Saturday, 8 December 2018

पार्कीन्सन्सविषयक गप्पा - ३१

पार्कीन्सन्सविषयक गप्पा - ३१
गप्पांच्या मागील भागात मी म्हणाले होते की, लहान मुलांना पार्किन्सन्सविषयी माहिती सांगितल्यास त्यांचे शुभार्थींबरोबरचे वागणे जास्त योग्य होते. यासंदर्भात येथे मला आणखी एक निरिक्षण नोंदवायचे आहे. ज्यांच्याकडे लहान वयात पार्किन्सन्स झालेले शुभार्थी असतात, त्यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट गरजेची असते. होते असे की, मुले खूप अजाण असतात, त्यांना आजाराबद्दल काही सांगण्याइतक्याही वयाची नसतात. तेव्हा घरातील मोठी माणसे शुभार्थींबरोबर जशी वागतात, तशी ती मुले अनुकरण करतात. त्यामुळे कुटुंबियांनी साहजिकच शुभार्थींबरोबर सौहार्दाने वागणे आवश्यक असते. ते एरवीही प्रत्येक घरामध्ये जरुरीचे आहे, मात्र लहान मुले असलेल्या घरांमध्ये जास्त, कारण लहान मुले घरातल्या सदस्यांचे निरिक्षण करत असतात.
उदाहरण द्यायचे झाले तर, अमिता गोगटेला तिसाव्या वर्षी पार्किन्सन्स झाला. तिला पहिला मुलगा होता आणि दुस-या मुलाच्या वेळी बाळंतपणानंतर तिला पार्किन्सन्स असल्याचे लक्षात आले. म्हणजे मुले खूपच लहान होती. पण त्यावेळी तिचे आई-वडिल, सासुसासरे आणि यजमान ह्या सर्वांनी ही समस्या फारच चांगल्या त-हेने हाताळली. अमिताला बसलेल्या ह्या मोठ्या धक्क्यातून बाहेर तर काढलेच, शिवाय मुलांना सांभाळण्यासकट सर्व जबाबदा-या आलटून पालटून एकमेकांमध्ये वाटून घेतल्या. तिच्या यजमानांचे वर्तन तर आदर्श म्हणण्याजोगे होते. आम्ही तिच्याकडे जेव्हा प्रथम गेलो तेव्हा माझ्या यजमानांना नुकताच पार्किन्सन्स झाला होता. म्हणजे तशी बरीच जुनी गोष्ट आहे. तेव्हा तिची कोल्हापूरचे न्युरोसर्जन डॉ. प्रभू ह्यांच्याकडे थॅलॅमॉटोमीची शस्त्रक्रिया झाली होती. आमच्या एका नातेवाईकांकडून ह्या शस्त्रक्रियेमुळे तिच्या तब्येतीत खूप सुधारणा झाल्याचे आम्हाला समजले आणि त्या नातेवाईकांनी तुम्हीही तशी शस्त्रक्रिया करून घेण्याचे सुचवल्यामुळे आम्ही तिला भेटायला गेलो होतो.
अमिताने आम्हाला शस्त्रक्रियेबद्दल बरीच माहिती दिली, शस्त्रक्रियेमुळे सुधारणा वाटत असल्याचेे सांगितले. आधी तिच्या हाताला खूप कंप असे, काही काम करता येत नसे, पण आम्ही गेलो तेव्हा तिने स्वत: केलेले पोहे आग्रह करकरून आम्हाला खायला घातले. फोडणीत मोहरी मी माझ्या हाताने घातली, ही गोष्ट सांगतानाही तिचा चेहरा खुलला होता. त्यावरून मोहरीचे दाणे उचलणे आणि फोडणीत घालणे ही सोपीशी गोष्टही तिच्यासाठी किती अवघड होती, हे लक्षात आले. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिची परिस्थिती सुधारली होती.
अर्थात थॅलॅमॉटोमी ही जी शस्त्रक्रिया आहे, ती आता मागे पडली आहे किंवा आउटडेटेड झालेली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सध्या डीप ब्रेन स्टिम्युलेशन ही शस्त्रक्रिया रुढ आहे आणि खूप फायदे होत असल्यामुळे आता ती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पण आत्ता आपला विषय शस्त्रक्रियेचा नसल्यामुळे आपण मूळ मुद्द्याकडे वळू.
