आमचे स्फूर्तीस्थान - रामचंद्र करमरकर
करमरकरांची पहिली भेट नेमकी कधी झाली हे आठवत नाही.बहुदा शेंडे साहेबांच्या घरी मिटिंगमध्ये.मला मात्र आम्ही वर्षानुवर्षे एकमेकाना ओळखतो असेच वाटते.पार्किन्सन मित्रमंडळात जे सहभागी झाले त्यांच्या कुटुंबातील कोणा ना कोणा व्यक्तीला पीडी होता.करमरकर असे एकमेव आहेत ज्यांच्याकडे कोणालाही पीडी नसताना ते मंडळाचे भक्कम आधारस्तंभ बनले.शेंडे आणि पटवर्धन यांनी पार्किन्सन स्वमदत गट सुरु केला पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.मनुष्यबळ कमी होते.शेंडे साहेब मदतीसाठी जेथे जात तेथे विचारत.प्रतिसाद फारसा नसे. पण ते न कंटाळता सांगत राहत. करमरकर आणि शेंडे साहेब काही दिवस TEC मध्ये काम करत होते तेवढीच काय ती ओळख.हाताखाली काम करणार्याना ते बरोबर जोखत.करमरकरांचा झोकून देऊन काम करण्याचा स्वभाव त्यांच्या लक्षात आला होता.एका कौटुंबिक भेटीत त्यांनी मंडळात मदतीला येशील का विचारले.करमरकर यांना मारलेला खडा मात्र नेमका लागू पडला.ते आमच्यात सामील झाले.२००८ च्या जागतिक पार्किन्सनदिन मेळाव्यात ३००/३५० लोक हजर होते.यातून मदतीचे अनेक हात मिळाले.पुण्यातील वेगवेगळ्या एरियानुसार सात भाग करण्यात आले.दर महिन्याला प्रत्येक केंद्रावर सभा घ्यायचे ठरले. त्या त्या एरीयेसाठी प्रमुख नेमण्यात आले.शहर विभागाचे प्रमुख करमरकर मी आणि शेखर बर्वे होतो.त्यांनी आपले मित्र अरुण देवस्थळी यांचे अश्विनी लॉजचे बेसमेंट सभेसाठी मिळवले. ते मोफत उपलब्ध होणार होते.नंतरच्या काळात हे सर्वांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने इतर केंद्रे बंद झाली आणि पुण्यातील सर्वांसाठी येथेच सभा सुरु झाल्या.९वर्शे तेथेच चालल्या.
बघताबघता मंडळाच्या कामांनी करमरकरांना झपाटले आणि ते मंडळाचे सर्वे सर्वा झाले.त्यांची ऐकू येण्याची समस्या वाढत गेल्यावर ते आता कामातून निवृत्त झाले असले तरी त्यांचा कामाचा उत्साह, शाबासकी देणे आजही आम्हाला प्रेरणा देते.२००१ मध्ये निवृत्त झाल्यावर ते स्वत:ला डायबेटीस असल्याने डायबेटीस पेशंट साठीच्या ग्रुपसाठी काम करत होते.तेथे काम करणारे अनेक आहेत येथे आपली जास्त गरज आहे हे त्यांनी जाणले.तेथील लोकांचा रोष पत्करून ते आमच्यातच राहिले.तेथल्या त्यांच्या कामाचा आम्हाला उपयोग झाला.सभेसाठी दुसरा गुरुवार ठरलेलाच होता.वक्ते ठरविणे, शुभार्थीना यासाठी फोन करणे उपस्थिती घेणे,दानपेटी,चहापान अशी निट व्यवस्था लागली.यात करमरकरांचा मोठा वाटा होता.
