पार्किन्सन्स विषयक गप्पा - ८
दिल्लीहून जोत्स्नाताई सुभेदार आणि इंदूरहून वनिताताई सोमण एकत्र ठरवून पुण्यात भेटल्या आणि मला भेटायला आल्या होत्या.मला त्यांच्या येण्याचे अप्रूप वाटले.त्यांच्या भेटीतून पार्किन्सन मित्रमंडळामुळे या दोघीची झालेली मैत्री,सुभेदार कुटुंबीयांचे एकमेकातील हृद्य परस्पर संबंध, जोत्स्नाताईंचा पंचाऐंशीव्या वर्षातील मनाचा उत्साह,बुद्धीचा तल्लखपणा,नव्वदीतल्या सुभेदारांचा पार्किन्सन सांभाळताना शुभंकर म्हणून बजावत असलेली चोख भूमिका,दिल्ली पुणे एकटीने केलेला प्रवास विविध वानिताताईंची १०० किलोमीटर पायी नर्मदा परिक्रमा. अशा विविध बाबींचे दर्शन झाले.या सर्वातून सकारात्मक उर्जा मिळाली.
मी आधी त्या दोघींना भेटले होते पण त्या दोघी प्रथमच प्रत्यक्ष अशा एकमेकीना भेटत होत्या जोत्स्नाताईंचे माहेर इंदूर.माहेरचे नाव निघाले की बायका हरखुन जातात. जोत्स्नाताईंचे तसेच झाले.वनिताताईंशी त्यांची मैत्री झाली. पार्किन्सनमुळे ती अधिक घट्ट झाली.प्रत्यक्ष भेटीची ओढ होती.ऑक्टोबरमध्ये आठ दिवसासाठी जोत्स्नाताई इंदूरला गेल्या नेमक्या वनिता ताई लंडनला होत्या.भेट झाली नाही दोघींनाही हळहळ वाटली.
मला भेटायची आणि एकमेकीना भेटायची दोघींची उत्कट इच्छा होती.वेळोवेळी फोनवर चर्चा होऊन दिवस निश्चित झाला. वनिताताई बाली सहल करून पुण्यात येणार होत्या.त्याचवेळी जोत्स्नाताई आल्या.सुभेदाराना सांभाळायची जबाबदारी केअरटेकरच्या सहाय्याने त्यांचा मुलगा घेणार होता.जोत्स्नाताईं पुण्यात असताना सर्व सभांना हजर असत.एकदा त्यांचा मुलगाही आला होता.वक्त्यांनी अधूनमधून कुटुंबीयांनी स्वत: शुभार्थीची जबाबदारी घेऊन शुभंकराला मोकळीक दिली पाहिजे असे सांगितले होते. जोत्स्नाताईंच्या मुलांनी ते लक्षात ठेवले होते आणि आईला मागे लागून आठ दिवस इंदूरला आणि आता पुण्याला पाठवले होते.नव्वद वर्षाच्या सुभेदार यांना नळीतून अन्न द्यावे लागते.बोलता येत नाही.खाणाखुणा,स्पर्श यांची भाषा.तरीही ते केअर टेकरने करवून घेतलेला व्यायाम आवडीने करतात.जोत्स्ना ताईना जायला त्यांनी मानेनेच होकार दिला.नातू आला तेंव्हा आजोबांचा चेहरा खुलला.त्याला ही आजोबाने आपल्याला ओळखले याचा आनंद झाला.असे काहीना काही जोत्स्नाताई सांगत होत्या.एकीकडे इथला आनंद उपभोगताना सुभेदार त्यांच्या मनात सारखे होतेच.
जोत्स्नाताईनाही दम्याचा त्रास आहे त्यांनी तो योग्य आहार व्यायाम आणि आनंदात राहण्याने आटोक्यात ठेवला आहे.रेसिपी प्रवास,Whats app ग्रुप अशा विविध चर्चा रंगल्या.आमच्या कामवालीने हा आनंद फोटो काढून टिपला.जोत्स्नाताई आमचे दोघींचे हात प्रेमाने धरून बसल्या होत्या.रीक्षातही त्या अशाच हात हातात घेऊन बसल्या होत्या असे वनिताताई सांगत होत्या.मन भरत नव्हते.वनिताताईना सुभेदारांच्या एरंडवण्याच्या घरी थांबून पुढे कोथरूडला जायचे होते.रिक्षाही थांबवली होती.दोघी उठल्या तेंव्हा जोत्स्नाताईनी काठी आणली नाही हे लक्षात आले.तसे ते घरून निघताना लक्षात आले होते.वनिता ताई म्हणाल्या पुन्हा कोठे आत जाता, चला मी आहे तुमची काठी.हे सांगताना दोघींचाही चेहरा फुलला होता.दोघी गेल्या तरी वनिताताईनी आणलेल्या इंदुरी गजगचा आणि सुभेदारांच्या स्वत: बनवलेल्या तिळाच्या वड्यांचा गोडवा रेंगाळत होता.
No comments:
Post a Comment