Saturday, 29 March 2014

हे जीवन सुंदर झाले. - - (प्रकरण ५ - पार्किन्सन्स मित्रमंडळाचा परीसस्पर्श)

                                            पार्किन्सन्स मित्रमंडळाचा परीसस्पर्श
(मे २०१२च्या माहेर अंकात 'पार्किन्सन्ससह आनंदाने जगूया' या प्रकाशीत लेखातील माहिती छापण्यास परवानगी दिल्याबद्दल माहेर व्यवस्थापनाचे आभार)

   'It is not the strongest of the species that survive not the most intelligent,but rather the one that is most adaptable to change' Charles Darwin
                      पार्किन्सन्स पेशंट (त्याला  पार्किन्सन्स मित्रमंडळात आम्ही शुभार्थी म्हणतो) बाबत तर बदलाला अनुकूल करून घेण हे खूप मोठ आव्हान असत.पार्किन्सन्स होण्यापूर्वीच जीवन आणि पार्किन्सन्स
 झाल्यानंतरच जीवन यात मोठी तफावत असते आम्ही ते अनुभवलंय.पार्किन्सन्स आजारांनी आमच्या घरात चोर पावलांनी प्रवेश केला,त्याला आता १५ वर्षे झाली.त्यातली साडेसात वर्षे पार्किन्सन्स मित्रमंडळाची ओळख होण्यापूर्वीची आणि साडेसात वर्षे पार्किन्सन्स मित्रमंडळाशी संपर्क आल्यानंतरची.आता मागे वळून पाहताना लक्षात येत त्या साडेसात वर्षातले आम्ही आणि आत्ताचे आम्ही यात जमीन अस्मानाचा फरक आहे.आजार तोच,पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या ओळखीने आमचे जीवनच बदलून गेल.किंबहुना पार्किन्सन्स मित्रमंडळ हेच आमच जीवन झाल.पुण्यात २००० सालापासून हे मित्रमंडळ अस्तित्वात होत.आणि आम्हाला त्याची माहितीही नव्हती,याच आता आश्चर्य वाटत.अस काय घडल नंतरच्या साडेसात वर्षात? तेच आपल्यापर्यंत पोचवायच आहे.याचबरोबर इतर पार्किन्सन्स ग्रस्तानाही  आमच्याप्रमाणे पार्किन्सन्ससह आनंदी जगण्यास प्रवृत्त करायचं आहे.त्यासाठी हा लेखनप्रपंच.
                       १५ वर्षापूर्वी माझ्या पतीना पार्किन्सन्स झाला आहे, अस न्युरोलोजीस्टनी शिक्कामोर्तब केल,
तेंव्हा त्यांच्या फक्त डाव्या हाताला कंप होता.ही सुरुवातीची अवस्था आहे, अस त्यांनी सांगितलं.'मोठ्या लोकांचा आजार,आता पुलंच्या रांगेत आलो,'असा विनोदान घेतलं.पण जसजसा दुसरा हात जबडाही थरथरायला लागला,समोरच्या माणसाना बोललेल समजेनास झाल,मग व्यक्तीना टाळण,फोन घेण टाळण सुरु झाल.छोट्या छोट्या कामाना वेळ लागू लागला.लक्षण वाढत गेली तसा आमचा धीरही खचत चालला.पार्किन्सन्सवरच लेखन वाचायला सुरुवात केली.आणि पहिल्यांदाच एका प्रतीथयश दैनिकात डॉक्टरांनी लिहिलेला लेख वाचनात आला.अलोपाथीच्या औषधांचे साईडइफेक्ट्स आणि पार्किन्सन्सच्या शेवटच्या अवस्थेच वर्णन इतक रसभरीत केला होत .त्याचा मनावर इतका परिणाम झाला,की पार्किन्सन्सवरच काही वाचणच सोडून दिल.माझ्या डोळ्यासंमोर सतत माझ्या पतीचा व्हीलचेअरवरचा,लाळ गळत आहे बोलता येत नाही,गलितगात्र भकास चेहरा यायचा.यातच ज्यांच्याकडे पार्किन्सन्स रुग्ण होते आणि आहेत अशा व्यक्तींनी,'अलोपाथीच्या नादाला लागू नका बर.रोगापेक्षा साईडइफेक्ट्स भयंकर असतात.'अस सांगितलं.आणि आम्ही अलोपाथी सोडून पार्किन्सन्सला घालवण्यासाठी कोण काय सांगतील ते इतर अनेक उपचार सुरु केले. पार्किन्सन्स हा बरा न होणारा आजार आहे, अस सांगणार्या विज्ञानापेक्षा आजार पूर्णपणे बरा करू शकतो असे सांगणारे उपचारकर्ते हवेसे वाटू लागले.आयुर्वेदिक पंचकर्म,रेकी प्राणिक हिलिंग,हाताला धान्य चिकटवण,सुज्योग,मशरुमच्या गोळ्या,नेचारोपांथी,अगदी २२ हजार रुपयांना लुबाडणारा वैदुसुद्धा.काहीवेळा उपचार खर्चिक असत.त्यातला फोलपणा मला पटलेला असे:पण याना ते उपचार हवे असत.हे नुकतेच निवृत्त झालेले होते.पार्किन्सन्समुळे मनाने खूप हळवे झाले होते.छोट्याछोट्या गोष्टीत भावनावश होऊन रडायला लागत.त्यांची अशी मानसिक अवस्था पाहून,त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो अस त्याना वाटायला नको म्हणून त्यांच्या समाधानासाठी आम्ही ते उपचार करायचो.यातच अक्युपंक्चर करणारे अलोपाथीचे डॉक्टर भेटले.अलोपाथीच्या औषधांचे दुष्परिणाम आणि अक्युपंक्चरची उपयुक्तता त्यांनी इतकी पटवली.की,सुरुवातीला तीन तास आणि नंतर एक तास अशी अडीच वर्षे हे उपचार घेतले.लाखांनी रुपये यासाठी खर्च झाले.प्रत्येक उपचारानंतर थोडा काळ बर वाटलं, अस वाटे.नंतर पुन्ह: 'येरे माझ्या मागल्या ' अस व्हायचं.अशात न्यूरोसर्जन होऊ घातलेले आमचे कौटुंबिक मित्र भेटले.त्यांनी घरी येऊन तपासल.आणि सरळ न्युरोलाजीस्टची अपोईनटमेन्ट घेतली.आणि अलोपाथीचे उपचार सुरु झाले.हे सर्व इतक्या विस्तारान सांगण्याच कारण पार्किन्सन्स मित्रमंडळाचा काम करताना आमच्या लक्षात आल.पार्किन्सन्सच निदान झाल्यावर अनेकजण अशा मृगजळामागे धावतात.आजकाल आसाद्य रोगावर रामबाण उपाय अस सांगणार्या,पूरक उपचार म्हणवणार्याच उदंड पीक माजल आहे.पार्किन्सन्सच शिक्कामोर्तब झाल्यावर मनान दुर्बल झालेले पेशंट आणि त्यांच्या कुटुंबीयावर अशा उपचार पद्धतीच्या मार्केटीन्गचा चटकन प्रभाव पडतो.
                   आम्ही अलोपाथी उपचार सुरु केले, तरी मनात साईड इफेक्ट्सचा भयगंड होता. पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या ओळखीनंतर मात्र ही पारीस्थिती बदलली.पार्किन्सन मित्रमंडळाची ओळख म्हणजेच मधुसुदन शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन यांचीच ओळख
                 शेंडे यांच्याशी प्रथम फोनवर बोलन झाल. त्यांनी लगेचच दुसर्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता भेटीला बोलावलं.पहिल्या भेटीतच शेंडे व त्यांची पत्नी शामला शेंडे यांच्याशी जवळीक निर्माण झाली.शेंडे याना १७ वर्षे(त्यावेळी.) पार्किन्सन्स असून,ते अजून स्वत:ची कामे स्वत: करतात.सुरुवातीपासून अलोपाथीची औषधे घेतात:पण साईडइफेक्टची भयानकता दिसत नाही,हे पाहून हे पाहून साईडइफेक्टबाबतचा कमी झाला.त्यांच्याकडे पार्किन्सन्सवर माहिती देणारी बरीच पुस्तके,मासिके,सीडीज आहेत.हे साहित्य मोफत पुरविण्याची त्यांची तळमळ,उत्साह,त्यांच आश्वासक व्यक्तिमत्व यांनी पिडीकडे सकारात्मक दृष्टीने पाह्ण्याच
बीज रोवल गेल.
                शरच्चंद्र पटवर्धन प्रथम शेंडे यांच्या घरी मिटींगमध्ये भेटले.१९९२ मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर त्यांनी बरच वाचन केल.तेंव्हापासून छापून आलेली मराठी इंग्रजीतील माहितीची कात्रण त्यांनी जपून ठेवली होती.ती आम्हाला वाचावयास मिळाली.पार्किन्सन्सविषयी न घाबरवणारी बरीच माहिती समजली.केअरगीव्हर म्हणून त्यांचा पत्नीला असलेला आधार आणि पत्नीचा पार्किन्सन्ससह आनंदी जगण्याचा प्रयत्न.माहिती इतर पार्किन्सन्सग्रास्तांपर्यंत पोचविण्याचा त्यांचा खटाटोप.यामुळे आम्ही प्रभावित झालो.केअरगीव्हर म्हणजे शुभंकर कसा असावा याचा वस्तुपाठच मिळाला.
 ही जोडगळी जीव तोडून काम करत होती पण प्रतिसाद मात्र हवा तसा मिळत नव्हता. सत्तरी ओलांडलेल्या या दोघांचा उत्साह आम्हालाही या कामात ओढण्यास कारणीभूत झाला.पुढील काळातही यांच्यातील सकारात्मक उर्जा आम्हाला कामाची उर्जा देत राहिली.
