Tuesday, 14 January 2014

हे जीवन सुंदर झाले - (प्रकरण सहा पार्कीन्संन्स मित्रमंडळ एक प्रयोगशाळा)

पार्किन्सन्स मित्रमंडळ एक प्रयोगशाळा
पीडी होण्याची कारणे? माहित नाहीत
पीडी पूर्ण बरा होण्यासाठी उपचार? अजून तरी नाहीत.पण संशोधन चालू आहे. आशेचा किरण आहे.आणि पूर्ण बरा होत नसला तरी लक्षणावर नियंत्रण आणून चांगले जीवन जगता येते.
अशी प्रश्नोत्तरे पीडीवरील कोणतेही साहित्य वाचले की हमखास आढळतात.
तसे पाहता १९६०मधे लिओडोपा उपचारात आले तोपर्यंत कोणतेही औषध नव्हतेच ना?संशोधकाच्या अथक प्रयत्नातून हे साध्य झाले.पाश्च्यात्य देशात करोडो डॉलर संशोधनावर खर्च होत आहेत.The Michal J.Fox Foundation For Parkinson's Research द्वारे पार्किन्सन्ससाठी स्टेमसेलचा उपयोग कसा करता येईल यावर संशोधन चालू आहे.
आमची प्रयोगशाळा मात्र बिन पैशाची.३५० पीडी शुभार्थी हीच काय ती आमची साधनसामग्री. आणि या साधन सामग्रीवर प्रयोग करतात, काही पदव्युत्तर अभ्यासाचा भाग म्हणून प्रकल्प करणारे डॉक्टर आणि काही नि:स्वार्थीपणे काम करणारे कलोपचारक इत्यादी..पीडीवरील संशोधनाच्या अवकाशात हे सारे अत्यंत नगण्य.असेच आहे. संशोधन म्हणावे का या पातळीवरचे..इथे अगदी गमतीने प्रयोगशाळा म्हटले आहे.तरीही शुभार्थिंच्या जीवनात आनंद निर्माण करणारे म्हणून आमच्या दृष्टीने हे सर्व महत्वाचे.या प्रयोगांमागे एक दृष्टिकोन आहे.
पीडीच्या लक्षणावर नियंत्रण आणून गुणवतापूर्ण जीवन जगण्यासाठीही फक्त आधुनिक वैद्यकाचे औषधोपचार पुरेसे नाहीत.औषधोपचाराबरोबर इतर पूरक उपचारही वापरुन पहायला हवेत.असा तो दृष्टिकोन. आणि हा आता मूळ धरु लागला आहे.हा दृष्टिकोन प्रयोगाद्वारे प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न चालू आहेत.याची उपयुक्तता ओळखून पार्किन्सन्स मित्रमंडळाने प्रयोग कर्त्यांसाठी नेहमीच कवाडे उघडी ठेवली आहेत.
प्रयोगकर्त्यांमधे भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ ऑडिओ अंड स्पिच थेरपी; संचेती हॉस्पिटलचा फिजिओथेरपी विभाग;डी.वाय. पाटील फिजिओथेरपी कॉलेजचा न्यूरॉलॉजी विभाग,येथील पदव्युत्तर अभ्यास करणारे विद्यार्थी,कलोपचारक यांचा समावेश आहे.यातील काहीनी फक्त आपल्या प्रयोगापुरते आम्हाला
गिनिपिग बनवले आणि कार्यभाग पूरा झाल्यावर ढुंकुनही पाहिले नाही.त्यांचा इथे उल्लेख केला नाही.काहीनी मात्र अत्यंत मनापासून नेटाने प्रयत्न केले.प्रयोगाचे निष्कर्ष लेखाद्वारे, सभेमधून व्याख्यानाद्वारे आमच्यापर्यंत पोचवले.ते आमच्या परिवारातील झाले.काहीचे प्रामाणिक प्रयत्न व्यावहारिक अडचणीमुळे, काहीवेळा आमच्या उदासीन प्रतिसादामुळे तडीला जाऊ शकले नाहीत.काही अजून चालू आहेत.या सर्वांचा आढावा पुढे घेतला आहे.सुरुवातीला स्पिच आणि फिजिओथेरपीच्या प्रयोगाची माहिती घेऊ.
स्पिचथेरपी
जानेवारी २००९ मध्ये भारती विद्यापीठातील स्पिच थेरपीस्ट नमिता जोशी यांचे व्याख्यान ठेवले होते.पीडिमधे स्पिचथेरपीचा उपयोग कसा होऊ शकतो हे एल.सि.डीच्या आधारे सांगितले.व्यायामाची प्रात्यक्षिकेही दाखवली.त्यांची उपयुक्तता नमिता आणि मित्रमंडळ या दोघांच्याही लक्षात आली यातून प्रत्येक शुभार्थीला त्यांच्या समस्येनुसार वेगवेगळे व्यायाम करण्याची गरजही लक्षात आली.व्यायाम ठरविण्यासाठी प्रत्येकाची तपासणी आवश्यक होती.यासाठी फेब्रुवारीमधे त्यानी आमच्या सभेच्या ठिकाणी येऊन आपल्या १४ विद्यार्थिनीच्या सहाय्याने २८ शुभार्थिंची मोफत तपासणी केली.मोबाइल,टेपरेकॉर्डर यांच्या आधारे शुभार्थींच्या बोलण्याचे नमुने घेण्यात आले.प्रश्नावलीही भरुन घेण्यात आल्या.ज्यांच्या बोलण्यात अधिक दोष होता अशा काही शुभार्थीना काही चाचण्यांसाठी आधुनिक सामग्रीची गरज होती .त्या साठी विद्यापीठातील स्पिचथेरपी विभागात जाणे आवश्यक होते.आणि उपचारासाठी ५/६ महिने तरी आठवड्यातून दोनदा जाणे आवश्यक होते.काही शुभार्थीनी अशा तपासण्या करुन घेतल्या उपचारही घेतले पण सातत्याने जाता न आल्याने हा प्रयोग अर्धवट राहिला.यातील भारती विद्यापीठ हे शुभार्थीना जाण्यायेण्यासाठी जिकिरीचे आणि गैरसोयीचे होते ही मोठी अडचण होती.पण यामुळे एक झाले ते म्हणजे विद्यापीठाच्या या विभागाची मित्रमंडळाशी जवळीक निर्माण झाली.डॉकटर नमितानी आमच्या स्मरणिकेसाठी लेख लिहून दिला.पद्व्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्पासाठी लक्ष वेधले गेले.
मधुरा कर्डुकर,युक्ती अजवानी आणि रचना परिकर अशा ३ विद्यार्थीनी, बोलणे आणि पार्किन्सन्स याबाबतच्या ३ वेगवेगळ्या पैलुवर संशोधन करत आहेत.मित्रमंडळाच्या सभाना त्या आल्या. त्यांच्या प्रयोगाविषयी माहिती सांगितली.शुभार्थीना घरी जाउन त्या भेटतात आणि चाचण्या घेतात त्यामुळे शुभार्थिंच्या दृष्टीने ते सोयीचे आहे.प्रकल्प हा परीक्षेचा भाग असल्याने तो पूर्ण व्हायला हवा.
फिजिओथेरपी
डी.वाय पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या डॉक्टर कोमल पारीख यांचा प्रयोग हा महत्वपूर्ण होता.पार्किन्सन्समधे तोल जाणे आणि पडणे ही काही लोकांबद्दल समस्या असते.कोमलचा प्रकल्प या समस्येवर आधारित होता.आम्ही गोळा केलेल्या माहितीतून आम्ही लगेचच तोल जाण्याची समस्या असणार्‍या शुभार्थिंची नावे तिला दिली.
