Monday, 15 January 2024

क्षण भारावलेले - २५

                                                    क्षण भारावलेले - २५

                      करोना नंतर मंडळाचे काम थांबल्यासारखेच होत होते.अतुलनी झूम मिटींगची कल्पना मांडली.आणि ती लगेच अमलातही आणली.झूम मिटिंगचे रेकॉर्डिंग करणे शक्य होते.ते रेकॉर्डिंग यु ट्यूब चॅनेलवर अतुलने घालायला सुरुवात केली.आत्तपर्यंत १४३ व्हिडीओ चॅनेलवर आहेत त्यातील काहीच व्हिडीओ करोना काळापूर्वीचे आहेत.हे व्हिडिवो जसेच्या तसे असल्याने सभेच्या सुरुवातीपुर्वीचे बोलणे त्यात आहे.ते थोडे प्रेझेन्टेबल असावे अशी फार दिवसांची इच्छा होती.हे एडिटिंगचे काम कोण करू शकेल? इतके व्हिडीओ करायचे तर खर्च खूप येईल असे व्यावहारिक प्रश्न होते.मध्यंतरी वृद्धकल्याणशास्त्रतज्ज्ञ रोहिणीताई पटवर्धन यांनी पैशासाठी काम थांबवू नका मी मदत करेन असे सांगितले होते.काही पर्याय शोधलेही पण काहीना काही कारणाने घोंगडे भिजत पडले.आणि आता अतुल ठाकूर यांनी पुढाकार घेऊन काम पूर्ण केले.अशी सुंदर प्रेझेंटेबल कामगिरी पाहून मी भारावून गेले.

                  अतुलनी जबाबदारी घेतल्यावर नमुन्याचा व्हिडिओ करून पाठवला.कार्यकारिणीच्या  सर्वाना तो आवडला.दीपा होनपने सुरुवातीला आणि शेवटी प्रार्थना असावी अशी सूचना केली.अतुलने तर मला वगळता सर्व कार्यकारिणी सदस्यांना शोभनाताईच्या आवाजात काहीतरी असावे अशी कल्पना मांडली.यथावकाश ती माझ्याकडे आली.मला ती फारसी पसंत नव्हती पण अतुलने सर्वांमार्फत  माझ्या गळी उतरवली.मंडळाच्या मासिक सभेत सुरुवातीला 'सर्वे पि सुखिनः सन्तु' ही प्रार्थना म्हटली जायची. पटवर्धन सर खणखणीत आवाजात ती म्हणत आणि सर्व जण त्याला साथ देत.त्यामुळे तीच सुरुवातीला असावी असे ठरले.

                 अतुलनी मागे बासरी किंवा तंबोऱ्याची साथ असावी असे सुचविले.यासाठी डोळ्यासमोर काही नावे होती.योगायोगाने माझा जावई पराग पुण्यात आला.खरे तर तर त्याच्या येण्याला दुःखाची किनार होती.तीर्थळीकाकांच्या मागोमाग सव्वा महिन्यातच माझ्या मोठ्या मुलीच्या सासर्यांचे दुःखद निधन झाले होते आणि तो भेटायला आला होता.बोलता बोलता व्हिडीओसाठी प्रार्थना करायची आहे याबद्दल विषय निघाला.त्यांनी लगेचच भैरव रागातील आत्ता व्हिडीओ असलेली चाल म्हणून दाखवली. त्याच्या आवाजात ती ऐकायला छान वाटली.त्याच्या मोबाईलवर तंबोरा app होते.ते बॅकग्राउंडला ठेऊन प्रार्थना छान वाटत होती.प्रार्थनेसाठी संगीत संयोजक घरातच मिळाला होता.

               मी बरेच दिवसात गुणगुणलेही नव्हते.परागने माझ्याकडून भैरवच्या स्वरांचा रियाज करून घेतला.मला आत्मविश्वास नव्हता.माझी मुलगी देवयानीने साथ केली.प्रार्थना ग्रुपने चांगली वाटते म्हणून परागलाही सामील करून घेतले.घरातच रेकॉर्डिंग करत असल्याने आजूबाजूचा आवाज यायचा.पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करावे लागले.ट्रायल कार्यकारिणी सदस्याना पाठवली.काहीना माझ्या एकटीच्या आवाजातले आवडले बहुसंख्यांना ग्रुपचे आवडले. अतुलने सुरुवातीला आणि शेवटी अशा दोन्ही प्रार्थना वापरल्या. प्रार्थना  बॅकग्राउंडला आणि  मंडळाचा लोगो,इतर स्लाईड्स एकामागोमाग येत राहतात. शेवटही तसाच.सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले आणि व्हिडीओ फायनल झाला. 

                गेले काही दिवस घरात उदासीन वातावरण होते.दैनंदिन कामे यांत्रिकपणे केली जात होती.ते साहजिकही होते.प्रार्थनेने हळुवारपणे फुंकर घालून मनाला उभारी दिली होती.देववाणीतील प्रार्थनेचे आणि संगीताचे सामर्थ्य अनुभवास आले.या प्रक्रियेत आम्ही सर्व काही विसरून गेलो एक आत्मिक आनंद मिळाला.

                यापुढे प्रत्येक व्हिडीओ प्रेझेन्टेबल असेल याचा आनंद आहे.

No comments:

Post a Comment