मंडळाची स्वत:ची जागा नव्हती करमरकर यांचे घर मध्यवर्ती असल्याने तो ऑफिशियल पत्ता ठरला.मंडळाचे काम वाढल्यावर पुस्तके,स्मरणिका न्यायला, इतर माहितीसाठी ये जा सुरु झाली.करमरकर आनंदाने सर्वांचे स्वागत करत. पार्किन्सनविषयी,मंडळाविषयी माहिती सांगत.याशिवाय घरभेटीही करत.कार्यकारिणीच्या सभांसाठीही करमरकर यांचे घर सर्वाना मध्यवर्ती असल्याने हक्काचे ठिकाण होते.करमरकर वहिनीही आमच्यातल्याच झाल्या.जागतिक पार्किन्सनदिन मेळाव्यात ईशस्तवन बसवून घेण्याचे काम त्यांनी आनंदानी उचलले.मेळाव्यात पुस्तकविक्री आणि इतर मदतीसाठी त्यांनी मुलगी आणि जावई यांनाही कामात ओढले, एकुणात कुटुंब रंगलय मंडळाच्या कामात असे झाले.
काम करताना ट्रस्टीशिप असे. त्यांचा काटकसरी स्वभाव मंडळाचे काम करतानाही असेच.वक्त्यांना फोनवर,मेलवर निमंत्रण चालायचे.पण करमरकरांना घरी जाउनच सर्व माहिती सांगून आमंत्रण द्यायचे असायचे.उन्हातान्हाचे चालत,बस करून ते जात.सहलीचे ठिकाण आधी पाहायचे असायचे त्यातही त्यांचा पुढाकार.तेथेही बसनी जात.१४ साली खानापूर येथील सनवर्ल्डला सहल जायची होती तीर्थळी आणि करमरकर यांनी नेहरू स्टेडियमकडून बसनी जायचे ठरवले.तीर्थळींच्या काळजीमुळे मी आमचे सुह्र्द प्रकाश जोशी याना बरोबर पाठवले.१५ साली पूर्ण दिवसाची सहल ठरली.बसने जाणे सोयीचे नव्हते आम्ही गाडी करून गेलो.खर्च आलाच.१६ सालच्या शांतीवन सहलीसाठी पाहणी करायला जाण्यासाठी आम्ही गाडी ठरवत आहोत हे लक्षात आल्यावर त्याआधीच ते बसने जाऊन पाहणी करूनही आले.तेथे मंडळाच्या कामाबद्दल सांगून कमी खर्चात भोजन व्यवस्था ठरवून आले.आम्ही कपाळाला हात लावला.आनंदवनच्या सहलीलाही पती पत्नी दोघेही आले.सहलीला वाहिनी आल्या पण मासिक सभेलाही त्याना यायचे असायचे.पण करमरकर त्याना सभेबद्दल सांगत नसत.ती आली की रीक्षा करावी लागते असे त्यांचे म्हणणे असे.नंतर मी करमरकरांचा रोष पत्करून त्याना सभेची माहिती सांगायला सुरुवात केली.
सहलीसाठी,मासिक सभेसाठी किंवा जागतिक पार्किन्सन मेळाव्यासाठी अनेक गोष्टींची खरेदी असे ते सर्व काम करमरकर स्वत:कडे घेत.आम्ही आणलेले महाग असते.गावात घेतल्याने पैसे वाचतात असे त्यांचे म्हणणे असे.सुमनताई जोग यांनी माईक दिला होता.तो माईक,बॅनर, इतर साहित्य असलेली एक भली थोरली पिशवी ते स्वत:च्या घराचे तीन मजले उतरून आणत आणि पुन्हा चढून नेत.परत जाताना पटवर्धन यांच्या सायकलीवर पिशवी ठेवून दोघे बोलत बोलत जात.ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे.दोघांच्या वैचारिक मतभेद असत. करमरकर यांचे मत होते फुकट काही द्यायचे नाही आणि पटवर्धन म्हणत पैसे अजिबात घ्यायचे नाहीत.अशा तर्हेचे हे मतभेद असत.कधी आवाजही चढे. पण त्यांच्या मैत्रीच्या आड ते कधीच आले नाही.दोघांची कामा बद्दलची निष्ठा, निष्काम काम करण्याची वृत्ती आमच्यावर प्रभाव टाकत आली.