                   श्री शेंडे प्रकृतीचे कितीही चढउतार झाले तरी खचले निराश झाले असे दिसले नाहीत.डोक्याला खोक पडलीय टाके घातलेत तरी ते सभाना हजर.त्यांच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाला ते व्हीलचेअरवरून आलेले पाहून आम्हाला वाईट वाटलं होता. पण नंतर त्यांच्या घरी झालेल्या मिटींगला ते स्वत: चहाचा Tray हातात घेऊन कोणत्याही आधाराशिवाय आले.अमेरिकेला गेले तरी सर्व लक्ष मंडळाच्या कामाकडे.अमेरिकेहून लोक अनेक वस्तू घेऊन येतात.पण यांच्या बेगा मात्र पिडीवरील साहित्यांनी भरलेल्या.तिथही सपोर्टग्रुपना जाण, मित्रमंडळाच्या कामाची माहिती देण, हे असतच.ट्रीपमध्येही हे सर्वांच्या पुढे.तरुणाला लाजवणारा उत्साह.लोकसंग्रहही मोठा.त्याचा मंडळाला कसा उपयोग करून घेता येईल यासाठी धडपड.डॉक्टर विजय देव आणि विणा देव यांच्यासारखे वलयांकित, डॉक्टर अमित करकरे यांच्या सारखे  प्रसिद्ध होमिओपाथ, कोणत्याही अपेक्षेविना साध्या कार्यकर्त्यांसारखे पार्किन्सनन्सडेच्या कार्यक्रमात सामील झाले.रामचंद्र करमरकरांसारखा ज्यांच्याकडे कोणालाही पीडी नाही तरी आमच्यात सामील झालेला खंदा निस्पृह कार्यकर्ता पीडी ग्रुपची असेट अस ज्याला म्हणता येईल हेही शेंडेचच फाईंड 
                 श्री पटवर्धन या वयातही सायकलवर सर्वकडे  फिरतात.मिटिंग दुपारी तीनला असली तर आम्ही बंद गाडीतून आरामात येऊनही थकलेले.तर पटवर्धन मात्र सायकल चालवत येऊनही उत्साहानी कामाला लागलेले.आतापर्यंत जितक्यां म्हणून मिटिंग झाल्या त्या सर्वाना त्यांची १००% उपस्थिती.तीही सक्रीय'.कुठे कमी तिथ आम्ही' ही वृत्ती.ते सतत पुण्यातील आणि पुण्याबाहेरील शुभार्थीना फोनवरून कौन्सिलिंग करत असतात.ते फक्त त्यांच्या पत्नीचे शुभंकर नाहीत तर जोजो भेटेल पिडीग्रस्त त्यांचे शुभंकर आहेत.पीडी पेशंट स्वत:ही विचार करणार नाही इतका त्यांनी पेशंटच्या भूमिकेत जाऊन जगण्यातील बारीक सारीक बाबींचा विचार केलेला असतो.पार्किन्सन्सवरच चिकित्सकपणाने केलेलं वाचन त्याला असलेली अनुभवाची जोड,पिडीग्रस्तानी आनंदी राहावं यासाठीची धडपड या सर्वातून निर्माण झालेलं लेखन,पिडीवरील लिखाणात मोलाची भर घालणार आहे.हे निश्चित.
                   या दोघांमार्फत विविध मदतगटांनी एकत्र येऊन केलेल्या 'सेतू' शी संपर्क आला.डॉक्टर उल्हास लुकतुके,डॉक्टर माया तुळपुळ,यशोदा वाकणकर,अशी अनेक मंडळी संपर्कात आली.महिन्यातून एकदा होणार्या सेतूच्या मिटिंग मधून काम करण्याची उर्जा व प्रेरणा मिळून गेली.सेतुबरोबर 'सकाळ आरोग्य प्रदर्शनातला सहभाग वेळोवेळी त्यांच्या विविध उपक्रमातला सहभाग यातून सामजिक कार्यात झोकून देण म्हणजे काय असत हे समजल.आणि आमच्याही नकळत आम्ही पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कामात अधिकाधिक गुंतत गेलो.
                   मित्रमंडळाची कार्यक्षमता वाढवायची, तर मुळात लोकांपर्यंत मित्रमंडळाची  माहिती पोचवण गरजेच होत.यासाठी ११ एप्रिल हा पार्किन्सन्सदिन म्हणून जगभर साजरा केला जातो,त्यानिमित्त मेळावा घेण्याच ठरलं. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलन हॉल देऊ केला.पार्किन्सन्सविषयी लेख,मेळाव्याची निवेदन वृत्तपत्रात छापून आली.मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.तीनशे लोक उपस्थित होते.महत्वाच म्हणजे,मित्रमंडळाकरता काम करू इच्छिणारे अनेक हात पुढे आले.दोघानाही पीडी असलेले अनिल कुलकर्णी आणि डॉक्टर शिला कुलकर्णी हे जोडप,शेखर बर्वे,वसुधा बर्वे,जे.डी.कुलकर्णी,अंजली महाजन,विजयालक्ष्मि रेवणकर,श्री व सौ दिवाणे आणि विशेष म्हणजे ज्यांच्या घरात कोणालाही पार्किन्सन्स नाही,तरी मंडळाच्या कामाचा मोठा भार उचलणारे आम्हा सर्वांचे शुभंकर रामचंद्र करमरकर.या सर्वांमुळे कामाला वेग आला.हि सर्व माणसे मंडळाच्या कामाबरोबर वैयक्तिक आयुष्यातही जवळची झाली.नातेवाइकांपेक्षा या सर्वांशी फोनवर संपर्क सुरु झाला.यासर्व प्रक्रियेत पार्किन्सन्सला हाकलण्याचे प्रयत्न आम्ही विसरलो.मित्रमंडळाबरोबर पार्किन्सन्स आजारालाही आम्ही कधी मित्र बनवल ते  समजलच नाही.
                   पीडीबरोबर संगणकही आमचा मित्र झाला.मित्रमंडळाच्या कामात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी संगणकाचा उपयोग सतत झाल्याने या वयात आपल्याला संगणक जमणार नाही हा गंड कमी झाला.काही नवीन माहिती एकमेकाना पाठवण सुकर झाल.'We Move News','Northwest Parkinsans Group' च ऑनलाईन पाक्षिक.यातून पार्किन्सन्सबद्दल अध्ययावत माहिती समजत गेली.पार्किन्सन्स केअरगीव्हर ग्रुपमध्ये सामील झाल्याने पुण्यातीलच नाही तर जगभरातील पीडीग्रस्तांशी जवळीक निर्माण झाली.
                    मित्रमंडळाच काम करायला  लागल्यावर आणखी एक महत्वाची गोष्ट झाली.ती म्हणजे समाजाकडे पाहण्याचा आशावादी दृष्टीकोन निर्माण झाला.सारा समाज आत्मकेंद्री,व्यवहारी चंगळवादी झालाय, अस म्हटलं जात असल तरी आमचा अनुभव वेगळचं सांगत होता.चांगल्या कामाला मदतीचे हात आपोआप पुढे येतात.मित्रमंडळाच्या सभाना विनाशुल्क अश्विनी हॉल देणारे अरुण देवस्थळी,दर अमावस्येला मिळणारा मित्रमंडळ हॉल,डॉक्टर विविक लीमयेंचे नंदादीप हॉस्पिटल,चिंचवडच लोकमान्य हॉस्पिटल,पुना हॉस्पिटलच सुसज्ज प्रेक्षागृह आम्हाला सभांसाठी मोफत मिळत गेले.वृत्तपत्रातली बातमी वाचून विश्वासाने देणग्या देणारे भेटले: तसच इंग्रजीतील पुस्तक मराठीत भाषांतरीत करण्यासाठी मोठ्ठी देणगी देणार्या न्यूयॉर्कच्या सुधाताई कुलकर्णीसारख्या हितचिंतक भेटल्या. आमच्यावर विश्वास टाकणारी माणसे भेटल्याने आमच्या कामातला उत्साह वाढला आणि एकेक पैसा खर्च करताना ट्रस्टीशिपची भावनाही निर्माण झाली.
                  विविध कला आणि वैद्यकीय क्षेत्र याबाबत हेच म्हणता येईल.प्रोफेशानालीझम हा परवलीचा शब्द झाला असताना आमच्या वाट्याला मात्र या क्षेत्रातल्या विविध लोकांची चारीटीच आली.पुण्यातले प्रतिथयश न्युरोलोजीस्ट,आहारतद्न्य,फिजिओथेरपिस्ट,आयुर्वेद्तद्न्य,होमिओपाथ यासार्वानी विना मोबदला आपल्या अतिशय व्यग्र आयुष्यातून वेळ काढून त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून दिला.सुचित्रा दातेसार्ख्या ख्यातनाम भरतनाट्य नर्तिका,र्हूशिकेश पवारसारखा तरुण कथ्थकनर्तक,ड्रम थेरपी शिकवणारे झुबेन बलसारा,कविता नायर,कलोपाचाराचा वसा घेतलेले डॉक्टर शशिकांत करंदीकर,विकास कशाळकर या सर्वांमुळे पार्किन्सन्ससह आनंदी जगण्याच समाधान मिळाल
                  .काम चालू होत.पण सभाना उपस्थिती कमी असते असे लक्षात आले.यातून घरी भेटी देऊन संपर्क वाढवण गरजेच आहे, हे लक्षात आले.त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत मंडळाकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत,हे जाणून घेणही महत्वाच वाटलं.त्यानिमित्ताने एक प्रश्नावली तयार केली.आणि माहिती गोळा करण्याचे कामही सुरु झाले.आतापर्यंत मंडळाचे पुण्यातील २८० आणि बाहेरगावचे ८० सभासद आहेत.सकाळ मुक्तपीठमधील जे.डी.कुलकर्णींचे आणि,फमिली डॉक्टरमधील पटवर्धन यांचा लेख,आकाशवाणीवरील डॉक्टर कोठारी यांच्या समवेत अनिल कुलकर्णींची मित्रमंडळाची माहिती सांगणारी मुलाखत यामुळे पुण्यातील तसेच परगावचे अनेक पेशंट सामील झाले.मित्रमंडळाच सभासद होण्यासाठी कोणतीही वर्गणी घेतली जात नाही.आमच्याशी संपर्कात आलेले आमचे सभासद होतात.या सर्वाना भेटी देण तस कष्टांच,जिकिरीच तरीही गरजेच होत.एकदा नव्हे तर पुनःपुन्हा भेटत राहण गरजेच होत.सर्वांनी मिळून हे काम जमेल तस करत राहायचं ठरल.