तर आम्ही अमिताकडे गेलो तेव्हा तिची मुले थोडी मोठी झालेली होती. वडिल जसे जबाबदारीने वागत होते, तशीच ती मुलेही वागत होती. पुढे काही कालावधीने पुन्हा तिच्याकडे जाणे झाले तेव्हा मुले आणखी थोडी मोठी झाली होती. तेव्हा अमिताच्या बोलण्यात आले की, मुले तिला पोळ्या करतानाही मदत करतात. आम्ही तिला पार्किन्सन्स मित्रमंडळात बोलावल्यावर तिने सांगितले की, माझ्याकडे तुम्ही कितीही लोकांना पाठवा, मी त्यांना सगळी माहिती सांगेन, त्यांचे आदरातिथ्य करेन, पण मला मंडळात येणे जमणार नाही. त्याचे कारण असे होते की, अमिताला कोणत्याही बाह्य स्व-मदत गटाची आवश्यकता नव्हती, जशी इतर शुभार्थींना सहसा असतेच. अमिताला कुटुंबिय होतेच शिवाय मैत्रिणीही कायम मदतीसाठी, आधारासाठी तत्पर होत्या. त्यामुळे स्वमदत गटाशिवायही ती छानपैकी आनंदी होती. तिची मुले किंवा यजमान नवनवीन माहिती शोधून त्याप्रमाणे सतत काही ना काही करत रहायचे आणि पर्यायाने तिचे एकूण छान चाललेले होते.
एकदा आम्ही पूर्वकल्पना न देता अचानकच तिच्याकडे गेलो असताना ती मैत्रिणींबरोबर भिशीला गेली होती आणि परस्परच वाचनालयातून पुस्तके बदलून आणणार होती. हे सगळे ती एकटी करत होती. तिचे यजमान जायच्या ठिकाणी खाली सोडत, नंतर मैत्रिणी रस्ता ओलांडून देत आणि ती चालत येत असे. थोडक्यात, सर्व त-हेने अमिता स्वावलंबी आयुष्य जगत होती. केवळ कुटुंबियच नव्हे तर तिला मैत्रिणीही चांगल्या मिळाल्या होत्या. आम्ही भेटलो तेव्हा ती कुटुंबियांबद्दल, मैत्रिणिंबद्दल भरभरून सांगत होती, वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलत होती. ती इतकी आनंदी होती की, आम्हीही तिला पार्किन्सन्स मित्रमंडळात सहभागी होण्याचा आग्रह धरला नाही. पण अनेकांना तिच्याकडे पाठवले आणि त्या सर्वांना ती छान माहिती देत असे. महत्त्वाचे म्हणजे, अमिताच्या ह्या सर्व प्रवासात आम्हाला अमिताच्या मुलांचा सक्रिय सहभाग प्रकर्षाने जाणवला.
शब्बीर सय्यद ह्यांनाही असाच लहान वयात पार्किन्सन्स झाला. ते आता नाहीत. त्यांच्याकडे परिस्थिती थोडी बिकट, कारण हा मिळवता हातच आजारी पडल्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक घडीवर परिणाम होणे साहजिक होते. त्यांच्या पत्नी ब्युटी पार्लर चालवत आणि त्यांचा भाऊ त्यांच्या औषधोपचाराचा खर्च चालवत असे. अशावेळी सय्यदांचा दहावीत असलेला मुलगा त्यांची सेवा करत असे आणि त्यांना चांगली वागणूकही देत असे. ही चांगल्या वर्तणुकीची काही उदाहरणे पाहिलेली.
तर एक उदाहरण असेही पाहिले, जेथे असाच अगदी लहान वयात, तीस-बत्तिसाव्या वर्षी पार्किन्सन्स झालेल्या, मुले लहान असलेल्या शुभार्थी स्त्रीला कुटुंबियांकडून बरे वागवले जात नव्हते. तिच्याकडून इतर स्त्रियांसारख्याच कुटुंबियांच्या देखभालीच्या, जबाबदा-या पार पाडण्याच्या अपेक्षा केल्या जात होत्या, आणि त्या ती पूर्ण करू शकत नाही म्हणून तिचा राग केला जात होता. तिची कर्तव्ये पूर्ण करणे तिला शारिरीक मर्यादांमुळे झेपणारे नव्हतेच, पण तिला कुणाचाच मानसिक आधारही नसल्यामुळे ती सततच मनाने खचलेली, दमलेली, निराश मन:स्थितीत असे. त्यामुळे तिचा पार्किन्सन्स आणखीनच वाढत असलेला आम्हाला दिसत होता.
ह्या सर्व उदाहरणांवरून हेच सांगायचे आहे की, लहान मुले म्हणून त्यांना गृहीत न धरता त्यांना शुभार्थीशी कसे वागायला हवे हे सांगितले पाहिजे. ती मोठी झाल्यावर पुढे माहिती समजल्यावर मग ती आपोआपच समंजसपणे वागू शकतात. त्यामुळे शुभार्थींच्या पार्किन्सन्ससह आनंदी रहाण्यामधे तीही सहभागी होतात. कितीतरी वेळा आम्ही पहातो की, घरी लहान मूल असेल किंवा नवे बाळ आले तर शुभार्थी खूप आनंदी दिसतात. परगावाहून किंवा परदेशातून मुले, नातवंडे येतात, तेव्हाही ते खुललेले दिसतात. त्यामुळे पार्किन्सन्स शुभार्थींच्या जीवनातील लहान मुलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
शब्दांकन - सई कोडोलीकर.
अधिक माहितीसाठी

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईट पहा.

