Wednesday, 26 August 2020

पार्किन्सन्सविषयक गप्पा ६०

 

पार्किन्सन्सविषयक गप्पा ६०

                                  शुभार्थी डॉ.सतीश वळसंगकर यांची प्रथम भेट राजीव ढमढेरे यांच्या घरी २०११ मध्ये झाली.आम्ही पार्किन्सन्स मित्रमंडळ कार्यकारिणीचे सदस्य तेथे होतो. पार्किन्सन्स असून अत्यंत सकारात्मकतेने वागणारी व्यक्ती म्हणून ते आमच्या लक्षात राहिले..त्या वर्षीच्या जागतिक पार्किन्सन्स मेळाव्याच्या स्टेजवरही त्यांनी हजेरी लावली.परंतु आखीव रेखीव कार्यक्रमात त्याना फार वेळ देता आला नाही.सोशल मीडियामुळे दहा वर्षांनी आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो..

                        औरंगाबादचे शुभंकर रमेश तिळवे यांनी मंडळात सामील झाल्या झाल्या परगावच्या सदस्यांची बरेच दिवस रेंगाळलेली यादी अपडेट करायला घेतली आणि अनेक सदस्य Whats app द्वारे संपर्कात आणले.डॉक्टरांच्या पत्नी क्षमा वळसंगकरही सामील झाल्या.इतकी वर्षे या पतीपत्नीच्या संपर्कात नव्हतो याची हळहळ वाटली.फक्त पार्किन्सन्स शुभार्थीसाठीच नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचे जीवन प्रेरणादायक आहे.

                       सोलापूरच्या सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक जीवनात आणि वैद्यकीय क्षेत्रात मान्यताप्राप्त असे बहुआयामी व्यक्तिमत्व, आपल्या परिवाराचा भाग असणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.परंपरेने मिळालेला सेवाभावी वृत्तीने आणि नैतीकतेनी वैद्यकीय व्यवसाय करण्याचा वसा त्यांनी सांभाळला शिवाय अधिक वाढवून पुढच्या पिढीकडेही हीच परंपरा पोचवली.

 ते एम.बी.बी.एस.आणि एम.एस.( जनरल सर्जरी) आहेत. डॉक्टरनी पुढे एफ.सी.पीएस.(सर्जरी) आणि १९८६ मध्ये लंडनयेथे GI सर्जरीचा कोर्स केला.या सर्व पद्व्यांपेक्षा एक मोठ्ठी पदवी त्यांच्याकडे आहे ती म्हणजे मुंबईचे प्रसिध्द सर्जन वी.ना.श्रीखंडे यांच्याबरोबर त्यांनी ३/४ वर्षे काम केले.श्रीखंडे यांचे फक्त 'आणि  दोन हात' पुस्तक वाचल्यावर वाचक चार्ज होतो.भाराऊन जातो.त्यांच्याबरोबर इतकी वर्षे राहणाऱ्या व्यक्तीला केवळ सर्जरीचा अनुभवच नाही तर सहृदय व्यक्ती म्हणून किती आणि कायकाय मिळाले असेल याची आपण कल्पना करू शकतो.

                       पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ सर्जन म्हणून ते नावाजलेले आहेत.सोलापुरात त्यांनी गँस्ट्रोस्कोपी प्रथम चालू केली.५०००० च्या वर  गँस्ट्रोस्कोपी केल्या कॉम्प्लिकेटेड केसेस यशस्वीपणे हाताळल्या.लँप्रोस्कोपिक सर्जरीही  उत्तम रीतीने हाताळल्या.स्वत:चे सोलापूर क्लिनिक हे हॉस्पिटल त्यांनी नावारूपास आणले.

