Thursday, 31 August 2023

आठवणीतील शुभार्थी - तारा माहुरकर.

May be an image of 1 person                     May be an illustration of text                        

  आठवणीतील शुभार्थी - तारा माहुरकर.

                      तारा माहुरकर यांना मी दोनदाच भेटले.पण फोनवर,मेलवर,फेसबुकवर आणि whats app सुरु झाल्यावर whats app वर त्या संपर्कात होत्या.प्रत्येक संपर्कात त्यांचे नवेच रूप दिसायचे.सूर नेहमीच सकारात्मकतेचा.मग त्या अमेरिकेत असोत,दिल्लीत असोत,औरंगाबादमध्ये घरी,किंवा स्नेह्सावली केअर सेंटर मध्ये असोत, त्या आनंदातच असत. त्यांची वेळोवेळी आठवण येते.मध्यंतरी सुनील देशपांडे यांचे अवयवदानावर व्याख्यान झाले त्यावेळी तर प्रकर्षाने आली. देहदानाचा विचार बोलून दाखवल्यापासून ते फॉर्म भरेपर्यंत त्यांना किती अडचणी आल्या यावर त्यांनी लेख लिहिला होता.आता अधिक मास सुरु आहे. त्यांचा पुरुषोत्तममास हा वर्तमानपत्रातील लेख आठवला.

                     फेसबुकवर रोज आपल्या मैत्रीयादीतील  सदस्यांचे वाढदिवस येत असतात. ताराताईंच्या ८ ऑगस्टच्या वाढदिवसाची फेसबुकनेच आठवण करून दिली.आणि सर्व जुन्या आठवणीना पुन्हा उजाळा मिळाला.त्यांचा पार्किन्सनसह प्रेरणादायी प्रवास सर्वाना सांगावा असे वाटले.

                    त्यांचा जीवनप्रवास खडतर होता.मोट्ठे कुटुंब. वडील लवकर गेल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पडली.हसत हसत परिस्थितीशी दोन हात केले.शिक्षणाची आवड होती स्वत:च पैसे मिळवत शिक्षण पुरे केले.हिंदीमध्ये एम.ए. केले.इतरांशी संवाद साधण्याची कला अवगत होती.इन्शुरन्स एजंट,शिक्षक अशी कामे करून या कौशल्याचा उपयोग करून घेतला.लेखन वाचन यांची आवड होती.तरुण भारत,पुणे सकाळ,लोकमत,सामना यात लेखन छापून आले.आकाशवाणीवर कार्यक्रम झाले.

                   मुले शिकली सुस्थिती आली.ऐशोआराम होता.हवे ते छंद मनसोक्त पूर्ण करता येत होते.अशात पार्किन्सनने प्रवेश केला.आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची जन्मजात सवय होती त्यामुळे हताश न होता पार्किन्सन्स झाल्यावरही हे सर्व चालूच राहिले.

           कार्य करताना भयशंकित न होता 'चल मना पुढे चल'  असे मनाला म्हणतच चला,कामाला लागा.नी आपल्या जीवनाला सार्थकी लावा.असे त्यांनी पाठवलेल्या एका लेखात म्हटले होते.हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र अखेरपर्यंत राहिले.

           त्यांची पहिली भेट त्या दिल्लीहून पुण्याला आल्या तेंव्हा झाली.पहिल्या भेटीनंतर लगेच त्या ग्रुपमध्ये सामील झाल्या.त्यावेळी परगावच्या लोकांशी संपर्कासाठी फोन,मेल हीच साधने होती.स्मरणिकेतून वर्षातून एकदाच मासिक सभांचे सविस्तर वृत्त असे.परगावच्या लोकांना मी ग्रुप मेलवर लगेचच मासिक सभेचे वृत्त पाठवत असे.ताराताई लगेच प्रतिक्रिया देत आपले मत मांडत.त्यांचे काही लेखन छापून आले की त्याची माहिती पाठवत.फोटोग्राफी, बागकाम,भटकंती,स्केचेस काढणे असे त्यांना अनेक छंद होते.

         त्यांच्या सुनबाई प्राचीताई यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखात सून म्हणून घरात प्रवेश केल्यापासून प्रेम आणि जीव्हाळाच मिळाल्याचे लिहिले आहे.प्रवासात इंग्लिशचे मर्यदित ज्ञान असूनही सिंगापूर,Las Vegas मध्ये एकटे फिरण्याचे धाडस,त्यांच्या विविध पाककृती यांचे कौतुक केले आहे.ताराताईंनी 'वळून पाहताना नकळत' हे पुस्तक लिहिले.त्याचे संपादन करताना प्राचीताईना सासूबाईंची नव्याने ओळख झाली आणि त्यांच्याबद्दलच्या आदर अधिकच वाढला.

