आठवणीतील शुभार्थी - तारा माहुरकर.
तारा माहुरकर यांना मी दोनदाच भेटले.पण फोनवर,मेलवर,फेसबुकवर आणि whats app सुरु झाल्यावर whats app वर त्या संपर्कात होत्या.प्रत्येक संपर्कात त्यांचे नवेच रूप दिसायचे.सूर नेहमीच सकारात्मकतेचा.मग त्या अमेरिकेत असोत,दिल्लीत असोत,औरंगाबादमध्ये घरी,किंवा स्नेह्सावली केअर सेंटर मध्ये असोत, त्या आनंदातच असत. त्यांची वेळोवेळी आठवण येते.मध्यंतरी सुनील देशपांडे यांचे अवयवदानावर व्याख्यान झाले त्यावेळी तर प्रकर्षाने आली. देहदानाचा विचार बोलून दाखवल्यापासून ते फॉर्म भरेपर्यंत त्यांना किती अडचणी आल्या यावर त्यांनी लेख लिहिला होता.आता अधिक मास सुरु आहे. त्यांचा पुरुषोत्तममास हा वर्तमानपत्रातील लेख आठवला.
फेसबुकवर रोज आपल्या मैत्रीयादीतील सदस्यांचे वाढदिवस येत असतात. ताराताईंच्या ८ ऑगस्टच्या वाढदिवसाची फेसबुकनेच आठवण करून दिली.आणि सर्व जुन्या आठवणीना पुन्हा उजाळा मिळाला.त्यांचा पार्किन्सनसह प्रेरणादायी प्रवास सर्वाना सांगावा असे वाटले.
त्यांचा जीवनप्रवास खडतर होता.मोट्ठे कुटुंब. वडील लवकर गेल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पडली.हसत हसत परिस्थितीशी दोन हात केले.शिक्षणाची आवड होती स्वत:च पैसे मिळवत शिक्षण पुरे केले.हिंदीमध्ये एम.ए. केले.इतरांशी संवाद साधण्याची कला अवगत होती.इन्शुरन्स एजंट,शिक्षक अशी कामे करून या कौशल्याचा उपयोग करून घेतला.लेखन वाचन यांची आवड होती.तरुण भारत,पुणे सकाळ,लोकमत,सामना यात लेखन छापून आले.आकाशवाणीवर कार्यक्रम झाले.
मुले शिकली सुस्थिती आली.ऐशोआराम होता.हवे ते छंद मनसोक्त पूर्ण करता येत होते.अशात पार्किन्सनने प्रवेश केला.आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची जन्मजात सवय होती त्यामुळे हताश न होता पार्किन्सन्स झाल्यावरही हे सर्व चालूच राहिले.
कार्य करताना भयशंकित न होता 'चल मना पुढे चल' असे मनाला म्हणतच चला,कामाला लागा.नी आपल्या जीवनाला सार्थकी लावा.असे त्यांनी पाठवलेल्या एका लेखात म्हटले होते.हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र अखेरपर्यंत राहिले.
त्यांची पहिली भेट त्या दिल्लीहून पुण्याला आल्या तेंव्हा झाली.पहिल्या भेटीनंतर लगेच त्या ग्रुपमध्ये सामील झाल्या.त्यावेळी परगावच्या लोकांशी संपर्कासाठी फोन,मेल हीच साधने होती.स्मरणिकेतून वर्षातून एकदाच मासिक सभांचे सविस्तर वृत्त असे.परगावच्या लोकांना मी ग्रुप मेलवर लगेचच मासिक सभेचे वृत्त पाठवत असे.ताराताई लगेच प्रतिक्रिया देत आपले मत मांडत.त्यांचे काही लेखन छापून आले की त्याची माहिती पाठवत.फोटोग्राफी, बागकाम,भटकंती,स्केचेस काढणे असे त्यांना अनेक छंद होते.
त्यांच्या सुनबाई प्राचीताई यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखात सून म्हणून घरात प्रवेश केल्यापासून प्रेम आणि जीव्हाळाच मिळाल्याचे लिहिले आहे.प्रवासात इंग्लिशचे मर्यदित ज्ञान असूनही सिंगापूर,Las Vegas मध्ये एकटे फिरण्याचे धाडस,त्यांच्या विविध पाककृती यांचे कौतुक केले आहे.ताराताईंनी 'वळून पाहताना नकळत' हे पुस्तक लिहिले.त्याचे संपादन करताना प्राचीताईना सासूबाईंची नव्याने ओळख झाली आणि त्यांच्याबद्दलच्या आदर अधिकच वाढला.