                  व्यवसाय सांभाळताना.अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषविले.'असोसिएशन ऑफ सर्जन्स,महाराष्ट्र,'सोलापुर जनता सहकारी बँके'चे अध्यक्ष,'हेडगेवार रक्तपेढी,सोलापूर'चे संस्थापक व अध्यक्ष,'एस.पी मंडळी( पुणे' चे सदस्य,एस.ए.एस.पोलिटीकनिकचे उपाध्यक्ष अशी काही महत्वाची नावे सांगता येतील.याशिवाय इतर अनेक संस्थांच्या कार्यकारिणीवर निरपेक्षपणे खूप काम केले.

                २००४ मध्ये पार्किन्सन्सने गाठले तरी त्यांचे काम सुरूच होते.२०१३ पर्यंत ते शस्त्रक्रिया करत होते.त्याना कंप आहे ,त्यामानाने रीजीडीटी नाही.पार्किन्सन्सच्या वाढीची गतीही स्लो आहे. कदाचित त्यांच्या जगण्यातील कार्यरतता, इतरांसाठी झोकून देऊन काम करणे, सकारात्मकता. आनंदी वृत्ती, संगीतप्रेम, स्वत: गाणे गाणे आणि सिंथेसायजर वाजवणे, लहान मुले असोत की, वृद्ध, शिक्षित असो की अशिक्षित सर्वांमध्ये रमणे अशा विविध गोष्टी पीडीला रोखण्यात यशस्वी ठरत असाव्यात.

                        इतका व्याप असताना विविध गोष्टी शिकणे आणि शिकवणे  यातूनही पर्किन्सन्सला वाढायला जागाच उरत नसावी. जर्मन संस्कृत, मोडी, उर्दू,कानडी, तेलगु या भाषांवर त्यांचे मराठी, इंग्रजी, हिंदीप्रमाणेच प्रभुत्व आहे.या सर्व भाषा ते वाचू, लिहू शकतात. जर्मन, संस्कृतचे अजूनही वर्ग घेतात.जर्मनमध्ये कविता करतात. उर्दू हस्ताक्षरासाठी त्यांना बक्षिसे मिळाली.

      स्वत:चा विषय असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातले अध्यापनही चालूच असते.१८/२० वर्षे त्यांनी हौस म्हणून अँनॉटोमीचे अध्यापन केले. इन्स्ट्रुमेन्ट्स शिकायला गव्हर्मेंट कॉलेजचे विद्यार्थीही यायचे.आजही मेडिकल, नॉनमेडिकल कुठलेही विद्यार्थी आले तरी ते आनंदाने शिकवतात.अगदी युपीएससीच्या विद्यार्थ्यानाही ते मार्गदर्शन करतात.विद्यार्थ्यांवर ते मनापासून प्रेम करतात.त्यांचे अध्यापन विनामूल्य असते शिकवण्यातून मिळणारा आनंद हेच त्यांचे मानधन.

पत्नी अँनेस्थेशियालॉजिस्ट असल्याने फक्त संसारातच नाही तर वैद्यकीय क्षेत्रांत शस्त्रक्रिया करताना खांद्याला खांदा लावून बरोबर होतीच.

आता दोघांनीही व्यवसायातून निवृत्ती घेतली असली तरी आनंदाने जगण्यासाठी अनेक क्षेत्रे त्यांच्याबरोबर आहेत.पार्किन्सन्सने statue करण्याऐवजी पार्किन्सन्सलाच statue करण्यात डॉक्टर यशस्वी व्हावेत हीच सदिच्छा.