           फेसबुक आणि Whats app सुरु झाल्यावर प्राणी,पक्षी,स्वत: लावलेली फुलझाडे,मुले, नातवंडे यांच्याबरोबर परदेशातील फोटो,असे त्यांनी स्वत: काढलेले फोटो मोठ्या प्रमाणात येऊ लागले.त्यांनी केलेल्या कविता आणि लेखही येऊ लागले.लोकसत्तामध्ये घरचा दवाखाना नावचे सदर येत होते.त्यात लवंग,वेलदोडा अशा वनस्पतींचे औषधी उपयोग आणि घरच्या बागेत ते कसे वाढवायचे याची माहिती येत होती.एकुणात स्वस्थ बसणे त्यांना माहिती नव्हते.त्यांच्या विविध उद्योगाना पीडी रोखू शकत नव्हता.

             Whats app वर त्या सक्रीय होत्या. शुभार्थी असूनही त्या शुभंकर बनून सल्ले देत.आपला शुभार्थी अजिबात काही करत नाही म्हणून हैराण होऊन एका शुभंकरानी तक्रार केली.ताराताईंनी लिहिले या लोकांना बर्याच वेळा Apathy चा त्रास होतो.अशा वेळी Handel with care गरजेचे असते.ते मुद्दाम करत नाहीत.हे लिहिताना न्यूरॉलॉजिस्टच्या कानावर घाला आणि प्रत्येक शुभार्थी वेगळाच असेल सहवासातील व्यक्तीलाच हे जास्त समजू शकते.हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

              माझी त्यांची शेवटची प्रत्यक्ष भेट त्या पुण्यात राहत असताना झाली.त्या जागतिक पार्किन्सन मेळाव्याला एस,एम.जोशी सभागृहात आल्या होत्या.कार्यक्रम संपल्यावर मला भेटण्यासाठी त्या बाहेर खुर्चीवर बसून होत्या.भरपूर द्राक्षे घेउन आल्या होत्या. आम्ही स्वयंसेवक तेवढेच शिल्लक होतो.सर्वांनी द्राक्षांचा आस्वाद घेतला.त्यांना ताटकळत बसावे लागले याचे मला फार वाईट वाटले.त्या एका वृद्ध निकेतन मध्ये राहत होत्या.तेथील माणसाला त्या घेऊन आल्या होत्या.त्या आलेल्या माणसाला त्यांच्याबद्दल आदर दिसत होता.त्यांची तो व्यवस्थित काळजी घेत होता.

              शेवटच्या काळात त्या औरंगाबाद येथील स्नेहसावलीकेअर सेंटर मध्ये होत्या.तेथे त्या खुश होत्या.आणि स्नेसावलीचे लोकही त्यांच्यावर खुश होते.तेथील विविध कार्यक्रमात त्या सहभागी होत.वृत्तपत्रात आलेल्या वृत्तांतात त्यांचे नाव असे त्याचे फोटो त्या पाठवत.स्केचेस,ड्राईंग पाठवत.

            आता वय बरेच झाले होते.पती २००० मधेच गेले होते.मधल्या काळात कॅन्सरने मोठ्ठी बहिण गेली.छोटी बहिण पायर्यावरून पडून अपघाताने अचानक गेली.वहिनी बरेच दिवस कोमात होती आणि गेली.मोठ्ठा भाऊ अचानक हार्ट attack ने गेला.अशा वेळी मरणाची भीती वाटली नाही.ते अटळ आहे त्याच्याशी सख्यत्व करायला हवे असे त्यांना वाटत होते.पण असे अचानक मरण येईल तर त्याना घाई होती देहदानाचा फॉर्म भरायची. कधी वैफल्य आले तर "हरणार नाही एक दिवस सुखाचे रहस्य शोधून काढीन" असे एका कवितेत त्यांनी लिहिले.शेवटपर्यंत पार्किन्सनसह आनंदी राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला.आपल्या लिखाणातून चित्रातून,फोटोतून तो मागे ठेवला.

त्यांना विनम्र प्रणाम.

             

 


Saturday, 19 August 2023

गौरी, तुझा अभिमान वाटतो.

        .                     गौरी, तुझा अभिमान वाटतो.

