Wednesday, 19 October 2022

कर्तबगार लढवय्या.. उषाताई खातू


  • कर्तबगार  लढवय्या.. उषाताई खातू     
         
                    उषा सुर्यकांत खातू एक उद्योजिका!.  त्यांचा  एक सर्वसामान्य गृहिणी ते उद्योगभूषण पुरस्कार मिळवणारी उद्योजिका हा प्रवास.या प्रवासातील अनेक टक्केटोणपे, कोसळलेले दुःखाचे  डोंगर,  विविध आजार, या सर्वांवर मात करत,त्यांचे  ठामपणे उभे राहणे हे सगळे मी जवळून पाहिले आहे .  गुलटेकडीच्या  कारखान्याच्यावर २५० बाय ३०० फुटाच्या जागेत असो की 'किनारा' या अलिशान बंगल्यात राहात असो.त्या वावरल्या राणीच्या थाटात.त्या कर्तबगार स्त्रीची ही  प्रेरणादायी जीवन कहाणी. 

                      १९६७ मध्ये सुर्यकांत खातू यांच्याशी विवाह झाला आणि त्या पुण्यात आल्या.गुलटेकडी इंडस्ट्रीअल इस्टेट मध्यें त्यांचा Fabrication चा व्यवसाय होता.खातू पुरोगामी विचाराचे.पत्नीची कर्तबगारी ओळखून व्यवसायातील काही जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या. कारखान्याच्या वरतीच राहत असल्याने व्यवसायातील बारकावे त्यांना  समजत गेले.  त्या ७९ साली बंगला बांधून सॅलस्बरीपार्क येथे राहायला गेल्या . तरी तोवर दुचाकी आणि चारचाकीही शिकल्यामुळे,त्यांचे कारखान्यात जाणे येणे चालू  होते.दोघा पती पत्नीना माणसांची आवड त्यामुळे घर लहान होते तेंव्हा आणि बंगला झाल्यावर घर सर्वांसाठी खुले असे.गावाकडून पुण्यात शिक्षण, नोकरीसाठी येणार्यांनाही  त्यांना हक्काचा आधार असे.दोन मुली,एक मुलगा घरी सासूबाई होत्या.त्यांचेही या सर्वाला प्रोत्साहन होते आणि घरावर लक्षही होते.८२ साली सासुबाईंचे निधन झाले.आणि लगेच ८३ साली खातूंची बायपास करावी लागली. ही सर्जरी इंग्लंड मध्ये करायची होती.खातूंचा लोकसंग्रह मोठा असल्याने,इंग्लंडला  राहण्याची सोय झाली. कारखान्याचा पसारा,मुलांची जबाबदारी हे सारे होतेच उषाताई स्वत: महिनाभर इग्लंडला खातूंच्या बरोबर राहिल्या.खंबीरपणे त्यांनी आल्या प्रसंगाला तोंड दिले.भारतात आल्यावर पतीची सुश्रुषा,  आणि कारखान्याचा भार उषा ताईंच्यावर आला. 

                  पतीला  मदत करणे आणि कारखान्याची जबाबदारी  शिरावर घेणे यात फरक होता.  शिक्षण फारसे झालेले नव्हते. पण धाडस,कामाचा प्रचंड उरक,प्रसंग कितीही बाका असो डगमगायचे नाही ही वृत्ती ही अस्त्रे त्यांच्याबरोबर होती.कारखान्यात लोखंडी खिडक्या,दरवाजे,जाळ्या अशा गोष्टी ग्राहकांच्या जागेवर जाऊन कराव्या लागत.कारखान्याच्या मोठमोठ्या शेड असत.ताई स्वत: फोरव्हीलर घेऊन साईटवर जात.हाताखाली काम करणारी २५/३० माणसे सांभाळायची होती.खातूंनी गुणवत्तेचा आदर्श प्रस्थापित केला होता.त्याला तडा जाऊ द्यायचा नव्हता.उषाताइनी हे शिवधनुष्य पेलले.बंगला असो इमारत असो,छोटा उद्योग असो की मोठा कारखाना, सराईतपणे त्या काम करू लागल्या.बाजाराचे भान ठेवत उत्पादनात नव्याची भर घातली.व्यवसाय वाढवला.खातूंचा सल्ला,प्रोत्साहन होतेच. 

