Tuesday, 4 February 2014

६. हे जीवन सुंदर झाले. - ! ( प्रकरण २ :पार्किन्सन्स येता घरा....)

    

                      The illness has come to you by chance & not by choice it is not self appointed but fate appointed so accept it  & learn to face it



                  " पडु आजारी मौज हीच वाटे भारी" आपल्या आठवणीतील हे गाण म्हणजे एका छोट्या मुलाच मनोगत.मोठ्ठेपणी मात्र कोणताही आजार झाल्यावर मौज हीच वाटे असा प्रतिसाद नक्कीच नसतो.आजच्या ताण तणावाच्या, धकाधकीच्या जीवनात मधुमेह्,रक्तदाब्,हृदयविकार,स्पॉन्डिलायटिस अशा एखाद्या आजाराच शिक्कामोर्तब झाल नाही अशी व्यक्ती दुर्मीळ.कायम ठाण मांडणारे असे आजार चिकटले की व्यक्तीला सुरुवातीला स्वीविकार करणे जड जाते.पार्किन्सन्स सारख्या आजाराचे निदान झाल्यावर तर व्यक्ती गोंधळुन जाते.आम्ही स्वतः हा अनुभव घेतलाच आहे.शिवाय पार्किन्सन्स मित्रमंडळ परिवारातील अनेक शुभार्थींच्या भेटीगाठीतून,प्रश्नावलीतून पीडीचे निदान झाल्यावर विविध प्रतिक्रिया समजत गेल्या.



                     पीडीला समजून घेउन स्वीविकाराची अवस्था जितक्या लवकर येइल तितके पीडिसह आनंदानी जगणे शक्य होते. आणि ही स्विकाराची अवस्था लवकर येण्यासाठी आणि टिकण्यासाठी डॉक्टर, शुभंकर(Care Taker)यांच्या प्रयत्नाबरोबर पार्किन्सन्स मित्रमंडळासारखे स्वमदतगटही गरजेचे आहेत हा निष्कर्श अधोरेखित झाला.

                   जी निरीक्षणे,घटना अनुभव या निष्कर्शापर्यंत येण्यास कारणीभूत झाले त्यांचे विवेचन पुढे केले आहे.यात स्वतःचा अनुभव,प्रश्नावलीतून आलेल्या प्रतिक्रिया,प्रत्यक्ष भेटीतील निरीक्षणे,साहित्यातुन समजलेले अनुभव,या सर्वांचा समावेश आहे.

                  त्यात काय(so what)अशा स्वीकारापासून  आत्मह्त्या करावीशी वाटली अशा टोकाच्या नकारात्मक प्रतिसादा मधल्या आश्चर्य,दु:ख,भीती,नैराश्य,काळजी,लाज अशा विविध तर्‍हा यात आहेत.पीडि झाल्यापासुन सकारात्मक, नकारात्मक असे चढउतारही यात दिसतात.

       
                  आमचा स्वतःचा अनुभव सांगायचा तर माझ्या नवर्‍याच्या डाव्या हाताच्या कंपाचे  निदान पीडिची सुरुवातीची अवस्था असे झाले तेंव्हा त्यांचे वय ५९ वर्षे होते.मोठ्या लोकांचा आजार, आता पु.लंच्या रांगेत जाउन बसलो अस विनोदानी घेतल.पण जसजसा दुसरा हात जबडाही थरथरायला लागला,समोरच्या माणसाना बोललेले समजेनासे झाले, मग लोकाना टाळणे,फोन घेणे टाळणे सुरु झाले.छोट्या,छोट्या कामाना वेळ लागु लागला, लक्षण वाढत गेली तस आमचा धीरही खचत गेला पीडी वरचे लेखन वाचायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच एका प्रतिथयश दैनिकात डॉक्टरनी लिहिलेला लेख वाचनात आला.अ‍ॅलोपाथीच्या औषधांचे साइड इफेक्टस आणि शेवटच्या स्टेजच   रसभरीत वर्णन यांची मनावर इतकी दडस बसली की पीडिवरचे काही वाचणेच सोडून दिले.आणि पीडिला घालवण्यासाठी कोण काय सांगतील ते उपचार करणे सुरु झाल.या उपचारांची(?) विस्तृत माहिती.पुढे येणारच आहे.

                 पार्किन्सन्स हा बरा न होणारा आजार आहे हे सांगणार्‍या विज्ञानापेक्षा आमच्या उपचाराने आजार पुर्णपणे बरा होउ शकतो असे सांगणारे उपचारकर्ते जास्त जवळचे वाटु लागले.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या ओळखीनंतर मात्र ही परिस्थिती बदलली. आणि यथार्थ ज्ञानातून स्विकाराची अवस्था आमच्याही नकळत आली.

                 १५० प्रश्नावलीतुन आलेल्या प्रतिक्रियाही विविध प्रकारच्या होत्या.काही जणांच्या घरी जाउन माहिती घेतली होती:तर काही पुण्यातील आणि परगावच्या शुभार्थीनी स्वतः प्रश्नावली भरुन दिल्या होत्या.त्यापैकी काहीनी प्रतिक्रिया नोंदवली नाही.या निरीक्षणातून फार मोठे निष्कर्श काढता येतील असे नाही.
प्रत्येक शुभार्थीबद्दल पीडी झाल्यावरची प्रतिक्रिया आणि पीडिसह जगताना रोजच्या व्यवहारात निर्माण होणार्‍या अडीअडचणी,आजारातील चढउतार यातुन निर्माण होणारी मानसिक आंदोलने वेगळी असु शकतात.पीडी झाल्यावरची प्रतिक्रिया आणि त्यात वेळोवेळी झालेले बदल ते घडविणारे घटक याबाबत प्रत्येक शुभार्थी क्षेत्रिय अभ्यासाचा(case study) विषय होऊ शकेल यावर सखोल मानसशास्त्रीय संशोधन होऊ शकेल.
               
 प्रश्नावलीतिल प्रतिक्रीया :
                 धक्का     भिती     नकार    दु:ख    नैराश्य    आश्चर्य   स्विकार     नोंद नाही
                    १४          १४        ११      २१         ११         २             ६८                ९
           आकडेवारी पाहता पीडीला स्विकारले असे सांगणार्‍यांची संख्या अधिक आहे.मागील प्रकरणात आपण पाहिले की ६८% ना पीडीबद्दल काही माहिती नव्हती.म्हणजे हा स्विकार अज्ञानातुन असण्याची शक्यता अधिक..पीडिचे खरे रुप प्रत्ययास आले तशी अनेकाना नकारार्थी भावना सुरु झाल्या.पीडीबद्दलच्या यथार्थ ज्ञानातुन स्विकाराची भावना आल्यास पीडीसह आनंदाने जगणे सोपे होते असे अनुभवास आले.५शुभार्थिनी असा स्विकार केलेला आढळला.इतर शुभार्थीना त्यांची उदाहरणे रोल मॉडेल म्हणून देता येतात.