                       गौरी इनामदारचे पार्किन्सनला माणसाळण्याचे अनेक प्रयत्न चालू असतात.इतरांना ते सांगण्यातही तिला रस असतो.ती काही दिवसांसाठी मुलांकडे अमेरिकेला गेली आहे.तेथेही ती स्वस्थ बसली नाही.Times group ने अमेरिकेतील पहिल्या शंभरात ज्यांची गणना केली आहे असे तेथील प्रसिद्ध उद्योजक Mr. Ronald Bruder यांनी तिला डिनरसह भेटण्यासाठी बोलावले.त्यांचे अमेरिकेत ८०० शॉपिंग मॉल आहेत.ते उद्योजक आहेत तसेच परोपकारीही आहेत.मिडलइस्टमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत असतात.

महत्वाचे म्हणजे ते पार्किन्सन शुभार्थी आहेत.गौरीचा पार्किन्सनसह जीवन प्रवास त्याना समजून घ्यायचा होता आणि ती पीडीला नियंत्रणात आणण्यासाठी करत असलेले विविध प्रयोग याविषयी सल्लाही हवा होता.दोघांचे कॉमन मित्र श्री.महंतेश यांनी ही भेट घडवून आणली.

                   गौरीच्या भेटीने ते प्रभावित झाले.पार्किन्सन झालेल्या व्यक्तीचे इतके सुंदर हास्य मी प्रथमच पाहतो या शब्दात त्यांनी तिचे कौतुक केले.तू जगभरच्या शुभार्थींना प्रेरणास्थान बनत आहेस.गौरी आम्हला तुझा अभिमान वाटतो.

 

Friday, 11 August 2023

सविताताई मन:पूर्वक अभिनंदन

                                            सविताताई मन:पूर्वक अभिनंदन

                       कालपासून पार्किन्सन मित्रमंडळाच्या Whatsapp ग्रुपवर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.आमच्या शुभार्थी साविताताई बोर्डे LLM परीक्षेत ६८.५ टक्के गुण मिळवून A ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाल्या.पार्किन्सनमुळे उजवा हात काम करत नाही तरी रायटर घेऊन इप्सित साध्य केले.कौटुंबिक जाबादाऱ्यातून मोकळ्या झाल्यावर त्यांनी आपले पुढील शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे ठरवले. LLB च्या तिसऱ्या वर्षाला असतानाच त्यांना पीडीचे निदान झाले.पण त्यांनी न थांबता LLM ही केले.LLMच्या प्रकल्पासाठी त्यांचा 'मुक्त जेल' हा विषय होता.

                 त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल मन:पूर्व का अभिनंदन. आणि त्यांच्या जिद्दीला सलाम. 

May be an image of 1 person, smiling and eyeglasses

Sunday, 6 August 2023

मेट्रो प्रवास

                                                               मेट्रो प्रवास

                             

