Tuesday, 29 November 2022

                                                 ताण हवासा

                             
                                शुभार्थी अश्विनी दोडवाड यांची मुलगी अनुश्रीचा फोन आला.'काकू कितीतरी दिवसांनी आईचा आनंदी आवाज आणि प्रसन्न चेहरा पाहिला.आता सभेलाही पाठवीन.मंडळाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.'पार्किन्सनमित्रमंडळाची सहल जाऊन आली की अशा  अनेक प्रतिक्रिया येत असतात.करोना काळात दोन वर्षे सहल गेली नव्हती. आता एक डिसेंबरला मोराची चिंचोली येथे सहल जाणार आहे.विशेष म्हणजे आमचे शुभार्थी आण्णा गोराडे यांच्या विशेष आग्रहावरून त्यांच्या कृषी पर्यटन केंद्रावर ही सहल जाणार आहे.सहल ठरल्यावर शुभंकर ( केअरटेकर) शुभार्थी ( पेशंट) नोंदीसाठी अगदी तुटून पडले. सामाजिक भयगंडाने पछाडलेल्या शुभार्थीना त्यातून बाहेर पडण्यासाठी,लहान मुल बनून आनंद लुटण्यासाठी सहल ही पर्वणी असते. 
                    शुभार्थीना आनंद देणाऱ्या सहलीचे आयोजन,नियोजन  २/३ महिने आधीपासूनच केले जाते.पुण्यापासून ३०/४० किलोमीटरवर असणारे निसर्गरम्य ठिकाण निवडले जाते.कार्यकारिणीचे सदस्य प्रत्यक्ष जावून २/३ ठिकाणाची पाहणी करून येतात.त्यातले शुभार्थीना सुखावह होईल असे ठिकाण निवडले जाते.बस अगदी ठिकाणापर्यंत जायला हवी.ठिकाण उंच सखल नको,खूप पायऱ्या नसाव्यात.शौचालय जवळ असावे.कमोड असावा.कार्यक्रम,खेळ यासाठी हॉल हवा.असे सगळे आखुडशिंगी,बहुदुधी हवे.

                         ठिकाण निश्चित झाले की नावनोंदणी सुरु होते.बस ठरवणे संख्येवर अवलंबून असल्याने ठराविक तारीख दिली जाते पण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत नावे येतच राहतात.आणि अशा उशिरा आलेलया शुभार्थीचे मन मोडणे कठीण होते.त्यांच्यात सहलीमुळे झालेले परिवर्तन पाहून केले ते योग्यच होते असे वाटते.

                      बसमध्ये शुभार्थीना नाश्ता देतानाही त्यांचा कंप लक्षात घेऊन चमच्याने खाण्याऐवजी उचलून खाता येईल असा मेनू ठरविला जातो.खेळ करमणुकीचे कार्यक्रम यांची रेलचेल असते.एकुणात सहलीचे सर्व नियोजन शुभार्थी केन्द्री असते.सर्वजण लहान मुल बनून मनसोक्त आनंद घेतात.सामुहिक शक्तीतून उर्जा निर्माण होते ती उर्जा अनेक दिवस पुरते.

                     सहलीला परगावहून शुभार्थी शुभंकर येतात.यावेळी सहलीला इंदूरहून वनिता सोमण,बेळगावच्यायेणे आशा नाडकर्णी, औरंगाबादहून रमेश तिळवे येणार आहेत. महाडचे मधुकर तांदळे यांचे व्हिसाची तारीख आल्याने रहित झाले. अनेक शुभार्थी परदेशवाऱ्या,भारत भ्रमण करतात तरीही त्यांना मंडळाची ही मिनी सहल आकर्षित करते

                     सहलीपूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत अनेक अडचणी येतात.तोल जातो,ऑनऑफची समस्या आहे, फ्रीजीन्गची समस्या आहे,डिस्काय्नेशियामुळे शरीर सारखे हलते अशा अनेक शुभार्थीना नेताना प्रचंड ताण असतो. ताण कसा दूर करावा यासाठी अनेक उपाय सांगणारे तज्ज्ञ थोडा तरी ताण गरजेचा आहे असे सांगतात.ते पटते.सहलीनंतरच्या शुभंकर, शुभार्थींच्या सुखावणाऱ्या प्रतिक्रिया आणि खुललेले चेहरे पाहून आधीचा ताण ताण विसरायला होतो.ताणानंतरच्या आनंदाची गोडी वेगळीच असते.पुन्हा सहल निघते.खरे तर  आमची सहल म्हणजे 'ताण हवासा' असेच म्हणावे लागेल.
                    




  • No comments:

    Post a Comment