            भीती वाटणार्‍यापैकी काही जणानी पिडीचे व्हिलचेअरवरील रुग्ण पाहिले होते.पिडी मंडळाच्या कार्यकारिणीची सदस्य प्रज्ञा हिचा भाउच पीडी रुग्ण.आहे.त्याच्यासारखी अवस्था आपली होणार म्हणून मी खुप रडले असे तिने सांगितले.पण आता मात्र अशी परिस्थिती नाही.ती म्हणजे सळसळता उत्साह्,मित्रमंडळाच्या सर्व कामात तिचा हिरिरीने सहभाग असतो.

             काहीना वाचनातुन पीडीविषयी माहिती समजली ती भीती निर्माण करणारी होती.उदाहरणार्थ विजय तेंडुलकरांच्या एका लेखातील कमलाकर सारंग यांच्या पीडी झाल्यानंतर झालेल्या विकलांग अवस्थेच वर्णन एका शुभार्थीच्या वाचनात आले होते.

              तरुण वयात पीडी झाल्यास धक्का बसणे, नैराश्य येणे या प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत.प्रश्नावलीतील माहितीनुसार २४ शुभार्थीना ५०शीच्या आत अणि यातल्या.८ शुभार्थिना तर ४०च्या आत पीडीनी गाठले.यातल्या एका शुभार्थिनी सांगितले एम.एससी. झाले होते लग्नानंतर बी.एड. केले.नोकरीसाठी अपॉइंटमेंटच पत्र आणि पीडीचे निदान एकाच दिवशी झाले. आत्महत्या करावीशी वाटली.पण पटवर्धन काकानी( मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य)हे कसे चुकीचे आहे हे इतक्या छान प्रकारे समजाऊन सांगितले की आता पीडी होऊन १० वर्षे झाली. खूप सोसावे लागते पण आत्महत्येचा विचार मात्र मनातून पूर्ण पुसला गेला.

             ३०व्या वर्षी पीडी झालेल्या एका शुभार्थीनी तर एक तरी डॉक्टर पीडी नाही म्हणेल म्हणून विविध न्युरालॉजिस्टचे उंबरठे झिजवले पण या बाबतीत सर्वांचे एकमत झाले..

              खूप दिवस आजाराचे कोणतेच निदान होत नव्हते.तपासण्या करुन कंटाळलेल्या या शुभार्थीनी चला पीडी का असेना, काहीतरी निदान झाले म्हणून बरे वाटले अशी प्रतिक्रिया नोंदवली.

               ४५व्या वर्षी पीडी झालेल्या एका शुभार्थीच्या मते डॉक्टरनी अशा पद्धतीने माहिती सांगितली की,घरातले सगळे घाबरले;रडारड सुरु झाली,नातेवाईक जमा झाले.नंतर आजाराची नीट माहिती समजली.विशेष म्हणजे या शुभार्थीनी नोकरीची सर्व वर्षे पूर्ण केली.पिडी होउन २२ वर्षे झाली स्वतःची कामे स्वतः करतात.त्यावेळच्या प्रतिक्रियेची आता त्याना गंमत वाटते.

                कुस्तीपटु,अ‍ॅथलेट,बॅडमींटन प्लेअर्,वकील प्राध्यापक्,ड्राफ्टसमन,असे व्यवसाय असणार्‍या आणि काम करण्याच्या वयात पीडीनी गाठलेल्याना नैराश्येनी घेरलेल दिसल.तर ४८व्या वर्षी पीडि झालेल्या आणि अनैच्छिक हालचालीची शिकार बनलेल्या एका शुभार्थीनी मात्र आपल्या हालचालींची लाज वाटू न देता पार्किन्सन्सची ऐशीतैशी म्हणत आपला शिक्षिकेचा कार्यकाल पूर्ण केला.

                 काही शुभार्थी मात्र पीडि झाल्यावरच्या नकारार्थी भावनेतून बाहेरच येत नाहीत असे आढळले.३५व्या वर्षी पीडी  झालेल्या एका तरुणाने राग,दु:ख,मलाच का? या संमिश्र भावनेतुन स्वतःच्या कवितांची वही फाडुन टाकली.स्वतःच गायलेल्या गाण्यांची सीडी तोडून टाकली.याला नैराश्येच्या गर्तेतुन बाहेर काढणे गरीब परिस्थितीतील कुटूंबीयाना त्रासाचे होत आहे.मिळवता हातच निकामी झाल्याने पत्नीची अर्थार्जन करुन घर सांभाळायचचे? मुलांचे संगोपन करायचे की पतीकडे लक्ष द्यायचे? अशी कोंडी झाली आहे.आमच्या प्रत्यक्ष भेटीत या शुभार्थीशी खुप गप्पा झाल्या.बोलताना त्रास होणार्‍या या शुभार्थीने स्वतःची एक कविता मोठ्या आवाजात म्हणून दाखवली.अशा व्यक्तीना पुन्हःपुन्हः भेटणे,त्यांच्याशी बोलणे हे खुप गरजेच आहे.आम्ही त्यासाठी अपुरे पडतो.यासाठी मदतीचे हात हवेत.या कुटुंबासाठी आपण फार काही करु शकलो नाही याची नेहमीच खंत वाटते.