पार्किन्सन पेशंटला घराबाहेर नेऊन फिरवणे बरोबरीच्या व्यक्तींना जिकिरीचे असते. पण आपल्या शुभार्थीला आनंद देण्यासाठी कुटुंबीय मनापासून हे काम करतात. असाच शुभार्थी किरण देशपांडे यांचा मेट्रो प्रवास त्यांच्याच शब्दात
मेट्रोचा प्रवास
मुलगी जावई नातू नात सगळ्यांच्या बरोबर मी आणि बायको !सिविल कोर्ट च्या मेट्रोच्या स्टॉप ला गेलो आणि तिथून पीसीएमसी पर्यंत गेलो, पीसीएमसी कडून पुन्हा परत फिरलो आणि पुन्हा आलो सिविल कोर्टला! सगळीकडे सरकते जिने आहेत! खालीवर करावं लागतं. थोडं लक्ष देऊन जिन्यावरून वरून जायचं कारण मॅन्युअली आपल्याला झेपत नाही. शिवाजीनगर स्थानक भुयारी मार्गात आहे सिविल कोर्ट ते पीसीएमसी आणि पुन्हा परत असा प्रवास एक तासाचा झाला. तिथे जाणाऱ्या आपल्यासारख्या प्रवाशांच्या दृष्टीने ऑनलाइन किंवा मोबाईल मधून तिकीट काढणे, स्कॅन करणे त्याचप्रमाणे या विविध प्रकारच्या विंडो आणि दरवाजे यांच्या वरच्या सूचना वाचत, आजूबाजूला न धडकता दरवाजे पार करणे ही थोडी कसरत आहे पण मुलगी आणि जावई हे "तयार "असल्यामुळे आम्ही आपले "बाबा वाक्य प्रमाणम्" त्यांच्या पाठीमागून गेलो.नातू अबीरही "वय वर्षे 6" मदतीला होता 'तू माझा हात धर मी तुला नीट नेतो !'म्हणत,
सहा जणांचे एकत्र तिकीट होते प्रत्येक तिकीट स्कॅन करून घ्यावे लागले, काही सेकंदामध्ये तीन गेट पास करणे आणि प्लॅटफॉर्म वर जाणे ,त्याचप्रमाणे दहा मिनिटांनी कुठली मेट्रो स्टेशनवर येते. प्लॅटफॉर्म आणि मेट्रोचे दरवाजे आ़़ॅटोमॅटिक आहेत.मेट्रो मध्ये आथ जाऊन बसणे सोपे आहे, प्रवास मजेशीर झाला , बाहेर खूप हिरवाई बघायला मिळाली आणि पुणे मुंब्ई रोड आणि त्यावरून जाणारी माणसं वाहन हे सगळं अनुभवायला मिळालं, आमच्यासारखे सहल म्हणून मेट्रोमध्ये आलेले बरेच पुणेकर होते, थोडक्यात काल च्या 55 हजार लोकांपैकी आम्ही सहा जण होतो. मेट्रोमध्ये कोणाला काही खायला प्यायला देत नाही परवानगी नाही मेट्रो स्वच्छ राहावी हा त्यांचा उद्देश त्यात आहे. बाकी मंडळी सेल्फी काढण्यात इतकी सगळी गर्क होती की त्यांना मेट्रोच्या बाहेर बघायचे नव्हते. माझ्याकडे काठी असल्यामुळे येताना जरी गर्दी होती तरी मला चक्क बसायला जागा देण्यात आली . मज्जा आली आता हळूहळू सवय होईल आपल्याला!.

Friday, 4 August 2023

प्रत्यक्ष सभा

                                                प्रत्यक्ष सभा

                    ११ सप्टेंबर २०२२ - करोना नंतर पहिली प्रत्यक्ष सभा किरण सरदेशपांडे यांच्या मदतीमुळे ओक ट्रस्ट येथे झाली.औरंगाबादचे शुभंकर रमेश तिळवे पुण्यात येणार होते.त्यांनी काही लोक एकत्र भेटू अशी इच्छा व्यक्त केली.whats app वर सात तारखेला मेसेज टाकला ११ तारखेला ५५ शुभंकर, शुभार्थी हजर झाले.रमेश तिळवे यांची शुभंकर शुभार्थीना भेटण्याची प्रबळ इच्छा,सुंदर व्यवस्था असलेला ओक ट्रस्टचा हॉल,सरदेशपांडे यांनी sponsor केलेले स्वदिष्ट जेवण,सरदेशपांडे पती, पत्नी आणि टीमचे अगत्य.शरच्चंद्र पटवर्धन आणि रामचंद्र करमरकर या बुजुर्गांची उपस्थिती,शुभंकर,शुभार्थींचा अमाप उत्साह यामुळे कार्यक्रम संस्मरणीय झाला.

               १७ ऑक्टोबर २०२२ - कोजागिरी निमित्त नीलिमा बोरवणकर  यांचे सत्र झाले.त्यांनी मान्यवरांच्या मुलाखती दरम्यान घडलेले किस्से सांगून श्रोत्यांचे रंजन केले.या प्रसंगी शुभार्थी नारायण फडणीस सर यांनी स्वागतपर गीत आणि समारोप गीत सादर केले.डॉ. शोभना तीर्थळी यांनी प्रास्ताविक केले.अंजली महाजन यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि सूत्र संचालन केले.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमानंतर अल्पोपहार आणि मसाला दुध  यांचा आस्वाद सर्वांनी घेतला.हा कार्यक्रम झूमवरून लाइव्ह दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.यासाठी अतुल ठाकूर,गिरीश आणि शिरीष कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले.