                   तर मंडळाच्या कामातील सक्रीय सहभागही सुरु झाला.श्रद्धा भावे आणि पद्माकर आठवले ही उदाहरण याबाब
आम्ही दोघ एकत्र भेटीला जाऊ लागलो.त्यातून पेशंट न येण्यामागे आर्थिक शारीरिक हतबलता,वेळ नसण, सोबत नसण अशा अनेक अडचणी लक्षात आल्या.बर्याच जणांची घर दुसर्या तिसर्या मजल्यावर आहेत लिफ्टची सोय नाही.काही जणांना औदासिन,आत्मविश्वासाचा अभाव,मित्रमंडळात ज्याना पार्किन्सन्स होऊन बरेच दिवस झाले आहेत अश्यांची अवस्था पाहून अधिक नैराश्य येईल ही भीती सभाना उपस्थित राहण्यास परावृत्त करीत होती.चौदा वर्षे पीडी असूनही माझे पती कार ड्राईव्ह करत भेटीला येतात.हे पाहून त्याना दिलासा मिळे.आमच्या अनुभवावरून मित्रमंडळाच्या सभाना येण्यास ते प्रवृत्त होत.यातून सभाना येणार्यांची संख्या वाढत गेली.काहींचात सांगता येतील जे सोबत मिळाली तर येऊ शकणार होते अशाना सोबत मिळवून देण सुरु झाल.औंध,हडपसर,चिंचवड,पिंपरी,कात्रज,धनकवडी अशा ठिकाणी भेटीला गेल्यावर या लोकाना सभाना येण किती कष्टांच,वेळखाऊ आणि आर्थिक बोजा वाढवणार आहे हे लक्षात आले.तरीही यातले काही जण नियमाने येतात.त्याच कौतुक वाटलं.आणि कार्यक्रम करायचा म्हणून न करता,तो उत्तमच असला पाहिजे याच सतत भान राहील.
                   काही जणाना मात्र सभांना येण अशक्यच होत.परगावच्या लोकांसाठीही काहीतरी कारण आवश्यक होत.यातून लिखित साहित्याचा पर्याय महत्वाचा वाटला.दृक्श्राव्य फितीचा पर्यायही आहेच;पण तो खर्चिक व सर्वाना वापरता येईलच अस नाही.त्यामुळे लिखित साहित्यावर भर द्यायच ठरल.प्रत्येक पार्कीन्सन्सदिनी आता स्मरणिका प्रकाशीत केली जाते.तज्ञांचे लेख,पार्किन्सन्सवर मात करून आनंदान जगणार्या शुभार्थीचे, शुभंकरांचे अनुभव प्रेरणादायी ठरत आहेत.अमेरिकास्थित सुधा कुलकर्णी यांच्या मदतीतून दोन इंग्रजी पुस्तकांचे मराठीत भाषांतर झाले आहे. शेखर बर्वे यांच्या पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत या पुस्तकाची निर्मिती झाली.
                   परगावच्या लोकाना यातून मित्रमंडळाच कार्यांनी कार्यकर्ते यांचा परिचय झाला.प्रत्यक्ष येऊ शकत नसले, तरी फोनवरून पत्रातून ते संपर्क साधत राहतात.अलिबागचे म्हात्रे,नागपूरची मीनल दशपुत्र,नाशिकच्या पुष्पा नागले,नांदेडचे प्राध्यापक खानापुरे,कोल्हापूरचे मिरजकर अशी सतत संपर्कात राहणारी नावे सांगता येतील.
                   व्यक्तिश:: आम्हाला या भेटी देण्याने खूप समृद्ध केल.शुभंकर,शुभार्थी कसा असावा, कसा नसावां याचा वस्तुपाठ मिळत गेला.आम्हाला यातून आत्मपरीक्षण करायची सवय लागली.चाळीसाव्या वर्षी पीडी झालेले केशव महाजन आणि मुख्याध्यापिका असलेल्या त्यांच्या पत्नी अंजली महाजन.१९ वर्षाची मुलगी कन्सरनी गेली हे दु:ख पचवून पीडीसह आनंदी राहण्याची त्यांची धडपड पाहून आम्ही अवाक झालो.४५ वर्षाचा सेलेबल पाल्सी झालेला मुलगा आणि हालचालीवर बंधने असलेली पीडीग्रस्त पत्नी या दोघांच करत हसतमुखाने वावरणार्या गोगटेना पाहून आम्ही प्रभावित झालो.बँकेतून मोठ्या पदावरून निवृत्त झालेले विद्याधर पटवर्धन ८० व्या वर्षी स्केचीस,मोठीमोठी पेंटिंग्ज करतात.संगणकावर बँकाना उपयोगी माहिती देणारी मोफत वेबसाईट तयार करतात.त्यांच्या चेहर्यावरचे सात्विक भाव आणि आत्मिक समाधान पाहून आम्हाला  सकारात्मक उर्जा मिळाली.हालचालीवर अनेक बंधन आली. पतीपत्नी दोघानाही पीडी आहे; परंतु हार न मांनता ६५ वर्षानंतर चित्रकला शिकून ताठरलेल्या बोटात आणि मरगळलेल्या मनात चैतन्य आणणार्या डॉक्टर शीलाताई कुलकर्णींची चित्रकला पाहून ११ एप्रिलच्या पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यात शुभार्थीच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरवण्याचे सुचले.आणि त्याला भरभरून प्रतिसादही मिळाला.कल्पना शिरनामे,कमलाकर झेंडे अशी उत्तम चित्रकला करणारी अनेक रत्ने समोर आली.विणकाम, भरतकाम,फोटोग्राफी अशा कलाकृती मांडल्या गेल्या.हे प्रदर्शन इतर शुभार्थीना प्रेरणा देणारे ठरले.ही काही उदाहरण सांगितली.आम्ही जवळ  जवळ १५० शुभार्थीच्या घरी गेलो.प्रत्यक व्यक्तीचा अनुभव वेगळा. समस्या वेगळी.
                   प्रत्येक घरभेटीत आणि मंडळाच्या सभात माझ्या पतीना वैयक्तिक सामुपदेशनातून जो आनंद मिळतो,तो त्यांचा स्वत:चा आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद वाढवणारा ठरतो.आधी केल मग सांगितलं,असा त्यांच स्वानुभावाधारीत मार्गदर्शन असल्यान शुभार्थीना दिलासा देणार ठरत.ते स्वत: पीडीच्या गोळ्याइतकच नियमितपणे हास्यक्लब,ओंकार,प्राणायाम करतात.त्यांच आनंदी असण तर पाहूनच इतराना समजत.प्रत्येक नवीन भेटणार्या शुभार्थीच्या वाट्याला आमची आधीची साडेसात वर्षे न येता नंतरची साडेसात वर्षे यावीत,यासाठी आमची धडपड असते.
                    आमच्याप्रमाणे मित्रमंडळाच्या सहभागामुळे जीवन सुखमय झालेली अनेक उदाहरण आहेत.त्यांच्याकडे पाहून  मित्रमंडळाच शुभार्थीच शारीरिक, मानसिक,भावनिक,सामाजिक आरोग्य सुधारण,आत्मविश्वास वाढवण,आशावादी द्र्ष्टीकोन अंगी बाणवण हे उद्दिष्ट पुष्कळशा अंशी पूर्ण होत असल्याची जाणीव होते.स्वत:ची ओळख सांगताना भावनावश होऊन बोलू न शकणारे सिधये आता आत्मविश्वासाने अभेत बोलतात,सुचना करतात.पेशंटना सभेसाठी फोनवरून निमंत्रण देण्याच काम स्वत:हून स्वीकारतात.पीडीच शिक्कामोर्तब चाळीशीतच झाल्यावर ढसाढसा रडणारी,नैराश्यान घेरलेली प्रज्ञा जोशी कोथरूड गटाची फेसिलीटेटर म्हणून हौसेने काम करते.मित्रमंडळाच्या सर्व उपक्रमात कोणताही काम करायला तयार असते.आत्मविश्वास गमावलेले व्ही.बी.जोशी डान्स क्लाससाठी नवीन घेतलेल्या Nano मधून येतात.शुभार्थीच्या घरी  भेटी देतात.सह्कारनगरचे फासिलीटेटर म्हणून काम पहातात.ही नमुन्यादाखल काही उदाहरणे.हे सर्व चित्र आशादायी असले, तरी मर्यादित लोकांपुरते आहे.याची जाणीव देणारे.पुण्यातील विविध भागात, विविध गावात आम्हाला अजून पोचायचे आहे.अजून भरपूर काम आहे चला कामाला लागा अस सुचविणार आहे.
                      शुभार्थीच्या समस्या सारख्या असल्या तरी त्यातही काहींच्या जास्त समान. उदाहरणार्थ लहान वयात पीडी झालेल्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या.अशा लोकांची आम्ही सांगड घालून देऊ शकलो.लहान वयात पीडी झालेली नागपूरची मीनल आणि पुण्यातील आश्विनी आता सख्या मैत्रिणी झालेत.फोनवरून अनुभव शेअर करत असतात.काही पुण्याबाहेरील पण जवळ राहणार्यांची आम्ही सांगड घालून देऊ शकलो.सातार्याच्या कुरकुटे आणि उम्ब्रजच्या कांबळे आता एकमेकाना भेटू शकतात.
                        