                 पार्किन्सन्स झाल्यावरच्या धक्क्यातुन बाहेर न येण्याचे साहित्यातून दिसलेले चटका लाउन जाणारे उदाहरण म्हणजे डॉक्टर विद्याधर पुंडलिकांचे..रागिणी पुंडलिक यांच्या 'साथसंगत' मध्ये याबद्दल त्याना होणारे क्लेश दिसतात.
               "संसार बहरण्याच्या ऐन मोक्याच्या क्षणी आशु गेला.आणि पार्किन्सन्स्नी खिंडीत गाठल.हे अक्षरशः झिजत गेले.याचे माझ्या मनाला क्लेश होतात"
                 "शेवटी कुठल्याही दुखण्यात रुग्णानी मानसिक उभारी दाखवली की रोग बरा व्हायला मदत होते....पार्किन्सन्सच्या.शेवटच्या अवस्थेत काय होते हे वाचल्याने,त्याचे मनन केल्याने, मानसिक दृष्टयां ह्यांच दुखण जास्त जास्तच होत गेल."
                  "अति औषध,अति विचारआणि जोडीला तीव्र बुद्धीमत्ता,ज्या बुद्धीमत्तेच्या जोरावर ह्यानी आयुष्यात मोठेपणा मिळवला.त्याच बुद्धीने ह्याना या दुखण्यात खालीखाली नेऊन दगाच दिला"असा विविध पद्धतीने त्या क्लेश व्यक्त करतात.
               डॉक्टर पुंडलिकही देवावर आणि पार्किन्सन्सवर राग व्यक्त करताना दिसतात.ते म्हणतात,
             "या परमेश्वरावर श्रद्धा कशी ठेऊ? ज्या परमेश्वराने माझ्या आयुष्यातील जेजे सुंदर त्यावर क्रूरपणे घाला घातला.माझ्या संसारातल्या सर्वात गुणी रत्नाला आशुला हिराऊन नेले.लेखन करणारा माझा उजवा हात पार्किन्सन्सने निकामा केला.माझी रसाळ वाणी वक्तृत्व ओरबाडुन नाहीस केल.माझ्या डोळ्यातील मिस्किलपणा घालवून माझी नजर थीज्ज करुन टाकली.या परमेश्वराला मी का मानू?"
             मला राहून राहून त्याना पार्किन्सन्स मित्रमंडळा सारखा स्वमदतगट भेटला असता तर किती बरे झाले असते असे वाटते.अनेकांची अशी नकारात्मक विचारांची प्रक्रिया मित्रमंडळात आल्यावर थांबलेली मी पतेहिली आहे पण या जर तरला अर्थ नाही पण पीडी झालेल्यांपर्यंत पोचण्याची निकड मात्र अशा उदाहरणातुन प्रकर्षाने जाणवत राहते.
              प्रश्नावलीतील ९  जणांना जवळच्या नातेवाईकांच्या अक्स्मात मृत्युला सामोर जाव लागल.यातील ६जणाच्या तर तरुण वयातील अपत्याचाच मृत्यू झाला.यातील ३जण नैराश्यातुन बाहेर येऊ शकले नाहीत.६  जण मात्र जवळच्या व्यक्तिच्या निधनाच दु:ख विसरुन पुढे जाताना दिसतात.केशव आणि अंजली महाजन यांच उदाहरण येथे विशेषत्वाने सांगाव लागेल.१९ वर्षाच्या सिएस करत असलेल्या गुणी मुलीचा कॅन्सरने झालेला मृत्यू पचवून हे जोडप आनंदी जगण्याचा प्रयत्न करत  आहे.मुलीच्या मृत्युनंतर ४८व्या वर्षी श्री महाजन याना पीडी झाला.
              अंजली महाजननी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या.

ऐका आज कहाणी
डोळ्यात येइल पाणी

अशी झालेली सुरुवात
 डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व तपासण्या केल्या.
 पार्किन्सन्स आता आमचा पक्का मित्र झाला.
 पती पत्नी और वो त्रिकोण पुर्ण झाला.
अशी  सकारात्मकतेत बदलत गेली.यातील मित्रमंडळाचा वाटाही त्यांनी नमूद केला.
                  एका अप्रकाशित लिखाणातुन प्रथम नैराश्य नंतर स्विकाराचे झालेले दर्शन आणि त्याच शुभार्थीची नंतर प्रत्यक्षात झालेली टोकाची नकारात्मक अवस्था याबद्दल ही इथ सांगण उचित ठरेल.त्याचे असे झाले डॉक्टर एम डी मोहिरे या कोल्हापुरच्या न्युरॉलॉजिस्टनी पीडीवर तयार केलेली छोटी  पुस्तिका एका नातेवाइकानी आम्हाला पाठवली.त्यातील काही भाग पर्किन्सन्स मित्रमंडळाच्या स्मरणिकेत छापावा असे वाटल्याने त्यांच्याकडे परवानगीसाठी फोन केला.आश्च्यर्य म्हणजे ते फोनवर पार्किन्सन्सविषयी अर्धा पाऊण तास बोलले.त्यानीही काही दिवस स्वतःच्या क्लिनिकमध्ये स्वमदत गट सुरु केला होता.त्यातील एका शुभार्थीचे मनोगत त्यानी पोष्टाने पाठवून दिले.
                    आलीया भोगाशी असावे सादर
                    जगावया आनंदी आयुष्य हे सुंदर.
 अशा मथळ्याने मनोगताची सुरुवात झाली होती.नंतर आजार झाल्यावरची अवस्था लिहिलेली होती.
"माझी त्यावेळची  अवस्था मी आणि माझा रोग अशी होती.शारीरिक हालचाल एकदम ठप्प झाली.माझ्या मुलीने माझे दात घासायचे,मुलाने दाढी करायची, सौने भरवायचे.अशी परिस्थिती घरामधे होती.घरात सर्वात मोठ्ठा असून मी लहान मुल झालो होतो."
                    अशा परीस्थितीत या शुभार्थीनी संगणकाच्या पडद्यावर एक मेसेज पाहिला.
                  ' Moving water cannot be frozen
                   such moving muscles cannot be restricted
                   so keep your muscles always moving
                   to keep yourselves here & there
                   like an average person'
  
.                 हे वाचुन स्वतःच्या हालचाली स्वतः करणे सुरु झाले.ते ६ किलोमिटर चालण्यापर्यंत मजल गेली दुबई वारी झाली.मी व माझा रोग याऐवजी मी व माझे सुंदर जग अशी अवस्था आली काही नाही हा नकारात्मक विचार जाऊन सर्व काही आहे या भावनेतून मानसिक संतुलन वाढले
     
                   याच शुभार्थीचे नंतर पुण्यात मुलाकडे स्थलांतर झाले.असे समजले.पार्किन्सन्स मित्रमंडळाला एक चांगला मदतीचा हात मिळेल म्हणुन आम्ही खुष झालो.पण प्रत्यक्षात मात्र हेच शुभार्थी पुनः नैराश्येच्या भोवर्‍यात अडकलेले.आणि लहान मुल झालेले.थोडक्यात काय पीडीला स्वीकारले तरी त्याबरोबर दबा धरून बसलेल्या नैराश्येचा शिरकाव होऊ नये यासाठी अखंड सावधान रहायला हवे.पार्किन्सन्सला आपण हाकलू शकत नाही. पण नैराश्याला मात्र आपण चार हात लांब ठेवू शकतो.

                  पीडि झाल्याची लाज वाटणे तसेच आपल्याला पीडी झाला आहे हे कोणाला कळू नये म्हणून सतत धडपडणे असेही शुभार्थी दिसतात.नोकरी करत असताना पीडी झालेल्या एका रुग्णाने पीडीच्या गोळ्या पाहुन इतराना पीडी झाला आहे हे समजेल म्हणून मिळणार्‍या वैद्यकीय सुविधावर पाणी सोडले.आमच्याशी झालेल्या भेटीनंतरर आता मात्र त्यानी मंडळात येणे आणि मंडळाच्या कामात सक्रिय सह्भाग घेणे सुरु केले.

                 एका नोकरी करत असलेल्या शुभार्थीने २वर्षे पत्नीपासूनही पीडी झाल्याचे लपवले.
तिला कपाट आवरताना फाइल दिसली.आणि समजले.

