Wednesday, 16 April 2014

मार्च १४ पासून मित्रमंडळ वार्ता जानेवारी १६ पर्यंत

                                           मित्रमंडळ वार्ता

१३ मार्च १४ रोजी आश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती.पुण्यात अवेळी आलेला आणि  कोसळणारा पाउस, आश्विनी हॉटेलसमोर काम चालू असल्याने बंद असलेले रस्ते यांची तमा न बाळगता.४५ सभासदांनी हजेरी लावली.
श्री टी.एस. अरुणाचलम,डॉक्टर एस.जी.कास्थेडीकर,श्री सुधीर वकील या DBS (Deep Brian Stimulation ) शस्त्रक्रिया झालेल्या शुभार्थिनी आपले अनुभव सांगितले.आतापर्यंत अशी शस्त्रक्रिया झालेल्या ८ व्यक्तींच्या संपर्कात मंडळ आले.पण प्रयत्न करूनही अनुभव शेअर करण्यास कोणी येऊ शकले नव्हते.प्रसिद्ध न्यूरोसर्जन चारू आपटे यांचे शस्त्रक्रियेची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले होते पण प्रत्यक्ष लाभार्थीचा अनुभव ऐकणे त्यांच्यातला फरक पाहणे याबाबत सर्वांनाच औत्सुक्य होते.या तीघानीही आपली श्स्त्राक्रीयेपुर्वीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती याची माहिती दिली श्रोत्यांच्या शंकाना उत्तरे दिली शस्त्रक्रिया झालेल्यांना परस्पर अनुभवांची देवाणघेवाणही करता आली.ज्याना शस्त्रक्रिया करावयाची आहे त्यांच्यासाठी ही पर्वणीच होती.चर्चा इतकी उपयुक्त होती की, आशा रेवणकर यांचे ठरलेले व्याख्यान त्यांच्याच सूचनेनुसार पुढे कधीतरी ठेवण्याचा विचार करण्यात आला.सभेला उपस्थीत नसलेल्या आणि परगावच्या सभासदांसाठी तिघांनीही लिखित स्वरूपात आपले अनुभव देण्याचे कबुल केले.
निवेदन
 १३ मार्च रोजी  श्री टी.एस. अरुणाचलम,डॉक्टर एस.जी.कास्थेडीकर,श्री सुधीर वकील या DBS (Deep Brian Stimulation ) शस्त्रक्रिया झालेल्या शुभार्थिचे  अनुभवकथन खूपच रंगले त्यामुळे आशा रेवणकर यांचे शुभंकर शुभार्थी परस्पर संबंधावर हे नियोजित व्याख्यान होऊ शकले नाही.ते व्याख्यान
गुरुवार  दिनांक  ८ मे रोजी होणार आहे.
१३ एप्रिलच्या जागतिक पार्किन्सन्स दिवस समारंभात
कृपया सर्वांनी उपस्थित राहावे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.
                                   जागतिक पार्किन्सन्स दिवस मेळावा वृत्त

                                     दिनांक १३ एप्रिल रोजी लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता.कार्यक्रमास २०० ते २५० शुभंकर शुभार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते.सातारा,मुंबई,धुळे,उंब्रज अशा महाराष्ट्रातील इतर भागातूनही शुभंकर, शुभार्थी आले होते.
                                कार्यक्रमाची सुरुवात' हमको मनकी शक्ती देना' या प्रार्थनेने झाली.राजीव ढमढेरे,वसुधा बर्वे आणि प्रज्ञा जोशी या शुभार्थी कडून अनुपमा करमरकर यांनी ही प्रार्थना बसवून घेतली.सविता ढमढेरे आणि शोभना तीर्थळी या शुभांकरानीही त्याना साथ दिली.
                                 या नंतर मंडळाचे संस्थापक सदस्य श्री.शरच्चंद्र पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.आपल्या मनोगतात त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या भविष्यकालीन योजना,शुभंकर व  शुभार्थीकडून अपेक्षा व्यक्त केल्या.
                               शुभार्थींच्या नृत्याविष्कार हे मेळाव्याचे आकर्षण होते..गेली तीन वर्षे 'ऋषिकेश सेंटर फॉर कंटेंपररी डान्स'चे ऋषिकेश पवार हे पीडी शुभार्थीवर विनामूल्य नृत्योपाचाराचा प्रयोग करत आहेत.त्याची उपयोजिता सिद्ध होत आहे.पवार व त्यांच्या तन्वीवपियुषा या सहकार्यांनी सुरुवातीच्या वार्मअप व्यायामात उपस्थित प्रेक्षकानाही सहभागी करून घेतले.'ऐरणीच्या देवा तुला'गाणे सुरु झाल्यावर त्या तालावर  श्रोत्यांनीही  ताल धरला नृत्यातील. मुद्रा,बोल यानंतर 'हवाके साथसाथ' या गीताने नृत्य सादरीकरणाचा शेवट झाला.टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी शुभार्थींचे कौतुक केले.नृत्याविष्कारात प्रज्ञा जोशी, विलास जोशी, सुरेखा रोकडे,विनया दीक्षित,सुलोचना  दीक्षित,श्री आपटे,दिलीप कुलकर्णी,दुर्गा शेंडे,विजय देशपांडे,श्री व सौ.साने,शरद सराफ,अश्विनी दोडवाड,पांडुरंग कोंडभोर.या शुभंकर,शुभार्थिनी भाग घेतला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पंड्या यांनीही आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले.
                            यानंतर मंचावर अध्यक्ष डॉक्टर सुनील पंड्या,डॉक्टर शशिकांत करंदीकर,आणि शरच्चंद्र पटवर्धन याना पाचारण करण्यात आले.डॉक्टर सुनील पंड्या यांची डॉक्टर शशिकांत करंदीकर यांनी ओळख करून दिली.अध्यक्षांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.डॉक्टर पंड्या हे न्यूरोसर्जन असल्याने त्यांच्या व्याख्यानात त्यांनी पीडीवरील शास्त्रक्रीयांबाबत माहिती दिली.थेलेमोटोमी या शस्त्रक्रियेची सुरुवात अपघाताने झाली.या शस्त्रक्रियेत मेंदूतील काही भाग डॅमेज केला जाई.शस्त्रक्रिया झाल्यावर सुरुवातीला चांगले वाटते.पण काही काळानंतर याची उपयुक्तता कमी होते असे लक्षात आल्याने ही पद्धत मागे पडली.सध्या DBS (डीप ब्रेन स्टीम्युलेशन) ही शस्त्रक्रिया प्रचलित आहे.यात डॅमेज न करता स्टीम्युलेट केले जाते.या शस्त्रक्रियेला लागणारी साधने आयात करावी लागतात. त्यामुळे ही शस्त्रक्रिया थोडी महागडी.आहे.स्टेमसेलवर प्रयोग चालू आहे.सैद्धांतिक पातळीवर हे ठीक असले तरी प्रत्यक्षात हे सिद्ध झालेल नाही.वेळेअभावी श्रोत्यांच्या काहीच प्रश्नाना त्यांनी उत्तरे दिली.शस्त्रक्रियेचा सक्सेस रेट किती आहे? या प्रश्नाला त्यांनी मी स्वत:ही शस्त्रक्रिया करत नाही पण जे करतात त्यांच्याशी नेहमी चर्चा होते असे सांगितले.त्यावरून लहान वयात शस्त्रक्रिया झाल्यास सक्सेस रेट जास्त आहे. आणि सत्तरी नंतर झाल्यास तो कमी आहे असे सांगितले.
              आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले,पूर्वी डॉक्टर सांगतील तेच ऐका असायचे पण शुभार्थींच्या नृत्याने, इतर मार्गानेही काही होऊ शकते हे दाखवून दिले.नृत्यात सहभागी शुभार्थींच्या हालचालीना मर्यादा होत्या. पण फिनालेमध्ये त्यावर मात करून हालचाली बसवल्या होत्या. या प्रयत्नासाठी ऋषिकेश अभिनंदनास पात्र आहे.आता कुटुंबातील एखादी व्यक्ती केअरटेकर न राहाता स्वमदतगट, ऋषिकेशसारख्या व्यक्तीही हे काम करत आहेत.एकटेपणा त्यातून नैराश्य आणि त्यामुळे पीडीत वाढ यावर या सर्वामुळे मात होऊ शकेल.               
              डॉक्टर पंड्या याना मुंबईला जायचे असल्याने ते पूर्णवेळ थांबू शकणार नव्हते.त्यांनी मंच सोडल्यावर अंजली महाजन,संजीवनी आठले या शुभंकर आणि मोरेश्वर काशीकर,जयश्री बर्वे, आणि बी.के.चौगुले या शुभार्थींनी अनुभव कथन केले.या सर्वांची पीडीसह सकारात्मक वाटचाल सर्वाना प्रेरणा देऊन गेली.
             कार्यक्रमात मित्रमंडळाच्या वेबसाईट बाबत व त्यावरील बातमी पत्राबद्दल माहिती सांगण्यात आली.वेबसाईटवर काय असेल, शुभंकर आणि शुभार्थी यासाठी कोणती मदत करू शकतील हेही सांगण्यात आले.  
             कार्यक्रमाचे सूत्र संचलन आशा रेवणकर यांनी केले शोभना तीर्थळी यांनी आभार मानले.प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली पुढे अर्धा तास परस्पर चर्चा ओळखी करून घेणे यासाठी ठेवला होता.त्याचा सर्वांनी पुरेपूर लाभ घेतला.
            दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्मरणिका सर्व शुभार्थींना मोफत देण्यात आल्या.

वृत्तांत - पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि. ८/५ १४
शुभार्थी (Patient ) व शुभंकर (Care giver )यांच्यातील समन्वय :
वरील विषयावर सौ. विजयालक्ष्मी रेवणकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. सौ रेवणकर या मंडळाच्या एक तळमळीच्या कार्यकर्त्या आहेत व त्या स्वत: एक शुभंकरही आहेत. त्या M. A; M.Ed.( English ) असून १८ वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्या कन्नड, मराठी, व इंग्लिश या भाषांच्या प्रस्थापित भाषांतरकारही आहेत. अत्यंत सोप्या भाषेत व म्रुदु आवाजात त्यांनी श्रोत्यांशी सुसंवाद साधला व त्यांना बोलतेही केले.
व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक पी डी पेशंट हा सुद्धा वेगवेगळा असतो. काही समायिक गोष्टी सोडल्या तर प्रत्येकाची लक्षणे, त्यांना होणारे त्रास हेही वेगवेगळे. त्यांची शारीरिक धारणा वेगवेगळी असते. त्यामुळे साहजिकच त्यांना लागणारी औषधेही वेगवेगळी असतात. प्रत्येकाचे स्वभावही वेगळे असतात. त्यामुळे शुभार्थी व शुभंकर यांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यात चांगला समन्वय असला पाहिजे. तसे झाले तर शुभार्थी व शुभंकर दोघांचे जीवन आनंददायी होण्यात कोणताच अडथळा येऊ शकत नाही. दोघेही आपापल्या आजारांवर व समस्यांवर सहजपणे मात करू शकतील. पीडीमुळे शुभार्थींना नैराश्य आलेले असते त्यातून त्यांना बाहेर काढणे व पुन्हा कोणत्याही कारणांने नैराश्य येऊ न देणे हे शुभांकाराचे आद्य कर्तव्य आहे. त्यात यशस्वी झाल्यावर इतरही सर्व गोष्टी सुकर होतात.
छोटया छोटया चांगल्या कामाबद्दलही एकमेकांनी एकमेकांचे कौतुक करायला हवे. आणखी अनेक चांगल्या गोष्टी करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. या सर्व गोष्टी प्रत्येक वेळी बोलूनच दाखवाव्या लागतात असे नाही. बोलण्याबरोबरच हसणे, कटाक्ष, व इतरही काही हालचालींनी (body language), हावभावांनी त्या व्यक्त करता येतात. कोणी कोणाला दुखवू नये, टाकून बोलू नये. क्वचित कधी तसे घडले व नंतर ते आपल्या लक्षात आले तर त्याबद्दल खेद व्यक्त करावा, गरज वाटल्यास माफीसुद्धा मागावी. त्यामुळे गैरसमज दूर होतात. क्षणिक अबोलाही मोकळा होतो. आपल्या सद्यस्थितीतील क्षमता ओळखून व आपला आवाका लक्षात घेऊनच कार्यक्रमांची आखणी करावी म्हणजे आपण त्यात हमखास यशस्वी होतो हे लक्षात ठेवावे. काम करायला लागणाऱ्या पूर्वीच्या व आत्ताच्या वेळेचे योग्य मूल्यमापन करून कामासाठी पुरेश्या वेळेचे नियोजन करावे.
आपल्या छंदांना पूर्वी वेळ मिळाला नसेल तर पुन्हा त्यात गुंतवून घ्यावे. काही नवीन छंदही लावून घ्यावे उदा. चित्रकला, गाणे, वाद्ये वाजविणे. हे छंद पुन्हा शिकण्यातही खूप आनंद मिळतो. वरील सर्व गोष्टींसाठी त्यांनी आपल्यातीलच अनेक शुभार्थींची उदाहरणे दिली व त्यांना त्याचा कसा फायदा झाला तेही सांगितले. पीडीबरोबर इतरही काही व्याधी असू शकतात. त्याकडे दोघांनीही जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला हव. पथ्यपाणी, औषधे, त्यांच्या वेळा, डोस याच्याकडे विशेषत: शुभांकाराने जास्त लक्ष द्यायला हवे.
सर्व श्रोत्यांना सौ रेवणकरांचे भाषण /मार्गदर्शन खूपच आवडले. अनेक शुभार्थींनी व शुभांकारांनी आपापले विचारही व्यक्त केले