                     पार्किन्सन्स मित्रमंडळान आम्हा दोघाना कामाला लावलं.हा आमचा सर्वात मोठा फायदा.आम्ही दोघ माणसात रमणारी, पण आवडीनिवडी कामाची क्षेत्र म्हणजे समांतर रेषाच.पण मित्रमंडळाच्या कामामुळे एकत्र येऊ न शकणार्या समांतर रेषा एकत्र आल्या.मित्रमंडळान आम्हाला एक लक्ष दिल.प्रतिकुलतेला अनुकुलतेत बदलण्याच बळ दिल.आमची सेकंड इनिंग अर्थपूर्ण केली.
                        पार्किन्सन्स मित्रमंडळामुळे शुभार्थी,शुभांकरांचे वैयक्तिक फायदे झाले,तसेच वैद्यकीय क्षेत्रासाठीही मुंगीचा वाटा म्हणता येईल असा हातभार लागला.सध्या तरी पार्किन्सन्स मित्रमंडळा एक प्रयोगशाळा झाली आहे.डी..वाय.पाटील फिजिओथेरपि कॉलेज,संचेती हॉस्पिटल इथून फिजिओथेरपि पदव्युत्तर शिक्षण घेणारे,भारती विद्यापीठाच्या स्पीच थेरपी विभागाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे,विद्यार्थी त्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी न्युरोलोजीस्ट मार्फत आमच्याकडे येतात.त्याना विनासायास एकत्र  पेशंट उपलब्ध झाल्याने ते खुश असतात आणि आपल्या घरी येऊन शिकवणारे शिक्षक मिळाल्याने आणि प्रयोगासाठी आपला उपयोग होणार,या भावनेने आमचे शुभार्थीही खुश असतात.
                    पार्किन्सन्स मित्रमंडळासारख्या स्व-मदत गटाची उपयुक्तता आता सर्वाना पटत आहे.न्युरोलाजीस्टही आवर्जून पेशटना मित्रमंडळाशी संपर्क साधावयास सांगतात.एका न्युरोलोजीस्टनी मित्रमंडळात सहभागी असणार्यांचा पीडी आटोक्यात असल्याच सांगितलं.तेंव्हा आम्ही सुखावलो.पण लगेच अजून खूप जणांपर्यंत पोचायचं आहे, याची जाणीवही झाली.यासाठी मदतीचे हात हवेत.सर्वात मोठी गरज लोकांच्या घरी जाऊन भेटी देण आणि सभाना येण्यासाठी शुभार्थीना सोबत देण ही आहे.डाक्युमेंटरी करण,दूरचीत्रवाणीमार्फत लोकांपर्यंत पोचण,दृक्श्राव्य फिती करण,विविध गावात स्वमदत गट तयार करण अशी बरीच काम अजून बाकी आहेत.त्यासाठी आर्थिक, सेवा स्वरुपात, तांत्रिक स्वरूपात, जागेच्या स्वरूपात  मदत करू इच्छिणार्यांचे स्वागत आहे.
                     आतापर्यंत अनेक मदतीचे हात आले यापुढेही येतील याची खात्री आहे.