                 एक निवृत्त आर्मी अधिकारी,पीडीच शिक्कामोर्तब करायला न्युरॉलॉजिस्टची गरज नाही इतकी सगळी स्पष्ट लक्षणे.औषधाच्या दुकानात पीडीवरील गोळ्या घेताना आढळले.आम्ही अति उत्साहाने त्याना गाठण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या पत्नीने सांगितले त्याना पीडी रुग्ण म्हटलेले आवडत नाही.तुम्ही संपर्क करु नका.
                 एका परगावच्या पेशंटचा मुलगा मुंबइत राहतो.त्याला मित्रमंडळाची माहिती मिळाली.त्यानी आमच्याशी संपर्क साधला.पण स्वतःचा पत्ता दिला.वडिलाना पीडी झालेले सांगितलेले आवडत नाही त्यामुळे त्यांचा पत्ता देत नाही असे सांगितले.

               प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सुचित्रा दाते या पीडी रुग्णाना उपचार म्हणून नृत्य शिकवतात.त्यांच्याकडे आम्ही काहीजण नृत्य शिकायला जात होतो.त्यांच्याकडे येणारे काही पीडी रुग्ण मात्र त्याना पीडी झाल्याचे सांगू इच्छित नव्हते.त्यामुळे त्याना २ गट करावे लागले.नातेवाइक शेजारी यांच्याकडुन अशा रुग्णांची माहिती समजते.पण त्याना लपवायचे असल्याने मंडळ त्यांच्यासाठी काही करु शकत नाही.

               एका शुभार्थीच्या पतीला तिच्या आजाराची लाज वाटते तो  तिला शेजारीपाजारी  जाऊ देत नाही बरोबर नेत नाही. तो ऑफिसला गेल्यावर ती फिरावयास बाहेर पडते.

                  
                  व्यावहारिक कारणासाठी काहीना समाजापासुन लपवणे गरजेचे असते.अशावेळी हे समजू शकते पण लाज वाटते म्हणून लपवल्यास .स्विकाराच्या अवस्थेत लवकर येणे कठीण.

                   या सर्व अनुभवातून पीडिसह आनंदी जगणे हा विचार पोचवण्यासाठी कामाची दिशा कोणती असावी हे समजू शकते.सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पीडिबाबत यथार्थ जाणिवेतून स्विकाराची अवस्था जितक्या लवकर येइल तितक पार्कीनस्न्स्सह आनंदी जगणे अधिक सुकर होइल.पीडिविषयीच अज्ञान,अपुर ज्ञान,चुकीच ज्ञान,यामुळे यात अडसर येतो.

                  पार्कीन्सन्स मित्रमंडळाच्या ११ एप्रिल २०११च्या  पार्किन्सन्सदिनाच्या समारंभात डॉक्टर लुकतुके यानी डॉक्टर एन्,टी. बेक यांचा समस्या मुक्त होण्यासाठीचा ४Aप्लॅन सांगितला.त्यानुसार
              १)  समस्येची जाणीव होणे.(अवेअरनेस)
              २)समस्येचा स्विकार करणे (अ‍ॅक्सेप्टन्स)
              ३)कार्यप्रवण व्यावहारिक निर्णय घेणे.(अफर्मेशन)
              ४)निर्णयानुसार कार्यवाही करणे (अ‍ॅक्शन)

               शुभार्थीने पीडी हीच समस्या मानली तर  समस्या सोडवण्यासाठीचा हा प्लॅन अमलात आणण्यास हरकत नाही.यासाठी स्वतःच स्वतःची मदत करावी लागेल.शिवाय शुभंकर, स्वमदतगट यासाठी आहेतच.

५.हे जीवन सुंदर झाले.- ! (प्रकरण १: असा मी असामी)

·               अनंतरावांनी रीक्षाला हात केला रीक्षा  येत नाही असे पाहून डावा पाय ओढत स्वत:च रीक्षाकडे जाऊ लागले.हात थरथरत होते तोल जात होता."कोथरूडला जायचे आहे"त्यांनी सांगितले
"झेपत नाही तर प्यावं कशाला?"रिक्षावाला उपकार केल्यासारखे त्याना घेत उर्मटपणे म्हणाला

सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेल्या आणि पार्कीन्संन्सचे  रुग्ण असलेल्या अनन्तरावानी बाहेर जाणेच बंद केले स्वत:ला कोशात अडकवून घेतले.
       

·                   जागतिक कीर्तीचा मुष्टियोद्धा महमद अलीला अटलांटामध्ये ओलिंपिक ज्योत घेऊन जाताना स्वत:चा तोल सावरणे कठीण जात होते,हात थरथरत होते दूरदर्शनवर सर्व जणांनी हे दृष्य पाहिले.

·                 लाखो लोकाना आपल्या मुद्राभिनयाने हसवणारे चित्रसृष्टी,नाट्यसृष्टी गाजवणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांचा चेहरा भाववीहीन झाला होता. सलग एकपात्री प्रयोग करणारया पुलंचे बोलणे दिवाणखान्यात त्यांचे जवळ बसले तरी ऐकू येत नव्हते.

·                   सरीता विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका.तिच्या मंत्रमुग्ध करणार्‍या व्याख्यानांनी अनेकजणाना प्रेरणा मिळत होती.पण आताशा तीच बोलण अस्पष्ट झाल होत. बोलण्यासाठी ताकद लावावी लागत होती तिला नैराश्याने घेरले होते.

           
वरील सर्व पार्कीन्संन्स रुग्ण. वलयांकित,सर्वसामान्य,श्रीमंत गरीब,स्त्रीपुरुष ,विकसित देशातले,विकसनशील देशातले असा कोणताच भेद पार्किंन्संन्संकडे नाही.लक्षणावरून निदान केला जाणारा हा चेता संस्थेचा आजार आहे.ही असामी इतर आजाराच्या तुलनेत हटके आहे.

      पीडी पेशंटच्या घरभेटी,आणि परगावच्या लोकांच्या कडून पोस्टाद्वारे प्रश्नावली मागवून माहिती गोळा केली असता विविध प्रकारची माहिती मिळाली.
          
साधारणपणे हा वृद्धांचा आजार असे म्हटले जाते..सरासरी वय ६० वर्षे मानले जाते पण प्रश्नावलीतून ६० वर्षाखालील अनेक व्यक्ती आढळल्या.१२व्या वर्षी पिडी झालेली व्यक्तीही आढळली.या सर्वांचा समावेश "वय आणि पार्किन्सन्स" या स्वतंत्र प्रकरणात केला आहे.
        
हॄदयरोग,मधुमेह्,रक्तदाब्,इत्यादिचे अस्तित्व,आजार वाढण किंवा कमी होण हे मोजण्यासाठी साधने आहेत.पण या बुवाच अस्तित्व शरीरावर लक्षण दिसू लागल्यावरच समजत.आणि ही लक्षणही यानी मेंदूत डोपामाईन तयार करणाऱ्या पेशींची ६०ते७०% मोडतोड केल्यावरच दिसतात इतर मेंदुच्या विकारापेक्षाही हा गोंधळवून टाकणारा आणि गुंतागुंतीचा आहे.या आजाराची कारणे अजून निश्चित सांगता येत नाहीत जगभर याबाबतचे संशोधन चालू आहे. सर्वसाधारणपणे काही अनुवांशिक घटक,शरीरातील विषारी पदार्थ,वयोवर्धन,,वातावरणातील विषारी घटक,काही औषधे,यांच्या एकत्रित परिणामातुन हां आजार होतो असे मानले जाते.               
       