सप्टेंबर २०१० मधे तिच्या प्रयोगाची सुरुवात झाली.फिजिओथेरपी द्वारे शुभार्थिंचा तोल जाणे सुधारणे,पडण्याला प्रतिबंध करणे आणि आटोक्यात आणणे,.याद्वारे जगण्याची गुणवत्ता वाढवणे,दैनंदिन जीवनातील विविध गोष्टी करण्यात त्याना जास्तीत जास्त स्वावलंबी बनवणे.ही तिच्या प्रयोगाची उद्दिष्टे होती.उपचाराचा प्रमुख भाग औषधोपचार असेल फिजिओथेरपी पूरक असेल हेही तिने स्पष्ट केले होते.
आठवड्यातून तीनदा असे चार आठवडे तिचा प्रशिक्षण कार्यक्रम होता. यात रिलॅक्सेशन,श्वास आणि तोल यावर आधारित व्यायाम तिने प्रत्येकाच्या घरी जाऊन शिकवले.प्रशिक्षणाचा पहिला दिवस झाल्या झाल्याच शुभार्थिंचे फोन यायला सुरुवात झाली.कोमलच्या प्रशिक्षणावर सर्वजण खुश होते.ती त्यांची कुटुंबीयच झाली होती..आश्विनी वीरकरला ऑन ऑफची समस्या आहे. तिचा ऑफ पिरिएड चालू होऊन संपेपर्यंत आणि पुनः ऑन पिरिएड चालु असतानाचा काळ ती थांबली त्या काळातील तिच्या हालचाली तिने न्याहाळल्या.आणि त्यानुसार तिचे व्यायाम ठरवले.प्रत्येकाची समस्या वेगळी आणि त्यानुसार व्यायामही वेगळे.कोमल येण्याची सर्वजण वाट पाहात असायचे.कोमलनेही.'.' I enjoy my role as Physiotherapist and as friend 'अस आपल मनोगत व्यक्त केल. प्रशिक्षणाचे निष्कर्ष आशादायी होते.शुभार्थीना त्यानी नैराश्येतून बाहेर काढल.तोल जाण्यावर मात करु शकू हा आत्मविश्वास वाढवला.समाजापासून तुटल्याची भावना कमी केली.काही शुभार्थींच्या याबाबतच्या भावना बोलक्या आहेत. सुधाकर अनवलीकर याना प्रशिक्षण प्रक्रिया आनंददायी वाटली.शालिनी गोपालक्रिश्णनचा आत्मविश्वास वाढला,.हालचालीवर मर्यादा आल्या होत्या त्त्या कमी झाल्या.स्टॅमिना वाढला.
शीला कुलकर्णी स्वतः डॉक्टर आहेत त्या तिच्या कामाने प्रभावित झाल्या.त्यांची तोल जाण्याची समस्या कमी झाली.आश्विनीने तर स्मरणिकेसाठी "फिजिओथेरपि पार्किन्सन्स शुभार्थिंसाठी आशेचा किरण" असा लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
'this journey helped me to grow as a physiotherapist.and human being.The process of working with a Parkinson's disease patient was exiting for all the learning it allowed me' अशी भावना स्मरणिकेतील लेखात कोमलनेही व्यक्त केली.
तिच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले तरी ती नेहमीच आमच्या संपर्कात राहिली.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभासदांसमोर तिने आणि तिच्या सह्कार्‍यानी फिजिओथेरपीचा पीडीसाठी कसा उपयोग होतो हे चित्रफीतीसह अणि प्रात्यक्षिकासह दाखविले.या प्रकल्पाची व्यायामाच्या रेखाटनासह छापील प्रत दिली. त्याच्या झेरोक्स प्रती पुढील कार्यक्रमात सर्व शुभार्थिंना दिल्या.परगावच्या शुभार्थीना पोष्टानी पाठवल्या
इथे एक मह्त्वाचा प्रश्न राहतो.कोमलने सांगितले की श्वास, अन्न, झोप या सर्वांसाठी अत्यावश्यक बाबी आहेत.पार्किन्सन्सच्या बाबतीत एक्सरसाइज ही चौथी बाब हीसुद्धा समाविष्ट करायला हवी.तिचा सल्ला ऐकून शिकवलेले व्यायाम प्रकार सातत्याने करणे हे आता शुभार्थींचे आणि करवून घेणे हे शुभंकरांचे काम.
संचेती हॉस्पिटलच्या निमिषा जैन हिचा प्रयोग ही दिलासा देणारा ठरला.
पार्किन्सन्सच्या आजारात ट्रेडमिलचा उपचार
म्हणून वापर असा तिच्या अभ्यासाचा विषय होता.ट्रेडमिलचा वापर अ‍ॅथलेट करतात किंवा वजन कमी करण्यासाठी केला जातो असा सर्वसाधारणपणे समज आढळतो पण अमेरिकेत आणि इतर देशात पार्कीन्सन्स आणि पॅरॅलेसिसच्या आजारात उपचार म्हणून ट्रेडमिलचा वापर यशस्वी ठरला आहे.पार्किन्सन्स्च्या रुग्णाना तोल जाण्याची आणि चालण्याची समस्या असते यासाठी उपचार म्हणून ट्रेडमिल प्रशिक्षण उपयोगी ठरले.भारतातील रुग्णाना याचा खरोखरच उपयोग होईल का हा तिच्या अभ्यासाचा विषय होता
निमिषाने तिच्या प्रकल्पाविषयी मित्रमंडळात माहिती दिली आणि अनेक शुभार्थी उत्साहाने सामील झाले.हे प्रशिक्षण . आठवड्यातून ३वेळा,३० मिनीटे असे ६ आठवडे असणार होते.शुभार्थिंच्या विविध अडचणीमुळे नियमित येणार्‍या शुभार्थींची संख्या १३वर आली.हे प्रशिक्षण ट्रेडमिलवर असल्याने शुभार्थीना संचेती हॉस्पीटलमध्ये यावे लागणार होते.त्यामुळे हॉस्पिटलपर्यंतचे अंतर हा मोठ्ठा अडथळा होता.पुण्यातील दळणवळण सुविधा पाहता रिक्षा किंवा स्वतःचे वाहन हेच पर्याय होते.यासाठी शुभंकराची मदत आवश्यक होती.इच्छ्या असली तरी अनेक शुभंकरांसाठी आठवड्यातून ३वेळा, ६आठवडे सोबत करणे शक्य नव्हते.
ज्याना र्‍हुदयविकार आहे त्याना या प्रशिक्षणात सहभागी होता येणार नव्हते असेही काही नाइलाजाने गळाले.
निमिषाने शुभार्थींची भीती जाण्यासाठी आणि खबरदारी म्हणून सुरक्षिततेची साधने(safety harness) वापरावयाची ठरवले होते परंतु एकाही शुभार्थीला त्याची गरज वाटली नाही.प्रत्येक शुभार्थिंकडे निमिषा जातीने लक्ष देत होती.निमिषाच्या कामावर सर्व शुभार्थी फिदा होते.एकही दिवस चुकवत नव्हते. तिने काही गृहितके धरली होती ती तपासली जात्त होती
१)पार्किन्सन्समध्ये मेंदूची सूचना देण्याची नैसर्गिक यंत्रणा कमी झालेली असते.त्यामुळे बाहेरुन
इशारे देण्याने आवश्यक कार्यभाग साधला जातो.ट्रेडमिलवर चालताना हालणार्‍या ट्रेडमिल बेल्टकडून अशा सूचना मिळतात.यातून तोल सावरण्यास मदत होते आणि पावलातील अंतर वाढवण्यास ही मदत होते.
२) ट्रेडमिलवर चालण्याने एक लय साधली जाते शरीरांतर्गत बिघडलेली लय सुधारण्यास याची मदत होते.
