ताण हवासा
Tuesday, 29 November 2022
Saturday, 12 November 2022
पार्किन्सन्सविषयक गप्पा - ८०
पार्किन्सन्सविषयक गप्पा - ८०
शुभार्थी रामचंद्र सुभेदार यांच्या वाढदिवसाला मेसेज पाठवला. त्यावर जोत्स्ना ताईंची व्हाइस मेसेज द्वारे प्रतिक्रिया आली.आज ८९ वर्षे पूर्ण झाली.वयोमानामुळे समस्या थोड्या वाढल्या आहेत,आवाज गेलेला आहे.गिळता येत नाही म्हणून सहा महिन्यापासून ट्यूब द्वारे फीडिंग करावे लागते.बाकी इतर काही कॉम्प्लिकेशन नाही त्यामुळे तब्येत बरी आहे.सकाळी व्हिल्चेअरवरुन खाली फिरायला नेतो.झोपूनही ते हातपाय हलवत व्यायाम करतात.केअरटेकर चांगला मिळाला आहे.मुलगाही खूप चांगल पाहतो सगळे छान चाललय.आनंदी कावळ्याच्या गोष्टीसारखे जोत्स्नाताई कायम आनंदीच असतात.कितीही कठीण परिस्थिती आली तरी कुरकुर न करता त्या परिस्थितीतल्या जमेच्या बाजू हे पतीपत्नी पाहतात असे वेळोवेळी मी पाहिले आहे.
ज्योस्नाताईनी पाठवलेल्या वाढदिवसाच्या फोटोत सुभेदार यांनी सिल्कचा झब्बा आणि धोतर घातले होते.नाकाला लावलेल्या ट्यूबसकटचा त्यांचा फोटो पाहून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक वाटले.आशा रेवणकरनी 'सकारात्मकतेचे शिखर' असे फोटो पाहून म्हटले ते अगदी खरे आहे.आम्हाला तुम्ही हवे आहात हे कुटुंबियांच्या.कृतीतून दिसले की शुभार्थीलाही जगण्यासाठी उर्जा मिळते.
स्वमदत गटाचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला.
वर्गात पहिल्या बाकावर बसून शिक्षकाच्या प्रत्येक प्रश्नाला हात वर करणाऱ्या सिन्सियर विद्यार्थ्यासारख्या त्या मला वाटतात.
प्रत्यक्ष सभा,ऑनलाईन सभांना जास्तीत जास्त उपस्थिती कोणाची? - जोत्स्ना सुभेदार
युट्यूब वरील सर्व व्हिडिओ कोणी पहिले आहेत.- जोत्स्नाताई सुभेदार
पार्किन्सनवर लिहिलेले आमचे सर्व लेखन कोणी वाचले आहे ?-जोत्स्नाताई सुभेदार
शुभार्थीचे करताना स्वत:ला आणि कुटुंबियाना स्पेस देणे कोणाला जमले आहे?.ज्योत्स्नाताईना
पार्किन्सनसह आनंदाने जगूया हे ब्रीदवाक्य आचरणात आणणे कोणाला जमले आहे? अर्थात जोत्स्नाताई सुभेदार यांना.
पत्नी, आई,शुभंकर,आज्जी,विद्यार्थिनी,मैत्रीण,पेशंट अशा सर्व भूमिका त्या चोख बजावतात.यात अजिबात अतिशयोक्ती नाही.
रामचंद्र सुभेदार हवामान खात्यात India Meteorological Department मधून असिस्टंट Meteorologist म्हणून निवृत्त झाले.शेतीची आवड,निवृत्तीनंतर घरची शेती करायला मध्यप्रदेशात आले.त्यानंतर पुण्यात ११ वर्षे मुलीकडे होते.मुलगा ,सून आर्मीमध्ये.सारख्या बदल्या होत.मुलगा निवृत्त झाल्यावर दिल्लीला घेऊन गेला.अशी विविध ठिकाणी स्थलांतरे झाली तरी या दोघांना सर्वांशीच जमवून घेता आले.आणि तेही सर्वांना हवेशे वाटले.
पुण्यात आल्यावर ते व त्यांचे पती गीता संथा
वर्गात दाखल झाले संस्कृतची किंवा गीता पठणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती.२०१८ मध्ये जोत्स्नाताई गीता धर्म मंडळाच्या 'संपूर्ण गीता कंठस्थ परीक्षे'त ९३.९ % गुण मिळवून
तिसऱ्या आल्या.त्यावेळी वय होते ७८. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचा अडसर येत नाही हे त्यांनी दाखवून
दिले.शृंगेरीला जाऊन दिलेल्या गीता पठ्णाम्ध्ये त्यांना २१००० रु.बक्षीस मिळाले.अधिक महिन्यात त्यांनी गीतेचे ३३ पाठ केले.
अश्विनीमधल्या आणि नर्मदा हॉलमधल्या सर्व सभांना त्या पतिना घेऊन हजर असत.काही दिवसानी त्यांच्याबरोबर केअरटेकर असे.सहलीलाही सक्रीय सहभाग असे.झूम मिटिंग सुरु झाल्या त्यातही त्यांचा पहिल्या पासून सहभाग होता.
मध्यंतरी त्या सुभेदाराना सावरत असताना स्वत:च पडल्या.खुब्याचे हाड मोडले.शस्त्रक्रिया करावी लागली.माझे ऑपरेशन आहे सभा अटेंड करु शकणार नाही म्हणाल्या होत्या.परंतु सभेत नेहमीप्रमाणे उपस्थिती पाहून मला आश्चर्य वाटले.ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी सभेला हजेरी लावली होती.त्या काळात दोघा पतीपत्नीना वेगवेगळे केअर टेकर होते.मुलगी आणि जावई यांनी घेतलेली काळजी,सकारात्मक विचार यामुळे त्या लवकर बऱ्या झाल्या.बऱ्या झाल्यावर त्यांचा मेसेज आला. माझ्याकडे काम करणारी केअरटेकर चांगली आहे कोणाला हवी असेल तर फोन देत आहे.मेसेज ग्रुपवरही टाकला.तिला काम मिळावे आणि कोणाला तरी चांगली केअर टेकर अशी त्यांची मनापासून इच्छा होती.
लेखन,व्हिडिओ,सहल, कोणताही कार्यक्रम यावर लगेच त्यांची त्या त्या व्यक्तीला व्यक्तिश: प्रतिक्रिया असते.मी त्यांच्या कोणत्याच प्रतिक्रिया,फोटो,व्हाइस मेसेज गाळले नाहीत.ते पाहून मलाच उर्जा मिळते.पुणे सोडून दिल्लीला निघाल्या तेंव्हा भाऊक झाल्या होत्या.ऑनलाईन मिटिंग,मेसेज, फोन द्वारे भेटत राहिल्या.
रमेश तिळवे औरंगाबादहून पुण्यात येणार होते अचानक गेटटुगेदर ठरले.आपण पुण्यात नाही याची त्याना हळहळ वाटत होती.त्यांचा व्हिडीओ कॉल आला रमेश भाऊनी सर्वकडे फिरवून कोणकोण आले आहे, कशी सभा चालले हे दाखवले. माझ्याशी बोलल्या.दुधाची तहान ताकावर भागवली.१७ ऑक्टोबरचा ऑफलाईन कार्यक्रम चुकल्याचेही त्याना वाईट वाटत होते. त्यांचा मुलगा म्हणाला पुण्याची इतकी आठवण येते तर मी बाबांना पाहतो तू थोडे दिवस जाऊन राहून ये.
एकहा रसमलाई बनवली त्याचा फोटो आला कृतीही सांगितली.मुला नातवंडाना नवीनवीन पदार्थ करून घालताना त्याना आनंद मिळत होता.दिवाळीत स्वत: केलेल्या फराळाचा फोटो त्यांनी पाठवला होता.खूप वर्षांनी मुलांसाठी फराळ करता आला.होते तोपर्यंत करत राहायचे आणि करत राहिले कि होत राहते असेही त्यांनी लिहिले होते.आता त्यांचे वय वर्षे ८३. मी अजिबात फराळ करायचा नाही ठरवले होते पण त्यांचा हा विचार वाचल्यावर मलाही उत्साह आला.आणि थोडा फराळ केला.
त्यांचा उत्साह, सकारात्मकता वेळोवेळी माझ्यापर्यंत पोचली ती तुमच्यापर्यंत पोचवावी यासाठी हा लेखन प्रपंच.
Wednesday, 2 November 2022
क्षण भारावलेले - २१
क्षण भारावलेले - २१
कोजागिरीचा कार्यक्रम संपवून तृप्त मनाने जवळजवळ सर्व शुभंकर, शुभार्थी परतले होते.मोजकेच बाकी होते.कार्यक्रम छान झाल्याच्या सर्वांच्या भरभरून प्रतिक्रिया ऐकून आम्ही आयोजकही सुखाऊन गेलो होते.उरलेल्यांना उबर,ओला करून देण्याचे काम चालले होते.कॅसिओचे सुंदर स्वर कानावर आले आणि मी थबकले.फडणीस सर त्यांच्यासाठी बुक केलेली उबर येईपर्यंत बाहेरच्या बाकावर बसले होते.आजूबाजूचे जग विसरून तल्लीन होऊन हे स्वर छेडत होते.मला तेथेच ऐकत बसावे असे वाटत होते.मृदुलाचा ड्रायव्हर रोहन, गाडी दाराशी घेऊन वाट पाहत होता.पावसाची चिन्हे आहेत चला चला अशी माझ्यामागे घाई चालली होती.मी गाडीत बसले.कॅसिओचे स्वर मनात रेंगाळतच होते.आणि तल्लीन झालेली सरांची मुर्तीही डोळ्यासमोरून हलत नव्हती.'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता', 'पंगु लंघयते गिरिम' हे सर्व आपण म्हणतो ते प्रत्यक्षात येताना दिसले होते.पुण्याच्या कार्यक्रमात सर सुंदर गाणी वाजवतील असे २०२० सप्टेंबरमध्ये कोणी सांगितले असते तर त्यावर विश्वास बसला नसता.
