Friday, 13 January 2017

जानेवारी २०१७ पासून सभा वृत्त

                                           निवेदन
                           गुरुवार दिनांक १२ जानेवारी १७ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
नवीन वर्षाची सुरुवात तिळगुळ समारंभाने होणार आहे.सर्वांना सहभागी होता येईल असे खेळ असणार आहेत.संचारचा अंकही देण्यात येईल
 स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४ वाजता
                                                 १२ जानेवारी २०१७ सभावृत्त                  
                           गुरुवार दिनांक १२ जानेवारी २०१७ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.नवीन वर्षाची सुरुवात खेळ आणि तिळगुळ समारंभाने करायची ठरले होते.४५ सभासद हजर होते.संक्रांतीनिमित्त काळे कपडे घालायचे ठरले होते.अनेकजण काळे कपडे घालून आले होते.फक्त खेळ असल्याने लोक येतील का अशी शंका मनात होती.पण ती खोटी ठरली.डीबीएस सर्जरीनंतर पद्माकर आठल्ये प्रथमच येत होते.येण्यासाठी त्यांनी हट्ट धरल्याने  त्यांची मुलगी त्यांना घेऊन आली होती.मीरा देशपांडेना हिप सर्जरीमुळे चालता येत नाही.पण त्या व्हीलचेअरवर आल्या होत्या.शीलlताई कुलकर्णी मुलीचा काळा ड्रेस घालून उत्साहाने आल्या होत्या.तुमची सूचना  मानली असे हसत हसत सांगत होत्या.एकूणच वातावरणात चैतन्य होते.दीपा,अरुंधती,सविता हे आमचे खंदे  कार्यकर्ते काही कारणाने येऊ शकले नव्हते.त्यांना आम्ही मिस करत होतो.  
सुरुवातीला कमिन्स कॉलेजच्या देवयानी आणि गौरी कुलकर्णी,मृगाली भट,शर्वरी इनामदार या इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनिनी आपल्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली. त्यांनी कंप मोजणारे App तयार केले आहे.याद्वारे कंप पार्किन्सन्सचेच आहेत का  हे समजू शकणार आहे.पीडी असणाऱ्यांचाही कंप केंव्हा कमी होतो, केंव्हा जास्त होतो हे मोजता येणार आहे.याची किंमत ५०० रुपये पर्यंत असेल आणि शुभार्थीना कोणताही त्रास न होता कंप मोजता येणार आहे.हे App करताना डॉक्टर मंदार जोग यांनी अशी  App केले ली आहेत त्यामुळे त्यांचाही सल्ला  घेतला. शुभार्थींच्या घरी जाऊन त्यांच्या ऑफ पिरिएडमध्ये त्या  हे काम करणार आहेत.

                        यानंतर जानेवारी महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत त्या शुभंकर, शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले.'हाउसी' हा सर्वजण सहभागी होतील असा खेळ यानंतर खेळण्यात आला.आशा रेवणकर यांनी सुरुवातीला खेळाचे नियम सांगितले.सर्वाना यासाठीचे अंक असलेले कागद वाटण्यात आले. प्रथम पाच,चार कोपरे,पहिली ओळ,दुसरी ओळ, तिसरी ओळ,सर्व पूर्ण अशी बक्षिसे होती.आशा रेवणकर खुसखुशीत शैलीत उत्कंठा वाढवत अंक जाहीर करत होत्या.हेमा शिरोडकर यांचे  प्रथम पाच पूर्ण झाल्याने  बक्षीसाचा श्रीगणेशा केला. यानंतर नंदा चित्तरवार,जोत्स्ना आणि आर.एस.सुभेदार,श्री शिरोडकर,अनिल कुलकर्णी,शरच्चंद्र पटवर्धन,पदमाकर आठल्ये,अंजली महाजन,श्यामला शेंडे  हे बक्षिसाचे मानकरी ठरले.प्रत्येकाचे अंक तपासले जात होते.अंक लक्षपूर्व ऐकणे, अंकावर खूण करणे यासाठी लागणाऱ्या एकाग्रतेमुळे शुभार्थी थोडावेळ का असेना पीडिला विसरले होते.
                      ' हाऊसी' खेळाचा पट अजित कट्टी यांनी भेट दिला.अंकावर खुणा करण्यासाठी पेन आणि बक्षिसे हे सविता ढमढेरे यांनी प्रायोजित केले होते.यानंतर सर्वाना तिळगुळ देण्यात आला.मंडळासाठी अरुंधती जोशी यांनी तिळगुळ प्रायोजित केला.याशिवाय शीला कुलकर्णी,हेमा शिरोडकर,मीरा देशपांडे यांनीही तिळगुळ आणला होता. मोरेश्वर काशीकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पेढे दिले.
                       जानेवारी महिन्याचा संचारचा अंक सर्वाना देण्यात आला.नवीन वर्षाची सुरुवात सर्वांच्या सहकार्याने रंगतदार झाली.
                                                निवेदन
                         शुक्रवार  दिनांक १० फेब्रुवारीला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.मंगला जोगळेकर या' विस्मरणाचे प्रश्न आणि उपाय' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४ वाजता
स्मरणिका २०१७ साठी ज्यांना आपले अनुभव  द्यायचे आहेत त्यांनी आपले लेखन सभेस येताना घेऊन यावे.
जे सभेस येऊ शकणार नाहीत त्यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत आपले लेखन श्री रामचंद्र करमरकर यांच्याकडे पोस्टाने पाठवावे.याबाबत काही शंका असतील तर
रामचंद्र करमरकर- ९४२३३३८१६४ किंवा
शोभना तीर्थळी - ९६७३११४८४३ यांच्याशी संपर्क साधावा.
        १० फेब्रुवारी २०१७ सभावृत्त
शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा  हॉटेल अश्विनी येथे पार पडली.
सभेस ६०/ ७०  सभासद उपस्थित होते.मंगला जोगळेकर यांचे 'विस्मरणाचे प्रश्न व उपचार' या विषयावर व्याख्यान झाले.मंगला जोगळेकर या २०१० पासून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे.मेमरी क्लिनिक चालवतात.डिमेन्शिया पेशंट आणि त्यांच्या केअरटेकर साठीही त्या काम करतात.
वसू देसाई यांनी सुरुवातीला वक्त्यांची ओळख करून दिली.त्यानंतर शुभंकर शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
शुभंकर अंजली महाजन हिला दौंड येथील 'रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट'तर्फे 'रक्तदाता' पुरस्कार प्राप्त झाला.त्याप्रीत्यर्थ तिचा सत्कार करण्यात आला.अंजलीने २१ वेळा रक्तदान केले आहे. तिचा रक्त गट ओ आरएच निगेटिव्ह आहे.हा रक्तगट रेअर असल्याने अत्यवस्थ परिस्थितीतल्या अनेकांचे जीव तिच्या रक्तदानामुळे वाचले आहेत.अंजलीनेआपले मनोगत व्यक्त केले. या रक्त गटाचे रक्त साठउन ठेवता येत नसल्याने.अत्यवस्थ रुग्णासाठी फोन आला की तातडीने जावे लागते.असे सांगितले.
मंगला जोगळेकर यांनी श्रोत्यांना  प्रथम स्मरणशक्तीच्या कोणत्या समस्या आहेत हे विचारले आणि छोटे छोटे खेळ,कोडी,रोजच्या जगण्यातील प्रश्न सांगत विषय सोपा केला.सर्वाना बोलते केले.अशाच तऱ्हेने घरच्या घरीही खेळ कोडी तयार करून मेंदूला खतपाणी घालता येऊ शकेल असा विश्वास त्यांनी निर्माण केला.काही सूचना दिल्या.
लक्षात राहण्यासाठी करत असलेल्या कामाकडे पूर्ण लक्ष हवे.आजूबाजूला आवाज नको.
गटात बोलताना अनेक व्यक्ती बोलत असतात. तेंव्हा गटात महत्वाचे  बोलणे नको.
निर्णय घेण्यास अडचण वाटत असेल तर जवळच्या माणसाची मदत घ्यावी,स्वत:स थोडा वेळ द्यावा.
विस्मृतीच्या लक्षणांची सुरुवात झाल्यावर दोन तीन वर्षे उशिरा लक्षात येतात.त्यामुळे लक्षणे दिसतात का यावर लक्ष ठेवावे.
चेहरे,माणसे लक्षात राहण्यासाठी त्या व्यक्ती आणि त्यांची काही वैशिष्टे यांची मनाशी सांगड घालावी.
मंगलाताईनी १०६ वर्षाच्या बाईचे उदाहरण दिले.त्यांच्या मुलाखतीत त्यांनी या वयात स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आपल्याला शिस्त उपयोगी पडल्याचे सांगितले.शिस्त कोणत्याही वयात लावता येते.आणि १५ दिवसात ती लागू शकते.असेही त्या म्हणाल्या.
याशिवाय त्यांनी काही टिप्सही दिल्या.
१)एकावेळी दोन,तीन कामे करू नका.
२)अडथळे कमी करा.
३)थांबा आणि विचार करा.
५)समजले नाही तर पुन्हा विचारा.
६)एका वेळी अनेकांशी बोलू नका.
७)नजरेला नजर देऊन बोला.
८)कामाचे छोटे तुकडे करा.
९)ऑन पिरिएड असताना कामे करा.
१०) वेळेचे बंधन व  इतर बंधने घालू नका.
११)मन शांत ठेवा.यासाठी  झोप चांगली लागणे आवश्यक.
१२)नोटस्,डायरी,फळा,अलार्म,कॅलेंडर या सर्वांचा वापर करा.
१३)नकारार्थी बोलू नका,स्वत:ला संधी द्या.होत आहे ते मान्य करा,धीर धरा.
१४) मेंदूच्या क्षमता कमी झालेल्या असतात.त्यामुळे अनेकाग्रता.असणार नाही हे लक्षत घ्या.
१५) झोप शांत लागण्यासाठी मन शांत राहण्यासाठी ध्यान,व्यायाम,पत्ते खेळणे अशा गोष्टी करा. आवडत्या गोष्टीत मन रमवा.
या सर्व टिप्स लक्षात ठेवून आणि  घरच्या घरीही खेळ कोडी तयार करून मेंदूला खतपाणी घालता येऊ शकेल असा विश्वास त्यांनी निर्माण केला.
वाढदिवसानिमित्त कलबाग यांनी पेढे दिले.शीलाताईनी चॉक्लेट वाटली.९ एप्रिलच्या जागतिक पार्किन्सन्स दिवसाच्या निमित्ताने असलेल्या मेळाव्यात शुभार्थिनी केलेल्या कालावस्तुंचे प्रदर्शन असणार आहे त्यासाठी कलाकृती साठी आव्हान करण्यात आले.
निवेदन
गुरुवार ९ मार्च रोजी  पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
बाळकृष्ण जगताप यांचे 'आयुष्याच्या उत्तरार्धातील गुंतवणूक' या विषयावर व्याख्यान असणार आहे.सर्वांनी याचा लाभ घ्यावा.उन्हाळ्यामुळे सभेची वेळ दुपारी ४.३० आहे याची नोंद घ्यावी.स्म्र्निकेसाठी ज्यांना लेखन द्यायचे आहे त्यांनी ते येताना आणावे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४.३० वाजता