३)निमिषाने सांगितल्यानुसार ट्रेडमिलमुळे न्यूरोप्लॅस्टिसिटी साधली जाते. न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे मेंदुची फेरफार करणे,नव्याने आकार देणे,नव्या गोष्टी शिकणे ही क्षमता..पिडी रुग्णांना विशिष्ट काम देऊन ते करण्याचे प्रशिक्षण दिल्यास न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढते असे संशोधनाने सिद्ध झाले आहे.
या सर्व सैद्धांतिक पातळीवरच्या बाबी प्रयोगातून तपासल्या गेल्या.
.संचेती हॉस्पिटलचे न्यूरॉलॉजिस्ट शैलेश देशपांडे यांचीही मदत घेतली गेली.सर्व शुभार्थी निमिषाच्या कामावर फिदा होते.
 सहा आठवड्यानंतर मूल्यांकन करण्यात आले.शुभार्थींच्या तोल जाण्याच्या समस्येत आणि चालण्याच्या समस्येत खूपच सुधारणा झाली होती.आत्मविश्वास वाढला होता.अंधारात आणि चढउतार असला तरी चालू शकतो असे सहभागी शुभार्थी सांगत होते.स्वतःशीच स्पर्धा करुन स्वतःमध्ये सुधारणा करण्याची क्षमता वाढली होती.सह्भागी शुभार्थी शीलाताई कुलकर्णी यानी तर ट्रेडमिल विकत घेतले.
ट्रेडमिलवर चालणे असे उपयुक्त असले तरी तज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवे प्रत्येक शुभार्थीच्या समस्या, गरजा वेगवेगळ्या असतात.त्यानुसार प्रशिक्षण देणे गरजेचे असते.हा उपचार कोणासाठी योग्य आहे हेही तज्ञच ठरवू शकतात.असा सल्ला मात्र निमिषाने आवर्जून दिला.
निमिषाचा प्रकल्प संपला तरी मित्रमंडळाशी संबंध मात्र संपले नाहीत.मित्रमंडळासाठी तिने आपले प्रकल्पाबद्दलचे अनुभव आमच्या स्मरणिकेसाठी लिहून दिले.प्रकल्पात सह्भागी नसणार्‍या काही शुभार्थींच्या घरीही ती फिजिओथेरपीसाठी जात होती.अभ्यासक्रम संपल्यावर ती परत गेली. जाताना दुसर्‍या फिजिओथेरपिस्टवर काम सोपवून गेली होती.पण निमिषाची जागा ती  घेऊ शकत नाही असे  शुभार्थीनी मत नोंदवले..निमिषा पुनः पुण्यात यावी असे त्याना वाटते.थोडक्यात निमिषाचा प्रकल्प यशस्वी होण्यात तिचा सहानुभाव आणि शुभार्थीमध्ये तिने निर्माण केलेला विश्वासही महत्वाचा होता.
डि. वाय.पाटिल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉक्टर नेहाचा प्रकल्प -अनुलोम विलोम प्राणायामाचा पि.डी.साठी उपयोग असा आहे.नंदादीप हॉस्पिटल येथे झालेल्या व्याख्यानात तिने शुभार्थीना अनुलोम विलोम प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवले.प्रयोगात सहभागी होऊ इच्छीणार्‍या शुभार्थींच्या घरी जाऊन ती आता हे काम करत आहे.तिच्या प्रयोगाचे निष्कर्ष अजून समजावयाचे आहेत.आमच्याही घरी ती आली होती. आम्ही आधीपासून प्राणायाम करत होतोच अनुलोम विलोम प्राणायाम करताना ह्यांचा कंप पूर्ण थांबतो असा आमचा  अनुभव आहे.
नेहाच्या प्रयोगातून काय निष्कर्ष निघतो ते आता पहावयाचे.
नेहाचा व्यक्तिगत पातळीवरचा प्रयोग चालू होता त्याचवेळी डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉक्टर्सनी पार्किन्सन्स शुभार्थीना उपयुक्त व्यायाम शिकवणारे शिबीर घेतले.पाचसहा शुभार्थी मागे एक डॉक्टर मार्गदर्शनासाठी होते.तोल जाणे, कंप,स्नायुंची ताठरता,झोप न येणे,नैराश्य,जाणीवक्षमता कमी होणे अशा पार्किन्सन्सशी संबंधित विविध बाबीचा विचार केला गेला.प्राणायाम, ध्यान यांचेही प्रात्यक्षिक दाखवले.यानंतर ताठरता, कंप्,तोल जाणे अशा विविध समस्येनुसार वेगवेगळे गट करुन व्यायाम प्रकार,प्राणायाम करून घेण्याचा उपक्रम राबवला गेला प्रत्येक महिन्याचा शेवटच्या गुरुवारी असा चार महिने हा उपक्रम चालला.पदव्युत्तर अभ्यास करणार्‍या डॉक्टर्ससाठी हा अभ्यासाचाच एक भाग होता.प्रत्येक शुभार्थीकडून माहिती भरुन याच्या नोंदी केल्या गेल्या.त्यांच्यासाठी याचे फलित काय होते समजले नाही पण आम्हाला मात्र पार्किन्सन्स मध्ये फिजिओथेरपीची उपयुक्तता पटली.
विविध कलोपचार
२०१० या वर्षात कलोपचार(आर्ट बेस थेरपी)हा विषय घेऊन विविध उपक्रम राबवले गेले.तत्पूर्वी प्रसिद्ध भरत नाट्यम नृत्यांगना सुचित्रा दाते यांच्या नृत्यप्रेरणा या संस्थेशी आमचा संपर्क झाला.
सुचित्रा दाते यांचा नृत्योपचार
.११ एप्रिल २००८च्या दि टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकात 'Dancing away the Disease' असा लेख जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त छापून आला होता.त्यात नृत्यप्रेरणाच्या सुचित्रा दाते यांच्या प्रयोगाबद्दल माहिती होती.भरतनाट्यमचा त्या पार्किन्सन्सवर उपचार म्हणून उपयोग करत होत्या.त्या मोफत शिकवायला तयार असूनही फारसा प्रतिसाद मिळत नाही असे म्हटले होते.कोणत्या वयात काय शिकायचे या सामाजिक बंधनामुळे हे होते असे त्याना वाटत होते.श्री.व सौ.शेंडेनी त्यांच्याशी संपर्क साधला.आणि आम्ही काही जणानी त्यांच्या प्रयोगात सामिल व्हायचे ठरवले.त्यानुसार दर शुक्रवारी वर्ग सुरु झाला.दात्ये यांच्या मैत्रिणीच्या नवर्‍याला लहान वयात पीडी झाला.म्हणून त्यानी याचा अभ्यास केला आणि नृत्योपचार यावर उपयोगी ठरु शकेल असे त्याना वाटले. मैत्रिणीच्या नवर्‍याने यात सह्भाग घेतलाच नाही आम्ही मात्र जाऊ लागलो. शुभार्थींबरोबर शुभंकरही सहभागी झाल्यास तुलनेस सोपे जाईल म्हणून आम्हालाही त्यानी यात सामील करुन घेतले
त्यानी एक प्रश्नावली तयार केली होती.आम्हा प्रत्येकासाठी एक ज्येष्ठ विद्यार्थिनी नेमली होती.
नृत्य वर्गात आमच्या नातवंडांच्या वयाच्या मुली असायच्या.आम्ही शिकताना पाहून त्या कौतुकाने मदत करायच्या.आडाव,मुद्रा,नव्ररसाद्वारे अभिनय असे काही काही शिकत होतो.गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमात एक छोटीशी झलकही दाखवली.नृत्योपचारासाठी सातत्य महत्वाचे होते.पण ते होत नव्हते.कोणाचे अमेरिकेला जाणे,कोणाचे डोळ्याचे ऑप्रेशन, अशा काही ना काही कारणानी क्लास बुडायचा.पण दात्ये मॅडमनी नाद सोडला नाही.त्या स्वतः समुपदेशक आहेत.शुभार्थी आणि शुभंकरांची मानसिकता त्या ओळखत होत्या.त्यांच्यातील समुपदेशक आणि शिक्षिकेने आम्हाला प्रवृत्त करण्यासाठी निरनिराळे प्रयोग केले पण अशा काही अडचणी येत राहिल्या की आमचे जाणे थांबले.