असे असले तरी  याच्या जमेच्या बाजुही आहेत.
             
यासाठी महागड्या तपासण्या नाहीत.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या बर्‍याच शुभार्थीकडे न्यूरॉलॉजिस्टच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय पीडी (पार्किन्सन्स डिसिज) आहे अस सांगणार दुसर काही नसत.काहीजण सांगतात आमचा MRI केला होता."पार्किन्सन्सचे दिवस" नावाच्या मन्दा चित्रे यांच्या मराठी पुस्तकातुनही अशी गरज ध्वनित होत होती.पण ही मेंदूची चाचणी, पीडीच अस्तित्व नसणे सिद्ध करण्यासाठी असते असणे नाही.यातुन ट्युमर आहे का? ?स्ट्रोक आहे का? हे पाहिल जात.ज्यांच्याबद्दल डॉक्टरना अशी शंका येते त्यांचीच ही तपासणी होते.आणि मेंदुत इतर काही समस्या नाही हे पाहिल्यावरच पीडिच निदान केल जात.अर्थात वयोमानानुसार आणि इतर आजार असल्यास तपासण्या कराव्या लागतील.पण त्या पीडीसाठी नसतील तुमच्या गोडधोड खाण्यावर हा गदा आणत नाही.खाण्यापिण्याची खुप सारी बंधनही सांगत नाही. हा तुमच्या आयुष्यरेषेवर परिणाम करत नाही.
    
आमच्या पाहणीत १० शुभार्थिंच्या आइवडिल ,काका याना पीडी आढळला.१२ शुभार्थिंच्या भाउ किंवा बहिणीला पीडी आहे.५ शुभार्थिंच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पालकाना पीडीची लक्षणे होती पण न्युरॉलॉजिस्टनी तपासून शिक्कामोर्तब केले नव्हते.असे असले तरी शास्त्रज्ञांच्या मते  हा अनुवंशिक नाही.
हा संसर्गजन्यही नाही.
  
म्हणून याला घाबरुन जाण्याच कारण नाही. घाबरुन हाकलवायला गेलात तर अधिकच बिथरतो.पण समजून घेतलत, मित्र बनवलत तर याच्यासह आनंदानी राहता येत.
याला समजून घ्यायच तर याच्याबद्दल ज्ञान हवच.कारण भीती निर्माण होते ती अज्ञानातुनच.
प्रश्नावलितून मिळालेल्या माहितीनुसार ६८% शुभार्थीना पार्किन्सन्स या आजाराबद्दलची माहिती नव्हती बर्‍याच जणाना प्रथम डॉक्टरकडूनच प्राथमिक माहिती मिळाली.३९ जणानी पुस्तके वाचून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.२५ जणानी इन्टरनेटवरुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.८ जणानी सिडी,कॅसेट मधुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.एकुणात आपणहुन माहिती मिळवण्याचे प्रयत्न.अपुरेच होते त्यामुळे मित्रमंडळाच्या उद्दिष्टात पार्किन्सन्स साक्षरता हे उद्दिष्ट महत्वाचे आहे.. .
               
पार्किन्सन्स प्राथमिक माहिती 
            
ब्रिटीश चिकित्सक जेम्स पार्किन्सन यांनी १८१७ साली "An essay on a shaking palsy" या निबंधाद्वारे या आजाराची लक्षणे जगासमोर मांडली.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या आजाराला पार्किन्सन हे नाव देण्यात आले.
               
पार्कीन्संन्स  होतो म्हणजे नेमके काय होते?
             
मध्यमेंदूमध्ये Substantia nigra या भागात डोपामिन  नावाचे रसायन तयार होत असते शरीराची हालचाल व तोल सांभाळण्याचे कार्य ते करीत असते.पार्किन्सन्स रुग्णात डोपामिन तयार करणार्‍या पेशी हळूहळू कमी होऊ लागतात. त्यामुळे  शरीराच्या हालचाली मंदावतात.इतर लक्षणेही दिसू लागतात.या पेशींचे कमी होण्याचे प्रमाण वाढले की लक्षणेही  वाढतात.
              
याची गंमत अशी आहे की बहुतांशी रुग्णात सुरुवातीला ही लक्षणे अगदी सूक्ष्म आणि धिम्या गतीने वाढतात. पीडी झालेल्या व्यक्तीला   ही लक्षणे लक्षात येत नाहीत मित्र, कुटुंबीय यांच्याच नजरेत प्रथम येतात.
              
हात पाय कडक होणे(रिजिडिटी),शरिराला कंप्,हालचालीत मंदत्व अशी सर्वसाधारण लक्षणे दिसायला लागली की हा येतोय अस समजायला हरकत नाही.अर्थात हे स्वतः ठरवायच नाही तर न्युरॉलॉजिस्टचा सल्ला घ्यायचा.पीडीशी साधर्म्य असणारे ७/८ तरी आजार आहेत.त्यामुळे सखोल ज्ञानाशिवाय केलेले निदान चुकू शकते..लक्षणावरुन निदान करावयाचे असल्याने हे अत्यावश्यक.
              
येथे आणखीन एका गोष्ट नमूद करायला हवी. बऱ्याच जणांना पक्षाघात (Paralysis) आणि पार्किन्संन्स एकच वाटतात.पण असे नाही पक्षाघातात एखादा अवयव कायमचा बधीर होतो वा लुळा पडतो.संवेदनाशून्यही बनतो.पार्कीन्संन्समध्ये एखादा अवयव ताठरल्यासारखा दिसला तरी त्यात संवेदना असते.
        
लक्षणे
          
लिखित साहित्यातुन,तज्ज्ञांच्या व्याख्यानातुन लक्षणे माहित झाली होती पण अशी लक्षणे असलेल्या व्यक्ती दिसू लागल्यावर ती मनावर नेमकी ठसली. सुरुवातीला असलेली लक्षणे,.त्यात काहींच्या बाबतीत झालेली वाढ,काहींची लक्षणे मात्र फारशी न वाढणे,काहींच्यात नंतर इतरही लक्षणे दिसु लागणे अशा विविध बाबी निदर्शनास येऊ लागल्या.प्रश्नावलीतून त्यांची काही प्रमाणात नोंद करता आली.या नोंदींचा ही पुढे समावेश केला आहे.विविध लक्षणांचा शुभार्थिंच्या मानसिकतेवर झालेला परिणाम,काहींचे लक्षणावर मात करुन आनंदानी जगणे अशी काही निरिक्षणे मनावर कोरली गेली. या सर्वांबद्दल 'मन करारे प्रसन्न 'या प्रकरणात लिहिलेले आहे.
           