फेसबुक आणि Whats app सुरु झाल्यावर प्राणी,पक्षी,स्वत: लावलेली फुलझाडे,मुले, नातवंडे यांच्याबरोबर परदेशातील फोटो,असे त्यांनी स्वत: काढलेले फोटो मोठ्या प्रमाणात येऊ लागले.त्यांनी केलेल्या कविता आणि लेखही येऊ लागले.लोकसत्तामध्ये घरचा दवाखाना नावचे सदर येत होते.त्यात लवंग,वेलदोडा अशा वनस्पतींचे औषधी उपयोग आणि घरच्या बागेत ते कसे वाढवायचे याची माहिती येत होती.एकुणात स्वस्थ बसणे त्यांना माहिती नव्हते.त्यांच्या विविध उद्योगाना पीडी रोखू शकत नव्हता.
Whats app वर त्या सक्रीय होत्या. शुभार्थी असूनही त्या शुभंकर बनून सल्ले देत.आपला शुभार्थी अजिबात काही करत नाही म्हणून हैराण होऊन एका शुभंकरानी तक्रार केली.ताराताईंनी लिहिले या लोकांना बर्याच वेळा Apathy चा त्रास होतो.अशा वेळी Handel with care गरजेचे असते.ते मुद्दाम करत नाहीत.हे लिहिताना न्यूरॉलॉजिस्टच्या कानावर घाला आणि प्रत्येक शुभार्थी वेगळाच असेल सहवासातील व्यक्तीलाच हे जास्त समजू शकते.हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
माझी त्यांची शेवटची प्रत्यक्ष भेट त्या पुण्यात राहत असताना झाली.त्या जागतिक पार्किन्सन मेळाव्याला एस,एम.जोशी सभागृहात आल्या होत्या.कार्यक्रम संपल्यावर मला भेटण्यासाठी त्या बाहेर खुर्चीवर बसून होत्या.भरपूर द्राक्षे घेउन आल्या होत्या. आम्ही स्वयंसेवक तेवढेच शिल्लक होतो.सर्वांनी द्राक्षांचा आस्वाद घेतला.त्यांना ताटकळत बसावे लागले याचे मला फार वाईट वाटले.त्या एका वृद्ध निकेतन मध्ये राहत होत्या.तेथील माणसाला त्या घेऊन आल्या होत्या.त्या आलेल्या माणसाला त्यांच्याबद्दल आदर दिसत होता.त्यांची तो व्यवस्थित काळजी घेत होता.
शेवटच्या काळात त्या औरंगाबाद येथील स्नेहसावलीकेअर सेंटर मध्ये होत्या.तेथे त्या खुश होत्या.आणि स्नेसावलीचे लोकही त्यांच्यावर खुश होते.तेथील विविध कार्यक्रमात त्या सहभागी होत.वृत्तपत्रात आलेल्या वृत्तांतात त्यांचे नाव असे त्याचे फोटो त्या पाठवत.स्केचेस,ड्राईंग पाठवत.
आता वय बरेच झाले होते.पती २००० मधेच गेले होते.मधल्या काळात कॅन्सरने मोठ्ठी बहिण गेली.छोटी बहिण पायर्यावरून पडून अपघाताने अचानक गेली.वहिनी बरेच दिवस कोमात होती आणि गेली.मोठ्ठा भाऊ अचानक हार्ट attack ने गेला.अशा वेळी मरणाची भीती वाटली नाही.ते अटळ आहे त्याच्याशी सख्यत्व करायला हवे असे त्यांना वाटत होते.पण असे अचानक मरण येईल तर त्याना घाई होती देहदानाचा फॉर्म भरायची. कधी वैफल्य आले तर "हरणार नाही एक दिवस सुखाचे रहस्य शोधून काढीन" असे एका कवितेत त्यांनी लिहिले.शेवटपर्यंत पार्किन्सनसह आनंदी राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला.आपल्या लिखाणातून चित्रातून,फोटोतून तो मागे ठेवला.
त्यांना विनम्र प्रणाम.
No comments:
Post a Comment