Thursday, 6 December 2018

२१ नोव्हेंबर २०१८ - घाडगे बोटॅनिकल गार्डन सहल

                                         २१ नोव्हेंबर २०१८ - घाडगे बोटॅनिकल गार्डन सहल
                        दरवर्षी नोव्हेंबर,डिसेंबरच्या दरम्यान पार्किन्सन्स मंडळाची सहल असते.यावर्षी २१ नोव्हेंबरला होती. नेमेची येणारा पाऊस नेम बदलून  पुण्यात २० नोव्हेंबरला अचानक कोसळला. आणि उद्या सहल जाऊ शकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.हवामानाच्या भविष्यावर हवाला ठेऊन आम्ही सर्वांना आपली सहल ठरल्याप्रमाणे जाणार असा भरोसा दिला.यावेळी प्रथमच नर्मदा हॉलकडे जमायचे होते.प्रभातरोडला बस थांबवता येत नाही, कमिशनरची परवानगी घ्यावी लागते.आशा रेवणकर परवानगीसाठी गेल्या आणि दिलासादायक अनुभव घेऊन परवानगीसह परत आल्या.कमिशनरनी अगत्याने स्वागत केले.त्यांना आमच्या गटाबद्दल माहित होते.परवानगीबरोबर त्या भागात  ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांना तेथे थांबायला सांगतो असेही त्यांनी  सांगितले.
                       साडे आठला सर्वांना बोलावले होते.तरी आठपासूनच मंडळीं यायला सुरुवात झाली. चेहऱ्यावर लहान मुलांसारखा आनंद आणि उत्सुकता होती..नर्मदाच्या पारावर आलेली मंडळी स्थानापन्न होत होती.काही उभ्याउभ्याच गप्पा मारत होती..बस उभीच होती.आलेल्या व्यक्तींना नावाचा बिल्ला देवून लगेच बसमध्ये बसवणे,पैसे भरून घेणे,जे अजून आले नाहीत त्यांना फोन करणे,अशी  उमा दामले,अरुंधती जोशी,दीपा होनप,अंजली महाजन,वसू देसाई, आशा रेवणकर,सविता ढमढेरे यांची लगबग चालू होती. बसमध्ये चढण्यासाठी आणलेले स्टूल लहान पडत होते. नर्मदाच्या कुलकर्णी यांच्याकडून मोट्ठे स्टूल  आणले. नर्मदा हॉलही आमच्यासाठी उघडून ठेवला होता.त्यांची आमच्या कामात खूपच मदत होते.
                          अंजलीने हजेरी घेतली आणि ९ वाजून १० मिनिटांनी बस निघाली.अनेकदा सहलीत पुढे जागा मिळवण्यासाठी धडपड,भांडाभांडी आढळते.आम्हाला मात्र इतक्या सहली झाल्या पण असा एकही अनुभव आला नाही.सर्वाना न्याहारीसाठी ठेपले आणि चटणी देण्यात आली.अरुंधतीने नात झाल्याबद्दल बर्फी दिली.ओरिगामीसाठी कागद देण्यात आले. नेहमीप्रमाणे शरच्चंद्र पटवर्धन यांनी चौकोनी कागद कापून आणले होते.नंतर शिकवल्या जाणाऱ्या क्विलीन्गचे साहित्यही त्यांनी आणले होते.चहा घेणारे किती, कॉफी घेणारे किती आणि बिनसाखरेचा घेणारे किती याची मोजदाद होऊन घाडगे गार्डनला ऑर्डर गेली.
                          घाडगे गार्डन जवळच असल्याने लगेचच पोचलो.डोंगराच्या कुशीतले निसर्गरम्य ठिकाण आहे. पोचल्या पोचल्या चहा  तयारच होता.वसूने श्रुजबेरी बिस्किटे आणली होती.आमच्याप्रमाणेच एका शाळेची २५० मुले तेथे आली होती.मनोहारी निसर्गाबरोबर त्यांचे बागडणेही आनंददायी वाटत होते.आमचेही खेळणे, बागडणे सुरु झाले.व्यवधान वाढवणारा,सर्व सहभागी होतील असा इडली डोसा खेळ झाला.तेथेच असलेल्या जादुगार कोहीनुरच्या  जादूच्या  प्रयोगानी आणि त्याबरोबरच्या चटपटीत बोलण्याने निर्भेळ करमणूक झाली.
          यावर्षी प्रथमच आलेल्या उल्हास बापट यांनी सन डायल या स्वत: प्रयोग करून तयार केलेल्या साधनाचे प्रात्यक्षिक दाखवले.हे साधन सूर्याच्या दिशेनुसार वेळ दाखवते.यानंतर बसल्याबसल्या सर्वात जास्त एक रुपयाची नाणी कोणाकडे आहेत,किल्ल्या कोणाकडे आणि डेबिट, क्रेडीट कार्ड कोणाकडे आहेत, असा छोटा खेळ घेण्यात आला.जोत्स्ना सुभेदार यांच्याकडे १७ नाणी,रेखा आचार्यकडे १३ किल्ल्या आणि मधुकर तांदळे यांच्याकडे ४ कार्डस् निघाली.अशा छोट्या खेळात सर्व सहभागी होऊ शकतात.सर्वांनीच याचा आनंद घेतला.                                      
              जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात विजय देवधर यांच्या क्विलिंगचे डॉक्टर लुकतुके यांनी खूपच कौतुक केले होते.सर्वाना ते शिकण्याची इच्छा होती.यातून एकाग्रता,मोटर स्कील वाढणे,नैराश्य कमी होणे असे अनेक फायदे असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले आणि प्रात्यक्षिकास सुरुवात झाली.देवधर यांनी काही प्राथमिक भाग शिकवला.सर्वच शुभंकर, शुभार्थी यात सहभागी झाले.सर्वांच्या ओरिगामीच्या कृतीही करून झाल्या होत्या.विजय देवधर आणि शरच्चंद्र पटवर्धन या परीक्षकांनी त्यातून निवड केली.लगेच बक्षिसेही देण्यात आली.