४ सप्टेंबर २०२० ला सरांचा वाढदिवस म्हणून मी मेसेज केला होता.छायाताईंचा मेसेज आला ते गेले आठ दिवस सिव्हीयर चिकन गुनियाने आजारी आहेत.हॉस्पिटलमध्ये आहेत. मला खूपच काळजी वाटली. २०१२ मध्ये त्यांना पार्किन्सन्स झाला होता.इतर लक्षणे होतीच पण त्यांच्यासाठी सर्वात त्रासदायक लक्षण होते बोलण्यावर झालेला परिणाम. गाणे हा त्यांचा प्राण होता आणि आणि त्या गात्या गळ्यावरच पार्किन्सन्सने हल्ला केला होता.गाण्याचे क्लास, गीतरामायणाचे क्लास, सुगम संगीताचे कार्यक्रम सर्व बंद होणार होते.बालगंधर्व,भरतनाट्यमंदिर अशा ठिकाणी त्यांनी कार्यक्रम गाजवले होते.आता ते होणार नव्हते.या गोष्टींचा मानसिक त्रास होत होता.त्यात चिकन गुनियाने पार्किन्सनची लक्षणेही वाढत होती.
वेळोवेळी छायाताई अपडेट देत होत्या.बारा तेरा दिवस झाले तरी ताप हटत नव्हता शुध्द हरपली होती,तीन आठवडे आयसीयूमध्ये होते.एक आठवडा कोमामध्ये होते.मुलगा सून सर्व कामे सोडून तळेगावहून सांगलीला दिमतीला आले.मित्र,गीतरामायण ग्रुप,डबे देणे,हॉस्पिटलमध्ये धावपळ करण्यासाठी बरोबर पैसेही ठेऊन तयार असत.माकडहाडाजवळ बेड्सोर्स झाले होते.खूप वेदना होत.रात्रभर झोप लागत नसे.छायाताई त्या काळात हवालदिल झाल्या होत्या.सेवा करता येते.वेदना घेता येत नाहीत.
यातच हिमोग्लोबिन कमी झाले.आणि ओ निगेटिव्ह हा रेअर ब्लडग्रुप.पुण्याला दिनानाथ हॉस्पिटलमध्ये आणले.त्यातूनही पार पडले.हॉस्पिटलमधून डीसचार्ज मिळाला पण उठता येत नव्हते, चालता येत नव्हते.मुलाने तळेगावला नेले.वर्षभर स्वत: बेड्सोर्सचे ड्रेसिंग केले.मानसिक आधार दिला.यासाठी छायाताईही होत्याच.मित्र नातेवायिक सर्वांच्या प्रेमाने फडणीस सरांनीही उभारी धरली.फिजिओथेरपिस्टचे व्यायम,ओंकार,प्राणायाम चालूच होते.श्रद्धा,प्रयत्नांची,औषधोपचाराची योग्य दिशा यामुळे प्रगती होऊ लागली.औंधला कुलस्वामीनीचे दर्शन घ्यायला जाईपर्यंत मजल गेली.जेंव्हा सरांनी पहिली लकेर घेतली.तेंव्हा छायाताईनी ग्रुपवर शेअर केले.आनंद पोटात माझ्या मायेना अशी त्यांची अवस्था होती.
Whats app group वर मधूनमधून सरांची गाणी येऊ लागली.झूमवर 'भेटू आनंदे' कार्यक्रमात छायाताई आणि सरांनी आपले मनोगत मांडले.त्यावेळीही सुंदर गाणी म्हटली.पार्किन्सनशी मैत्रीपूर्ण लढत पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झाले त्यावेळी सुरुवातीला त्यांनी 'तू बुद्धी दे तू तेज दे' ही प्रार्थना म्हटली.त्यांच्या गीतरामायण आणि दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे फोटो छायातैनी टाकले होते.विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला त्यावेळीही ते गायले.हे सर्व बसून केलेले.औंध येथील पालखी सोहळ्यात रस्त्यावरून गळ्यात ताशा अडकवून तो वाजवत चाललेले सर हे एक अद्भुत दृश्य होते.संगीताचे मार्गदर्शनही करू लागलेले आहेत.आता तर तळेगावहून मंडळाच्या कोजागिरीच्या कार्यक्रमासाठी पुण्याला आले होते.सुरूवातीला एक गाणे कार्यक्रम संपल्यावर दोन गाणी म्हटली.पुन्हा तळेगावला परत जायचे होते.कुठुन येते एवढी उर्जा?
२०२२ च्या स्मरणिकेत त्यांनी 'आम्ही फिनिक्स' ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’असा लेख लिहिला त्यात त्यांचे मनोगत त्यांनी मोकळेपणाने लिहिले.पार्किन्सन साथीला असला तरी त्यांचा श्वास गाणे त्यांना परत मिळाले आहे,छायाताईसारखी भक्कम जीवनसाथी,सर्व काही करण्यास तत्पर मुलगा सून आणि कुटुंबीय,मित्रपरिवार एवढे सर्व असताना पार्किन्सनची त्रास देण्याची काय बिशाद.पार्किन्सन मित्रमंडळाचा यात खारीचा वाट आहे याचा आम्हाला आनंद आहे.त्यांनी मंडळाला भरभरून दिले.
त्यांनी मनोगतात अंदमानला जायचा संकल्पही व्यक्त केला.तेथे जाऊन सावरकरांच्या कविता ते नक्की गातील.त्यांच्या पार्किन्सनसह आनंदी जगण्याचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्याच लेखातील काव्यपंक्ती नेमकेपणाने सांगतात.
‘कितीक वाटा आल्या कितीक आली वळणे
आले प्रसंग होते तितकेच जीवघेणे
उर्जेचा प्रदीप्तपरी तो अंतरीचा होता वन्ही
आहे फिनिक्स आम्ही आहे फिनिक्स आम्ही’
Wednesday, 19 October 2022
कर्तबगार लढवय्या.. उषाताई खातू
- कर्तबगार लढवय्या.. उषाताई खातूउषा सुर्यकांत खातू एक उद्योजिका!. त्यांचा एक सर्वसामान्य गृहिणी ते उद्योगभूषण पुरस्कार मिळवणारी उद्योजिका हा प्रवास.या प्रवासातील अनेक टक्केटोणपे, कोसळलेले दुःखाचे डोंगर, विविध आजार, या सर्वांवर मात करत,त्यांचे ठामपणे उभे राहणे हे सगळे मी जवळून पाहिले आहे . गुलटेकडीच्या कारखान्याच्यावर २५० बाय ३०० फुटाच्या जागेत असो की 'किनारा' या अलिशान बंगल्यात राहात असो.त्या वावरल्या राणीच्या थाटात.त्या कर्तबगार स्त्रीची ही प्रेरणादायी जीवन कहाणी.१९६७ मध्ये सुर्यकांत खातू यांच्याशी विवाह झाला आणि त्या पुण्यात आल्या.गुलटेकडी इंडस्ट्रीअल इस्टेट मध्यें त्यांचा Fabrication चा व्यवसाय होता.खातू पुरोगामी विचाराचे.पत्नीची कर्तबगारी ओळखून व्यवसायातील काही जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या. कारखान्याच्या वरतीच राहत असल्याने व्यवसायातील बारकावे त्यांना समजत गेले. त्या ७९ साली बंगला बांधून सॅलस्बरीपार्क येथे राहायला गेल्या . तरी तोवर दुचाकी आणि चारचाकीही शिकल्यामुळे,त्यांचे कारखान्यात जाणे येणे चालू होते.दोघा पती पत्नीना माणसांची आवड त्यामुळे घर लहान होते तेंव्हा आणि बंगला झाल्यावर घर सर्वांसाठी खुले असे.गावाकडून पुण्यात शिक्षण, नोकरीसाठी येणार्यांनाही त्यांना हक्काचा आधार असे.दोन मुली,एक मुलगा घरी सासूबाई होत्या.त्यांचेही या सर्वाला प्रोत्साहन होते आणि घरावर लक्षही होते.८२ साली सासुबाईंचे निधन झाले.आणि लगेच ८३ साली खातूंची बायपास करावी लागली. ही सर्जरी इंग्लंड मध्ये करायची होती.खातूंचा लोकसंग्रह मोठा असल्याने,इंग्लंडला राहण्याची सोय झाली. कारखान्याचा पसारा,मुलांची जबाबदारी हे सारे होतेच उषाताई स्वत: महिनाभर इग्लंडला खातूंच्या बरोबर राहिल्या.खंबीरपणे त्यांनी आल्या प्रसंगाला तोंड दिले.भारतात आल्यावर पतीची सुश्रुषा, आणि कारखान्याचा भार उषा ताईंच्यावर आला.पतीला मदत करणे आणि कारखान्याची जबाबदारी शिरावर घेणे यात फरक होता. शिक्षण फारसे झालेले नव्हते. पण धाडस,कामाचा प्रचंड उरक,प्रसंग कितीही बाका असो डगमगायचे नाही ही वृत्ती ही अस्त्रे त्यांच्याबरोबर होती.कारखान्यात लोखंडी खिडक्या,दरवाजे,जाळ्या अशा गोष्टी ग्राहकांच्या जागेवर जाऊन कराव्या लागत.कारखान्याच्या मोठमोठ्या शेड असत.ताई स्वत: फोरव्हीलर घेऊन साईटवर जात.हाताखाली काम करणारी २५/३० माणसे सांभाळायची होती.खातूंनी गुणवत्तेचा आदर्श प्रस्थापित केला होता.त्याला तडा जाऊ द्यायचा नव्हता.उषाताइनी हे शिवधनुष्य पेलले.