पार्किन्सन्सविषयक गप्पा - ८३
मुंबईहून माझी नणंद तीच्या मुलगी आणि जावयासह बऱ्याच वर्षांनी येणार होती.अपेक्षेपेक्षा थोडा उशीर होत असल्याने आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.एकमेकांना भेटण्यास उत्सुक होतो.तीही पार्किन्सन शुभार्थी असल्याने प्रवासाचा त्रास होईल का ही काळजीही होती.अखेर ती सुखरूप आली.पायऱ्या चढत असताना तिने पाउल पायरीच्या कडेला ठेवले.आणि तिची मुलगी थोडा आवाज चढवून म्हणाली, 'आई तुला किती वेळा सांगितले पायरीवर पूर्ण पाय दे म्हणून पडशील ना' मी तिला शांत करत म्हटले अग चिडू नको. तो तीचा दोष नाही.पार्किन्सनमुळे Visuospatial abilities वर झालेल्या परिणामामुळे असे होते.तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर मी म्हणाले,'सांगते तुला समजाऊन नंतर आधी फ्रेश व्हा'.तिला मी समजाऊन सांगितलेच पण हे गप्पमाध्येही सांगावेसे वाटले.कारण अनेक शुभंकरांकडून अशाच तर्हेची तक्रार मी ऐकली आहे.
माझ्या भाचीप्रमाणेच मीही तीर्थळींच्यावर याच कारणावरून चिडायची.लाईटचे बटण ऑन करायचे तर ते खूप लांबून पाय वर करून ऑन करायचे.पायरीच्या कडेवर पाय देऊन चढणे होतेच शिवाय खुर्चीवर समोरून बसताना इतके अलीकडे बसायचे की पडतील असे वाटायचे कडेनी खुर्चीकडे गेले तर खुर्चीचा हात असेल तिथेच बसायला पहायचे.टेबलवर पाण्याचा ग्लास ठेवताना टेबलाच्या कडेवर ठेवायचे त्यामुळे तो खाली पडायचा.नलीन जोशींचीही प्रज्ञाबद्दल हीच तक्रार होती.
एकदा PDMDS च्या ऑनलाईन सभेत Visuospatial abilities या विषयावर व्याख्यान झाले आणि मी इतके दिवस तीर्थळींच्यावर चिडायची त्याचे वाईट वाटले.अतिशय उत्तम फोरव्हीलर चालवणाऱ्या ह्यांचा अंदाज का चुकायचा हे लक्षात आले.अपराधीपणाची भावनाही आली.
येथे हे स्पष्ट करावे लागेल की सर्वच शुभार्थीना ही समस्या येत नाही.ज्यांना ही समस्या आहे त्यांच्यासाठी व्याख्यानाची लिंक सोबत दिली आहे ती अवश्य पहा. अत्यंत सोप्या भाषेत वेगवेगळ्या स्लाईड्सच्या आधारे उपयुक्त माहिती दिलेली आहे.
येथे मी थोडक्यात सांगते.आपल्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या वस्तूकडे आपण पाहतो तेंव्हा किंवा जातो तेंव्हा आपल्या दृष्टीला त्या वस्तूची उंची,खोली,अंतर,दिशा या सर्व बाबींचा अंदाज असतो. त्यानुसार क्रिया होतात.रोजच्या व्यवहारात या गोष्टी इतक्या सहज होत असतात की एवढे सर्व पाहिले जाते हे लक्षातही येत नाही.काही पार्किन्सन शुभार्थीची हे पाहण्याची द्रूष्टी आणि अंदाज म्हणजेच Visuospatial abilities बाधित झालेल्या असतात.म्हणजे आपल्याला खुर्चीकडे जाताना ती खुर्ची दिसते त्याच्या अलीकडे शुभार्थीला खुर्ची दिसते.पायरी चढतानाही पायरी पर्यंतचे अंतर,खोली,उंची यांचा अंदाज चुकतो.
यापेक्षा जास्त माहिती मी देत नाही.कारण ज्यांना त्रास आहे त्या शुभार्थीच्या शुभंकरांनी सोबत दिलेली लिंक पहावी असे मला वाटते.आणि आपण शुभार्थीला बोल लावले याबद्दल अपराधीपणाची भावनाही ठेवण्याची गरज नाही.शुभंकर शुभार्थीसाठी जीवाचे रान करता असतो.अज्ञातून आपल्याकडून अशा चुका झाल्यास स्वत:ला माफ करून टाकावे.
वेगवेगळ्या स्वमदतगटातून विविध माहितीचा खजिना आपल्यापर्यंत पोचत असतो.त्याद्वारे हा गुंतागुंतीचा आजार जास्तीत जास्त समजून घ्यावा.याबाबत यथार्थ ज्ञान देउन शुभार्थीची जगण्याची गुणवत्ता उत्तम ठेवण्यास मदत करणाऱ्या तज्ज्ञांबद्दल मनापासून कृतज्ञता मानावी.
https://www.youtube.com/watch?v=Vwcm7bePYjQ
No comments:
Post a Comment