 

               


 

 


 

 

 

 

 

 

Tuesday, 25 August 2020

आठवणीतील शुभार्थी - मोरेश्वर काशीकर

आठवणीतील शुभार्थी मोरेश्वर काशीकर
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आमचा जागतिक पार्किन्सन्स मेळावा होणार नाही हे सांगण्याकरता आम्ही सर्व सभासदांना फोन करत होतो. मी काशीकर सरांना फोन केला. हे माझे बोलणे लाॅक डाऊन सुरू होण्यापूर्वी झाले होते. नेहमी सारखा भारदस्त आवाज आणि सकारात्मक ऊर्जा मिळणारे बोलणे झाले. त्यांच्या मनात एक विषय घोळत होता पुढच्या स्मरणिके साठी आत्तापासून लिहितो म्हणाले परंतु पुढच्या स्मरणिकेच्या आणि आमच्याही नशिबात हा योग नव्हता.
11 जुलै 2020 ला त्यांचे दुःखद निधन झाले. मंडळाच्या दृष्टीने बुद्धिमान, शुभार्थीच्या आरोग्याविषयी कळकळ असणारे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले. ते मंडळात सामील झाल्यापासून त्यांच्या लेखा शिवाय आमची एकही स्मरणिका झाली नाही. त्यांचे अनुभवाधारित संशोधनपर लेख स्मरणिकेची गुणवत्ता वाढवतात.
1961 साली पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून ते उत्तीर्ण झाले. पुढे जवळजवळ एकोणचाळीस वर्षे त्यांनी नोकरी केली आणि निवृत्त झाल्यावर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग क्षेत्रासंबंधी सल्ला आणि सेवा देणे सुरू केले. त्याचबरोबर त्यांनी योगोपचाराचे प्रशिक्षण आणि सेवाही सुरू केली. पुण्यातील प्रसिद्ध कबीर बागेत ते शिकवायला जात होते.
2012 साली पार्किन्सन्स झाल्यावर पार्किन्सन्सने ताबा घेतलेले आपले शरीर त्यांनी योगासाठी प्रयोगशाळा बनवले. स्वतःचे निरीक्षण करून योगाने पार्किन्सन्स वर कसा विजय मिळवता येईल याचे प्रयोग सुरू केले.
लहानपणापासून 108 सूर्यनमस्कार, निरनिराळे खेळ, पोहणे, दुर्गभ्रमण, हिमालयन ट्रेकिंग, योगाभ्यास केल्याने कोणत्याही व्यायामातून आनंद निर्माण
करणारे इंडॉर्फिन निर्माण झाल्याची भावना होते. पार्किन्सन्सच्या लक्षणावरही व्यायामाने मात करता येईल असे त्यांचे गृहितक होते आणि त्यांच्याच शब्दात सांगायचे तर 'ब्र्याडीची करून टॅकी पार्किन्सन्सची
ऐसी तैसी' अशी आक्रमक आरोळी ठोकत' त्यांनी 2013 पासून स्वतावर प्रयोग करणे सुरू केले. त्यावर आधारित 2016 च्या स्मरणिकेत 'ट्रेमर्सशी मैत्री एक प्रयोग' हा त्यांचा लेख क्षेत्रीय अभ्यासाचा (केस स्टडी) उत्तम नमुना म्हणता येईल.
त्यांच्यातील योगशिक्षक, इंजिनियर, संशोधक, दृढनिश्चय असणारा शुभार्थी यांच्या समन्वयातून त्यांच्या या प्रयोगाला सुरुवात झाली. गृहितक चुकले तरी खंत मानायची नाही ही मनाची तयारी होती.
त्यांच्या या प्रयोगात सामील करून घेण्यासाठी घरी जाऊन शिकवण्याची ही त्यांची तयारी होती त्यांनी काहींना शिकवलेही पण त्यांच्यात काशीकर सरांसारखा दृढनिश्चय नसल्याने सातत्य राहिले नाही. आणि 'बुडती हे जन न देखवे डोळा' अशी त्यांची अवस्था झाली. ही खंत ते बोलून दाखवत.
हे फक्त योगासना बद्दल नाहीतर विविध उपचार पद्धतीचे समन्वय साधून स्वतःवर प्रयोग करणे त्यांनी चालू केलं.
