Wednesday, 23 January 2019

आठवणीतील शुभार्थी - पद्माकर आठले

 आठवणीतील शुभार्थी - पद्माकर आठले
  
नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि फोनवर, व्हाट्सअप वर शुभेच्छांचा पाऊस पडू लागला. मला मात्र आता कधीही न येणाऱ्या पद्माकर आठले यांच्या फोनची ऊणीव भासत होती. एक जानेवारीला नेहमी त्यांचा शुभेच्छा देणारा फोन यायचा. पहिल्यांदा त्यांचा फोन आला तेव्हा कोण बोलत आहे हे मला कितीवेळ समजतच नव्हते. आपण कोण बोलत आहात असे मी पुन्हा पुन्हा विचारत होते आणि मग माझ्या लक्षात आले आठले बोलत आहेत. पार्किन्सन मुळे त्यांच्या बोलण्यावर परिणाम झाला होता वयही  पंचाहत्तरीच्या पुढचे होते. आवाज खोल गेलेला,अस्पष्ट होता पण तरीही शुभेच्छा देण्याचा त्यांचा आटापिटा, आणि त्यामागचे बरेच काही बोलण्याचा प्रयत्न माझ्या मनाला स्पर्शून गेला

बरेच  पीडी पेशंट बोलण्याची समस्या  असली की बोलणेच टाळतात पण आठले यांच्या बाबतीत असे नव्हते. बोलण्यावर परिणाम झाला तरी त्यांची मनाची उमेद संपली नव्हती. पद्माकर आठल्ये आणि संजीवनी आठल्ये हे एकमेकांना अनुरूप अशी शुभंकर, शुभार्थीची जोडी. आमचे न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर हेमंत संत यांनी आठल्ये यांचा फोन नंबर दिला आणि आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो त्यानंतर ते सभांना यायला लागले. माझ्या मुलीच्या घराजवळ त्यांचे घर असल्याने तिच्याकडे गेलो की आम्ही  त्यांच्याकडे भेटायला जायचो. पद्माकर आठल्ये खूपच खूश व्हायचे. इंजिनीअर असलेले आठले भिलाई स्टीलप्लान्ट येथून डेप्युटी चीफ इंजिनिअर म्हणून निवृत्त झाले आणि पुण्यात राहायला आले होते.संजीवनीताई बिहारमध्ये वाढलेल्या,उच्चशिक्षित. नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची आस असलेल्या.व्याख्याने, वेगवेगळ्या तज्ञानी सांगितलेल्या  गोष्टी समजून घेवून त्यांची संजीवनी ताईनी अंबलबजावणी करून पाहिलेली असायची त्याच्यावर आमच्या चर्चा व्हायच्या.त्यांचे हिंदी ढंगातील मराठी आणि त्यामागचा विचार दोन्ही ऐकायला छान वाटायचे.

त्यांच्या घरापासून मंडळाच्या  सभेचे ठिकाण तसे लांबच होते.चार वाजता सभा म्हणजे घरातून  बरेच लवकर निघावे लागायचे. संजीवनी ताई कधीकधी दमलेल्या असायच्या त्याना सभेला येणे नको वाटायचे पण आठले मात्र तयार होऊन बसायचे. सभेला येण्यासाठी उत्सुक असायचे आणि संजीवनी ताईना दमलेल्या अवस्थेत सभेला यावे लागायचे.मंडळाला जमेल ती मदत त्या करायच्या.सभेला येऊ शकल्या नाहीत तरी  संजीवनी ताई सभांचे फोन करायचे काम करायच्या.

सतत हसरा चेहरा हे पद्माकर आठलेंचं वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांची जगण्याची उमेद टिकून असल्याने पार्किन्सनन्स वाढत गेल्यावर त्यांनी डीबीएस सर्जरी करण्याचे ठरवले. सत्तरीनंतर  ही सर्जरी अगदी उत्तम तब्येत असली तरच करावी  असे तज्ञांचे म्हणणे असते.त्यामुळे घरच्या लोकांना ऑपरेशन करावे की नाही  असा संभ्रम होता आठले यांच्या डोळ्यासमोर मात्र सत्तरी झालेल्या एका  व्यक्तीची सर्जरी झाली आणि त्यांना त्याचा चांगला उपयोग झाला हेच उदाहरण होते. आणि हो नाही करता करता शस्त्रक्रिया झाली. हळूहळू ते चालु,फिरू लागले त्याना भेटायला जायची इच्छा असून मला जाणे जमले नव्हते.आणि  जानेवारी २०१७च्या सभेला संजीवनी ताइंची तब्येत ठीक नसल्याने मुली बरोबर त्यांनी हजेरी लावली.खूप महिन्यांनी त्यांचा पूर्वीसारखाच हसतमुख चेहरा पाहताना आनंद झाला.त्यावेळी .'हाउसी' हा सर्वजण सहभागी होतील असा खेळ ठेवला होता त्यात ते  आनंदाने सहभागी झाले आणि बक्षिसही मिळवले. आता ते  सभांना यायाला  लागतील असे  वाटले होते. पण न्यूमोनियाचे निमित्त झालं आणि एक मार्चला त्यांचे निधन झाले.ते त्यावेळी ८१ वर्षाचे होते.

 पद्माकर आठले गेले तरी आठले कुटुंबियांशी संवाद चालूच राहिला त्यांची मुलगी एका सभेत देणगी देवून गेली.संजीवनीताईनी' पार्किन्सन्स मित्रमंडल और हमारी यादे'  असा कृतज्ञता व्यक्त करणारा लेख लिहून दिला १८ सालच्या स्मरणिकेत तो आम्ही छापला.लेखात त्यांनी

'तहे दिलसे ईश्वरको हमारी प्रार्थना है की यह मंडल विकसित और विस्तृत होकर दिन दुनि और रात चौगुनी उन्नति करे' अशा शुभेच्छा दिल्या होत्या.

५ जानेवारीला संजीवनी ताईचा भरभरून शुभेच्छा देणारा फोन आला.त्यांच्या लेखातील भावनाच त्या बोलून  सांगत होत्या.पार्किन्सन्स मित्रमंडळाची हीच तर खासियत आहे. एकदा आत शिरलेला माणूस कुटुंबातील एक होऊन जातो.त्यांचे जोडलेपण मंडळाला मोट्ठे करत राहते.


  • No comments:

    Post a Comment