बंगला असो इमारत असो,छोटा उद्योग असो की मोठा कारखाना, सराईतपणे त्या काम करू लागल्या.बाजाराचे भान ठेवत उत्पादनात नव्याची भर घातली.व्यवसाय वाढवला.खातूंचा सल्ला,प्रोत्साहन होतेच.मोठा मुलगा इंजिनिअर होउन हाताशी आला.बाहेरची कामे तो करू लागला.९२ साली सून आली आणि घराचा भारही थोडा कमी झाला.आता अलिबागजवळ अक्षीला जागा होती तेथे मधुनमधून आरामात रहायची स्वप्ने पाहणे सुरु झाले पण अकस्मात ९३ साली खातूंचे निधन झाले.दु:ख करत बसायला वेळच नव्हता. पसारा खूप वाढवला होता. याशिवाय पतीचे अक्षीला रीसॉर्ट करायचे स्वप्न पुरे करायचे होते.ते स्वप्न त्यांनी पूर्ण केले .पती आणि मुलगा यांचे नाव गुंफलेले 'सूर्यकिरण रीसॉर्ट ' दिमाखात उभे राहिले.१४खोल्या.नारळ,सुपार्रीची भोवती वाडी,जवळ बीच व्हेज,नॉनव्हेज दोन्ही तर्हेचे जेवण अशी सर्व सोय होती.काही बँकांशी टायअप केले.उत्तम बस्तान बसले.उद्योगाच्या एका नव्या क्षेत्रात त्या शिरत होत्या.खाणे आणि खाऊ घालणे दोन्हीची आवड असल्याने हे काम आनंददायी होते.थोडे स्थिरावत होते.तितक्यात आणखी एक दुर्घटना घडली.९६ साली मोठ्या मुलीचे दुर्दैवी निधन झाले.२००१ मध्ये नातू झाला.दु:खावर थोडी फुंकर घातली गेली.पण आता अक्षी ची ओढ लागली होती.मुलावर कारखाना सोपवून त्या तेथे रहायला गेल्या.मनात आले की गाडी घेऊन पुण्याला येत.जुन्या पुणा मुम्बई रोडवर त्या घाटातून छोट्या गाड्या चालवायच्या तशी जीपही चालवायच्या. आता नवीन हायवे झाल्यावर तर त्यांच्यासाठी गाडी चालवणे सोपे असायचे. उद्योगाचा पसारा वाढला तरी त्यांनी ड्रायव्हर कधीच ठेवला नाही.पुण्यापेक्षा तेथे निसर्गाच्या सहवासात राहणे आवडायला लागले.थोडे कुठे चांगले चालले तर नशिबाला परीक्षा घ्यायची लहर आली.तब्येयीच्या तक्रारी सुरु झाल्या.२००७ मध्ये बायपास सर्जरी झाली.दीड वर्षे पुण्यात राहावे लागले.ड्रायव्हिंग करणे चालूच होते.१/२ वर्षे चांगली गेली, पुन्हा नवे संकट २०११ मध्ये गुड्गघ्यांची शस्त्रक्रिया झाली.पण कणखर असलेल्या उषाताई, दीड दोन महिन्यातच चालायला लागल्या.सहा महिन्यात पुन्हा अक्षी ला गेल्या.या सगळ्या आजारपणात त्या कधीच चेहरा टाकून बसल्या नाहीत की खचल्या नाहीत. सवड मिळेल तसे देश, परदेशात प्रवास करत राहिल्या. नवे मित्रमंडळ जोडत राहिल्या.आजार दु:ख कुरवाळत बसणे त्यांच्या स्वभावातच नव्हते.आणि दु:ख काही त्यांची पाठ सोडत नव्हते.२०१६ मध्ये तरूण कर्तबगार मुलाचा,हृदयविकाराने अचानक मृत्यू झाला.दैवाने दिलेला हा मोठ्ठा दणका होता!पुत्रवियोग...नात लग्नाची झाली होती.तिच्यासाठी वरसंशोधन करायचे होते.दुसरी नात,नातू यांची अभ्यासाची महत्वाची वर्षे होती.सासू सून दोघींनाही दु;ख विसरून कामाला लागावे लागले.२०१८ ला मोठ्या नातीचे लग्न झाले.चांगले स्थळ मिळाले.लग्नात सुंदर नटून बसलेल्या उषाताईना सर्वांचे स्वागत करताना पाहून आनंद वाटला.त्याना आधुनिक कपडे घालणे आवडायचे.कोण काय म्हणेल याची तमा करत नसत. दुसरी नात आर्किटेक्ट झाली. पुढील शिक्षणासाठी आस्ट्रेलियाला गेली.जीवनसाथी निवडला असल्याचे गुज आईला सांगितले नाही पण आज्जीच्या कानात सांगून गेली.ही आधुनिक आज्जी तिची सेल्फीची हक्काची बडी होती.लॉकडाऊन काळात पणतू झाला.नातूही इंजिनिअर झाला.जरा बरे चालले..तोवर त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढल्या. यावेळी किडनीच्या आजाराने नंबर लावला .२०१९ पासून डायलेसिस सुरु झाले.सुरुवातीला आठवड्यातून दोनदा नंतर तीनदा. डायलेसीसपूर्वी जेवण जात नसे.छातीवर प्रेशर येई.डायलेसिस केले की बरे वाटे.नातू हॉस्पिटलमध्ये सोडून येई आणि आणायला जाई.त्यांच्याबरोबर कोणी काम सोडून थांबावे असे त्याना वाटत नव्हते.केव्हढ मनोधैर्य. अनेकाना या प्रर्क्रीयेचा त्रास होत असल्याचे ऐकले होते. उषाताई मात्र नेहमीसारख्या आनंदी असत.फोन करणे, आर्थिक व्यवहार पहाणे , अक्षीच्या रीसॉर्टकडे लक्ष देणे हे चालूच होते.त्यांना फक्त उठताना कोणीतरी हात धरणे याशिवाय कोणाची मदत लागली नाही.उलट कुटुंबीय, आणि ज्ञाती बांधव याना त्यांचाच आधार वाटायचा.नातू हाताशी आला . आता त्यांचे ड्रायव्हिंग बंद झाले.अक्षीला नेणे आणणे नातू करू लागला. काहीवेळा तेथे राहून त्या अलिबागला डायलेसिससाठी जात.कारखान्यात असो की रीसॉर्ट तेथील कामगार,नोकरवर्गाला परीवाराप्रमाणे वागवल्याने तेही त्यांना प्रेमानेच मदत करत.इतक्या अडचणी असल्या तरी त्यांनी वैश्यावणी समाजाची स्थापना करून अनेक सामाजिक कामे केली,या संस्थेच्या त्या अध्यक्षही होत्या.अंध शाळा आणि अनाथाश्रमातील मुलीना दत्तक घेऊन त्यांचा खर्च करणे अशी कामे तर त्या करतच होत्या.डिसेंबरमध्ये नात ओस्ट्रेलियावरून येणार होती. तिचा साखरपुडा व्हायचा होता. अश्यात जुलैमध्ये थोडे व्हायरल इन्फेक्शन झाले,आणि पाठोपाठ हार्टॲटॅकनेचे निमित्त होऊन उषाताईंचे निधन झाले.निधनापूर्वी , ७/८ दिवस आधी मुलीच्या सासरच्यांना त्यांनी जेवायला बोलावले होते. स्वत: गॅॅससकडे उभे राहून खासरेसिपी केल्या होत्या.शरीर डायलेसीसने थकले होते,भल्या मोठ्या प्रपंचाची गाडा ओढून दमले होते तरी आनंद घ्यायची ही त्यांची वृत्ती विलक्षण होती.कॅलेंडर मधे जसा अधिक मास येतो तशी नियमितपणे संकटे त्यांच्या आयुष्यात येत राहीली. पण परिस्थितीने आलेला कणखरपणा ,धाडसी आणि आनंदी वृत्ती यामुळे त्यांनी आयुष्यात केलेला सामना थक्क करतो.आजार असले, जाणे अपेक्षित असले तरी, त्यांचे अचानक जाणे अनपेक्षित होते. एकप्रकारे, आजाराला त्यांनी चकवले ! आजाराने गलितगात्र करण्याआधीच, सर्वांच्या डोळ्यांसमोर आपले हसरे,उत्साही रूप ठेऊन त्या गेल्या.एक उदाहरण बनून गेल्या.कसं जगायचंय ? रडत रडत की हसत हसत ? या प्रश्नाच्या 'हसत हसत' या उत्तराचा पर्याय त्यांनी निवडला आणि आपलेच नाही तर घरादाराचे आयुष्य उजळून टाकले !उषाताईंच्या कणखर,धाडसी बाण्याला सलाम...डाॅ. शोभना तीर्थळी.
Tuesday, 18 October 2022
पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७९
पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७९
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या Whats app Group ला आनंदाची पाठशाला असे नाव द्यावेसे मला हल्ली वाटायला लागले आहे.आपल्या कला सादर करणे त्यातून होणार्या कौतुकाने आनंदून जाणे, लक्षणांवर अनुभवातून शोधलेले नियंत्रणाचे छोटे छोटे उपाय सुचविणे,झुमवरील सभा झाल्यावर लागलीच सकारात्मक प्रतिसाद देऊन इतराना व्हिडीओ पाहण्यास प्रवृत्त करणे,आपल्या प्रेरणादायी कृती सांगून इतराना प्रेरणा देणे,कोणी मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्यास त्याना उभारी देणे.स्वत:च्या आनंदात इतरांना सामील करून घेणे इत्यादी गोष्टी रोज घडत असतात.