निवेदन
गुरुवार दिनांक १२जुन रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली आहे.
पार्किन्सन्स मित्रमंडळाची विना मोबदला वेबसाईट तयार करणारे श्री अतुल ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत.
श्री.श्रीकांत साने हे  'विडंबन व विनोदी काव्याची मिसळ' हा कार्यक्रम सदर करणार आहेत.
रोजच्या चिंता आणि काळज्या यातून बाहेर काढून मनाला आंनद देणारा रोजच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित असा हा विडंबन व विनोदी गाण्याचा कार्यक्रम असेल.
सहकलाकार- सदानंद भिडे,सौ.मीरा भिडे,सौ.मृणाल साने,मंजिरी साने.
कृपया सर्वांनी उपस्थित राहावे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४.३०वाजता.
वृत्तान्त
पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि १२/६/१४
दिनांक १२ जून रोजी आश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती. नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.सौ.शोभना तीर्थळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले; तसेच मित्रमंडळाची वेबसाईट तयार करणारे श्री अतुल ठाकूर खास मित्रमंडळाला भेट देण्यास आणि  pmmp.anubandh.org या संकेतस्थळाची माहिती व उद्देश सांगण्यासाठी आले होते.त्यांची ओळख करून दिली.
यानंतर 'विडंबन व विनोदी काव्याची मिसळ' या नियोजित कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सौ अंजली  महाजन यांनी कार्यक्रम सादर करणारे श्रीकांत साने,सदानंद भिडे,सौ.मीरा भिडे, सौ मृणाल साने यांची ओळख, काव्यात करून दिली.
सतत औषधोपचार,व्यायाम यांचे डोस घ्यावे लागणार्‍या शुभंकर शुभार्थीना ही मिसळ चांगलीच रुचकर वाटली.नेहमी ऐकल्या जाणार्‍या मराठी,हिंदी गीतांच्या चालीवर गीते होती.हार्मोनियम आणि माईक अशा .अत्यंत कमी साधन सामग्रीत या चौघानीही गीते सादर केली.नावात काय आहे, पतीपत्नीचे सवाल जवाब,साठाव वरीस धोक्याच अस खुलवून सांगता सांगता नातवाच्या मिठीन ते  सुखाच होत हे घेतलेलं वळण,पथ्य,व्यायाम आजार गोळ्या अशा सर्वांच्याच जिव्हाळ्याचे विषय विनोदातून सांगण यामुळे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली.उपस्थितांनी अनेक गाण्याना टाळ्यांनी ठेका दिला.काही गाण्याना वन्समोअरही दिला.अंजली महाजन यांनी विविध विनोदी उखाणे घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली.श्री.सदानंद भिडे यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.
मध्यंतरामध्ये चहापान झाले आणि सुनील मेहेर या केमिस्टनी  सवलतीत घरपोच सर्वप्रकारची  औषधे देण्याच्या आपल्या योजनेची माहिती दिली.
शेवटी श्रोत्यांच्या विनंतीवरून सौ मृणाल साने  यांनी 'रामका गुणगान करिये' हे गीत सुरेल आवाजात गायिले.
'तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या ' हे अशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतावरील विडंबनाचा न आलेल्या शुभार्थीनाही  आंनद घेतायावा यासाठी ते  वृत्तांतामध्ये द्यावे अस अनेकानी आवर्जून सांगितल्याने ते गीत देत आहे.
                          तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या
                            गुंफू गोळ्यांच्या माळा
                           कुठली गोळी किती वेळा
                           लक्षात ठेऊ सार्‍या वेळा / धृ                                         
                        
तुझी पिवळी माझी निळी
गंमत आहे ही सगळी.
लिहून ठेऊया गोळी नि गोळी
नाहीतर होईल घोटाळा./१/

                             तुझी बीपीची अन डायबेटीसची
                             माझी मोठी कॅपसुल कॅल्शियमच                 
                           
                            तुझी जेवणा आधीची माझी नंतरची
                            विसरून गेलो तर भोगा कळा  /२/
बघुनिया सार्‍या गोळ्या
हसतील सगळे खळाखळा
येतील यांच्याही वेळा
तेंव्हा रडतील तेही घळाघळा /३/


                                                  निवेदन 
                         
गुरुवार  दिनांक १०/७/२००१४ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे सभेचे आयोजन केलेहे आहे.
  डॉक्टर रोहिणी पटवर्धन ' वैद्यकीय इच्छापत्र 'या विषयावर व्याख्यान देणार आहेत.कृपया सर्वांनी उपस्थित राहावे व व्याख्यानाचा लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.
               वृत्तांत - पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि. १० -७ - २०१४
                      गुरुवार  दिनांक १०/७/२००१४ रोजी डॉक्टर रोहिणी पटवर्धन यांचे वैद्यकीय इच्छापत्र या विषयावर व्याख्यान झाले.फरासखान्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचे वृत्त ऐकून शुभंकर शुभार्थिच्या उपस्थितीबद्दल शंका निर्माण झाली होती.पण या घटनेचा उपस्थितीवर परिणाम झाला नाही.
प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.रेखा आचार्य या शुभार्थिनी, रोहिणी पटवर्धन यांची ओळख करून दिली.
रोहिणी पटवर्धन परिचय
१८ वर्षे एम.आय.टी.कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून काम करीत आहेत.त्यापूर्वी १५ वर्षे एस.पी.कॉलेजमध्ये कॉमर्स विषयात अध्यापन केले.पत्रकारिता विषयात पदवी मिळवली.टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे जेरंडॉलॉजीमध्ये पदविका केली.दूरदर्शनवरील जाहिरातीचा समाजावर परिणाम या विषयात एम.फिल.तर वृद्धाश्रमांचे व्यवस्थापन या विषयात पीएचडी मिळवली.वाढत्या वयाच्या समस्या या विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून काम केले आहे.हंस,रोहिणी,किर्लोस्कर, स्त्री, मिळून सार्‍याजणी या मासिकांत;लोकसता, केसरी,महाराष्ट्र टाइम्स अशा विविध वृत्तपत्रात लेखन केले आहे.अनेक सामाजिक संस्थांच्या त्या विश्वस्त आहेत.
रोहिणीताईनी सुरुवातीला बदलाला स्वीकारण्याची पार्किन्सन्स मित्रमंडळात जी सामुहिक शक्ती दिसली, त्याबद्दल सामाधान व्यक्त केले. आजाराचा, बदलाचा स्वीकार,.इतरांवर थोडफार अवलंबून राहावं लागल तर त्याबाबत अवघडलेपण वाटू न देण आणि स्वत:ही आवश्यक तितके प्रयत्न करण या गोष्टींच महत्व विविध उदाहरणे देऊन पटवत आजाराशी दोस्ती करा असे सांगितले.आरोग्य सेवेच झालेलं व्यवसायीकरण, आजाराचा वाढता खर्च,वाढती वयोमर्यादा हे लक्षात घेता वैद्यकीय इच्छापत्राचे(Living will )महत्व सांगितले..
शरीर ही आपली संपत्ती असल्याने त्याबाबत काय करावे हा अधिकार आपला आहे तो वापरला पाहिजे आणि जे वाटते ते लिखित स्वरूपात ठेवल्यास पुढच्या पिढीचा शारीरिक मानसिक आर्थिक त्रास वाचतो असा एक विचार प्रवाह आहे. यावर टीका करणारे आणि याला विरोध करणारेही आहेत.
हा विचार भारतात नव्याने रुजत आहे.नॉर्वे स्वीडन,जपान इत्यादी देशात याबाबतचा कायदा आहे. भारतात मात्र तसा नाही.त्यामुळे  रजिस्टर करता येत नाही.परंतु लेखी लिहून त्यावर नोटरी आणि दोघांच्या सह्या घेऊ शकतो यामुळे नातेवाइकांत याबाबत मतभेदाला जागा राहात नाही.पंचाहत्तरी, सहस्त्रचंद्रदर्शन अशा कार्यक्रामात याबद्दल जाहीरपणे सांगावे.असे सुचविले.हा विचार सुरु होण्यापूर्वीच प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी कमला पाध्ये यांनी मेंदू काम करेनासा झाल्यास पुढे कोणतेही उपचार करू नयेत असे फॅमिली डॉक्टरांसमोर सांगितले होते..इतरही अनेक उदाहरणे देत वैद्यकीय इच्छापत्राचे महत्व पटवले.
यानंतर श्रोत्यांनी याबाबत अनेक प्रश्न विचारले. त्याची रोहिणीताईनी समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमास मुद्दाम उपस्थित राहिलेल्या डॉक्टर शशिकांत करंदीकरांनी  अ‍ॅसकॉपनी इछ्यापत्राप्रमाणे इतर अनेक विषयावर वृद्धांसाठी छोटया पुस्तिका केल्या असल्याची माहिती सांगितली.
रोहिणीताईंच्या भाषणानंतर फिजिओथेरेपी मध्ये पदव्युत्तर अभ्यास करणार्‍या केतकी करंदीकर यांनी पार्किन्सन्सवर संगीताद्वारे उपचार या आपल्या अभ्यास विषयासंबंधी माहिती सांगितली आणि प्रयोगासाठी शुभार्थीना मदत करण्याची विनंती केली.
सभेत संवाद पत्रिका काढण्यात येणार असल्याचे आणि ती पोष्टाने घरी पाठवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.चहापानानंतर सभा समाप्त झाल
निवेदन 
जुलै महिन्याची 'संचार' ही संवाद पत्रिका प्रसिद्ध झाली. सर्व शुभार्थीना पोष्टाने पाठविली आहे.याशिवाय वेबसाईट pmmp.anubandh.org वरही पाहू शकता.