पुढे लक्षणांची भली मोठ्ठी यादी दिली आहे. याने घाबरुन  जाण्याचे कारण नाही.कारण ही सर्व लक्षणे एकाच रुग्णात असतात असे नाही.काही लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये कधीच असणार नाहीत:.काही आजार वाढल्यावर दिसायला लागतील.तसेच ही सर्व औषधोपचाराने,पूरक उपचाराने आटोक्यात येऊ  शकतात.ह्याना पीडि झाला तेंव्हा ते निवृत्त झाले होते आणि मी नोकरी करत होते.मला सारखी काळजी वाटायची हे बाहेर गेले आणि नाव पत्ता विसरले तर?हे तोल जाउन पडले तर? याना चक्कर आली तर वगैरे वगैरे आता या अज्ञानाचे हसू येते.माझ्याप्रमाणेच अनेकाना सुरुवातीला माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला की अशा शंका येतात काळजी वाटते. म्हणुन हे सांगावेसे वाटते.
           
माझ्या नवर्‍याला सुरुवातीला कंप होता.आता काही  वर्षानंतर हालचाली मंद झाल्या.पण वेळ लागला तरी स्वतःची कामे स्वतःच करतात.वेळेचे नियोजन करताना या लक्षणाची आठवण ठेवली की झाले.बोलण्यात थोडा दोष निर्माण झाला होता.पण ओंकार, रामरक्षा नियमित केल्याने तो फारसा जाणवत नाही.इतर कोणतीही लक्षणे नाहीत.सांगायचा मुद्दा असा की खाली दिलेली लक्षणे या असामीची सर्वांगिण माहिती देण्याच्या उद्देशाने आहेत.घाबरवून टाकण्यासाठी नाहीत.
                     
अ)  प्राथमिक लक्षणे

       
१)  कंप (Tremors) - या आजारात७०% ते ७५% लोकाना कंप हे लक्षण जाणवते.बहुसंख्य लोकाना हे लक्षण असल्याने कंप म्हणजेच पीडी(पार्किन्सन) असे समीकरण बहुतेकांच्या मनात असते.माझ्याही होते. मित्रमंडळात कंप नसलेले शुभार्थी पाहिल्यावर हा समज दूर झाला.पार्किन्सन्सला मराठीतील प्रतिशब्द म्हणून कंपवात हा शब्द वाप्ररल्यानेही हे वाटू शकते.खर पाह्ता आयुर्वेदानुसार कंप असणारे पीडी रुग्णच कंपवातात मोडतात.पीडिचे कंप नसलेले  रुग्ण इतर वातविकारात मोडतात.पण त्याना कंपवात म्हणत नाहीत.या दोन्ही शास्त्राचा पाया आणि विचारपद्धती हे पूर्णपणे वेगळे असल्याने पीडी(पार्किन्सन्स डीसिज)हा शब्द वापरणे मला तरी योग्य वाटते
हे इतके विस्तारानी द्यायचे कारण एका वृत्तपत्रात आणि एका मासिकात पार्किन्सन्स मित्रमंडळावर लेख दिला असता संपादकीय संस्करण करुन पार्किन्सन्स शब्द बदलून कंपवात शब्द घालण्यात आला.
एका परगावच्या व्यक्तीचा फोन आला. सूर भांडण्याचाच होता.त्यांच्या मते मराठीतील कंपवात शब्द न वापरता पार्किन्सन्स मित्रमंडळ का म्हणता?त्याना समजावून  सांगण्याचा प्रयत्न केला पण ते आपला हेका सोडायला तयार नव्हते.
   
पार्किन्सन्स मध्ये सुरुवातीला  एक हात कंप पावू लागतो. हळूहळू दुसरा हात,पाय हनुवटी असे कंपाचे प्रमाण वाढत जाते.पण कंप हे लक्षण इतर आजारातही असू शकल्याने कंप पार्कीन्संन्समुळेच आहे का हे तज्ज्ञांकडून तपासावे लागते.
            
सतत लिखाण करणार्याना रायटर्स क्रम्प हा विकार होतो तो हातापुरताच असतो.इतर शरीरात पसरत नाही.
          
प्रश्नावलीतील माहिती   नुसार १५० पैकी१२५ जणाना म्हणजे जवळजवळ ८३.३३% % लोकाना कंप हे लक्षण होते.. यातील ९६ जणांच्या पीडीची सुरुवात  कंपाने झाली.
        .
पीडीतील कंप वाती वळल्याप्रमाणे(pil -roliing),विशिष्ट लयीत असतो.झोपेत ते अदृश्य होतात.हस्तांदोलन,स्टिरिंग व्हिलवर हात ठेवणे अशा हेतुपुरस्सर क्रिया करतानाही ते अदृश्य होतात.
           
डॉक्टरकडे जाताना कंप कोठेकोठे आहे,केंव्हा थांबतात,केंव्हा वाढतात या सर्वांचे निरीक्षण शुभंकर आणि शुभार्थीने करणे आणि त्यानुसार माहिती देणे आवश्यक आहे?
            
बर्‍याच वेळा ते essential tremor असू शकतात.हे दारु प्यालेल्यावेळी नाहीसे होतात पण पीडीचे मात्र दारु प्याल्यावर नाहीसे होत नाहीत.अर्थात कंपने पीडीची आहेत का पाहण्यासाठी दारु पिण्याची गरज नाही तर न्यूरॉलॉजिस्टकडे जावे.हे पुनःपुन्हा सांगावेसे वाटते.कारण पार्किन्सन्स मित्रमंडळात येणार्‍या काही जणांच्या बाबतीत कंपने आहेत म्हणुन पीडिचे निदान केले औषधोपचारही सुरु झाला आणि न्यूरॉलॉजिस्टकडील तपासणीत पीडी नसल्याचे आढळले.तोवर हे आमच्या परिवारात रमले.आणि पीडी नसला तरी येत राहीले.ही गोष्ट वेगळी.याशिवाय दरवर्षी सभासदांची यादी अद्ययावत करताना १/२ तरी व्यक्ती आधी पिडीचे निदान झाले आणि परत  पीडी नाही असे निदान झाले म्हणून गळतात.

                  
२)  हालचाली मंदावणे (Bradykinesia)
- 
रुग्णाच्या दैनंदिन हालचालीत मंदत्व येते.जेवणे, खाणे,स्नान कपडे घालणे,बूट घालणे अशा दैनंदिन क्रियांना लागणारा वेळ वाढतो.काही जणांच्यात हालचालीबरोबर बोलणे, विचार करणे या बाबीही मंदावतात.
               
प्रश्नावलीतील माहितीनुसार १५० पैकी १०० जणाना म्हणजे जवळ जवळ ६६.६६% जणाना हालचाली मंदावण्याची समस्या जाणवली..यातील ९ जणाच्या पार्किन्सनची सुरुवातच हालचाली मंदावण्याने झाली.
           