आजचीच गोष्ट.डॉ.अविनाश धर्माधिकारी यांनी व्हाईस मेसेज टाकला.सुनील कर्वे आणि ते व्हिडीओ कॉल वर एकत्रित व्यायाम करतात.त्यांना दोघानाही त्यातून समाधान मिळते.दोघेही शुभार्थी असल्याने शुभार्थीच्या मर्यादा त्याना माहिती आहेत.त्यानुसार व्यायाम बसवले आहेत.इतर कोणाला हवे असल्यास त्यात्या शुभार्थीच्या वेळेनुसार हे दोघेही शिकवायला तयार आहेत.मला हे फारच भावले स्वत:च्या आजारात न अडकता इतरांसाठी करण्याची भावनाच किती चांगली आहे.
धर्माधिकारी नेहमी व्होईस मेसेज करतात.आवाज थोडा लो असायचा.माझ्या कानाच्या मर्यादा असल्याने आणि मी हेड फोन वापरत नसल्याने मला कानाकडे लाऊन ऐकावा लागायचा.आता मात्र त्यांचा आवाज मला सहज आणि स्पष्ट ऐकू आला.मी तसे लिहील्यावर ते म्हणाले, 'रोज दोन वेळा बाराखडी मोठ्याने म्हणण्याचा परिणाम'.मला हे खूप छान वाटले.किरण सरदेशपांडे यांनीही एका मुलाखतीत आपला आवाज पूर्ण गेला होता.रामरक्षा,हनुमान चालीसा,अशी स्तोत्रे रोज मोठ्याने म्हणून फरक पडल्यचे सांगितले होते. मी अविनाश सराना लगेच फोन केला.
नुकताच व्यायाम केलेला होता ते एकदम फ्रेश होते.एकट्यानी व्यायाम करण्यापेक्षा व्हिडिओवरुन का असेना एकत्र व्यायाम केल्याचा हा परिणाम होता.या त्यांच्या उपक्रमाला 'काया,वाचा, मने' असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.लक्षणे लगेच कमी होत नाहीत. आधी मन प्रसन्न होते.नंतर शरीरावर आणि वाचेवर परिणाम होतो.काही दिवसापूर्वी फोन केलेल्यावेळी त्यांचा थोडा निराशेचा स्वर होता.पण ते यातून स्वत:च मार्ग काढतील हे मला नक्की माहिती होते.आणि तसा त्यांनी काढलाही.
पार्किन्सनवर जगभर भरपूर संशोधन होत आहे.ते होत राहील पण रोजच्या जगण्यातील गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्षणांवर नियत्रण आणण्यासाठी असे छोटे छोटे प्रयत्नही मोलाचे आहेत.मदत घ्या मदत करा ही मंडळाची मागणी 'अशी एकमेका सहाय्य करू' मधून सुपंथ धरण्यासाठी उपयोगी होत आहे याचा आनंद वाटतो.
Saturday, 13 August 2022
क्षण भारावलेले - २०
क्षण भारावलेले - २०
Tuesday, 26 July 2022
पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७८
पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७८
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे. पार्किन्सन्स शुभार्थीसाठी तर तो औषधाइतकाच महत्वाचा आहे.पार्किन्सन्समध्ये स्नायूंचा ताठरपणा हे एक महत्वाचे लक्षण आहे.या लक्षणावर नियंत्रण आणायचे तर व्यायाम अत्यावश्यक आहे 'वापरा नाही तर गमवा' हे लक्षात ठेवायला हवे.व्यायाम नाही केला तर बेडरीडन व्हायला वेळा लागत नाही.'भेटू आनंदे' कार्यक्रमात शुभार्थी शैला भागवत यांनी व्यायामाने स्वत:ला शारीरिक दुरावस्थेतून कसे बाहेर काढले ते सांगितले.त्यांच्या व्याख्यानाने सर्व प्रभावित झाले छान प्रतिक्रिया आल्या. त्यांच्या जिमने आमच्या शुभार्थीसाठी मोफत प्रात्यक्षिक दाखवण्याची तयारी दाखवली. शैलाताईनीही उत्साहाने उपक्रमाची आखणी केली.जवळ राहणार्यांना फोन केले.तीन शुभार्थिनी नावे दिली.
शुभार्थी गौरी इनामदार यांनी पार्किन्सन्सबरोबरच प्रवास सांगताना व्यायामाला दिलेले महत्व सांगितले त्या स्वत: योग शिक्षक आहेत.त्यांनी योग शिकवण्याची तयारी दाखवली होती.पण प्रतिसाद मिळाला नाही.बेंगलोरच्या व्यास योग विद्यापीठाचे परमेश्वर यांचा तर पीएचडीसाठी पार्किन्सन्ससाठी योग हा विषय घेतला आहे. त्यांनी ही सात आठ जण असल्यास मोफत योग शिकवण्याची तयारी दाखवली होती.पण पाचच नावे आली.यापूर्वी या क्षेत्रातले नावाजलेले अरुण दातार सर,हास्ययोगी विठ्ठल काटे सर यांनीही मोफत शिकविण्याची तयारी दाखवली होती.प्रतिसाद शून्य.एकूणच व्यायामाबद्दल उदासीनताच दिसते.आणि आम्हा अयोजकानाही हतबल झाल्यासारखे वाटते.
आम्ही सुरुवातीपासून न्यूरॉलॉजिस्ट,मानसोपचारतज्ज्ञ,इतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या व्याख्यानाइतकेच व्यायामावरील प्रात्यक्षिके,व्याख्याने याना महत्व दिले.यात फिजिओथेरपी, योगासने, ताईची,स्ट्रेचिंगचे व्यायाम,योगासने प्राणायाम,मेडीटेशन,हास्ययोग,स्पीचथेरपी,डान्स थेरपी या सर्वांचा समावेश होता.डीवायपाटील फिजिओथेरपी कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थी यांनी अश्विनी हॉल येथे लक्षणानुसार विभाग करून प्रात्यक्षिके घेतली होती.प्रवरानगर फिजिओथेरपी कॉलेजच्या नेहा शर्मा आपल्या विद्यार्थीनिना बसने घेऊन आल्या होत्या आणि प्रत्येक शुभार्थीला स्वतंत्रपणे व्यायाम शिकवले होते.अर्थात हे वैयक्तिक पातळीवर फारच थोड्यांनी अमलात आणले.या सर्वाचा फायदा त्यावेळी उपस्थीत असणार्यांना मिळाला. पण यातील बर्याच जणांनी स्मरणिकेत लेख दिले आणि ते वेबसाईटवर उपलब्ध आहेत.अतुल ठाकुर यांनी शुभार्थीसाठी योगावर एक मालिकाही लिहिली होती. २०१५ पासूनच्या स्मरणिकेच्या पीडीएफ फाईल आणि त्यापूर्वीच्या स्मरणिकेतील स्कॅन केलेले लेख पीडीएफ स्वरुपात स्वतंत्रपणे वेबसाईटवर उपलब्ध आहेत.या सर्वांची यादी देणे विस्तार भयास्तव टाळते पण दिवंगत शुभार्थी मोरेश्वर काशीकर यांच्या लेखांचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही.ते कबीर बागेत योग शिक्षक होते.त्यांनी स्वत:वर प्रयोग करून अभ्यासपूर्ण लेख लिहिले.शेवटपर्यंत ते शुभार्थिनी व्यायाम करावा यासाठी धडपडत होते.आणि कोणी ऐकत नाही म्हणून निराश होत होते.
व्यायामाचा विषय चालला होता आणि मृदुला म्हणाली.कर्णींचे डोके वेगाने धावायचे मात्र व्यायाम त्यांनी केलाच नाही तो केला असता तर त्यांचा पार्किन्सन्स लवकर वाढला नसता.अनेक शुभंकराना व्यायामासाठी शुभार्थींच्या मागे लागून त्यात यश येत नाही.कितीही शोध लागले,नवीन औषधे निघाली,शस्त्रक्रिया निघाल्या तरी व्यायामाला पर्याय नाही हे लक्षात घ्यायला हवे.या लेखाद्वारे सर्व शुभार्थीना कळकळीची विनंती व्यायाम करा आणि पीडीला नियंत्रणात ठेवा.हा लेख वाचल्यावर एकाही शुभार्थिनी वेबसाईटवर लेख शोधले, व्यायामाला सुरुवात केली तर हा लेख किहीण्याचे सार्थक झाले असे वाटेल.
Friday, 8 July 2022
आठवणीतील शुभार्थी - शुभलक्ष्मी पटवर्धन
आठवणीतील शुभार्थी - शुभलक्ष्मी पटवर्धन
(लाल काठाची साडी नेसलेल्या पटवर्धन वहिनी)
२७ऑक्टोबर, पटवर्धन वहिनींचा( शुभलक्ष्मी पटवर्धन ) यांचा जन्मदिन. त्या
आज आपल्यात नाहीत पण त्यांची आठवण वेळोवेळी येते. वहिनी सभाना नेहमी नाही
आल्या तरी जेंव्हा येत तेंव्हा आम्हाला मनापासून आनंद व्हायचा..कमी पण नेमक
बोलण हे त्याचं वैशिष्ट.त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया महत्वाची
वाटायची.एकदा परस्पर ओळखीच्या कार्यक्रमात आपल्या शेजारच्या व्यक्तीची ओळख
करून द्यायची होती.मी त्यांच्या शेजारी होते.माझी ओळख त्यांनी करून
दिली.माझ्या कामाबद्दल कौतुकानी सांगितलं. मला माझ्या कामाची ती मोठ्ठी
पावती वाटली.माझ्या रेडीओवरच्या लिखाणाबद्दल कधीही फोन न करणार्या त्यांनी
फोन करून लेखन आवडल्याच सांगितलं.आत्तापर्यंत खूप लिहील पण माझ्या
लिखाणावरची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी सर्वात मोलाची होती.कमलाकर
सारंगबद्दल विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं वाचून पिडीबद्दल त्याना भीती बसली.