९ मार्च २०१७ सभावृत्त                
पार्किन्सन्स मित्रमंडळात बहुसंख्येने ज्येष्ठ नागरिक आहेत.आर्थिक आवक कमी आणि आजारावरील वाढता खर्च हे लक्षात घेता आर्थिक व्यवहाराशी संबधित विषयावर व्याख्यान ठेवण्यास हरकत नाही असे वाटले.यानुसार
गुरुवार ९ मार्च रोजी  पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभेत
बाळकृष्ण जगताप यांचे 'आयुष्याच्या उत्तरार्धातील गुंतवणूक' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
कार्यक्रमात सुरुवातीला मंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
पार्किन्सन्स मित्रमंडळाचे ते संस्थापक आहेत पण स्वत:ला कार्यकर्ता समजतात.ते  ८२ वर्षाचे झाले तरी तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्याकडे आहे.ते सायकलवर सर्वत्र जातात.सभेला न चुकता वजन काटा घेऊन येतात असे त्यांच्याबद्दल  शोभना तीर्थळी यांनी सांगितले.श्री. अजित कट्टी यानी ते संगणकाचा विविध प्रकारे वापर करायला  शिकले, इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगितले.
यानंतर श्री मोरेश्वर काशीकर यांनी कबीरबाग  योगोपचार पद्धतीने गोपाळ तीर्थळी या शुभार्थींवर पाठीला बेल्ट बांधण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.पीडी पेशंट स्नायूंची ताकद कमी झाल्याने पाठीत  थोडे झुकतात.यावर उपाय म्हणून बेल्ट बांधण्याचा प्रयोग ते स्वत:वरही करतात.
श्री.अजित  कट्टी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.श्री जगताप यांनी अत्यंत सोप्या भाषेत विषय समजावून सांगितला.
साठीनंतर शारीरिक, मानसिक असमर्थता वाढते.आर्थिक आवक कमी होते.त्यामुळे पहिले महत्व आर्थिक सुरक्षिततेस द्यायला हवे. त्यानंतर value preservation ला महत्व द्यावे. हे लक्षात घेऊन चार महत्वाच्या गोष्टींद्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.
१) सुरक्षितता -सुरक्षीततेच्या दृष्टीने राष्ट्रीयकृत बँका निवडणे चांगले.सहकारी बँका,पतपेढ्या यात त्यामानानी धोका अधिक.बाजाराची सुरक्षितताही पाहणे आवश्यक
२) लिक्विडीटी - या वयात कमवायचे नाही तर वापर करायला शिकले पाहिजे.गरज वाटली तर लगेच पैसे उपलब्ध होणे महत्वाचे.यासाठी जेथे सहा वर्षे पैशाला आपण अजिबात हात लावू शकत  नाही अशा एन.एस.सी.सारख्या ठिकाणी गुंतवणूक नको.एफ.डी.ही सेमी लिक्विड म्हणता येईल कारण येथे थोडे व्याज कमी होईल पण पैसे हवे तेंव्हा उपलब्ध होऊ शकतील.सेव्हिंग बँक खाते पूर्ण लिक्विड असते.
३)उत्पन्न ( income )- महागाई वाढते आणि गुंतवणुकीवरील व्याज दर कमी होत जात आहे.हे लक्षात घेऊन महागाईच्या  दीडपट उत्पन्न असेल अशी गुंतवणूक करावी.हे उत्पन्न  कर वजा जाता असेल हे लक्षात घ्यावे.
४) इन्कमटॅक्स - एफडी,आरडी,कंपनी डिपॉझीट यांना कर असतो.सेव्हिंग बँकेच्या रकमेत १०००० व्याजापुढे कर असतो.फायनान्शियल सल्लागाराचा यासाठी सल्ला घ्यावा.
याशिवाय फिजिकल asset मध्ये बंगला,शेती,सोने,फर्निचर हे येते.यातील दागिने,घर,फर्निचर हे पुन्हा उत्पन्न न देणारे. राहत्या घराशिवाय उत्पन्नाचे साधन म्हणून सेकंड होम घेऊ नये.त्याची व्यवस्था पाहणे उतारवयात शक्य होत नाही.फायनान्शियल asset मध्ये  बँकेतील एफडी,आरडी,पोस्ट,सिनिअर सिटीझन स्कीम्स,पीपीएफ,म्यूच्युअल फंड,शेअर्स येतात.
कराचा आणि परताव्याचा विचार करताफक्त एफडीत गुंतवणूक चालणार नाही.इक्विटी म्युच्युवल फंडात गुंतवल्यास कर भरावा लागत नाही.परतावा जास्त असतो पण रीस्क असते.इंडेक्सचा अभ्यास केल्यास ४०% तोटा ६०% नफा दिसतो. जितकी वर्षे जास्त तितका तोटा कमी, फायदा जास्त होईल .या वयात जास्त वर्षांचा विचार करता येत नाही.
महागाईच्या दीडपट उत्पन्न असण्यासाठी आणि रिस्क आणि महागाईची सांगड घालताना ७०% रिस्क नसलेली आणि ३०% रिस्क असलेली गुंतवणूक करावी.३० % गुंतवणूक करतानाही १०/१० टक्क्याचे ३ भाग करून वेगवेगळे गुंतवावे. यासाठी ज्यांचा  मार्केटचा अभ्यास आहे असा तज्ञ गुंतवणूक सल्लागार निवडावा.
नेट बँकिंग,मोबाईल बँकिंग,भीम App यांचा जरूर वापर करावा असा सल्ला दिला.यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना जगताप यांनी उत्तरे दिली.पार्किन्सन्ससाठी असलेल्या सवलतींची माहिती दिली.
पार्किन्सन्स पेशंटना मोफत सल्ला देण्याचे आश्वासन दिले.
त्यांचा फोन नंबर ९८५०७२९८६८
इमेल - bvjagtap@yahoo.com
    जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा २०१७ वृत्त

 रविवार  दिनांक ९ एप्रिल रोजी लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता.मेळाव्याचे हे दशकपूर्तीचे वर्ष होते.एप्रिलच्या  भर उन्हात दुपारी साडेचारला  कार्यक्रमास २०० ते २५० शुभंकर, शुभार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते
   नेहमीप्रमाणे  सुजाता हरगुडेने काढलेल्या सुंदर रांगोळीमुळे प्रसन्न मनाने सर्व आत प्रवेश करत होते.चाफ्याचे फुल आणि थंड ताक देऊन सर्वांचे  स्वागत केले गेले.
                    गणेश वंदना आणि गणेश स्तवनाने  सभेला सुरुवात झाली.प्रार्थनेत  वसुधा बर्वे,पद्मजा ताम्हणकर, सविता ढमढेरे, अंजली महाजन,विजया दिवाणे,शोभना तीर्थळी या शुभार्थी आणि  शुभंकरांनी सहभाग घेतला.संवादिनीवर त्यांच्या गुरु अनुपमा करमरकर होत्या .
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा होनप यांनी केले.त्यांच्या रूपाने एक नव्या दमाची उत्तम सूत्रसंचालिका मंडळाला मिळाली..
                 सुरुवातीचा कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता. .नृत्यामध्ये विलास जोशी,प्रज्ञा जोशी,प्रभाकर आपटे,श्रीमती तिकोने,विजय देशपांडे,कर्नल पी.व्ही.चंद्रात्रेय,श्री सिंग,श्री,दिलीप कुलकर्णी,  या शुभार्थिनी आणि सौ.शेंडे,दीपा लागू,श्रीमती वाघोलीकर  या शुभंकरांनी सहभाग घेतला.या सर्वांच्या आणि हृषीकेशच्या साडे आठ वर्षांच्या परिश्रमाचे हे फलित होते.हृषीकेशने या उपक्रमाची फोटोसह माहिती हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अल्टरनेटीव थेरपीत समाविष्ट झाल्याचे मागील वर्षी सांगितले होते.त्याचा पुढचा भाग १५ नोव्हेंबर २०१७ ला प्रकाशित होणार आहे. हृषीकेश पवार यांनी यावेळी नृत्यार्थी स्वतंत्रपणे  स्वत:च नृत्याचे संचलन करणार असल्याचे आणि आपले अनुभव सांगणार असल्याचे सांगितले.सुरुवातीला श्रीमती वाघोलीकर यांनी मनोगत व्यक्त केले.त्या शुभार्थी पतीबरोबर नृत्यात सामील झाल्या.आता ते नाहीत पण त्यांचे नृत्य चालूच राहिले.नृत्याच्या शेवटी सुरुवातीपासूनचे विद्यार्थी विलास जोशी आणि नवीन विद्यार्थी श्री सिंग यांनी आपले अनुभव सांगितले.
              यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर राजस देशपांडे  यांचे श्री.शरच्चंद्र  पटवर्धन आणि श्यामला शेंडे  यांच्यासह मंचावर आगमन झाले. श्री पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला.दीपा होनप यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.
              डॉक्टर राजस देशपांडे हे रुबी हॉल क्लिनिक येथे डायरेक्टर ऑफ न्यूरॉलॉजी म्हणून कार्यरत आहेत.नाटो या भारत सरकारच्या कमिटीचे सदस्य आहेत.त्यांनी एमबीबीएस,एमडी जनरल मेडिसिन केले. केइएममध्ये डीएम. न्यूरॉलॉजी मध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.कॅनडा येथे फेलोशिपवर गेले असता त्यांनी जनरल न्यूरॉलॉजी, न्युरो Ophthalmology, मुव्हमेंट डीसऑर्डर,मल्टीपल स्क्लेरॉसिस या विषयात विशेष काम केले.ग्रामीण भागात अपुऱ्या सुविधा असूनही गुंतागुंतीच्या केसेस हाताळणे,किल्लारी भूकंपाच्या वेळचे कार्य,जातीय दंगलीची परिस्थिती हाताळणे यातील योगदानातून त्यांनी सामजिक भान दाखवले.अनेक संशोधन पेपर त्यांच्या नावावर आहेत'.डॉक्टर जीन' हे त्यांचे सर्वसामान्यांसाठीचे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे.  
.पाहुण्यांच्या सत्कारानंतर गेली आठ वर्षे अश्विनी हॉटेल कार्यक्रमासाठी मोफत देणारे  श्री.देवस्थळी,नृत्योपचारासाठी स्वत:च्या घरातील हॉल गेली सात वर्षे देणाऱ्या सुमन जोग,दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वृषाली बेलेकर,मंडळाच्या हितचिंतक डॉक्टर विद्या काकडे,निशिगंध हा व्यसनी स्त्रियांचा गट चालविणाऱ्या प्रफुल्ला मोहिते,डीमेन्शीया गट चालविणाऱ्या मंगला जोगळेकर आणि मंडळाचे हितचिंतक माधव येरवडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर मंडळाचे संस्थापक सदस्य श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रोत्यांशी संवाद साधला.सकारात्मक विचारांची  पेरणी केली.( स्मरणिकेत हे प्रास्ताविक समाविष्ट केले आहे.)

मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर राजस देशपांडे  यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.याचवेळी वेबसाईटवरही अतुल ठाकूर यांनी स्मरणिका प्रकाशित केली.
यानंतर श्यामलाताई शेंडे यांनी भावपूर्ण शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
डॉक्टर राजस देशपांडे यांचे व्याख्यान ऐकण्यास सर्वच उत्सुक होते.डॉक्टरनी आपल्या आजोबांनी दिलेला समोरच्या पेशंटमध्ये स्वत:चे आई वडिलांना पहा असा  सल्ला सांगितला.तो आजतागायत मी पाळत असल्याचे सांगितले आणि  पहिल्या वाक्यातच प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला. 'Basics of  Parkinson's disease and care at home' या विषयावर बोलताना ते  पार्किन्सन्सकडे तज्ज्ञाच्या नजरेतून पाहताना पेशंट आणि त्यांच्या कुटुंबियाच्या नजरेतूनही पाहातात हे सातत्याने जाणवले. पार्किन्सन्स हा जीवघेणा आजार नाही.यासह आनंदी,यशस्वी,प्रॉडक्टिव्ह्,क्रिएटिव्ह आयुष्य जगता येते हे सांगून या आजार बद्दलची भीती काढून टाकली.एकदा तो झाल्यावर त्याला हाताळायचे कसे याबद्दल उपयुक्त सूचना दिल्या.सर्वात महत्वाचे त्याला स्वीकारणे,जेवढे भांडत राहाल तेवढी आयुष्याची गुणवत्ता कमी होईल.
यासाठी त्याला समजून घेणेही महत्वाचे.न्यूरॉलॉजिस्टनी आजाराचे निदान केल्यावर सर्व कुटुंबियासह त्यांच्याशी एक मिटिंग करणे व आजाराबद्दल यथार्थ ज्ञान मिळवणे आवश्यक आहे.एकदा औषधाचा डोस जुळल्यानंतर वारंवार न्यूरॉलॉजिस्टकडे जाण्याची गरज नाही. वर्षातून तीन चार वेळा जाणे पुरेसे आहे.इतर आजारासाठी फिजिशियन आणि घराजवळचे नर्सिंग होम पाहून ठेवावे अशा व्यावहारिक सूचनाही दिल्या.
यानंतर पार्किन्सन्स होतो म्हणजे नेमके काय होते? पार्किन्सन्सची नॉनमोटार लक्षणे,पेशंटला वावरताना सोयीचे जावे म्हणून घरात करावयाचे बदल,व्यायामाचे महत्व अशा विविध बाबी  अत्यंत सोप्या रीतीने समजावून सांगितल्या.पेशंटबरोबर केअरटेकरचाही विचार करावा. इतरांनी पेशंटची काळजी घेऊन केअरटेकरला थोडा आराम द्यावा हे आवर्जून सांगितले.यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.वेळे अभावी काही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.ती मंडळाच्या संचार  अंकातून देण्यात येतील.त्यांचे संपूर्ण भाषण वेबसाईटवर आणि युट्यूबवर ऐकावयास मिळेल.सर्वांनी आवर्जून ऐकावे आणि कुटुंबियांना ऐकवावे.
हे भाषण,एका तज्ज्ञ व्यक्तीचे होतेच पण सहानुभाव( Empathy )असलेल्या सुहृदाचे होते.
यानंतर काही महत्वाची निवेदने आणि आभाराचे काम अरुंधती जोशीने केले.
सभा संपल्यावरही डॉक्टरांच्या भोवती शुभंकर, शुभार्थीनी गर्दी केली. सर्वांच्याच प्रश्नांना डॉक्टर न कंटाळता उत्तरे देत होते.
यावर्षीच्या कार्यक्रमात शुभार्थीनी केलेल्या कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या. अनेकजण आवर्जून त्या  पाहत होते.यावर्षीच्या कलाकृतीत विविधता होती.यावर स्वतंत्र लेख दिला जाणार आहे.एकूणच कार्यक्रम उपस्थितांना सकारात्मक उर्जा देणारा झाला.
सर्व शुभार्थीना स्मरणिका देण्यात आल्या.सभेस हजर नसणाऱ्याना पोस्टाने पाठविण्यात येतील.

                                                                निवेदन
                           गुरुवार दिनांक ११ मे १७ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
यावेळी डॉक्टर अरुण दातार यांचे कमतरतावर मात करणाऱ्या व्यायामाचे प्रात्यक्षिक असणार आहे.खास लोकांच्या आग्रहास्तव त्यांना पुन्हा पाचारण केले आहे.सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
 स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४.३० वाजता

                                                      ११ मे २०१७ सभा वृत्त

                   ११ मे २०१७ रोजी अश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती.सूर्या जिमचे डॉक्टर अरुण दातार यांना शुभार्थिंच्या मागणीवरून पुन्हा पाचारण केले होते.
                     प्रार्थनेने सभा सुरु झाली.अजित कट्टी यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.नुकताच त्यांना क्रीडा महर्षी कै. बा. प्रे. झंवर क्रीडा जीवन गौरव  पुरस्कार मिळाला त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.डॉक्टरांनी मागच्या वेळचे व्यायाम कितीजणांनी घरी केले आणि काय उपयोग झाला असे विचारले.तिघांनीच हात वर केले.व्यायामाचा फायदा काय होतो हे ते केल्याशिवाय कसे समजणार? असा निरुत्तर करणारा प्रश्न त्यांनी विचारला.येथे येणे लांब पडत असेल तर छोटे गट करून वेगवेगळ्या ठिकाणी आठवड्यातून एकदा व्यायाम शिकवण्याची त्यांनी तयारी दाखवली.
                  व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखविण्यास टाळ्यांनी सुरुवात झाली.बोटे पसरून दोन्ही हाताची बोटे एकमेकांवर ठेऊन जोरात टाळ्या वाजविण्यास सांगितले. हळूहळू वेग वाढवत नेला. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते,हातावरील प्रेशर पॉइंट दाबले जातात.यानंतर मागच्यावेळी दाखवलेले काही सोपे आणि विविध ठिकाणचे सांधे मोकळे करणारे व्यायाम करून घेतले.(स्मरणिका २०१७ मध्ये हे सर्व व्यायाम दिलेले आहेत.सर्वांनी आवर्जून पाहावे.) यानंतर'वेट लिफ्टिंग विदाउट वेट' असे ज्याला डॉक्टरनी नाव दिले आहे ते व्यायाम करून घेतले.पुढे आणि मागे चालणे,९० अंशात वळणे अशा तऱ्हेचे व्यायाम ही घेतले.याचा उपयोग पीडी पेशंटना चालताना तोल जातो, त्यावर मात करण्यासाठी होईल..शेवटी व्यायामाचा राजा  असे ज्याला म्हटले जाते त्या  सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक,दिलीप कुलकर्णी,शैलजा कुलकर्णी आणि प्रतिभा पारखे यांनी डॉक्टरांच्या सूचनेनुसार केले.ज्यांना सूर्य नमस्काराच्या सर्व हालचाली जमत नाहीत त्यांनी काय करावे हे सांगितले.
                   यानंतर शुभंकर शुभार्थिंचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
अनेक शुभार्थिंनी आपल्याला येणाऱ्या अडचणी विचारल्या. डॉक्टरानी त्यांना उत्तरे दिली.
डॉक्टरानी आणलेल्या साहित्यातील,शून्यातून सूर्याकडे,भारतीय व्यायाम साधना ही पुस्तके आणि सूर्यनमस्काराची सीडी अनेकांनी विकत घेतली.                 

