टूलिप पार्किन्सन्स आजाराचे बोधचिन्ह
अश्विनी करमरकर यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळासाठी बोधचिन्ह (लोगो )तयार करून दिल आहे.इंडिअन ऑइल मध्ये काम करणार्या अश्विनीनी छंद म्हणून चित्रकला जोपासली.मायबोली दिवाळी अंक २०१४ मधील तिचे हे कौश्यल्य पाहून मी तिला सहज विचारले आणि तिनी हे काम करण्यास लगेच होकार दिला अट एकच होती, हे काम विना मोबदला करण्याची.मनाजोगे काम होईपर्यंत कितीही वेळा बदल करण्याची विविध नमुने देण्याची तिची तयारी होती.शेवटी मनाजोगे काम झाले आणि आता वेबसाईट,स्मरणिका सर्वत्र ते विराजमान झाले आहे.या बोधचीन्हात टूलिप असावे असे आम्हीच सांगितले होते.त्याचे कारण पुढे देत आहे.
टूलिपची हवेत डोलणारी फुले सर्वांनाच मोहित करतात.टर्कीचे राष्ट्रीय फुल आणि डच लोकांच्या हृदयात विराजमान असणारे 'टूलिप' आता जगभर तितकेच प्रिय झाले आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या बोधचिन्हात त्याला स्थान मिळाले ते एका वेगळ्याच कारणासाठी.
एप्रिल २००५च्या लक्समबर्ग( Luxembourg) येथे झालेल्या पार्किन्सन्स परिषदेत लाल टूलिप हे पार्किन्सन्स आजाराचे बोधचिन्ह म्हणून निवडले गेले.१९८० मध्ये प्रसिद्ध डच बागकाम तज्ज्ञ जे.डब्ल्यू.ए.व्हॅनडर वेरल्ड ( Vander Wereld) यांनी लाल व पांढर्या टूलिपची विशेष जात विकसित केली.व्हॅनडर स्वत: पार्किन्सन्सग्रस्त होता.या नवनिर्मितीस त्यांनी 'जेम्स पार्किन्सन्स टूलिप' असे नाव दिले. जेम्स पार्किन्सन्सच्या 'Essay on the shaking palsy' निबंधाने पार्किन्सन्स या आजाराचे प्रथम वर्णन केले.हे सर्वश्रुतच आहे.हे नाव देऊन या ब्रिटीश डॉक्टरचा त्यांनी सन्मान केला.इंग्लंडची 'रॉयल हार्टीकल्चर सोसायटी'.आणि हॉलंडची 'जनरल बल्ब ग्रोंअर्स' यांनी पार्किन्सन्स टूलिपची दखल घेऊन व्हेंडरचा सन्मान केला.
पार्किन्सन्स आजारासाठी टूलिप हे चिन्ह औचित्यपूर्ण आहे.टूलिपचा कंद गडद तपकिरी रंगाचा असतो.त्यावर सुकलेले कागदासारखे आवरण असते.आत उमलण्यासाठी आतूर असलेले टूलिप.हिवाळ्यात वितळलेल्या बर्फात हे लगडलेले कंद न्हाऊन निघतात.आणि निर्जीव वाटणार्या टूलिपची स्प्रिंगची वाट पहात भोगलेली खडतरता संपते.हळुवारपणे फुले उमलतात व हवेत डोलू लागतात.पार्किन्सन्स पेशंटचे आखडलेले स्नायू ,मंद हालचाली इत्यादी लक्षणामुळे रोजचे जगणे कष्टप्रद झालेले असते.आनंदानी डूलणारी टूलिपची फुले काही उपाय निघेल आणि कष्टप्रद जगणे सुसह्य होईल.धीर धरा,आशेचा किरण आहे,आनंदाने जगा असा संदेश देतात
.पार्किन्सन्स मित्रमंडळासारखा स्वमदतगटही पार्किन्सन्स पेशंटसाठी आशेचा किरण आहे.मित्रमंडळाचा आनंदी जगण्यासाठी सर्वांनी मिळून करावयाच्या प्रयत्नावर भर आहे.निराश,हताश न होता मनाला उभारी देणे,पार्किन्सन्ससह आनंदी जगता येते हा आत्मविश्वास वाढवणे,आशावाद निर्माण करणे,पार्किन्सन्सबाबत नवनवीन ज्ञान,शोध,तज्ज्ञांमार्फत पोचवणे याच उद्दिष्टांनी धडपडणारे मित्रमंडळ पार्किन्सन्सग्रस्ताना नक्कीच टूलिपचा संदेश पोचविणारे माध्यम आहे.
(Parkinson Foundation of the Heartland यांच्या एका बातमिपत्रामधील लेखाच्या आधारे.)
No comments:
Post a Comment