लिखाण करताना त्याचं हे वाक्य माझ्या नेहमी लक्षात असायचं.असेलही.
पटवर्धन यांच्या बोलण्यात नेहमी माझी पत्नी अस म्हणाली आणि आता अस म्हणाली
असती अस येत. मायबोली च्या अंकात मी’ चैतन्याचा झरा’ असा पटवर्धन यांच्यावर
लेख लिहिला.त्यावर माझी पत्नी अस म्हणाली असती अस म्हणून त्यांच्या
प्रतिसादात एक कविता दिली.
‘चैतन्याचा झरा?’ नव्हे, हा तर ऊर्जेचा भिक्षेकरी
दिवसाही हा झोपा काढी, घरची कामे मुळि ना करी||
कधी काढले काम घरातिल, तरी हा घाली खूप पसारा
मला सांगतो ‘असार पसारा शून्य संसार सारा’||
‘गाणे कुठल्या नाटकातले शोधू आधी’ म्हणतो हा
शोध तयाचा घेण्यासाठी अधिक पसारा घालि पहा ||
शोध घेतला पण तरी शिल्लक तसाच मूळ पसारा
उत्तर देई ‘तव प्रभुने तरी आवरला का विश्व पसारा?’|
मी अनेक शुभार्थी,शुभंकर पाहिले पण शुभंकर आणि शुभार्थी परस्पर संबंधाबद्दल पटवर्धन पती पत्नी मला आदर्श वाटतात..एकमेकाना स्पेस देत दोघांनी मिळून हे नात सांभाळल. पटवर्धनांनी आपल्या शुभंकरत्वाची व्याप्ती सार्वत्रिक करून आणि वहिनीनी त्याला साथ देऊन या नात्याला खूप उंचीवर नेऊन ठेवल..मी त्याना म्हणायची, तुमच्यामुळे मित्रमंडळ अस्तित्वात आल.तुम्हाला पीडी झाला नसता तर हे अस्तित्वातच आल नसत.तेंव्हा त्यां म्हणायच्या अस काही नाही दुसर्या कुणीही केलच असत.पटवर्धनांच्या घरी मिटिंग असली की वहिनींचा घरातला अबोल वावर, देहबोलीही सुखावह वाटायची.पीडी मुळे चेहरा भावविहीन होतो. पण वहिनींचे डोळे नेहमी बोलताना जाणवायचे.
सर्वच कुटुंबीयांनी त्यांच्या शेवटच्या काळात खूप सेवा केली खूप धीरांनी घेतल.
त्यांच्या कुटुंबीयांप्रमाणे आम्हालाही वहिनींची आठवण वेळोवेळी येतच राहील.
आठवणीतील शुभार्थी - चंद्रकांत दिवाणे
आठवणीतील शुभार्थी - चंद्रकांत दिवाणे
(सभेत आठवणी शेअर करताना चंद्रकांत दिवाणे)
११ऑगस्टला नेहमीप्रमाणे दुसऱ्या गुरुवारी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा होती.या महिन्यात वाढदिवस असणाऱ्यांना सभेस येण्याची आठवण करायला फोन करायचे होते.यात चंद्रकांत दिवाणे यांचे नाव होते.पण त्यांना फोन करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली.अत्यंत बुद्धिमान,मितभाषी, शांत स्वभावाच्या दिवाणे यांचा मंडळाच्या कामात विविधांगी सहभाग असायचा.
२००८ मध्ये दीनानाथ हॉस्पिटल मध्ये झालेल्या मेळाव्यानंतर मंडळाची नौका वेगाने पुढे नेणारी नव्या उमेदीची कुमक सामील झाली.त्यात चंद्रकांत दिवाणे हे शुभार्थीही होते.सुरुवातीला पुण्यातील वेगवेगळ्या भागात सभा घेण्यासाठी सात विभाग करण्यात आले. त्यातल्या डेक्कन विभागाची धुरा दिवाणेनी उचलली.स्वत:च्या घरी डेक्कनच्या सभासदांची सभा आयोजित केली.सभासदांना सुंदर हस्ताक्षरात सभेची पत्रे पाठवली.वास्तुरचनाकार असल्याने कार्डाच्या मागे त्यांच्या घराकडे कस यायचं हे दाखवणारा नकाशाही होता.सहवास वाढत गेला तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजत गेले.
त्यांच्या यशाची भव्य वास्तू परिश्रम,माणुसकी आणि नैतिकतेच्या भक्कम पायावर उभी होती.सकाळी ड्राफ्ट्समनचे काम करायचे आणि संध्याकाळी अभिनवकलाच्या आर्किटेक्चर डिप्लोमाच्या व्याख्यानांना हजर राहायचे,असे करत त्यांनी शिक्षण पुरे केले.इतरांना असे कष्ट घ्यावे लागू नयेत म्हणून आजही गरजूंना शिक्षणासाठी ते मदत करीत, शैक्षणिक संस्थानाही ते मदत करीत होते.१९६५ मध्ये स्वतंत्र प्रॅक्टीस सुरु केली मग मागे वळून पहिलेच नाही. बंगले,चर्चेस,सोसायट्या विविध प्रकार हाताळले.मुलेही हाताशी आली व्याप वाढत गेला.२०१० पासूनच्या सर्व स्मरणिकेत त्यांनी दिलेल्या जाहिरातीतून तो आमच्यापर्यंत पोचला.त्यांनी न सांगताच स्मरणिकेत एक पान आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेले असायचे. मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात दिवाणे पती पत्नीचा सक्रीय सहभाग असायचा.सहली हा त्यांचा आवडीचा विषय.मंडळाची पहिली पानशेतची दिवसभराची सहल फक्त कार्यकारिणीच्या लोकांची पायलट सहल होती. त्यानंतरची आठ दिवसाची आनंदवन सहल,प्रत्येक वर्षाच्या छोट्या सहली यात ते सपत्नीक हजर होते.सहलीतील खेळ,ओरिगामी स्पर्धा,क्विझ या सर्वात ते पुढे असत बक्षीसही मिळवत.कठीणातल्या कठीण प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे असे.मागच्या वर्षीच्या फुलगाव सहलीत तर त्यांनी स्वत:च एक क्विझ तयार करून त्याच्या सर्वाना द्यायला झेरॉक्स कॉपी करून आणल्या होत्या.आनंदवनच्या सहलीत चार जणांना एक खोली शेअर करावी लागली.अंजली आणि केशव महाजन हे दिवाणे यांच्या बरोबर होते.शिक्षिका असलेल्या अंजलीनी आपल्या पतीसाठी व्हीआरएस घेतली होती.आनंदवन,हेमलकसा येथील शाळा आणि मुले पाहिल्यावर तिला शिकवण्याची उर्मी आली.दिवाणे यांनी केशव महाजन यांच्याकडे पाहण्याची जबाबदारी घेतली.आणि अंजलीला आपली इच्छा पूर्ण करता आली.सहलीत खूप फोटोही काढले.सहलीतील त्यांचा वावर पाहता यांना खरच पीडी आहे का? अशी कोणालाही शंका आली असती.
दर महिन्याच्या सभासाठी सभासदांना फोन केले जातात.हे काम बहूतेक शुभंकर करतात.कारण बऱ्याच शुभार्थीना स्पष्ट बोलता न येण्याची समस्या असते.पण मागच्या महिन्याच्या सभेपर्यंत दिवाणे यानी हे काम केले.या महिन्याच्या सभेसाठीही त्यांनी नावांची यादी काढून ठेवली होती.
शेवटपर्यंत मंडळासाठी काम करण्याची त्यांची धडपड होती.व्यावसायाबद्दलही तेच.आता मुलांच्यावर व्यवसाय सोपऊन त्यांनी निवृत्ती घेतली होती खरी,पण त्यांच्या मुलाच्या सांगण्यानुसार ते ऑफिसमध्ये जात नव्हते, प्रत्यक्ष काही करत नव्हते तरी सर्व काही करत होते.त्यांनी केलेल्या कामाच्या फायली अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी सांभाळल्या आहेत.आजही ज्यांचे काम केले त्यांना कागदपत्रे सापडली नाही तरी दिवाणे यांच्या फायलीत ती सापडतात.स्वत:पुरते न पाह्ता कोणतही काम परफेक्ट करायचं हा त्यांचा गुण.त्यांच्या इतक परफेक्शन आमच्याकडे नाही अस त्यांच्या मुलांनी सांगितलं.
दिवाणे,यावर्षीच्या स्मरणिकेतही तुमची जाहिरातीची परंपरा तुमच्या कुटुंबीयांनी जपली.विजयाताईनी तर यावेळी जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात गणेश स्तवनात भाग घेतला.सभा सहलीत आठवणीच्या रूपाने नेहमीच तुम्ही आमच्याबरोबर असाल.
आठवणीतील शुभार्थी - सुधाकर अनवलीकर
मंगळवारी सकाळी सकाळी आकाशवाणीवर शुभार्थी सुधाकर अनवलीकर यांच्या निधनाची वार्ता ऐकली.लगेच महाराष्ट्र टाईम्समध्येही वृत्त वाचले.तसे हे अनपेक्षित नव्हते. ८०वर्षाच वय,गेली तीन वर्षे डायलेसीसही चालू होते. तरीही यापुढे त्यांचा हसतमुख चेहरा सभामधून दिसणार नाही याच दु:ख होतेच.