आशा रेवणकर प्रथम,रेखा आचार्य द्वितीय आणि नंदा चीद्दरवार,केशव महाजन यांना तृतीय क्रमांक विभागून मिळाला.डॉक्टर जावडेकर यांच्या स्केचलाही बक्षीस देण्यात आले.

           सर्वांनाच आता आजूबाजूची हिरवळ, धबधबा,धबधब्यात मनसोक्त डुंबणारी मुले खुणावत होती. एक वाजेपर्यंत जेवण तयार होणार होते. तोवर काहीजण भोवतालचा निसर्ग पाहण्यास गेले.एक दोघांनी तेथे असलेल्या बाजांवर झोपणे पसंत केले.काही तेथेच गप्पा मारत बसले.सगळ्यांना एकपर्यंत गोळा करून आणण्यासाठी  विद्यार्थी सहाय्यक समीतीचा गिरीश कुलकर्णी हा तरुण विद्यार्थी आमच्याबरोबर होता.व्हिडीओ,फोटो काढणे,शुभार्थीना आधार देणे अशा विविध कामात त्याची मदत होत होती.
         जेवणात पिठलं भाकरी, चायनीज,गुलाबजाम,शिरा,पुरी,पावभाजी  अशी विविधता होती. जेवणानंतर सर्वजण हॉलमध्ये जमले.सुरुवातीला वाढदिवस साजरे करून हास्याचा फुगा फोडण्यात आला. वसू देसाईनी प्रश्नमंजुषा तयार करून आणली होती. सर्वांना ते कागद वाटण्यात आले.दिलेल्या वेळानंतर कागद गोळा करण्यात आले.कोणाचे  किती बरोबर आहे पाहून नंबर लावण्यात आले.उन्नत्ती क्षीरसागर,उमा दामले,सुनिता चाफळकर यांनी यात प्राविण्य मिळवले.
        नंतर  करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली.माईकनी संप पुकारला. मग जवळ खुर्च्या घेऊन माईकशिवायच कार्यक्रम झाला.पार्किन्सन्सशी सामना करणाऱ्या शुभंकर, शुभार्थीना अशा छोट्या मोठ्या समस्यांना तोंड देणे सहज शक्य होते.