इतर उपचार पद्धतीचा पूरक म्हणून वापर करण्यासाठी पाठपुरावा करणे हे मंडळाचे उद्दिष्ट आहे. ते कधी प्रत्यक्षात येईल माहीत नाही पण 'एकला चलो' म्हणून काशीकर यांनी मात्र विविध उपचार पद्धतींचा समन्वय साधून स्वतःवर प्रयोग करणे सुरूही केले. सातत्याने लिहीत राहून लिखाणासाठी ही फिजिओथेरपीस्टने सांगितलेला व्यायाम करून पीडीच्या लिहिण्याच्या समस्येवर मात केली. स्वतःच्या अक्षरात लेख लिहिले.
मंडळात इंजिनिअरिंग, फिजिओथेरपीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रकल्पासाठी येत.त्यांच्या प्रयोगात त्यांना विशेष रस असे ते त्यांना मनापासून मदत करायचे पण ते स्वतः हाडाचे संशोधक असल्याने जे विद्यार्थी या प्रकल्पाबद्दल गंभीर नसतात त्यांचा त्यांना खूप राग यायचा.
मंडळाच्या प्रत्यक्ष कामात त्यांचा सहभाग असे. मंडळाच्या सभेमध्ये सुरुवातीला प्रार्थना सांगायचे काम ते करीत. त्यांच्या पार्किन्सन्स वाढल्यावर ही ते स्मरणिकेचे प्रुफ तपासण्यासाठी माझ्याकडे द्या असे म्हणायचे.
मंडळाच्या सभेत शुभंकर,शुभार्थींचे वाढदिवस साजरे केले जातात. त्यावेळी अंजली महाजन स्वहस्ते तयार केलेली भेटकार्डे आणते. एका महिन्यात ती येऊ शकणार नव्हती. भेटकार्डे तयार होती तर काशीकर सरांनी तिच्या घरी जाऊन तीन मजले चढून भेटकार्डे आणण्याचे काम केले.
ब्रेनजीमवर आंतरजालावरील एक सुंदर लेख डॉक्टर शशिकांत करंदीकर यांनी पाठवला होता त्याचे भाषांतर करण्याचे काम काशीकर सरांनी स्वीकारले. अत्यंत ओघवत्या मराठीमध्ये त्यांनी भाषांतर करून दिले.
आम्हा दोघा पती पत्नींच्या वैयक्तिक जीवनातील त्यांचे स्थान खूप वरचे होते. स्कूटरवरून अनेक वेळा ते आमच्याकडे व्यायाम शिकवायला आले. पार्किन्सन्स वाढल्यावर त्यांचे स्कूटर चालवणे बंद झाले. आम्ही त्यांच्या घरी जायला लागलो त्यांचा मुलगा आम्हाला घेऊन जाई आणि पुन्हा परत आणून सोडत असे. त्यांच्या सर्व कुटुंबाशीच आमची जवळीक निर्माण झाली.त्यांच्याकडे गेले की सकारात्मक उर्जा घेऊनच आम्ही येत असू.
आता सभेलाही ते रिक्षाने येऊ लागले. नंतर त्यांना बरोबर कोणीतरी लागू लागले. त्यांनी स्मरणिकेतील एका कवितेत हम होंगे कामयाब च्या चालीवर 'हम होंगे अपने शुभंकर एक दिन' असा विश्वास दाखवला होता पार्किन्सन्सने त्यांच्या विश्वासावर घाला घालून दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ आणली पण तरीही त्यांचा पार्किन्सन्सची ऐशीतैशी हा भाव मात्र पार्किन्सन्सला पुसता आला नाही.
शेवटच्या काळात ते हॉस्पिटलमध्ये होते त्यांचा आत्मविश्वास, योगाने कमावलेले शरीर हे सर्व त्यांना यातून बाहेर काढणार आणि त्या सर्वांवर ते छान लेख लिहून देणार असे विशफुल थिंकिंग मी करत होते त्यामुळे त्यांचे जाणे स्वीकारायला मन तयार होत नाही पण ते खरे आहे.हे स्वीकारायला हवे. त्यांच्या लेखातील विचारासह, आठवणींसह ते आमच्या बरोबर आहेतच.
त्यांच्या अभ्यासाचे सारं त्यांनी एका कवितेत दिले
'शुभार्थी आणि शुभंकर आहार-विहार आणि उपचार
एकरुप जेथे होती सर्व हाच जाणा पीडी समाधी योग'
हे सारं आपण आचरणात आणणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल
त्यांच्यावर यापूर्वी लिहिलेल्या लेखांच्या लिंक सोबत दिल्या आहेत. याशिवाय त्यांचे स्मरणिकेतील लेखही आवर्जून वाचावेत
 