निवेदन
गुरुवार दिनांक ८ जून रोजी हाॅटेल आश्विनी येथे दुपारी ४ वाजता सभा आयोजित केली आहे.पार्किन्सन्सला आपण मित्र बनवु शकला आहात का? असल्यास यासाठी काय केले? नसल्यास कोणत्या अडचणी येतात? याबाबतचे आपले विचार, अनुभव यांची देवाणघेवाण करायची आहे.या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा.

    ८ जून मासिक सभा वृत्त
                         स्वमदत गटात एकमेकांच्या विचाराची,अनुभवाची देवाण घेवाण अत्यंत गरजेची असते.गुरुवार दिनांक ८ जुन रोजी हाॅटेल अश्विनी येथे आयोजित सभा यासाठीच होती.पार्किन्सन्सला आपण मित्र बनवु शकला आहात का? असल्यास यासाठी काय केले? नसल्यास कोणत्या अडचणी येतात? याबाबतचे आपले विचार, अनुभव सांगायचे होते.सभेस ४० शुभंकर,शुभार्थी उपस्थित होते.
प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.यानंतर शुभंकर शुभार्थिंचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
                           कमिन्स कॉलेजच्या देवयानी कुलकर्णी,मृगाली भट,शर्वरी इनामदार या इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या प्रकल्पाला शुभार्थिनी मदत केली,विश्वास दाखविला  यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या आल्या होत्या.जानेवारी १६ च्या सभेत त्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगण्यासाठी आल्या तेंव्हा शुभार्थिंचा इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असे त्यांना वाटले नव्हते.पण प्रत्येक शुभार्थिंनी मनापासून त्यांना प्रयोगासाठी हवा तेवढा वेळ दिला.पीडी सारख्या आजाराला झेलत आनंदी राहणाऱ्या शुभार्थिंकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली असेही त्यांनी सांगितले.सर्वांच्या विनंतीवरून आपल्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली. त्यांनी कंप मोजणारे App तयार केले आहे.त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. शुभार्थिंना कोणताही त्रास न होता कंप मोजता येणार असल्याचे लक्षात आले.त्यांनी सर्व शुभार्थिंसाठी स्वत: तयार केलेली भेटकार्डे आणली होती.
                                  या तिघींनी त्यांना भेटलेल्या शुभार्थिनी पीडीला मित्र बनविल्याचा अनुभव सांगितला आणि विषयाला आपसूकच सुंदर सुरुवात झाली.शोभना तीर्थळी यांनी विषय प्रास्ताविक केले. शरच्चंद्र पटवर्धन हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येवू शकणार नव्हते. त्यांनी Voice मेसेजद्वारे आपले विचार पाठवले होते.त्याची, माहिती सांगितली मधमाशीचा डंख विशिष्ट भागावर चार सेशनमध्ये करून पीडी बरा करता येतो असा दावा पुण्यातील एक व्यक्ती करते. त्याचा अनुभव कोणी घेतला आहे का? असा प्रश्नही पटवर्धन यांनी विचारला होता.
                              श्रद्धा  भावे यांनी विविध व्याख्यानातून मी आपल्याला योग्य ते घेत जाते.सातत्याने व्यायाम करते असे सांगितले.त्या  डॉक्टर अरुण दातार यांनी सांगितलेले व्यायाम उठताना गादीवर बसूनच करतात.एक सूर्य नमस्कार घालतात. त्यांमुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात.दिवसभरात सांधे आखडले तर पुन्हा त्या हे व्यायाम करतात.
                             आर्मी ऑफिसरच्या पत्नी असलेल्या अंजली देवधर यांनी आपल्याला पार्किन्सन्स झाला हे स्वीकारणे महत्वाचे मानले.यासाठी न लपवता सर्वांना सांगते असे सांगितले. त्या घरातली सर्व कामे स्वत: करतात.सही तशीच राहावी म्हणून पानभर सही करतात.अक्षराचा सराव  राहण्यासाठी नियमित शुद्धलेखन लिहितात.
                             Lab टेक्निशियन असलेल्या अरुण सुर्वेना पार्किन्सन्सचे निदान होण्यासच दोन अडीच वर्षे गेली.ते सातत्याने व्यायाम करतात.त्यांच्या जवळ राहणाऱ्या शुभार्थी सौ.देवी यांना त्यांनी गुरु केले आहे. देवी यांनी अंधश्रद्धा वाटणारे अनेक पर्यायी उपचार केले.उपयोग झाला नाही. त्यात मधमाशांचा डंख हा प्रकारही होता.अशा उपचारांच्या वाटेला जायचे नाही हे सुर्वेनी ठरवले.पीडीला मित्र बनवणे,आनंदात राहणे त्यांना महत्वाचे वाटते.
                            वसुधा बर्वे यांना .पीडी होऊन १० वर्षे झाली.त्या नियमित व्यायाम करत होत्या,इतरांचे व्यायाम घेत होत्या.तरीही आपल्याला पीडी झाला म्हणून निराश झाल्या होत्या पण डॉक्टरानी समजावून सांगितले.पीडीला स्वीकारता आले.त्यांनी संगीत क्लास सुरु केला. गाण्याच्या दोन परीक्षाही दिल्या.प्रथम श्रेणी मिळवली.
                            लतिका अवचट एकट्या सभेला येतात.नियमित व्यायाम करत असल्याचे आणि रोज लिहित असल्याचे त्यांनी सांगितले.
                              मोरेश्वर काशीकर हे सभेपूर्वी स्वत: प्रार्थना घेतात.स्मरणिकेतून त्यांनी वेळोवेळी आपण पार्किन्सन्सला हाताळण्यासाठी काय करतो हे सांगितले आहे.त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, त्याला शत्रू म्हणा किंवा मित्र म्हणा त्रास हा सोसावाच लागतो मग मित्र का म्हणायचे नाही? डॉक्टरांना वेळोवेळी भेटणे,नियमित औषधे घेणे,आहार,विहार,व्यायाम,पूरक उपचार या सर्वांच्या आधारे पीडीला हाताळत असल्याचे सांगितले.
                              रेखा आचार्य एकट्या राहतात.शिक्षिकेची नोकरी करत असतानाच पीडी झाला. पण कार्यकाल  पूर्ण केला.घरातील सर्व कामे करतात.मित्रमंडळाचा आधार वाटतो.नियमित व्यायाम करतात.बऱ्याच वेळा रात्री झोप येत नाही.पण काही तरी हालचाली करत राहतात. झोपेची गोळी अजिबात घ्यायची नाही असे त्यांनी ठरवले आहे.होमिओपथिच्या  औषधांचा त्यांना चांगला उपयोग होतो.
                            रमेश घुमटकर पाषाणहून सभेला स्कूटरने येतात.नियमित व्यायाम,चालणे करतात.सतत हालचाल करणे त्यांना महत्वाचे वाटते.मोबाईलवर बोलत असतानाही ते एका जागी बसून न बोलता फिरत फिरत बोलतात.
                          उत्साही शुभार्थी  पद्मजा ताम्हणकर यांना वटपोर्णिमा असल्याने वटसावित्री व्रताबद्दल माहिती सांगायची होती. अतिशय सुंदर अक्षरात त्यांनी ती लिहून आणली होती.पण वेळे अभावी सांगता आली नाही.प्रत्येक वेळच्या स्मरणिकेत त्यांनी आपले अनुभव दिलेले आहेत.ते वाचावे असे त्यांनी सांगितले.
                        राजीव कऱ्हाळे यांच्या आईवडिलांना पीडी होता.पीडीबद्दल माहिती होती.संगीताचा आपल्याला चांगला उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.
                         देवयानी, मृगाली आणि शर्वरी याना अंजली महाजन यांनी तत्काळ भेटकार्डे तयार करून दिली आणि त्यांचे आभार मानले. या तिघींनी सर्वांसाठी वेफर्स,बर्फी आणली होती, चहाही दिला. अंजलीने वाढदिवसानिमित्त चॉकलेट दिली.
                        शरच्चंद्र पटवर्धन, दीपा,अजित कट्टी,आशा रेवणकर,श्यामाताई,व्ही.बी.जोशी, प्रज्ञा जोशी अशी खंदी कार्यकर्ती मंडळी  अपरिहार्य कारणाने अनुपस्थित होती.परंतु फोटोची धुरा अरुंधतीने सांभाळली.इतर कामात वसू,श्रद्धा,अंजली यांना देवयानी मृगाली,शर्वरी यांनी मदत केली आणि कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.
निवेदन
गुरुवार दिनांक १३ जुलै १७ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर माधवी साळुंखे या 'पार्किन्सन्स आणि नैराश्य' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
यावेळी
जुलै १७ चा संचारचा अंकही देण्यात येईल
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४ वाजता