यावर उपाय म्हणून त्यानी एक सिडी तयार केली आहे ती पाहून तुम्ही घरीही नृत्यावर आधारित व्यायाम करु शकता.शिवाय प्रत्येक शनिवारी नृत्यवर्गात सामील होऊ शकता.इतराना यासाठी शुल्क असते पण पार्किन्सन्स शुभार्थीना मात्र मोफत प्रवेश आहे काही शुभार्थी सामीलही झाले आहेत.आमचा प्रयोग अर्धवट राहिला तरी.जितके दिवस सहभाग होता त्यातही फायदे जाणवले
११ एप्रिल २०१०च्या स्मरणिकेत.ह्यानी आपला नृत्यविषयक अनुभव 'पार्किन्सन्सने मला नाचविले'.या लेखात दिला. ते लिहितात,"पार्किन्सनने चेहरा भावविहिन होतो असे सांगितले जाते प्रत्यक्षात अनुभवलेही.चेहर्‍याचे स्नायु ताठ झाल्याने हे होते.मी बोलणारा कमी.पण माझा राग,आनंद, कौतुक, कंटाळा हे चेहर्‍यावरुन समजायचे.पीडीमुळे हे बंद झाले होते.नृत्यामधल्या नवरसाच्या अभिनयाने आणि व्यायामाने चेहर्‍यावरची ताठरता कमी होऊ शकते, आता न बोलता माझा राग बायकोला समजतो.आणि आवडले नाही म्हणून नाराजी किंवा आवडल्या बद्दलचे कौतुक इतराना समजू शकते.वेगवेगळ्या हालचाली आणि त्यांचे बदलते वेग यांची सांगड घालणे आता जमायला लागले.मुद्रांच्या सरावामुळे वेगवेगळ्या हालचाली सुलभ होत आहेत."
नृत्य वर्गात येणार्‍या इतरानाही तोल सांभाळणे,हालचाली सुलभ होणे असे फायदे झाले.
विविध शुभार्थी आणि त्यांच्या कला.
नृत्याप्रमाणेच संगीत, चित्रकला अशा इतर कलाही उपचार म्हणून उपयुक्त ठरत आहेत असे गृह्भेटीतून लक्षात आले.यातील प्रेरणादायी अनुभव डॉ. शीलाताई कुलकर्णी यांचा.तीसपस्तीस वर्षांच्यावर भारत आणि भारताबाहेर त्यानी वैद्यकीय व्यवसाय केला.अनेक रुग्णांवर उपचार करुन त्याना दिलासा दिला.पण त्यांचे पति आणि त्या स्वतः या दोघानाही पार्किन्सन्स झाल्यावर मात्र नैराश्येनी घेरले.पण त्यात गुंतून न राहता त्यातून बाहेर पडण्याचे विविध मार्ग शोधले.ताठरणार्‍या बोटाना वठणीवर आणण्यासाठी कॅरम वीणकाम,चित्रकला यांचा आधार घेतला.२००९ मध्ये जवळच राहणार्‍या सोनाली राणेकडून चित्रकलेचे धडे घेण्यास सुरुवात केली.आठवड्यातून पाच दिवस रोज एक तास शिकणे चालू झाले.शालेय जीवनात एक अनिवार्य विषय म्हणून आणि वैद्यकीय शिक्षणात आकृत्या काढण्यापुरताच चित्रकलेशी संबंध होता आता अडुसष्टाव्या वर्षी पेन्सिल हातात धरली होती.आडव्या उभ्या तिरक्या रेषा काढण्यापासून सुरुवात केली.शिक्षक आलेल्यावेळी ऑफ पिरिएड असला तर उठून बसताही यायचे नाही.सुरुवातीला लगेच हात दमायचे.सारखे खोडरबर लागायचे.रेषांच्या फटकार्‍यातून हाताची असमर्थता जाणवायची.पण मनाचा निर्धार आणि सतत सराव यानी रेषा स्थिर होऊ लागल्या.प्रमाणबद्धता जमू लागली.त्रिमितीची जाण आली,.एकाच पेन्सिलिने कमी जास्त दाब देत शेडींग करणे जमू लागले.निसर्ग चित्र, वस्तुचित्र,व्यक्तिचित्र सगळे सराइतासारखे जमू लागले.
या सर्वांपेक्षा महत्वाचे म्हणजे सलग एक तास बसूनही शरीर कुरबुर करेनासे झाले.औषधांची आठवण येईनाशी झाली.नैराश्य दूर होऊन उत्साह, आत्मविश्वास वाढला.
त्यांची शिक्षिका सोनाली राणेनी सांगितले ‘चित्रकलेत त्यांनी प्रगती केलीच पण चित्रकला शिकताना आणि चित्रे काढताना त्यांच्या शारीरिक, मानसिक,अवस्थेत झालेले स्थित्यंतर अधिक आनंदाचे होते.’
आम्ही त्याना भेटायला गेलो तेंव्हा त्यांनी काढलेली चित्रे दाखवली ती दाखवताना, त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रिये विषयी त्या भरभरून सांगत होत्या.हे सांगताना त्यांचा चेहरा आनंदाने खुलला होता एरवी त्या वॉकर घेऊन चालतात पण आता त्या वॉकर शिवाय आत बाहेर करत होत्या.एरवी कपडे बदलायला वेळ लागतो पण त्यादिवशी त्या पाच मिनिटात कपडे बदलून आल्या.चित्रकलेविषयी बोलताना त्या इतक्या एक्सायटेड असतात तर चित्रे काढताना किती असतील याची कल्पना आली.चित्रकलेची ही किमया थक्क करणारी होती.त्यावर्षीच्या स्मरणिकेचे मुखपृष्ट त्यांच्याच चित्राने सजले.

                          चित्रकलेने पिडीच्या लक्षणावर मात करणारे दुसरे उदाहरणं विद्याधर पटवर्धन यांचे. बँकेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासला.७५व्या वर्षी पिडी झाला तरी त्यानी चित्रकला सोडली नाही.मी त्याना भेटले तेंव्हा ते ८० वर्षाचे होते...शीलाताईना कंपाची समस्या नव्हती.पटवर्धनाना मात्र ताठरते बरोबरच कंपाचीही समस्या आहे.त्यामुळे त्यानी पीडी झाल्यावर केलेली मोठमोठी पेंटींग्ज पाहून त्यांच्या जिद्दीला हॅट्स ऑफ म्हणावेसे वाटले.पक्षी, प्राणी, फुले, निसर्गाची विविध रुपे, व्यक्ती यांच्या चित्रानी तर कितीतरी वह्या भरल्या होत्या.चित्रे काढताना त्यांची समाधी अवस्था असते. कंप, ताठरता जवळही फिरकत नाहीत.