  गुरुवार  दिनांक १४- ८ - १४ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली आहे.
 रामचंद्र दसवडकर हे पार्किन्सन्ससाठी अ‍ॅक्युप्रेशरचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.
 स्वमदतगटात सभासदातील  परस्पर संवाद महत्वाचा आहे. अनुभव, विचाराची देवाण घेवाण,बोलून मोकळ होण याची नितांत गरज असते.हे लक्षात घेऊन यावेळच्या सभेत असा संवाद साधण्याची संधी उपलब्ध केली आहे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.
                            वृत्तांत - पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि. १४ - ८ - २०१४
गुरुवार  दिनांक १४- ८ - १४ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल आश्विनी येथे सभा आयोजित केली होती.
सुरुवातीला रामचंद्र करमरकर यांनी देणे समाजाचे या सामाजिक संस्थांचे कार्य समाजासमोर आणणार्‍या आर्टीस्ट्री आयोजित प्रदर्शनाची माहिती सांगितली.१२,१३,१४ सप्टेंबर रोजी होणार्‍या या प्रदर्शनात पार्किन्सन्स मित्रमंडळ सहभागी होणार आहे.
यानंतर  रामचंद्र दसवडकर यांनी  पार्किन्सन्ससाठी अ‍ॅक्युप्रेशरवर  प्रात्यक्षिकासह माहिती  दिली..त्यांनी हात व पाय यावर अ‍ॅक्युप्रेशरचे पॉइंट दाखविणारी आकृती असलेली पत्रके दिली होती त्यामुळे.त्यांचे विवेचन समजणे सोपे गेले.
यानंतर स्त्रिया व पुरुष यांचे परस्पर संवादासाठी वेगवेगळे गट करण्यात आले.काही शुभार्थींच्या मागणीवरून  प्रयोग स्वरूपात अशी चर्चा घडवून  आणली होती.सतरा स्त्रिया आणि पुरुष साधारणपणे स्त्रियांच्या दुप्पट होते. एरवी समुहात बिचकणार्‍या स्त्रिया मोकळेपणाने बोलत होत्या.अंजली महाजन यांना १९ वर्षांच्या मुलीच निधन आणि पतीला लहान वयात झालेला पीडी हे दु:ख पचवून परिस्थिती  हळुवारपणे हाताळायला  लागली.सुधीर वकील यांना ३६व्या वर्षीच पीडी झाला पीडी होऊन २५ वर्षे झाली.बँकेत नोकरी करणार्‍या,मुळात शिस्तप्रिय आणि सकारात्मक विचार करणार्‍या वकील याना सौ वकील यांची सुयोग्य साथ मिळाली आणि  पीडी सुसह्य झाला.ज्योती दळवी या शुभार्थी काही दिवसापूर्वी सभेलाही येऊ शकत नव्हत्या.बोलण्यात दोष होता पण स्तोत्रे म्हणणे,पटवर्धन यांच्या स्मरणिकेतील लेखातील व्यायाम,बर्वे यांच्या पुस्तकातील व्यायाम सकारात्मक विचार,मनाचे सामर्थ्य याद्वारे सर्वावर मात केली. न्युरॉलॉजिस्टनी त्याना तुम्ही पीडी पेशंट वाटत नाहीच, पण नुसत्या पेशंटही वाटत नाही'अशी शाबासकी दिली.यावर सर्व उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.वसुधा बर्वे प्रथम श्रेणीत संगीत परीक्षा उत्तीर्ण झाल्या यावरही अशीच प्रतिक्रिया होती.शुभार्थी सौ. दळवी आणि सौ.ताम्हणकर या 'संचार' पत्रिकेत कोडे दिल्याने खुश होत्या त्यांनी ते सोडवून आणले होते.शुभार्थी अश्विनी दोडवाड,प्रज्ञा जोशी याना नृत्याचा उपयोग झाला.सौ सिधये यांनी आयुर्वेदिक औषधामुळे सिधये यांचे तोल जाणे कमी झाले,काठी घेऊन चालण बंद झाल,अनैच्छिक हालचाली बंद झाल्या,इंग्लंड प्रवास सुखनैव झाला,सिंडोपाच्या पाच ऐवजी दोन गोळ्या झाल्या असे सांगितले. सौ शेंडे यांनी भास होण्याच्या समस्येसाठी ती वेळीच ओळखून न्युरॉलॉजिस्टचा सल्ला घेण्याची गरज सांगितली,सौ.ढमढेरे यांनी त्यांच्या पतिना खुर्चीतून उठताना होणार्‍या त्रासावर शोधलेला उपाय सांगितला,सौ कुलकर्णी यांनी बोलण्याच्या समस्येवर करीत असलेल्या उपायाची माहिती सांगितली इतर स्त्रियांनीही चर्चेत सहभाग घेतला. नव्याने सहभागी झालेल्या एका शुभार्थीना दु;ख अनावर झाले.इतरांनी त्यांचे सांत्वन केले.अनेकाना आपलीही अशीच अवस्था होती याची आठवण झाली.
                           पुरुष विभागातील चर्चेच्या सुरुवातीला श्री. शरच्चंद्र पटवर्धन यांनी २/३ सकारात्मक विचार देणारे मार्गदर्शनपर  लेख वाचून दाखविले. त्यानंतर श्री रामचंद्र करमरकर यांनी अशा प्रकारच्या सभा घेण्यामागचा उद्देश पुन्हा एकदा स्पष्ट केला.शुभंकर श्री  नलिन जोशी यांनी  अध्यात्माच्या मार्गे विकारावर कशी मात करता येईल यावर विचार मांडले .वकील यांचे व्याही  श्री. राम शास्त्री यांनी शुभार्थी श्री. सुधीर वकील यांचे तोल जाणे  फार वाढले आहे व त्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढविणे फार जरुरीचे असल्याचे सांगितले. शुभार्थी श्री काळे यांचे मते ३० % औषधांचा  व ७०% व्यायामाचा एकत्रित परिणाम फार चांगला होतो. शुभार्थी श्री काशीकर यांनी व्यायामावर जास्त भर दिला. शुभार्थी श्री दिलीप कुलकर्णी यांना प्राणायाम फार महत्वाचा वाटतो, तसेच डान्स थेरपीचा त्यांना फार उपयोग झाला. शुभांकरा बरोबरचा सुसंवादही त्यांना लाभला आहे त्याचा सर्वाधिक फायदा होतो असे त्यांना वाटते. शुभार्थी श्री केशवराव महाजन यांना सर्वात महत्वाचा वाटतो तो शुभार्थी व शुभंकर यांच्यातील सुसंवाद. तोच त्यांच्या पर्किन्सन्स वर मात करण्याचा उत्तम उपाय आहे. शुभार्थी श्री घोलप यांना समाजात मिसळणे आणि मंडळाच्या सभांना हजर राहणे याचा खूपच फायदा झाला. सर्वांनी चर्चेत सहभाग घेतला.
एकंदर चर्चेवरून असा निष्कर्ष काढता येईल शुभार्थी व शुभंकर यांच्यातील सुसंवाद हा पार्किन्सन्स वर मात करण्यावर एक उत्तम उपाय आहे "
अश्विनी दोडवाड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चहाचा खर्च केला.
निवेदन 
              गुरुवार  दिनांक११/८ /२००१४ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे सभेचे आयोजन केलेहे आहे.
            डॉक्टर प्रसाद होनप (एमडी फिजिशियन) यांचे  'ताणतणावांचे व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान   होणार आहे.सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.

                                                         वृत्तांत 
                       सप्टेंबरचा दुसरा आठवडा भरगच्च कार्यक्रमाचा होता. ९ तारखेला डी.वाय पाटील कॉलेजच्या केतकी करंदीकर यांच्या संगीतावर आधरित उपचार या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रयोगात मित्रमंडळाचे शुभार्थी सहभागी झाले.११ तारखेला डॉक्टर प्रसाद होनप यांचे 'ताणतणावांचे व्यवस्थापन' या विषयावर  व्याख्यान,दिनांक १२ते १४ हे तीन दिवस 'देणे समाजाचे' या सामाजिक संस्थांच्या प्रदर्शनातील सहभाग आणि दिनांक १४ ऋषिकेश पवार यांच्या ' Dance For Parkinson's Disease' फिल्मचे अनावरण.असे विविध कार्यक्रम होते.
                                 पर्किन्सन्स मित्रमंडळ सभा ११ सप्टेंबर २०१४ 
                                  गुरुवार ११ सप्टेंबर रोजी अश्विनी हॉटेल येथे डॉक्टर प्रसाद होनप (एमडी फिजिशियन) यांचे  'ताणतणावांचे व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान झाले. आमच्यापुर्वीच डॉक्टर,त्यांच्या पत्नी दीपा होनप,आणि सहकारी हजर होते.LCD चा वापर करावयाचा असल्याने यंत्रणा बसवण्यात, योग्य चालते किंवा नाही हे तपासण्यात वेळ जाऊ नये याकरता ही खबरदारी होती.अश्विनी हॉटेलच्या सभागृहात दोन खुर्च्यांवर पार्टीशन ठेऊन आम्ही पडदा बनवतो.तरुण मंडळी नसल्याने हे करताना आमची तारांबळ उडते पण डॉक्टर,त्यांच्या पत्नी आणि सहकारी यांनी भराभर सूत्रे हातात घेतली आणि खुर्च्या मांडण्यापासून सर्व कामात मदत केली.ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान देण्यापूर्वीच त्यांनी आमचा ताण हलका केला.त्यांच्या पत्नी दीपा यांनी यानंतरही मदत करण्याचे आश्वासन दिले.
 प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.शोभना तीर्थळी यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.
डॉक्टर प्रसाद होनप यांचा परिचय
                         एमडी जनरल मेडिसिन असलेले डॉक्टर प्रसाद होनप १९८१ पासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.कन्सल्टंन्सिबरोबर, प्राध्यापक, अ‍ॅडमिनीस्ट्रेटर,डीबीएन, गाईड, सॉफ्ट्वेअरतज्ञ, व्याख्याते अशा विविध भूमिका निभावत आहेत.१९८५ मध्ये सूर्या हॉस्पिटलची स्थापना.२००६ पर्यंत तेथे  मॅनेजींग डायरेक्टर्, चिफ फिजिशियन, .चिफ ऑफ  ICU, या भुमिका निभावल्या.Smart Doc Clinic Management या  सॉफ्ट्वेअरची निर्मिती केली..Smart Hospital Management System Lenus Lab Pvt Lt Software ही कंपनी सुरु केली.'स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने देतात.
                      डॉक्टरनी व्याख्यानात सुरुवातीला ताण म्हणजे काय आणि ताण निर्माण होण्याची कारणे सांगितली.मेंदूच्या संदेशवहनाच्या रासायनिक यंत्रणेत काही संदेशवाहक आनंद निर्माण करणारे तर काही त्या विरोधी असतात.या दोन्हीत समतोल असतो तेंव्हा ताणाची अवस्था येत नाही.पार्किन्सन्सच्या बाबतीत ज्या डोपामीनच्या कमतरतेमुळे पार्किन्सन्स होतो ते डोपामीन आनंद निर्माण करणारे असते.ते कमी झाल्यामुळे मुळातच पीडी पेशंट नैराश्यात जाण्याची शक्यता जास्त असते.
                   यानंतर ताण येतो तेंव्हा शरीरात काय होते हे विस्ताराने सांगितले.आदिम माणसापासून संकटात
सामना करण्यासाठी 'लढा किंवा पळा' ही यंत्रणा शरीरात कार्यरत असते.लाखो वर्षाच्या उत्क्रांतीतून ती विकसित झाली आणि नैसर्गिक प्रवृत्ती बनली.यापासून सुटका नाही.लढा किंवा पळा यापैकी कोणतीही क्रिया करायची तर स्नायुना अधिक उर्जा लागते.हे काम मेंदू तत्परतेने करतो.रक्ताची तातडीची गरज जेथे नाही तेथे रक्त न पाठवता स्नायुंकडे पाठवण्याचा आदेश देतो.स्नायुकडे वेगाने रक्त पाठविण्यासाठी हृदयाचे ठोके वाढतात,श्वासोच्छवास जलद होतो,कमी रक्त गेलेल्या अवयवावर परिणाम होऊन पोटात खड्डा पडतो, कातडी थंड होते.ग्लुकोजची गरज वाढविण्यासाठी लीव्हरमधील अतिरिक्त साठा मागविला जातो.रक्तस्त्राव होऊ शकतो म्हणून रक्त गोठविण्याची यंत्रणा कार्यरत होते.ताण सहन करण्यासाठी स्नायू ताठ होतात.
                 असा ताण सहन करण्याची यंत्रणा प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते.ती अनुवंशिकता,शैक्ष्निक प्रगल्भता,संस्कृती,सामाजिक पर्यावरण अशा अनेक घटकांवर अवलंबून असते.काहीना पुनःपुन्हा ताणाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते.मग ताण सहन करण्याची क्षमता संपते.परिणामी घाम येणे,छातीत धडधड,छातीत दुखणे,डोके दुखणे,निद्रानाश,क्रम्प्स,पाठीत दुखणे, एकाग्रता कमी होणे,निर्णयक्षमता कमी होणे,हुरहूर,नैराश्य अशी अनेक शारीरिक मानसिक लक्षणे दिसू लागतात.नखे खाणे, धुम्रपान,मद्यपान,अतिरेकी खाणे असे वागण्यात बदल होतात.ब्लडप्रेशर,कोलायटीस,अल्सर,अ‍ॅसिडिटी अशा मनोशारीरिक आजाराला सुरुवात होते.
                 ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी ताणाचे नियोजन कसे करायचे हे डॉक्टरांनी अत्यंत सोप्या भाषेत,व्यवहारातील विविध उदाहरणे देत सांगितले.वेळेचे नियोजन सर्वात महत्वाचे.प्रत्येक स्नायुना काम देणारे व्यायाम,विविध कामात गुंतवणे,विनोदी सिनेमा पाहणे,हास्ययोग इत्यादीचे महत्व सांगितले.या सर्वामुळे शरीराने निर्माण केलेली अफू म्हणता येईल असे इंडोर्फिन तयार होते.यामुळे प्रतिकार शक्ती वाढणे,हृदयाचे ठोके नीट होणे,आणि ताणाला पळवून लावणे या गोष्टी शक्य होतात.
                 पार्किन्सन्सचा विचार करता छोट्याछोट्या आजारातून पीडी वाढतो.ताणाला दूर ठेवल्यास छोटे आजार दूर ठेवणे आणि पिडीवर नियंत्रण ठेवणे साधू शकते.
                  या सर्वाबरोबर ध्यानाचे विविध सोपे सहज करता येण्याजोगे प्रकार सांगितले.
                  श्रोत्यांच्या विचारलेल्या अनेक प्रश्नाना उत्तरे दिली.