१३ जुलै २०१७ सभा वृत्त
    गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा  हॉटेल अश्विनी येथे पार पडली.डॉक्टर माधवी साळुंखे यांचे 'पार्किन्सन्स आणि नैराश्य' या विषयावर व्याख्यान झाले.
पाऊस असूनही सभेस  ५०/६०  सभासद उपस्थित होते.सुरुवातीला शुभंकर शुभार्थिंचे वाढदिवस साजरे करण्यात आले.शोभना तीर्थळी यांनी डॉक्टर साळुंखे यांची ओळख करून दिली.श्रोत्यांशी  संवाद साधत साळुंखे यांनी व्याख्यानास सुरुवात केली.नैराश्य ( depression ) हा शब्द रोजच्या व्यवहारात आपण सहजपणे वापरत असतो.पण  नैराश्य म्हणजे नेमके काय हे व्याख्यानातून त्यांनी स्पष्ट केले.
पार्किन्सन्स आणि नैराश्य याचा घनिष्ठ संबंध आहे.कंप, ताठरता इत्यादी प्रमाणे नैराश्य हेही पीडीचे एक लक्षण आहे. असे असले तरी प्रत्येकाला हे लक्षण असेलच असे नाही. टक्केवारी पाहता जास्तीतजास्त ६० टक्के असण्याची शक्यता असते.आजार वाढला, वय वाढले,दु:खद प्रसंग ,अपघातात एखादा अवयव गमावला, कर्करोग झाला, अशावेळीही नैराश्य येण्याची शक्यता वाढते.जेंव्हा शक्यता आहे असे आपण म्हणतो तेंव्हा बरे होण्याची शक्याताही  आलीच. उपायच नाही असा हा आजार नाही.त्यामुळे आपण जेवढा बाऊ करतो तेवढा करायची गरज नाही.
निराश होणे ही त्या क्षणाची,दिवसाची मानसिक दृष्ट्या खालची पातळी ( लो फिलिंग ) असते. यात सातत्य राहिले,दीर्घ  काळपर्यंत अशी पातळी राहिली तर नैराश्य या आजाराची अवस्था येते.त्याला सांभाळायचे कसे,  हे पाहणे महत्वाचे.
                       नैराश्याचे क्लिनिकल आणि सायकॉलॉजिकल असे प्रकार सांगता येतील.क्लिनिकल मध्ये दु:खी होणे,आयुष्य नको वाटणे,आपली उपयुक्तता संपली असे वाटणे,अपराधीपणाची भावना वाढणे,असा लक्षणांचा समूह आढळतो.हे सातत्याने वाढत गेले, दोन आठवड्याहून जास्त काळ झाला तरी बदल होत नाही असे आढळले तर नैराश्य हा आजार झाला असे म्हणता येईल. अशावेळी मानसोपचार तज्ञाकडे जाऊन उपचार करणे आवश्यक ठरते.
                       सायकॉलॉजिकल डिप्रेशनमध्ये  समुपदेशन,talk थेरपी,स्वमदतगटातील सहभाग इत्यादीचा उपयोग होऊ शकतो.पीडीच्या शुभार्थिना तर यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कारण नर्व्हस सिस्टीम मध्ये ज्या प्रक्रिया होतात, त्यात असमतोल निर्माण होतो आणि त्यामुळे नैराश्याची शक्यता वाढते.ही शक्यता कमी करण्यासाठी आपल्या भावना समजून घेणे गरजेचे. व्यक्तीच्या भावनात सतत बदल होत असतात.आपल्या भावना नेमक्या काय आहेत हे स्वत:ला समजणे महत्वाचे.नैराश्य आहे आणि नाही यात जी सीमारेषा असते ती ओलांडायच्या आधीच आपल्याला लो फिलिंग असताना दु:ख,निराशा,आपण कोणाला नकोसे आहोत अश्या नेमक्या  कोणत्या भावना आहेत हे समजले तर त्यावर मात करणे सोपे जाईल.यासाठी
१) आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन 'असणारच ऐवजी शक्यता आहे' असा असावा.
२)भावना नीट ओळखता आल्या तर उपाय करणे सोपे जाते.भावनानी आपल्याला नाचवण्यापेक्षा त्यांना आपण हाताळणे महत्वाचे.
३)नकारात्मक भावना साठवत गेल्याने एकत्र डोंगर तयार होतो.त्याला कवटाळून न बसता, ते साठू न देता ती सायकल तोडणे आपल्या हातात असते.
हे कसे करायचे?याबद्दलही डॉक्टर साळुंखे यांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले.
कधी कधी लो फिलिंगला ती नेमकी कशामुळे हे न समजून घेता वरवर थांबवले जाते.त्याऐवजी मुळाशी जाऊन कशामुळे हे शोधणे महत्वाचे.यासाठी रोज स्वत:बरोबर  अर्धा तास तरी राहून जळमटे कुठे साठली आहेत ते पाहुन रोजच्या रोज ती साफ करणे महत्वाचे.
आपण आपल्या भावना हाताळू शकतो का? नसेल तर इतरांची मदत घ्यावी.मोकळे व्हावे.याला talk therapy म्हणतात.यासाठी निवडलेली व्यक्ती योग्य असावी नाहीतर कौन्सिलरची मदत घ्यावी.
मी माणूस आहे त्यामुळे कधीतरी 'ओके टू फिल नॉट ओके'.हेही  स्वीकारावे.
लो फिलिंगचा काळ,वारंवारिता,तीव्रता हे वेळोवेळी तपासत राहणे महत्वाचे आहे.असे केल्याने स्वत:ला सांभाळणे शक्य होते.
प्रकृती ठीक नसतानाही डॉक्टर साळुंखे यांनी जवळ जवळ दीड दोन तास व्याख्यान सुरु असताना आणि व्याख्यान झाल्यावर विचारल्या गेलेल्या शंका,प्रश्नांना  सोपी उदाहरणे देत उत्तरे दिली.
सभा संपल्यावरही त्यांच्याभोवती शंका विचारण्यासाठी शुभंकर,शुभार्थी उभे होते.अनेकांना नैराश्य उंबरठ्यावर असताना त्याला परतवायचे कसे हे समजल्याने समाधान वाटत होते.सभेनंतर शुभार्थिच्या आलेल्या फोनवरूनही हे लक्षात आले.
वाढदिवसानिमित्त जोत्स्ना पुजारी यांनी केक आणि वेफर्स, हेमा शिरोडकर यांनी बिस्किटे दिली.दीपा होनप यांनी आपली मुलगी तन्वी हिने  पीएचडी मिळवल्याबद्दल पेढे दिले.
निवेदन
गुरुवार १० ऑगस्ट रोजी  पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर अमित करकरे ' केअर ऑफ केअरटेकर ' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.