कमलाकर झेंडे, कल्पना शिरनामे हेही छंद म्हणून चित्रकला जोपासणारे शुभार्थी.झेडे व्यवसायाने अभियांत्रिकी कॉलेजमधे गणिताचे प्राध्यापक होते तर शिरनामे खेळाडु.या सर्वांची चित्रकला पाहून २०१०या वर्षातील पार्किन्सन्स दिनादिवशी शुभार्थिंच्या कलाकृतिंचे प्रदर्शन भरविण्याची कल्पना सुचली.हे प्रदर्शन अत्यंत यशस्वी झाले.इतर शुभार्थीना नैराश्य झट्कून केल्याने होत आहे रे अशी प्रेरणा मिळाली.वरील प्रयत्न वैयक्तिक पातळीवरील असले तरी पीडी शुभार्थिंसाठी कलेची उपयुक्तता अधोरेखित करणारे होते.२०१०च्या स्मरणिकेतील लेखाने याला वैज्ञानिक आधार मिळाला
झुबेन बलसारा यांची ड्रमथेरपी
स्मरणिकेत कॅनडास्थित न्यूरॉलॉजिस्ट मंदार जोग(President, Canadian Institute of Parkinson's Disease) यांचा Music Brain & Parkinson लेख तर ABT practitionerकविता नायर यांचा Art Based Therapies हे लेख कलोपचाराबद्दल माहिती देणारे होते
                         मंदार जोग स्वतः शास्त्रीय संगीत शिकलेले आहेत.पुण्यात आलेल्यावेळी त्यांची संगीताची मैफिल आणि शेवटी पीडीवर व्याख्यान होते. मित्र मंडळाच्या सभासदाना निमंत्रण होते.त्यानी स्मरणिकेतील लेखात पार्किन्सन्सच्या बाबतीत संगीताची उपचार म्हणून उपयुक्तता प्रायोगिक पातळीवर आहे.जास्तीत जास्त संशोधन संगीताचा ठेका (Rhythm)कसा उपयुक्त ठरतो यावर आहे. आणि ठेक्यामुळे चालण्याच्या क्षमतेत सुधारणा होते
                          पीडीसारख्या गुंतागुंतीच्या आजारावर उपचारा साठी साध्या सरळ संगीतापेक्षा गुंतागुंतीची रचना अधिक प्रभावशाली ठरु शकते.उदाहरणार्थ जाझ किंवा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत.
                   कविता नायर यांच्या मते ABT हे Art Based Therapies चे संक्षिप्त रुप नाही तर त्याची उपचार म्हणून उपयुक्तता पुराव्या आधारे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेली आहे.
संगीत,तालवाद्य,नृत्य,नाट्य,चित्रकला,शिल्पकला,रंगकाम्,फोटोग्राफी,अशा विविध दृश्यकला,कथाकथन इत्यादिंचा यात समावेश होतो.ABT अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे उपचार केले जातात.हे व्यक्तिगत किंवा समूह पातळीवर असतात.प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार साध्य निश्चित केले जाते.औषधोपचार चालू ठेउन पूरक म्हणून हे उपचार आहेत हे लक्षात ठेवावयास हवे.
संशोधनानुसार विविध कलामुळे व्यक्तिवर काही सुपरिणाम होत असतात.हे सुपरिणाम Cortical Arousal, स्मरणशक्तीत वाढ,मनोसामाजिक अवस्था,भावनिक प्रतिसाद,सामाजिक वर्तणूक,शारीरिक पुनर्वसन,भाषा आणि बोलणे,अशा विविध पातळीवर असतात पीडी शुभार्थींचा विचार करता निर्मितीक्षमतेला गती मिळून ती वृद्धींगत होते,आजाराचा विसर पडून कंप,ताठरता,फ्रिजिंग,या लक्षणावर नियंत्रण येते,(शीलाताईंच्या उदाहरणात हेच झाले.)नकारात्मक विचार,नैराश्य, ताण दूर होतात.संवादकौशल्यात वाढ होते.
                                 ABT उपाचारक झुबेन बलसारा आणि कविता नायर ए.बी.टी.ची प्राथमिक माहिती सांगणारा प्रात्यक्षिकासह कार्यक्रम गांधीभवन येथे आयोजित केला होता.झुबेननी सहज उचलता येतील अशी छोटी मोठी ताल वाद्ये आणली होती.शुभंकर आणि शुभार्थीना कोणतेही ताल वाद्य घेण्यास सांगितले.वेगवेगळे ठेके दाखवत सर्वाना सहभागी करुन घेतले.जुनी हिंदी गाणी ,मराठी गाणी असे कोणी कोणी काही सुचवत होते.आणि त्या आधारित ताल धरावयास शिकवले जात होते.तास दिडतास आजार विसरुन सर्वानी मनसोक्त आनंद लुटला.पीडी शुभार्थींवर प्रयोग करण्याची त्यांची तयारी होती.
शुभार्थी अनिल कुलकर्णी यानी पुढाकार घेतला. गांधीभवन कोथरुड येथे जून १०ला कलोपचार उपक्रम चालू झाला.पाच शुभार्थी सहभागी झाले.दर सोमवारी चार ते सहा  या वेळात बारा सत्रे घेण्यात आली.हा प्रयोग पायलट स्वरुपाचा होता.संगीत ड्रम्,डान्स,दृश्यकलेतील चित्रकला यांचा यात समावेश होता.
झुबिन बलसाराच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या प्रयोगावर कविता नायरने लेख लिहून दिला तो २०११च्या पार्किन्सन्स दिनाला काढलेल्या स्मरणिकेत दिला आहे.त्याआधारे खालील माहिती दिली आहे.
हजारो वर्षापासून हिंदु, बौद्ध वगैरे धर्मात लयबद्ध मंत्रोच्चारण,भजन, कीर्तन,मुद्रा यांचा वापर आत्मोन्नत्तीसाठी केला जाई.आजही उन पावसाची पर्वा न करता मैलोनमैल वारीत चालणारे वारकरी,नवरात्रातील गर्बा याना नृत्य, वादन संगीत कला उर्जा देताना दिसतात.आधुनिक संशोधनाद्वारे याचे विश्लेषण केले जात आहे आणि या सर्वाचा उपचारपद्धती म्हणून वापर कसा करता येईल याचा ही विचार केला जात आहे.प्रयोगही होत आहे.झुबेननी चालवलेले कलोपचाराचे कार्य त्याचाच एक भाग आहे
झुबेनच्या प्रयोगात सहभागी सदस्याना कोणत्याही क्रियेची सुरुवात करणे,ती क्रिया चालू ठेवणे या बाबी सहज साध्य नव्हत्या. हालचालीतील मंदत्व ही समस्या होती.ठेका आणि लय याआधारे यावर मात करण्याचा प्रयत्न  होता.चालणे, तोल सांभाळणे, सहज हालचाली करणे यासाठी संगीताचे ठेक्याचे विविध प्रकार वापरले गेले.प्रत्येक शुभार्थीच्या समस्येनुसार वेगवेगळा विचार केला गेला.
संगीत,वाद्यांचा वापर, गीताचे बोल यांच्या श्रवणाने मज्जाकोश चैतन्यमय होऊन अवयवांच्या हालचालीत लयबद्धता निर्माण होते.मज्जासंस्थेकडून संदेशवहन एक पाउल पुढे जाते.नियमित सरावाने कृतिशीलता निर्माण होते.
शुभार्थींच्या प्रत्यक्ष कृतिशील सहभागाबरोबर.विश्रांती घेण्यास सांगून शांत संगीत ऐकवण्यात आले.डोळ्यासमोर आनंददायी दृष्ये आणण्यास सांगण्यात आले.यातून मानसिक शांती मिळण्यास मदत होते.
संगीताप्रमाणे ड्रमथेरपिचाही वापर केला गेला.कोलोरोडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या बायोमेडिकल रिसर्च सेंटर इन म्युझिक चे डायरेक्टर मिचेल थॉट (Michael Thaut) यांच्या मते लय ताल यावर आधारित सूचनांमुळे मेंदूच्या स्ट्रोक,पार्किन्सन्ससाख्या आजारात मेंदूची रीट्रेन करण्याची क्षमता वाढते.
ड्रमिंगच्या तालामुळे विविध हालचालीत समन्वय आणि काल साधला जातो.ड्रमच्या ठेक्यांमुळे हालचालीसाठी मेंदूला इशारा किंवा सूचना मिळते.स्नायुंच्या हालचालीत समन्वय साधल्याने अनैच्छिक शारीरिक हालचालीवर नियंत्रण येते,कंप कमी होतो,शरीराची बिघडलेली लय सुधारते.