जोत्स्ना सुभेदार यांच्या गणपती पंचरत्नने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यानंतर शोभना तीर्थळी यांनी सर्वांनी एकत्रित गावून म्हणायचा 'सखू गेली पाण्याला' हा खेळ घेतला.सखुला वेगवेगळे लोक भेटतात आणि हावभावासह गाणी म्हणतात.यात अरुण सुर्वे 'चाहे कोई मुझे जंगली कहे',दीपा,आशा,सविता,वसू इ.नी 'सुहाना सफर',कुर्तकोटी पती पत्नींनी 'तेरी प्यारी प्यारी सुरतको', सुभेदार पती पत्नींनी 'माळ्याच्या मळ्यामध्ये', देसाई पती पत्नींनी 'मेरा साया साथ होगा',डॉक्टर जावडेकर यांनी 'मानसीचा चित्रकार तो'अशी गाणी म्हटली.सर्वांसाठी गाणी तयार होती पण उशीर होत होता म्हणून सखुची साथ सोडावी लागली.
         सूत्र संचालनासाठी अंजलीने सूत्रे हातात घेतली.शोभना आणि सवितानी 'गार डोंगराची हवा' हे गाणे सर्वांसह म्हटले.सरोजिनी कुर्तकोटी यांनी पुलंचे विनोद सांगितले,पद्मजा ताम्हणकर विजया मोघे,अर्चना अंतुरकर, शुभदा गिजरे यांनी भक्ती गीते म्हटली,विजया दिवाणेनी 'चौदहविका चांद',उन्नत्ती क्षीरसागरनी 'तू बुद्धि दे' ही प्रार्थना म्हटली.अंजली महाजननी स्वरचित कविता म्हटली.केशवराव महाजन यांनी 'रहा गर्दीशोमे हरदम' हे गीत म्हटले.डॉक्टर जावडेकर यांनी लहानपणीची आठवण सांगितली.उल्हास बापट यांनी त्यांच्या नोकरीच्या काळात राजीव गांधी यांच्याबरोबर घडलेली थरारक आठवण सांगितली.
         कार्यक्रम चालू असताना  चहा बिस्कीटे आली आणि कार्यक्रमात रमलेल्या सर्वाना वेळेचे भान आले. शेवटी सर्वांनी सैराटच्या गाण्यावर नाचायचे ठरले होते.ते तर व्हायलाच हवे होते आणि झालेही.पटवर्धन,करमरकर हे पंच्याहत्तरी ओलांडलेले तरुण रिंगणात आल्यावर सर्वांनाच स्फूर्ती मिळाली.
        सर्वांचा एकत्रित फोटो झाला आणि पुढच्या सहलीची स्वप्ने पाहत,अनेक दिवसांसाठी उर्जा घेऊन मंडळी जड पावलाने परतली.जावडेकर म्हणाले, प्रत्येक दोन महिन्यांनी सहल निघायला हवी.
         यावेळी सहलीचे आयोजन करताना कार्यकारिणीतील कोणीतरी म्हणाले, पुढच्या वर्षीपासून  सहल नको.खूप टेन्शन येते.सह्लीनंतरच्या शुभंकर, शुभार्थींच्या सुखावणाऱ्या प्रतिक्रिया आणि खुललेले चेहरे पाहून आपलेच विधान विसरायला होते आणि पुन्हा सहल निघते.खरे तर  आमची सहल म्हणजे 'ताण हवासा' असेच म्हणावे लागेल. 




         
              

Monday, 3 December 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा -३०


                       पार्किन्सन्सविषयी गप्पा -३०
                 दर शनिवारी आम्ही आमच्या घरामागेच असलेल्या छोट्या गल्लीत मारुती मंदिरात जातो.सोसायटीचे छोटे मंदिर आहे.बाकावर जेष्ठ नागरिक बसलेले असतात.छोटी मुले खेळत असतात. कधी अभ्यास करत असतात.त्यादिवशी ह्यांना पाहून छोटी मुले आपापसात कुजबुजून हसू लागली.एक मुलगा हाता हलवून नक्कल करत होता तर एक छोटी मुलगी त्यांना दटावत होती.ह्यानी याची आता सवय असल्याने त्यांना त्याचे काहीच वाटले नाही.पण सर्वच पार्किन्सन्स शुभार्थीबद्दल असे होईल असे नाही.माझ्यातला शिक्षक अशा वेळी जागा होतो.मी थांबून त्या मुलाना म्हणाले, असे का होते तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही हसला.आधी मुले मी बोलायला लागल्यावर कावरीबावरी झाली.मी त्यांना म्हटले,मी तुम्हाला रागावत नाही.घाबरू नका.मग त्यांना समजेल अशा भाषेत मेंदूतील डोपामिन कमी झाले की कसा हालचालीवर परिणाम होतो हे सांगितले.मुले ऐकत आहेत म्हटल्यावर इतरही हिताच्या गोष्टी सांगून झाल्या.दुसऱ्या दिवशी त्यातला एक मुलगा आई बरोबर चालला होता.आमच्याकडे पाहून गोड हसला आणि बाय केले.मुलांना निट समजावून सांगितले तर मुले ऐकतात असा माझा अनुभव आहे.शुभार्थीच्या घरी मुले नातवंडे असतात त्याना आजाराबद्द्ल समजावून सांगितले तर त्यांच्या शुभार्थीशी वागण्यात फरक पडतो.शुभार्थीच्या आनंदी राहण्यात आणि पीडीला स्वीकारण्यात कुटुंबातील सर्वांच्या सहकार्याचा आणि त्यांच्याबरोबर सौहार्दाने वागण्याचा खूप वाटा असतो.
       माझ्या नातवाबाबत असेच घडले.पीडीमुळे हालचाली मंद होतात.एकदा लिफ्ट उघडून नातू तयार होता आणि ह्यांना चप्पल घालून लिफ्टपर्यंत यायला वेळ लागत होता. तो ओरडून चिडलेल्या आवाजात म्हणाला,' अब्बू लवकर लवकर या ना'.मी ते हळू का येतात हे त्याला समजावून सांगितले.नंतर मी फोनवर शुभार्थीशी बोलायची तेही तो ऐकायचा जेंव्हा तो आमच्याकडे होता तेंव्हा आम्हाला त्याला सभेलाही घेऊन जावे लागायचे.आता त्याला पीडीबद्दल बरीच माहिती आहे तो ह्यांचे निरिक्षण करून मलाच काहीकाही सांगत असतो.मुलांचे आणखी काही अनुभव पुढील गप्पात.
             