                  
                  

Saturday, 22 March 2014

पार्किन्सन्स सुपरस्टार

                                               पार्किन्सन्स सुपरस्टार


                                  एलिझाबेथ बर्डना ( Elizabeth Burd ) नशनल पार्किन्सन्स कमिटीतर्फे 'पार्किन्सन्स सुपरस्टार ' हा किताब देण्यात आला. पीडी समुदायासाठी विशेष काम करणार्याना हा पुरस्कार दिला जातो.
योगा शिक्षक असलेल्या एलिझाबेथने पीडी झालेल्यांसाठी योगाचा विशेष कार्यक्रम तयार केला.२००६ पासून ती हे काम करत आहे.रुग्णांवरझालेला सकारात्मक परिणाम पाहून न्युरोलोजीस्ट तिच्या कडे पीडी पेशंट पाठवतात.योगामुळे पार्किन्सन्सच्या वाढीवर नियंत्रण आणता येते.असा अनुभव आला.ध्यान करताना अनेकांचा कंप कमी होतो.काहींचा तर पूर्ण थांबतो.आता तिच्या हाताखाली दोन सहाय्यक आहेत.समुहात, खाजगी ,आणि शबिरे घेऊन योगा शिकवायचे काम करते.South Portlandd येथील मेडीकली ओरिएन्टड जिम मध्ये ती योग  वर्ग घेते.पेशंट च्या सकारात्मक प्रतिसादामुळे तिचा उत्साह वाढला आहे.

Thursday, 6 March 2014

दस्तावेज

               (या पत्राला उत्तर आले असते तर कदाचित पार्किन्सन्स स्वमदत काढावा असे पाटवर्धनाना वाटले नसते.)

                                                                                                                                                                                                                  ७,तपोभूमी  सोसायटी,दत्तवाडी,
पुणे,४११०३०
२७/७/९९

स.न.वि.वि.
दैनिक नवाकाळच्या ६ जूनच्या  अंकातील मुलाखती संदर्भात हे पत्र लिहित आहे.
माझी पत्नी सौ.शुभलक्ष्मी ही पार्किन्सन्स डीसिजची पेशंट आहे. वय ५७ वर्षे.निदान ४ जून १९९२ रोजी झाले.सध्या डॉक्टर आनंद पटवर्धन यांची औषधयोजना चालू आहे.
१)'पार्किन्सन्स डीसिज फाउंडेशन ऑफ इंडिया 'चा संपूर्ण पत्ता - सभासदत्वाची वर्गणीरुपये पाचशे चेकने पाठविण्यासाठी (चेक चालेल का मनीऑर्डर हवी तेही कृपया कळवावे.
२)पीडी संबंधात आपली जी त्रैमासिके,प्रकाशन,लेखइ.असतील तीही कृपया पाठवावीत.त्यासाठी किती रक्कम जास्त पाठवावी लागेल हेही कृपया कळवावे.
३)शस्त्रक्रियेचा खर्च यापुढे जास्तीतजास्त बावीस हजार रुपये (२२०००रुपये )ही मध्यमवर्गीय रुग्णाच्या दृष्टीनेसुद्धा दिलासा देणारी बातमी आहे.(मुलाखतीत त्या परिच्छेदाच्या मथळ्यात खर्च २२००रु.( बावीसशे छापल गेल आहे!)
४)पीडी संबंधात पुणे शहरात रुग्ण सहाय्य गात (Support groups) कार्यरत आहेत काय?त्यासंबंधात आपल्याकडे काही माहिती असल्यास कृपया कळवावे.
मी आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे.
धन्यवाद
आपला
शरच्चंद्र भा. पटवर्धन
प्रति
डॉक्टर मोहित भट्ट
जसलोक हॉस्पिटल
मुंबई,महाराष्ट्र.
      
 (या निवेदनाने पार्किन्सन्स मित्रमंडळाचा बीज रोवल गेल.आणि पुढील इतिहास घडला.)

 दिनांक ६ ओगस्ट २००० रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात या निवेदनाच्या २०० प्रती वाटल्या.

                                                 निवेदन

     पार्किन्सन्स डिसीज (Parkinsans Disease) अथवा कंपवात/वातकंप या रोगाने ग्रस्त असणार्या रुग्णांचा आपापसात परस्पर संपर्क आणि सहाय्य यासाठी पार्किन्सन्स रुग्णमित्रमंडळ सुरु करण्याचा प्रयत्न आहे.या रोगासंबंधी आणि नवनवीन उपचारासंबंधी माहिती रुग्णांना आणि रुग्णमित्राना व्हावी असा प्रयत्न करुया.
      एका पोस्टकार्डावर रुग्णाचे पूर्ण नाव,पत्ता,उपलब्धअसल्यास टेलिफोन नंबर,रुग्णाशी नाते ही माहिती कृपया पुढील पत्त्यावर पाठवावी.
     शरच्चंद्र भास्कर पटवर्धन,७ तपोभूमी सोसायटी,दत्तवाडी,पुणे ४११०३० टेलिफोन नंबर ४३३१४३६
टीप : आता  टेलिफोन नंबर२४३३१४३६ झाला आहे.

                                        पार्किन्सन्स रुग्णमित्रमंडळ
                                        पहिली मिटिंग २२- १०- २०००
                                   मित्रहो मी आपले सर्वांचे स्वागत करतो.
 I hope everybody understand Marathi. Some people may not be able to speak Marathi fluently but hopefully .they understand it.
                    