           १ डिसेंबर २०२२ - एक दिवशीय सहल आयोजित करण्यात आली.गेली दोन वर्षे होऊ शकला नाही तो सर्वांचा आवडता कार्यक्रम सहल.या वर्षीची सहल 'जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र मोराची चिंचोली' येथे आयोजित केले होते.आमचे शुभार्थी देवराम गोरडे आण्णा हे या केंद्राचे सर्वे सर्वा.त्यांच्या उदार आदरातिथ्याचा प्रत्यय घेतला.निसर्गरम्य वातावरणातील मनोरंजनाची ठिकाणे,मासवडी,पिठले,ठेचा,लापशी असे ग्रामीण भोजन हुरडा पार्टी,शुभार्थी,शुभंकरांनी सादर केलेले विविध गुण दर्शन,या सर्वामुळे ही सहल सर्वाना सुखावून गेली.पुढचे कितीतरी दिवस सहलीच्या आठवणी व्हाटसअप ग्रुपवर चालू होत्या.त्या काळात सगळे सहभागी जणू पीडी विसरले यापेक्षा सहलीचे यश ते कोणते?

            ९ एप्रिल २०२३ - जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त तीन वर्षानंतर एस.एम. जोशी हॉल येथे प्रत्यक्ष मेळावा घेण्यात आला.पुण्यातील तसेच परगावचे शुभंकर, शुभार्थीही आवर्जून हजर होते.सभागृह तुडुंब भरले होते.प्रवेश करताना ताक देऊन स्वागत करण्यात आले. शुभार्थीच्या कलाकृतींचे प्रदर्शन बाहेर मांडले होते ते पाहून सर्व जण आत येत होते.

  सुप्रसिद्ध क्रीडावैद्यक तज्ज्ञ हिमांशू वझे हे प्रमुख पाहुणे होते.गौरी इनामदार यांनी सुरुवातीला निमंत्रितांचे व उपस्थित सर्वांचे स्वागत केले.अंजली भिडे यांनी मधुर आवाजात इशस्तवन म्हटले.आशा रेवणकर यांनी मंडळाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.संस्थेचे संस्थापकसदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.अतुल ठाकूर यांनी वेबसाईट आणि स्वमदतगटाचे महत्व विषद केले.यानंतर डॉ. शोभना तीर्थळी यांनी कलाकृती प्रदर्शनातील सहभागींची माहिती सांगितली.गौरी इनामदार यांनी 'चला संवाद साधूया....' या पुस्तकाबद्दल आणि रुपांतरकार रामचंद्र करमरकर यांच्याबद्दल माहिती सांगितली.शरच्चंद्र पटवर्धन यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.यानंतर प्रमुख पाहुणे हिमांशू वझे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.वक्त्यांनी 'स्वास्थ्य संयोजन' या विषयावर श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान दिले.श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.गौरी इनामदार यांनी गुरु ठाकूर यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता केली. 
       १३ ऑगस्ट २०२३ - 'Lady with the magic hand' नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ.सुरभी धनावला यांचे निवारा सभागृहात व्याख्यान झाले.प्रार्थनेने सभेची सुरुवात झाली.डॉ.सुरभी या न्युरोफिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोथेरपिस्ट आहेत.निसर्गोपचार आणि मसाज थेरपी यांचा पारंपारिक वारसा त्यांच्याकडे असल्याने त्यांनी आधुनिक आणि पारंपारिक पद्धतीची सांगड घालून स्वत:ची उपचार पद्धती विकसित केली आहे.याआधारे त्यांनी रीजीडीटी,कंप,भास,फ्रीजिंग अशा पार्किन्सनच्या लक्षणावर प्रात्यक्शिकासह व्याख्यान दिले.अनेक शुभार्थी प्रात्यक्षिकासाठी मॉडेल म्हणून पुढे आले.आशा रेवणकर यांनी डॉ.सुरभी यांची ओळख करून दिली.उमेश सलगर यांनी आभार मानले.श्री.साठे यांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींग केले.कॉफी आणि बिस्किटे यांचा आस्वाद घेत गप्पा झाल्या.आणि कार्यक्रमाची सांगता झाली.  
 