वेळ : दु ४ वाजता

  १० ऑगस्ट २०१७ सभा वृत्तांत
                           गुरुवार १० ऑगस्ट २०१७ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल अश्विनी येथे सभा आयोजित केली होती.डॉक्टर अमित करकरे यांनी ' केअर ऑफ केअरटेकर ' या विषयावर व्याख्यान दिले.सभा आयोजित करताना नेहमीच शुभार्थिंचा विचार केला जातो यापूर्वी एकदाच शुभंकरांच्या प्रश्नावर शेअरिंग झाले होते.आणि सिप्ला तर्फे दिवसभराचे 'केअरटेकर वर्कशॉप' आयोजित केले होते.या वेळी हा विषय डॉक्टर करकरे यांनीच सुचविला.
प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.श्यामला शेंडे यांनी डॉक्टर करकरे यांची ओळख करून दिली आणि सभेची सूत्रे त्यांच्याकडे दिली.आधी व्याख्यान आणि नंतर प्रश्नोत्तरे या ऐवजी शुभंकरांनी आपले अनुभव आधी सांगावे असे डॉक्टरांनी सुचविले.
दीपा होनप यांनी आपल्या वडिलांना पीडी झाल्यावर केअरटेकर असलेल्या आईबद्द्ल आलेले अनुभव सांगितले. सोशल असलेल्या आईने आपले सामजिक विश्व थोपवून १३ वर्षे पूर्णपणे पतीच्या सेवेला वाहून घेतले.असे न करण्यास आजूबाजूच्या सर्वांनी सांगूनही ऐकले नाही. त्यांना खाल्लेले काहीच न पचता लूज मोशनचा त्रास सुरु झाला.अनेक तपासण्यानंतर याचे कारण मानसिक ताण  असे निघाले शुभंकराने स्वत:ची आणि इतरांनी शुभंकराची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आशा रेवणकर यांना पतीचा इगो हा त्रासदायक वाटतो.यावर मात करून स्वत:ची काळजी घेत शुभार्थीची काळजी घेणे आपल्याला कसे जमणार याची चिंता त्यांना वाटत होती.स्वत:ला विविध कामात गुंतवून,हळुवारपणे पतीला हाताळून त्यांनी यातून मार्ग काढला.तरी पूर्णपणे तणावमुक्त होता येत नसल्याचे सांगितले.
शोभना तीर्थळी यांना इतर शुभंकरांचे फोन येतात. त्यातून इगो हा प्रश्न मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवले..आजाराबद्द्लचे अज्ञान,त्यामुळे वाटणारी भीती,काळजी आणि मन मोकळे करण्यासाठी योग्य व्यक्तीची गरज या समस्या जाणवत असल्याचे सांगितले.
रामचंद्र करमरकर यांनी Cipla cancer center तर्फे शुभंकरांसाठी झालेल्या कार्यशाळेची आठवण सांगितली.अशा तऱ्हेचा कोर्स पार्किन्सन्स मित्रमंडळाने करावा असे सुचविले.
डॉक्टर करकरे यांनी ही सूचना उचलून धरत आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.पिडीचे निदान झाल्यापासूनच शुभंकरांच्या समस्यांना सुरुवात होते.धक्का, अस्वीकार,आपल्याला हे झेपेल का? हा विचार अशी नकारात्मकतेची शृंखलाच सुरु होते.शुभंकरांनीही पुढील आयुष्यासाठी काही बेत ठरवलेले असतात ते आता प्रत्यक्षात येणार नाहीत याची चिडचिड,आपल्याला असे वाटते याबद्दलची अपराधीपणाची भावनाही निर्माण होते.शुभार्थीच्या मुळ स्वभावातले काही दोष अशावेळी उफाळून येतात.त्यामुळे चिडचिड होते.या सर्वातून उत्तरे मिळण्यापेक्षा आणखी प्रश्न निर्माण होतात त्यामुळे बिनशर्त स्वीकार महत्वाचा ठरतो.बिनशर्त स्वीकार म्हणजे शरणागती नव्हे.
इतर सर्वांचे लक्ष शुभार्थीकडे असते.शुभंकरांच्या मनाची अवस्था कोणाच्या लक्षात येत नाही.पण कोणी विचारेल म्हणून न थांबता स्वत:च कोणाशी तरी बोला.यातून समस्या निराकरणाचा मार्ग मिळू शकतो.सर्वांनी मिळून ऐनवेळी पडणे,चक्कर येणे अशा काही गोष्टी घडल्यास काय निर्णय घ्यायचा याबद्दलचा तक्ता केल्याने ,विविध फोन नंबर लिहून ठेवल्याने अज्ञाताबद्द्लची भीती, काळजी कमी होण्यास मदत होते.
शुभार्थी प्रमाणेच बहुसंख्य शुभंकरही वयोवृद्ध असतात. त्यांचेही काही आजार असतात.अनेक प्रसंगी दोघांचीही चिडचिड होते. अशावेळी रागावर नियंत्रण, रागाचे व्यवस्थापन महत्वाचे ठरते.बऱ्याचवेळा राग परिस्थितीवर असतो.कृती मुद्दाम केली आहे का?हेतू त्रास द्यायचा होता का?  असा विचार केल्यास रागावर नियंत्रण सोपे होते.शुभार्थिनीही शुभंकरांची चिडचिड समजून घेतली पाहिजे.
भास ही पीडी शुभार्थीबाबत मोठ्ठी समस्या असते.यासाठी डोस ठरविण्याचे आणि कशामुळे भास होतात हे ठरविण्याचे काम न्यूरॉलॉजीस्टचे असते.औषधांचा परिणाम हवा, तसा दुष्परिणामही स्वीकारावा लागतो. भास होतात तेंव्हा शुभार्थी वेगळ्याच विश्वात असतात.त्यांच्या विश्वात जाऊन त्यांच्याशी वर्तन केल्यास शुभार्थीला हाताळणे सोपे जाते. हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
शुभंकर एकटाच सर्व गोष्टी हाताळू शकत नाही.जे हाताळणे शक्य नाही. त्यासाठी न लाजता,इगो न करता मदत घ्यावी.काही जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर सोपवाव्या. स्वत:ची होणारी चिडचिड,भीती,अपराधीपणाची भावना या सर्वामुळे होणारी घुसमट, यातून मन:शांती ढळते. यासाठी आपले मन कोणाशीतरी मोकळे करावे.
समजून घ्यायला सोप्या,कोणताही दुष्परिणाम न होणाऱ्या ३८  पुष्पौषधीपैकी काही यासाठी उपयोगी पडतात.
जबाबदारीचे ओझे वाटत असल्यास - एल्म
विशिष्ट भितीसाठी - मिम्युलस
काळजीसाठी -रेडचेस्टनट
अनामिक भितीसाठी - अस्पेन
स्वत:वर नियंत्रणासाठी - चेरीप्लम इत्यादी.
पुढच्या सभेपर्यंत अशा औषधांची यादी आणि ती कशी घ्यावयाची ही माहिती छापील स्वरुपात देण्याचे डॉक्टरांनी कबुल केले.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना डॉक्टरांनी उत्तरे दिली.डॉक्टरांनी दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास अधिक दिला.पुन्हा येण्याचे कबूल करून डॉक्टरांनी रजा घेतली.
शुभंकर शुभार्थिंचे वाढदिवस साजरे करण्यात आले.शुभंकर असणे यशस्वीपणे हाताळलेले आणि आम्हा सर्वांचेच शुभंकर असणाऱ्या शरच्चंद्र पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.
रामचंद्र करमरकर यांनी संस्था रजिस्टर झाल्याचे जाहीर केले. आणि समारंभ संपला.
शुभार्थी अश्विनी दोडवाड यांनी वाढदिवसानिमित्त उपमा आणि जिलबी दिली.अश्विनीताईनी  स्वत: उपमा बनवला  होता.रत्नाकर मोघे यांनी चहा दिला.
         निवेदन
                             गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने डॉक्टर सोनल चिटणीस यांचे
'Parkinson's disease and speech problems' या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.
वेळ - दुपारी - ४ .०
ठिकाण - हॉटेल अश्विनी
                                         १४ सप्टेंबर २०१७ सभा वृत्त
    गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा  हॉटेल अश्विनी येथे पार पडली. सभेस ६०/ ७०  सभासद उपस्थित होते.वक्त्या डॉक्टर सोनल चिटणीस ४.३० ला येणार होत्या.त्यामुळे प्रार्थनेनंतर सुरुवातीलाच शुभंकर, शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.लता अवचट आणि उषा चौधरी यांची पंचाहत्तरी झाली.लताताईनी यानिमित्त बर्फी आणि उषाताईनी पेढे वाटले.राजीव ढमढेरे,सविता ढमढेरे ५/६ महिन्यानंतर अमेरिका दौरा करून आले.राजीव ढमढेरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अमेरिकेहून आणलेली चॉकलेटस वाटली.
                ९४ वर्षाचे कलबाग हे एकटेच राहतात. कार्यक्रमाला त्यांची कॅनडास्थित भाची स्मृती हळदीपूर आल्या होत्या..त्यांनी तेथील समाजाचा पेशंटकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि येथे आल्यावर समाजाचा दृष्टीकोन यात फरक जाणवल्याचे सांगितले.इकडे समाजात वावरताना पेशंटला संकोच वाटतो.कलबाग यांनी मात्र एकटे राहूनही स्वत:ला चांगले रमवून घेतले असल्याचे सांगितले.या सभेंला बरेच नविन शुभार्थी आले होते, मेहता पती पत्नी इंदापूरहून आले होते.सौ दिवाण यांना त्यांचा मुलगा घेऊन आला होता.त्यांनीही आपल्या आईच्या पीडीविषयी अनुभव सांगितले.
                 डॉक्टर सोनल चिटणीस आल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.अरुंधती जोशी यांनी त्यांची ओळख करून दिली.डॉक्टर चिटणीस यांनी श्रोत्यांशी संवाद साधत व्याख्यानाला सुरुवात केली.काही वस्तू सांगितल्या. त्या डोळे बंद करून डोळ्यासमोर आणायच्या आणि डोळे उघडून आठवून सांगायच्या.ही अगदी छोटी क्रिया वाटली तरी आजूबाजूचा परिसर न्याहाळून अशी क्रिया करीत राहिल्यास  बोलणे, आठवणे  या मंदावलेल्या क्रियांची  गती वाढण्यास मदत होते.पीडीमध्ये औषधाबरोबर व्यायामही महत्वाचा असतो.तो का महत्वाचा असतो हे सांगताना प्रथम त्यांनी पार्किन्सन्सची लक्षणे, अवस्था,विविध प्रकार यांची माहिती सांगितली.शरीराच्या हालचालीवर नियंत्रण करणारा डोपामिन हा  स्त्राव कमी झाल्याने कंप,गतिमंदता,ताठरता या गोष्टी होतात.बाहेरील अवयवाप्रमाणे जीभ,स्वरयंत्र,श्वास नलिका,अन्ननलिका या बोलणे,गिळणे हे कार्य करणाऱ्या यंत्रणांवरही हा परिणाम होत असतो.
                 बोलण्याच्या पातळीवर आवाजातील चढउतारावर परिणाम होतो.बोलताना एक शब्दावरच अडखळणे, शेवटच्या शब्दाचा उच्चार न होणे यामुळे समोरच्या व्यक्तीला बोलणे समजत नाही.संवाद साधता येत नसल्याने बोलणे,बाहेर जाणे कमी होते. यातून नैराश्य येते.यातच ताठरतेमुळे आपल्याला काम जमणार नाहीअसे  वाटते.त्यामुळे काम न करणे,इतरांचा आधार घेणे सुरु होते.आत्मविश्वास कमी होतो.व्यायामाने यावर मात करता येते.अर्थात प्रत्येक व्यक्तीत हे सारखे नसते.काहीना बोलता चांगले येते. हालचाली करता येत नाहीत. काहीना हालचाली चांगल्या करता येतात पण बोलण्यात दोष निर्माण होतो.शरीर यंत्रणा एकसंध असल्याने बोलणे,गिळणे,आठवणे या सर्वांवर इतरही अनेक बाबींचा परिणाम होता असतो.याचे निट निदान झाल्यावरच औषध योजना ठरवण्यात येते.पीडीची औषधे आणि इतर काही आजार असल्यास त्याची औषधे, B12,D Vitamin ची कमतरता,मेंदूला रक्त प्रवाह,ऑक्सिजन यांचा पुरवठा कमी होणे याचा परिणाम होत असतो. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळात लक्षणात चढउतार होत असेल तर कोणत्या गोळ्या आहेत त्यांचा परिणाम होतो का हे पाहणे आवश्यक आहे. त्यानुसार निरीक्षण करून डॉक्टरना सांगणे आवश्यक आहे.
                  पीडीमध्ये बोलण्या,गिळण्याबरोबर पोश्चर,गेटची समस्या,तोल जाणे, पडणे,फटिग अशा अनेक बाबी औषधाने बऱ्या होणाऱ्या नसतात त्यासाठी व्यायामच लागतो.त्यासाठी त्या त्या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. या सर्व व्यायामाचे दिवसभराचे शेड्युल करणे आवश्यक आहे.त्याची सवय होते. तो एक प्रकारचा रियाज असतो.आजाराच्या अवस्थेनुसार जीवन शैली ठरवणे आवश्यक आहे.म्हणजे नेमके काय हे सांगणारे व्याख्यानातील महत्वाचे मुद्दे पुढे देत आहे.
                    बोलणे, गिळणे याचा विचार करता प्रथम स्पीच लँग्वेज pathologist कडून आपली बोलण्या ,गिळण्याची समस्या कोणत्या अवस्थेत आहे हे समजून घ्या.यासाठी असलेल्या डिव्हाईसद्वारे हे तपासता येते.त्यानुसार व्यायाम दिले जातात.
                  समस्या फार वाढण्याच्या आधीच व्यायाम केल्यास पीडी पूर्ण बरा होणार नसला तरी परिस्थिती नियंत्रणात आणता येते.
                   गिळण्याची  समस्या असल्यास  पाणी पिणे टाळले जाते.तसे न करता straw ने पाणी प्या. पेल्याने पाणी पिताना मोठे घोट घेतल्याने ठसका लागतो.खाद्य पदार्थ मउ करून खा. कण राहु द्रेऊ नका.ठसका लागू नये म्हणून गिळताना हनुवटी खाली करा.पाणी, अन्न श्वास नलिकेत गेल्यास न्युमोनिया होऊ शकतो.           