                मोठा मुलगा इंजिनिअर होउन हाताशी आला.बाहेरची कामे तो करू लागला.९२ साली सून आली आणि घराचा भारही थोडा कमी झाला.आता अलिबागजवळ अक्षीला जागा होती तेथे मधुनमधून आरामात रहायची स्वप्ने पाहणे सुरु झाले पण अकस्मात ९३ साली खातूंचे निधन झाले.दु:ख करत बसायला वेळच नव्हता. पसारा खूप वाढवला होता. याशिवाय पतीचे अक्षीला रीसॉर्ट करायचे स्वप्न पुरे करायचे होते.ते  स्वप्न  त्यांनी पूर्ण  केले .पती आणि मुलगा यांचे नाव गुंफलेले  'सूर्यकिरण  रीसॉर्ट ' दिमाखात उभे राहिले. 

                  १४खोल्या.नारळ,सुपार्रीची भोवती वाडी,जवळ बीच व्हेज,नॉनव्हेज दोन्ही तर्हेचे जेवण अशी सर्व सोय होती.काही बँकांशी टायअप केले.उत्तम बस्तान बसले.उद्योगाच्या एका नव्या क्षेत्रात त्या शिरत होत्या.खाणे आणि खाऊ घालणे दोन्हीची आवड असल्याने हे काम आनंददायी होते.थोडे स्थिरावत होते. 

                तितक्यात आणखी एक दुर्घटना घडली.९६ साली मोठ्या मुलीचे दुर्दैवी निधन झाले.२००१ मध्ये नातू झाला.दु:खावर थोडी फुंकर घातली गेली.पण आता अक्षी ची ओढ लागली होती.मुलावर कारखाना सोपवून त्या तेथे रहायला गेल्या.मनात आले की गाडी घेऊन पुण्याला येत.जुन्या पुणा मुम्बई रोडवर त्या घाटातून छोट्या गाड्या चालवायच्या तशी जीपही चालवायच्या. आता नवीन हायवे झाल्यावर तर त्यांच्यासाठी गाडी चालवणे सोपे असायचे. उद्योगाचा पसारा वाढला तरी त्यांनी ड्रायव्हर कधीच ठेवला नाही.पुण्यापेक्षा तेथे निसर्गाच्या सहवासात राहणे आवडायला लागले.थोडे कुठे चांगले चालले तर नशिबाला परीक्षा घ्यायची लहर आली.तब्येयीच्या तक्रारी सुरु झाल्या. 

                 २००७ मध्ये बायपास सर्जरी झाली.दीड वर्षे पुण्यात राहावे लागले.ड्रायव्हिंग करणे चालूच होते.१/२ वर्षे चांगली गेली, पुन्हा नवे संकट  २०११ मध्ये गुड्गघ्यांची शस्त्रक्रिया झाली.पण कणखर असलेल्या उषाताई, दीड दोन महिन्यातच चालायला लागल्या.सहा महिन्यात पुन्हा अक्षी ला गेल्या.या सगळ्या आजारपणात त्या कधीच चेहरा टाकून बसल्या नाहीत की खचल्या नाहीत. सवड मिळेल तसे देश, परदेशात प्रवास करत राहिल्या. नवे मित्रमंडळ जोडत राहिल्या.आजार दु:ख कुरवाळत बसणे त्यांच्या स्वभावातच नव्हते.आणि दु:ख काही त्यांची पाठ सोडत नव्हते.२०१६ मध्ये  तरूण  कर्तबगार मुलाचा,हृदयविकाराने अचानक मृत्यू झाला.दैवाने दिलेला हा मोठ्ठा दणका होता!पुत्रवियोग... 

                       नात लग्नाची झाली होती.तिच्यासाठी वरसंशोधन करायचे  होते.दुसरी नात,नातू यांची  अभ्यासाची महत्वाची वर्षे होती.सासू सून दोघींनाही दु;ख विसरून कामाला लागावे लागले.२०१८ ला मोठ्या नातीचे लग्न झाले.चांगले स्थळ मिळाले.लग्नात सुंदर नटून बसलेल्या उषाताईना सर्वांचे स्वागत करताना पाहून आनंद वाटला.त्याना आधुनिक कपडे घालणे आवडायचे.कोण काय म्हणेल याची तमा करत नसत. दुसरी नात आर्किटेक्ट झाली. पुढील शिक्षणासाठी आस्ट्रेलियाला गेली.जीवनसाथी निवडला असल्याचे गुज आईला सांगितले नाही पण आज्जीच्या कानात सांगून गेली.ही आधुनिक आज्जी तिची सेल्फीची हक्काची बडी होती.लॉकडाऊन काळात पणतू झाला.नातूही इंजिनिअर झाला.जरा बरे चालले.. 