    आजच्या आपल्या भेटीमधून आपल्याला एक टक्का जरी फायदा झाला तरी वाईट नाही.एक आकड्याच महत्व - एकदा लहान दिसत असला तरी तास कमी नाही.एका मतामुळे सरकार पडत.एका धावेमुळे संघ सामना हरतो.एक टक्क्याच्या फरकामुळे निराशावादी दृष्टीकोन आशावादी बनू शकतो.तेंव्हा सर्वांना ही दिवाळी आणि नवीन वर्ष अधिक समृद्धीच - भरभराटीच,अधिक आशावादी दृष्टिकोनाच जावो.मग ते अधिक आनंददायी असेल.
    आपण सार्वजण पार्किन्सन्स रुग्णमित्रमंडळParkinson's Patient Friends' Circle चालू करीत आहोत.हा जगन्नाथाचा रथ आहे,सार्‍यांनी मिळून ओढायचा आहे.गोवर्धन पर्वत आहे,सार्‍यांनी मिळून उचलायचा आहे.
सार्‍यांच्या सहकार्याची सहभागाची अपेक्षा आहे.
       या मित्रमंडळाबाबतची पार्श्वभूमी आणि माझ्या कल्पना मी आपल्यासमोर मांडतो.कुणाचे काही वेगळे विचार असतील त्याबाबतही आपण चर्चा करू शकू.
       मी अस सुचवू इच्छितो आहे की किमान तीनचार मासिक बैठका आपण अध्यक्ष,उपाध्य्क्ष,घटना अशा गोष्टीचा विचार न करता आपण नियमितपणे एकत्र येऊया,भेटूया.बोलूया.अशा बैठकींचा आपल्याला कसा किती फायदा होतो हे पाहूया.मग या गोष्टींचा विचात करुया.तोपर्यंत मी तात्पुरता सेक्रेटरी म्हणून काम पाहतो आहेच.
       त्यामध्ये एक वेगळा विचारपण आहे.आज कदाचित कुणी धनकवडीहून येतो.कुणी येरवडा-बंडगार्डन भागातून,कुणी पौडरस्ता-वनाझ भागातून येतो.त्याना इकडे येण कडची दूर म्हणून गैरसोयीच वाटत असेल.तर,जर आणि जेंव्हा त्या भागातले चार-सहा -दहा सभासद जमतील तर त्यांनी त्यांच्या सोयीन,त्यात्या भागात अस रुग्णमित्रमंडळ सुरु कराव.आणि आपण एकमेकांच्या संपर्कातरहाव.
     एका गृहस्थांनी मला फोनवर विचारलं होत की या सभासदत्वाची वर्गणी किती? या संदर्भात मी सुचवू इच्छीतो की सध्या आपण काहीच वर्गणी घ्यायची नाही.आपल्यापैकी काहीजण आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असतील त्याना वर्षाला हजारबाराशे वर्गणीही जड वाटणार नाही.काहीना वर्षाचे शंभर रुपयेही जास्तीचा बोजा 
वाटू शकतील.कारण आपल्या औषधांचा खर्चही तसा थोडाथोडका नसतो.आणि तो वाढतच असतो.म्हणून मी अस सुचवितो आहे की आपल्या मनात वर्गणी देण्याची इच्छाअसेल तर ती रक्कम आपण बाजूला ठेवा.आपल्याजवळच पण बाजूला ठेवा.जर औषधांच्या दरमहा खर्चात काही बचत होते आहे अस होऊ शकल - तसा प्रयत्न चालू आहे .- तर ती बचत झालेली रक्कम बाजूला ठेवा.पुढे कदाचित जरूर पडली तर त्याचा उपयोग करता येईल काटे पाहूया.कारण रुग्णाच हित ही प्रथम प्राधान्याची बाब आहे.म्हणजे आपण आपलच
सार्‍यांच हित पाहणार आहोत.




Wednesday, 5 March 2014

हे जीवन सुंदर झाले. - ( प्रकरण ४- पार्किन्सन्स मित्रमंडळ - एक स्वमदतगट)

'  Longest  journey start with single step'

अनेक समाजहिताच्या संस्था स्वमदगट यांचे बीज वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावरच पेरले जाते.आणि हळूहळू त्यामध्ये समदु:खी,समविचारी व्यक्ती एकत्र येतात.संस्था मोठी होत जाते.पार्किन्सन्स मित्रमंडळ या स्वमदत गटाची सुरुवातही अशीच वैयक्तिक प्रयत्नातून झाली.इथ आधी स्वमदतगट ही संकल्पना समजून घेऊ.

स्वमदतगट म्हणजे काय?
              
एकमेकाना भेटून  अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि व त्यातून शिकाण्याची इच्छा  असणा-या  समान समस्येनी ग्रस्त व्यक्तींचा गट असे ढोबळमानाने स्वमदत गटाबद्दल म्हणता येईल यात घटस्फोट,व्यसनाधीनता,सिंगल पेरेन्ट अशा सामाजिक समस्या असतील किंवा कर्करोग,एपिलेप्सी पार्किन्सन असे शारीरिक आजार असतील.
           
कोणत्याही शारीरिक आजारावर डॉक्टर उपचार करतात.पण रुग्णानीही काही धडपड केली पाहिजे.ही धडपड म्हणजे स्वमदत . २१ जून २००८ च्या साप्ताहिक  सकाळच्या अंकात विविध स्वमदत गटांची माहिती आली होती.त्यात डॉक्टर उल्हास लुकतुके यांनी स्वमदतीबद्दल केलेले गमतीशीर विवेचन आहे.

'आपल्याला दोरा हवा असतो.तो आपण रिळावर गुंडाळून ठेवतो.जेंव्हा पाहिजे तेंव्हा रिळातून पाहिजे तेवढाच दोरा घेतो.तो टाके घालण्यासाठी वापरतो.पण हाच दोरा मोकळा करून ठेवला तर त्याचा गुंता होईल. गुंता झाला तर तो आपल्याला सोडवत बसावा लागेल. म्हणजे त्या दोर्‍याची आपल्याला मदत होण्याऐवजी अडचणच होईल. ही अडचण होऊ द्यायची नसेल तर आपल्याला दोरा कसा बाळगावा. तो कसा वापरावा. रीळ म्हणजे काय? ते कसे वापरावे,शिवण म्हणजे काय ते कसे करावे,हे सगळे माहित पाहिजे.याचाच अर्थ दोर्‍याचा गुंता नको असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. त्याचप्रमाणे मनाची एखादी अडचण नको असेल तर मनाचा स्वभाव,मनोव्यापार माहित पाहिजे. हे सर्व माहित करून घेणे म्हणजे स्वमदत'.
         
अस स्वमदतीच तंत्र समजलेले एकत्र येतात. स्वत:च्या समस्या,अनुभव यांची देवाण घेवाण करतात एकमेकाला आधार देतात. अस नियमितपणे भेटण्यातून स्वमदतगटाची निर्मिती होते.थोडक्यात काय तर' आपले आपण उभे रहा,बोलून टाका,मोकळे व्हा,करून पहा येत चला,याच संयोजन करणारा गट म्हणजे स्वमदतगट'
             
डॉक्टर राजेंद्र बडवे यांच्या मते "स्वमदत गट  ही जगभरात शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली गोष्ट आहे. स्वमदत गटामुळे रुग्णांचे जीवनमान ( क्वालिटी ऑफ लाईफ) तर उंचावतेच.पण आयुष्यमानही वाढते."
          
कॅन्सर माझा सांगाती या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरविंद बावडेकर अशा गटाला."कॉम्रेडशिप इन डीसट्रेस"(comradeship in distres) अस म्हणतात.                 