कमी तेथे आम्ही असे करमरकरांचे काम होते. त्यांनी काय नाही केले? APDA या अमेरिकन सपोर्ट ग्रुपच्या पुस्तिकेचे 'चला संवाद साधूया....' या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले.स्मरणिकेसाठी प्रिंटर शोधले. मार्चच्या भर उन्हात वारंवार पायी चालत खेटे घालून काम मार्गी लावले,लेखन,संपादन केले,प्रुफे तपासली.बँकेत खाते काढून आर्थिक व्यवहार हातात घेतले.गरज पडली तर सूत्र संचालन केले.'देणे समाजाचे' या आर्टीस्ट्रीच्या प्रदर्शनात मंडळ सहभागी झाले तेथे स्वयंसेवक म्हणून काम केले.पत्रव्यवहार सांभाळला.देणग्या मिळवल्या.पदरमोड करून अनेक कामे केली.अशी यादी खूप लांबत जाईल.
पार्किन्सन मेळावा आणि सहल तर करमरकरांच्याशिवाय होऊच शकणार नाही असे वाटायचे.एक वर्षी ते मुलीकडे सिंगापूरला गेले होते तर खरच सहल गेली नाही.मध्यंतरी ते अमेरिकेला गेले. तेथूनही त्यांचे मंडळाच्या कामाकडे लक्ष असे.
सुरुवातीपासुन्ते शेडेसाहेब,अनिल कुलकर्णी हे मंडळाचा ट्रस्ट करण्यासाठी मागे लागले होते काही सदस्यांचा विरोध असल्याने काम रेंगाळले.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने स्वयंसेवी संस्थांच्या कार्यवाहीसाठी अथ्व्द्याभाराची कार्यशाळा आयोजित केली होती.मी आणि करमरकर त्यात सहभागी झालो.तेथे मला त्यांच्यातला आदर्श विद्यार्थी पाहायला मिळाला.कार्यशाळेत त्रस्त स्थापन करण्याबद्दल मार्गदर्शन होते.त्यावेळी ट्रस्ट करण्याची निकड प्रकर्षाने जाणवली.आम्ही कच्चा आराखडा केला.श्री.माधव येरवडेकर यांनी हे काम करून देण्याची तयारी दर्शवली.पाठपुरावा करण्याचे काम करमरकरांनी नेटाने केले.आल्या घराचा पत्ता दिला.आणि ट्रस्ट अस्तित्वात आला.ते कार्यवाह झाले.
हळूहळू आम्ही कामे हातात घ्यायला सुरुवात झाली.८२ वर्षाचे वय ४० वर्षे सांभाळलेला डायबेटीस यामुळे तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या होत्या.ऐकू येत नव्हते.अर्थात ते म्हणत मी उत्तम आहे.
त्यांच्या समाजकार्याचा मोठ्ठा वाटा मंडळासाठी असला तरी इतर अनेकांचे करमरकरांशिवाय पान हलत नसे. यात करमरकर कुलवृत्तांत,मित्रमंडळी, जवळचे लांबचे नातेवाईकही असत.त्यांच्यासाठी ते फ्रेंड,फिलॉसॉफर,गाईड असतात.त्यांचे जावई हरिप्रसाद म्हणतात, बाबा माझ्यासाठी रोल मॉडेल आहेत.
करोना काळात ऑफलाईन सभा बंद झाल्या.ऑनलाईन सभा सुरु झाल्या.वार्षिक मेळावाही ऑनलाईन झाला या नव्या तंत्राशी त्यांचे जुळू शकले नाही.ऐकू न येणे वाढतच चालले.करोना काळात तर त्यांना अचानक हय्पोग्लोसोमिया झाला. शरीरावरचा ताबा सुटला.संवेदना बंद झाल्या.उभे राहता येईना.तोंड उघडता येईना.१५ दिवस हॉस्पिटलमध्ये होते.हळूहळू तब्येत सुधारू लागली.
या काळात आशा रेवणकर जाऊन यायच्या त्या आल्या की ते छान हसत.ती त्यांच्या आवडीचे खायला करून नेई. ते आवडीने खात. त्यांची मुलगी म्हणे, तुम्ही आलात की ते खुश असतात.येत जा.मुलीलाही थोडा आधार वाटे.आशा मला म्हणे त्यांची अवस्था पाहवत नाही.तुम्ही अजिबात येऊ नका तुम्हाला बघवणार नाही.त्याना काही न करता पडून राहिलेले पहायची सवय नव्हती.