               तोवर   त्यांच्या  तब्येतीच्या तक्रारी वाढल्या. यावेळी किडनीच्या आजाराने नंबर  लावला .२०१९ पासून डायलेसिस सुरु झाले.सुरुवातीला आठवड्यातून दोनदा नंतर तीनदा. डायलेसीसपूर्वी जेवण जात नसे.छातीवर प्रेशर येई.डायलेसिस केले की बरे वाटे.नातू हॉस्पिटलमध्ये सोडून येई  आणि आणायला जाई.त्यांच्याबरोबर कोणी काम सोडून थांबावे असे त्याना वाटत नव्हते.केव्हढ मनोधैर्य. अनेकाना या प्रर्क्रीयेचा त्रास होत असल्याचे ऐकले होते. उषाताई मात्र नेहमीसारख्या आनंदी असत.फोन करणे, आर्थिक व्यवहार पहाणे , अक्षीच्या  रीसॉर्टकडे लक्ष देणे हे चालूच होते.त्यांना फक्त उठताना कोणीतरी हात धरणे याशिवाय कोणाची मदत लागली नाही.उलट कुटुंबीय, आणि ज्ञाती बांधव याना त्यांचाच आधार वाटायचा.नातू हाताशी आला . आता  त्यांचे ड्रायव्हिंग बंद झाले.अक्षीला नेणे आणणे नातू करू लागला. काहीवेळा तेथे राहून  त्या अलिबागला डायलेसिससाठी जात.कारखान्यात असो की रीसॉर्ट तेथील कामगार,नोकरवर्गाला परीवाराप्रमाणे वागवल्याने तेही  त्यांना प्रेमानेच मदत करत. 

                   इतक्या अडचणी असल्या तरी त्यांनी वैश्यावणी समाजाची स्थापना करून अनेक सामाजिक कामे केली,या संस्थेच्या त्या अध्यक्षही होत्या.अंध शाळा आणि अनाथाश्रमातील मुलीना दत्तक घेऊन त्यांचा खर्च करणे अशी कामे तर  त्या करतच होत्या.डिसेंबरमध्ये नात ओस्ट्रेलियावरून येणार होती. तिचा साखरपुडा व्हायचा होता. अश्यात   जुलैमध्ये थोडे व्हायरल इन्फेक्शन झाले,आणि पाठोपाठ हार्टॲटॅकनेचे निमित्त होऊन उषाताईंचे  निधन झाले.
          
               निधनापूर्वी , ७/८ दिवस आधी मुलीच्या सासरच्यांना  त्यांनी  जेवायला बोलावले होते. स्वत: गॅॅससकडे उभे राहून खास 
    रेसिपी केल्या होत्या.
    शरीर डायलेसीसने थकले होते,भल्या मोठ्या प्रपंचाची गाडा ओढून दमले होते तरी आनंद घ्यायची ही त्यांची वृत्ती विलक्षण होती. 

             कॅलेंडर मधे जसा अधिक मास येतो तशी नियमितपणे  संकटे त्यांच्या आयुष्यात येत राहीली.  पण परिस्थितीने आलेला कणखरपणा  ,धाडसी   आणि आनंदी वृत्ती यामुळे त्यांनी आयुष्यात केलेला सामना थक्क करतो. 

              आजार असले, जाणे  अपेक्षित असले तरी,  त्यांचे अचानक जाणे  अनपेक्षित  होते.       एकप्रकारे,  आजाराला त्यांनी चकवले ! आजाराने  गलितगात्र करण्याआधीच,  सर्वांच्या डोळ्यांसमोर आपले  हसरे,उत्साही रूप ठेऊन  त्या गेल्या.एक उदाहरण बनून गेल्या.
           
              कसं जगायचंय ? रडत रडत की हसत हसत ? या प्रश्नाच्या 'हसत हसत' या उत्तराचा पर्याय त्यांनी निवडला आणि आपलेच नाही तर घरादाराचे आयुष्य उजळून टाकले ! 

           उषाताईंच्या कणखर,धाडसी बाण्याला सलाम... 

                        डाॅ. शोभना तीर्थळी.


No comments:

Post a Comment