पार्किन्सन्स विषयक गप्पा - ९३
आमच्या whats app ग्रुपवर रोज सकाळी गीताताई पुरंदरे नवनवीन आकर्षक पुष्परचना टाकतात.सर्वांचीच सकाळ प्रसन्न होते.मीही ती पुष्परचना लगेच आमच्या फेसबुक ग्रुपवर टाकते. तेथेही त्यांचे बरेच चाहते आहेत.गीताताईंचा विशेष म्हणजे एकदा रचना करून झाली की त्या लोकार्पण करतात.कॉपीराईट वगैरे भानगड नाही.कोणीही कोठेही टाका त्यांची परवानगी असते.अगदी हल्लीहल्ली त्यांनी त्यावर गीता लिहायला सुरु केले आहे.हे सुद्धा त्यांना नक्की कोणीतरी सुचविले असले पाहिजे.
रविवारी मात्र पुष्परचना आलीच नाही.मी थोड्या थोड्या वेळाने सारखे पुष्परचना आलीय का पाहत होते.दुपार उलटून गेलीतरी आली नव्हती.काय झाले असेल? मला थोडी काळजी वाटू लागली.फोन केला तर फोन उचलला जात नव्हता.शेवटी संध्याकाळी ती आली. आणि त्याबरोबर एक थक्क करणारी माहिती.
" आज आळंदी ते पुणे ३० किलोमीटरचा टप्पा पार पडला सकाळी सहाला निघालो होतो.चार वाजता पुण्याला पोचलो."पुण्याला आल्या आल्या थोड्या वेळातच. त्यांनी पुष्परचना टाकली होती.
मला इंदूरहून येऊन दोनदा आळंदी पुणे वारी करणाऱ्या शुभार्थी वनिता सोमण आठवल्या. त्यांनी उत्तर वाहिनी नर्मदा प्रदक्षिणाही केली होती.यात एका दिवसात २५ किलोमीटर चालायचे असते.
औरंगाबादच्या शुभार्थी सविता बोर्डेने ब्रम्हगिरी प्रदक्षिणा केली होती.
गौरी इनामदारनी अमेरिकेत असेच अवघड ट्रेक केले होते.
अरुण सुर्वे पुणे ते भीमा शंकर पायी गेले होते.
या सर्व शुभार्थीच्या जिद्दीचे आणि पार्किन्सनलाही तोंडात बोट घालायला लावणाऱ्या कर्तुत्वाचे नेहमीच कौतुक आणि अभिमानही वाटला आहे.
माझी काळजी दूर झाली होती.माझा मिस कॉल पाहून गीताताईंचा फोन आला.त्या सांगत होत्या मी सर्व वारी पायी करणार आहे.बरोबर त्यांची बहीणही होती.हे ऐकून तर स्तिमितच झाले. मला अनेक प्रश्न पडले.त्यांचे पती विश्वासरावही पार्किन्सन पेशंट आहेत.ते एकटे राहणार का सांगलीला? माझा प्रश्न ऐकून त्या म्हणाल्या, हो.बाई आहे स्वयंपाक करणारी आणि तसा ह्यांनाही येतो करता. थोडक्यात त्यांना काही प्राब्लेम नव्हता.
गीता ताईंनी रोज १० किलोमीटर चालून वारीसाठी सराव केला होता.त्यांची खूप दिवसाची इच्छा पूर्ण होत होती म्हणून त्या आनंदात होत्या.एकदा पुणे सासवड टप्प पूर्ण झाला की सर्व सोपच आहे.त्या अगदी सहजपणे सांगत होत्या.त्यांचा तो टप्पा आता पार पडला आहे.सर्वांच्या मागणीवरून त्या वारीचे अपडेट आणि फोटो पाठवत आहेत.आमच्यासारखे घरबसे फोटो पाहून आनंद लुटणे आणि त्यांचे भरभरून कौतुक करणे एवढेच करू शकतो.
त्यांनी १५ दिवसांच्या पुष्परचना करून बरोबर घेतलेत. रेंज असली तर टाकणार आहेत.गीताताई तुम्हाला सलाम!
No comments:
Post a Comment