३)ताठरता (Rigidity)- या आजारात हातापायाचे स्नायू कडक होतात कधीकधी त्यामुळे अंग दुखते.खूप काम केल्याने अंग दुखते,चुकीच्या पद्धतीनी झोपल्याने दुखत असावे  अस रुग्णाला वाटत राहते .पण हे दुखतच राहते .चेहर्‍यावरील स्नायुंच्या ताठरतेमुळे चेहरा निर्विकार भावविहीन होतो.चालताना हात हालणे बंद होते,डोळ्याची उघडझाप मंद होते.प्रश्नावलीतील माहिती नुसार १०६ शुभार्थीना ताठरतेची समस्या सतावते.यातील २७ जणांच्या पीडीची सुरुवात ताठरतेने झाली.
            
ताठरता कोणत्या भागात निर्माण होते हे व्यक्तीगणिक वेगळे आढळते श्वसनासाठी लागणारे बोलण्यासाठी  लागणारे स्नायु ताठर झाल्यास बोलण्यावर परिणाम होतो.बोलताना ताकद लावावी लागते.आवाज अस्पष्ट, बारीक होतो.ही समस्या ८८ जणाना आढळली.यातील ८ जणांची पीडीची सुरुवात या लक्षणाने झाली.

         
गिळण्यासाठी लागणारे स्नायु ताठर झाल्यास  गिळण्याची क्रिया मंद होते..३३ शुभार्थीना गिळण्याची समस्या आहे. एका शुभार्थीला तर द्रव पदार्थ  गिळण्यासच फक्त त्रास होतो.
        
वरील तीन महत्वाच्या लक्षणा शिवाय इतरही काही लक्षणे आढळतात.

          
आ) इतर लक्षणे

         
१) शरीराचा तोल सांभाळता येत नाही.रूग्ण पाय ओढत चालतो.तसेच पुढे वाकून चालतो चालताना जवळजवळ पावले टाकली जातात.प्रश्नावलीनुसार ८३व्यक्तीना तोल जाण्याची समस्या आहे.१७ जणांची पीडीची सुरुवात तोल जाण्याने झाली.

           
२)  .ह्स्तकौशल्य आणि हालचालीतील समन्वय(coordination) या बाबी कठीण होतात.काहीवेळा हालचालीतील मंदत्व आणि ताठरता या दोन्हीच्या एकत्रीकरणातुन हे होते काहीवेळा हे स्वतंत्रपणे लक्षण असू शकते.सुईत दोरा ओवणे,बोटानी बारीक गोष्टी उचलणे उदहरणार्थ फोडणीसाठी मोहरी उचलणे.इत्यादी.बाबी समस्या बनतात.हस्ताक्ष्ररात फरक पडतो.ते बारीक होत जाते.कंप असल्यास  लिहिणे कठिण होते.काहीना सही सुद्धा करता येत नाही प्रश्नावलीतील माहितीनुसार १०३जणांच्या हस्ताक्षरात फरक झाला.येथे वापरा नाहीतर गमवा(Use or Loose) हे सूत्र लक्षात ठेवावे लागेल.सही करता येणार नाही अशी अवस्था येउ द्यायची का हे आपणच ठरवायचे.आपण लिहित राहिलात तर ही वेळ येणार नाही.सोबत दिलेले माझ्या नवर्‍याच्या अक्षरातील लिखाण आणि चंद्रकांत दिवाणे या शुभार्थीच्या अक्षरातील लिखाण हा त्याचा पुरावा आहे.अर्थात पूर्वीपेक्षा वेळ लागणार,पूर्वीपेक्षा अक्षर थोडे खराब  असणार हे लक्षात ठेवावयास हवे.ह्यानाही लिहिण्यासाठी तगादा लावला तर कंप वाढतो आणि लिहिणे कठीण होते.
           
३)त्वचा तेलकट होते डोक्यात कोंडा होतो.फक्त ८ जणाना ही समस्या जाणवली.

           
४)इतर लक्षणात बद्धकोष्टता हे मह्त्वाचे लक्षण आहे.बर्‍याच शुभार्थींच्या आजाराची सुरुवातच बद्धकोष्ठतेने होते.बद्धकोष्टता ही समस्या सर्वसाधारण ,असल्याने इतर लक्षणे दिसेपर्यंत हे पीडीचे लक्षण होते हे लक्षात येत नाही.प्रश्नावलीतील ५७ शुभार्थीना ही समस्या  जाणवली.
             
५)झोपेच्या तक्रारी काही जणात आढळतात.वारंवार लघवीला जाणे,रात्री अचानक हाताचा कम्प वाढणे,मानसिक अस्वस्थता यामुळे झोपेच्या तक्रारी निर्माण होतात.निद्रानाशाची समस्या ३३ जणात आढळली.
             
६)तोंडातून लाळ गळणे,ही समस्या खरे पाहता गिळण्याशी संबंधितच आहे.ताठरपणामुळे तोंडातील स्नायुकडून गिळण्याची क्रिया योग्यप्रकारे न झाल्याने लाळ गळते.४२ जणाना ही समस्या आढळली.
             
७) लघवीला त्रास होणे,यात मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे,घाईघाईने मूत्रविसर्जन करावे लागणे असे प्रश्न निर्माण होतात.या समस्या साठीनंतरच्या  पुरुषात पौरुषग्रंथीच्या वाढीमुळेही दिसू शकतात त्यामुळे ही लक्षणे पीडीची आहेत की पौरुषग्रंथीच्या वाढीमुळे हे तज्ञांकडून तपासून  घेणे चांगले.
            
८)विसरभोळेपणा वाढणे ही तक्रार काहीना जाणवते.नावे,दिवस,महिना,साल,नातेसंबंध,नुकत्याच घडलेल्या गोष्टी,घरचा पत्ता,फोनवरचे निरोप इत्यादी गोष्टी आठवेनाशा होतात.बर्‍याच वेळा ही तक्रार वृद्धत्वामुळेही असू शकते.प्रश्नावलीतील ५६ जणाना ही तक्रार आढळली.
                 
९)अशक्तपणा,रक्तदाब कमी होणे,चक्कर येणे या तक्रारीही आढळतात.गिळता न आल्याने खाणे कमी होउनही अशक्तपणा जाणवू शकतो.वृद्धत्वामुळेही असू शकतो.प्रश्नावलीतील् ७७ जणाना तो जाणवला.
     
रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे ही समस्या आजाराचा भाग असू शकते तसेच औषधाचा परिणाम ही असू शकतो.हे तज्ञांकडून समजावून घेणे आणि उपाय करणे चांगले.
                   
१०)फ्रिजिंग म्हणजे अचानक पुतळा होऊन जाणे अशी अवस्था काहींची होते.प्रश्नावलीतील १८ जणाना ही समस्या आढळली.हालचालीचे मंदत्व,आणि ताठरता या दोन्हीच्या मिश्रणातून,तर काहीवेळा स्वतंत्र बाब म्हणूनही हे होऊ शकते.
                  
