Wednesday, 28 October 2020

पार्किन्सन्सविषयक गप्पा ६२

                                      





    पार्किन्सन्सविषयक गप्पा  ६२

                      आमचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांना आमच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आपले विचार मांडावे असे सांगण्यासाठी मी फोन केला.विषय कोणता या बाबत विचारले तर म्हणाले, सध्या माझा करोनावर अभ्यास चालू आहे.त्यांचा करोना या आजाराचे स्वरूप,करोनाच्या चाचण्या,करोनामुळे होत असलेले सामाजिक मानसिक परिणाम असा  करोना वर विविधांगी अभ्यास आकडेवारीसह झाला होता.एकीकडे या विषयाकडे तटस्थपणे पाहात असताना करोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या दोन घटना वाचून ते व्यथित  झाले होते आणि यासाठी जेष्ठांसाठी स्वमदत गट तयार करावा का असा विचार त्यांच्या मनात घोळत होता.२००० मध्ये त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मुहूर्तमेढ रोवली तेंव्हाचाच उत्साह आज ८५ व्या वर्षी तब्येतीच्या थोड्या तक्रारी असूनही पाहून मी अवाकच झाले.

याच्या उलट मी करोनाविषयी अजिबात वाचायची नाही.बातम्या पहायच्या नाही. प्राथमिक माहिती आहे तेवढी बस झाली असा विचार करणारी.अनेक मानसोपचार तज्ञही सारख्या अशा  बातम्या पाहू नका, ऐकू नका असे सांगत असलेले दिसले.मध्यंतरी एक शुभार्थी करोनामुळे गेल्याने whats app group वरच्या अनेकांच्या मनात भीती निर्माण झालेली मी पाहिली.त्यामुळे यावर काही लिहायचे नाही असे मी ठरवले होते.पटवर्धन यांच्या करोनाकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे  मला या विषयावर गप्पा माराव्या असे वाटले.या वातावरणात निराश झाला असाल घाबरला असाल तर ग्रुपमधल्या कोणाशी तरी बोलून मन मोकळे करा आमच्या whats app group वर सामील व्हा,व्हिडिओ कॉन्फरन्स जॉईन करा,ऑनलाईन डान्सक्लास जॉईन करा हेही आवर्जून सांगावेसे वाटले.या गप्पातून थोडी माझ्यापर्यंत पोचलेली सकारात्मकता तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न.

 करोना हा रक्तदाब,मधुमेह,कर्करोग हे आजार असणाऱ्यांना धोकादायक आहे असे सांगितले जाते.अर्थात हे आजार असणारेही करोना झाल्यावर सही सलामत बाहेर पडल्याची उदाहरणे आहेतच.इंडिअन मेडिकल असोशिएशनचे डॉ.अविनाश भोंडवे आणि न्यूरॉलॉजिस्ट डॉ.श्रीपाद पुजारी यांनी आपल्या व्याख्यानात पार्किन्सन्स हा आजार या यादीत नसल्याचे सांगितले.त्यामुळे हायसे वाटले.तरीही पार्किन्सन्स झालेले बरेच जण जेष्ठनागरिक असतात त्यामुळे त्यादृष्टीने मात्र काळजी घेतली पाहिजे असेही सांगितले होते.येथे करोनाविषयी मी जास्त लिहिणार नाही. परंतु करोनाची भीती थोडी कमी करणारे काही अनुभव लिहिणार आहे.

लॉकडाऊन मध्ये घरात राहावे लागते याबद्दल आमच्या शुभंकर, शुभार्थीना समस्या वाटत नव्हती पण बऱ्याच जणांना इतर काही आजारामुळे किंवा पार्किन्सन्स वाढल्यामुळे हॉस्पिटल मध्ये जावे लागले तर आपल्याला करोनाची लागण होईल अशी भीती वाटते.पण अनेकांना पर्याय नसल्याने हॉस्पिटल गाठावे लागले.सुरुवातीला पार्किन्सन्स वाढल्याने एका शुभार्थीना हॉस्पिटलाईज करायची गरज वाटली त्यावेळी कोविद्ची तपासणी झाल्याशिवाय कोणतेही हॉस्पिटल admit करायला तयार नव्हते कोविद्च्या टेस्ट आता घरीही येऊन घेतल्या जातात तशा तेंव्हा नव्हत्या. ससून मध्ये न्यायची वेळ आली.तेथे टेस्ट निगेटिव्ह निघाली.नंतर शस्त्रक्रिया झाली.त्यानंतर दोन महिने नर्सिंग होम मध्ये राहावे लागले परंतु करोना मात्र निगेटिव्ह राहिला. आमच्या मंडळाच्या कार्यवाह आशा रेवणकर यांचे पती रमेश रेवणकर याना त्यांचे दोन्ही हात खूप भाजल्याने आठवड्यातून तीनदा अनेक दिवस सर्जनना दाखवायला  जावे लागत होते.शिवाय घरीही ड्रेसिंगसाठी तास सव्वा तास लागायचा ही सर्व काळजी आशाने उत्तमप्रकारे घेतली..( हे भाजले कसे याची मोठ्ठी कथा आहे ती पुन्हा सांगेनच).अर्थोपेडीककडेची वारीही झाली. त्यातच त्यांची शेजारीणच कोविद पॉझिटिव्ह निघाली.परंतु या सगळ्यातून करोना यांच्यापर्यंत पोचू शकला नाही.आता ते पुर्ववत होऊन दिवाळीचा आकाशकंदील करायच्या तयारीला लागले आहेत.

शुभार्थी वनिता कुलकर्णी घरातच पडल्या.खांद्याचे हाड मोडले.शस्त्रक्रिया करावी लागणार होती.सर्व तपासण्या नॉर्मल होत्या पण कोविद टेस्ट पॉझिटिव्ह निघाली.ती निगेटिव्ह आल्याशिवाय शस्त्रक्रिया शक्य नव्हती.त्याना लक्षणे कोणतीच नव्हती.मुलगा आणि सून यांनी त्याना घरातच क्वारेनटाइन करून उत्तम काळजी घेतली.शस्त्रक्रिया होईपर्यंत प्रचंड वेदना सहन करणे हे मात्र वनिताताईनाच करावे लागले हेवी पेन किलर त्याना दिल्या होत्या.पण त्यांनी धीर सोडला नाही.शस्त्रक्रिया क्रिटीकल होती हाडांचे तुकडे झाले होते.ती यशस्वी होऊन त्या घरीही आल्या.मी त्यांच्याशी बोलल्यावर त्या या सर्व काळात मनाने कोलमडल्या नव्हत्या हे लक्षात आले.त्यांची सूनही म्हणाली त्या अगदी पॉझिटिव्ह होत्या.

मनाने न खचता  कोविद्शी लढा देऊन पूर्ववत झालेल्या माझ्या नवऱ्याची गोपाळ तीर्थळी यांची कथा थोडी विस्ताराने सांगायची आहे कारण घरचाच अनुभव आहे.ती पुढच्या गप्पात.या सर्वात योग्य डॉक्टर केअरटेकर,कुटुंबीय हितचिंतक यांचाही मोठ्ठा रोल असतो हे नक्की.येणाऱ्या परिस्थितीला धीराने तोंड देणे ही महत्वाचे.बऱ्याचशा समस्या घाबरून गेल्यानेच वाढतात.

 


No comments:

Post a Comment