ड्रमींगप्रमाणे नृत्य आणि हालचाली( Dance &Movement) यांचाही वापर केला गेला.देहबोलीतून माणसाच्या विचार आणि भावनांचे प्रगटीकरण होत असते.नृत्य आणि हालचालीद्वारा निर्मितीक्षमता आणि अभिव्यक्ती यांचा मिलाप होतो.पीडीच्या शुभार्थीने कोणतीही हालचाल करायची इच्छ्या आणि प्रत्यक्ष कृती यात अंतर राह्ते.हालचालीत ताठरता आणि मंदगती असते.नृत्यातील ठेका, ताल, लय आणि हालचालीची पुनरावृत्ती यामुळे या सर्वात सुधारणा होते.सांधे मोकळे होतात, मन, शरीर, भावना यात संतुलन निर्माण होते.हालचाली लक्षात ठेवाव्या लागत असल्याने स्मरणशक्ती सुधारते.सततच्या सरावाने आत्मविश्वास निर्माण होतो.याचा रोजच्या व्यवहारात उपयोग होतो.गर्दीच्या रस्त्यात दुकानात पैसे देताना गोंधळ न ऊडता हालचाली सुलभ होतात.
काही शुभार्थीना मार्चींग संगीतामुळे.फ्रिजिगच्या समस्येवर उत्तर मिळाले.तोल सावरता येणे ,कंप थांबणे,मानसिक समाधान त्यामुळे नैराश्य जाणे हेही फायदे आहेतच.
दृश्य कलेतील चित्रकला आणि रंगकामाचाही(Painting) वापर केला जातो..यात व्यक्तीला प्रगट होता येते. कोंडलेल्या भावना मुक्त होतात.संगीताप्रमाणे येथेही लय महत्वाची असते.आजूबाजूच्या जगाशी मेळ साधला जातो त्यामुळे मेंदूला उत्तेजना मिळते.कधीकधी अनपेक्षितपणे नादुरुस्त झालेल्या मेंदूतील भागाला ती पोचते आणि विस्मृतीत गेलेल्या गोष्टी आठवायला लागतात. नवनिर्मितीचा आनंद मिळतो. हात ,डोळे,मेंदु यांच्या एकत्र वापरामुळे हात आणि डोळे आणि विचारशक्ती यांचा समन्वय साधतो.जाणीव क्षमता(cognitive skill) सुधारते.बोटांची पकड सुधारते.कंपापासून स्थिरता लाभते.
कलोपचाराच्या प्राथमिक वर्गात सह्भागी शुभार्थी प्रयोगावर खुश होते.सुरेश सिधयेनी आपल्या भावना म्युझिक थेरपी एक उपचार या लेखातून व्यक्त केल्या.या वर्गात प्रत्येकाची आवडती गाणी आणि र्‍हीदम ओळखून त्या बिट्स आणि र्‍हिदमची गाणी प्रत्येकाला दिली होती ते गाणे मनाशी घोळवत कामे केल्यास हालचालीत लक्षणीय परिणाम होतो.संगीताने निराश मनाला उभारी मिळते.आजार विसरायला होतो असे त्यानी नमूद केले.
निराश असाल तर आपल्या आवडीचे गाणे लावा.आणि तालावर न लाजता खुशाल नाचा.कोणाला काय वाटेल,
कोण काय म्हणेल याची अजिबात काळजी करु नका.असा इतरानाही त्यानी सल्ला दिला.आता मी रोज हा प्रयोग घरी करतो माझी नातवंडेही माझ्याबरोबर नाचतात.घरातले वातावरण प्रसन्न होते.असेही सांगावयास ते विसरले नाहीत.
अमेरिकेच्या हिदर मॅक्टॅव्हिश यांचा अनुभवही प्रेरणादायी असा आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये त्या भारतात आल्या होत्या तेंव्हा मित्रमंडळास त्यानी भेट दिली. १९९५मधे त्याना पार्किन्सन्स झाला.त्यानी पीडीला फक्त स्विकारलेच नाही तर त्याच्याकडे विनोदाने पाहिले.ड्रम थेरपीचा उपचार म्हणून वापर केलाच.शिवाय इतरानाही धडे दिले.आता ते त्यांचे मिशनच झाले आहे.जगभर विद्यापीठे,परिषदा यातून त्या प्रात्यक्षिकासह ड्रमथेरपीचे महत्व सांगत असतात.त्याचे अभ्यास वर्गही घेतात. साठी ओलांडलेल्या हिदरनी स्वतः गात आणि नाचत शुभंकर शुभार्थीना नाचायला, गायला लावले.१७ वर्षे त्या पीडी पेशंट आहेत हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही.कोणताही कलोपचार फक्त शिबिरात धडे घेऊन सार्थकी लागणार नाही तर सातत्याने त्याचा पाठपुरावा केला तरच त्याचा उपयोग होऊ शकतो हे त्यांच्या भेटीने मनोमन पटले
डॉक्टर विकास कशाळकरांचा संगीतोपचार.
कलोपचारातील संगीतोपचाराचा प्रयोग डॉक्टर विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.मित्रमंडळाचे हितचिंतक डॉक्टर शशिकांत करंदीकर आणि डॉक्टर कशाळकर यानी नोव्हेंबर २०११ मधे धन्वंतरी हॉलमध्ये कलोपचारावर कार्यक्रम आयोजित केला होता.कलोपाचारावर पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याचा त्यांचा विचार आहे.  डॉक्टर विकास कशाळकर यानी व्यक्तिगत अनुभव आणि निरीक्षण याआधारे संगीताचा उपचार म्हणून कसा उपयोग होऊ शकेल याची दिशा दाखवणारे व्याख्यान दिले.कलोपचाराचा अभ्यासक्रम आणि संशोधन सुरु होणार अशी माहिती दिली यावेळी पीडी रुग्णांवरही असा प्रयोग करता येईल का असा विचार मांडण्यात आला.
 शुभस्य शीघ्रम म्हणून लगेच डिसेंबर मध्ये नंदादीप हॉस्पिटल मध्ये डॉक्टर कशाळकर यांच्या सह्कार्याने याची सुरुवात ही झाली.सरगमवर ओंकार आणि काही भजने सर्वांकडून म्हणून घेण्यात आली .काही संगीत ऐकवण्यात आले.मित्रमंडळाच्या प्रत्येक सभेपूर्वी पंधरा वीस मिनिटे असा उपचार करण्याचे ठरले.डिसेंबर जानेवारी .अशा दोन महिन्यात चार वेळा असा उपक्रम झाला.१५ दिवसानी पंधरा वीस मिनिटे हा वेळ कमी पडतो त्याऐवजी एक संपूर्ण सत्र या कार्यक्रमाला द्यावे व यात सहभागी होऊ इच्छीणार्‍यांसाठी हा सलग उपक्रम असावा असे वाटले त्यानुसार फेब्रुवारी मधे आश्विनी लॉजमध्ये पूर्णवेळ कलोपचाराचा कार्यक्रम झाला.मुद्रांच्या आधारे सरगम्,ओंकार,भजन, संतुर वादन असा विविधांगी कार्यक्रम होता.त्यानंतर शुभार्थीना एक प्रश्नावली भरावयास देण्यात आली त्यातील प्रतिसादातून पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवण्यात येणार होती.प्रश्नावलीचे विश्लेषण करुन डॉक्टर कशाळकरांकडे पाठवण्यात आले.अनेकानी उत्सुकता दाखवली.डॉकटर कशाळकरांच्या मते प्रयोग योग्यप्रकारे करायचा तर साउंडप्रुफ खोली हवी. याचे ठिकाणही लोकाना सोयीचे हवे.प्रयोग करणारे कोणतेही मानधन न घेता प्रयोग करणार असले तरी प्रत्यक्ष वादकांकडून संगीत ऐकवायचे तर त्यांच्या वेळा सांभाळायला लागणार होत्या.,मानधन द्यावे लागणार होते..हे सर्व अजून जमून आलेले नाही.या सर्वासाठी खूप खर्च येणार आहे.कोणी प्रायोजक मिळाल्यास हे काम लवकर पुढे जाईल.कमी खर्चात उपचार उपलब्ध होऊ शकतील.भविष्यात असा प्रयोग होऊ शकेल अशी आशा करायला हरकत नाही.सध्या तरी प्रायोगिक स्वरुपात घरी ऐकण्यासाठी दृकफिती करण्याचा विचार आहे.
