Thursday, 12 April 2018

आठवणीतील शुभार्थी - डॉक्टर मोहन कुलकर्णी

                                       ११ एप्रिल जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणून लक्षात राहतो तसाच शुभार्थी मोहन कुलकर्णी यांचा स्मृतिदिन म्हणूनही लक्षात राहतो.मितभाषी,अत्यंत बुद्धिमान,दिलदार,रसिक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.आम्ही घर भेटीला त्यांच्याच्याकडे गेलो होतो.पार्किन्सन्स हा माझ्या अनेक आजारापैकी एक आजार आहे असे ते म्हणाले होते.त्यांना ऐकू येत नसल्याने कदाचित ते जास्त बोलत नसावे. पण माझ्या नवऱ्याचे आणि त्यांचे कार्यक्षेत्र एक निघाले आणि त्यांच्या  गप्पा रंगल्या.ते केएसबीत एच आर हेड होते.पुन इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी सिव्हाल इंजिनिअरिंग केले होते पण त्यांनी आपली पीएचडी केली ती एच आर.मध्ये. मोहन कुलकर्णींची निट ओळख आनंदवनच्या सहलीत झाली.त्यांची एकूण तब्येत पाहता त्यांना प्रवासाला नेण हे धाडसच होते.पण ते उषा ताईनी केले.न बोलणारे कुलकर्णी सहलीत हळूहळू मोकळे होत होते.ते धारवाडचे.मातृभाषा कानडी पण मराठीशीही जवळीक होती.नागपूरहून परतताना गरीब रथ मध्ये आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत होतो.अनेक जुनी मराठी गाणी ते सुचवत होते.धारवाड आकाशवाणी केंद्रात लहान असताना लहान मुलांच्या कार्यक्रमात त्यांनी अनेकवेळा भाग घेतला होता.हे आम्हाला नव्यानेच समजले.
                                आनंदवनच्या प्रवासाने,वातावरणाने त्यांचा आत्मविश्वास वाढला होता.कोणीतरी प्रसिद्ध कन्नड कवी ( मी नाव विसरले)म्हणाले होते'.जन्माला आल्यावर एकदा तरी हंपी पहिले पाहिजे नाहीतर जगणे फुकटच गेले.' असे ते सांगत होते.हंपी पाहण्याची त्यांची इच्छा आणि आत्मविश्वास आता बळावला होता.आनंदवनहून आल्यावर थोडे दिवसातच ते आणि उषाताई स्पेशल गाडी करून हंपी, बदामी करून आले.त्या ट्रीपची सीडी पाहण्यासाठी आम्हाला ते सारखे बोलावत होते.आम्ही गेल्यावर सीडी दाखवताना ते खूपच खुष होते.केशवराव आणि अंजली महाजन यांच्याशी सहलीत त्यांची दोस्ती झाली होती.एकदा मग दुपारी ते अंजलीच्या घरी येणार होते तेथून बागुल उद्यानाचा लेझर शो पहायचा असे ठरले मग आनंद्वानला गेलेली बरीच मंडळी पुन्हा एकत्र आली एक छोटीशी ट्रीप झाली.
                             मासिक सभाना ते आवर्जून येऊ लागले.पूर्वी वक्त्याचे भाषण ऐकू येत नसल्याने ते सभेस येण्यास नाराज असत. आता मैत्रीची माणसे भेटतात हा आनंद होता.यानंतर आमच्या घरी जमायचे ठरले होते. पण ते बऱ्याच दिवसासाठी बेळगावला गेले.ते आले तर आम्ही मुलीकडे गेलो असे करत काहीना काही कारणाने आमच्याकडे येणे राहूनच गेले.याची आम्हाल अजून खंत आहे.
                             त्यांचे विविध आजार आता डोके वर काढत होते.हार्नियाची शस्त्रक्रीया झाली. बायपास सर्जरी झाली.एक पाय प्रयाग हॉस्पिटल मध्ये आणि एक घरात असे आता चालू झाले.हॉस्पिटलचे कर्मचारी घरच्यासारखे झाले होते. उषाताईनी एकटीने सर्व निभावले.
                            मोहनरावांचा दातृत्वाचा वारसा उषाताई पुढे चालवत आहेत.नाव कळू द्यायचे नाही या अटीवर त्यांनी मंडळाला अनेकवेळा मोठ्या देणग्या दिल्या.आनंदवन,मुक्तांगण या सर्वाना ही देणग्या दिल्या त्याचा गाजावाजा केला नाही.इतरांना त्यांचे अबोल दातृत्व कळावे म्हणून मी त्यांची अट मोडून हे सांगत आहे.उषाताई अजूनही सभांना ,सहलीला येतात. पार्किन्सन्स मित्रमंडळ आता एक कुटुंब झाले आहे.त्यामुळे शुभार्थी नसले तरी शुभंकरांची गुंतवणूक,प्रेम आणि मदत करण्याची इच्छा कायम आहे.

No comments:

Post a Comment