आठवणीतील शुभार्थी - शुभलक्ष्मी पटवर्धन
(लाल काठाची साडी नेसलेल्या पटवर्धन वहिनी)
२७ऑक्टोबर, पटवर्धन वहिनींचा( शुभलक्ष्मी पटवर्धन ) यांचा जन्मदिन.त्यांच्याबरोबरचे अनेक क्षण आठवले. त्या आज आपल्यात नाहीत पण त्यांची आठवण वेळोवेळी येते.त्यांच्या पार्किन्सन्स मुळे पार्किन्सन्स मित्रमंडळाची निर्मिती झाली असे म्हणावयास हरकत नाही.त्यांना १९९२ साली पीडीचे निदान झाले.त्यांना आधीपासून Thyroid चा त्रास होता.अशक्त पणाही होता.आमची भेट झाली तेंव्हा त्यांचा पार्किन्सन्स १५ वर्षाचा होता.
त्यांना पार्किन्सन्स झाल्या झाल्या
पटवर्धनांची पार्किन्सन्सबाबत माहिती मिळवण्याची धडपड सुरु
झाली.परिचयातले आजाराचे रुग्ण,वृत्तपत्रातून,मासिकातून येणारे
लेख,ग्रंथालयातून आणलेली पुस्तके ही माहितीची साधने होती. पण ती अपुरी होती
कारण वृत्तपत्रातील माहिती मिळती जुळती नसायची. आणि इंग्रजी पुस्तकातला
मजकूर अपरिचित वैद्यकीय शब्दामुळे.अनाकलनीय वाटायचा.
दुसरीकडे फॅमीली फिजीशियनचे होमिओपॅथीचे उपचार,योगासने व्यायाम हे सुरु
होते. पार्किन्सन्स बर्यापैकी आटोक्यात होता. अशक्तपणा मात्र होता.
एकदा वृत्तपत्रात मुंबईच्याच्या डॉ. मोहित भट यांची पर्किन्सन्स स्वमदत गटाची माहिती आली.५०० रुपये भरून सभासद व्हायचे होते.पटवर्धन यांनी चौकशीसाठी पत्र्लीहिले पैसे कोठे भरायचे हे विचारले.खूप वाट पाहिली पण उत्तर आले नाही.पटवर्धन यांच्या मनात आले आपणच का ग्रूप काढू नये या विचारातून पुढच्या हालचाली झाल्या.स्वमदत गट चालू झाला.
मी त्याना म्हणायची, तुमच्यामुळे मित्रमंडळ अस्तित्वात आल.तुम्हाला पीडी झाला नसता तर हे अस्तित्वातच आल नसत.तेंव्हा त्यां म्हणायच्या अस काही नाही दुसर्या कुणीही केलच असत.
वहिनी सभाना नेहमी नाही आल्या तरी जेंव्हा येत तेंव्हा आम्हाला मनापासून आनंद व्हायचा.कमी पण नेमक बोलण हे त्याचं वैशिष्ट.त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया महत्वाची वाटायची.एकदा परस्पर ओळखीच्या कार्यक्रमात आपल्या शेजारच्या व्यक्तीची ओळख करून द्यायची होती.मी त्यांच्या शेजारी होते.माझी ओळख त्यांनी करून दिली.माझ्या कामाबद्दल कौतुकानी सांगितलं. मला माझ्या कामाची ती मोठ्ठी पावती वाटली.
माझ्या रेडीओवरच्या लिखाणाबद्दल कधीही फोन न करणार्या त्यांनी
फोन करून लेखन आवडल्याच सांगितलं.आत्तापर्यंत खूप लिहील पण माझ्या
लिखाणावरची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी सर्वात मोलाची होती.कमलाकर
सारंगबद्दल विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं वाचून पिडीबद्दल त्याना भीती बसली.
लिखाण करताना त्याचं हे वाक्य माझ्या नेहमी लक्षात असायचं.असेलही.
पटवर्धन यांच्या बोलण्यात नेहमी माझी पत्नी अस म्हणाली आणि आता अस म्हणाली
असती अस येत. मायबोली च्या अंकात मी’ चैतन्याचा झरा’ असा पटवर्धन यांच्यावर
लेख लिहिला.तो पटवर्धन यांना पाठवल्यावर ते वाचून माझी पत्नी अस म्हणाली असती अस म्हणून त्यांच्या
प्रतिसादात एक कविता दिली.
‘चैतन्याचा झरा?’ नव्हे, हा तर ऊर्जेचा भिक्षेकरी
दिवसाही हा झोपा काढी, घरची कामे मुळि ना करी||
कधी काढले काम घरातिल, तरी हा घाली खूप पसारा
मला सांगतो ‘असार पसारा शून्य संसार सारा’||
‘गाणे कुठल्या नाटकातले शोधू आधी’ म्हणतो हा
शोध तयाचा घेण्यासाठी अधिक पसारा घालि पहा ||
शोध घेतला पण तरी शिल्लक तसाच मूळ पसारा
उत्तर देई ‘तव प्रभुने तरी आवरला का विश्व पसारा?’|
मी अनेक शुभार्थी,शुभंकर पाहिले पण शुभंकर आणि शुभार्थी परस्पर संबंधाबद्दल पटवर्धन पती पत्नी मला आदर्श वाटतात..एकमेकाना स्पेस देत दोघांनी मिळून हे नात सांभाळल. पटवर्धनांनी आपल्या शुभंकरत्वाची व्याप्ती सार्वत्रिक करून आणि वहिनीनी त्याला साथ देऊन या नात्याला खूप उंचीवर नेऊन ठेवल..मी त्याना म्हणायची, तुमच्यामुळे मित्रमंडळ अस्तित्वात आल.तुम्हाला पीडी झाला नसता तर हे अस्तित्वातच आल नसत.तेंव्हा त्यां म्हणायच्या अस काही नाही दुसर्या कुणीही केलच असत.पटवर्धनांच्या घरी मिटिंग असली की वहिनींचा घरातला अबोल वावर, देहबोलीही सुखावह वाटायची.पीडी मुळे चेहरा भावविहीन होतो. पण वहिनींचे डोळे नेहमी बोलताना जाणवायचे.
मंडळाला डॉ.अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला.तेंव्हा वहिनी हॉस्पिटलमध्ये होत्या.सर्व कुटुंबीयांनी आम्ही हॉस्पिटलची बाजू सांभाळतो तुम्हाला तुमची काही कामे असतील ती करु शक्तता असे सांगितले होते.पटवर्धन समारंभाला आले होते.समारंभ संपल्यावर ते भावूक होऊन म्हणाले, पुरस्काराचा मोमेंटो हिला दाखवायला घेऊन जाऊ का? कोणी नाही म्हणणे शक्यच नव्हते.पण आम्हा सर्वांचेही डोळे भरून आले.
सर्वच कुटुंबीयांनी त्यांच्या शेवटच्या काळात खूप सेवा केली खूप धीरांनी घेतल.
त्यांच्या कुटुंबीयांप्रमाणे आम्हालाही वहिनींची आठवण वेळोवेळी येतच राहील.