पार्किन्सन्सविषयक गप्पा ६०
शुभार्थी डॉ.सतीश वळसंगकर यांची प्रथम भेट राजीव ढमढेरे यांच्या घरी २०११ मध्ये झाली.आम्ही पार्किन्सन्स मित्रमंडळ कार्यकारिणीचे सदस्य तेथे होतो. पार्किन्सन्स असून अत्यंत सकारात्मकतेने वागणारी व्यक्ती म्हणून ते आमच्या लक्षात राहिले..त्या वर्षीच्या जागतिक पार्किन्सन्स मेळाव्याच्या स्टेजवरही त्यांनी हजेरी लावली.परंतु आखीव रेखीव कार्यक्रमात त्याना फार वेळ देता आला नाही.सोशल मीडियामुळे दहा वर्षांनी आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो..
औरंगाबादचे शुभंकर रमेश तिळवे यांनी मंडळात सामील झाल्या झाल्या परगावच्या सदस्यांची बरेच दिवस रेंगाळलेली यादी अपडेट करायला घेतली आणि अनेक सदस्य Whats app द्वारे संपर्कात आणले.डॉक्टरांच्या पत्नी क्षमा वळसंगकरही सामील झाल्या.इतकी वर्षे या पतीपत्नीच्या संपर्कात नव्हतो याची हळहळ वाटली.फक्त पार्किन्सन्स शुभार्थीसाठीच नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचे जीवन प्रेरणादायक आहे.
सोलापूरच्या सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक जीवनात आणि वैद्यकीय क्षेत्रात मान्यताप्राप्त असे बहुआयामी व्यक्तिमत्व, आपल्या परिवाराचा भाग असणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.परंपरेने मिळालेला सेवाभावी वृत्तीने आणि नैतीकतेनी वैद्यकीय व्यवसाय करण्याचा वसा त्यांनी सांभाळला शिवाय अधिक वाढवून पुढच्या पिढीकडेही हीच परंपरा पोचवली.
ते एम.बी.बी.एस.आणि एम.एस.( जनरल सर्जरी) आहेत. डॉक्टरनी पुढे एफ.सी.पीएस.(सर्जरी) आणि १९८६ मध्ये लंडनयेथे GI सर्जरीचा कोर्स केला.या सर्व पद्व्यांपेक्षा एक मोठ्ठी पदवी त्यांच्याकडे आहे ती म्हणजे मुंबईचे प्रसिध्द सर्जन वी.ना.श्रीखंडे यांच्याबरोबर त्यांनी ३/४ वर्षे काम केले.श्रीखंडे यांचे फक्त 'आणि दोन हात' पुस्तक वाचल्यावर वाचक चार्ज होतो.भाराऊन जातो.त्यांच्याबरोबर इतकी वर्षे राहणाऱ्या व्यक्तीला केवळ सर्जरीचा अनुभवच नाही तर सहृदय व्यक्ती म्हणून किती आणि कायकाय मिळाले असेल याची आपण कल्पना करू शकतो.
पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ सर्जन म्हणून ते नावाजलेले आहेत.सोलापुरात त्यांनी गँस्ट्रोस्कोपी प्रथम चालू केली.५०००० च्या वर गँस्ट्रोस्कोपी केल्या कॉम्प्लिकेटेड केसेस यशस्वीपणे हाताळल्या.लँप्रोस्कोपिक सर्जरीही उत्तम रीतीने हाताळल्या.स्वत:चे सोलापूर क्लिनिक हे हॉस्पिटल त्यांनी नावारूपास आणले.
व्यवसाय सांभाळताना.अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषविले.'असोसिएशन ऑफ सर्जन्स,महाराष्ट्र,'सोलापुर जनता सहकारी बँके'चे अध्यक्ष,'हेडगेवार रक्तपेढी,सोलापूर'चे संस्थापक व अध्यक्ष,'एस.पी मंडळी( पुणे' चे सदस्य,एस.ए.एस.पोलिटीकनिकचे उपाध्यक्ष अशी काही महत्वाची नावे सांगता येतील.याशिवाय इतर अनेक संस्थांच्या कार्यकारिणीवर निरपेक्षपणे खूप काम केले.
२००४ मध्ये पार्किन्सन्सने गाठले तरी त्यांचे काम सुरूच होते.२०१३ पर्यंत ते शस्त्रक्रिया करत होते.त्याना कंप आहे ,त्यामानाने रीजीडीटी नाही.पार्किन्सन्सच्या वाढीची गतीही स्लो आहे. कदाचित त्यांच्या जगण्यातील कार्यरतता, इतरांसाठी झोकून देऊन काम करणे, सकारात्मकता. आनंदी वृत्ती, संगीतप्रेम, स्वत: गाणे गाणे आणि सिंथेसायजर वाजवणे, लहान मुले असोत की, वृद्ध, शिक्षित असो की अशिक्षित सर्वांमध्ये रमणे अशा विविध गोष्टी पीडीला रोखण्यात यशस्वी ठरत असाव्यात.
इतका व्याप असताना विविध गोष्टी शिकणे आणि शिकवणे यातूनही पर्किन्सन्सला वाढायला जागाच उरत नसावी. जर्मन संस्कृत, मोडी, उर्दू,कानडी, तेलगु या भाषांवर त्यांचे मराठी, इंग्रजी, हिंदीप्रमाणेच प्रभुत्व आहे.या सर्व भाषा ते वाचू, लिहू शकतात. जर्मन, संस्कृतचे अजूनही वर्ग घेतात.जर्मनमध्ये कविता करतात. उर्दू हस्ताक्षरासाठी त्यांना बक्षिसे मिळाली.
स्वत:चा विषय असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातले अध्यापनही चालूच असते.१८/२० वर्षे त्यांनी हौस म्हणून अँनॉटोमीचे अध्यापन केले. इन्स्ट्रुमेन्ट्स शिकायला गव्हर्मेंट कॉलेजचे विद्यार्थीही यायचे.आजही मेडिकल, नॉनमेडिकल कुठलेही विद्यार्थी आले तरी ते आनंदाने शिकवतात.अगदी युपीएससीच्या विद्यार्थ्यानाही ते मार्गदर्शन करतात.विद्यार्थ्यांवर ते मनापासून प्रेम करतात.त्यांचे अध्यापन विनामूल्य असते शिकवण्यातून मिळणारा आनंद हेच त्यांचे मानधन.
पत्नी अँनेस्थेशियालॉजिस्ट असल्याने फक्त संसारातच नाही तर वैद्यकीय क्षेत्रांत शस्त्रक्रिया करताना खांद्याला खांदा लावून बरोबर होतीच.
आता दोघांनीही व्यवसायातून निवृत्ती घेतली असली तरी आनंदाने जगण्यासाठी अनेक क्षेत्रे त्यांच्याबरोबर आहेत.पार्किन्सन्सने statue करण्याऐवजी पार्किन्सन्सलाच statue करण्यात डॉक्टर यशस्वी व्हावेत हीच सदिच्छा.
No comments:
Post a Comment