Sunday, 18 November 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - २९

                                               पार्किन्सन्सविषयी गप्पा -२९
               दिवाळीची साफसफाई, दिवाळीचा फराळ आणि नंतर दिवाळी साजरी करणे यात सर्वजण एका वेगळ्याच मूडमध्ये असतात म्हणून गप्पांना थोडी विश्रांती दिली होती.आता खूप बोलायचे आहे.
                 गप्पा सुरु केल्या तेंव्हा मी खूप साशंक होते.सई कोडोलीकरने शब्दांकन करायची तयारी दाखवली आणि गप्पा सुरु झाल्या.मध्यंतरी अतुल सुलाखे आमच्याकडे आले असताना म्हणाले सई तुमच्या जवळ राहतात का? मी म्हणाले' नाही.ती आता कोल्हापूरला राहते.पुण्यात होती तेंव्हाही जवळ राहत नव्हती.' अतुलला वाटले होते  मी  सांगते आणि  ती लिहून घेते असेच चालत असेल.पण तसे नव्हते.
               मला  जे म्हणायचे आहे ते रेकार्ड करून Whats App वर मी पाठवते.सई ते लिहून पाठवते.आणि मी ते फेसबुक,पार्किन्सन्सचा Whatsapp ग्रुप आणि वेबसाईटवर देते.त्याला नाव देणे,आकडे टाकणे हेही सईच्या सुचनेतूनच झाले.तिचे शब्दांकन प्रत्येक लिखाणानंतरचा  तिचा पहिला प्रतिसाद उत्साह वाढविणारा असायचा.सर्वसामान्यांपर्यंत पार्किन्सन्स विषयक प्राथमिक माहिती तरी पोचवायची हा उद्देश साध्य होत आहे हे तिच्या प्रतिसादातून मला समजत गेले.तांत्रिक अडचणी येत राहिल्या.पण त्यावर मात करत गप्पा चालू राहिल्या.
                तिचे  शब्दांकन असल्याने मी तिला Tag केले.इतर अनेकांनाही Tag करण्याचेही तिनेच सुचविले. त्याचा गप्पा मला तरुण पिढीपर्यंत पोचविण्यासाठी खूप उपयोग झाला.माझ्या मुलीची अमेरिकेतील मैत्रीण मला मुद्दाम भेटायला आली तुमचे फेसबुवरचे लिखाण मी वाचते म्हणाली.दुसऱ्या मुलीची ठाण्याची मैत्रीण 'मी तुझ्या आईचे सदर नियमित वाचते' असे तिला सांगत होती.मराठी भाषिक असणाऱ्या देशपरदेशातील शुभार्थींच्या मुला नातवंडापर्यंत मंडळाची माहिती पोचत होती.आणि ते शुभार्थी आमच्यापर्यंत पोचत राहिले.ज्यांच्याकडे पीडी पेशंट नाही असे अनेकही जोडले गेले.आमच्या टीमवी मधल्या शेणोलीकरबाई अनेक वर्षांनी येथे भेटल्या.फोनवर भरभरून बोलल्या.माध्यमिक शाळेतला वर्गमित्र श्रीशैल्य सारखा सुजाण वाचक ६४ सालानंतर भेटला.ही काही वानगीदाखल उदाहरणे.
              आपला  भरभरून प्रतिसाद,प्रेम याबद्दल मनापासून धन्यवाद.
            
              