निवेदन

निवेदन

गुरुवार दिनांक ९ / १० / २००१४ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे सभेचे आयोजन केले आहे.
यावेळी श्री निखिल वालकीकर Consultant Psychologist, यांचे व्याख्यान. होणार आहे
संचार या संवाद पत्रिकेत जाहीर केलेल्या कोड्याचा निकालही जाहीर केला जाणार आहे.
सर्वांनी उपस्थित राहावे.

स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.

वृत्तान्त
पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि ९ / १० / १४

                     गुरुवार  दिनांक ९- १० - १४ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल आश्विनी येथे सभा आयोजित केली होती.
                     निखील वाळकीकर आणि अर्चना राठोड यांचे 'म मनाचा' या विषयावर व्याख्यान होते हे दोघेही मानसशास्त्रज्ञ आहेत.विविध मानसिक समस्यांवर समुपदेशन,व्याख्याने आणि कार्यशाळा घेतात..
प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.श्री.रामचंद्र करमरकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.
सुरुवातीला निखील वाळकीकर यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO ) अहवालानुसार २०२० पर्यंत  नैराश्य हे आजारात प्रथम क्रमांकावर असणार आहे.त्यामुळे याविषयी जागृती करण्याची गरज प्रतिपादन केली आहे असे सांगितले.
                     अशी परिस्थिती येण्याचे कारण वैश्विकरणामुळे फायदे झाले तसे तोटेही झाले.बदलती जीवन शैली.व्यस्तता,एकमेकातील हरवलेला संवाद यातून सर्व वयोगटात ताणताणाव वाढले.यातून विविध मनोकायिक आजारही वाढले.हे स्पष्ट करण्यासाठी. निखील वाळकीकर आणि अर्चना राठोड यांनी रोलप्लेचा आधारे घेतला.
                      विचार, भावना, स्मृती यात सकारात्मकता ठेवली,तारतम्य आणि विवेक बाळगला तर मनाचे आरोग्य चांगले राहु शकते.हे विविध उदाहरणे देऊन कथन केले.मन फक्त निरोगी असून चालत नाही तर ते सुदृढही हवे.यासाठी विचाराची लवचिकता,अनिश्चीततेचा स्वीकार,क्रिएटिव्ह राहण गरजेच आहे
                     अर्चना राठोड यांनी पार्किन्सन्समुळे होऊ शकणार्‍या मनाच्या आजारांची माहिती दिली.या आजाराचा भाग म्हणून नैराश्य येत त्याला वेळीच रोखायला हव. पीडीग्रस्त आणि केअरटेकर दोघांच्याही मनावर ताण असतो.आजारी व्यक्तीला आजारामुळे आणि आपल इतराना कराव लागत, याचा तर केअरटेकरला त्याच्या कामाच्या यादीत वाढ होते,आजार प्रदीर्घ असला तर वैतागात वाढ आणि आपल्या प्रेमाच्या माणसाबद्दल अस वाटण याचही दु:ख होत.आजारी व्यक्तीला औषधोपाचाराबरोबर कुटुंबीयांचा आधार महत्वाचा ठरतो आणि दुखणे मानसिक आजाराकडे जाऊ लागले तर मानसोपचार  तज्ज्ञांची मदत घेणे,स्वमदतगट,कालोपचारासारख्या गोष्टींची मदत घेणे गरजेचे.केअर टेकरनी स्वत:साठी अवकाश देणे स्वत:चे काही छंद जोपासणे, गरजेचे.
                    सदस्यांचे वाढदिवस अंजली महाजन यांनी तयार केलेले भेटकार्ड आणि कविता  देऊन  साजरे केले. सं'चार' मध्ये दिलेल्या प्रश्नमंजुषेचा निकाल जाहीर करण्यात आला.
                सौ.पद्मजा ताम्हणकर आणि ज्योती दळवी याना  प्रथम क्रमांकाचे परितोषिक मिळाले.श्री.शरच्चंद्र पटवर्धन यांच्या हस्ते ते देण्यात आले.ज्योती दळवी प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकल्या नाहीत.
                 वृंदा बिवलकर यांनी रामचंद्र बिवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त चहा व.स्वत: करून आणलेल्या
वड्या दिल्या.

     निवेदन
गुरुवार १३ नोव्हेंबर १४ रोजी आश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली आहे.
चैतन्य हास्य परिवारचे श्री विठ्ठल काटे आणि सुमन काटे या हास्य योगावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.
 विशेष सूचना
गुरुवार दि.११ डिसेंबरला 'सन वर्ल्ड,खानापूर येथे मित्रमंडळाची सहल जाणार आहे.सं'चार ' या संवाद पत्रिकेत याबाबतचा तपशील देण्यात आला आहे.सहलीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी सभेच्या ठिकाणी प्रत्येकी २०० रुपये भरून आपले नाव नोंदवावे.
वृत्तान्त
पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि १३ / ११ / १४
   गुरुवार  दिनांक१३- ११ - १४ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल आश्विनी येथे सभा आयोजित केली होती.नवचैतन्य हास्य परिवारचे श्री विठ्ठल काटे आणि सुमन काटे यांचे  हास्य योगावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले.
                       मित्रमंडळात व्याख्यानासाठी येणार्‍या अनेकांनी मानसिक स्वास्थ्यासाठी हास्ययोगाचे महत्व सांगितले होते.त्यामुळे आवर्जून हे व्याख्यान आयोजित केले होते.काटे यानी पुण्यातील विविध भागातील १२० बागांमध्ये नवचैतन्य हास्य परिवारातर्फे हास्यक्लब चालू केले.याचा जवळ जवळ १२००० व्यक्ती फायदा घेतात.काटेनी प्रथम हास्याची गरज प्रतिपादन केली.बदलत्या जीवन पद्धतीत व्यायाम कमी आणि खाणे तेही शरीराला अपायकारक  खाणे वाढले.खाण्याच्या वेळा अनियमित झाल्या.मधुमेह,उच्च रक्तदाब हृदयविकार असे आजार लहान वयातच गाठू लागले.यासाठी नियमित व्यायाम हे उत्तम औषध आहे.व्यायामामुळे शरीराला फायदा होतो मनाच्या आरोग्यासाठी हास्य हे उत्तम औषध आहे.
                      भारतात डॉक्टर कटारिया यांनी पहिला हास्य क्लब मुंबईमध्ये सुरु केला.हे लोण सर्व भारतभर पसरले.आता भारतात जवळ जवळ २०००० हास्य क्लब कार्यरत आहेत.
खळखळून हसण्याचे अनेक फायदे आहेत.त्यामुळे ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते,मूड बदलतो, नकारात्मक विचाराने बिघडलेली पचनशक्ती सुधारते, रक्तप्रवाह सुधारतो, आनंद निर्माण करणार्‍या इंडोर्फिन या रसायनाची निर्मिती होते.
                     काटेनी यानंतर हास्यक्लबमध्ये येणार्‍या विविध लोकाना कसे फायदे झाले ते सांगितले. यानंतर  प्रात्यक्षिकाना सुरुवात झाली.वेलकम हास्य, मिरची हास्य,मोबाईल हास्य, ट्रॅक्टर हास्य,पतंग हास्य असे हास्याचे हास्याबरोबर व्यायाम देणारे विविध प्रकार झाले. सर्व शुभंकर शुभार्थिनी यात सहभाग घेतला.हास्याचा आनंद लुटला.सभेमध्ये नेहमी त्या महिन्यातील ज्या शुभार्थींचे वाढदिवस आहेत ते साजरे केले जातात.यावेळी काटे आणि सुमनताईनी हास्याचा फुगा फोडून आणि हस्याचाच केक कापून मजा आणली.हे सर्व हास्यप्रकार बसून चालले होते सुमनताईनी टांग टींग टिंगा या मोरूची मावशीमधी गाण्यावर  ठेका धरला आणि अनेकांनी उठून साथ दिली.आजार आणि  वय विसरून सर्वांनी हास्याचा मनमुराद आनंद लुटला.
                  शेवटी सर्वाना संचारचे अंक देण्यात आले ११ नोव्हेंबरला जाणार्‍या सहलीची माहिती आणि सुचना सांगून सभेची सांगता झाली.
गुरुवार दिनांक ११ डिसेंबर  - खानापूर सहल वृत्तांत

                            गुरुवार दि.११ डिसेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल खडकवासला धरणाजवळ डोणजे पानशेत मार्गावरील खानापूर येथील 'सन वर्ल्ड फॉर सिनियर्स' येथे गेली होती.२२ शुभंकर आणि २२ शुभार्थी सहभागी झाले होते.सहा शुभार्थी कोणतीही सोबत न घेता एकटे आले होते.सहा शुभंकर घरात पीडी पेशंट नसताना सहकार्यासाठी सुहृद म्हणून आले होते.
                           दोन वाजता  अश्विनी हॉटेलपासून सहल निघणार होती.दुपारी दिडपासूनच मंडळी जमायला सुरुवात झाली.सर्वांच्या नावाचे बॅच तयार करण्याचे आणि ते सर्वाना देण्याचे काम दीपा होनप करत होत्या अंजली महाजन हजेरी घेत होत्या.शोभना तीर्थळी अजून न आलेले कुठवर पोचलेत हे पहात होत्या.करमरकरांची नेहमीप्रमाणे विविध आघाड्यांवर लगबग चालली होती.सर्व गडबडीत मोबाईल  घरीच विसरले होते.त्यांची मुलगी तो द्यायला आली तर आम्ही बसमधून तिलाच हायजॅक केले.आशा रेवणकर आपले कॉलेजमधील व्याख्यान संपऊन,तर शैलजा कुलकर्णी ऑफिसमधून हाप डे घेऊन थेट आल्या होत्या.सर्व मंडळी आणि बसही वेळेत आली.जसजशी येतील तशी मंडळी बसमध्ये बसत होती.नेहमी बसमध्ये पुढे बसण्यावरून होणारी भांडणे आमच्याकडे कधीच नसतात.बस वेळेत निघाली.ओरिगामीसाठी श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी कागद आणले होते ते सर्वाना देण्यात आले.गाणी ,कोडी अशा गमती करत ३५ किलोमीटर कधी पार केले समजलेच नाही.
 निसर्गाच्या कुशीत वसलेली,सन वर्ल्डची बैठी सुबक देखणी वास्तू स्वागतासाठी तयार होती.गेल्या गेल्या थंड पेयांनी स्वागत झाले.मंडळी स्थानापान्न झाली.डिसेंबर महिन्यातील वाढदिवस असणार्‍या वसुधा बर्वे,शरद सराफ आणि श्री. घुमटकर यांचा हास्याचे फुगे फोडून,हास्याचाच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.अंजलीने त्यांच्यासाठी भेटकार्डे करून आणली होती.सर्वाना सहभागी होता येतील असे विविध बैठे खेळ घेण्यात आले.लगेचच नंबर जाहीर करून बक्षिसे देण्यात आली.
इडली,डोसा,वडा,कॉफी खेळात
 प्रथम क्रमांक  -  शैलजा कुलकर्णी
  द्वितीय क्रमांक -  विजया दिवाणे
 चॉइस बाय मेजॉरीटी हा खेळ शुभार्थी मृत्युंजय हिरेमठ यांनी तयार करून आणला होता.यात
  प्रथम क्रमांक  - अविनाश पानसे
द्वितीय क्रमांक - स्मिता सिधये
ओरिगामी मध्ये
शैला कुलकर्णी - चौफुला
निशिकांत जोशी- विमान
विनया मोडक - शिडाची होडी.
चंद्रकांत दिवाणे - राजहंस
विजय शाळीग्राम - चांदणी
अशा सहा जणांच्या कृती निवडण्यात आल्या.
                     यानंतर' तू बुद्धी दे तू तेज दे ' या शोभना तीर्थळी आणि विनया मोडक यांनी म्हटलेल्या प्रार्थनेने करमणुकीच्या कार्यक्रमाना सुरुवात झाली.केशव महाजन यांनी 'पाकीजा' चित्रपटातील राजकुमारचा आणि 'सौदागर' चित्रपटातील  दिलीपकुमार आणि राजकुमारचे संवाद,'चलरी सजणी' हे गाणे म्हणून टाळ्या मिळवल्या. वसुधा बर्वे यांनी 'खेळ मांडीयेला वाळवंटी घाई'  हा अभंग म्हटला त्या नुकत्याच .संगीताची दुसरी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या म्हणून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.नेहमी वैचारिक आणि माहितीपूर्ण लिहिणार्‍या शेखर बर्वे यांनी स्वरचित कविता म्हणून सर्वाना चकित केले.वसू देसाई यांनी 'प्रत्येक घराला एक दार असत' ही आईच  महात्म्य वर्णन करणारी कविता सादर केली.पद्मजा ताम्हणकर यांनी चारोळ्या म्हटल्या.श्री ताम्हणकरांनी यशवंत देव यानी लिहिलेले विडंबन काव्य म्हटले,मोरेश्वर मोडक यांनीही 'सांग सांग भोलानाथ बायको सुधारेल काय?' आणि पुण्याच्या बारगळलेल्या मेट्रोवरील स्वरचित विडंबन गीते  सादर केली.सौ सराफ यांनी' ईश्वर तुम्हारे साथ हो तो डरनेकी क्या बात है' हे गीत म्हणत आशावाद निर्माण केला.अंजली महाजन यांनी' रुसेन मी भांडेन मी तरी पुन्हा जेवेन मी' हे स्वरचित गीत सादर करत वातावरण थोडे हलके केले.
                     कार्यक्रमाबरोबर बटाटेवडे, ओल्या नारळाच्या करंज्या,चहा असा  अल्पोपाहाराचाही सर्वांनी आस्वाद घेतला.व्यवस्थेमध्ये कुठे कमतरता नाही ना हे पाहण्यासाठी सन वर्ल्डच्या संचालिका रोहिणी पटवर्धन स्वत: जातीने आल्या व उपस्थितांशी संवाद साधला.उगवता सूर्य, कोवळ्या उनातील डोंगर,रात्रीचे पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब अशी निसर्गाची विविध रूपे पाहण्यासाठी मुक्कामाला येण्याचे आमंत्रण दिले.अनेकांनी तशी तयारीही दाखवली.
                     परिसरातला निसर्ग आता सर्वाना खुणावत होता.सातआठ पायर्‍या वर चढून गेल्यावर शंकर हनुमान आणि साईबाबाचे देऊळ आहे.एकदोन शुभार्थी वगळता सर्वजण वर गेले.वरून खडकवासला धरणाच्या  बॅकवॉटरचे विहंगम दृश्य दिसते.संध्याकाळ झाली होती. संथ पाण्यात डोंगरांचे प्रतिबिब दिसत होते.सूर्यदेव  अस्ताला चालले  होते.कोणाचेही पाय हलत नव्हते.पण बुडणारा सूर्याचा लाल गोळा सांगत होता मी चाललो.अंधार होईल तुम्हीही जा सुखरूप. पुन्हा येण्यासाठी.
                     बस आता परतीच्या मार्गाला लागली.सात वाजता अश्विनी हॉटेलपाशी पोचली.सहलीचा थोडा थकवा असला तरी मन ताजीतवानी झाली होती.पुढील काही दिवसांसाठी उर्जा मिळाली.