                जीभ आतल्या आत थांबते असे वाटते.तिचे नियंत्रण कमी होते.अशावेळी जीभ बाहेर, आत,बाहेर,वरती,खालती करणे असा व्यायाम करावा.बोलणे आणि गिळणे या दोन्हीसाठी तो उपयुक्त आहे.
                   तोंडात अन्न घालताना ते योग्य ठिकाणी ठेवले गेले पाहिजे. फार पुढेही नको फार मागेही नको.नंतर हनुवटी थोडी तिरकी खाली करायची.असे केल्याने अन्न नीट आत जाऊ शकते नाहीतर अडकते,ठसका लागतो.अन्नकण छातीत  अडकतात.
                     वासाची क्षमता कमी होते यासाठी विविध पदार्थांचे वास घेऊन पहा. सौम्य वास आले नाहीत तर तीव्र वास घ्या. 
                 घास तोंडातून बाहेर येतो याचा अर्थ जिभेचे आणि ओठांचे नियंत्रण गेले आहे.व्यायामाने यावर नियंत्रण आणता  येते.ओठ बाहेर काढणे,दाबणे,इकडे तिकडे स्ट्रेच करणे अशी क्रिया मधून मधून करत राहावी.
                   श्वास पुरेसा घेतला न जाणे, योग्य प्रकारे न  घेणे याचाही बोलण्यावर परिणाम होतो.तोंडाने श्वास घेऊन,तोंडाचा फुगा करून हळूहळू श्वास सोडावा.तज्ञांचा सल्ला घ्यावा.
                    बोलण्याची क्षमता वाढवण्यासाठी आ,ई ऊ नंतर ई ऊ आ असे म्हणा.ओम म्हणा.अशा प्रकारचे विविध व्यायाम प्रकार सांगितले. असे स्वरावर काम केल्याने बोलण्याच्या अवयवांना व्यायाम होतो.ओठ,जीभ, स्वरयंत्र या सर्वांनाच अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे व्यायाम अतीही नको, कमीही नको.थांबून थांबून करा.(प्रत्येकाची क्षमता कमी जास्त असल्याने तज्ज्ञ व्यक्ती हे ठरवू शकेल.) 
                    ज्यावेळी बोलणे अजिबात समजत नाही अशा वेळी पिक्चर बोर्ड बनवा.
                    शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूचे व्यायामही महत्वाचे.

                शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करणे,नावे आठवणे,शब्द आठवणे,,गाणी आठवणे,गाणी म्हणणे,ऐकणे,रांगोळी काढणे,नृत्य म्हणजे तालावर हालचाली करणे,बागकाम करणे, ताटात रवा घेऊन त्यावर अक्षरे काढणे अशा विविध क्रिया करत राहा.मेंदूला यामुळे चालना मिळते.
               यानंतर डॉक्टर चिटणीस यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांच्या विषय कक्षेच्या बाहेरच्या प्रश्नांनाही न कंटाळता उत्तरे दिली.सभा संपली तरी श्रोत्यांचे व्यक्तिगत प्रश्न विचारणे चालूच होते.
                सोनल चिटणीस यांच्याबरोबर त्यांच्या विद्यार्थिनीही आल्या होत्या.त्यांचे काही प्रकल्प चालू आहेत त्यासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची नावे लिहून घेतली.
                   निवेदन          
  गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर १७ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर पराग ठुसे हे 'Stress Management and PD' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
यावेळी ऑक्टोबर महिन्याचा संचारचा अंक देण्यात येईल.
  स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४ वाजता
विशेष सूचना - १ नोव्हेंबरला मंडळाची सहल पानशेत जवळील 'अभिरुची'  येथे जाणार आहे.
सहल सकाळी ८.३० वाजता हॉटेल अश्विनिपासून  निघेल.संध्याकाळी परत येईल.ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी प्रत्येकी रुपये ३०० बरोबर आणावे.इतर तपशील सभेच्या ठीकाणी सांगण्यात येईल.
                   १२ ऑक्टोबर २०१७ सभावृत्त 
                                दिनांक १२ ऑक्टोबर २०१७ रोजी डॉक्टर पराग ठुसे यांचे 'Stress Management and PD' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.सभेस ६०/७० सदस्य उपस्थित होते.प्रार्थनेने सभेची सुरुवात झाली.यानंतर दीपा होनप यांनी मंडळाच्या कामाची व्याप्ती वाढली आहे आणि कार्यकर्ते कमी आहेत.यासाठी विविध पातळीवर सहकार्याची विनंती केली.रामचंद्र करमरकर यांनी १ नोव्हेंबरला जाणाऱ्या सहलीविषयी सूचना दिल्या.तोवर वक्त्यांचे आगमन झाले.आशा रेवणकर यांनी डॉक्टर पराग ठुसे यांची ओळख करून दिली.
श्रोत्यांशी संवाद साधत,मध्येच प्रश्न विचारण्याची मुभा देत आणि सर्वांचा ताण हलका करतच डॉक्टर ठुसे यांनी  व्याख्यानास सुरुवात केली.
                               जन्मणाऱ्या मुलापासून मृत्युपर्यंत आणि आदि मानवापासून आधुनिक मानवापर्यंत सर्वांनाच तणावाला सामोरे जावे लागते.हा सर्वांच्याच अनुभवाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.ज्यावेळी तणाव येतो तेंव्हा ज्ञान, बुद्धी उपयोगी पडत नाही.कळते पण वळत नाही असे होते आणि विचित्र विचाराच्या साखळीत आपण अडकतो.पार्किन्सन्सचा विचार करता तणाव कमी करून आजार कसा सुसह्य बनवायचा,वाढ कशी रोखायची हे पहायचे.पीडीच्याबाबत खूप संशोधन चालू आहे. परीपूर्ण उत्तर अजुन सापडले नाही कारण  मूळ कारणच समजलेले नाही. त्यामुळे मुळ औषधोपचाराबरोबर पूरक उपचारावर चांगले लक्ष द्यावे.कोणताही आजार त्या एकाच ठिकाणचे वैगुण्य नाही तर संपूर्ण शरीर,मन त्याच्यातल्या असलेल्या दोषाचे झालेले एकत्रीकरण असते.(Any disease is localized  manifestation of generalized condition) Generalize condition कडे सुद्धा नीट लक्ष दिल्यास localized manifestation सुसह्य करता येईल का? हे करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजले जातात.त्यातील एक तणाव नियोजन.  
                         डॉक्टरानी  ताण का येतो हे श्रोत्यांनाच विचारले.मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी अनेक शोध लावले.पण त्यातुन फायद्याबरोबर तोटेही होत आहेत.तणाव कमी करायचा तर फायद्याकडे पाहिले पाहिजे. आजाराबाबतही काही लपलेला फायदा असतो. तोट्यापेक्षा त्याकडे लक्ष द्यायला हवे.कल्पनाशक्तीचा शरीरक्रियेवर खूप मोठ्ठा परिणाम होत असतो.तिचा वापर चुकीच्या पद्धतीने  न करता योग्य पद्धतीने केल्यास तणाव नियोजन योग्य प्रकारे होऊ शकते.संकट आल्यास लढा नाहीतर पळा ही शरीराची प्रतिक्रिया असते. त्यानुसार शरीरात स्नायू ताठरणे,घाम येणे,श्वासाची गती वाढणे इत्यादी बदल होतात. आदिमानवाच्या काळात तो यापैकी काही तरी क्रिया करायचा आणि त्यामुळे ताणाचा लगेच निचरा व्हायचा.आता तणाव बदलले.परंतु पूर्वीसारख्या.क्रिया होत नाहीत.तणाव शरीरावर परिणाम करत राहतो.ताणाची कारणे लक्षात घ्या.आपल्या वैचारिक बैठकीनुसार ताणाचे प्रकार वेगळे वेगळे आहेत.आपल्या ताणाची शारीरिक,मानसिक,भावनिक कारणे काय आहेत?कौटुंबिक,सामाजिक,आजारानुसार काय आहेत? भूतकाळ,भविष्यकाळ यानुसार काय आहेत? याची कागदावर नोंद होणे आवश्यक.तसे होत नाही.ताणांची जाणीव होणे यातच अर्धे उत्तर आहे.उत्तरे शोधताना ताणाच्या कारणाना मोट्ठे न करता उत्तराला मोट्ठे करायची जबाबदारी घ्यायची आहे. काही प्रश्नांना  उत्तरे आहेत तर काहीना उत्तरेच नाहीत किंवा प्रश्नचिन्ह आहे.या प्रश्नचिन्हाबाबत आशावादी राहिले पाहिजे.हे करताना आपण चुकीच्या दिशेने जाणार नाही याचीही जबाबदारी घेतली पाहिजे.आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून याही परिस्थितीत भविष्यकाळ नीट करण्यासाठी मी वर्तमान नीट हाताळेन याकडे लक्ष देण्याचा दृष्टीकोन हवा.
                         ताण प्रमाणात असेल तर चांगला.त्यांनी कार्यक्षमता वाढते,मोटीवेशन वाढते.पण ताण प्रमाणाबाहेर tवाढू द्यायचा नाही.WHO च्या नुसार ८०% आजार ताणामुळे होतात.आपला ताण गरजेपेक्षा जास्त वाढला आहे का हे ओळखता आले पाहिजे.चिडचिड वाढणे, छातीत धडधडणे असे काही होते का पहा. पीडीत ताण वाढला की लक्षणे वाढतात.आजारपण कमी करण्यासाठी ताण कमी करणे गरजेचे.यासाठी
                    १) विचारांच्या गुंत्याने ताण वाढतो. ताण घेऊन परिस्थिती बदलता येत नाही त्यामुळे नकारात्मक,भूतकाळ,भविष्यकाळ यांचे विचार न आणता वस्तुनिष्ठ विचार करून वर्तमानात राहावे.
                  २)  हवे असलेले विचार आणून विचाराला दिशा द्यायची.उत्तरे शोधा.तणाव नियोजनात मी किती पर्याय शोधले हे महत्वाचे.
                  ३) विचारांकडे त्रयस्थपणे पाहून विचारांचा स्वत:च्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही.
                  ४) कोणता विचार बरोबर कोणता चूक हे ओळखता आले पाहिजे.
                  ५) ध्यानाने हे सर्व शक्य होऊ शकते.ध्यान लगेच जमणार नाही त्यासाठी आधी प्राणायाम करावा. श्वासाकडे लक्ष द्यावे.श्वास घेतला,थांबला.श्वास सोडला,थांबला.ही जाणीव मनाला शांत करते.
                  ६)बरीच कामे  यांत्रिकपणे होत असतात.मग विचार यायला मन मोकळे राहते.तेच तेच विचार परत येतात.नको असलेल्या गोष्टी आठवतात.वाचणे,काहीतरी ऐकणे,एखादी कला असे मनाला चांगल्या गोष्टीत गुंतवल्यास निरर्थक विचार येत नाहीत.              
                   ७) विश्रांती,झोप हेही तितकेच महत्वाचे आहेत.
                   ८) पीडी हा बरा न होणारा आणि वाढत जाणारा आजार आहे असे आपल्या मेंदूत ठामपणे भरले असल्याने आजाराबाबत वेगळा विचार केला जात नाही.याऐवजी लक्षणे काबूत आणून जीवन सुसह्य होऊ शकते असा विचार करा.पीडी आहेच, पुढचे आयुष्य सोपे कसे करता येईल पहा.आजाराशी सामना करून आनंदी राहणाऱ्यांची उदाहरणे पाहून आशावादी व्हा.
       यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नाना उत्तरे देताना काही महत्वाचे मुद्दे चर्चेत आले.
                १)व्यायाम हा महत्वाचा.पण त्याचा अतिरेक नको.यात दमछाक करणारे,ताकद वाढवणारे,लवचिकता वाढवणारे व्यायाम असू द्या.स्वत:ला किती व्यायाम झेपतो हे समजायला हवे.व्यायामानंतर काहीच वाटले नाही तर कमी झाला,थकवा आल्यास जास्त झाला,छान वाटल्यास योग्य झाला.
                २) मणक्याची अलाइनमेंट योग्य राहू द्या.
                ३) पीडी हा आयुर्वेदानुसार वात विकार असल्याने कोणतीही गोष्ट शांतपणे करा.भराभर गोष्टी केल्याने ताण वाढतो.सर्व कामे इन्व्हालव्ह होऊन,मन लावून सातत्याने करा.
                ४)आहारात पालेभाज्या,घेवडा,शेवग्याच्या शेंगा, कच्च्या भाज्या असुद्या.रिफाइंड गोष्टी टाळा.
मेंदू आणि पोटाचे थेट कनेक्शन असल्याने पोटाचे आरोग्य नीट ठेवा.
                ५) पोटासाठी पवनमुक्तासन,भुजंगासन,अग्निसार करा.
प्रश्न संपतच नव्हते.वेळ खूप झाल्याने थांबावे लागले.
सर्वाना ऑक्टोबरचा संचारचा अंक देण्यात आला.उपस्थित नसणाऱ्याना पोस्टाने पाठवण्यात येईल.
                                         निवेदन
नोव्हेंबर महिन्यात सहल झाल्यामुळे सभा होणार नाही याची कृपया सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी.
डिसेंबर महिन्यातील सभा सोमवार ११ डिसेंबरला नर्मदा हॉल येथे होणार आहे. यापुढील सर्व सभा दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नर्मदा हॉल येथेच होतील.नेहमीप्रमाणे सभेची सूचना फोनवरून देण्यात येईल.
नर्मदा हॉलचा नकाशा सोबत देत आहे.
पत्ता : नर्मदा,८०६ B,प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४

