२४ मे रोजी आय. एम.ए.च्या संचेती हॉलमध्ये शेखर बर्वे यांच्या
"पार्किन्सनशी मैत्रीपूर्ण लढत" या पुस्तकाच प्रकाशन झाल. प्रसिद्ध
न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर प्रदीप दिवटे यांची प्रस्तावना लाभलेल्या या
पुस्तकाने मराठीतील शास्त्रीय विषयावरच्या लिखाणात मोलाची भर पडली
आहे.आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉक्टर माया तुळपुळे यांनीही पुस्तकातील
मुल्यांकन तक्ते, मानसिक आघातावरील प्रकरण आहारविहारावरील माहिती याचे
विशेष कौतुक केले.
डॉक्टर ह.वि.सरदेसाई प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास येऊ शकले
नाहीत.पण त्यानी आवर्जून पुस्तक प्रकाशनापूर्वी आपला अभिप्राय दिला पुस्तक
परिचयाबरोबर तो ही येथे देत आहे.डॉक्टर ह.वि.सरदेसाई यांचा अभिप्राय :
" पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत हे पुस्तक संपूर्ण वाचले.एखादा वैद्यकीय व्यावसायिक देखिल या विषयावर इतकी सखोल माहिती देणारे पुस्तक लिहू शकेल किंवा कसे; असे वाटावे इतक्या कौशल्याने आपण हे पुस्तक लिहिले आहे. इतर कुठेही न मिळणारी म्हणजे, इतर उपद्धतीची ओळख त्यांची काय मदत मिळू शकेल या संदर्भातील मार्गदर्शन आहे. पार्किन्सन डिसिज हा आजार अधिकाधिक वाढत असलेला आढळू लागला आहे. लोकसंखेत वाढत्या वयाचा गट अधिकाधिक जास्त संख्येचा होत चालला आहे.त्याचा हा नैसर्गिक परिणाम असावा. पार्किनसन्स झालेल्या रुग्णानी हे पुस्तक तर अवश्य वाचावे. परंतु सर्व कुटुंबियानी, आधार देणा-यांनी देखिल वाचाले पाहिजे.असे हे पुस्तक आहे.या कार्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो."
पुस्तक परिचय
२००७ मध्ये बर्वेंच्या पत्नीला पिडी ( पार्किन्सन्स डिसिज ) झाला आणि ही लढत चालू झाली.पार्किन्सन्स बद्दलच अज्ञान अपुरे ज्ञान आणि चुकीच ज्ञान यामुळे पिडि झाल्यावर रुग्ण आणि कुटुंबीय घाबरतात,खचतात,निराश होतात.शेखर बर्वेनी मात्र आजाराविषयी सुयोग्य ज्ञान मिळवण्याची खटपट केली.स्वतःच्या पत्नीच्या आजाराच निरिक्षण,अनुभव,पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कामातील सहभागातून विकसित झालेल ज्ञान, इतर शुभंकर,शुभार्थींचे केलेले निरिक्षण आणि अनुभव यातून पिडिला स्विकारले,लढत मैत्रीपूर्ण केली.यातून त्याना पिडिसह जगण्याचा मूलमंत्र सापडला.हे अनुभवाधिष्ठीत ज्ञान मूलमंत्रासह यच्च्ययावत मराठी भाषिक पिडी ग्रस्तांपर्यंत पोचवावे या तळमळीतून, सहानुभावातून या पुस्तकाची निर्मिती झाली.
पिडिविषयीचे ज्ञान येथे शास्त्रीय भाषेचा किचकटपणा टाळून सोप्या भाषेत येते.लक्षणावर नियंत्रण ही पिडिच्या मैत्रीपूर्ण लढतीतील मोठ्ठी चाल आहे.वैद्यकीय उपचार ही हेच करतात.पुस्तकात विविध लक्षणे आणि त्याबाबतच्या मौलिक सूचना यावर विस्ताराने लिहिले आहे.या माहितीला अनुभवाची जोड असल्याने शुभार्थींना रोजच्या जगण्यात ती नक्की उपयोगी ठरतील. यासाठी आहार विहार,व्यायाम,विविध पूरक उपचार पद्धती यांचीही जोड पुस्तकात आहे.
पिडिबरोबर येणार नैराश्य याला नामोहरम करणं हा लढतीतील महत्वाचा भाग आणि तो आपल्या कक्षेतला.पुस्तकातील मानसिक आघातावरील प्रकरण या दृस्टीने महत्वाचे.हे प्रकरण वाचले तरी पार्किन्सन्सशी लढाई निम्मी जिंकता येइल.
तुम्ही एकटे नाही आहात; असा दिलासा देणारे स्व-मदत गटावरील प्रकरण,मित्र,तत्वज्ञ,मार्गदर्शक अशी काळजीवाहकाची भूमिका,रोजच्या जगण्यातील सहाय्य उपकरणातील बदल ,काही उपयुक्त सूचना या सर्वच पिडि शुभंकर शुभार्थींसाठी एकदा वाचण्याच्या बाबी नाहीत तर पुस्तक संग्रही ठेऊन पुन्हःपुन्हः वाचण्याच्या आहेत.
पुस्तकाचा विशेष म्हणजे इतकी भरगच्च माहिती असलेले पुस्तकाची किंमत फक्त ६० रुपये आहे.
पुस्तकासाठी संपर्क
रा.हे.करमरकर११९९,सदाशिवपेठ,पुणे ४११०३०
दुरभाष ९४२३३३८१६४
No comments:
Post a Comment