       
निवेदन

गुरुवार दिनांक ८ / १ / २००१५ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे सभेचे आयोजन केले आहे.
.नेहमीप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात तिळगुळ समारंभाने होणार आहे.
'Dance for Parkinson' ही फिल्म दाखविली जाणार आहे.याचबरोबर अमेरिकेच्या सपोर्ट ग्रुपनी तयार केलेल्या व्यायामाच्या सीडीजही दाखविल्या जाणार आहेत.सर्वांनी उपस्थित राहावे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.



वृत्तान्त
पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि ८/ १ / १५
                गुरुवार  दिनांक ८- १ - १५ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल आश्विनी येथे सभा आयोजित केली होती. नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहवर्धक होती.६१ शुभंकर आणि शुभार्थी उपस्थित होते अंथरूण ग्रस्त असलेले, काही दिवसापूर्वी आयसीयूमध्ये असलेले अनिल कुलकर्णी,व्हिलचेअरवरआले होते पुढच्या सभेला व्हिलचेअरशिवाय येण्याची उमेद घेऊन आले होते. दोन  महिन्यापूर्वी आयसीयूमध्ये असलेली प्रज्ञा जोशी एकटीच कोणाच्या मदतीशिवाय आली होती.नुकतेच आजारपणातून उठलेले राजीव ढमढेरे आले होते.बेळगावहून  श्री व सौ.नाडकर्णी,नाशिकहून श्री व सौ. पेठे आले होते.नवीन वर्षाची सुरुवात नव्या उमेदीने होत होती.
                 यावेळी ' डान्स फॉर पार्किन्सन्स ' आणि अमेरिकेच्या सपोर्ट ग्रुपनी तयार केलेल्या व्यायामाची सीडी दाखवायाची होती.याची तांत्रिक जुळवाजुळव होईपर्यंत सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.अंजली महाजन यांनी.मित्रमंडळाला 'समिधा' हा काविता संग्रह भेट दिला १५ कवींच्या कविता असलेल्या या संग्रहात, अंजलीच्या १० कविता आहेत.श्री करमरकर यांनी यातील अंजली यांची आईवरील कविता वाचून दाखवली,शुभार्थी विजय शाळीग्राम यांनी ते मशीनवर कागदी द्रोण तयार करतात त्याबद्दल माहिती सांगितली.हे काम ते पैसे मिळवण्यासाठी नाही तर कार्यरत राहण्यासाठी करतात.यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि पार्किन्सन्सचा विसर पडतो.असे त्याना वाटते.
                     तांत्रिक जुळवाजुळव झाल्यावर प्रथम ' डान्स फॉर पार्किन्सन्स ' ही फिल्म दाखविण्यात आली.श्री रामचंद्र करमरकर यांनी नृयोपाचार प्रयोगाची पार्श्वभूमी सांगितली.Hrishikesh Centre of Contemporary Dance तर्फे २००८ मध्ये पार्किन्सनस साठी नृत्योपाचाराची सुरुवात झाली.प्रथम संचेती हॉस्पिटलच्या सहयोगाने नंतर शुभार्थी श्री जोग यांच्या घरी मोफत  नृत्य वर्ग सुरु झाला तो आजतागायत सुरु आहे.हृषीकेशच्या या अनुभवाचे फलित म्हणजे तपन पंडित यांनी तयार केलेली ही फिल्म.यात सहभागींचे आणि हृषीकेशचे अनुभव, डॉक्टर पराग संचेती यांचे याबाबतचे मत.आणि नृत्य प्रत्यक्षिक यांचा समावेश आहे.फिल्म शुभार्थीना प्रेरणा देणारी आणि त्याना आशेचा किरण दाखवणारी होती.यानंतर या उपक्रमात प्रथमपासून सहभागी असणार्‍या विलास जोशी आणि प्रज्ञा जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नृत्योपाचाराबद्दलचे आपले अनुभव सांगितले.

                    यानंतर व्यायामाची सिडी दाखविण्यात आली.पार्किन्सनन्ससाठी उपयुक्त असे बोलणे तसेच  स्नायू, सांधे यांच्या हालचाली असणारे विविध व्यायाम प्रकार यात होते. या सिडीबरोबर उपस्थितानीही व्यायाम केला.
                    सर्वाना तिळगुळ देण्यात आला.श्री. काशीकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वाना तीळाची वडी व  अंबावडी वाटली.चहापानानन्तर समारंभाची सांगता झाली.
   निवेदन 
पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे दर महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारी सभा आयोजित केली जाते. फेब्रुवारी महिन्यातील सभा मात्र गुरुवार ऐवजी  रविवार दिनांक १५ जानेवारीला होणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.
यादिवशी डॉक्टर माधवी साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे'
'.पार्किन्सन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वसाधारण तब्येतीची (General Health )घ्यावयाची  काळजी'याबाबत त्या मार्गदर्शन करणार आहेत.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.
रविवार १५/२/१५ च्या सभेचा वृत्तांत
                  रविवार १५ फेब्रुवारीला अश्विनी लॉज येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा झाली.डॉक्टर माधवी साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.' पार्किन्सन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वसाधारण तब्येतीची (General Health )घ्यावयाची काळजी' असा विषय होता..भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच.मुळे उपस्थितीबद्दल शंका वाटत होती.नेहमीपेक्षा कमी उपस्थिती असली तरी ३०/३५ जण आले होते.
                 सुरुवातीला  मोरेश्वर काशीकर यांनी सर्वाना ओंकार व प्रार्थना सांगितली. यानंतर शोभना तीर्थळी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.
                 डॉक्टर माधवी साळुंखे यांनी व्याख्यान दिले म्हणण्यापेक्षा श्रोत्यांच्या प्रत्येक शंकेच निरसन करत सोपी उदाहरणे देत अत्यंत सहज सोप्या शैलीत  संवाद साधला असच म्हणाव लागेल.एक तासापेक्षा जास्त वेळ बसू न शकणारे शुभार्थी सलग दोन तास संवादात सहभागी झाले.मध्यंतरी चहा आला पण संवाद चालूच होता. सर्वांनी एकमुखाने माधवी साळुंखे याना पुन्हा येण्याच निमंत्रण दिल.
                सर्दी,जुलाब, अ‍ॅसिडीटी असे छोटे आजार, रक्तदाब मधुमेह सारखे आजार आणि कॅन्सर सारखे जीवघेणे आजार, छोट्यामोठ्या सर्जरी,अपघात अशा विविध पैलूवर श्रोत्यांच्या प्रश्नानुसार चर्चा रंगली.
             आजाराच्या बाबत आजाराची शुभंकर आणि शुभार्थी यांनी केलेली पार्किन्सन्सची स्वीकृती ही मुलभूत बाब आहे.मग इतर आजार छोटे वाटतात.सर्दी जुलाबासारख्या छोट्या आजारातही मानसिक अस्थैर्य निर्माण होते ते  पार्किन्सन्स वाढायला कारणीभूत होऊ शकते.त्यामुळे आजार साधा समजून दुर्लक्ष न करता लक्षणे दिसू लागल्यावर लगेच उपचार सुरु करावे.
              शरीर ही एक व्यवस्था असते.पचनसंस्था,उत्सर्जन्संस्था,श्वसनसंस्था अशा विविध यंत्रणाद्वारे शरीराचे व्यवहार चालतात.एकीत बिघाड झाला तरी इतर  यंत्रणावर लहान मोठे परिणाम होतात .पार्किन्सन्समुळे एक यंत्रणेतला बिघाड पूर्ण दुरुस्त होण्यातला नसतो.इतर व्यवस्था बिघडल्यास पार्किन्सन्स आणखी वाढू शकतो.पार्किन्सन्सला नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर यंत्रणाकडे वेळच्यावेळी लक्ष पुरवणे महत्वाचे थोडीफार  लक्षणे दिसू लागताच उपचाराबरोबर योग्य आहार,शरीराला आराम देण या बाबी महत्वाच्या ठरतात.येथेही आजाराला समजून घेऊन त्याचा स्वीकार गरजेचा असतो,मानसिकता संभाळणे महत्वाचे ठरते.यामुळे पार्किन्सन्सला वाढू न देता या छोट्या मोठ्या आजारांचा आजारांचा सामना करता येतो.
प्राणी पाळीव बनवलं की ऐकतो.पण चेन मात्र आपल्या हातात हवी.आजाराबाबतही असाच दृष्टीकोन हवा.व्याख्यानाच्या शेवटी माधवीताईंनी योग्य आहार,पाणी,स्वस्थ झोप,ऑक्सिजन,तणावमुक्त राहाण या पंचसूत्रीचा स्वीकार करण्यास सांगितला.
जीवनात शांती, आनंद आणि समाधान आणण्यासाठी  कस जगायचं  हे शुभार्थी आणि शुभंकरांच्या मनात बिंबवण्याचे काम माधवी ताईंशी झालेल्या संवादाने उत्तम पार पाडले.
माधवी साळुंखे यांचा परिचय.
माधवीताईंनी MGM Medical college सोलापूर येथून एम.बी.बी.एस.ही पदवी मिळवली.
कौन्सिलिंग आणि सायकोथेरपीमध्ये एम,एस. केल.
जोशी हॉस्पिटल येथे काही काळ काम,स्वतंत्र प्रॅक्टीसही केली.
R.E.B.T. च त्याचं प्रशिक्षण झाल आहे,यातच अ‍ॅडीक्शन,ग्रिफ आणि डिप्रेशनमध्ये अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग झाल आहे  : N.L.P.( Neurolinguistic Programming ) मध्ये विशेष प्रशिक्षण
सध्या 'आश्रय इनीशीटीव्ह फॉर चिल्ड्रन' या संस्थेत प्रोजेक्ट कोआरडीनेटर  म्हणून कार्यरत.सन्मती बालनिकेतन येथे समुपदेशक. म्हणून काम करतात.सेंटर फॉर  अ‍ॅटिस्टीक चिल्ड्रनसाठीही सेवाभावी वृत्तीने काम केले..मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासाठी समुपदेशक व्याख्याता म्हणून काम करतात.
या सर्व तज्ज्ञत्वाच्या विषयावर व्याख्याने देतात.
समुपदेशक म्हणून वैयक्तिक प्रॅक्टीस करतात.
मोबाईल ०९५५२३५९६२५
इमेल madhavi 2171@gmail .com

निवेदन 
गुरुवार दिनांक १२मार्च रोजी पार्किन्सन्स मंडळाची सभा आयोजित केली आहे.
'भास' ही समस्या काही शुभार्थीना जाणवते. या अनुभवातून गेल्रले शुभंकर आणि शुभार्थी या आपले अनुभव कथन करणार आहेत.याशिवाय किरण बालचंदानी आणि पांडुरंग लोहार या शुभार्थिंची DBS शस्त्रक्रिया झालेली आहे.शेखर बर्वे त्यांची मुलाखत घेणार आहेत.
सर्वांनी उपस्थीत राहावे.

