिएशन कडून श्री व सौ.शेंडे याना पार्किन्सन्सविषयक कामगिरीसाठी गौरव करणारे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
२०१४ मध्ये मुक्तांगण मार्फत दिला जाणारा 'डॉ.अनिता अवचट संघर्ष सन्मान' पुरस्कार मिळाला.
करोना काळातही काम थांबले नाही. ऑन लाइन मिटिंग आणि नृत्योपचार सुरु झाले.घरातून बाहेर जाऊ न शकणारे,बेडरीडन,परगावचे शुभार्थी यांच्यासाठी तर करोना ही इष्टापत्ती ठरली.
संस्था रजिस्टर झाली आहे. आणि ८० जी अंतर्गत आयकर सवलतीस पात्र आहे.अनेक भविष्यकालीन योजना आहेत
या वर्षीचा जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा ९ एप्रिलला आहे.सर्वाना आग्रहाचे निमंत्रण.
ठिकाण - एस.एम.जोशी सभागृह,शास्त्री रोड,नवी पेठ
वेळ दु. ४.३०
No comments:
Post a Comment