मी शुभंकर
प्रदीपना पीडी झाला तेंव्हा त्याच काहीच वाटलं नाही, कारण त्याने रोजच्या जीवनात
काहीही फरक पडला नाही. ते आपली सगळी कामं स्वत:ची स्वत:च करायचे .गाडी पण चालवायचे. फक्त
स्कूटर चालवू शकत नव्हते. पण त्याने काही बिघडत नव्हतं. त्यांच्या वडिलांना
पार्किन्सन होता.ते ४ वर्षे बिछान्याला खिळून होते. तशी वेळ प्रदीपवर
येईल असं कधीच वाटलं नाही ,आताही वाटत नाही.
पण मधल्या काळात, म्हणजे २०१७ मध्ये
घरात काही समस्या सुरू झाल्या. आणि या कौटुंबिक समस्येचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला.पीडीचं उग्र रूप दिसायला लागलं. चालताना
तोल जायला लागला , रात्री बिछाना ओला व्हायला लागला, जेवताना अंगावर
सांडायला लागलं. न्यूरॉलॉजिस्टने डोस वाढवून दिला ,यूरोलॉजिस्टने गोळ्या
दिल्या. २४ तास ब्यूरोचा माणूस ठेवला, थोडा रिलीफ मिळाला.
मग मुलाने बावधनला घर घेतलं म्हणून बघायला गेलो.तिथे ब्यूरोचा माणूस नव्हता. ४ दिवसांसाठी गेलो होतो. कामाला बाई नव्हती. त्यातच पुन्हा रात्री कपडे,
बिछाना ओला झाला. उठून सगळं बदलून होईपर्यंत सकाळ झाली.मी रात्रभर जागीच होते. चहा, नाष्टा, अंघोळ
उरकून कपडे धुवायला गेले तर वॉशिंग मशीन बंद पडलं होतं. कपडे धुवून, स्वैपाक
करून कसंबसं आटपलं आणि जरा पडले तर प्रदीप उठवायला आले.मी खूप थकून गेले होते. रात्रभर झोप झाली नव्हती.खूप चिडचिड झाली,
काय करावं समजेना. रात्री मुलाशी बोलले, त्याला माझी अगतिकता आणि बाबांची असुरक्षितता दोन्ही जाणवले असावे.तो म्हणाला, "बाबांना इनसेक्युअर वाटत
असणार, म्हणून तुझी पाठ सोडत नाहीत. तू जरा सहन कर". मग पार्किन्सनन्स मित्रमंडळाच्या Whats app ग्रुपवर मी माझे मन मोकळे केले. शोभनाताई, रेखाताई, रमेशजी असे बऱ्याच जणांचे फोन आले,
त्यामुळे धीर आला.
रेखाताईनी मलाच डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला हवी असं सांगितलं.पण मला स्वतःसाठी वेळच नव्हता.
परत बेळगावला आलो.इथे कामाला माणसे मिळाली, थोडी स्थिरावले.
दरम्यान मित्रमंडळाच्या मीटिंगला गेलो होतो. तिथे उषा कुलकर्णी भेटली.तिच्याही यजमानांना पीडी होता.बेळगावला आमची घरे जवळ होती. मग ओळख वाढली. खूप दिवसांची मैत्री असावी असे बंध जुळले.
थोड्या दिवसांनी धाकट्या मुलाने गुडगावला येण्यासाठी विमानाचं तिकीट
पाठवलं. बरोबर आमचे व्याही पण येणार होते. पुण्याला आलो, जागा वेगळी, रात्री
बाथरूमला जाताना पडायला नको म्हणून डायपर लावला. त्याचा त्यांना राग आला. तोपर्यंत डायपर वापरावा
लागत नव्हता ,रात्री उठून बाथरूमला जायचे.रात्री
डायपर काढून टाकला आणि बाथरूमला गेले. तिथे पाय घसरून पडले. हाताला लागलं, पण लगेच
दिल्लीला जायचं म्हणून डॉ. कडे गेले नाही. तिथे गेल्यावर डॉ. ना दाखवलं.