स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.
विशेष सूचना 
११ एप्रिल या जागतिक पार्किन्सन्स दिन मेळाव्यात शुभार्थीन्च्या कलाकृती मांडण्यात येणार आहेत.पेंटिंग,विणकाम,भरतकाम,फोटोग्राफी,कलाकौशल्याच्या विविध वस्तू ठेवता येतील..त्यासाठी
आतापासून तयारी करु शकता.
पार्किन्सन्स मित्रमंडळ वार्ता जानेवारी २०१५ ते मार्च २०१५
         एप्रिल २०१४ ते मे २०१५  या काळात  विणा गोखले यांच्या आर्टिस्ट्री संस्थेच्या’ देणे समाजाचे’ या प्रदर्शनातील सहभाग,संचार या संवाद पत्रिकेची सुरुवात फेसबुकवरील Parkinson’s mitramandal  या Community ची निर्मिती आणि शेखर बर्वे यांच्या ‘पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्णलढत’ या पुस्तकास मराठी ग्रंथोत्तेजक सभेतर्फे मिळालेले पारितोषिक या महत्वाच्या घटना घडल्या.  ArtistryarTistryArtistryस्वमदत गटात संपर्क महत्वाचा. सभांना येऊ न शकणार्यांसाठी स्मरणीकेद्वारे तो वर्षातून एकदा होत होता.हे लक्षात घेऊन जुलै २०१४ मध्ये संचार या संवाद पत्राची सुरुवात झाली.जुलै,ऑक्टोबर आणि जानेवारी असे तीन अंक निघाले.यातून डिसेंबर पर्यंतचे वृत्त आपल्यापर्यंत पोचलेच आहे.यापुढील महिन्यांचा वृत्तांत येथे देत आहे.


गुरुवार १२ मार्च सभेचा वृत्तांत
                    अश्विनी हॉटेल येथे  झालेल्या दिनांक १२ मार्चच्या सभेत भास या लक्षणावर अनुभव कथन,आणि DBS शस्त्रक्रिया झालेल्या शुभार्थींची मुलाखत असा कार्यक्रम होता.प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली. श्री शरच्चंद्र पटवर्धन यांचा वाढदिवस हास्याचा फुगा फोडून साजरा करण्यात आला.
संचारच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम आलेल्या सौ ताम्हणकर याना श्री. पटवर्धन यांच्या हस्ते  पारितोषिक देण्यात आले.यानंतर मुख्य विषयाला सुरुवात झाली.
             शोभना तीर्थळी यांनी हा विषय चर्चेला ठेवण्याची आवश्यकता सांगताना,ही समस्या सर्वच शुभार्थीना जाणवेल असे नाही.सर्वेक्षणातील १५० शुभार्थीपैकी २९ जणाना भासाची समस्या होती.पुढे ती कमी झाली तर सर्वेक्षणाच्यावेळी ज्याना ही समस्या नव्हती त्यातील काहीना नंतर निर्माण झाली.असे प्रतिपादन केले.या चर्चेने घाबरून न जाता.वास्तव समजून घेऊन योग्य पावले उचलल्यास यातून बाहेर पडता येते इतरांच्या अनुभावातून किती वेगवेगळ्या स्वरूपाचे भास होऊ शकतात हे लक्षात घेण्यास सांगितले.२०१२ सालच्या स्मरणिकेतील न्युरॉलॉजीस्ट हेमंत संत यांचा भासावरील लेख वाचण्यासही सांगितले.एका उच्चशिक्षित शुभंकरानी फोनवर सांगितलं,तिचा पीडीग्रस्त पती तिच्या चारित्र्यावर संशय घेतो.तिच्याकडे कोणीतरी येत आणि ती त्याच्याबरोबर जाते अस त्याना वाटत होत.मला वेड लागायची वेळ आले.अस त्या रडत सांगत होत्या त्याना शांत करत, भासाचे विविध शुभार्थींचे अनुभव सांगितले आणि तातडीने न्युरॉलॉजीस्टकडे जायला सांगितले.असाच अनुभव अनेक शुभंकर आणि शुभार्थी यांच्या भासाविषयीच्या अज्ञानाबद्दल आल्यानेही याविषयावर चर्चा घडून आणण्याची गरज वाटली.
              श्यामला शेंडे यांच्यापासून अनुभव कथनास सुरुवात झाली.मंडळाचे संस्थापक मधुसूदन शेंडे याना गेली २३ वर्षे पीडी आहे.आठ वर्षापूर्वी सहा साली अमेरिकेत असताना आजूबाजूच्या झाडीत लोक हिंडत आहे असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी सर्वाना उठवल.पण त्यानंतर  काही समस्या नव्हती.११ साली  मात्र अंगावर किडे हिंडतात तोंडातून दोरे निघतात असा वाटायला लागल.कंप आवडत नाही म्हणून स्वत:च त्यांनी गोळ्या वाढवल्या होत्या. भासाच प्रमाण वाढल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल केल.अशा वेळी पेशंट अनावर होऊ शकतो म्हणून ICU ठेवलं.ते त्याना न आवडल्याने ते पळून जाऊ लागले. भासाचाच एक भाग म्हणजे अमेरिकेहून मदतीला आलेला मुलगा, पत्नी,डॉक्टर हे कट करत आहेत असे वाटू लागले.औषधाचे प्रमाण कमी केले.घरच्या लोकांचे पटत नसल्याने त्यांचे मित्र श्री.शरच्चंद्र पटवर्धन याना बोलावलं.उपचारानंतर भास कमी झाले.पण पार्किन्सनस वाढला.शामला ताईंनी थोडेसे लक्षण दिसल्यास  सुरुवातीलाच तातडीने न्युरॉलॉजीस्टना दाखवावे असा सल्ला दिला
               श्री.पटवर्धन यांनी औषधांच्या उपयोगापेक्षा दुष्परिणाम जास्त झाल्यास डॉक्टरना, कुटुंबियाना तारतम्याने निर्णय घ्यावा   लागतो असे सांगितले.
              आशा रेवणकर यांनी श्री.रेवणकर,दिवंगत मधुकर देशपांडे आणि श्री आठल्ये यांचे अनुभव सांगितले.रेवणकर याना आपले पाकीट जळाले आहे असे वाटत होते.४८ तास ते न झोपता १०/ १० मिनिटांनी  ड्रॉवर उघडून ते पाकीट पहात होते.भासाबद्दल त्यावेळी फारशी माहिती नसल्याने त्या घाबरल्या.त्यांच्या Ameltralच्या तीन ऐवजी दोन गोळ्या केल्यावर त्यांचे भास कमी झाले अर्थात हा निर्णय न्युरॉलॉजीस्टच्या सूचनेवरून घेतला.श्री. आठल्येना चोर आल्याचे वाटते.देशपांडेनी तर एकदा पोलीस स्टेशनला फोन
करून चोर आल्याचे सांगितले.
                आशा ताई यांच्या अनुभवानंतर शोभना तीर्थळी यांनी, त्यावेळी प्रश्नावलीतील  शुभार्थींच्या भास आणि औषधे यांचा काही परस्पर संबंध आहे का हे तपासले असता भास होणारे अनेक जण या गोळ्या घेत नव्हते आणि या गोळ्या घेणार्‍या अनेकाना भास होत नव्हते असे लक्षात आले.त्यामुळे विशिष्ट औषधांचे
दुष्परिणाम व्यक्तीनुसार वेगळे असतात  त्यामुळे औषधांच्या बाबताचा निर्णय स्वत: न घेता न्युरॉलॉजीस्टवर सोपवावा असा सावधानतेचा इशारा दिला.
                दीपा होनप यांच्या वडिलाना पीडी होता.आज ते हयात नाहीत तरी त्यांनी वडिलांची ही समस्या हाताळली आहे. वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून या समस्येकडे पहिल्याने आणि प्रत्यक्ष अनुभवाबरोबर पती एम.डी.फिजिशियन असल्याने या समस्येचे यथार्थ ज्ञान त्याना होते.अतिशय संवेदानशिलतेने ही समस्या त्यांनी हाताळली.एक चतुर्थांश शुभार्थीनाच ही समस्या जाणवते परंतु आपणापर्यंत ती येणार आहे की नाही हे समजणे अश्यक्य.त्यामुळे त्याबद्दल माहिती आवश्यक.शुभार्थीला एकटे न ठेवणे, डिप्रेशन येऊ न देणे,भास होऊ लागल्यास न लाजता इतराना सांगणे.या गोष्टी भासावर मात करण्यासाठी थोड्याफार उपयोगी होऊ शकतात.त्यांनी  स्वत: हाताळलेला Socratic reasoning चा प्रयोग सांगितला.यात शुभार्थीच म्हणण खोडायच नाही कारण हे शुभार्थी कधीच स्वीकारत नाही कारण त्यांच्यासाठी  ते सत्यच असते. त्याऐवजी अप्रत्यक्षपणे वेगळेच प्रश्न विचारत जायचं. ज्यातून हळूहळू ते योग्य  विचारापर्यंत येऊ शकतील.त्याचं वडिलांशी असलेल जवळीकीच विश्वासाच नात यामुळेही हे शक्य झाल.अस त्या म्हणाल्या.प्रत्येक शुभार्थिच्या समस्येनुसार तारताम्यानेच डॉक्टर आणि शुभंकरालाही निर्णय घ्यावे लागतात.नुकत्याच आमच्या परिवारात कार्यकर्ता म्हणून सामील झालेल्या दीपाच्या अनुभवाने सर्वच उपस्थीत प्रभावित झाले.
            मित्रमंडळाचे हितचिंतक डॉक्टर शशिकांत करंदीकर यांनीही आपल्या विवेचनात दीपाचे कौतुक केले.अनेक दिवस झोप न झाल्यानेही भास होऊ शकतात.भासाची इतर कारणेही पाहण्याची आवश्यकता सांगितली. LSD 25  सारख्या रसायनाचा एक कण सुद्धा भास निर्माण करतो हिप्पी त्याचा वापर काल्पनिक विश्वात जाण्यास करत.मेंदूतील न्युरॉन्सचे प्रमाण एक बिलियनपेक्षा जास्त असते आणि त्यांची कनेक्शन ८०,००० मिलियन असतात त्याचा कोठे कसा परिणाम होईल याचा अंदाज करणे अत्यंत कठीण. त्यांचे अमेरिकेतील न्युरॉलॉजीस्ट मित्र पुढील ५० वर्षात तरी याबद्दलचे कोणते प्रश्न नक्की सोडऊ शकू हे सांगता येत नाही असे सांगतात असे प्रतिपादन केले.डॉक्टर पेशंटला वेळ देत नाहीत अशा तक्रारीवर पीडी च्या २०/२५ लक्षणांची यादी करून त्यातील नेमकी कोणती त्रास देतात यावर खुणा केल्यास डॉक्टर मदत करू शकतील असे सुचविले
            श्री. मोरेश्वर काशीकर यांनी मी डॉक्टरकडे जाताना दोन फुलस्केप कागद भरून अडचणी आणि काही पीडीवरील माहितीची पेपर कटिंग घेऊन जातो त्याचा उपयोग होतो असे सांगितले.
            शुभार्थी रमेश घुमटकर यांनी घरी ते एकटेच असतात परंतु घरात माणसे वावरत असल्याचा भास होतो. स्कूटरवरून जाताना कोणीतरी ओव्हरटेक करत असल्याचे भास होतात.फिरायला गेले असता मागून कोणीतरी येत असल्याचे वाटते.पण मी स्वत:ला हे भास असल्याचे पटवतो.
             श्री. शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला भास होत असल्याचे सांगितले.पण हे भास आहेत हे मला समजत होते.पिडीत ते खरे असल्याचे वाटते.
              प्रज्ञा जोशी यांनी आपल्या मुलासाठी मुलगी सांगून आले.सर्व पाहुणे मंडळी बाहेर बसली आहेत अस वाटत होत. आपल्या सांगण्याकडे कोणी लक्ष देत नाही याचा राग येत होता.
             सौ.लोढा यांच्या पतिना आपली पत्नी हरवली असे वाटत होते.पत्नीला ते नर्स समजत होते आणि होस्पिटलभर पत्नीला शोधत होते आणि बरोबर मी आहे या सांगण्याच्या प्रयत्नात सौ लोढा. शेवटी मुलांनी फोन करून मम्मी घरी आली आहे अस सांगितलं.आणि यातून मार्ग काढला.
              शैलजा कुलकर्णी यांनी वास्तवावर आधारित चर्चा ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.कोणत्याही प्रसंगी शुभंकर आणि शुभार्थी यातील समन्वयाचे नाते महत्वाचे वाटत असल्याचे सांगितले.
            यानंतर मुलाखतीचा कार्यक्रम होता.श्री लोहार याना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्याने ते येऊ शकले नाहीत.किरण बालचंदानीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुलाखत देऊ शकल्या नाहीत.शोभना तीर्थळी यांनी त्यांच्याबद्दल माहिती सांगितली.या दोघांच्या शत्रक्रिया मुंबई येथे झाल्या.
             श्री लोहार यांच्या शस्त्रक्रियेनंतर ऑन ऑफ अवस्थेवर खूपच नियंत्रण आले.१२ ऐवजी दोन वर सिंडोपाची संख्या आली. अनैच्छिक हालचाली पूर्ण कमी झाल्या.कोणाच्याही मदतीशिवाय एकटे सर्वत्र जाऊ शकतात.सभाना येतात.शस्त्रक्रियेसाठी त्याना सी.जी.एस.कडून आर्थिक मदत मिळाली.
             किरण बालचन्दानीही सभाना येतात. मंडळाच्या सहलीलाही आल्या होत्या.त्यांच्या पतीचे दुकान आहे.पत्नीसाठी ते सभाना येण्यासाठी दुकान बंद ठेवतात.शस्त्रक्रियेपूर्वी त्याना व्हीलचेअर लागायची आता ती लागत नाही.त्यांचेही गोळ्यांचे प्रमाण कमी झाले.
             नागपूरस्थित श्री. वकील दोन जुळ्या नातवंडाना सांभाळण्याच्या  ड्युटीसाठी पुण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांची DBS शस्त्रक्रियेबद्दल  मुलाखत झाली होती.यावेळी त्यांच्या पत्नीची मुलाखत शोभना तीर्थळी यांनी घेतली.सुधीर वकील आणि रेखा वकील या पतीपत्नीकडे पाहूनच सकारात्मक उर्जा मिळते. गेली २८ वर्षे ते पीडीग्रस्त आहेत पण त्यांच्याकडे पाहून तसे वाटत नाही. ३६व्या वर्षी त्याना पीडी झाला.२००६ साली DBS शस्त्रक्रिया झाली.औषधे कमी झाली जगण्याची गुणवत्ता सुधारली.त्यावेळी त्याना शस्त्रक्रियेचा खर्च सहा लाख आला.आता यात थोडी वाढ झाली आहे.इकॉनॉमी क्लास निवडल्यास खर्च थोडा कमी होतो असे त्यांनी सांगितले.शस्त्रक्रिया करावी किंवा नाही याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल असे विचारले असता त्यांनी करावी असे उत्तर दिले.
                चहापानाचा खर्च वाढदिवसानिमित्त श्री. पटवर्धन यांनी केला.'यापुढील प्रत्येक कार्यक्रमाच्या चहापानाचा  खर्च मी करीन' असे  श्री चंद्रकांत दिवाणे यांनी जाहीर केले.सौ शेंडे यांनी पार्किन्सन्स मेळाव्याचे हॉल भाडे दरवर्षी देणार असल्याचे जाहीर केले.
                           