झुंझार पत्रकार म्हणून ते ओळखले गेले असले तरी आमची ओळख झाली ती पार्किन्सन्स शुभार्थी ( पेशंट) म्हणूनच.पार्किन्सन्स मित्रमंडळात येणाऱ्या शुभार्थीत बरेचसे मलाच का? भूमिकेत असतात.काही पीडीशी सामना करायच्या तयारीत, काही पीडीचा सहज स्वीकार करून त्याला मित्र बनविणारे.अनवलीकरांचा खाक्या मात्र वेगळाच होता. पीडी त्यांच्या खिजगणतीतही नव्हता.सो व्हाट? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. त्यांना तोल जाण्याची समस्या होती ते सभेला सुरुवातीला एकटेच यायचे.एकदोनदा पडलेही पण काहीच झाले नाही अशा अविर्भावात उठून बसले.त्यांना बोलण्याची समस्या निर्माण झाली होती.पण पार्किन्सन्स त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र पुसू शकला नाही.पिडीमुळे चेहर भावविहीन होतो हे त्यांच्यासारखेच आमचे अनेक शुभार्थी खोटे ठरवतात.पत्रकार म्हणून त्यांची ओळख आम्ही घरभेटीचा उपक्रम सुरु केला तेंव्हा झाली. सहजी संवादिजे या आगामी पुस्तकाची प्रुफे आली होती.अतिरथी महारथींची व्यक्ती चित्रे त्यात होती. नानासाहेब परुळेकर,बालगंधर्व,कृष्णराव फुलंब्रीकर,ग.दि.माडगुळकर,पु.ग सहस्त्रबुद्धे,श्री कृ.कोल्हटकर,मनोहर माळगावकर अशी कितीतरी नामवंत मंडळी, प्रुफ चाळताना मला दिसली. पुस्तक प्रकाशित झाल्यावर अनवलीकर यांचे सहाध्यायी शंकर सारडा यांच्या प्रस्तावनेतून अनवलीकारांच्या जडणघडणीतल्या ,व्यक्तीमत्वातल्या अनेक बाबी निदर्शनास आल्या’.सिद्धहस्त वार्ताहर आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व’ असे त्यांचे वर्णन त्यानी केले. घरची परिस्थिती बेतासबात असल्याने शिक्षणासाठी, जगण्यासाठीचा झगडा खडतर होता.अर्थार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या छोट्या मोठ्या कामातून साहित्यिक विचारवंत यांचा सहवास लाभला.त्यांतून जे अनौपचारिक शिक्षण मिळाले ते व्यक्तिमत्व संपन्न करणारे,बहुश्रुत करणारे होते.दहावीनंतर लगेच सकाळ मध्ये अर्धवेळ शिकाऊ पत्रकार म्हणून वर्णी लागली.सुंदर अक्षर आणि बिनचूक लेखन यामुळे डॉक्टर परुळेकर यांचा लेखनिक होता आल. आणि पत्रकारितेत पाय रोवण्यासाठी पत्रकारितेला आवश्यक असे विविध विषयाचे ज्ञानही झाले.बरोबरीने मराठी विषयात एम.ए.झाले.६२ सालपर्यंत ते सकाळ मध्ये होते.महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या पहिल्या अंकापासून ते ३३ वर्षे मटाच्या सेवेत होते.अनेक प्रकरणे उघडकीस आणून त्यांनी शोध पत्रकारितेचे विश्व गाजवले.त्यांच्या लेखणीने विविध विषयांत स्वैरसंचार केला.पु.ल.देशपांडे,ग,दि माडगुळकर,श्री.के क्षीरसागर यांच्यासारख्या मातब्बरांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले.त्यांच्या लेखांची ‘भुलाये न बने,” बोला अमृत बोला’,’सुजन कसा मन चोरी’ ही पुस्तके झाली.अभिनेत्री हंसा वाडकर यांचे आत्मकथन ‘सांगत्ये ऐका’ हे त्यांनीच माणूस मध्ये शब्दांकित केले.
मंडळात ते सामील झाले तेंव्हा हा भूतकाळाचा झगमगाट उरलेला नव्हता.वळणदार अक्षर आणि थोरामोठ्यांच्या मुलाखती घेण्याची क्षमता असणारी वाणी ही अस्त्रेच पार्किन्सन्सने बाधित झाली होती.प्रसन्न चित्ताला मात्र पार्किन्सन्सला हात लावता आला नाही.ज्यांच्या व्यवसायात बोलण हे महत्वाच असत असे प्राध्यापक,वकील,समुपदेशक असणारे अनेक शुभार्थी वाणीवरच्या हल्ल्याने कोसळून जातात.पार्किन्सन्स झाल्याच लपवतात.शुभार्थीच नाहीतर तरुणवयात मोठ्ठी पद भूषविणारे अनेक जेष्ठ नागरिकही वास्तव नाकारून भूतकाळच उगाळत बसतात. अनवलीकरांच मात्र अस नव्हत.मासिक सभाना ते यायचे,जेष्ठ नागरिकांच्या मेळाव्यातून दिसायचे. स्मरणिकेत त्यांनी स्वत:च्या कविता दिल्या. डायलेसीस सुरु झाल्यावरही ते सभांना आले.जानेवारीत दिनानाथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या डॉक्टर मंदार जोग यांच्या व्याख्यानाला तर ते डायलेसीस करून लगेच आले होते.एप्रिलमध्ये जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्तच्या मेळाव्यालाही ते हजर राहिले.आता त्यांची अवस्था खर तर विकलांग म्हणता येईल अशी होती पण अशा परीस्थितीतही त्यांना सभांना यावेसे वाटे आणि त्यांची पत्नी त्यांना घेऊन येई.दोघानाही दाद द्यायला हवी.
‘सहजी संवादिजे ‘ या अनवलीकारांच्या पुस्तकात त्यांनी श्री.के.क्षीरसागर यांची जीवनविषयक भूमिका दिली होती.” माझ्यासारखे रोमँटिक पिंडाचे लोक पुष्कळदा नकळत सुखाकरता नव्हे,दु:खाकरता नव्हे तर केवळ अनुभवाकरता जगत असतात.’ अनुभव ‘ म्हणूनच त्याचं अनुभवावर प्रेम असत….बाह्य जीवनात यश येवो वा अपयश येवो,सुख येवो वा दु:ख येवो,आरोग्य वा रूग्णावस्था येवो,माझा हा मानसिक प्रवास चाललेलाच आहे.”अनवलीकराना हे पटलेलं असाव.पार्किन्सन्सकडेही त्यांनी एक अनुभव म्हणूनच पाहिलं असेल का?
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– डॉ. सौ. शोभना तीर्थळी
आठवणीतील शुभार्थी - केशव महाजन
तरी
व्हाट्सअप वर मोहम्मद रफी हिट ची लिंक पाठवली आणि सवयीने फॉरवर्ड
करण्यासाठी अंजली महाजनला नकळतपणे सर्च करू लागले आणि एकदम थबकले आणि आता
केशवराव आपल्यात नाही याची जाणीव झाली. मोहम्मद रफी चे काही आले की मी
अंजली ला पाठवायची आणि केशवरावांना ती ते ऐकवायची. ते खुश व्हायचे
शोभनाताईनी आपल्यासाठी आठवणीने पाठवले याचाही आनंद असायचा बरेच
पार्किन्सन्स शुभार्थी होमस्टर झाल्याने एकटे पडतात. फक्त सहचर पुरेसा पडत
नाही. इतर कोणीतरी आपली दखल घेतली ही भावना त्यांना हवीशी वाटते आणि छोटीशी
कृती ही यासाठी पुरते.
एका उमद्या व्यक्तिमत्वाला पार्किन्सन्सने होमस्टक केलं होतं.
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यकारीणी सदस्य अंजली महाजन यांचे पती केशवराव यांचे 27 जून 2020 ला दुःखद निधन झाले.
अत्यंत
हळव्या मनाच्या केशवरांवाना आनंदी ठेवण्यासाठी अंजलीने केलेल्या कल्पक
प्रयत्नांची पराकाष्ठा आठवत राहिली. 2008 पासून आमचे केशवरावांशी अत्यंत
जिव्हाळ्याचे असे संबंध होते.
सीडीए मध्ये ते
सीनियर ऑडिटर म्हणून
काम करत होते. 1980 मध्ये त्यांचा विवाह झाला. 1980 ते 2001 पर्यंत अत्यंत
आनंदात संसार होता. दोन हुशार मुली अंजली, केशवराव दोन्ही माणसात रमणारे,
लोकसंग्रह मोठा होता. दोघेही कोणाच्या अडीअडचणीला धावून जाणारे. साहित्य,
संगीत, सिनेमा, नाटके यात रमणारे.
अंजली चे भाऊ मोरेश्वर मोडक यांनी
आमच्या एका स्मरणिकेत ‘एक धीरोदात्त व्यक्तिमत्व केशवराव’ असा लेख लिहिला
होता. त्यांच्या आनंदी विनोदी स्वभावाचे वर्णन केले होते. सर्वांना
हवेहवेसे वाटणारे केशवराव भावंडात धाकटे.सर्व छान चालले
असतांना
2002 मध्ये या सर्वाला दृष्ट लागली. 19 वर्षांची त्यांची धाकटी मुलगी स्वरूपाला cancer
झाला. वर्षभरात ती गेली. केशवरावांना हा धक्का जबरदस्त होता.
दुसर्या मुलीचा विवाह,वर्षसण,नातवंडाचे आगमन यातच काही काळ चांगला गेला.थोडे स्थीर होते तोच
पन्नाशीत
असलेल्या केशवरावांना 2003 मध्ये पार्किन्सन्स ने गाठले. तीन चार वर्षे
त्यांनी कशीबशी नोकरी केली. हळूहळू संगणकावर काम करणे, लेखन काम करणे,आडिट
करणे या सर्व गोष्टी अशक्य होऊ लागल्या. स्कूटर चालवणे जमेना. मग
स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली.