Monday, 15 October 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - २८

                                          पार्किन्सन्सविषयी गप्पा -
             
                  मागच्या गप्पात आपण अंजलीने पतीच्या पीडीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या पातळ्यांवर कसे बदल केले हे पाहिले.
                आशा रेवणकर यांनीही फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवायला नियमित जाण्याचे काम  थांबवले.बालभारतीमध्ये पाठ्यपुस्तक लेखनाचे रोजचे काम तसेच एस.एस.सी बोर्डातील रिसोर्स पर्सन म्हणून काम मात्र चालू ठेवले.हे काम करताना त्या फोनवर उपलब्ध राहू शकतात.त्यांचे पती एकटे राहू शकतात.ते ब्रिज चाम्पियन आहेत अजूनही खेळायला जातात परंतु एकदा ते रस्त्यात पडले.अशी वेळ आली तर फोनवर त्या लगेच उपलब्ध असणे त्याना महत्वाचे वाटले.आणि त्या व्याख्यान देत असल्या तर फोन  बंद ठेवायच्या.आता त्या बराच वेळ घरी असल्याने नकळत त्यांचे पती आनंदी असतात.
               शशिकांत देसाई सुरुवातीची काही वर्षे सभेला एकटेच येत.नंतर त्यांची पत्नी  वसूही सभेला येऊ लागली.देसाईंचा पीडी थोडा वाढला होता.तोल जाणे सुरु झाले,भासही होत.पण वसू नियमित त्यांना सभेला घेऊन येते.सहलीला येते.दिनानाथ हॉस्पिटलमधील गृपलाही नेते.आमची कार्यकारिणी सदस्य असल्याने त्या मिटींगलाही ती त्याना घेऊन येते.तिला लक्षात आले त्यांचे वाचन टी.व्ही.पाहणे अशा सर्व गोष्टी बंद झालेत.ते फक्त बसून असतात.तिने वेळीच त्यांच्या activity वाढतील असे प्रयत्न सुरु केले.त्याना ज्येष्ठांसाठी असलेल  'रेनबो डे-केअर सेंटरचा पर्याय सापडला.सकाळी ९.३० ते ५ पर्यंत ते तेथे राहतात.त्यांची बस न्यायला सोडायला येते.विविध खेळ असतात.समवयस्क असतात. हळू हळू ते हसायला,बोलायला लागले आहेत.
                 एकदा पीडी झाला कि तो कधी न कधी वाढणार आहे हे वास्तव समजून घेऊन त्याला हाताळले की पीडीसह अनादी राहणे सोपे जाते.पीडीच्या वाढीची टांगती तलवार सतत डोक्यावर बाळगायची नाही.आणि जेंव्हा वाढ होते त्यावेळी.हताश न होता घाबरून न जाता त्याच्याशी समायोजन साधण्यासाठी योग्य उपाय करायचा असा समतोल साधण्याची कसरत  शुभंकरालाच करावी लागते.
                            आता या अवस्था म्हणजे नेमके काय ते पाहू. 
                       पार्किन्सन्सचे निदान झाले कि' हा आजार कधीही बरा होणारा नाही. आणि वाढत जाणारा आहे' असे सांगितले जाते. 'असे असले तरी आजार समजून घेऊन योग्य औषधोपचार,व्यायाम,आजाराचा स्वीकार,शुभंकर,स्वमदत गटाचे सहकार्य  या आधारे लक्षणावर नियंत्रण आणता येते. आणि जीवनाची गुणवत्ता वाढवता येत'अशी जोड दिल्यास पहिल्या विधानातील नकारात्मकता आणि भयावहता कमी होते.आमच्या अनेक शुभार्थिनी असे गुणवत्तापूर्ण जीवन जगून आदर्श घालून दिला आहे.
                 आजार वाढत जाणारा आहे. म्हणजे आज निदान झाले.आणि लगेच चार आठ दिवसात तो वाढला असे होत नाही.पीडीच्या अनिश्चितता आणि अनाकलनीयता या स्वभावाचे प्रत्यंतर येथेही येते.प्रत्येकाच्या बाबत वाढीचा वेग वेगळा असतो.या आजाराच्या लक्षणांच्या अवस्थेनुसार पाच अवस्था सांगितल्या जातात.पहिली अवस्था निदान झाल्यावरची लक्षणे दिसू लागण्याची आणि पाचवी शयाग्रस्ततेची.याबाबत फार खोलात न शिरता याबाबतची लिंक सोबत देत आहे.माझ्या पाहण्यात पहिल्या दुसऱ्या अवस्थेतच अनेकजण बराच काळ असतात.मी यातली तज्ज्ञ नाही त्यामुळे याबाबत खोलात न जाता   शुभंकराची  भूमिका कशी महत्वाची  आहे एवढेच  सांगायचे आहे.
https://parkinsonsdisease.net/basics/stages/
                  
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune( https://www.youtube


             