त्यांनी फ्रॅक्चर नाही पण हात हलवायचा नाही, असे सांगून बांधून ठेवला. ड्रेसिंग
करून गोळ्या दिल्या. ४ दिवसांनी सूज गेली पण १५ दिवस अंघोळ,संडास , भरवणं, कपडे बदलणं सगळं मलाच करावं लागलं .
बेळगावला आलो, परत हात
सुजला. इथल्या डॉ. नी फ्रॅक्चर आहे असे सांगितले. पण जखम भरली नाही म्हणून दर २ दिवसांनी प्लास्टर काढून ड्रेसिंग करायचं, परत प्लास्टर घालायचं शिकवलं.
रात्री प्रदीप प्लास्टर काढून टाकायचे. त्यात न्यूरॉलॉजिस्टने डोस आणखी
वाढवला. मग चक्कर
यायला लागली ,शिवाय प्रदीपना
डिप्रेशनही आलं. आता आपण जगत नाही असं प्रदीपच्या मनाने घेतलं. खाणे, पिणे,
फिरणे सगळे कमी झाले. १चपाती, १ चमचा भाजी किंवा आमटी, ३ चमचे दही एवढंच
जेवण. बनियन फाटला तरी नवा नको, हाच राहूदे, चप्पल नवी नको ,मी कुठे
जाणार असं करायला लागले.मलाही त्यांचा भरवसा वाटेना.
त्यांचा ७५ वा
वाढदिवस आला. निदान सगळे भेटू देत म्हणून माझ्या आणि त्यांच्या भावंडांना
कुणी कसलंही गिफ्ट आणायचं नाही या अटीवर रहायला बोलावलं. २ दिवस घरात ३५
माणसे होती खूप बडबडलो, एकत्र जेवलो, रात्री अंताक्षरी खेळलो.दुसऱ्या दिवशी
वाढदिवस. सगळे देवळात जाऊन आलो. संध्याकाळी मुलांनी हॉल घेऊन छोटासा समारंभ
केला. मेजवानी दिली. आम्ही लवकर घरी आलो पण दुसऱ्या दिवशी सगळे जाताना
प्रदीप त्यांना पोचवायला गेटपर्यंत जायला लागले ,हसून आभार मानायला लागले
आणि पहिल्यांदाच प्रसन्न दिसले.
दरम्यान होमिओपॅथीची Gelhemium,Brain Tonic R
57, Calcarea Fiu , Silicea, Kali Phos सुरू केलं. त्याबरोबरच फ्लॉवर रेमेडीची Gorse , Oak, Agree many Larch द्यायला लागले.त्याचा परिणाम दिसायला लागला.
मी पण फ्लॉवर रेमेडीमधील Elm , Hornbeam, Olive आणि Impatient घ्यायला लागले माझी चिडचिड कमी झाली.माणसं नसली तरी कामाचा त्रास वाटेना. म्हणूच तर त्यांच्या पंचाहत्तरीचा बेत आखू शकले आणि निभावू शकले.
आता त्यांचा तोल जाणं कमी झालं, चालणं सुधारलं, मुख्य म्हणजे निराशा कमी झाली ',आपला काही उपयोग नाही' हे विचार गेले आणि जेवण पण सुधारले.आता ते ३ चपात्या, १ डाव भाजी, १ डाव आमटी, अर्धी वाटी दही आणि अर्धा कप सूप घेतात. नॉनव्हेज असलं तर मागुन घेतात.आता त्यांना फारशी मदत लागत नाही.
आता मी पंचामृत , च्यवनप्राश ,सकाळी १ केळे द्यायला लागले, दुधातून
शंखपुष्पी, अश्वगंधा, हळद द्यायला लागले आणि खूपच सुधारणा दिसायला लागली.