पत्नीअंजली मुख्याध्यापिका म्हणून शाळेत
नोकरीला होती. सकाळी लवकर शाळेला जावे लागेल मुख्याध्यापिका असल्याने अनेक
जबाबदार्या असायच्या. घरी यायला वेळ व्हायचा. आम्ही पहिल्यांदा
त्यांच्याकडे घर भेटीला गेलो त्यावेळी केशवरावांच्याकडे त्यांच्या वृद्ध
आईने दार उघडले. आम्ही बराच वेळ बसलो तरी केशवराव बाहेर येत नव्हते.
थोड्यावेळाने आले. त्यांचा ऑफ पीरीएड चालू होता त्यामुळे गोळीचा असर सुरू
झाल्यावर ते हालचाल करू शकले होते. त्यावेळी फारशी ओळख नसल्याने त्यांच्या
off पिरीएड बद्दल आम्हाला माहीत नव्हते. एकदा बाहेर आल्यावर मग मात्र खूप
गप्पा झाल्या सर्व माहिती त्यांनी सांगितली. स्वतःचे घर फिरवून दाखवलं
अंजलीचे फोन येत होते मी निघतच आहे जाऊ नका.आल्या आल्या लगेच पदर खोचून ती
कामाला लागली. त्या दिवसापासून आमच्या दोन्ही कुटुंबात जवळीक निर्माण झाली
ती आजपर्यंत.
कधी पावभाजी केली की केशवराव म्हणायचे काका काकूंना बोलाव
आणि त्यांच्या आनंदासाठी आम्ही जायचो. लोकांनी घरी येण्यात त्यांना खूप
आनंद असायचा. त्यांना बेळगावचा कुंदा आवडायचा. बेळगावला कधीही गेले तरी मी
त्यांच्यासाठी कुंदा आणायची. ते खुश व्हायचे. मग त्यांचा फोन यायचा. कुंदा
खाल्ला फार छान होता. आमचे वाढदिवस, नवीन वर्ष, दिवाळी यासाठी त्यांचा फोन
आवर्जून यायचा. ‘भयंकर असला जरी तो रीपु. मात कर त्यावरी’ असे स्वतःला
बजावत पार्किन्सन्सने कितीही छळवाद मांडला तरी ‘सुखी जीवनाचीच स्वप्ने
पाहावी’ अस अंजलीने एका कवितेतून सांगितले होते. केशवरावांनी त्याला साथ
दिली.
केशवराव कॅरम खेळण्यात एकदम एक्स्पर्ट होते. त्यांच्याशी कॅरम
खेळायला अंजली कोणी ना कोणी शोधायची. स्वतः खेळायची. अजित कट्टी
त्यांच्याकडे कॅरम खेळायला गेल्याचे आठवते. अंजलीचे भाऊ मोरेश्वर मोडक
त्यांच्या लेखात सांगतात, ते मला कायम हरवायचे.क्वीन कधी मला मिळायची नाही.
पण त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून मी जिंकलेले असायचो. त्यांना आनंदी
ठेवणे यासाठीच तर होता अट्टाहास. मोडक आणि त्यांची पत्नी विनया, अंजली आणि
केशवराव असे स्पेशल गाडी करून केरळ, कर्नाटक, हंपी अशा सहली करून आले. आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, ताडोबा सहल
गेली होती. केशवराव यांची परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या सहलीला जाण्याचा
निर्णय हे धाडस होते पण डॉक्टरांनी परवानगी दिली होती. मागील प्रकरणात याबद्दल विस्ताराने आले आहे.
का जायचे ही
सकारात्मक ऊर्जा त्यांना सहलीत मिळाली. मंडळाच्या सर्व सहलींसाठी ही
आवर्जून हजर राहात. केशवरावांचे राजकुमार चे डायलॉग प्रत्येक सहलीत
व्हायचेच. स्वतःच्या निवृत्तीनंतर सहा वर्षे ते अंजली ऑफिसला गेल्यावर
वृद्ध आईसह दिवसभर एकटे राहायचे.पण हळूहळू त्यांना एकटेपणा जाणवू
लागला.नैराश्य येऊ लागले. ते उठण्या आधीच अंजली शाळेत गेलेली असायची. २०१२
मध्ये केशवरावांची अवस्था पाहून अंजलीने मुलगी,जावई सर्वांशी चर्चा करून
स्वेच्छानिवृत्ती घेतली. ‘पत्नीची स्वेच्छानिवृत्ती आणि माझी वाढली आनंदी
वृत्ती’ असे त्यांच्या लेखात त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या लेखाची लिंक
दिल्याने त्यावर जास्त लिहीत नाही.
आता अंजली त्यांच्याबरोबर पूर्णवेळ देण्यास मोकळी झाली होती.
कधी सारसबागेतील कमळे दाखवायला ने, कधी नाटक, सिनेमाला ने असे तिचे त्यांना रमवणे
चालू
झाले. असे वेळोवेळी त्यांना तिन जीने उतरवून बाहेर नेणे अंजलीच करू
जाणे.एकदा अचानक ती एका कार्यक्रमात भेटली. नवचैतन्य परिवाराचे विठ्ठल काटे
यांचा 75 वा वाढदिवस होता. त्यानिमित्त अण्णाभाऊ
साठे सभागृहात गफार
मोमीन यांचा मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 75 गाण्यांचा कार्यक्रम आयोजित
केला होता. आमच्या मागेच अंजली आणि केशवरावांना पाहून मला आश्चर्य वाटले
कारण ते दोघे तर हास्यक्लबला जात नव्हते. अंजली म्हणाली, त्यांना मोहम्मद
रफीची गाणी आवडतात ना म्हणून आलोय. हे थीएटर जवळ आहे. कोणतेही चांगले
कार्यक्रम असले की आम्ही येतो. केशवरावांचा चेहरा आनंदाने फुलला होता.
पार्किन्सन्सने थोड्या काळाकरता दडी मारली होती. त्यांच्यासाठी मध्ये भूक
लागली तर काही खायला, पाणी, त्यांच्या गोळ्या अशा सर्व सरंजामासह अंजली आली
होती.
अशी किती उदाहरणे सांगावी?
पार्किन्सन्सही हटणारा नव्हता.
त्याची कुरघोडी चालूच होती अंजली ला आता केअरटेकर ठेवण्याची गरज वाटायला
लागली. आपल्यामुळे अंजली आणि इतरांना त्रास होतो हे केशवरावांना जाचत होते.
यातच दीड वर्षापूर्वी त्यांच्या
आईचे एकशे पाचाव्या वर्षी निधन झाले.
त्या आधीचे त्यांचे आजारपण आणि निधन आईवेड्या केशव रावांना सहन होत नव्हते.
आईच्या दुःखातून केशवराव बाहेरच येत नव्हते. आजारामुळे घरात राहावे
लागल्याने ही कदाचित ते कंटाळले असतील. अंजली त्याना दुःखातून बाहेर
काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.जावई,मुलगीही प्रयत्न करीत होते परंतु
केशवराव कोषात जाऊ लागले. त्यांनीच हत्यार टाकल्यावर लढणे कठीण होते. तरी
शेवटपर्यंत अंजलीने जिद्द सोडली नाही आता त्यांच्या जगण्याची गुणवत्ता घसरत
चालली होती आणि उमेदही. मृत्यूला चांगली संधी मिळाली मिळाली.
शेवटचा
काही काळ सोडला तर केशवरावांनी पार्किन्सन्स विरोधात धीरोदात्तपणे तोंड
दिले. त्यांच्या कितीतरी आठवणी येतच राहतील. अंजलीच्या लेखना खाली
केशवांजली असेच येत राहिल आणि या नावाने ते कायम तिच्या बरोबर असतील.
त्यांना भावपूर्ण
Wednesday, 8 June 2022
आठवणीतील शुभार्थी - डॉ.बा.दा. जोशी.
Friday, 27 May 2022
पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७७
पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७७
भर दुपारच्या रणरणत्या उन्हात श्री. कापसे आमचे घर शोधत आले होते.तीर्थळी ज्या कंपनीत काम करत होते तेथे ते वेल्डर होते.'बरेच दिवस साहेबांना भेटायचे होते.साहेबांमुळे आम्ही घडलो.' ते सांगत होते.साहेब तिन, तिन पायऱ्या एकदम चढायचे,फास्ट चालायचे आम्ही दमायचो.साहेब येताना दिसले की सर्वजण आपापल्या जाग्यावर जायचे.दराराच तसा होता साहेबांचा.अशी बरीच माहिती ते पुरवत होते.ह्यांच्या बरोबर काम करणारे बरेच जण भेटतात आणि असे काही काही सांगत असतात.त्यांचे एक ड्रायव्हर सांगत होते साहेब इतर गाड्यांच्या इतक्या जवळून गाडी नेत मला भीती वाटे. पण साहेबांचा अंदाज अगदी इंचभरही चुकत नसे. तीर्थळीना निवृत्त होऊन २३/२४ वर्षे झाली. पण त्यांच्याबरोबर काम केलेले आणि त्यांच्याबद्दल प्रेम,आदर असणारे असे अनेकजण भेटायला येतात.त्यांची शारीरिक अवस्था पूर्वीसारखी नाही. वजन खूप कमी झालेले आहे, बोलण्याला प्रॉब्लेम येतो,कमरेत वाकलेले आहेत,खुर्चीवरून उठताना धरावे लागते.हे सर्व पाहून येणाऱ्याना सुरुवातीला वाईट वाटते. तरी साहेब आनंदी आहेत, आपल्याला ओळखु शकतात,आपल्या येण्याने खुश होतात हे पाहून त्याना चांगलेही वाटते.अशा सातत्याने येणाऱ्या प्रसंगांची आता सवय झाली आहे.८१ वर्षे वय आणि तेवीस वर्षाचा पीडी त्यामानाने चांगलीच आहे यांची तब्येत असे मी सांगत असते पण त्यादिवशी मला प्रकर्षाने जाणवले इतकी एनर्जी आणि उत्साह,धाडस असणाऱ्या व्यक्तीला छोट्या छोट्या गोष्टीसाठी अवलंबून राहणे किती कठीण आहे.