Saturday, 13 October 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - २७

                                                पार्किन्सन्सविषयी गप्पा  - २७
                            अंजली महाजनच्या घरी मी प्रथम गेले. त्यावेळी ती शाळेत मुख्याध्यापिकेची नोकरी करत होती.तिचे पती केशवराव स्वत:ची काळजी घेऊ शकत होते तिच्या सासूबाईही चांगल्या परिस्थितीत होत्या.ती घरी नसली तरी केशवराव आनंदी राहतील याची योजना तिने करून ठेवली होती.गच्चीतली छोटी बाग केली होती,देवपूजेचे,वर्तमानपत्रे लावून ठेवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते.त्यांच्या आवडीच्या महमद रफीच्या गाण्याच्या सीडी आणून ठेवल्या होत्या.दुपारी अडीच तीन पर्यंत ती घरी येई.पण जेंव्हा त्यांना नैराश्य येत आहे,त्यांचा आत्मविश्वास कमी होत आहे  असे लक्षात आले तेंव्हा अंजलीने मुलीशी चर्चा करून स्वेच्छयानिवृत्ती घेतली.'माझ्या पत्नीने घेतली स्वेच्छयानिवृत्ती आणि माझी वाढली आनंदी वृत्ती ' असा लेख केशवरावांनी स्मरणिकेसाठी दिला होता. या लेखाची लिंक सोबत दिली आहे अवश्य वाचा.त्यांची अंजलीच्या उपस्थितीने असुरक्षितता संपली,दिवसभरातील प्रत्येक कृती आनंद देवू लागली. 'केवळ पत्नीच्या उपस्थितीने माझा निम्मा आजार बरा झाला'  असे त्यांनी लिहिले आहे.
                    मी जितक्या वेळा तिच्या घरी गेले तितक्यावेळा तिने त्यांच्या पीडीच्या अवस्थेनुसार  घराची रचना बदललेली दिसली.उदा तिसऱ्या.मजल्यावर घर असल्याने त्यांचे खाली जाणे कमी झाल्यावर तिने बाल्कनी आत घेतली,गज लावून ती बंद केली.त्यावर रुफ केले,झोपाळा लावला,तेथे बसून रस्त्यावर पाहण्यात केशवराव रमू लागले.ती स्वत:सासूबाई आणि पतीचे सर्व करता होती पण जेंव्हा हे अशक्य आहे हे लक्षात आले तेंव्हा तिने ब्युरोचा  माणूस ठेवला.
                  या प्रत्येक निर्णयानंतर नातेवायिक,समजतील इतर यांच्याकडून टीका टिप्पणी होत राहिली.पण अंजली प्रत्येकवेळी निर्णयावर ठाम होती कारण तिने ते विचारपूर्वक घेतले होते.शुभार्थीचा आजार समजून घेतला, शुभार्थीचे सातत्याने निरीक्षण केले कि असे योग्य निर्णय घेता येतात.
                या पीडीच्या अवस्था म्हणजे काय? आणि इतर काही शुभंकरांचे अनुभव पुढच्या गप्पात पाहू.                  केशव महाजन यांच्या लेखाची लिंक.                
https://www.parkinsonsmitra.org/wp-content/uploads/2015/08/SwecchaNivRuti2013.pdf
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune( https://www.youtube


Monday, 1 October 2018

पुस्तक प्रकाशन

                                                       पुस्तक प्रकाशन
                         शुभार्थी डॉक्टर प्रकाश जावडेकर यांच्या' डॉक्टर होणे एक आव्हान ' या पुस्तकाचे ३० सप्टेंबरला प्रकाशन झाले.Continental प्रकाशन सारख्या प्रतिथयश, जुन्या जाणत्या प्रकाशन संस्थेने ते प्रकाशीत केले.प्रकाशन समारंभास डॉक्टर मोहन आगाशे अध्यक्ष होते. प्लास्टिकसर्जन रवीन थत्ते,अर्थोपेडीक सर्जन नंदू लाड हे जावडेकरांचे शिक्षक  मुम्बईहून आले होते.या सर्वांची भाषणे सुटसुटीत,नेमकी वैद्यकीय सध्य परिस्थितीवर आणि डॉक्टर पेशंट यांच्यातल्या संबंधावर भाष्य करणारी होती.जावडेकरांचे मनोगत पुस्तक निर्मितीची पार्श्वभूमी सांगणारे होते.पत्नीच्या आग्रहातून गप्पांना लेखनाचे स्वरूप आले.त्या समीक्षकही बनल्या.याचा  त्यांनी आवर्जून उल्लेख केला.जावडेकरांचे इंदापूरचे वर्गमित्र त्यांचा सत्कार करायला प्रेमाने आले होते.हा तसा कौटुंबिक सोहळा होता.आणखी एक पुस्तक लिहित असल्याची घोषणाही त्यांनी केली.
                         विशेष म्हणजे दीड दोन तासाच्या या कार्यक्रमात जावडेकरांचा पार्किन्सन्स अदृश्यच होता.नंतर पुस्तकावर सह्या घेण्यासाठी लोक गोळा झाले.इतक्या सगळ्या सह्या करतानाही कंपाद्वारे आपले अस्तित्व दाखविण्यास पार्किन्सन्स बहुधा विसरला.
                         डॉक्टर जावडेकर तुमचे मनापासून अभिनंदन.इतर शुभार्थीसाठी तुम्ही प्रेरणा स्थान आहात.पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा.