Friday, 4 August 2023

प्रत्यक्ष सभा

                                                प्रत्यक्ष सभा

                    ११ सप्टेंबर २०२२ - करोना नंतर पहिली प्रत्यक्ष सभा किरण सरदेशपांडे यांच्या मदतीमुळे ओक ट्रस्ट येथे झाली.औरंगाबादचे शुभंकर रमेश तिळवे पुण्यात येणार होते.त्यांनी काही लोक एकत्र भेटू अशी इच्छा व्यक्त केली.whats app वर सात तारखेला मेसेज टाकला ११ तारखेला ५५ शुभंकर, शुभार्थी हजर झाले.रमेश तिळवे यांची शुभंकर शुभार्थीना भेटण्याची प्रबळ इच्छा,सुंदर व्यवस्था असलेला ओक ट्रस्टचा हॉल,सरदेशपांडे यांनी sponsor केलेले स्वदिष्ट जेवण,सरदेशपांडे पती, पत्नी आणि टीमचे अगत्य.शरच्चंद्र पटवर्धन आणि रामचंद्र करमरकर या बुजुर्गांची उपस्थिती,शुभंकर,शुभार्थींचा अमाप उत्साह यामुळे कार्यक्रम संस्मरणीय झाला.

               १७ ऑक्टोबर २०२२ - कोजागिरी निमित्त नीलिमा बोरवणकर  यांचे सत्र झाले.त्यांनी मान्यवरांच्या मुलाखती दरम्यान घडलेले किस्से सांगून श्रोत्यांचे रंजन केले.या प्रसंगी शुभार्थी नारायण फडणीस सर यांनी स्वागतपर गीत आणि समारोप गीत सादर केले.डॉ. शोभना तीर्थळी यांनी प्रास्ताविक केले.अंजली महाजन यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि सूत्र संचालन केले.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमानंतर अल्पोपहार आणि मसाला दुध  यांचा आस्वाद सर्वांनी घेतला.हा कार्यक्रम झूमवरून लाइव्ह दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.यासाठी अतुल ठाकूर,गिरीश आणि शिरीष कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले.

           १ डिसेंबर २०२२ - एक दिवशीय सहल आयोजित करण्यात आली.गेली दोन वर्षे होऊ शकला नाही तो सर्वांचा आवडता कार्यक्रम सहल.या वर्षीची सहल 'जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र मोराची चिंचोली' येथे आयोजित केले होते.आमचे शुभार्थी देवराम गोरडे आण्णा हे या केंद्राचे सर्वे सर्वा.त्यांच्या उदार आदरातिथ्याचा प्रत्यय घेतला.निसर्गरम्य वातावरणातील मनोरंजनाची ठिकाणे,मासवडी,पिठले,ठेचा,लापशी असे ग्रामीण भोजन हुरडा पार्टी,शुभार्थी,शुभंकरांनी सादर केलेले विविध गुण दर्शन,या सर्वामुळे ही सहल सर्वाना सुखावून गेली.पुढचे कितीतरी दिवस सहलीच्या आठवणी व्हाटसअप ग्रुपवर चालू होत्या.त्या काळात सगळे सहभागी जणू पीडी विसरले यापेक्षा सहलीचे यश ते कोणते?

            ९ एप्रिल २०२३ - जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त तीन वर्षानंतर एस.एम. जोशी हॉल येथे प्रत्यक्ष मेळावा घेण्यात आला.पुण्यातील तसेच परगावचे शुभंकर, शुभार्थीही आवर्जून हजर होते.सभागृह तुडुंब भरले होते.प्रवेश करताना ताक देऊन स्वागत करण्यात आले. शुभार्थीच्या कलाकृतींचे प्रदर्शन बाहेर मांडले होते ते पाहून सर्व जण आत येत होते.

  सुप्रसिद्ध क्रीडावैद्यक तज्ज्ञ हिमांशू वझे हे प्रमुख पाहुणे होते.गौरी इनामदार यांनी सुरुवातीला निमंत्रितांचे व उपस्थित सर्वांचे स्वागत केले.अंजली भिडे यांनी मधुर आवाजात इशस्तवन म्हटले.आशा रेवणकर यांनी मंडळाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.संस्थेचे संस्थापकसदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.अतुल ठाकूर यांनी वेबसाईट आणि स्वमदतगटाचे महत्व विषद केले.यानंतर डॉ. शोभना तीर्थळी यांनी कलाकृती प्रदर्शनातील सहभागींची माहिती सांगितली.गौरी इनामदार यांनी 'चला संवाद साधूया....' या पुस्तकाबद्दल आणि रुपांतरकार रामचंद्र करमरकर यांच्याबद्दल माहिती सांगितली.शरच्चंद्र पटवर्धन यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.यानंतर प्रमुख पाहुणे हिमांशू वझे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.वक्त्यांनी 'स्वास्थ्य संयोजन' या विषयावर श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान दिले.श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.गौरी इनामदार यांनी गुरु ठाकूर यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता केली. 
       १३ ऑगस्ट २०२३ - 'Lady with the magic hand' नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ.सुरभी धनावला यांचे निवारा सभागृहात व्याख्यान झाले.प्रार्थनेने सभेची सुरुवात झाली.डॉ.सुरभी या न्युरोफिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोथेरपिस्ट आहेत.निसर्गोपचार आणि मसाज थेरपी यांचा पारंपारिक वारसा त्यांच्याकडे असल्याने त्यांनी आधुनिक आणि पारंपारिक पद्धतीची सांगड घालून स्वत:ची उपचार पद्धती विकसित केली आहे.याआधारे त्यांनी रीजीडीटी,कंप,भास,फ्रीजिंग अशा पार्किन्सनच्या लक्षणावर प्रात्यक्शिकासह व्याख्यान दिले.अनेक शुभार्थी प्रात्यक्षिकासाठी मॉडेल म्हणून पुढे आले.आशा रेवणकर यांनी डॉ.सुरभी यांची ओळख करून दिली.उमेश सलगर यांनी आभार मानले.श्री.साठे यांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींग केले.कॉफी आणि बिस्किटे यांचा आस्वाद घेत गप्पा झाल्या.आणि कार्यक्रमाची सांगता झाली.  
 
       ५ नोव्हेंबर २०२३ - विविध गुणदर्शन
    यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा होनप,अंजली महाजन यांनी कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी खूप कष्ट घेतले.शुभार्थीनीही भरभरून प्रतिसाद दिला.सविता बोर्डे औरंगाबादहून आणि फडणीस सर तळेगावहुन आले होते.सहभागींची नावे पुढे दिली आहेत.
१. सविता बोर्डे -  नृत्य ....शिवपंचाक्षरी
२. सुरेश फडणीस - गाणे ....पुकारता चला हु मै
३. सुनील कर्वे - नकला
४. शुभदा गिजरे -  भजन .... पायोजी मैंने
५. उमेश सलगर -  कविता
६. अरुण सुर्वे -  नृत्य ....फ्युजन
७. जगदीश माहेश्वरी -  कविता
८. विजया मोघे - भजन ....राम नाम गा ले
९. मोहन देशमुख - गाणे .... फूलों के रंग से
१०. श्रद्धा भावे - विनोदी उखाणे
११. शैला भागवत आणि शशिकांत भागवत -  नृत्य .... मला सांगा
१२. किरण सरदेशपांडे -  नाट्यछटा .... ट्रॅफिक पोलीस
१३. प्रणिता नरवाडकर -  गाणे .... लग जा गले
१४. रेखा आचार्य -  नृत्य ....सूर निरागस हो
१५. सुधाकर माने -  नृत्य ....I am a disco dancer
  डॉ.अविनाश बिनीवाले आणि अविनाश धर्माधिकारी यांना कार्यक्रम पाहून उत्साह आला आणि स्टेजवर येवून अचानक सादरीकरण केले.शेवटी सैराटमधील गाण्यावर उपस्थितातील जवळजवळ सर्वांनी डान्स केला.हे दृश्य अवर्णनीय होते.'पार्किन्सनसह आनंदाने जगूया' हे ब्रीद प्रत्यक्षात उतरताना दिसत होते.
कार्यक्रमात प्रास्ताविक आणि आभाराचे काम अंजली महाजननी केले.वसू देसाईनी सूत्र संचालन केले.अंजली महाजननी केशवराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्व सहभागींना भेटवस्तू दिली.गप्पा मारत
अल्पोपहार झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
         
२० डिसेंबर २०२३.-  पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल. यावर्षीची सहल 'झपूर्झा' येथे गेली होती.
          यावर्षी सहलीसाठी शुभार्थींकडून कोणतीही वर्गणी न घेण्याचे ठरले. इतरांकडून रु. ७००/- घेण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे ते  घेतले. बघताबघता सहलीसाठी इच्छुक असणाऱ्यांची नावे येत गेली  सर्व सदस्यांचा उदंड प्रतिसाद पाहता एक मोठी बस, एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक कार घेऊन जायचे ठरले. कार घेऊन जाण्यामागे एक उद्देश असाही असतो की सहलीच्या ठिकाणी चुकून कोणाला काही त्रास झाला तर त्या सदस्याला घेऊन पुण्यात लवकरात लवकर परत येता यावे.
                सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निवारा येथे सगळे जमायला सुरुवात झाली. तिन्ही वाहनांमध्ये सर्व स्थानापन्न झाल्यावर " गणपती बाप्पा मोरया " म्हणत, एका वाहनापुढे नारळ वाढवून, सगळे झपूर्झाच्या दिशेने निघाले म्हणून सहलीची सुरुवात केली. मग काय  उत्साहात  सगळे गाणी म्हणायला लागले. त्याचबरोबर खाऊवाटपही सुरू झाले. बघता बघता झपूर्झा कधी आले ते कळलेच नाही.
            झपूर्झा हे कला आणि संस्कृती संग्रहालय खडकवासल्याच्या जवळ आहे. पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांचा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम.  आपल्या संस्कृतीची आणि पारंपारिक कलांची ओळख व्हावी, त्यांची आवड निर्माण व्हावी, विशेषतः आताच्या नवीन पिढीला, हा त्यामागचा उद्देश. सात एकर जागेवर वसलेल्या या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य परिसरात एकूण दहा कलादालने आहेत, ज्यातील कलाकृती नेहमी बदलत असतात. भारतातील राजा रविवर्मा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची चित्रे, काही शिल्पकृती, परंपरागत पैठण्या यांसारखी वस्त्रे, सोन्या-चांदीचे असंख्य दागिने, जुन्या वस्तू, विविध प्रकारचे दिवे, अशा कितीतरी गोष्टी इथे आहेत. झपूर्झाच्या व्यवस्थापनाने सुरुवातीला थोडी माहिती सांगितली. त्यानंतर चहा- बिस्किटे यांची व्यवस्था केली होती. तसेच तिथे पाच-सहा व्हील चेअर्सचीपण सोय केलेली होती. सगळीकडे फिरायला रॅम्प्स, लिफ्ट, प्रशस्त दालने, त्यामुळे शुभार्थींना तिथे फिरणे आणि कलाकृती बघणे खूपच सोयीस्कर झाले.  प्रत्येक दालनामध्ये तिथली माहिती द्यायला स्वयंसेवक होते. ठिकठिकाणी कलाकृतींबद्दलची माहिती लिहिलेली होती सगळेजण गृप्स करून दालने पाहत असल्यामुळे कुठेही गर्दी झाली नाही. अगदी निवांतपणे सगळी दालने आणि त्यातील कलाकृती बघता आल्या. भरपूर फोटोही काढता आले. 
                    विशेष म्हणजे ज्यांनी या कलासंग्रहालयाची निर्मिती केली ते श्री. अजित गाडगीळ मुद्दाम वेळ काढून सर्वांना भेटायला आले होते. 
           साधारण एक - दीडच्या सुमारास सगळेजण भोजनालयाकडे वळले. साध्या घरगुती बेताबरोबर उकडीचे मोदक हा एक सरप्राईज आयटम होता जेवणामध्ये. जेवल्यानंतर काहीजण आरामात गप्पा मारत बसले, काहीजण खडकवासला बॅकवॉटरच्या बॅकग्राऊंडवर फोटो काढण्यात रमले. काहींनी अजून थोडा फेरफटका मारला जवळपास. तिथे जवळच एक शंकराचे छोटेसे देऊळ आहे. देवळाबाहेरील दीपमाळ नेहमीपेक्षा वेगळी होती. आत गाभाऱ्यात खूप शांत वाटत होते.
                  थोड्या विश्रांतीनंतर चहापान झाले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. 
           ही सहल इतर सहलींपेक्षा थोडी वेगळी होती. नेहमीप्रमाणे मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा विविध छोट्या स्पर्धा, खेळ यांचा समावेश जरी यामध्ये नसला तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ' खूप काही छान बघायला मिळाले आज ' असाच भाव होता. सहलीनंतरचे काही दिवस तिथले फोटो, अरुण सुर्वेंनी तयार केलेले व्हिडिओज व्हाॅट्सॲप गृपवर सतत येत राहिले आणि प्रत्येकाला पुनःप्रत्ययाचा आनंद देत राहिले, हे मात्र नक्की
          ७ एप्रिल २०२४ - जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त एस.एम. जोशी हॉल येथे प्रत्यक्ष मेळावा घेण्यात आला.पुण्यातील तसेच परगावचे शुभंकर, शुभार्थीही आवर्जून हजर होते.सभागृह तुडुंब भरले होते.प्रवेश करताना ताक देऊन स्वागत करण्यात आले. शुभार्थीच्या कलाकृतींचे प्रदर्शन बाहेर मांडले होते ते पाहून सर्व जण आत येत होते.
          या वर्षीचे वक्ते न्यूरोसर्जन डॉ.महेश करंदीकर नाशिकहून आले होते.वेळेच्या बरेच आधी ते आले.कलाकृतीच्या प्रदर्शनाचा मनमुराद आनंद घेतला.प्रत्येक शुभार्थीला त्यांनी बारकाईने कलाकृतीबद्दल प्रश्न विचारले.त्यांचे कौतुक केले त्यांच्या कृतीमुळे सहभागी शुभार्थी भाराऊन गेले.
         यावर्षी स्टेजवरील सर्व बाबी शुभार्थिनी केल्या.इशस्तवन प्रणिता नरवाडे,नृत्याबद्दल माहिती शैला भागवत,नृत्य सहभागींना फुले देणे राजीव कारळे,स्मरणिका प्रकाशन किरण सरदेशपांडे,आभार उमेश सलगर,सूत्र संचालन गौरी इनामदार
         डॉ.अमित करकरे यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.त्यानंतर स्मरणिका प्रकाशन झाले.वक्त्यांनी 'पार्किन्सन्स माझा सांगाती' या विषयावर उद्बोधक, प्रेरणादायी व्याख्यान दिले.विविध संशोधनाच्या आधारे औषधोपचाराबरोबर इतर उपायांचे महत्व विशद केले.मंडळाच्या कार्याचे शुभार्थींच्या विविध कलांचे कौतुक केले.
        शेवटी जाताना स्मरणिका वाटप झाले पेढा आणि चिवडा देण्यात आले.
        ९ नोव्हेंबर २०२४ -
         





  •                

        


    पार्किन्सन्सविषयक गप्पा - ८३

                                                      पार्किन्सन्सविषयक गप्पा  - ८३

                        मुंबईहून माझी नणंद तीच्या मुलगी आणि जावयासह बऱ्याच वर्षांनी येणार होती.अपेक्षेपेक्षा थोडा उशीर होत असल्याने आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.एकमेकांना भेटण्यास उत्सुक होतो.तीही पार्किन्सन शुभार्थी असल्याने प्रवासाचा त्रास होईल का ही काळजीही होती.अखेर ती सुखरूप आली.पायऱ्या चढत असताना तिने पाउल पायरीच्या कडेला ठेवले.आणि तिची मुलगी थोडा आवाज चढवून म्हणाली, 'आई तुला किती वेळा सांगितले पायरीवर पूर्ण पाय दे म्हणून पडशील ना' मी तिला शांत करत म्हटले अग चिडू नको. तो तीचा दोष नाही.पार्किन्सनमुळे Visuospatial abilities वर झालेल्या परिणामामुळे असे होते.तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर मी म्हणाले,'सांगते तुला समजाऊन नंतर आधी फ्रेश व्हा'.तिला मी समजाऊन सांगितलेच पण हे गप्पमाध्येही सांगावेसे वाटले.कारण अनेक शुभंकरांकडून अशाच तर्हेची तक्रार मी ऐकली आहे.

                     माझ्या भाचीप्रमाणेच मीही तीर्थळींच्यावर याच कारणावरून चिडायची.लाईटचे बटण ऑन करायचे तर ते खूप लांबून पाय वर करून ऑन करायचे.पायरीच्या कडेवर पाय देऊन चढणे होतेच शिवाय खुर्चीवर समोरून बसताना इतके अलीकडे बसायचे की पडतील असे वाटायचे कडेनी खुर्चीकडे गेले तर खुर्चीचा हात असेल तिथेच बसायला पहायचे.टेबलवर पाण्याचा ग्लास ठेवताना टेबलाच्या कडेवर ठेवायचे त्यामुळे तो खाली पडायचा.नलीन जोशींचीही प्रज्ञाबद्दल हीच तक्रार होती.

                    एकदा PDMDS च्या ऑनलाईन सभेत Visuospatial abilities या विषयावर व्याख्यान झाले आणि मी इतके दिवस तीर्थळींच्यावर चिडायची त्याचे वाईट वाटले.अतिशय उत्तम फोरव्हीलर चालवणाऱ्या ह्यांचा अंदाज का चुकायचा हे लक्षात आले.अपराधीपणाची भावनाही आली.

                येथे हे स्पष्ट करावे लागेल की सर्वच शुभार्थीना ही समस्या येत नाही.ज्यांना ही समस्या आहे त्यांच्यासाठी व्याख्यानाची लिंक सोबत दिली आहे ती अवश्य पहा. अत्यंत सोप्या भाषेत वेगवेगळ्या स्लाईड्सच्या आधारे उपयुक्त माहिती दिलेली आहे.

                    येथे मी थोडक्यात सांगते.आपल्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या वस्तूकडे आपण पाहतो तेंव्हा किंवा जातो तेंव्हा आपल्या दृष्टीला त्या वस्तूची उंची,खोली,अंतर,दिशा या सर्व बाबींचा अंदाज असतो. त्यानुसार क्रिया होतात.रोजच्या व्यवहारात या गोष्टी इतक्या सहज होत असतात की एवढे सर्व पाहिले जाते हे लक्षातही येत नाही.काही पार्किन्सन शुभार्थीची हे पाहण्याची द्रूष्टी आणि अंदाज म्हणजेच Visuospatial abilities बाधित झालेल्या असतात.म्हणजे आपल्याला खुर्चीकडे जाताना ती खुर्ची दिसते त्याच्या अलीकडे शुभार्थीला खुर्ची दिसते.पायरी चढतानाही पायरी पर्यंतचे अंतर,खोली,उंची यांचा अंदाज चुकतो.

                 यापेक्षा जास्त माहिती मी देत नाही.कारण ज्यांना त्रास आहे त्या शुभार्थीच्या शुभंकरांनी सोबत दिलेली लिंक पहावी असे मला वाटते.आणि आपण शुभार्थीला बोल लावले याबद्दल अपराधीपणाची भावनाही ठेवण्याची गरज नाही.शुभंकर शुभार्थीसाठी जीवाचे रान करता असतो.अज्ञातून आपल्याकडून अशा चुका झाल्यास स्वत:ला माफ करून टाकावे.

                  वेगवेगळ्या स्वमदतगटातून विविध माहितीचा खजिना आपल्यापर्यंत पोचत असतो.त्याद्वारे हा गुंतागुंतीचा आजार जास्तीत जास्त समजून घ्यावा.याबाबत यथार्थ ज्ञान देउन शुभार्थीची जगण्याची गुणवत्ता उत्तम ठेवण्यास मदत करणाऱ्या तज्ज्ञांबद्दल मनापासून कृतज्ञता मानावी.   

     

      https://www.youtube.com/watch?v=Vwcm7bePYjQ

     

                      

     

                           

    Friday, 28 July 2023

    क्षण भारावलेले - २४

                                                   क्षण भारावलेले - २४

                     १२ जुलै १५ ला अश्विनी हॉल मध्ये नेहमीप्रमाणे मासिक सभा होती.न्यूरॉलॉजिस्ट राहुल कुलकर्णी यांचे व्याख्यान होते. त्यांना व्याख्यानाला बोलावण्यासाठी शेंडे साहेबांची कितीतरी दिवस खटपट चालली होती.हल्ली शेंडे साहेबांचा ऑफ पिरिएड वाढला होता.तरीही ऑन पिरिएड मध्ये ते मंडळासाठी काहीना काही करत असतच.त्यातीलच ही एक खटपट.

    एकीकडे राहुल कुलकर्णी येणार याचा आनंद होता.पण त्याला दु;खाची झालर होती.ज्यांनी ही खटपट केली ते शेंडे साहेब आम्हाला सोडून गेले होते.त्याना जाऊन एक महिनाही झाला नव्हता.'शो मस्ट गो ऑन' म्हणून सभा तर होणारच होती.शेंडे साहेब कितीदा तरी पडायचे.खोक पडलेली असायची स्वत:च डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग करून घ्यायचे आणि लगेच सभेला यायचे.त्यांचा हा वसा आम्हाला चालवायचा होता.

                   मी श्यामलाताईना फोन करून सभेल येताय ना असे बिचकतच विचारले होते. 'बघू' असे त्या म्हणल्या होत्या. त्यांनी यायलाच हवे अशी अपेक्षाही नव्हती.अजुन भेटायला लोक येतच होते.श्यामलाताई मंडळाच्या कामात आता सहभागी होतील का? अशी मनात शंकेची पाल चुकचुकत होती.त्या सुरुवातीपासून म्हणायच्या मला असा सोशल वर्कमध्ये रस नाही.ह्यांच्यासाठी मी सहभागी होते.श्यामाताईंच्या असण्याची आता इतकी सवय झाली होती की त्या नसणार ही कल्पनाही करवत नव्हती.वेळोवेळी त्यांच्या अनुभवाचा,शुभंकर म्हणून शुभार्थीला हाताळण्याच्या कौशल्याचा आम्हाला आधार होता.

     शेंडे साहेब गेले त्या दिवसाचे स्मरण अजूनही ताजे होते.दुपारी श्यामाताईंचा फोन आला तर कामाचेच काहीतरी बोलायला फोन केला असेल असे वाटले.फोनवर शेंडेसाहेब गेले असे ऐकले आणि आपल्याला चुकीचे तर ऐकू आले नाही न असे वाटले कारण दोन तीन आठवड्यापूर्वीच २१ मेला शेंडे साहेबांचा वाढदिवस साजरा करयला गेलेल्यावेळी ते अगदी छान होते.

    दीपा, अंजली आमचा नातू आर्य आणि आम्ही दोघे त्यांचा वाढदिवस साजरा करायला त्यांच्या घरी गेलो होतो. ते खूप खुश होते.घरी कोणी आले की त्यांना नेहमीच आवडे.त्यांचा ऑन पिरिएड चालू होता.पार्किन्सन गायब झाला होता.त्यामुळे श्यामाताईंचा फोन आल्यावर माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता.मी आणखी कोणी आहे का असे धीर करून विचारले.श्यामाताई घरी एकट्याच होत्या.

    मी अंजलीला फोन केला आम्ही जवळ असल्याने लगेच त्यांच्या घरी गेलो.त्यांनी पहिला प्रश्न विचारला तीर्थळींच्या कडे कोण आहे?  ते एकटेच आहेत ते राहू शकतील असे मी सांगितले.त्यावर त्या म्हणाल्या.त्यांच्या नात्यातले कोणीतरी गेले. शेंडे साहेब असेच म्हणाले मी राहतो तु जा.पण घरी आले तर  यांना खूप त्रास झाला.त्यामुळे तुम्ही आधी घरी जा.खर तर बऱ्याच पार्किन्सन झालेल्या व्यक्तींच्या दु;खद घटना घडली की भावना अनावर होतात त्यामुळे पार्किन्सनही वाढतो हे मी पहिले होते.तीर्थळींच्याबाबतही असे होते पण मला त्यावेळी ते लक्षात आले नाही.श्यामाताईंना मात्र अश अवस्थेतही या गोष्टीचे भान होते. 

    मला मात्र घरी जाववत नव्हते.मी आमच्या जवळ राहणाऱ्या प्रकाश जोशीना फोन करून आमच्या घरी जायला सांगितले.मी घरी गेले तर जोशी म्हणाले,मी आलो बरे झाले त्यांना दु;ख अनावर झाले होते.कोणीतरी जवळ हवे होते.तीर्थळींना शेंडेसाहेब मोठ्या भावासारखे होते.अजूनही त्यांचा विषय निघाला की ते गहिवरतात.

     एवढ्या कठीण प्रसंगातही श्यामलाताईना मला हे सांगायचे सुचले याचे मला आश्चर्य वाटले.हळूहळू त्यांचे नातेवायिक आले.शेजारी आलेच होते.देहदान करायचे असल्याने हॉस्पिटलला फोन करणे चालू होते.तरीही त्या मधूनमधून मला घरी जा सांगत होत्या.या सर्व परीस्थितीत  श्यामलाताईच्या संयतपणे निर्णय घेण्याच्या क्षमतेला मी मनातल्या मनात सलाम केला.

    अश्विनिमध्ये सभेची तयारी चालली होती.खुर्च्या मांडल्या जात होत्या.माझे लक्ष मात्र श्यामलाताई येतात का यावर होते.त्या आल्या.आणि मी लांबूनच मनातल्या मनात घट्ट मिठी मारली.त्यांनी कितीही मला या कामाची आवड नाही म्हटले तरी त्या मंडळाच्या कामात मनोमन गुरफटल्या होत्या.आता आमचा एक परिवार झाला होता.हे काम आता घरचेच होते.कामाचा व्याप वाढत होता.शेंडे साहेबांचे ट्रस्ट व्हावा हे स्वप्न प्रत्यक्षात आले.शरच्चंद्र पटवर्धन यांनी ट्रस्ट मध्ये येण्यात रस नाही असे सांगितले होते.एकमुखाने अध्यक्ष म्हणून श्यामलाताईच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

    त्यांचा आदर्श पुढे ठेवून आपल्या शुभार्थीच्या नसण्यानंतरही अंजली,मृदुला,आशा,सविता या ट्रस्टच्या कार्यात आमच्याबरोबर आहेत.नाशिकहून रमेशभाऊ तिळवे,उषाताई,विजयाताई दिवाणे,बेळगावच्या आशाताई नाडकर्णी,मनीषाताई लिमये,नाशिकहून संगीता आगाशे,मुंबईहून अनुराधा गोखले अशा यांनीही ग्रुप सोडला नाही.विविध कामात मदतीचा हात पुढे केला.अनेक कुटुंबीय पार्किन्सन झालेल्यांपर्यंत मंडळाची माहिती पोचवणे,देणगी देणे असे हस्ते परहस्ते काहीना काही करताच असतात.श्यामाताईंनी त्यांच्याही नकळत असे धडे घालून दिले आहेत.

    श्यामलाताईच्या येण्याचा त्यादिवशीचा क्षण आणि त्याचे भारावलेपण माझ्या मनात अजूनही कोरले गेलेले  आहे.२५ जुलैला त्यांच्या गप्पांच्या कार्यक्रमात काही आठवणी सांगायच्या राहिल्या त्यातील ही एक.  'आमच्या आधारस्तंभ श्यामलाताई शेंडे' या त्यांच्यावर लीहिलेल्या लेखाची लिंक सोबत जोडत आहे.त्यातून त्यांची नेमकी ओळख होईल.

     

    https://parkinson-diary.blogspot.com/2021/10/blog-post.html

     



     
     

                    

    Wednesday, 17 May 2023

    क्षण भारावलेले - २३
















                                                        क्षण भारावलेले - २३

                            ९ एप्रिलचा मेळावा होउन इतके दिवस होऊन गेले पण झिंग अजून उतरली नाही.भारावलेपण संपले नाही.मेळाव्यापुर्वी,मेळाव्याच्या दिवशी आणि मेळाव्यानंतर सातत्याने सुखावणारे काहीना काही घडत राहिले. 'भेटीत तृष्टता मोठी' अशी भावना अनेकांच्या मनात होती.एकमेकाना न पाहता Whatsapp च्या माध्यमातून ओळखी झालेल्या सर्वाना प्रत्यक्ष भेटीची ओढ वाटत राहिली.या प्रत्यक्ष कार्यक्रमाना, सहलीला भरभरून प्रतिसाद मिळाला.नाती अधिक दृढ झाली.या कार्यक्रमांचे फोटो व्हिडीओ पाहून न आलेल्यानाही यावेसे वाटत राहिले.या सर्व दिवसात आमच्या सर्वांतील नाते संबंधाची घट्ट विण दर्शन देत राहिली.सुखावत राहिली.

                         जानेवारी,फेब्रुवारीपासूनच शुभंकर,शुभार्थींचे लेखन यायला सुरुवात झाली.शैला भागवत यांनी लेखनाबरोबर पेंटिंग केलेल्या बाटल्यांचे फोटो,व्हिडीओ पाठवला.कला हा माझा प्रांत नाही तरी हे करताना मन रमते म्हणून करत आहे असे त्या म्हणत असल्या तरी पेंटिंग पाहिल्यावर व्वाव असे सहज उद्गार निघाले.अशा ५० बाटल्या करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठरविले होते.कलाकृती प्रदर्शनाच्या एन्ट्रीची सुरुवातच दमदार झाली होती.

                        गीता पुरंदरे त्यांचा मुलगा लंडनहून येणार होता त्यामुळे कार्यक्रमाला येणार नव्हत्या पण कलाकृती पाठवून देईन म्हणाल्या.उमेश सलगर सांगलीला जाणार होते.गीताताईना भेटायला गेले.त्यांचे आदरातिथ्य,बाग सर्व पाहून खुश झाले.येताना त्यांची ४५ पेंटिंग्ज बरोबर घेऊन आले.पेंटिंग्ज देताना त्यांनी ती मोजलीही नाहीत याचे सलगरना खूप आश्चर्य वाटत होते.काही कारणाने थोडे नैराश्यात जाऊ लागलेले सलगर भरभरून उर्जा घेऊन आले

                        नागपूरच्या ज्योती पाटणकर याही कुरिअरने आपल्या विहीणबाईंच्याकडे मण्यांच्या विविध कलाकृती पाठवणार होत्या.परगावच्या शुभार्थींचा उत्साह् पाहून आनंद वाटत होता.पुण्यातल्या काहीना मात्र परगावी जावे लागणार होते.

                      राजीव कराळे नेपाळला जाणार होते.ते फोटोग्राफी उत्तम करतात.व्यक्तींच्यापेक्षा निसर्ग,वास्तू,देश परदेशातील प्रेक्षणीय स्थळे यांचे फोटो असतात. Instagram वर त्यांचे हजारो फोटोग्राफ आहेत.आपण कार्यक्रमाला असणार नाही याची त्याना हळहळ वाटत होती.त्यांनी निवडक फोटोग्राफ पुठ्ठ्यावर चिकटवून आशाकडे आणून दिले.                         

                 सुनील कर्वेही अमेरिकेला निघाले होते.त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी सविताकडे आणून दिली.मी त्यांच्यावर थोडी रागाऊन म्हणाले होते कार्यक्रम उरकून जायचे ना? ते काहीच बोलले नाहीत.४ एप्रिलला त्याना नात झाल्याचा मेसेज आला आणि त्याना जायची घाई का होती समजले.त्यांचे लक्ष मात्र येथेच होते. कार्यक्रम लाईव्ह करा असा त्यांचा आग्रह चालला होता.त्यांच्या फोनमधून, मेसेजमधून कार्यक्रम चुकतोय याचे त्याना किती वाईट वाटते हे समजत होते.१० तारखेला कार्यक्रमाचे वर्णन करणारी त्यांची कविता आली. प्रत्यक्ष हजर असल्यासारखे त्यांनी वर्णन केले होते. 

                मुलाच्या treatment साठी गेलेल्या गोटखिंडीकरांचा पुत्तुरहून उपस्थित राहणार नसल्याचा आणि नंतर शुभेच्छा देण्यासाठी असा दोनदा फोन आला.त्यानाही कार्यक्रम चुकणार याची खंत वाटत होती.   वेगवेगळ्या कारणांनी उपस्थित राहू शकणार नसणार्यांच्या भरभरून शुभेच्छा येत होत्या.whats app वर सर्व वातावरण मेळावामय झाले होते. 

                   मेळावा यशस्वी होण्यासाठी अनेक मदतीचे हात हवे होते.दरवर्षी फोन करून सर्वाना कार्यक्रमाची माहिती दिली जाते.असे १९/२० जण फोन करण्यास तयार झाले.यात पुण्यातील लोकांबरोबर इंदूरहून वनिता सोमण,औरंगाबादहून रमेश तिळवे,सांगलीहून गीता पुरंदरे,नाशिकहून संगीता आगाशे,बेळगावहून आशा नाडकर्णी याही फोन करणार होत्या.सर्वांनी उत्तम  काम केले.कोण येणार कोण नाही आणि का नाही हे सर्व आता समजले होते.कलाकृती कोण ठेवणार हेही नक्की झाले.

                   एस.एम.जोशी सभागृहातून मिळणारी टेबले पुरणार नव्हती.दाते मंडपवाल्यांकडून भाड्याने टेबले आणली.तीही अपुरीच पडली.नेहमीप्रमाणेच काहींनी ऐन वेळी कलाकृती आणल्या. आम्ही त्या नाकारत नाही.हा शुभार्थींचा उत्सव असतो.त्याना आनंदी राहण्यास प्रवृत्त करण्यासाठीच तर आटापिटा असतो.      

                  गीता पुरंदरेना कलाकृती पोचल्याचा फोन केला तर त्या म्हणाल्या, मुलागा त्यावेळी दुसरीकडे जाणार आहे त्यामुळे आम्ही येत आहोत.त्यांचे येणे सार्थकी लागले.कारण कार्यक्रम संपतासंपता प्रेक्षकातून आवाज आला त्या गीता पुरंदरे कोण ते पाहू दे आम्हाला.त्यांना स्टेजवर बोलवले गेले.आपल्या पुष्परचनेने सर्वांची रोजची  सकाळ आनंदी करणार्या फुलराणीला सर्वाना याची देही पाहता आले.             

                  कलाकृती मांडणे,निमंत्रितांचे आगत स्वागत,नोंदणी,पुस्तक विक्री,देणग्या स्वीकारणे, स्मरणिका देणे,ताक,खाउची  पाकिटे वाटणे,स्टेज व्यवस्था अशी कितीतरी कामे असतात.याकामासाठी उत्साहाने आपणहून स्वयंसेवक आले.गिरीश,शिरीष बंधुद्वय,वैशाली खोपडे हे तर आमचे एव्हररेडीअसतात.उमेश सलगर,मनीषा लिमये,मिलिंद भावे,अंजली भिडे, याना हक्काने मदतीला बोलावले,गौरीच्या पतीने,सुर्वेनी आपणहून मदतीला येणार असल्याचे सांगितले.नकार कोणीच दिला नाही. मनीषाताईंनी मला बैठे काम नको.फिरण्याचे द्या असे मोकळेपणानी सांगितले.मृद्लाची सून क्षितिजा आणि माझी लेक सोनाली या घरच्याच.या शिवाय आशाच्या मैत्रिणी ललिता,विजू,अंजलीची मैत्रीण पुष्पा,ऐनवेळी मदतीला आलेले आणि मलाही माहित नसलेलेही अनेक.सगळेजण तीन वाजल्यापासून आले होते.

                 अतुल ठाकूर अगदी लवकर आले होते. यावर्षी ते प्रथमच कार्यक्रमाला आले होत.ते ग्रुपमध्ये सर्वाना प्रिय आहेत.त्याना पाहण्यास सर्व उत्सुक होते. मला स्टेजवर बोलावून सत्कार करणार नसाल,काही भेट देणार नसाल तरच मी येईन असे त्यांनी सांगितले.आम्ही अट मान्य केली.वेबसाईट, मंडळासंबंधी बोलण्यास मात्र ते तयार झाले.कार्यक्रमाची सुंदर आणि सविस्तर वृत्त लगेच लिहून त्यांनी ग्रुपवर टाकले.त्याची लिंक सोबत देत आहे.त्याबद्दल मी काहीच लिहिणार नाही.

               आणखी एक सुखद धक्का. काही निमित्ताने औरंगाबादच्या रमेशभाऊना फोन केला तर ते म्हणाले मी बसमध्ये आहे.गीरीशही आहे. चार पर्यंत पोचेन.त्याना पाहून सर्वच खुश झाले.आल्यावर दोघेही मदतीला लागले.त्यांचे चार शब्द,स्पर्श सर्वांनाच दिलासा देतात.ते दोघे आले की मला अदृश्य रुपात त्यांची शुभार्थी पत्नी कै.नीला दिसत असते तिच्यामुळे तर ते ग्रुपमध्ये आले.कार्यक्रम संपल्यावर ते लगेच मिटिंग असल्याने परतही गेले.रक्ताच्या नात्यातही आढळत नाही असा जिव्हाळा आमच्या सर्वात निर्माण झाला आहे.

               संगीता आगाशे नाशिकहून आल्या तेही भेटीच्या ओढीनेच.आगाशेना जाऊन त्यादिवशी बरोबर महिना झाला होता.मंडळाचे कोणतेही काम मला सांगा हे त्यांनी आवर्जून सांगितले.ठाण्याच्या अनुराधा गोखले याही गोखले गेल्यावर संपर्कात आहेत सहलीला येतात.गोखलेंच्या स्मरणार्थ देणगी देतात.तीन वर्षात प्रत्यक्ष संपर्क झाला नव्हता.यावेळी आल्या.प्रत्येक जण येऊन भेटत होते.मला कोणाकोणाशी किती किती बोलू असे झाले होते.आनंदाने मन भरून आले होते.मिठीतून स्पर्शातून भावना जाणवत होत्या.

             प्रमुख वक्ते हिमांशू वझे यांच्या अतिशय उपयुक्त अशा भाषणाबरोबर ,वागण्यानेही आम्ही भारावूनन गेलो. त्यांनी आपल्या कार्यबाहुल्यातून आमच्या स्मरणिका वाचल्या होत्या.त्याबद्दल कौतुक केले. अर्धातास आधी येऊन कलाकृती प्रदर्शन पाहिले.सर्वाना ते आपल्यातलेच वाटले.

              इतर आलेले लोकही शुभार्थींच्या कलाकृती पाहून चकित होता होते,न मागता देणग्या देत होते.एकुण कार्यक्रमातून एक हार्मनी जाणवत होती.

               कार्यक्रमानंतरच्या, कार्यक्रमाबाबत, स्मरणिकेबाबत प्रतिक्रिया.'आनंद पोटात माझ्या मावेना' अशाच होत्या.या सर्वातून केलेल्या श्रमाचे सार्थक झाले असे वाटले.'मी आहे कारण आम्ही आहोत' हे उबंटू तत्वज्ञान सर्वार्थाने अमच्याबाबत खरे ठरत असल्याचा पुन्हा प्रत्यय आला.

                 

               

                     

                      

     

     

                       

    Saturday, 13 May 2023

    पार्किन्सन्सविषयक गप्पा - ८२

                                                  पार्किन्सन्सविषयक गप्पा  - ८२

                                          जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांची एक सभा घेतो. झालेल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा घेऊन काही सुधारणा हव्यात का हेही पहिले जाते.प्रत्येक जण आपापले मत सांगत होते.डॉ. अमित करकरे यांनी या ग्रुपकडून मला काय मिळाले हे सांगताना आमच्या झूम मिटिंगबद्दल  सांगितले त्यांनी अनेक ठिकाणी झुमवर व्याख्याने दिली इतरत्र दिसणारा ढिसाळपणा मंडळाच्या सभेत दिसला नाही.प्रत्येकजण शिस्तबद्धपणे ऑडिओ,व्हिडीओ म्युट करून होता.हवे तेंव्हा अनम्युट करत होता.त्यांच्या या निरीक्षणाने आम्ही नक्कीच सुखावलो.हे सहजासहजी झाले नव्हते.सुरु केले तेंव्हा सर्वांनाच हे तंत्र नवीन होते.  

                 लॉकडाऊनच्या काळात अतुल ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स चा प्रस्ताव मांडला.रमेश तिळवे,डॉ.रेखा देशमुख,वनिता सोमण,जोस्ना सुभेदार यांनी कल्पना उचलून धरली. झूम लोड करण्यापासून आमची सुरुवात होती. पहिली ट्रायल एप्रिल २०२० झाली.यानंतर दोन तीन ट्रायल मिटिंग झाल्या.अमेरिकेहून आमच्या अध्यक्ष श्यामला शेंडेही हजर राहिल्या.सभा यशस्वी झाल्या.पहिली ट्रायल व्याख्यानही आपल्यातल्याच कोणाचे तरी ठेवावे म्हणू डॉ. रेखा देशमुख यांचे 'आनंदी कसे रहावे' या विषयावर व्याख्यान झाले.

             मोफत झूम वापरत असल्याने.४० मिनिटांनी थांबावे लागे.हा एक अडथळाच होता.दुसरा अडथळा झुमच्या विश्वासार्हतेबद्दल अनेकांच्या मनात शंका होत्या.आपले बँकेतील पैसे जातील इथपर्यंत भीती होती.मग इतर काही app वापरून पाहिली.ती सोयीची वाटत नव्हती.हृषिकेशने १२ मेला झूमवर ऑनलाईन डान्स सुरु केला.PDMDSचे कार्यक्रमही झुमवर होते. या दोन्हीकडे हजर राहणार्यांनी झूमचा आग्रह धरला.बहुमताने झूम सुरु झाले.झुमचे पैसे भरून ४० मिनिटात बंद होण्याच्या अडथळ्यावर मात केली.या सर्व काळात रमेश तिळवे, मयूर श्रोत्रीय आदींनी तंत्रज्ञानविषयक भ्रामक समजुती दूर करण्याचे प्रयत्न केले.अतुल यांनी होस्ट म्हणून आणि गिरीशनी कोहोस्ट म्हणून उत्तम कामगिरी केली

                 अतुलने भेटू आनंदेची कल्पना सुचविली तिनेही बस्तान बसवले.यु ट्यूबवरील व्हिडीओ आणि Viewer वाढू लागले.या काळात वेळोवेळी ऑडीओ,व्हिडीओ म्युट कसा करायचा.प्रश्न विचारताना चालू कसा करायचा, काय टाळायचे.याबाबत सूचना Whats app वर दिल्या जाऊ लागल्या.जे करत नाहीत त्याना पर्सनली ते कसे करायचे हे समजाऊन दिले जाऊ लागले.सार्वजण झुमला सराईत झाले.

                 या काळात आणखी एक काम केले ते म्हणजे सर्व सभासदाना फोन करून झूम मिटिंग चालू झाल्याचे सांगितले.ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्याना आधी घरातील इतरांच्या फोनवरून जॉईन होउन नंतर स्वत:चा फोन घेण्यासाठी प्रवृत्त केले गेले.वैशाली खोपडेनी हे काम चोख केले. स्मार्टफोन हे त्यांची मानसिक अवस्था सुधारण्यासाठीचे औषध आहे असे ती सांगे.आता बहुतेक जण स्मार्ट फोन वापरतात.सगळीकडे निराशेचे वातावरण असताना आमचे शुभंकर आणि शुभार्थी मात्र Whatsapp वरील इतरांच्या कलाकृती, कविता. सकारात्मक प्रतिक्रिया पाहून मोटीवेट होत होते.एकमेकाना आधार देणारा सुंदर परिवार झाला.परगावचे लोक मंडळाशी जोडले गेले.आता समाजात मिसळायला कोणते बंधन नसले तरी ऑनलाईन सभा चालूच आहेत.

                 कदाचित ही सर्व जंत्री कंटाळवाणी वाटेल पण डॉ.अमित करकरे यांच्या वाक्याने २० सालापासून चालू झालेली झूम मिटिंग अनेकांच्या सहकार्यातून कशी स्थिरावत गेली याच्या आठवणी जाग्या झाल्या.या प्रक्रियेचीची नोंद व्हायला हवी असे वाटले.एखादा उपक्रम यशस्वी व्हायचा असला तर त्याला  सर्वांनी एकत्र येऊन भिडायला लागते हे सांगावेसे वाटले.

                 

     



     

    Thursday, 13 April 2023

    मेळावा २०२३ - कलाकृती

                                                    मेळावा २०२३  - कलाकृती

                         ' पार्किन्सनसह आनंदाने जगूया' हे मंडळाचे ब्रीदवाक्य आहे.असे आनंदी राहणे सहज सोपे नाही पण अशक्यही नाही.शुभार्थीच्या कलाकृती या आनंदाच्या अभिव्यक्ती आहेत.आनंदाचाही रियाज हवा त्यासाठी कला हे महत्वाचे मध्यम आहे हे अनुभवांनी मी सांगू शकते.

                              कलाकृतीत पेंटीगचे प्रमाण जास्त आहे.सांगलीच्या गीता पुरंदरे रोज Whatsapp वर पुष्परचना टाकतात. पेंटींगमध्येही त्यांचा हात कोणी धरू शकत नाही.मधुबनी,वारली,स्टेनगलास अशी भरपूर विविधता त्यात आहे आनंद देणे, आनंद लुटणे त्या प्रतिदिन करतात.त्यांनी ४५ कलाकृती इदं न मम म्हणत मंडळाला दिल्या.पती पत्नी दोघे शुभार्थी आहेत.आवर्जून सांगलीहून आले आहेत.

                   डॉ.प्रकाश जावडेकर यानी निद्रानाशावर उत्तर म्हणून कलेचे बोट धरले त्यांच्या शेकड्यांनी कलाकृतीपैकी काही येथे ठेवलेत.फेसबुकवर सर्व पाहता येतील.काही बक्षीसपात्र आहेत.

                  भूषणा भिसेने ऑफ पिरिएड मध्ये कुंचला हातात धरला आणि पीडिला ठेंगा दाखवत चमत्कार केला.कोणी काही उत्तम काम केले की त्या आपल्या कलाकृती भेट देतात.

                  २२ वर्षे पीडी असलेल्या गोपाळ तीर्थळी यांनी वारली पेंटींग ठेवली आहेत.कलामग्न असताना पीडी थांबलेला मी प्रत्यक्ष पाहिला आहे.

                 अशोक कुर्तकोटी यांनी स्केचेस ठेवली आहेत.

                  नारायण जोगळेकर येऊ शकणार नाहीत पण डंजोनी माझ्याकडे पेंटिंग आली. 

          शैला भागवत यांनी बाटल्या पेंटिंग केल्या आहेत.शिवाय वारली आर्टचे कोस्टर केले आहेत.

    गीता पुरंदरे आणि शैला भागवत यांच्या कृती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.त्यातून येणारे पैसे त्या मंडळाला देणार आहेत.

         डीबीएस सर्जरी झालेल्या ज्योती पाटणकर या सातत्याने विविध कलाकृती करतात.ज्या पाठवणे  शक्य आहे अशा मण्यांच्या कलाकृती त्यांनी नागपूरहून कुरिअरने विहीणबाई स्मिता नेर्लेकर कडे पाठवल्या आहेत.आणि उत्साही विहीणबाई त्या घेऊन हजर आहेत.

     अमेरिकेला गेल्याने गैरहजर असलेल्या  सुनील कर्वे यांच्या ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखिताने मात्र हजेरी लावली आहे.ट्रेकर राजीव कराळेही नेपाळला गेलेत जाताना फोटो रेवणकर यांच्याकडे देऊन गेले.त्यांचे हजारो उत्तम फोटो Instagram वर आहेत.अरुण सुर्वेही ट्रेकर आहेत त्यांचेही फोटो आहेत.थरथरणार्या हाताना थांबवण्याची जादू या दोघांच्याही फोटोग्राफमध्ये आहेत. 

    सर्व ठिकाणी सहभाग घेणार्या शुभदा गिजरे यांनी विणकाम आणि ग्रीटिंग ठेवली आहेत.

    किरण सरदेशपांडे यांची क्रिएटीविटी अफलातून आहे त्यांनी पाठ खाजवण्यासाठी खरारा,जाकीटचे डिझाईन,आणि क्राफ्ट मध्ये बैलजोडी ठेवली आहे.सीमा कळके यांनी क्राफ्टचे विविध नमुने ठेवले आहेत.

    या प्रदर्शनात आवळा सुपारी आणि भरल्या मिरच्या अशा रेसिपी आहेत. आणि त्या  ठेवलेल्या  आहेत एका  पुरुषांनी उमेश सलगर यांनी.

    विविध भाषा आणि कोश वाड्मय कर्ते मुंबई विद्यापीठाकडून डी.लिट.मिळवलेले डॉ,अविनाश बिनीवाले 

    यांनी पीडी झाल्यावरही सहा पुस्तके लिहिली यात अनेक भाषात भाषांतरित झालेली मदिला कादंबरी आहे.

    काहीनी ऐनवेळी कलाकृती आणल्या असतील.

    आपण सर्वांनी हे प्रदर्शन पाहून शुभार्थीच्या आनंदात भर घालावी ही नम्र विनंती.

                     

                            

    Thursday, 6 April 2023

    पार्किन्सन्स मित्रमंडळ - एक स्वमदतगट

     पार्किन्सन्स मित्रमंडळ - एक स्वमदतगट

                       एकमेकाना भेटून अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि व त्यातून शिकण्याची इच्छा असणा-या समान समस्येनी ग्रस्त व्यक्तींचा गट असे ढोबळमानाने स्वमदत गटाबद्दल म्हणता येईल यात घटस्फोट,व्यसनाधीनता,सिंगल पॅरेन्ट अशा सामाजिक समस्या असतील किंवा कर्करोग,एपिलेप्सी पार्किन्सन असे शारीरिक आजार असतील. कोणत्याही शारीरिक आजारावर डॉक्टर उपचार करतात.पण रुग्णानीही काही धडपड केली पाहिजे.ही धडपड म्हणजे स्वमदत.गेल्या काही वर्षात जगभर असे विविध आजार,समस्या यांच्यासाठी स्वमदत गट कार्यरत असलेले दिसत आहेत.यांची उपयुक्तता शास्त्रीय दृष्ट्याही सिद्ध झाली आहे.पार्किन्सन्ससारख्या गुंतागुंतीच्या आजारात तर स्वमदत गटाची गरज आणि उपयुक्तता खूप मोठ्ठी आहे.अशा गरजेतून पार्किन्सन्स मित्रमंडळ या स्वमदत गटाची स्थापना झाली 

     शुभंकर ( केअर टेकर ) आणि शुभार्थी ( पेशंट )यांनी एकत्र येऊन तयार केलेला हा स्वमदत गट आहे.तो मोफत चालवला जातो.पार्किन्सन्सचे निदान झाले की हा आजार बरा न होणारा आणि वाढत जाणारा आजार आहे असे सांगितले जाते. या आजाराची कंप,मंद् झालेल्या हालचाली स्नायूंची ताठरता इत्यादी लक्षणामुळे रोजच्या जगण्याची गुणवत्ता कमी होते.पेशंट आणि कुटुंबीय हताश होतात.यांना मदतीचा हात द्यायला.पार्किन्सन्स मित्रमंडळ स्वमदत गट पुढे येतो.सध्या पुण्यातील २८० आणि परगावचे ९० असे ३७० शुभार्थी मित्रमंडळाचे सभासद आहेत.पार्किन्सन्ससह आनंदाने जगूया हे मंडळाचे ब्रीदवाक्य आहे.याची स्थापना केलेले स्वत: पेशंट असलेले मधुसूदन शेंडे आणि ज्यांची पत्नी पेशंट होती ते शरच्चंद्र पटवर्धन यांनी स्वत:च्या जगण्याने ते सिद्ध केलेले आहे.
    उद्दिष्टे आणि पूर्तता
    पार्किन्सन्स साक्षरता हे महत्वाचे उद्दिष्ट आहे.यासाठी पार्किन्सनन्सविषयी भ्रामक समजुती दूर करून यथार्थ ज्ञान देणे गरजेचे आहे.अज्ञानातून भीती,भीतीतून अस्वीकार,अस्विकारातून चुकीच्या मार्गाने जाणे असे दुष्ट चक्र चालू होते.
    पार्किन्सन्स साक्षरता हे त्यावर उत्तर आहे.
      यासाठी लिखित साहित्य यात मराठीतून
    २ पुस्तके,एक इबुक,१२ स्मरणिका यांचा समावेश आहे.शिवाय प्रसारमाध्यमे,तज्ज्ञांची व्याख्याने,वेबसाईट,ब्लॉग,फेसबुकपेज आणि कम्युनिटी,whats app group,युट्युब चानल,घरभेटी,फोनवरून संवाद इ.चा वापर केला जातो.
    पार्किन्सन्सच्या स्वीकारासाठी पार्किन्सन्सशी सामना करण्यासाठी शुभार्थी ( पेशंट) व शुभंकर ( केअरटेकर) याना सहकार्य केले जाते..
    अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ पुरविले जाते.
    सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली जाते.
    शुभार्थीच्या जीवनशैलीचा स्तर उंचावण्यासाठी शारीरिक,मानसिक.सामाजिक कार्यप्रवणता वाढविण्यास विविध उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जातात.यात सहली, खेळ,ब्रेनजीम, जागतिक पार्किन्सनन्स दिनाच्या निमित्ताने शुभार्थींच्या कलाकृतीचे प्रदर्शन,फिजिओथेरपि कार्यशाळा,नृत्योपचार इत्यादींचा वापर केला जातो.या सर्वातून शुभार्थीच्या जगण्याची गुणवत्ता वाढवणे.पार्किन्सन्सच्या लक्षणावर नियंत्रण आणणे हे नक्कीच साध्य होते.हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. या भरीव कार्यामुळे
    एप्रिल २०१३ - अमेरिकन पार्कीन्सन्स असोशिएशन कडून श्री व सौ.शेंडे याना पार्किन्सन्सविषयक कामगिरीसाठी गौरव करणारे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
    २०१४ मध्ये मुक्तांगण मार्फत दिला जाणारा 'डॉ.अनिता अवचट संघर्ष सन्मान' पुरस्कार मिळाला.
    करोना काळातही काम थांबले नाही. ऑन लाइन मिटिंग आणि नृत्योपचार सुरु झाले.घरातून बाहेर जाऊ न शकणारे,बेडरीडन,परगावचे शुभार्थी यांच्यासाठी तर करोना ही इष्टापत्ती ठरली.

    संस्था रजिस्टर झाली आहे. आणि ८० जी अंतर्गत आयकर सवलतीस पात्र आहे.अनेक भविष्यकालीन योजना आहेत

     या वर्षीचा जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा ९ एप्रिलला आहे.सर्वाना आग्रहाचे निमंत्रण.

     ठिकाण - एस.एम.जोशी सभागृह,शास्त्री रोड,नवी पेठ

    वेळ दु. ४.३०