घरी सोडल्याव २४ तास attendant ठेवला तब्येत थोडी सुधारू लागली आणि १५ ऑगस्टला पुन्हा अनकाॅन्शस झाले पुन्हा हॉस्पिटलमध्ये २१ दिवस मुक्काम.आता किडनीवर थोडा परिणाम झाला.WBC count वाढला.करोनाचा काळ होता.एका वेळी रुममध्ये जास्त लोक राहू शकत नव्हते.यात एक बरे होते त्याना किंवा घरातल्या इतरांनाही करोनाने गाठले नाही.
एक वेळ अशी आली अमेरिकेची मुलगी आली.इतर नातवाईक भेटायला येऊन जाऊ लागले यातून ते बाहेर येणार नाहीत अशीच परिस्थिती होती.पण त्यांच्या विलपॉवरमुळे यातून ते बाहेर आले.डॉक्टरही म्हणाले,हा चमत्कार आहे.आता घरी सोडले तरी डॉक्टरनी २४ तास नर्स आणि attendant ठेवण्यास सांगितले.तीन महिन्यांनी नर्स कमी केली.फक्त रात्रीचा attendant राहिला.आता जिना उतरू लागले.
एवढे विस्तारानी सांगायचे कारण आज त्याना चांगल्या परिस्थितीत पाहणार्यांना ते आपल्या विलपॉवरच्या आधारे कोणत्या दिव्यातून बाहेर आलेत हे समजावे. आशा घरी जात होती.मंडळाच्या कामाबद्दल सांगत होती.भरतनाट्यमंदिरासमोर ऑफिस झाल्याचे सांगितल्यावर म्हणाले,मी आता रोज थोडा वेळ बसत जाईन.त्यांचा हा उत्साह पाहून आम्ही थक्क होत होतो.
स्मरणिका द्यायला अशा एकदा जाऊन आली.हळूहळू त्यांनी पूर्ण स्मरणिका वाचली.आशाने दिवंगत पतीवर हसतखेळत लिहिलेला लेख तर त्यांना एवढा आवडला मला त्यांचा फोन आला त्या समोर असत्या तर मिठी मारली असती.
सगळे त्याना भेटून येत होते.मला मात्र त्यांचे तीन जीने चढून जाणे शक्य नसायचे.तरीही मी मनाचा हिय्या करून जाउच असे ठरवले.तर त्यांचाच फोन आला अजिबात येऊ नका मीच तुम्हाला भेटायला येईन.त्यांची मुलगी उमाही म्हणाली मी एकदा बाबांना घेऊन येईन.त्याना भेटण्याची संधी अचानक जुळून आली. आमचे औरंगाबादचे शुभंकर रमेश तिळवे पुण्याला येणार होते अचानक किरण सरदेशपांडे यांच्या ओक संकुल सभागृहात गेटटुगेदर ठेवले. करोना नंतरचा हा पहिलाच ऑफलाईन कार्यक्रम होता.शुभंकर शुभार्थिनी याला उदंड प्रतिसाद दिला.करमरकर सपत्नीक कार्यक्रमाला आले.माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचेच उत्साही करमरकर होते.त्याना भेटून झालेल्या आनंदाचे वर्णन करू शकत नाही.
१७ ऑक्टोबरच्या कोजागिरी कार्यक्रमालाही ते आले.सकाळीच खणखणीत आवाजात फोन आला मदत करायला येऊ का?त्यांचे असे बोलणेही आम्हाला उर्जा देणारे होते.आम्हा सर्वांचे उत्तम आयोजनाबद्दल भरभरून कौतुक केले.१ डिसेंबरला मोराच्या चिंचली येथील सहलीलाही आले.तेथील सर्व उपक्रमात सहभागी झाले.त्यांचे सहलीतील सहभागाचे फोटो पाहून त्यांचे कुटुंबीयही थक्क झाले.
आज ते प्रत्यक्ष कामात सहभागी नसले तरी त्यांचा फक्त सहभागही आमच्यासाठी मोलाचा असतो. त्यांच्या निस्पृह कार्याचा आदर्श आमच्यासाठी दिशादर्शी आहे.मित्रा पार्किन्सना अशी लाखात एक असलेली माणसे तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात आली खूप धन्यवाद! त्यांचे आरोग्य उत्तम राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
No comments:
Post a Comment