       ५ नोव्हेंबर २०२३ - विविध गुणदर्शन
    यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा होनप,अंजली महाजन यांनी कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी खूप कष्ट घेतले.शुभार्थीनीही भरभरून प्रतिसाद दिला.सविता बोर्डे औरंगाबादहून आणि फडणीस सर तळेगावहुन आले होते.सहभागींची नावे पुढे दिली आहेत.
१. सविता बोर्डे -  नृत्य ....शिवपंचाक्षरी
२. सुरेश फडणीस - गाणे ....पुकारता चला हु मै
३. सुनील कर्वे - नकला
४. शुभदा गिजरे -  भजन .... पायोजी मैंने
५. उमेश सलगर -  कविता
६. अरुण सुर्वे -  नृत्य ....फ्युजन
७. जगदीश माहेश्वरी -  कविता
८. विजया मोघे - भजन ....राम नाम गा ले
९. मोहन देशमुख - गाणे .... फूलों के रंग से
१०. श्रद्धा भावे - विनोदी उखाणे
११. शैला भागवत आणि शशिकांत भागवत -  नृत्य .... मला सांगा
१२. किरण सरदेशपांडे -  नाट्यछटा .... ट्रॅफिक पोलीस
१३. प्रणिता नरवाडकर -  गाणे .... लग जा गले
१४. रेखा आचार्य -  नृत्य ....सूर निरागस हो
१५. सुधाकर माने -  नृत्य ....I am a disco dancer
  डॉ.अविनाश बिनीवाले आणि अविनाश धर्माधिकारी यांना कार्यक्रम पाहून उत्साह आला आणि स्टेजवर येवून अचानक सादरीकरण केले.शेवटी सैराटमधील गाण्यावर उपस्थितातील जवळजवळ सर्वांनी डान्स केला.हे दृश्य अवर्णनीय होते.'पार्किन्सनसह आनंदाने जगूया' हे ब्रीद प्रत्यक्षात उतरताना दिसत होते.
कार्यक्रमात प्रास्ताविक आणि आभाराचे काम अंजली महाजननी केले.वसू देसाईनी सूत्र संचालन केले.अंजली महाजननी केशवराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्व सहभागींना भेटवस्तू दिली.गप्पा मारत
अल्पोपहार झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
         