ऋषिकेश पवार यांचा नृत्योपचार
संगीतोपचाराबरोबर नृत्योपचाराचेही दोन प्रयोग झाले.यातील सुचित्रा दाते यांच्या प्रयोगाची माहिती सुरुवातीला आलेली आहे.
दुसरा नृत्योपचार प्रयोग ऋषिकेश पवार आणि मैथिली भुपटकर हे करत आहेत.त्याची सुरुवात रामचंद्र करमरकर यांच्या धडपडीतून झाली.२९ एप्रिल २०१० रोजी पुण्याच्या अर्काईव्हज थिएटर मध्ये ऋषिकेश सेंटर फॉर कंटेंपररी डान्स आणि मॅक्समुल्लरभवन यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्यावरील 'व्हाय डान्स फॉर पार्किन्सन्स' नावाची पंधरावीस मिनीटाची एक जर्मन फिल्म दाखवण्यात आली.कार्यक्रमाची जाहिरात वाचून आशा रेवणकर आणि करमरकर हा कार्यक्रम पाहण्यास गेले होते.सर्व तरुण, वृद्ध,स्त्री, पुरुष पीडी रुग्ण संगीताच्या तालावर कोणतीही लाज न बाळगता नाचताहेत.हे पाहून करमरकर खूपच प्रभावित झाले.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभासदाना ही फिल्म दाखवायचीच यासाठी त्यानी आटापिटा केला.याची परिणती म्हणून ३० मे २०१० रोजी मंडळाच्या सभासदांसाठी ही फिल्म पुना हॉस्पिटलच्या आडिटोरियमध्ये दाखवण्यात आली.पाश्च्यात्य.संगीता ऐवजी भारतीय संगीतावर आधारित प्रयोग करता येईल का असा विचार झाला.
ऋषीकेशच्या मनात २००४ मधे लंडनला असल्यापासुन ही कल्पना घोळत होती.रोहिणी भाटे यांच्याकडे तो कथ्थक शिकला होता.नंतर तो कंटेंपररी डान्सकडे वळला. Palucca Schule Dresden, Germany यांच्या टिचर्स ट्रेनींग प्रोग्रॅममध्ये बोलवला गेलेला तो पहिला गेस्ट स्टुडंट होता.त्यानी जगभर प्रवास केला आणि आता भारतात येऊन पुण्यात 'ऋषिकेश सेंटर फॉर कंटेंपररी डान्स'या संस्थेची निर्मिती केली. एका नृत्यविषयक मासिकात त्यानी मार्क मोरीस डान्स कंपनी आणि त्यांच्या पीडी रुग्णावरील डान्सविषयक प्रयोगाबद्दल वाचले होते..प्रयोग करु इच्छिणारा आणि प्रयोगात सह्भागी होऊ इच्छिणारे यांची गाठ सहा वर्षानी पडत होती.एक नव्या प्रायोगिक प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवली गेली.
ऋषिकेशनी संचेती हॉस्पिटलशी संपर्क साधून त्यांच्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटच्या सह्कार्याने त्यांच्याच हॉलमध्ये ऑगष्ट १०ला वर्ग सुरु केला. आठवड्यातून दोन वेळा एकूण तीन महिने असा पायलट कार्यक्रम ठरविला.याचे निष्कर्ष पाहून पुढे प्रयोग चालू ठेवायचा असे ठरले. भरताच्या नाट्यशास्त्रावर आधारित भारतीय शास्त्रीय नृत्यशैली,आधुनिक पाश्चात्य नृत्यशैली,समकालीन पाश्चात्य नृत्यनाट्य चळवळ,यांचा मिलाप करुन आराखडा तयार केला होता.
. पहिल्या दिवशी आठदहा जण हजर होते पण प्रत्यक्ष वर्गात पाच जणानीच सहभाग घेतला.प्रयोगाच्या दृष्टीने तीन महिने सह्भागी झालेले तीनच होते.संचेती हॉस्पीटल शुभार्थीना दूर पडत असल्याने संख्या कमी असावी.पण नाउमेद न होता ऋषिकेशनी सहाय्यक मैथिली भुपटकर हिच्या सहकार्याने वर्ग चालू ठेवला
ऋषिकेशप्रमाणेच मैथिलीलाही या प्रयोगात रस होता.मैथिलीला पंधरा वर्षाचा भरतनाट्यातला अनुभव होता.ऋषीकेशकडे दोन वर्षे कंटेंपररी डान्स शिकली होती याशिवाय न्यूयार्क येथील 'मार्क मोरीस डान्स कंपनी' येथे तिने' Dance For PD' Teachers Training course पूर्ण केला होता.
प्रयोग .सुरु झाल्यावर.विविध लक्षणानुसार एक ते दहा श्रेणी देऊन जगण्याची गुणवत्ता तपासणारे तक्ते तयार केले होते.संचेती हॉस्पिटल मधील डॉक्टरांची यावर देखरेख होती.संचेती हॉस्पिटलच्या न्यूरॉलॉजी डिपार्टमेटचे प्रमुख डॉक्टर राजस देशपांडे यांचाही पाठिंबा होता.त्यांच्या मते हालचालींचा पॅटर्न बदलाला की डोपॅमिन निर्मितीला मदत होते.नृत्यात लय, ठेका याआधारे हे अधिक सहज होते. पीडी रुग्णांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि नैराश्य जाण्यास हे उपयोगी पडते.संचेती इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉक्टर पराग संचेती म्हणाले "This therapy works as physical rehabilitation ....this combination of treatment,rehabilitation,&dance is fantastic concept"
निरीक्षणे नोंदवण्यात येत होती.प्रयोग सुरु होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर होणारे फरक पाह्ण्यात आले.न्यूरॉलॉजिस्ट आणि आर्थोपेडिक डॉक्टरांच्या दृष्टीनेही ते आश्चर्यकारक होते.
प्रयोगात सह्भागी शुभार्थिंच्या स्नायुंच्या हालचालींची मर्यादा वाढली;
हालचालीच्या गतीवरील नियंत्रण सुधारले
जमिनीवरील हालचालीच्या वेळी तोल सांभाळण्यात सुधारणा झाली,
नृत्यातील हालचालीचा क्रम लक्षात ठेवण्यात सुधारणा.झाली.
बोलण्यातील स्पष्टपणा आणि आवाजाच्या पातळीत वाढ झाली.
काही पेशंटचा औषधाचा डोस २५%नी कमी झाला.
ऋषिकेशच्या द्रुष्टीने नृत्याची उपचार म्हणून परिणामंकारकता सिद्ध झाली होती.
ऋषिकेशने नोव्हेंबर २०१० मध्ये आश्विनी लॉज येथे याबाबतच्या अनुभवावर आधारित व्याख्यान दिले.या प्रयोगाची डाक्युमेंटरीही तयार केली.होती ती दाखवली.