पार्किन्सन्स मित्रमंडळ थोडाफार इतिहास
             
अशाच एका धडपड्या व्यक्तीच्या म्हणजे शरच्चंद्र पटवर्धन यांच्या पत्नीला ४ जून १९९२ रोजी पार्किन्सन्सच निदान झाल.'' पार्किन्सन्स मित्रमंडळ थोडाफार इतिहास या टिपणात ही धडपड त्यांनी शब्दबद्ध केली.त्याच आधारे पुढील इतिहास.
           
एकीकडे पटवर्धनांची पार्किन्सन्सबाबत  माहिती मिळवण्याची धडपड सुरु झाली.परिचयातले आजाराचे रुग्ण,वृत्तपत्रातून,मासिकातून येणारे लेख,ग्रंथालयातून आणलेली पुस्तके ही माहितीची साधने होती. पण ती अपुरी होती कारण वृत्तपत्रातील माहिती मिळती जुळती नसायची. आणि इंग्रजी पुस्तकातला मजकूर अपरिचित वैद्यकीय शब्दामुळे.अनाकलनीय वाटायचा.
             
दुसरीकडे फॅमीली फिजीशियनचे होमिओपॅथीचे उपचार,योगासने व्यायाम हे सुरु होते. पार्किन्सन्स बर्‍यापैकी आटोक्यात होता. अशक्तपणा मात्र होता.
        
 दरम्यान  मे/जून १९९७च्या दरम्यान पार्किन्सन्स झालेल्या पु.ल.देशपांडे यांच्यावर अमेरिकेत शस्त्रक्रिया झाली. शतायुशीच्या दिवाळी अंकात याबद्दल सविस्तर लेख आला. सर्जरी करावी का असा विचार आला पण तो टप्पा अजून नाही असे तज्ञांकडून समजले. १९९८ नंतर इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळू लागली
           
२००० पर्यन्त पत्नीला लीव्होडोपा सुरु करण्याची गरज निर्माण झाली
        
६ जून १९९९ च्या दैनिक नवाकाळच्या अंकात डॉक्टर मोहित भट यांची मुलाखत होती. त्यात पार्किन्सन्स डिसीज फौंडेशनची माहिती होती. याची आजीव सदस्य फी ५०० रुपये असल्याचीही  माहिती होती.
पटवर्धनांनी लगेच पत्र लिहून कोणत्या पत्त्यावर पैसे पाठवायचे आणि असा सहाय्य गट पुण्यात आहे का अशी विचारणा केली. पण उत्तर नाही आले. पुण्यात असा गट हवा या विचाराला मात्र चालना मिळाली. अपना हात जगन्नाथ म्हणत स्वत:च कामाला सुरुवात केली.
          
६ ऑगष्ट २००० मध्ये एका रक्तदान शिबिरात पार्किन्सन्स मदत गटासंबंधी निवेदन वाटले. याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण टाइम्सच्या अविनाश ठोंबरे यांनी संपर्क साधला. आणि एक लेख तयार करून ९ ऑक्टोबर २०००च्या टाईम्स ऑफ इंडियाच्या अंकात प्रसिद्ध केला. लेख वाचून १४/१५ जणांनी फोनवर चौकशी केली. २२ऑक्टोबर२००० रोजी श्री पटवर्धन यांच्या घरीच पहिली सभा झाली. १५ जण उपस्थित होते.त्या सभेतच पार्किन्सन्स रुग्ण मित्रमंडळाची स्थापना झाली. जून २००० पर्यन्त सभा पटवर्धन यांच्या घरीच होत.दुसरी मिटिंग १९ नोव्हेंबर,उपस्थिती १७ तिसरी १७ डिसेंबर उपस्थिती १४ असा प्रतिसाद अत्यल्पच होता.तरीही बातमी वाचून तुरळक फोन येत.परगावचे लोक भेटून जात.घरभेटीही होत.सभासद संख्या ४० पर्यंत गेली.परंतु परगावचे,शय्यस्थ,बरोबर कोणी येण्याजोगे नाही असेच वीस होते.यातच कोणी गावाला गेले,पाहुणे आले, प्रकृती ठीक नाही अशा कारणांनी मिटींगला येणार्यांची संख्या घटतच होती.
       
व्याख्यानासाठी बाहेरचे वक्ते आणायचा प्रयत्न झाला.डॉक्टर परळीकर यांचे पार्किन्सन्स आणि डिप्रेशन या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.ऑक्टोबर२००१ ते डिसेंबर२००१ पर्यंत पटवर्धनांच्या  आजारपणामुळे सभा होऊ शकल्या नाहीत.२७ जानेवारी २००२ मध्ये राजाराम अय्यर आणि झुबीन बलसारा(ड्रमर) यांनी मुझिक थेरपीबद्दल माहिती सांगितली.पण ७ आणि ११ अशी उपस्थिती होती त्यामुळे बाहेरचे वक्ते बोलावणे सोयीचे नव्हते.
        
मध्यंतरीच्या काळात पुण्यात स्वमदत गट आहे का हा शोध चालूच होता.राजू देवस्थळी (यांचे वडील पार्किन्सन्स रुग्ण होते.) आणि आशा आणि विजयकुमार सरदेसाई हे दांपत्य वैयक्तिक पातळीवर पार्कीन्सन्स रुग्णांना मदत करत होते.विजयकुमार याना २००१ पर्यंत पार्किन्सन्स होऊन २४ वर्षे झाली होती.संपर्कात येणार्या पेशंटना माहिती सांगणे,धीर देणे,मार्गदर्शन करणे या गोष्टी ते करत.अमेरिकन पार्किन्सन्स डिसीज असोशिएशन (APDA) च्या अनेक माहितीपर पुस्तिका त्यांच्यामार्फत पेशंटांना उपलब्ध होत.देवस्थळी आणि सरदेसाई मार्च २००१ मध्ये मंडळात सामील झाले.हा जगन्नाथाचा रथ आहे.अनेकांची ताकद हा ओढण्यासाठी हवी अशी पटवर्धन यांची भूमिका होती.
           
30 जून २००२ ला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलतर्फे पार्किन्सन्स संबंधी एक चर्चासत्र आयोजित केले होते. मित्रमंडळाचे सभासद हजर होते आणि इतर सुमारे १०० शुभार्थी शुभंकर  होते.डॉक्टरांच्या भाषणानंतर उपस्थितानीही विचार मांडले.त्यात स्वत:पेशंट असलेले मधुसूदन शेंडे होते.ते अमेरिकेतील सपोर्ट ग्रुप पाहून आले होते.तसेच सपोर्ट ग्रुप इथेही असावेत असे त्यांनी मत मांडले.
        
शेंडे आणि पटवर्धन पूर्वी हिंदुस्थान कन्सटरक्शन(Hindusthan Constraction) कंपनीमध्ये भिलई येथे काम करत होते.पार्किन्सन्स मदतगट या संकल्पने मुळे ते पुन्हा एकत्र आले.आता एकत्रित काम सुरू झाले.
         
श्री. शेंडे यांच्याकडे इंग्लंड,अमेरिका,केनडा अशा विविध देशातील पार्कीन्सन्स सपोर्टग्रुपची पत्रके पुस्तिका, मासिके ,केसेट्स,सीडीज यांचा संग्रह होता.उदंड उत्साह होता.
         
आतापर्यंत घरी मिटिंग होत होत्या.शेंडे यांच्या प्रयत्नातून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा हॉल सभांसाठी उपलब्ध झाला.सभेस ४० ते ५० उपस्थिती होती.त्यामुळे उत्साह वाढला.महिन्याचा शेवटचा रविवार, पटवर्धनांचे घर हा परिपाठ चालूच राहिला.शिवाय दिनानाथ मधल्या सभाही चालू होत्या.पण हळूहळू
पुन्हा संख्या रोडावली.२००३ मध्ये शेंडे पती पत्नी अमेरिकेला गेल्यावर २ सभासद कमी झाले.पटवर्धनानी नेटाने काम चालूच ठेवले.नोव्हेम्बरमध्ये शेंडे परत आले.
           