जाहीर निमंत्रण
जागतिक पार्किन्सन्स दिवस मेळावा २०१५
शनिवार दिनांक ११ एप्रिल २०१५ रोजी 'जागतिक पार्किन्सन्स दिवसा' निमित्त पार्किन्सन्स मित्रमंडळ,पुणे, सर्वांसाठी मेळावा आयोजित करीत आहे.
स्थळ : लोकमान्य सभागृह,केसरीवाडा,न.चिं.केळकर मार्ग
५६८,नारायण पेठ,पुणे ३०.
दिनांक : शनिवार ११ एप्रिल२०१५
वेळ : दु.४ ते सायं.६.३०
प्रमुख पाहुणे : डॉक्टर अरविंद फडके M.D.
मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल.
आपले
शरच्चंद्र पटवर्धन
मधुसूदन शेंडे
नृत्योपाचारात सहभागी शुभार्थींचा नृत्याविष्कार,शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन हेही खास आकर्षण असणार आहे.
विशेष सुचना : ज्या शुभार्थीना आपल्या कलाकृती ठेवायच्या आहेतत्यांनी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी निदान १५ मिनिटे त्या आणाव्यात.स्वयंसेकांकडे सुपूर्त कराव्यात.

जागतिक पार्किन्सन्स दिवस मेळावा ११ एप्रिल वृत्त
                        दिनांक ११ एप्रिल रोजी लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता मेळाव्याची सुरुवात भर उन्हात दुपारी चारला असूनही कार्यक्रमास २०० ते २५० शुभंकर शुभार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते.पुण्यातील तसेच पुण्याबाहेरील जुन्नर,चिपळूण,बेंगलोर,नाशिक, अशा  इतर ठिकाणाहूनही शुभंकर, शुभार्थी आले होते.
                    ने काढलेल्या सुंदर रांगोळीमुळे प्रसन्न मनाने सर्व आत प्रवेश करत होते.
                    गणेश वंदना आणि त्यानंतर  अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचा वसा घेतलेल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्याला अनुरुप अशा ' इतनी शक्ती हमे देना दाता' या प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.प्रार्थनेत सौ वसुधा बर्वे,सौ.पद्मजा ताम्हणकर,सौ प्रज्ञा जोशी या शुभार्थी आणि सविता ढमढेरे आणि अंजली महाजन या शुभंकरांनी सहभाग घेतला.संवादिनीवर होत्या त्यांच्या गुरु अनुपमा करमरकर.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन व संचलन  डॉ.सौ शोभना तीर्थळी यांनी आपल्या ओघवत्या आणि माहितीपूर्ण शैलीत केले.मंडळाचे संस्थापक सदस्य श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेत प्रस्तावना केली.
                 सुरुवातीचा कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता.त्यांचे संचालन हृषीकेश पवार  या त्यांच्या शिक्षकांनी दोन सहाय्यीकाच्या साथीने केले.अत्य्नात लय, तालबद्ध व नियंत्रित हालचाली यांनी कार्यक्रमाची उंची सुरुवातीसच खूप उंचीवर नेली.सर्व श्रोते प्रेक्षकांनी हा कार्यक्रम डोक्यावर घेतला.
               कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर अरविंद फडके यांचे श्री पटवर्धन यांच्यासह मंचावर आगमन झाले.सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली.यानंतर मृत्युंजय हिरेमठ याशुभार्थिनी आणि शैलजा कुलकर्णी या शुभांकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.शुभार्थी प्राध्यापक करोडे हे थेट चिपळूण इथून कार्यक्रमास आले होते.अनेक प्रकारच्या वाद्यवादनात त्यांनी नैपुण्य प्राप्त केले आहे.इतक्या लांबून ते स्वत:ची वाद्ये अनु शकले नाहीत.पण उपलब्ध हार्मोनियम आणि प्लूट वादनाने थोडक्या वेळात आपले कौशल्य प्रगट केले.श्री पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला.सौ तीर्थळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर अरविंद फडके यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.डॉक्टर फडके यांनी त्यांच्या व्याख्यानात पार्किन्सन्स डिसीजची,त्याच्या लक्षणांची व उपचाराची अभ्यासपूर्ण माहिती दिली.पार्किन्सन्स बाधित व्यक्तीने आपली जीवनशैलीकशी ठेवावी याचे विवेचन केले.पीडीग्रासितानी स्वत:, फॅमीली डॉक्टर्,न्युरॉलॉजिस्ट यांच्यात एक बंध (Link ) निर्माण करायला हवा व त्याप्रमाणे उपचारात सुसूत्रता आणावी.वरचेवर  डॉक्टर बदलू नये.
सकस अन्नग्रहण करावे.वागिरे अनेक बाबींवर शुभार्थीना मार्गदर्शन केले.
श्री रामचंद्र करमरकर आणि गोपाल तीर्थळी यांनी कार्यक्रमात भाग घेतलेल्या प्रत्येकाचा व विशेष पाहुण्यांचा यथोचित सत्कार केला.
दीपा होनप यांनी निवेदने आणि आभारप्रदर्शनाचे काम आपल्या खुसखुशीत शैलीत केले.
शेवटी सर्व उपस्थितांचे तोंड पेढ्यांनी गोड करून कार्यक्रम संपला.उपस्थित शुभार्थीना स्मरणिका मोफत देण्यात आल्या.साबेस येऊ न शकलेल्याना पोस्टानी पाठवण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.

निवेदन
गुरुवार दिनांक १४ मे रोजी पार्किन्सन्स मंडळाची सभा आयोजित केली आहे.
सौ विद्या काकडे या' सायको न्युरोबिक 'या विषयावर व्याख्यान देणार आहेत.सर्वांनी उपस्थित राहावे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४.३० वाजता.

वृत्तान्त
पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि ८/ ५ / १५
                गुरुवार  दिनांक १४- ५- १५ रोजी पार्किन्सन्स मंडळाची सभा : हॉटेल आश्विनी येथे आयोजित केली होती.दोन दिवस पुण्यात जोराचा पूस असल्याने सभासद येती की नाही असे वाटत होते पण पण ६५ जण उपस्थित होते.सौ विद्या काकडे यानी' सायको न्युरोबिक 'या विषयावर व्याख्यान दिले.
श्री काशीकर यांनी घेतलेल्या प्रार्थनेने आणि शुभार्थींचे वाढदिवस साजरे करून सभेला सुरुवात झाली.विद्या काकडे यांची ओळख शोभना तीर्थळी यांनी करून दिली.
विद्या काकडे यांनी मायक्रोबॉयॉलॉजीमध्ये एम.एस.सी. केल आहे.हाफकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये 'डिप्लोमा इन लॅबोरेटरी पॅथॉलॉजी केल आहे.पुण्याच्या रुबी हॉलमध्ये ४० वर्षे काम केले. त्यातील  दहा वर्षे मायक्रोबॉयॉलॉजी विभागात आणि तीस वर्षे बायोकेमिस्ट्री विभाग प्रमुख म्हणून काम केले .निवृत्तीनंतर चेन्नई युनिव्हर्सिटीचा 'मास्टर्स इन सायको न्युरोबिक' हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम केला.अभ्यासाचा भाग म्हणून डायबेटीस रुग्णावर प्रयोग केला.त्यातील निष्कर्ष आशादायी होते.आता पार्किन्सन्सच्या रुग्णावर त्याना प्रयोग करायचा आहे त्यामुळे या विषयाची प्राथमिक माहिती सांगण्यासाठी त्यांचे व्याख्यान ठेवले होते.
              या संशोधनानातील सहभाग  स्वत: संशोधक आणि सहभागी होऊ इच्छिणारे शुभार्थी यांच्यातील परस्पर संपर्कातून आणि संवादातून होणार आहे.
              विद्या काकडे यांनी आपला विषय पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनचा उपयोग करून विविध अ‍ॅनिमेशन स्लाईडच्या आधारे सोपा केला.सायको म्हणजे मन,न्युरो म्हणजे मेंदू,बिक्स म्हणजे खेळ.मन आणि मेंदू वापरून खेळण्यात येणारा खेळ म्हणजेच आपले  जीवन.आपण म्हणजे एक हेड  टॉप कॉम्प्युटर आहोत.तो वापरून आपण आपली शरीर यंत्रणा चालवतो.आणि आयुष्य जगतो.मन हे सॉफ्टवेअर आणि मेंदू म्हणजे हार्डवेअर आहे.मेंदू,शरीर आणि मन हे एकमेकात इतके मिसळून गेलेत की एकाचा परिणाम दुसर्‍यावर होतो.मनात जे विचार येतात त्याचा परिणाम मेंदूवर होतो व त्याचा परिणाम शरीर यंत्रणेवर होतो.मनात नकारात्मक  विचार आले तर परिणाम वाईट व  सकारात्मक विचार आले तर चांगला होतो.
          शरीर स्वस्थ व आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी मनाची पण काळजी घेतली पाहिजे.सध्या फक्त शरीरावरच उपचार केले जातात.कारण ते दिसते, हालचाल करते,रोजची कामे सुरळीत पार पाडते.मनाची पण काळजी घेतली पाहिजे कारण मनातल्या भावना शरीरावर परिणाम करतात.हे सिद्ध झालेले आहे.
         प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतात'everything  is energy & energy is everything '
आपला मेंदू उर्जेवर चालतो.इलेक्ट्रिक इम्पल्स वर चालतो.प्रत्येक विचार,भावना सुद्धा एक प्रखर उर्जा आहे.आपल्याला लागणारी उर्जा आपण अन्नातून मिळवतो.पण या प्रक्रीयेला सुद्धा एक वेगळी उर्जा लागते.जैविक विद्युत चुंबकीय उर्जा.जी आपल्या शरीराच्या आत व बाहेर चार ते आठ फुटापर्यंत पसरलेली असते तिला Aura मानतात आपल्या शरीराचे कार्य, तब्येत जैविक विद्युत      
चुंबकीय उर्जेवरच चालते.ही आपल्या शरीराला ती भरपूर मिळाली तर तुम्ही स्वस्थ आणि निरोगी राहता.आजारी असाल तर ही उर्जा शरीराला दिली तर रोग कमी होण्यास मदत होते पार्किन्सन्सच्या रुग्णांना कोणाच्याही मदतीशिवाय हा माईंडगेम खेळून भरपूर उर्जा मिळून रोग आहे तेथे रोखण्यास मदत मिळेल.या रोगामुळे आलेल्या डिप्रेशन मधून बाहेर येण्यास मदत होते.किर्लिअन फोटोग्राफी वापरून Aura काढता येतो.
            व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या प्रश्नाना विद्या काकडे यांनी उत्तरे दिली.सर्वांच्या मनात विषयाबद्दल खूप उत्सुकता होती.कार्यक्रमाची वेळ संपली तरी प्रश्न संपत नव्हते.
प्रार्थनेने सभेची समाप्ती झाली.
 निवेदन
  गुरुवार  दिनांक ११ - ६  - १४ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली आहे.
पार्किन्सन्समध्ये स्नायूंची ताठरता ही समस्या असल्याने त्यावर मात करण्यासाठी व्यायाम हा महत्वाचा ठरतो .या सभेत शुभार्थीच्या  व्यायामाबाद्दलच्या  अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे.तसेच बद्धकोष्ठता या समस्येवरही शुभार्थी आपले अनुभव सांगणार आहेत.सर्वांनी सभेस उपस्थित राहावे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ .३० वाजता.

