Tuesday, 25 August 2020

आठवणीतील शुभार्थी - मोरेश्वर काशीकर

आठवणीतील शुभार्थी मोरेश्वर काशीकर
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आमचा जागतिक पार्किन्सन्स मेळावा होणार नाही हे सांगण्याकरता आम्ही सर्व सभासदांना फोन करत होतो. मी काशीकर सरांना फोन केला. हे माझे बोलणे लाॅक डाऊन सुरू होण्यापूर्वी झाले होते. नेहमी सारखा भारदस्त आवाज आणि सकारात्मक ऊर्जा मिळणारे बोलणे झाले. त्यांच्या मनात एक विषय घोळत होता पुढच्या स्मरणिके साठी आत्तापासून लिहितो म्हणाले परंतु पुढच्या स्मरणिकेच्या आणि आमच्याही नशिबात हा योग नव्हता.
11 जुलै 2020 ला त्यांचे दुःखद निधन झाले. मंडळाच्या दृष्टीने बुद्धिमान, शुभार्थीच्या आरोग्याविषयी कळकळ असणारे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले. ते मंडळात सामील झाल्यापासून त्यांच्या लेखा शिवाय आमची एकही स्मरणिका झाली नाही. त्यांचे अनुभवाधारित संशोधनपर लेख स्मरणिकेची गुणवत्ता वाढवतात.
1961 साली पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून ते उत्तीर्ण झाले. पुढे जवळजवळ एकोणचाळीस वर्षे त्यांनी नोकरी केली आणि निवृत्त झाल्यावर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग क्षेत्रासंबंधी सल्ला आणि सेवा देणे सुरू केले. त्याचबरोबर त्यांनी योगोपचाराचे प्रशिक्षण आणि सेवाही सुरू केली. पुण्यातील प्रसिद्ध कबीर बागेत ते शिकवायला जात होते.
2012 साली पार्किन्सन्स झाल्यावर पार्किन्सन्सने ताबा घेतलेले आपले शरीर त्यांनी योगासाठी प्रयोगशाळा बनवले. स्वतःचे निरीक्षण करून योगाने पार्किन्सन्स वर कसा विजय मिळवता येईल याचे प्रयोग सुरू केले.
लहानपणापासून 108 सूर्यनमस्कार, निरनिराळे खेळ, पोहणे, दुर्गभ्रमण, हिमालयन ट्रेकिंग, योगाभ्यास केल्याने कोणत्याही व्यायामातून आनंद निर्माण
करणारे इंडॉर्फिन निर्माण झाल्याची भावना होते. पार्किन्सन्सच्या लक्षणावरही व्यायामाने मात करता येईल असे त्यांचे गृहितक होते आणि त्यांच्याच शब्दात सांगायचे तर 'ब्र्याडीची करून टॅकी पार्किन्सन्सची
ऐसी तैसी' अशी आक्रमक आरोळी ठोकत' त्यांनी 2013 पासून स्वतावर प्रयोग करणे सुरू केले. त्यावर आधारित 2016 च्या स्मरणिकेत 'ट्रेमर्सशी मैत्री एक प्रयोग' हा त्यांचा लेख क्षेत्रीय अभ्यासाचा (केस स्टडी) उत्तम नमुना म्हणता येईल.
त्यांच्यातील योगशिक्षक, इंजिनियर, संशोधक, दृढनिश्चय असणारा शुभार्थी यांच्या समन्वयातून त्यांच्या या प्रयोगाला सुरुवात झाली. गृहितक चुकले तरी खंत मानायची नाही ही मनाची तयारी होती.
त्यांच्या या प्रयोगात सामील करून घेण्यासाठी घरी जाऊन शिकवण्याची ही त्यांची तयारी होती त्यांनी काहींना शिकवलेही पण त्यांच्यात काशीकर सरांसारखा दृढनिश्चय नसल्याने सातत्य राहिले नाही. आणि 'बुडती हे जन न देखवे डोळा' अशी त्यांची अवस्था झाली. ही खंत ते बोलून दाखवत.
हे फक्त योगासना बद्दल नाहीतर विविध उपचार पद्धतीचे समन्वय साधून स्वतःवर प्रयोग करणे त्यांनी चालू केलं.