Sunday, 9 August 2020

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे युट्युब चॅनल

 

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे युट्युब चॅनल
अतुल ठाकूर यांनी 'कृपया सर्वांनी आपले युट्युब चॅनल आवर्जून पाहावे. ४७ विडियोज आहेत तेथे'.असे सांगत खालील लींक दिली. https://www.youtube.com/channel/UCuB9UAYYEycNI4pwvdRDlhQ/
त्या लींक वरून यूट्यूब चानल वर गेल्यावर सर्व व्हिडिओ दिसत होते. मी यापूर्वी पार्किन्सन्स मित्र
मंडळाच्या फेसबुक ग्रुप वर दिलेल्या लिंक वरून जायचे तर मला फक्त न्युरालॉजीस्ट राहुल कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचा व्हिडिओ दिसायचा. अतुलनी दिलेली लिंक पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की मी दिलेली लिंक चॅनलची नव्हती तर डॉक्टर कुलकर्णी यांच्या व्याख्यानाची होती. माझ्या विविध लेखात मी आमचा युट्युब चॅनेल पहा म्हणून हीच लिंक दिली होती. आपण चुकलो होतो हा साक्षात्कार कित्येक दिवसांनी झाला. खरंतर जोरदार चपराकच बसली. लोकांच्या पर्यंत माहिती पोहोचवायची अशी नुसती तळमळ असून चालत नाही त्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा तेही नीट शिकून घ्यायला पाहिजे अशी मोठी अक्कलखाती जमा झाली.
२४ फेब्रुवारी २०१६ मध्ये युट्युब चॅनेल करण्यात आले. चानल तयार करण्यापासून त्यावर विविध व्हिडिओ लोड करण्यात, व्हिडिओ शुटिंग घेण्यात अनेकांनी वेळोवेळी विनामोबदला मदत केली हे सर्व जण नावासाठी काम करणारे नव्हते तर मंडळाच्या कामाबद्दलच्या आस्थेतून करत होते.पण तरीही त्यांच्या कामाची नोंद व्हायला हवी असे मला वाटते म्हणून या सर्वांची सविस्तर माहिती देत आहे.
चॅनेल सुरू होण्यापूर्वी वेबसाईटवर काही व्हिडिओच्या लिंक दिल्या होत्या.
आमच्या २००९ च्या जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात न्युरोलॉजिस्ट प्रदीप दिवटे यांचे पार्किन्सन्सच्या नॉन मोटर लक्षणांवर व्याख्यान झाले होते. यूट्यूबवर आरोग्य डॉट कॉम वर या व्याख्यानाचा व्हिडिओ होता त्याची लिंक दिली होती. ऋषिकेश पवार च्या Dance for Parkinsons या डॉक्युमेंटरीची लिंक दिली होती.
सुरुवातीला आम्ही मेळाव्यातील व्याख्यानांचे व्हिडीओ शुटींग घेत नव्हतो. डॉक्टर ह. वि. सरदेसाई यांचे २०१२च्या जागतिक पार्किन्सन्स दिन मेळाव्यात व्याख्यान झाले. त्याचा व्हिडिओ माझी मैत्रीण आरती खोपकरने घेतला होता. त्याची लिंक तिने दिली होती.
कॅनडास्थित मंदार जोग यांचे व्याख्यान पार्किन्सन्स मित्रमंडळ आणि दीनानाथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०१६ मध्ये झाले. त्या व्याख्यानाचे व्हिडिओ शूटिंग डॉक्टर विद्या काकडे यांनी केले होते. न्युरोलॉजिस्ट राहुल कुलकर्णी यांचे व्याख्यान अश्विनी हाल येथील मासिक सभेत झाले होते. त्याचाही व्हिडिओ डॉक्टर विद्या काकडे यांनी घेतला होता.