वृत्तान्त
पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि ११ / ६  / १५
                गुरुवार  दिनांक  ११  रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा : हॉटेल आश्विनी येथे आयोजित करण्यात आली होती.बद्धकोष्ठता आणि व्यायाम यावर शुभंकर शुभार्थीच्या अनुभवाची देवाण घेवाण हा सभेचा विषय होता.११ एप्रिल २०१२ च्या अंकात श्री शरच्चंद्र पटवर्धन यांचा बद्धकोष्ठतेवरील 'कोष्ठबद्धता' लेख आणि २०१५ च्या  स्मरणिकेतील मोरेश्वर काशीकर यांचा' व्यायाम,पीडी आणि मी' हा लेख प्रसिद्ध केले होते.इतर शुभार्थीनाही याबाबत बोलते करणे जरुरीचे होते.
.सभेची सुरुवात जून महिन्यात जन्म असलेल्या  शुभार्थीचे  वाढदिवस साजरे करून करण्यात आली. यानंतर नव्याने सामील झालेल्या शुभार्थीनी आपली ओळख करून दिली.
चर्चेची सुरुवात शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपले अनुभवावर आधारित मौलिक विचार मांडून केली. व्यायामाच महत्व कळत पण वळत नाही या अनेक शुभार्थीच्या मनोभूमिकेवर नेमक बोट ठेवलं.बद्धकोष्ठता आणि .व्यायाम यांचा परस्पर संबंध आहे.व्यायामाचा अभाव हे एक बद्धकोष्ठतेच कारण आहे.याशिवाय तंतुमय पदार्थ असलेला आहार, पाणी पीणे आणि रोजच्या रोज सकाळी मलविसर्जन झालेच  पाहिजे हा गैरसमज दूर करणे महत्वाचे असल्याचे मत मांडले.
 श्री मोरेश्वर काशीकर यांनी व्यायामाबाद्दलचे काही महत्वाचे मुद्दे मांडले.
शरीरात लाखो पेशी असतात.त्याना प्राणवायू पोचावावा लागतो.हे काम रक्तामार्फत होते .व्यायामाने हे शक्य होते.इंडार्फीनसारखे आनंद निर्माण करणारे हार्मोन्सही व्यायामाने तयार होते.
स्वत: सातत्याने व्यायाम करत असल्याने औषधाचा डोस वाढला नसल्याचे सांगितले.व्यायामात वजने समाविष्ट केल्यावर कंपही आधीपेक्षा कमी झाल्याचे लक्षात आले.बद्धकोष्ठतेसाठी सारक चूर्णे घेतल्याने तात्पुरता उपयोग होतो.पाणी पिणे तंतुमय पदार्थ खाणे व्यायाम अशा नैसर्गिक प्रक्रियेवर भर देण्यास सुचविले.शेखर बर्वे यांच्या पुस्तकात सांगितलेली  आटो सजेशनचीही आठवण करून दिली.
मित्रमंडळात नव्यानेच सामील झालेले श्री विजय ममदापुरकर हे बॉक्सिंग,स्विमिंग,रेसलिंग या खेळात अंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेले खेळाडू आहेत.ऑलिम्पिकसाठीही त्यांनी खेळाडू तयार केले.त्यांच्या मते व्यायामाचा अतिरेकही नसावा.ते स्वत: रोज १०० सूर्य नमस्कार घालायचे आता कमी केले.
पद्मजा ताम्हणकर यांनी जो व्यायाम करतो त्यात सातत्य हवे असे सांगितले.त्या ओंकाराने व्यायामाला सुरुवात करतात. ओंकारातील गुंजानाचा मेंदुला उपयोग होतो.स्पीच थेरपी म्हणूनही उपयोग होतो असा त्यांचा अनुभव आहे. सर्व अवयवांच्या हालचाली होतील असा व्यायाम त्या करतात.
श्री निशिकांत  काळे यांनी डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शनवर व्यायाम आणि आहाराबद्दल लिहावे असे सुचविले.
 श्री रामचंद्र करमरकर म्हणाले की पार्किन्सन्स मुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या त्रासांवर व्यायाम हा एक उत्तम उपाय आहे. एकटे  स्वत: घरी  व्यायाम करणारे शुभार्थी फारच थोडे आढळतात. आपल्या सभांमध्ये महिन्यातून एकदाच आम्ही व्यायाम करून घेऊ शकतो, डॉक्टर सुधा महिन्या दोन महिन्यांनी एकदाच तुम्हाला प्रिस्क्रिपशन मध्ये व्यायाम करा म्हणून लिहून देऊ शकतील. पण त्याची अंमलबजावणी कोण करणार. शुभार्थी नैराश्यग्रस्त व खचलेले असतात. त्यामुळे ते एकटे व्यायाम करू शकत नाहीत. अशा वेळी शुभंकाराने स्वत:च ही जबाबदारी अंगावर घेऊन शुभार्थींकडून व्यायाम करून घ्यायला हवा.असे सुचवावेसे वाटते.
८० वर्षाच्या पुढचे वयाच्या मानाने तरुण दिसणारे शुभार्थी श्री यशवंत एकबोटे यांनी  खणखणीत आवाजात आपले  अनुभव सांगितले ते फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते.जंगलात १०/१० किलोमीटर चालण्याची सवय होती.आताही ते सकाळी ५.३० ला उठतात.सहा ते सात व्यायाम,प्राणायाम ओंकार करतात त्यानंतर सात ते आठ फिरायला जातात.
रमेश घुमटकर यांनी एका जागी बसून न राहता हालचाली करत राहण्याची गरज प्रतिपादन केली.
नयना देसले यांनी त्यांच्या पतीला बद्धकोष्ठतेसाठी बाराक्षारची औषधे देत असल्याचे आणि त्याचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन केले.
समारोप करताना श्री करमरकर म्हणाले,
बद्धकोष्ठतेवर व्यायामाबरोबर इतरही अनेक उपाय आहेत. बद्धकोष्ठता होऊच नये कोंड्याचे रुचकर पदार्थ, खीर खावी,मूग ,मटकी सारखी मोड आलेली कडधान्ये थोडी वाफवून त्यात थोड लिंबू मीठ घालून खावी, पालक, चाकवत, हिरवा माठ, लाल माठ यांचे सूप घ्यावे,नाचणीच्या पीठाचे आंबील किंवा खीर खावी . या पदार्थांच्या वापराने आपण बध्कोष्ठावर नक्कीच मात  करू शकतो. काही पदार्थ मात्र आहारातून कायमचे हद्दपार करायला हवेत उदा. पाव, ब्रेड, सर्व प्रकारची बिस्किटे अर्थात बेकरीत बनणारे आट्याचे सर्व पदार्थ  तसेच शुभ्र तांदुळाचा भात. हे सर्व पदार्थ बद्धकोष्ठ होण्यास मदत करतात.  

व्यायामावर बरेच जणांनी अनुभव सांगितले त्यामानाने बद्धकोष्ठतेवर चर्चा कमी झाली.
प्रार्थनेने सभेची सांगता झाली.
निवेदन
नेहमी महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारी पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे सभा आयोजित केली जाते.पण जुलै महिन्यातील सभा
रविवार दिनांक  १२  /  ७  / २००१५ रोजीआयोजित केली आहे.याची नोंद घ्यावी.
प्रसिद्ध न्युरॉलॉजीस्ट' या विषयावर व्  डॉक्टर  राहुल कुलकर्णी यांचे ' पार्किन्सन्स आजारावरील अद्ययावत माहिती याख्यान होणार आहे .सर्वांनी या संधींचा अवश्य लाभ घ्यावा

स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.
वृत्तान्त
पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि १२/७ /१५
रविवार  दिनांक १२ जुलै रोजी अश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती प्रसिद्ध न्युरॉलॉजीस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांचे' पार्किन्सन्स आजार आणि त्यावरील नवी  औषधे  ' या विषयावर व्याख्यान झाले.सभेस ८६ सभासद उपस्थित होते.
सभेची सुरुवात प्रार्थनेने झाली.त्यानंतर मंडळाचे संस्थापक सदस्य श्री.मधुसूदन शेंडे याना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यांचे मित्र शरच्चंद्र पटवर्धन आणि रामचंद्र करमरकर यांनी शेंडे यांच्या आठवणीना उजाळा दिला.त्यानंतर
शोभना तीर्थळी यांनी डॉक्टर राहुल कुलकर्णी यांची ओळख करून दिली.
मधुसूदन शेंडे हे डॉक्टरांचे १२ वर्षे पेशंट होते.व्याख्यानाच्या सुरुवातीला त्यांनी शेंडे यांच्या आठवणी सांगितल्या.यातून मित्रमंडळाच्या इतिहासाचे एक पान  उलगडले.
 २००२ मध्ये  दिनानाथ हॉस्पिटल येथे राहुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मेळावा आयोजित केला गेला.त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.( याच सभेत श्री शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन या जुन्या मित्रांची बर्‍याच दिवसांनी गाठ पडली.दोघेही स्वमदतगट सदृश्य काम करत होते यानंतर एकत्र काम सुरु झाले.)त्यानंतर  श्री शेंडे यांनी  पुण्यातील न्युरॉलॉजीस्ट,न्यूरोसर्जन यांची वाडेश्वर हॉटेल येथे सदिच्छाभेट  आयोजित केली होती.स्वमदतगटाची कल्पना मांडली.त्यांच्या स्वमदत गटाच्या कल्पनेला सर्वांनी दुजोरा दिला.व्याख्यानात याचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले "शेंडे आणि पटवर्धन  यांनी समर्थपणे हा गट चालू केला.यांच्याइतका सक्रीय स्वमदत गट.भारतात इतरत्र नाही.येथे बरेच जुने पेशंट आहेत.काहींच्याबाबत खूप कोम्प्लीकेशन होतात.त्यातून बर्‍याच  गोष्टी आम्हा डॉक्टरनाही शिकायला मिळतात."
डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या आजच्या सभेचे आयोजनही श्री शेंडे यांच्या पुढाकाराने झाले.शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मंडळाच्या कामाचा विचार केला.
डॉक्टरांच्या व्याख्यानात त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने प्रचलित आणि नव्याने येत असलेल्या विविध औषधांचा मागोवा घेतला.नंतर श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.;शंकांचे निरसन केले.(हा सर्व मागोवा स्वतंत्रपणे देत आहे.)
दीपा होनप यांनी आभार मानले.
यानंतर जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
 बॉक्सिंगमधील कार्यासाठी जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभार्थी विजय ममदापुरकर यांचा सत्कार करण्यात आला.सौ विद्या काकडे यांनी डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या भाषणाचे व्हिदिओ शुटींग केले.
चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.रेखा आचार्य यांनी  वाढदिवसानिमित्त चहापानाचा खर्च केला.

   निवेदन
गुरुवार १३ ऑगस्ट रोजी आश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर नेहा पेलपेकर या' पार्किन्सन्स आणि फिजिओथेरपी' याविषयावर  प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.



No comments:

Post a Comment