प्रकरण ६
करोनाची इष्टापत्ती
भारतात करोनाची चाहूल लागली आणि माझ्या मुलीचा फोन आला 'आई बाबांना बागेत हास्यक्लबला पाठवू नको.' तिच्या मते बाबांची लाळ गळते म्हणून ते सतत रुमाल तोंडाकडे नेतात. तो खाली ठेवतात तोच पुन्हा तोंडाकडे नेतात.करोना व्हायरस कोणत्याही स्त्रावातुंनच तुमच्यापर्यंत पोचू शकतो त्यामुळे त्यांनी न जाणेच बरे.तिचे बाबा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बागेत येणाऱ्याना बाग सरकारी आदेशानुसार बंद करण्यात आली आणि माझी समस्या सुटली
एक समस्या सुटली आणि दुसरी सुरु झाली.लॉकडाउन अतिशय कडक झाला. कामवाल्या,माळी सगळेच येणे बंद झाले.सगळी कामे करताना दमछाक व्हायची.सगळा दिवस कामात जायचा.त्यापेक्षा ताण असायचा तो ह्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा.मला काम पडते म्हणून ते मदत करू पाहात.एकदा मी अंघोळीला गेले तर ह्यांनी भांडी घासून ठेवली होती.
ते पानगळतीचे दिवस होते.बागेत पानांचा प्रचंड कचरा झाला होता.सर्व नीटनेटके लागणाऱ्या ह्यांना ते पाहणे शक्य नव्हते.माझे लक्ष नसताना त्यांनी समोरची बाजू झाडून काढली.या काळात माझी भूमिका अत्यावश्यक तेवढे करू..बाकी गोष्टीकाफे दुर्लक्ष करू अशी होती.त्याना ते पटणारे नव्हते.यापूर्वी ते अनेक कामे करत.पण आता पाठीत वाकले होते.कमरेत ताकद नसल्याने फार वेळ ते उभे राहू शकत नव्हते.वळताना तोल जाई.एकदोनदा ते पडलेही होते.नशिबानी फारसे लागले नव्हते. प्रत्येकवेळी असेच होईल असे नव्हते ना? मी त्यांच्यावर लक्ष ठेऊ पहायची आणि हे माझे कधी लक्ष नाही यावर लक्ष ठेवायचे.असा आमचा टाॅॅम & जेरीचा खेळ सुरु झाला.
माझी मुलगी तिच्याकडे दोघांना बोलवत होती.तिच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.तिचा आर्मीत असलेला नवरा राज ऑफ्रिकेत यु.एन.मिशन वर होता. तो सुटीसाठी आला आणि लगेच लॉकडाउन सुरु झाला.त्याला १५ दिवस घरातच कोरोनटाइन मध्ये राहावे लागणार होते.ते संपल्यावर तिच्याकडे जाणार होतो.पास काढणे आदि प्रक्रिया तिला करावी लागणारच होती.
एक दिवशी माझी मैत्रीण लता देशमुखचा चौकशी करायला फोन आला. आमची सर्व परीस्थीती पाहून ती म्हणाली थोडेच दिवसाचा प्रश्न आहे तर मी पोळीभाजी देते.आमची जोडलेली माणसे मित्रमंडळ परिवार कठीण प्रसंगात नेहमीच साथ देत आली.
१५ दिवसांनी आम्ही मुलीकडे आलो.आता आरामच आराम होता.भोवतालचा विचार करायला सवड मिळाली.त्यात पहिला विचार होता तो आमच्या विस्तारित परिवाराचा.म्हणजे पार्किन्सन्स मित्रमंडळ परिवाराचा.परिवाराशी आम्ही इतके एकरूप झालो होतो की आमचे असे वेगळे जीवन राहिलेच नव्हते.मंडळाच्या पातळीवर लॉकडाउनमुळे अनेक प्रश्न उभे राहिले होते.
मित्रमंडळाची दुसऱ्या महिन्यातील सभा नेहमीप्रमाणे झाली होती.त्यावेळी करोनाची हवा होती.पण आम्हाला गांभीर्य समजले नव्हते.जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यासाठी चार पाच महिन्यापूर्वी एस. एम. जोशी हॉल बुक झाला होता. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मेळाव्याची तयारी टिपेला पोचली होती. स्मरणिका शेवटच्या टप्प्यावर होती. निमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार होता. ऋषिकेश पवारची मेळाव्यासाठी शुभार्थींचे नृत्य बसवून घेण्याची तयारी चालू होती. कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी शुभार्थी कामाला लागले होते.मेळाव्याच्या कामाचे वाटप झाले होते. डॉक्टर शिरीष प्रयाग प्रमुख वक्ते म्हणून येणार होते पु. ल. देशपांडे यांच्या पार्किन्सन्सवर उपचार करणारे डॉक्टर प्रयाग, पुलंच्या आठवणी सांगणार होते. करोनाच्या संकटाने एकदम स्टॅच्यू म्हटल्यामुळे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे थांबल्या.