मंडळात त्यावेळी अजित कट्टी हे मदतीसाठी येत. त्यांच्या बऱ्याच ओळखी होत्या. त्यांचे मित्र दिलीप नारखेडे हे युट्यूबवर व्हिडिओ घालून देतील.संगणकासंबंधी कोणतीही मदत करतील असे ते म्हणाले.
त्या नुसार मी नारखेडेंना फोन केला.विना संकोच कोणतीही शंका विचारा असे त्यांनी सांगितले.
चिंचवडला राहणारे नारखेडे शिवाजीनगरला कामासाठी येत. कट्टी तेथे व्याख्यानाच्या सीडी नेऊन देत. नारखेडे यांनी युट्युब चॅनेल तयार करून त्यावर या सीडी टाकल्या. असे व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचतात हे लक्षात आल्यावर मात्र मंडळांनी प्रोफेशनल व्यक्ती बोलावून व्हिडिओ घेण्यास सुरुवात केली.
एका मासिक सभेत न्युरालाजिस्ट सुयोग दोषी यांचे व्याख्यान झाले होते त्याचे व्हिडिओ शूटिंग केले.
जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या सर्व मेळाव्यांमध्ये प्रोफेशनल व्यक्तीकडून व्हिडिओ शूटिंग करणे सुरू झाले. आता आम्हाला दिलीप नारखेडे हक्काची व्यक्ती मिळाली होती.
कट्टीनी त्यांच्याकडे सीडी घेऊन जायची आणि त्यांनी ते लोड करायचे असे सुरू झाले.
मध्यंतरी डॉक्टर अरुण दातार यांच्या एक्सरसाइज प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ शूटिंग दिपा होनपनी
केले आणि ते अमेरीकेत राहणारी मुलगी तन्वीच्या मदतीने यूट्यूब चानल वर टाकले.
दरम्यान दीलिप नारखेडे यांनी हॉटेल सुरू केले आणि त्यांचे शिवाजीनगरला येणे बंद झाले. व्हिडीओ लोड करण्यासाठी कोणीतरी दुसरी व्यक्ती शोधणे भाग होते.
एकदा माझी मुलगी देवयानी अमेरीकेहून आली होती.एक व्हिडिओ लोड करायचा होता.माझ्या पीसी वरून तो झाला नाही.पण ती म्हणाली पार्किन्सन्स मित्र मंडळाची थोडक्यात माहिती यावर टाकायला हवी.मी सांगितली त्यानुसार तिने ती टाकली.कव्हरफोटो तयार केला.एकुणात युट्युब चानल मी कधी हाताळले
नाही.समजूनही घेतले नाही.
दिसेल त्या व्यक्तीकडून व्हिडीओ लोड करून घेत गेले. एकदा तर माझा जावई डॉ. राजशेखर यालाही मी कामाला लावले.
२०१८,२०१९ च्या मेळाव्याचे आणि अनीता अवचट संघर्ष सन्मान पुरस्काराचे व्हिडिओ राहूल भटेवरा यांनी लोड करून दिले.
खरे तर हा पुरस्कार २०१४ मध्येच मिळाला होता आणि त्याचे व्हिडिओ, मुक्तांगण संस्थेने दिले होते पण ते युट्युब चॅनल झाल्यावर त्यावर घालावे हे लक्षातच आले नव्हते.
राहुल भटेवरा यांची ओळख योगायोगाने झाली 2018 च्या मेळाव्याचा व्हिडिओ घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो ज्यांनी हा व्हिडिओ तयार केला त्या साठेंना तुम्ही कराल का विचारले ते नाही करू शकणार म्हणाले.त्यांनी काही नावे सुचवली पण ते शक्य झाले नाही.