१२ फेब्रुवारी २००४ ला वाडेश्वर हॉटेलमध्ये डॉक्टर राहुल कुलकर्णी,डॉक्टर चित्रे हे दोन डॉक्टर आणि पटवर्धन, शेंडेद्वय सौ. सरदेसाई अशी मंडळी हजर होती.मिटिंगमध्ये डॉक्टरनी मदतीच आश्वासन दिले.शुभार्थीनच्या सोयीसाठी बागुल उद्यान आणि कोथरूडच्या ज्ञानदा प्रतिष्टानची शाळा येथे सभा होऊ लागल्या.सभासदाना वाचण्यासाठी शेंडे यांच्याकडची पुस्तके मासिके दिली जाऊ लागली.वेळ सकाळची ठेऊन पाहिली.पण उपस्थिती रोडावतच होती.कधी कधी तर फक्त शेंडे आणि पटवर्धन असत.२००४ च्या उत्तरार्धात शेंडेद्वय पुन्हा अमेरिकेला गेले.मग पटवर्धन एकटेच उरले. ठरल्यावेळी पटवर्धन एकटेच बागेत जात पार्किन्सन्सवरील पुस्तक वाचत बसत.पटवर्धन यांच्या शब्दात सांगायचं तर"अखेरीस मधूनमधून तरी येणार्या एका पेशंटांनेही त्याला फोन केला असता फोनवरच दर महिन्यात दोनदा सभेला येणे सोयीचे होत नाही असे जाहीर केल्यावर मी हा एकसदस्यीय मिटींगचा उपक्रम नाईलाजाने थांबविला'.मासिक सभाना फोन करणे बंद झाले.त्यात पटवर्धन यांची दोन ऑप्रशन झाली.
           
२००६ मध्ये शेंडे पती पत्नी अमेरिकेहून परत आले त्यांनी पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुप स्थापन झाल्याची घोषणा करणारी २००० पत्रके छापून ती जेष्ठ नागरिकापर्यंत पोचविली.जेष्ठनागरिकांच्या प्रज्योत मासिकात हे छापून आले माझी मैत्रीण.प्रतिभा पारखे यांच्याकडून ते आमच्याकडे पोचले.त्यात शेंडे यांचा फोन नंबर होता.त्यांच्याशी फोनवर बोलल्यावर लगेचच दुसर्या दिवशी सकाळी १०.३० ला आम्हास .भेटीसाठी बोलावले.पहिल्या भेटीतच शेंडे आणि त्यांच्या पत्नी शामला यांच्याशी जवळीक निर्माण झाली.१० डिसेंबर २००७ रोजी मुंबईहून आलेल्या सोशल वर्कर शिबानी देव्हारे यांच्यासह शेंडे यांच्या घरी मिटिंग झाली.त्याला श्री पटवर्धन आले होते.त्यांची कामाविषयीची तळमळ पाहून आम्ही भाराऊन गेलो.आम्ही या कामात सामील झालो.यापुढचा सर्व इतिहास मित्रमंडळ आणि आम्ही असा हातात हात घालून झाला.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या परीसस्पर्शाने आम्ही आरपार बदलून गेलो.

(पुढे चालू)

Tuesday, 4 March 2014

पार्किन्सन्स मित्रमंडळाची प्रकाशने

                                     

 लेटस कम्युनिकेट
लेखक:Manjorie I Johnson,

 गुड न्युट्रिशन                            
 लेखक: Julie H.Carter

या दोन पुस्तकांचे एकत्रित रुपांतर : 
रुपांतर :  रामचंद्र   करमरकर
१) चला संवाद साधुया आणि आहार- कोणता,केंव्हा व किती?             
अमेरिकन पार्किन्सन्स डिसीज असोसिएशन ( APDA) यांच्या 'लेटस कम्युनिकेट 'आणि
'गुड न्युट्रिशन'  या दोन पुस्तकांचे एकत्रित रुपांतर. अमेरिकेतील व भारतातील राहणीमान यात खूप फरक असल्याने भारतीय राहणीमानास योग्य असे बदल केलेले आहेत.       
         
 पार्किन्सन्समुळे अनेकाना बोलण्याची तसेच लाळ गळण्याची समस्या निर्माण होते.यासाठी
औषधोपचाराबरोबर  बोलण्याचे विशिष्ट व्यायाम आणि बोलण्याच्या तंत्राचा सराव अशा पूरक कार्यक्रमाची गरज आहे.हे आव्हान स्वीकारण्यासाठी या पुस्तकातून मदत व प्रोत्साहन मिळेल.                  

पार्किन्सन्सग्रस्ताना आहाराविषयी पथ्य नसले तरी काही मनोसामाजिक कारणे, ,बद्धकोष्ठ, गिळण्याची समस्या हे आहारावर परिणाम करतात. हे लक्षात घेऊन पोषक आहाराचे महत्व,कुपोषण टाळणे,पार्किन्सन्स ग्रस्तांसाठी विशेष आहार या बाबींचा पुस्तकात समावेश आहे.

रुपान्तरकारांनी  परिशिष्टात शब्द, शब्दसमूह,वाक्ये व परिच्छेद खास मराठीतून तयार केले आहेत.
आहारविषयक तक्ते आहारतज्ज्ञ श्रुतिका बेंडे यांनी भारतीय आहाराला अनुसरून दिलेले आहेत.
                         

२)पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत   

लेखक - शेखर बर्वे 

लेखक व्यवसायाने डॉक्टर नाहीत परंतु पत्नीला पीडी झाल्यावर न डगमगता पार्किन्सन्स विषयी माहिती मिळवली त्याला अनुभवाची जोड मिळाली.आणि पुस्तकाची निर्मिती झाली
प्रसिद्ध न्युरोलोजीस्ट डॉक्टर प्रदिप दिवटे यांची प्रस्तावना हा या पुस्तकाचा विशेष.

पार्किन्सन्स विषयीचे ज्ञान येथे शास्त्रीय भाषेचा किचकटपणा टाळून सोप्या भाषेत येते.हा आजार पूर्ण बरा होणारा नसला तरी लक्षणावर नियंत्रण आणता येऊ शकते.हे लक्षात घेऊन पुस्तकात विविध लक्षणे आणि त्याबाबतच्या मौलिक सूचना यावर विस्ताराने लिहिले आहे.या माहितीला अनुभवाची जोड असल्याने शुभार्थींना रोजच्या जगण्यात ती नक्की उपयोगी ठरतील. यासाठी आहार विहार,व्यायाम,विविध पूरक उपचार पद्धती यांचीही जोड पुस्तकात आहे.

पिडिबरोबर येणार नैराश्य यावर स्वतंत्र प्रकरण आहे. तुम्ही एकटे नाही आहात; असा दिलासा देणारे स्व-मदत गटावरील प्रकरण,मित्र,तत्वज्ञ,मार्गदर्शक अशी काळजीवाहकाची भूमिका,रोजच्या जगण्यातील सहाय्य उपकरणे  ,काही उपयुक्त सूचना या सर्वच पिडि शुभंकर शुभार्थींसाठी एकदा वाचण्याच्या बाबी नाहीत तर पुस्तक संग्रही ठेऊन पुन्हःपुन्हः वाचण्याच्या आहेत.
         
दोनही पुस्तके आपल्या संग्रही हवीतच.

पुस्तकासाठी संपर्क :
द्वारा रा.हे.करमरकर
३चिंतामणी अपार्टमेंट,१११९,
सदाशिवपेठ,पुणे,४११०३०
भ्रमणभाष : ९४२३३३८१६४