पार्किन्सन्सविषयक गप्पा - ६३
पार्किन्सन्सवर नियंत्रण आणणारा एक रामबाण उपाय मला माहित आहे.हा प्रयोगाने कोठेही सिद्ध झालेला नाही.तरीही यावर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही.आमच्या अनेक शुभार्थींच्यावर याचा झालेला उपयोग मी पाहिलेला आहे.उत्सुकता वाढली ना? सांगते सांगते.मंडळी नातवंडाचे आगमन हा तो उपाय.ज्यांच्याकडे नातवंड आली त्यांना नक्की पटले असेल.तसे प्रत्येकालाच ही दुधावरची साय निर्भेळ आनंद देते.पण पार्किन्सन्स शुभार्थींच्याबाबत ही साय त्यांचा आजार विसरायला लावते हे महत्वाचे.
आमचे मंडळाचे संस्थापक मधुसूदन शेंडे यांच्या उत्साहाला अमेरिकेहून मुले नातवंडे आली की उधाण येत असे.दुसरे संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन यांच्या घरी त्यांच्या मुलाला मुलगा झाला म्हणून आम्ही सर्व पहायला गेलो होतो.नेहमी थकलेल्या पटवर्धन वहिनी उत्साहित दिसत आहेत हे सर्वाना जाणवले.त्यांनीही हसत हसत याला दुजोरा दिला.आमच्याकडेही नातवंडे आली की ह्यांचा एखादा डोस विसरला जातो पण त्याने काही फरक पडत नाही.
हे सर्व आत्ताच आठवायचे कारण म्हणजे मृदुला कर्णीला ५/६ महिन्यापूर्वी नातू झाला.सध्या लॉकडाऊनमुळे घरून काम करायचे आहे त्यामुळे मुलगा, सून पुण्यात आहेत.मृदुलाकडे फोन केला की नातवाबद्दल किती सांगू आणि किती नको असे तिला होते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे शुभार्थी कर्णी यांच्या वागण्यात नातवंड आल्यापासून खूपच बदल झाला.ते आनंदी असतात. त्यांची एक गोळी कमी झाली.पार्किन्सन्स मित्रमंडळाचा सोमवारी 'भेटू आनंदे' हा ऑनलाईन कार्यक्रम असतो.२८ तारखेच्या सोमवारी शुभंकरांच्या अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम होता.त्यावेळी मृदुला आणि त्यांच्याकडे अनेक वर्षे असलेला केअरटेकर रवी यांनी कर्णी यांच्यात झालेल्या बदलाची माहिती सांगितली.कर्णी यांचे मूड स्विंग असायचे ते कमी झाले.नातू रडला की ते सर्वांना रागवतात.नातवाची छोटी छोटी कामे आवडीने करतात.स्वत:च्याच कोशात असणारे कर्णी आता कुटुंब प्रमुखाच्या अविर्भावात वावरत असतात.मृदुलाचा गोड नातू आयुष त्याच्याही नकळत आजोबांचा शुभंकर झाला आहे.या छोट्या शुभंकराचे स्क्रीनवर दर्शनही झाले.सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच ते सुखावह वाटले.
No comments:
Post a Comment