याच काळात आमच्या जवळच डॉक्टर आरती भटेवरा यांचे डेंटल क्लिनिक आहे तेथे तीर्थळी यांची ट्रीटमेंट चालू होती. त्यांना आणि त्यांचे पती राहुल यांना आमच्या पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या कामाबद्दल माहिती होती. एकदा त्या आपले पती राहुल भटेवरा यांना घेऊन आमच्या घरी आल्या होत्या.बोलता बोलता पार्किसन्स मित्रमंडळाबाबत चर्चा झाली.तुमचे वैयक्तिक किंवा पार्किन्सन मित्रमंडळाचे कोणतेही काम असल्यास मला सांगा असे ते म्हणाले. ताबडतोब मी व्हिडिओ लोड करण्याबद्दल विचारणा केली त्यांनी लगेच होकार दिला त्यांची सॉफ्टवेअर कंपनी असल्याने त्यांच्यासाठी हे क्षुल्लक काम होते दिलीप नारखेडे यांनी पासवर्ड आणि युजरनेम दिले होते ते मी त्यांना दिले नारखेडेंचा फोन दिला.आता आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळ परिवारात आणखी एक हितचिंतक आला.
lock down च्या काळात पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा झालाच नाही परंतु व्हिडीओ कॉन्फरन्स झाल्या. अतुल ठाकूर यांनी यात पुढाकार घेतला होता सर्व कॉन्फरन्सचे रेकॉर्डिंग केले. रेकॉर्डिंग युट्यूब वर घालायचे होते अतुल ठाकूरनाही नारखेडे यांचा फोन नंबर, पासवर्ड, युजरनेम सर्व दिले.
आत्तापर्यंत मदत करणारे तंत्रज्ञ होते त्यांना व्हिडिओ मध्ये काय आहे यूट्यूब चैनल मध्ये काय आहे यात काही फारसा रस नव्हता. अतुल मात्र एक समाजशास्त्रज्ञ आहेत.स्वमदत गट हा त्यांचा अभ्यासाचा विषय.
आमची वेबसाईट करतांना आमच्या सर्व कामात रस घेणारे असल्यामुळे त्यांच्याकडून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 48 व्हिडिओ असल्याचे समजले. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी यूट्यूब चॅनल वर असलेल्या व्हिडिओंची यादी पुढे देत आहे.एका व्याख्यात्याचे 2/3 भाग असल्याने ही संख्या जास्त वाटते
*न्युरालाजिस्ट*
- डॉक्टर मंदार जोग
- डॉक्टर राहूल कूलकर्णी
- डॉक्टर सुयोग दोषी
- डॉक्टर राजस देशपांडे
- डॉक्टर चारूलता सांखला
*मनोविकार तज्ज्ञ*
- डॉक्टर विद्याधर वाटवे
- डॉक्टर उल्हास लुकतुके
*इतर*
- डॉक्टर अरूण दातार यांच्या व्यायामाचे प्रात्यक्षिक
- अनीता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार
- डॉक्टर अमीत करकरे यांचे व्हिडिओ कान्फरन्समधील व्याख्यान
डॉक्टर रेखा देशमुख आणि डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्या व्हिडिओ कान्फरन्सचे आडिओ रेकार्डींगही येईल.
सर्वांनी या अमुल्य माहितीचा लाभ
घ्यावा.चॅनलला लाईक, सबस्क्राईब करावे.शेवटी शास्त्र असत ते.


