पार्किन्सन्सविषयक गप्पा - ८१
नुकतेच 'भेटू आनंदे' मध्ये विलास गिजरे यांचे नर्मदापरिक्रमेवर अनुभव कथन झाले.त्यांना स्व सुधारणा आणि स्वपरीवर्तन यासाठीची ही संधी वाटली.घरच्यांचा पाठींबा यासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.हा पाठींबा सक्रीय होता. शुभार्थी शुभदाताई यांची काळजी मुलगा आणि सून यांनी उचलली त्यामुळेही शक्य झाले.जोत्स्ना पुजारीही मुलगा आणि सून यांच्यावर शुभार्थीची जबाबदारी सोडून मानस सरोवर यात्रा करून आल्या.दोघेही आल्यावर शुभार्थीची देखभाल करण्यासाठी अधिक सक्षम होऊन आले.मी स्वत:ही मुलीवर शुभार्थीची जबाबदारी सोपवून एका कौटुंबिक समारंभाला जाऊन फ्रेश होऊन आले.केअरगीव्हर बर्न आउट मधून थोडे बाहेर येण्यासाठी हे गरजेचे आहे.
न्यूरॉलॉजिस्ट राजस देशपांडे यांनी आपल्या व्याख्यानात .'केअरगीव्हर बर्न आउट' हा शब्द वापरला होता.शुभंकर स्वत: काही आजारांनी ग्रस्त असतात. शुभार्थीचा ताबा मुलांनी,कुटुंबीयांनी घेऊन आठवड्यातून एकदा तरी शुभंकराला मोकळीक दिली पाहिजे.Family counseling मध्ये डॉक्टरनीही हे सांगितले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले होते.यापुढे जाऊन वर्षातून एक महिना घरच्या लोकांनी शुभंकराला सुटी द्यायला हवी तसा कायदाच झाला पाहिजे असेही ते म्हणाले होते.हे होणे खूप दूरची गोष्ट निदान पार्किन्सन मित्रमंडळाने हा प्रयत्न करावा असा सल्ला त्यांनी दिला होता.हा त्यांचा सल्ला ऐकून याबाबत सांगणे आणि लिहिणे मी करत आले.
अनेक शुभंकरांना वाटते आपल्या व्यक्तीची सेवा आपणच केली पाहिजे.इतर नीट पाहणार नाहीत असेही वाटत असते.पगारी केअरटेकरचा खर्च झेपणार नसतो.यासाठी मुले,मुली खर्च करायला तयार असतात पण काहीना ती घेणे आवडत नाही. वयोमान आणि स्वत:चे आजार यामुळे हे झेपत तर नसते.मग चिडचिड होते.अशा अनेक शुभार्थींशी मी व्यक्तिश: याबाबत बोलले आणि त्यांना ते पटलेही.खर तर मलाही पगारी केअरटेकर ठेवणे पटत नव्हते.तीर्थळीना कोविद झाला आणि त्यानंतर हॉस्पिटल मधून आले ते बेडरिडन अवस्थेत.आमच्या घरी २४ तासाचा पगारी केआर टेकर आला.मुलींनी खर्च उचलला.आता आमच्या दोघांची सूत्रे मुलींच्या हातात आहेत.मुला, मुलीनी अशी थोडी आई वडिलांवर जबरदस्ती केली पाहिजे असेही मला वाटते.
काही कुटुंबात शुभंकरावर नातवंडे सांभाळण्याचा अधीक भार असतो.काही वेळा आज्जी आजोबांनाच नातवंडाना कोणावर सोपवणे नको असते.असे हट्ट सोडून दिले पाहिजेत.याबाबत प्रत्येक शुभंकर,शुभार्थीगणिक वेगवेगळ्या अडचणी असतात.यासाठी समुपदेशनाचे काम मंडळ हाती घेऊ शकते.ज्याना कोणाचा आधार नाही आणि आर्थिक परिस्थिती नाही अशाना आर्थिक मदत देण्यासाठीच्या योजना पुढील काळात मंडळ हाती घेऊ शकेल.
केवळ शुभार्थीचा विचार न करता शुभंकराचा विचारही व्हायला हवा हा विचार आता मूळ धरू लागला आहे.आहे वृद्धकल्याणशास्त्रतज्ज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांनीही त्यांच्या लेखनातून व्याख्यानातून यावर भर दिला.अल्झायमर सपोर्टग्रुप चालवणाऱ्या मंगला जोगळेकर यांनी काळजीवाहक घडताना या पुस्तकात यावर स्वतंत्र लेख लिहिला आहे.
एकुणात शुभार्थीची काळजी घेण्यास सक्षम असण्यासाठी शुभंकरानी स्वत:ची काळजी घेतलीच पाहिजे.
No comments:
Post a Comment