आम्ही घरभेटीत असे पीडीला स्वीकारता न आलेले अनेक शुभार्थी पाहिले. माझे अक्षर किती छान होते आता तसे नाही,मी किती ट्रेक केले आता जिना चढता येत नाही,मी किती वजन उचलायचो आता पेला उचलता येत नाही,मी ५० माणसांचा स्वयंपाक करायची आता स्वत:चा चहा करता येत नाही.असे दु:ख उगाळत त्यांचे जीवन तेथेच थांबलेले असते.पार्किन्सन्स मात्र आपली लक्षणे झपाट्याने वाढवतो.
तीर्थळींचे मात्र असे झाले नाही.पार्किन्सन्सचा अनकन्डीशनल स्वीकार केल्यामुळे या अवलंबित्वाचा त्यांनी बाऊ केलेला नाही.दु:खीही झाले नाहीत.मनाने ते पूर्वीसारखेच रुबाबात असतात.पार्किन्सन्स झाल्यावर सुरुवातीला काही चुकीच्या गोष्टी केल्या.पार्किन्सन्स बरा होऊ शकतो असे सांगणारे भरवशाचे वाटले.मधुसूदन शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन यांच्या भेटीनंतर म्हणजेच पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर मात्र पार्किन्सन्सला मित्र बनवले ते पुन्हा मागे वळून पहिले नाही.ही मैत्री २३ वर्षाची आहे.
पार्किन्सन्सला स्वीकारले की त्याला समजून घेणे सोपे जाते.त्याला हाताळणे सोपे जाते आणि त्याच्यासह आनंदाने राहता येते.हा स्वीकार महत्वाचा हे मी वेळोवेळी हे सांगितले आहे असे जगणाऱ्या अनेकांची उदाहरणे पण दिली आहेत.ज्यांच्या कडे पार्किन्सन्स नव्याने पाहुणा आला आहे त्याना याचा नकीच उपयोग होईल.हा स्वीकार पार्किन्सन्स झाल्यावर एकदाच करावा लागतो असे नाही. पार्किन्सन्स आपल्या भात्यातून हळूहळू एकेक बाण काढतो.त्यामुळे वेगवेगळ्या अवस्था येतात त्या प्रत्येक वेळी स्वीकार नव्याने करावा लागतो.
ह्यांचेच उदाहरण द्यायचे तर पीडी झाल्यावर कंप आणि गती मंद होणे एवढेच होते.ते फोर व्हीलर चालवायचे.एकटे प्रवास करायचे.नंतर बोलण्यावर परिणाम झाला.लिखाण चालू होते.हळूहळू अक्षर बिघडले, फोर व्हीलर चालवणे बंद झाले.पण रिक्षाने एकटे जात.चालतानाही कोणी बरोबर लागत नसे.अगदी पार्किन्सन्स झाल्यावर १९ वर्षे झाल्यावरही एकटे समोर बागेत व्यायामाला जात. नंतर पाठीत बाक आला.कोविदने तब्येत खालावली ब्युरोचा माणूस ठेवण्याची गरज पडली त्यातूनही ते आता बर्यापैकी बाहेर आले.ह्यांचे गोळ्यांचे प्रमाणही फार वाढले नाही.या प्रत्येक टप्प्यात स्वीकार एका क्षणात होत नाही. त्यासाठी शुभंकर ,शुभार्थी दोघानाही प्रयत्न करावे लागतात.सातत्याने व्यायाम, प्राणायाम ,मेडिटेशन,छंद,कुटुंबीय,स्नेहीजन यांचे सहकार्य, स्वमदतगट हे नक्की सहकार्य करतात.
आणखी एक महत्वाचे सुरुवातीपासून बरेच जण याना रोल मॉडेल म्हणतात.मी जर आनंदी राहू शकलो नाही तर त्याचा इतरांवर परिणाम होईल असेही ह्यांच्या मनात असते.त्यांची ही इमेज त्याना कायम ठेवायची असते.तुम्हीही असे रोल मॉडेल बनू शकता.चला तर एकमेकांच्या सहकार्याने 'अवघे धरु सुपंथ'.
Wednesday, 16 March 2022
अनिल अवचट
काही व्यक्तींच्या आस्तित्वाने वातावरणात चैतन्य निर्माण होते. भोवतालच्या सर्वाना सकारात्मक उर्जा मिळते. डॉक्टर अनिल अवचट म्हणजे बाबा यांपैकी एक.अशी उर्जा त्यांच्या पुस्तकातून मिळाली होतीच.टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दूरस्थ विद्यार्थ्यांचा १९९०च्या सुमारास स्नेहमेळावा होता.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते.ती त्यांच्याशी पहिली प्रत्यक्ष भेट.त्यांची ओळख मीच करून दिली होती.खेड्यापाड्यातून आलेल्या आमच्या विद्यार्थ्याना त्यांच्या भेटीचेच अप्रूप होते.त्यांच्या व्याख्यानाने ते भाराऊन गेले.पुढील काळात डॉ.अनिल अवचटपासून बाबा म्हणण्यापर्यंत ते जवळ येतील असे वाटलेच नव्हते.याचे श्रेय आमच्या पार्किन्सन मित्राला.
सर्व स्वमदत गटाना एकत्रित करणाऱ्या 'सेतू' या संस्थेद्वारे बाबांच्या मुली मुक्ता आणि यशोदा प्रथम संपर्कात आल्या.आणि तेथील इतरांप्रमाणे डॉ.अवचट आमच्यासाठी बाबा झाले.
मी व्याख्यान देणार नाही हे बाबानी सांगितल होत. आम्हालाही व्याख्यान नकोच होत. मला न्यायला यायची गरज नाही, असही सांगितल होत. ओरिगामीसाठी लागणारे कागद तेच आणणार होते. वेळेपुर्वीच ते आले. बरोबर एक सहाय्यकही होता. आल्या आल्या त्यानी आम्ही केलेली रचना बदलली. टेबल आणि त्याभोवती पार्किन्सन्स शुभार्थी बसतील अशी रचना केली. कारण टेबलवर कागद ठेउन काम करणे सोपे होणार होते. निमंत्रित पाहुणेपण गुंडाळून स्वतःही ते या कामात सहभागी झाले.
कृतीनुसार वेगवेगळ्या आकाराचे कागद त्यानी कापुन आणले होते. अरुंद लांबट पट्ट्या,लांबट चौकोनी, चौरस, वृत्तपत्राचे पूर्ण पान अशी विविधता त्यात होती.
आणि प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाला.कार्यक्रमाच्या सुरुवतीलाच, बाबांच्या चेह-यावरच्या; ह्या अतिशय प्रेमळ हास्याने सा-यांना आपलेसे केले आणि ओरिगामी मध्ये रंगवून टाकले. सा-यांची लगबग सुरू झाली. एकमेकांना मदत करत, बाबांची मद्त घेत सारे रंगून गेले.भिरभिर,मासा,फुलपाखरु,विमान्,ससा,बेडुक अशा वस्तु बनु लागल्या.कित्ती सोप्प असा काहिंच्या चेहर्यावर भाव, तर कोणी आपल विमान उडत नाही म्हणुन हिरमुसलेले.बाबा लगेच तिथ जाउन नेमक काय चुकले सांगत होते.अनेक्जण माझ्याकडे या म्हणुन बोलवत होते बाबाही तत्परतेने जात होते.शिकणारे आणि शिकवणारे सर्वच वय विसरुन लहान मुल झालेले.
आता सर्वांच्या टेबलवर वर्तमानपत्राचा मोठा कागद आला.त्याची गांधी टोपी बनवण्यात आली आता सर्वजण तयार झाले होते थरथरणारे हात स्थिर झाले होते.ताठरलेल्या स्नायुत जान आली होती भावविहिन चेहर्यावर भाव उमटु लागले सर्वाना सहज टोपी बनवता आली.
आपल्याच डोक्यावर टोपी घालून घेण्यासाठी सारे चपळ बनले.
गांधीटोपीनंतर मुगुट.आता टोप्या काढुन मुगुट घालण सुरु झाल.
इतकेच नव्हे तर तयार केलेले मुगुट घालून प्रत्येक जण माझा पण फोटो काढा म्हणत होते. बाबांप्रमाणे फोटो काढणारी मीही आता डिमांडमधे होते.पण माझाच फोटो काढण्याचा वेग कमी पडत होता.
शेवटी बाबानी स्वतः करुन आणलेल्या अनेक कलाकृती दाखवल्या.
सर्वानी आपण केलेल्या वस्तु स्वतःच्याच केलेल्या टोपीत भरल्या.मुलाना नातवंडाना दाखवायला.माझ्या मनात ती सुरेख संध्याकाळ अजुनही रेंगाळतेय. मला खात्री आहे सर्व शुभंकर आणि शुभार्थींच्याहि मनात रेंगाळत असणार.
मी या सर्वाच सुरुवातीपासुन व्हीडिओ शुटींग करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या आणि माझ्या कॅमेराच्या मर्यादामुळे ते निट होउ शकल नाही.माझ्या मनःपटलावर मात्र हे सर्व कोरल गेल.
.