पार्किन्सन्सविषयक गप्पा.- ५३

 

पार्किन्सन्सविषयक गप्पा.- ५३
Lock down जाहीर झाल्यावर मला सर्वात प्रथम आठवण आली ती रेखा आचार्य आणि कलबाग काका (नारायण कलबाग ) यांची. कारण हे दोघे एकटे राहतात कलबाग काका तर नव्वदी ओलांडलेले आहेत.
रेखाला फोन केला तर तिच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन मुली पेइंगेस्ट म्हणून राहतात त्या दोघीही आपल्या गावाला गेल्या आहेत.परंतु तिच्याकडे काम करणारी बाई आता 24 तास राहते त्यामुळे तिला काही प्रॉब्लेम नाही. ऋषिकेशचा ऑनलाइन डान्स क्लास आठवड्यातून तिनदा चालू असल्याने तिला छान वाटते. टॅबलेट तिला तो छान हाताळता येतो. याशिवाय शेखर बर्वे यांनी मध्यंतरी महाशब्दकोडे असलेले मासिक सर्वांना दिले होते ती कोडी सोडवण्यात तिला मजा येते असे ती सांगत होती एकूण ती आनंदात होती.
कलबागकाकांना सारखा फोन करत होते त्यांचा लैंडलाइन लागत नव्हता. ते हल्ली काही वेळा मुंबईला भाच्याकडे राहतात. तेथे असतील असे वाटले. मोबाईलही लागत नव्हता. थोडी काळजी वाटत होती आणि एक दिवशी त्यांचाच फोन आला मला हायसे वाटले. नेहमी सारखा स्पष्ट आवाज.त्यांच्या पत्नीच्या पार्किन्सन्स बद्दल,त्यांच्या भाचीने पाठवलेल्या सपोर्ट ग्रुपच्या पुस्तकाबद्दल अशा खुप गप्पा झाल्या.
मधल्या काळात त्यांना भोवळ आली होती त्यांचे भिंतीवर डोके आपटले ते खाली पडले. बराच वेळ पडून होते. काम करणारा माणूस आल्यावर भाची ला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे दोन-तीन दिवस राहावे लागले. भाची काही दिवस राहिली आणि ती आता परत कॅनडाला गेली आहे डॉक्टरने सांगितले आता एकटे राहायचे नाही त्यामुळे आता चोविस तास एक माणूस असतो. हे सर्व कथन ते कोणतेही भयंकरीकरण न करता सांगत होते. अगदी सर्दी खोकला झाला होता आणि डॉक्टर कडे गेलो होतो इतक्या सहजतेने सांगत होते.
पेपर येत नाही.टी.व्ही.बंद पडलाय परंतु कॅनडाहून भाची रोज दोन वेळा फोन करते आणि भारतातील सर्व बातम्या.सांगते त्यामुळे आजूबाजूला काय चालले आहे ते इत्थंभूत समजते. मुंबईचा भाचा काकांना विचारून आठवड्याचा मेनु ठरवतो. स्वीगीद्वारे सकाळचा ब्रेकफास्ट दुपारचे जेवण आणि संध्याकाळी काही स्नाक्स असे रोज घरपोच येते एकूण सर्व सुशेगात चालले आहे.
त्यांच्या फोनच्या डीपीवर वसू देसाई आणि सरोजिनी कुर्तकोटी त्यांच्याशी बोलत असताना फोटो आहे ते मला सांगत होते तुमच्या दोघांचा बाकावर बसलेला फोटो आहे तो माझ्यासमोर ठेवलेला आहे. मला नीट समजले नाही.यावर मी एकदम नीशब्द झाले.बहुता भाचीने काही फोटोची हार्ड कॉपी काढून दिली असावी का? त्यांच्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कुटुंबीय होतो म्हणून ते मुंबईवरूनही मोठ्या आवडीने मासिक सभेला येतात पार्किन्सन मित्रामुळे अनेकांशी असे ऋणानुबंध जोडले गेले आहेत एकमेकांबद्दल प्रेम, काळजी, कौतुक यातूनच तर येते.