११)नैराश्य हे आजाराचे महत्वाचे लक्षण आहे. काहीवेळा आजाराची सुरुवातच नैराश्याने होते.कोणताही आजार चिकटला की बर्‍याच जणाना तो स्विकारता येत नाही आणि नैराश्य येते.पीडीमध्ये हे होतेच, शिवाय मेंदूतील रसायनाच्या बदलामुळेही हे होते.बर्‍याचवेळा इतर लक्षणापेक्षा नैराश्येने वेढल्याने व्यक्ती अधिक अकार्यक्षम होते.जीवनात रस वाटत नाही.एकलकोंडेपणा वाढतो.अन्नावरची वासना उडते.पुढील प्रकरणात याविषयी अधिक चर्चा केली आहे.
                 
१२)भासाची समस्या ही आजाराचा भाग म्हणून तर काहीवेळा औषधाचा परिणाम म्हणून असू शकते.वेगवेगळ्या आकृत्या,माणसे,प्राणी दिसणे,काल्पनिक लोकांचे बोलण्याचे आवाज,अशा तर्‍हेचे भास असू शकतात.ताप,झोपेचे चक्र बिघडणे,शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होणे,वृद्धत्व अशी विविध कारणे यामागे असू शकतात.

       
उपचार

         
पार्किन्सनच्या बाबतीत हा आजार पूर्णपणे बरा होणार नाही हे रुग्णांनी व त्याच्या कुटुंबियानी प्रथम स्वीकारणे आवश्यक आहे. मधुमेह,रक्तदाब या आजाराप्रमाणे औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात.रोग पूर्ण बरा होत नसला तरी योग्य औषधोपचाराने अनेक लक्षणावर नियंत्रण आणता येते व रुग्णाचे जगणे सुसह्य होऊ शकते हे पुन: एकदा नमूद करायला हवे.त्यामुळे उपचार पद्धती आजार न वाढता लक्षणे आटोक्यात यावीत अशीच असते.डोपामिनच्या कमतरतेने आजार होत असल्याने बाह्य मार्गाने डोपामिन देणे हे औषधौपाचारात महत्वाचे ठरते.याशिवाय डोपामाईन अगोनीस्ट याप्रकारची औषधे आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत दिली जातात.ही डोपामाइन च्या निर्मितीला मदत करणारी द्रव्ये तयार करतात.या औषधामुळे आजाराची प्रगत अवस्थेतील लक्षणे विकसित होण्याचा काळ लांबविता येतो.

        
औषधाची परिणामकारकता कमी होऊन हालचालीवर मर्यादा येऊ लागल्यास झिजलेल्या पेशीचा समूह काढून टाकण्याचे प्रयत्न चालू आहेत.काही लक्षणे दूर करण्यासाठी स्टीरिओट्कटिक थेलेमोटोमी,पेलीडोटोमी(Pallidotomy) आणि सब थेलेमिक डीपब्रेन स्टीम्युलेशन (Deep brain stimulation) अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.सध्या तिसर्या प्रकारची शस्त्रक्रिया प्रचलित आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळातील नऊ रुग्णांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली आहे.शस्त्रक्रियाही पीडी बरा करत नाही तर लक्षणावरच उपाय करते.

                    आधुनिक वैद्यकाप्रमाणे आयुर्वेद,होमिओपाथी,अक्युप्रेशर,अक्युपन्क्चर,न्युरोथेरपी,ताई-ची,पुष्पौषधी,कलोपाचार युनानी असे अनेक पूरक उपचारही उपलब्ध आहेत.फिजिओथेरपी,योगासने,आहार हेही महत्वाचे ठरतात.अनेक लक्षणावर नियंत्रण आणण्यासाठी या सर्वांचा उपयोग होत असल्याचा अनुभव आहे.याबाबत विविध उपचार पद्धतीच्या तज्ञांनी एकत्र येऊन संशोधन करण्याची गरज आहे.इतर उपचार करताना कोणाच्याही सांगण्यावरून आधुनिक वैद्यकाचे बोट सोडायचे नाही हे मात्र पक्के ध्यानात ठेवावयास हवे.
          पुरक उपचार प्रकरणात याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
         प्रश्नावलीत शुभार्थी कोणकोणती औषधे घेतात ही माहिती घेतली होती.पण त्याबद्दल लिहिणे बोलणे या दोन्ही पातळीवर असमर्थता जाणवली.हा पुर्णपणे वेगळा आणि तज्ञाने हाताळावयाचा विषय आहे असे वाटले म्हणुन ती येथे दिली नाही शुभार्थी पीडीप्रमाणे इतर व्याधीनेही पीडित असतो.बर्‍याच जणाना त्यातली पीडीची औषधे कोणती व इतर व्याधीची कोणती हे माहीत नव्हते.याशिवाय वेळोवेळी औषधात बदलही होतात.एका शुभार्थीनी अमेरीकेला जाताना ४/५ महिन्याची औषधे घेतली होती.नंतर औषधे बदलल्यामुळे त्यानी ती मित्रमंडळास देऊ केली माझ्याकडे प्रश्नावलीत ती औषधे कोण घेते याची नोंद असल्याने मी मोठ्या उत्साहाने . आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणार्‍या व ती औषधे घेणार्‍या शुभार्थिंचा शोध घेतला पण ते शुभार्थी तोवर वेगळीच औषधे घेत होते.
           दुसरी एक घटना घडली.एका शुभार्थीचे भास होण्याचे प्रमाण वाढल होत.हॉस्पिटलमधे ठेवण्याची पाळी  आली.त्यांच्या अमान्ट्रेल(Amantrel)च्या गोळ्या कमी केल्या.दुसर्‍या एका शुभार्थीच्याही भास सुरु झाल्याने अमान्ट्रेलच्या गोळ्या कमी केल्या माझ्या नवर्‍याच्याही या गोळ्या होत्या त्याना भास कधीच होत नाहीत.प्रश्नावली पाहिल्यावर  अमान्ट्रेल  घेणार्‍याना भास होत होते असे नव्हते आणि ज्याना भासाची समस्या होती ते अमान्ट्रेल घेत होते असे नव्हते.मी आमच्या न्यूरॉलॉजिस्टना विचारल्यावर हे व्यक्तिनुसार वेगळे असल्याचे समजले.त्यामुळे औषधोपचाराबाबत स्वतःच्या मनाने आणि इतरांशी तुलना करुन स्वतःच कोणतेही बदल करु नयेत असे सुचवावेसे वाटत.
         पार्कीन्सन्स साठी उपचाराचे महत्व असले तरी पार्किन्सन्सला स्वीकारून पार्कीन्सन्ससंह  आनंदी जीवन जगण्याची कला शिकणे हे रुग्णासाठी सर्वात महत्वाचे ठरते.पीडिला समजून घेऊन स्वीकाराची अवस्था जितक्या लवकर येईल तितके पिडीसह आनंदाने जगणे शक्य होते.आणि ही अवस्था लवकर येण्यासाठी आणि टिकण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर त्याला साथ हवी असते जोडीदाराची,कुटुंबाच्या सहकार्याची,स्वमदत गटाची. पुढील सर्व प्रकरणातून या सर्वाबाबत माहिती आलेली आहे.
·