Wednesday, 30 January 2019

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ३४

                                               पार्किन्सन्सविषयक गप्पा - ३४
              दुपारचे दोन वाजले होते. माझा नातू शाळेतून यायचा होता.इतक्यात एका शुभार्थीचा पुना हॉस्पिटलमधून फोन आला.ती हमसाहमशी रडत होती 'काकू ताबडतोब या.येथे प्रॉब्लेम झालाय' ती रडत रडत सांगत होती.काय झाले आहे ते सांगतच नव्हती.मी गडबडून गेले.माझ्या घरापासून हॉस्पिटल पर्यंतचे अंतर पाहता मला पोचायला तासभर तरी लागला असता.शिवाय नातू यायचा होता.त्याला सोडून जाणे शक्य नव्हते.मी रामचंद्र करमरकरना फोन केला ते नव्हते त्यांना निरोप ठेवला.आणि आशा रेवणकरला फोन केला.मी थोडी भानावर आले आणि लक्षात आले शुभार्थीच्या नवऱ्याचा फोन माझ्याकडे आहे लगेच त्यांना फोन केला.ते म्हणाले, 'मी आत्ताच हॉस्पिटलमधून येतोय.नर्सला गरज वाटली तर फोन करायला सांगितले आहे.इमर्जन्सी काहीच नाही तिला भास होत आहेत.डोस अॅडजेस्ट करण्यासाठी अॅडमीट केले आहे.'
              पुन्हा या दोघांना हा निरोप सांगेपर्यंत आधी करमरकर आणि नंतर आशा  हॉस्पिटलमध्ये पोचलेही होते.करमरकरना ती काही सांगायला तयार नव्हती.आशा गेल्यावर मात्र तिचा बांध फुटला.तिची भीती,असुरक्षितता आणि पीडीमुळे होणारे भास यांची सरमिसळ तिच्या बोलण्यात होती.डॉक्टरी उपायाबरोबर तिला समुपदेशनाची गरज होती.आशाला पार्किन्सन्स पतीचे भास या सर्वांचा अनुभव असल्याने तिने परिस्थिती हळुवारपणे हाताळली.जवळजवळ तास दीड तास ती शुभार्थीला समजावत होती.आणि शोभना ताईंची तब्येत ,वय पाहता तु त्याना असा फोन करायला नको होतास असे झापलेही.आशाच्या समजावण्याने असेल कदाचित ती अपेक्षेपेक्षा लवकर तिच्या मानसिक अवस्थेतून बाहेर आली.मी तिला घरी भेटायला येण्याचे आश्वासन दिले.
                 हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर तिचा फोन आला,' काकू तुम्ही येवू नका. मी आता बरी आहे तुम्ही येवू नका.मीच तुम्हाला घरी भेटायला येईन.मी तुम्हाला त्रास दिला सॉरी'
                मागच्या गप्पात मी आशाबद्द्ल लीहिले होते..पार्किन्सन्स  मित्रमंडळात सामील झाल्यावर तिच्यात हा खंबीरपणा आला.आता इतर शुभार्थी शुभंकरांना ती खंबीर बनवत असते.ही प्रक्रिया हळूहळू पण सहजपणे झाली.आता ही शुभार्थी इतरांना खंबीर बनण्यास मदत करते.
         

1 comment:

  1. शोभना ताई, नेहमीप्रमाणेच आश्वासक व वाचनीय

    ReplyDelete