२० डिसेंबर २०२३.-  पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल. यावर्षीची सहल 'झपूर्झा' येथे गेली होती.
          यावर्षी सहलीसाठी शुभार्थींकडून कोणतीही वर्गणी न घेण्याचे ठरले. इतरांकडून रु. ७००/- घेण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे ते  घेतले. बघताबघता सहलीसाठी इच्छुक असणाऱ्यांची नावे येत गेली  सर्व सदस्यांचा उदंड प्रतिसाद पाहता एक मोठी बस, एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक कार घेऊन जायचे ठरले. कार घेऊन जाण्यामागे एक उद्देश असाही असतो की सहलीच्या ठिकाणी चुकून कोणाला काही त्रास झाला तर त्या सदस्याला घेऊन पुण्यात लवकरात लवकर परत येता यावे.
                सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निवारा येथे सगळे जमायला सुरुवात झाली. तिन्ही वाहनांमध्ये सर्व स्थानापन्न झाल्यावर " गणपती बाप्पा मोरया " म्हणत, एका वाहनापुढे नारळ वाढवून, सगळे झपूर्झाच्या दिशेने निघाले म्हणून सहलीची सुरुवात केली. मग काय  उत्साहात  सगळे गाणी म्हणायला लागले. त्याचबरोबर खाऊवाटपही सुरू झाले. बघता बघता झपूर्झा कधी आले ते कळलेच नाही.
            झपूर्झा हे कला आणि संस्कृती संग्रहालय खडकवासल्याच्या जवळ आहे. पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांचा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम.  आपल्या संस्कृतीची आणि पारंपारिक कलांची ओळख व्हावी, त्यांची आवड निर्माण व्हावी, विशेषतः आताच्या नवीन पिढीला, हा त्यामागचा उद्देश. सात एकर जागेवर वसलेल्या या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य परिसरात एकूण दहा कलादालने आहेत, ज्यातील कलाकृती नेहमी बदलत असतात. भारतातील राजा रविवर्मा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची चित्रे, काही शिल्पकृती, परंपरागत पैठण्या यांसारखी वस्त्रे, सोन्या-चांदीचे असंख्य दागिने, जुन्या वस्तू, विविध प्रकारचे दिवे, अशा कितीतरी गोष्टी इथे आहेत. झपूर्झाच्या व्यवस्थापनाने सुरुवातीला थोडी माहिती सांगितली. त्यानंतर चहा- बिस्किटे यांची व्यवस्था केली होती. तसेच तिथे पाच-सहा व्हील चेअर्सचीपण सोय केलेली होती. सगळीकडे फिरायला रॅम्प्स, लिफ्ट, प्रशस्त दालने, त्यामुळे शुभार्थींना तिथे फिरणे आणि कलाकृती बघणे खूपच सोयीस्कर झाले.  प्रत्येक दालनामध्ये तिथली माहिती द्यायला स्वयंसेवक होते. ठिकठिकाणी कलाकृतींबद्दलची माहिती लिहिलेली होती सगळेजण गृप्स करून दालने पाहत असल्यामुळे कुठेही गर्दी झाली नाही. अगदी निवांतपणे सगळी दालने आणि त्यातील कलाकृती बघता आल्या. भरपूर फोटोही काढता आले. 
                    विशेष म्हणजे ज्यांनी या कलासंग्रहालयाची निर्मिती केली ते श्री. अजित गाडगीळ मुद्दाम वेळ काढून सर्वांना भेटायला आले होते. 
           साधारण एक - दीडच्या सुमारास सगळेजण भोजनालयाकडे वळले. साध्या घरगुती बेताबरोबर उकडीचे मोदक हा एक सरप्राईज आयटम होता जेवणामध्ये. जेवल्यानंतर काहीजण आरामात गप्पा मारत बसले, काहीजण खडकवासला बॅकवॉटरच्या बॅकग्राऊंडवर फोटो काढण्यात रमले. काहींनी अजून थोडा फेरफटका मारला जवळपास. तिथे जवळच एक शंकराचे छोटेसे देऊळ आहे. देवळाबाहेरील दीपमाळ नेहमीपेक्षा वेगळी होती. आत गाभाऱ्यात खूप शांत वाटत होते.
                  थोड्या विश्रांतीनंतर चहापान झाले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. 
           ही सहल इतर सहलींपेक्षा थोडी वेगळी होती. नेहमीप्रमाणे मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा विविध छोट्या स्पर्धा, खेळ यांचा समावेश जरी यामध्ये नसला तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ' खूप काही छान बघायला मिळाले आज ' असाच भाव होता. सहलीनंतरचे काही दिवस तिथले फोटो, अरुण सुर्वेंनी तयार केलेले व्हिडिओज व्हाॅट्सॲप गृपवर सतत येत राहिले आणि प्रत्येकाला पुनःप्रत्ययाचा आनंद देत राहिले, हे मात्र नक्की
          ७ एप्रिल २०२४ - जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त एस.एम. जोशी हॉल येथे प्रत्यक्ष मेळावा घेण्यात आला.पुण्यातील तसेच परगावचे शुभंकर, शुभार्थीही आवर्जून हजर होते.सभागृह तुडुंब भरले होते.प्रवेश करताना ताक देऊन स्वागत करण्यात आले. शुभार्थीच्या कलाकृतींचे प्रदर्शन बाहेर मांडले होते ते पाहून सर्व जण आत येत होते.
          या वर्षीचे वक्ते न्यूरोसर्जन डॉ.महेश करंदीकर नाशिकहून आले होते.वेळेच्या बरेच आधी ते आले.कलाकृतीच्या प्रदर्शनाचा मनमुराद आनंद घेतला.प्रत्येक शुभार्थीला त्यांनी बारकाईने कलाकृतीबद्दल प्रश्न विचारले.त्यांचे कौतुक केले त्यांच्या कृतीमुळे सहभागी शुभार्थी भाराऊन गेले.
         यावर्षी स्टेजवरील सर्व बाबी शुभार्थिनी केल्या.इशस्तवन प्रणिता नरवाडे,नृत्याबद्दल माहिती शैला भागवत,नृत्य सहभागींना फुले देणे राजीव कारळे,स्मरणिका प्रकाशन किरण सरदेशपांडे,आभार उमेश सलगर,सूत्र संचालन गौरी इनामदार
         डॉ.अमित करकरे यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.त्यानंतर स्मरणिका प्रकाशन झाले.वक्त्यांनी 'पार्किन्सन्स माझा सांगाती' या विषयावर उद्बोधक, प्रेरणादायी व्याख्यान दिले.विविध संशोधनाच्या आधारे औषधोपचाराबरोबर इतर उपायांचे महत्व विशद केले.मंडळाच्या कार्याचे शुभार्थींच्या विविध कलांचे कौतुक केले.
        शेवटी जाताना स्मरणिका वाटप झाले पेढा आणि वेफर्स देण्यात आले.