मदतीला माणसे मिळाली म्हणून मी अहमदाबादला Statue of Unity बघायला जायचं ठरवलं.कोणाची कंपनी मिळेना ,तेंव्हा प्रदीप येतो म्हणाले. केसरीच्या ऑफिसमध्ये विचारलं तर सगळी मदत करू म्हणाले, मग आम्ही गेलो.५ दिवसांची टूर होती , सह्प्रवाश्यांनी पण खूप मदत केली आणि प्रदीपनी टूर
एन्जॉय केली. फक्त फार चालणे होते, तेथे व्हील चेअर घेतली. मग स्वतःच मित्रमंडळाच्या सहलीला जाऊया म्हणाले, म्हणून
बेळगावहून खास सहलीसाठी पुण्याला आलो. तिथंही त्यांनी ओरिगामीत भाग
घेतला.बक्षीसही मिळवले. खेळात प्रत्यक्ष भाग घेतला नाही पण एन्जॉय केलं. त्याच सगळं क्रेडिट सहल अरेंज करणाऱ्यांना.
आता त्यांची दिनचर्या अशी :
सकाळी १ टेबल स्पून खोबरेल तेल, मग चहा बरोबर १ बिस्कीट आणि न्यूरॉलॉजिस्टची औषधे, ८ ला होमिओपॅथीचा १ डोस
८.३० ला नाष्टा, १ ग्लास दूध अश्वगंधा, हळद, शंखपुष्पी घालून.
११ ला १ चमचा च्यवनप्राश, १ केळं, १ डाव पंचामृत.
१२.३० ला होमिओपॅथीचा २ रा डोस,
१ ला जेवण,
3 ला चहा,
५ ला होमिओपॅथीचा 3 रा डोस
६ ला बदाम, अक्रोड, डिंक घालून
लाडू,
८ ला जेवण.
सकाळच्या चहा नंतर ८.३० पर्यंत फिजिओथेरपीचे व्यायाम, प्राणायाम, उन्हात फिरणे,
१०.३० ला सायकलिंग
५ ते ६ - २ किलोमीटर फिरणे
लघवीवरच्या प्रॉब्लेमवर आधी यूरॉलॉजिस्टच्या गोळ्या देत होते, त्या बंद करून A पिल्स सुरू केल्या. आता Natrum Mur आणि Causticum देते.
अंगाला खाज यायला लागली होती, स्किनस्पेशालिस्टने गोळ्या, मलम दिले होते ते पण आता बंद झाले.. खाज आली तर आता Rhustox देते.
वर
सांगितलेली औषधे मी त्यांचा स्वभाव, आवडी बघून दिली आहेत,ती सर्वांना लागू
पडणार नाहीत.हे वाचून कोणी प्रयोग करू नये. मी पुण्याला १ वर्षाचा
होमिओपॅथीचा कोर्स केला आहे.लहान असताना मुलांनाही औषधे द्यायची.त्यामुळे याचा मला अनुभव आहे.होमिओपॅथी आणि आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही.
आणि एक गोष्ट म्हणजे प्रदीपना ऑन ऑफ पिरियड नाही, गोळ्या घायला विसरले तरी काही फरक पडत नाही.
आणि आता तर मला असं वाटतं की ते यातून पूर्ण बरे झाले नाही तरी आपलं जीवन स्वावलंबी जगू शकतील.मी केअरटेकरच्या भरवशावर आता एखादा दिवस गावालाही जाऊ शकते.माझ्यासाठी वेळ देऊ शकते.
.'जगणे नको पासून जगण्यातला आनंद घेण्याच्या' प्रदीप यांच्या अवस्थेसाठी औषधोपचाराबरोबर,आहार,व्यायाम,समजून केलेले पूरक उपचार,दिनचर्येतील नियमितता,प्रवासासारखे छंद जोपासणे,स्वमदत गटात सामील होणे या सर्वांचा सहभाग आहे.या लेखाचे नाव 'मी शुभंकर' हेही प्रदीपने सुचविले.
माझ्या अनुभवातून' 'धीर सोडू नका' असे मी आवर्जून सांगते. शुभंकरानी स्वत:
खचून न जाता,शुभार्थीची मानसिकता लक्षात घेऊन हळुवारपणे शुभार्थीला
हाताळायला हवे.
शुभंकर अशा नाडकर्णी