इतर उपचार पद्धतीचा पूरक म्हणून वापर करण्यासाठी पाठपुरावा करणे हे मंडळाचे उद्दिष्ट आहे. ते कधी प्रत्यक्षात येईल माहीत नाही पण 'एकला चलो' म्हणून काशीकर यांनी मात्र विविध उपचार पद्धतींचा समन्वय साधून स्वतःवर प्रयोग करणे सुरूही केले. सातत्याने लिहीत राहून लिखाणासाठी ही फिजिओथेरपीस्टने सांगितलेला व्यायाम करून पीडीच्या लिहिण्याच्या समस्येवर मात केली. स्वतःच्या अक्षरात लेख लिहिले.
मंडळात इंजिनिअरिंग, फिजिओथेरपीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रकल्पासाठी येत.त्यांच्या प्रयोगात त्यांना विशेष रस असे ते त्यांना मनापासून मदत करायचे पण ते स्वतः हाडाचे संशोधक असल्याने जे विद्यार्थी या प्रकल्पाबद्दल गंभीर नसतात त्यांचा त्यांना खूप राग यायचा.
मंडळाच्या प्रत्यक्ष कामात त्यांचा सहभाग असे. मंडळाच्या सभेमध्ये सुरुवातीला प्रार्थना सांगायचे काम ते करीत. त्यांच्या पार्किन्सन्स वाढल्यावर ही ते स्मरणिकेचे प्रुफ तपासण्यासाठी माझ्याकडे द्या असे म्हणायचे.
मंडळाच्या सभेत शुभंकर,शुभार्थींचे वाढदिवस साजरे केले जातात. त्यावेळी अंजली महाजन स्वहस्ते तयार केलेली भेटकार्डे आणते. एका महिन्यात ती येऊ शकणार नव्हती. भेटकार्डे तयार होती तर काशीकर सरांनी तिच्या घरी जाऊन तीन मजले चढून भेटकार्डे आणण्याचे काम केले.
ब्रेनजीमवर आंतरजालावरील एक सुंदर लेख डॉक्टर शशिकांत करंदीकर यांनी पाठवला होता त्याचे भाषांतर करण्याचे काम काशीकर सरांनी स्वीकारले. अत्यंत ओघवत्या मराठीमध्ये त्यांनी भाषांतर करून दिले.
आम्हा दोघा पती पत्नींच्या वैयक्तिक जीवनातील त्यांचे स्थान खूप वरचे होते. स्कूटरवरून अनेक वेळा ते आमच्याकडे व्यायाम शिकवायला आले. पार्किन्सन्स वाढल्यावर त्यांचे स्कूटर चालवणे बंद झाले. आम्ही त्यांच्या घरी जायला लागलो त्यांचा मुलगा आम्हाला घेऊन जाई आणि पुन्हा परत आणून सोडत असे. त्यांच्या सर्व कुटुंबाशीच आमची जवळीक निर्माण झाली.त्यांच्याकडे गेले की सकारात्मक उर्जा घेऊनच आम्ही येत असू.
आता सभेलाही ते रिक्षाने येऊ लागले. नंतर त्यांना बरोबर कोणीतरी लागू लागले. त्यांनी स्मरणिकेतील एका कवितेत हम होंगे कामयाब च्या चालीवर 'हम होंगे अपने शुभंकर एक दिन' असा विश्वास दाखवला होता पार्किन्सन्सने त्यांच्या विश्वासावर घाला घालून दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ आणली पण तरीही त्यांचा पार्किन्सन्सची ऐशीतैशी हा भाव मात्र पार्किन्सन्सला पुसता आला नाही.
शेवटच्या काळात ते हॉस्पिटलमध्ये होते त्यांचा आत्मविश्वास, योगाने कमावलेले शरीर हे सर्व त्यांना यातून बाहेर काढणार आणि त्या सर्वांवर ते छान लेख लिहून देणार असे विशफुल थिंकिंग मी करत होते त्यामुळे त्यांचे जाणे स्वीकारायला मन तयार होत नाही पण ते खरे आहे.हे स्वीकारायला हवे. त्यांच्या लेखातील विचारासह, आठवणींसह ते आमच्या बरोबर आहेतच.
त्यांच्या अभ्यासाचे सारं त्यांनी एका कवितेत दिले
'शुभार्थी आणि शुभंकर आहार-विहार आणि उपचार
एकरुप जेथे होती सर्व हाच जाणा पीडी समाधी योग'
हे सारं आपण आचरणात आणणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल
त्यांच्यावर यापूर्वी लिहिलेल्या लेखांच्या लिंक सोबत दिल्या आहेत. याशिवाय त्यांचे स्मरणिकेतील लेखही आवर्जून वाचावेत
 



No comments:

Post a Comment