  •                

        


    पार्किन्सन्सविषयक गप्पा - ८३

                                                      पार्किन्सन्सविषयक गप्पा  - ८३

                        मुंबईहून माझी नणंद तीच्या मुलगी आणि जावयासह बऱ्याच वर्षांनी येणार होती.अपेक्षेपेक्षा थोडा उशीर होत असल्याने आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.एकमेकांना भेटण्यास उत्सुक होतो.तीही पार्किन्सन शुभार्थी असल्याने प्रवासाचा त्रास होईल का ही काळजीही होती.अखेर ती सुखरूप आली.पायऱ्या चढत असताना तिने पाउल पायरीच्या कडेला ठेवले.आणि तिची मुलगी थोडा आवाज चढवून म्हणाली, 'आई तुला किती वेळा सांगितले पायरीवर पूर्ण पाय दे म्हणून पडशील ना' मी तिला शांत करत म्हटले अग चिडू नको. तो तीचा दोष नाही.पार्किन्सनमुळे Visuospatial abilities वर झालेल्या परिणामामुळे असे होते.तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर मी म्हणाले,'सांगते तुला समजाऊन नंतर आधी फ्रेश व्हा'.तिला मी समजाऊन सांगितलेच पण हे गप्पमाध्येही सांगावेसे वाटले.कारण अनेक शुभंकरांकडून अशाच तर्हेची तक्रार मी ऐकली आहे.

                     माझ्या भाचीप्रमाणेच मीही तीर्थळींच्यावर याच कारणावरून चिडायची.लाईटचे बटण ऑन करायचे तर ते खूप लांबून पाय वर करून ऑन करायचे.पायरीच्या कडेवर पाय देऊन चढणे होतेच शिवाय खुर्चीवर समोरून बसताना इतके अलीकडे बसायचे की पडतील असे वाटायचे कडेनी खुर्चीकडे गेले तर खुर्चीचा हात असेल तिथेच बसायला पहायचे.टेबलवर पाण्याचा ग्लास ठेवताना टेबलाच्या कडेवर ठेवायचे त्यामुळे तो खाली पडायचा.नलीन जोशींचीही प्रज्ञाबद्दल हीच तक्रार होती.

                    एकदा PDMDS च्या ऑनलाईन सभेत Visuospatial abilities या विषयावर व्याख्यान झाले आणि मी इतके दिवस तीर्थळींच्यावर चिडायची त्याचे वाईट वाटले.अतिशय उत्तम फोरव्हीलर चालवणाऱ्या ह्यांचा अंदाज का चुकायचा हे लक्षात आले.अपराधीपणाची भावनाही आली.

                येथे हे स्पष्ट करावे लागेल की सर्वच शुभार्थीना ही समस्या येत नाही.ज्यांना ही समस्या आहे त्यांच्यासाठी व्याख्यानाची लिंक सोबत दिली आहे ती अवश्य पहा. अत्यंत सोप्या भाषेत वेगवेगळ्या स्लाईड्सच्या आधारे उपयुक्त माहिती दिलेली आहे.

                    येथे मी थोडक्यात सांगते.आपल्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या वस्तूकडे आपण पाहतो तेंव्हा किंवा जातो तेंव्हा आपल्या दृष्टीला त्या वस्तूची उंची,खोली,अंतर,दिशा या सर्व बाबींचा अंदाज असतो. त्यानुसार क्रिया होतात.रोजच्या व्यवहारात या गोष्टी इतक्या सहज होत असतात की एवढे सर्व पाहिले जाते हे लक्षातही येत नाही.काही पार्किन्सन शुभार्थीची हे पाहण्याची द्रूष्टी आणि अंदाज म्हणजेच Visuospatial abilities बाधित झालेल्या असतात.म्हणजे आपल्याला खुर्चीकडे जाताना ती खुर्ची दिसते त्याच्या अलीकडे शुभार्थीला खुर्ची दिसते.पायरी चढतानाही पायरी पर्यंतचे अंतर,खोली,उंची यांचा अंदाज चुकतो.

                 यापेक्षा जास्त माहिती मी देत नाही.कारण ज्यांना त्रास आहे त्या शुभार्थीच्या शुभंकरांनी सोबत दिलेली लिंक पहावी असे मला वाटते.आणि आपण शुभार्थीला बोल लावले याबद्दल अपराधीपणाची भावनाही ठेवण्याची गरज नाही.शुभंकर शुभार्थीसाठी जीवाचे रान करता असतो.अज्ञातून आपल्याकडून अशा चुका झाल्यास स्वत:ला माफ करून टाकावे.

                  वेगवेगळ्या स्वमदतगटातून विविध माहितीचा खजिना आपल्यापर्यंत पोचत असतो.त्याद्वारे हा गुंतागुंतीचा आजार जास्तीत जास्त समजून घ्यावा.याबाबत यथार्थ ज्ञान देउन शुभार्थीची जगण्याची गुणवत्ता उत्तम ठेवण्यास मदत करणाऱ्या तज्ज्ञांबद्दल मनापासून कृतज्ञता मानावी.   

     

      https://www.youtube.com/watch?v=Vwcm7bePYjQ