Sunday 26 May 2024

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ९२

                                                  पार्किन्सन्स विषयक गप्पा -  ९२

                आमच्या Whats app ग्रुपवर आनंदाची क्रियेटीविटीची लागण  होत असते.७५ वर्षांच्या श्रीपाद कुलकर्णी यांचा त्यांच्याकडे दिलेल्या स्मरणिका वाटपाचे काम संपले असे सांगणारा निरोप आला.हे काम त्यांनी आपणहून घेतले होते.प्रत्येककडे त्यांना छान अनुभव आले.अजित गोखले, सुरेश बागल यांनी पुढील वर्षी आपणही जवळच्या स्मरणिका नेऊन देऊ असे सांगितले.कुलकर्णी यांचा मेसेज पाहून इतरही प्रेरित होऊन मदतीचा हात देतील.स्मरणिका पाठवणाऱ्या आशा,मी,अंजली, मृदुलानीही जवळच्या स्मरणिका देण्याचे काम घेतले.एकुणात सेवेचा,मदतीचा हात देण्याचीही लागण झाली. या निमित्ताने घरभेटीची क्षीण झालेली परंपरा सुरु होईल याचा आनंद झाला.

             सुरुवातीच्या काळात घरभेटी हा मंडळाचा आत्मा होता.स्मरणिका पाठवतानाही आश्विनी मध्ये आम्ही सर्व कार्यकारिणी सदस्य नावांची घेऊन एकत्र बसायचो.मेळाव्यातून प्रत्यक्ष स्मरणिका नेलेल्या सभासदांची नावे वगळून इतर कोण घरपोच स्मरणिका देईल ते काढायचो आणि उर्वरित स्मरणिका पोस्टाने पाठवायच्या.त्यामुळे अपोआप अनेक घरभेटी व्ह्ययच्या.

            मृदुला कर्णी यांच्याकडे आम्ही प्रथम स्मरणिका देण्याच्या निमित्ताने गेलो होतो.त्यावेळी ती पिंपरी येथील रयत शिक्षणाच्या कॉलेज मध्ये नोकरी करत होती.तिला मंडळाच्या सभानाही येणे शक्य नसे.तिचा घरातला अष्टभूजेसारखा विविध पातळ्यावरील वावर पाहून मी प्रभवित झाले होते.हिला आपल्यात घ्यायचेच असे ठरवले.आणि निवृत्त झाल्यावर ती आलीही. मंडळाची कार्यवाह झाली.थोडक्यात मृदुला हे घरभेटीचे फलित.

           श्रीपाद कुलकर्णी यांच्याही स्मरणिकेच्या निमित्ताने घरभेटी झाल्या आणि शुभार्थींची नवनवीन माहिती समजली.स्मरणिके व्यतिरिक्तही आपणहून घरभेटी करणारे आपल्याकडे आहेत.उमेश सलगर कोथरूडचे शुभार्थी सुभाष कुलकर्णी यांच्याकडे सहज गेले.त्यांचा एकटेपणा घालवून उर्जा देवून आले.परगावला ऑडीटला जाताना मला ते त्या गावात कोणी पेशंट आहेत का विचारायचे.संगमनेरला ते सतीश सांगळे यांच्याकडे गेले.कोल्हापूरच्या नाझ मोमीनकडे गेले.ते जातील तेथे सकारारात्मकतेचा झोत घेऊन जातात हे सर्वश्रुतच आहे.सांगलीच्या गीता पुरंदरे यांच्याकडून मात्र ते स्वत:च प्रभावित होऊन आले.

         संगीता आगाशे पतीच्या वाढणाऱ्या आजाराने त्रस्त,भयभीत झाल्या होत्या तेंव्हा मनीषा लिमये यांनी वेळोवेळी जाऊन त्यांना आधार दिला होता.

         मध्यंतरी गौरी इनामदार आणि त्यांचे पती श्रीपाद कुलकर्णी यांच्याकडे जाऊन आले.कुलकर्णी यांची पत्नीची सेवा पाहून प्रभावित झाले.त्यांच्या येण्याने कुलकर्णी पतीपत्नीही आनंदित झाले.ही मोजकी उदाहरणे दिली.

         आमच्याकडे तर परगावचे,परदेशातील आणि पुण्यातील अनेक जण येऊन गेले.कोणी येणार असले तर हे आधीपासूनच उत्साहित असत आणि येऊन गेल्यावर कितीतरी दिवस हा आनंद पुरे.जे घरातून बाहेर पडू शकत नाहीत त्यांच्याकडे घरभेटी करणे अत्यंत आवश्यक आहे.

          ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्रित भेटणेही उत्तम. सविता,मृदुला सुनील कर्वे यांच्याकडे गेले होते त्याचवेळी धर्माधिकारी पती, पत्नी तेथे आले.छान मैफिल झाली.

        अशा भेटी करण्यासाठी किरण सरदेशपांडे यांनी ओक ट्रस्टची जागा देऊ केलीच आहे.आपण त्याचा फायदा घेऊ.आपण झूमवर भेटत असलो तरी प्रत्यक्ष भेटीची उपयुक्तता नक्कीच मोलाची.

                   थोडक्यात ही घरभेटीची एकमेकांना भेटण्याची लागण अनेकांना होऊदे.यातून "पार्किन्सनसह आनंदाने जगूया" हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणायला बळकटी येईल हे नक्की.

     
 

 


No comments:

Post a Comment