सह्भागी सदस्यानी आपले अनुभव सांगितले.त्यांच्या चेहर्‍यावरील भाव, हालचालीतील आत्मविश्वास हा जास्त बोलका निष्कर्ष होता.आश्विनी दोडवाड आणि विलास जोशी या सहभागी शुभार्थीनी आपल्या भावना स्मरणिकेतील लेखातून व्यक्त केल्या बासष्ट वर्षाच्या पाचसहा वर्षे पीडी असलेल्या विलास जोशींची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती.आत्मविश्वास वाढला. ते परत स्कुटर चालवू लागले.चेहर्‍यावर तरतरी आली.बोलण्यात कमालीची सुधारणा झाली.त्यामुळे बोलताना वाटणारा संकोच दूर झाला.व्याधीचा विसर पडला."डान्स क्लासला संचेती हॉस्पीटलला गेलेल्यावेळी ओळखीचे कोणी भेटले तर विचारीत, 'कोणाला भेटायला आला?' तर मला सांगावे लागे मीच पेशंट आहे असे सांगितल्यावर त्याना आश्चर्य वाटे." असे मोठ्या अभिमानाने त्यानी नमूद केले.
आश्विनी ताईचा अनुभव ही इतराना नृत्याची प्रेरणा देणारा होता.सुरुवातीला अवघडलेपणा होता.आपल्याला नृत्य करताना पाहून कोणी हसत तर नाही ना असा संकोचही होता सरावाने दोन्ही कमी झाले.स्नायुंची ताठरता कमी झाली,चेहर्‍यावरचे गेलेले हावभाव परत आले.चालताना तोल सांभाळला जाऊ लागला, बोलण्यातला अडखळलेपणा जाऊन सुसंगतपणा आला,.हस्ताक्षर पहिल्यासारखे झाले.एकूणच निरोगी व्यक्तीप्रमाणे वर्तन झाले.सहभागीचा अनुभव पाहून.अनेकाना प्रयोगात सहभागी व्हायला हवे होते असे वाटले.
ऋषीकेशची हा प्रयोग पुढे चालु ठेवण्याची आणि शुभार्थीना मोफत मार्गदर्शन करण्याची तयारी होती होती.योग्य अशा जागेची व्यवस्था मंडळाने करावयाची होती.एरंडवणा भागात राहणार्‍या अरुण जोग आणि सुमन जोग या सदस्यानी आपली जागा देऊ केली.१ एप्रिल २०११ पासून आठवड्यातून तीन दिवस सकाळी ९ते१० यावेळात मार्गदर्शन सुरु झाले.बारा ते पंधरा शुभार्थी उपस्थित असतात.
चार पाच महिन्याच्या सरावानंतर नृत्यवर्गाचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले.ऋषीकेशच्या कन्टेंपररी डान्स शोमध्ये ते दाखवले गेले.सह्भागी शुभार्थींची मनोगतेही त्यात आहेत.त्यानंतर नंदादीप हॉस्पीटलमध्ये मित्रमंडळाच्या कार्यक्रमात,११एप्रिलच्या पार्किन्सन्स डे ला अशी प्रात्यक्षिके होतच राहिली. सह्भागींचा उत्साह वाढवत राहिली आणि इतर शुभार्थीना सकारात्मक उर्जा देत राहिली.जोशी आणि दोडवाड यांच्याप्रमाणेच इतरानाही फायदे झाले.
प्रज्ञा जोशी आणि मधुकर देशपांडे यानी लेखातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.४५व्या वर्षीच पीडी झालेली प्रज्ञा म्हणते नृत्योपचार उपक्रमामुळे माझ्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाला.हालचाल ,बोलणे, चालणे अशा प्रत्येक गोष्टीत गुणात्मक फरक झाला.शरीराचा ताठरपणा कमी कमी होत गेला.घरकामात, स्वयंपाकात व्यवस्थितपणा आला.तिसर्‍या मजल्यावरील माझ्या फ्लॅटमध्ये मी सामान घेउन एकटी चढु -उतरु लागले.पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यात बसमधे एकटी जाऊ लागले.मानसिकतेत सकारात्मक बदल झाला सर्वच शुभार्थीना सांगितलेल्या हालचाली लगेच जमतात असे नाही.पण मैथीली आणि ऋषीकेश न चिडता न कंटाळता पुनःपुन्हा हालचाली दाखवून करुन घेतात.असे तरुण हसतमुख प्रेमळ .नृत्य शिक्षक मिळाले आम्ही भाग्यवान आहोत."
मधुकर देशपांडे तर ८० वर्षांचे आहेत. त्यांचा तोल जात होता त्यामुळे आत्मविश्वास कमी झाला.होता कोणीतरी सोबत लागायची, वाहन लागायचे.पण आता ते एकटे घरापासून चालत क्लासला येतात.
या सर्वांच्यात झालेल्या सुधारणांमध्ये नृत्याचा उपचार म्हणून फायदा आहेच शिवाय ऋषीकेश आणि मैथीलीच्या प्रेम, जिहाळ्याचाही वाटा खूप मोठा आहे.
दोन वर्षे उलटून गेली तरी आजही हे मार्गदर्शन चालू आहे.अरुण जोग स्वतः शुभार्थी असल्याने प्रयोगात सामील ही झाले.मध्यंतरी त्यांचे दु:खद निधन झाले सुमन जोग काही दिवसासाठी अमेरिकेला गेल्या पण नृत्यवर्गासाठी जोगांचे घर खुलेच आहे.
सात आठ विद्यार्थी आले तर याशिवाय इतरत्रही वर्ग घेण्याची तयारी ऋषीकेशने दाखवली त्यानुसार भांडारकर रोडला मधुकर देशपांडे याच्या कडेही वर्ग चालू झाला होता.प्रज्ञा जोशी आणि विलास जोशी दोन्हीकडेही जात इतका त्याना नृत्यवर्ग आवडतो. पण संख्या कमी असल्याने तो बंद करावा लागला. अजूनही पुण्याच्या इतर भागात वर्ग सुरु करण्याची ऋषीकेशची तयारी आहे.आजची तरुण पिढी बेजबाबदार आहे म्हणणार्‍याना ऋषीकेशची ही कृती चपराक देणारी आहे.
शिकणारे शुभार्थी आणि शिकवणारे शिक्षक यांचा आता एक खास परिवार झाला आहे.तिळगूळ समारंभ, नातवंडांचे वाढदिवस,गाडी घेणे ( जोशीनी आता नॅनो घेतली आहे आणि ती चालवायलाही शिकले.),नातवाचे आगमन असे सोहळे साजरे होत असतात.सहली आयोजित केल्या जातात..गुरुपौर्णिमा, मैथिलिच्या लग्नाची पार्टी अशा विशेष कार्यक्रमाना आम्हालाही बोलवले जाते.
ऋषीकेशला पीडिशी दोन हात करणारे शुभार्थी पाहून प्रेरणा मिळते तर मैथीली म्हणते मला मिळालेल्या आनंदाची मोजदाद करता येणार नाही.असा हा समसमा संयोग.
या सगळ्या प्रयोगातून साध्य काय झाले? सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संशोधनाच्या क्षेत्राच्या दृष्टीने हे नगण्य असेल पण मित्रमंडळाच्या दृष्टीने खूप साध्य झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे पीडी झाला, आता संपल सगळ अस हतबल झालेल्या शुभंकर शुभार्थीचा आशावाद जागृत झाला. जगण्याची नवी प्रेरणा मिळाली.
नवीन सामिल होणार्‍या शुभार्थीना आता हेच शुभार्थी धीर देतात.असे जरी असले तरी अनेक गोष्टी सातत्याने चालू राहण्यासाठी अर्धवट राहिलेले प्रयोग पूर्ण करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे मित्र मंडळाला शक्य झालेले नाही या साठी हॉस्पीट्लस, स्वयंसेवी संस्थानीच पुढे यायला हवे.

No comments:

Post a Comment