           निवेदन
डिसेंबर महिन्यातील सभा सोमवार दि.११ डिसेंबरला नर्मदा हॉल येथे होणार आहे.
 डॉक्टर संजय गांधी ( MD ) हे 'मधुमेह,हृदयविकार आणि पार्किन्सन्स डिसीज' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
यापुढील सर्व सभा दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नर्मदा हॉल येथेच होतील.नेहमीप्रमाणे सभेची सूचना फोनवरून देण्यात येईल.
नर्मदा हॉलचा नकाशा सोबत देत आहे.
पत्ता : नर्मदा,८०६ B,प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
वेळ : दु.४ .०
         ११ डिसेंबर २०१७ सभावृत्त
                          पार्किन्सन्स मित्रमंडळाची ११ डिसेंबरची सभा नर्मदा या नव्या वास्तुत व्हायची होती.दिवंगत शुभार्थी चंद्रकांत दिवाणे यांचा मुलगा अतुल दिवाणे यांनी नवीन जागेचा नकाशा काढून त्याच्या प्रती काढून दिल्या होत्या. त्या सभासदांना नोव्हेंबरमध्येच पाठवल्या गेल्या.काही उत्साही शुभंकर सभेच्या दिवशी  जागा शोधण्यात वेळ जायला नको म्हणून आधीच जागा पाहून आले होते.सभेच्या ठिकाणी श्यामला शेंडे,आशा रेवणकर,रामचंद्र करमरकर,अरुंधती जोशी  यांनी लवकर जाऊन मंडळाचा बोर्ड लावला होता.नवीन जागेत प्रतिसाद मिळतो की नाही ही शंका ५०/६० सभासदांनी वेळेत येऊन निराधार ठरवली.नर्मदाच्या शुभांगी कुलकर्णी हवे नको पाहायला जातीने उभ्या होत्या.सर्वांनी चपला बाहेर काढायच्या होत्या. व्हरांड्यात सभासदांना बूट चपला काढणे सोपे जावे म्हणून  दोन खुर्च्या ठेवल्या होत्या.एकूणच वातावरणात सकारात्मक उर्जा होती.
                      नारायण कलबाग या ९४ वर्षाच्या शुभार्थीनी म्हटलेल्या प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.यानंतर नर्मदा हॉलच्या शुभांगी कुलकर्णी आणि वक्ते डॉक्टर संजय गांधी यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
                      शुभांगी कुलकर्णी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.त्या व त्यांचे सर्व कुटुंबीय विवेकानंद केंद्राचे काम करतात.या जागेत  पूर्वी  गुरुदेव रानडे यांची ध्यान कुटी असल्याने येथे कोणत्याही व्यावसायिक कार्यक्रमास जागा देत नसल्याचे सांगितले.जागेचे पावित्र्य राखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.आशा रेवणकर यांनी त्यांची ओळख करून दिली.
                    डॉक्टर गांधी यांची रामचंद्र करमरकर यांनी ओळख करून दिली.
                     डॉक्टरांनी मधुमेह असो रक्तदाब किंवा अशा तऱ्हेचा कोणत्याही आजाराची नोंद मातेच्या गर्भात असतानाच होते असे सांगत आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.टाईप १  आणि टाईप २  अशा मधुमेहाच्या प्रकारांची विस्ताराने माहिती सांगितली.मधुमेह होण्यात अनुवंशिकता हा एक भाग आहे. पण जीवनशैली योग्य ठेवून व्यायामाने तो लांबणीवर टाकता येतो.लठ्ठपणा,पोट सुटणे हे मधुमेहाला कारणीभूत असतात.डॉक्टर मधुमेह रुग्णाच्या कुटुंबियांना बोलवून त्यांचा मधुमेह लांबवण्यासाठी मार्गदर्शन करतात.'ब्रेकफास्ट विथ डॉक्टर' असा उपक्रम सुरु करून अचानक पेशंटच्या घरी जावून आहारावर नियंत्रण करण्यास मार्गदर्शन केले.विविध शिबिरे घेऊन आहार काय असावा याबाबत जागृती केली.योग,मेडीटेशनची शिबिरे घेतली.
                  मधुमेहाचा स्वमदत गट सुरु करून त्यांच्यासाठी विविध उपक्रम केले.सहली नेल्या.रामचंद्र करमरकर यांचा या सर्वात मोठ्ठा सहभाग होता.करमरकर यांनी कधी न सांगितलेली ही माहिती डॉक्टरांच्या व्याख्यानातून समजली.पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम करताना या अनुभवाचा नक्कीच उपयोग झाला.
                रक्तदाबाच्या काही गोळ्या सातत्याने घेतल्यास, लघवीसाठी घेतल्या जाणाऱ्या काही गोळ्याही सातत्याने घेतल्यास मधुमेह होऊ शकतो तसे पार्किन्सन्सच्या कोणत्या गोळ्यांचा असा परिणाम होत नाही.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
               चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
  निवेदन 
                     २०१८ या नवीन वर्षाची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने करत आहोत.हा कार्यक्रम सोमवार दिनांक ८ जानेवारीला असेल.
यापूर्वी डॉक्टर अमित करकरे हे डॉक्टर,समुपदेशक या नात्याने आले. यावेळी ते एका संवेदनशील कलाकाराच्या रुपात येणार आहेत.
फिरुनी नवी जन्मेन मी
सुधीर मोघे यांच्याबरोबरचे अनुभव,त्यांच्याच कविता व गीतांच्या सोबतीने डॉक्टर अमित करकरे सादर करतील.
 तिळगुळ समारंभा बरोबरच जानेवारीचा संचारचा अंकही देण्यात येईल.
स्मरणिकेसाठी लेखन, अनुभव द्यायचे असतील  तर ते आणावेत.त्याबरोबर स्वत:ची ओळख आणि फोटोही द्यावा.
वेळ : दुपारी ४.०
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४




                    





No comments:

Post a Comment