करोना व्हायरसमुळे सगळीकडे घबराट निर्माण झाली होती तसे घाबरण्याचे कारण नाही हे सांगितले जात होते सोशल मिडीयावर सातत्याने काय काळजी घ्यावी ते
सांगितले जात होतेच.शुभंकर,शुभार्थीनी परीस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी पार्किन्सन्स शुभार्थीसाठी विशेष काय काळजी घ्यावी.कोणते मार्ग अनुसरावे हे सांगण्याचे काम मंडळाचे आहे असे आम्हाला वाटले.आणि मंडळांनी ते करण्याचा विडा उचलला.मी 'पार्किन्सन्स विषयक गप्पा' हे सदर लिहित होते.त्याचा मला या कामासाठी छान उपयोग झाला.शुभंकर,शुभार्थींच्या सकारात्मक कृती मला गप्पासाठी विषय पुरवत होत्या. माझ्या लेखनाचे पाहिले वाचक हे असल्याने त्यांना ही नकळत जो पोचायचा तो मेसेज पोचत होता.करोनाने आम्हाला कामाला लावल आणि ती इष्टापत्ती म्हणावी इतक उपयुक्त काम सर्वांच्या एकत्र प्रयत्नातून घडत गेल.
पार्किन्सन्स शुभार्थी बरेचसे जेष्ठनागरिक असतात.
त्यातच पीडीमुळे विविध अवयवात ताठरता येते.श्वसनमार्गात सुद्धा ती असते
त्यामुळे पूर्ण श्वास घेण्याची क्रिया मुळातच होत नसते.श्वसनाशी सबंधित
लक्षणे असणाऱ्या आजारांना तोंड देणे त्यांना शक्य नसते आणि करोनाचे श्वास
घेण्यात अडथळा हे एक लक्षण असते.त्यामुळे जनसंपर्क टाळाणे अत्यंत महत्वाचे होते.
सर्वसामान्य माणसाना लाळ गीळण्याची प्रक्रिया सहज होत
असते पण शुभार्थीना गिळण्याशी संबंधित स्नायूच्या ताठरतेमुळे गिळण्याची
समस्या असते. लाळ अपोआप गिळण्याची प्रक्रिया होत नाही.ती तोंडात साठून
राहते मग जास्त लाळ झाली की तोंडातून अनियंत्रीतपणे गळत राहते.अर्थात सर्वच
शुभार्थीची ही समस्या नसते.करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाकडे सारखा हात
लावू नये असे सांगितले जाते.पण लाळ गळणाऱ्या पीडी शुभार्थीना हे शक्य
नसते.यासाठीही जनसंपर्क टाळणे अधिक गरजेचे होते.
काही शुभार्थीना पगारी केअरटेकरची नितांत गरज होती.केशवराव महाजन यांनाही केअर टेकर लागत होता.अंजली महाजनने तो प्रश्न सोडवला होता. त्यासाठी पास मिळत होते ते मिळवण्याची यंत्रणा काय आहे हे समजाऊन सांगण्याचे काम तिने केले.शेअरिंगमुळे शुभार्थीना उपयोगी अनेक बाबी कळू लागल्या.कुणाला रक्ताची गरज असे फडणीस सरांचा तर रेअर रक्तगट होता.अशावेळी रक्तपेढ्या,रक्तदात्यांची यादी मिळाली.ब्युरोचे पत्ते,रुग्ण सेवक मिळाले.अशा छोट्या मोठ्या गरजांबद्दल ग्रुपवर विचारणा व्हायची.त्यांची सोडवणूक व्हायची.अनेकजण आपले अनुभव सांगत.
पीडी शुभार्थीना मुळातच त्यांच्या लक्षणामुळे सामजिक
भयगंड असतो.आत्मविश्वास कमी होतो तो जाण्यासाठी प्रयत्न केले जात असतात.
लोकात जास्तीतजास्त मिसळायला सांगितले जाते आणि आता याच्या उलटे जन संपर्क
टाळायला सांगितले जात होते. हे काही काळासाठीच आहे धीर धरा. तसेच प्रत्यक्ष जनसंपर्क टाळला तरी फोनवर सोशल मिडीयावर तुम्ही
संपर्कात राहू शकता.मंडळाचे पार्किन्सन्स गप्पा आणि पार्किन्सन्स इन्फो असे
दोन whats App group आहेत यावर तुम्ही गप्पा मारू शकता.येथे सातत्यने कोडी
येतात ती सोडवू शकता.असे काहीना काही सांगावे लागत होते.
नेहमीचे व्यवहार बंद होऊन घरीच बसायचे तर
सर्वसामान्यांना सुद्धा कंटाळवाणे वाटते.उदास वाटू शकते. पीडी शुभार्थीच्या
बाबतीत तर आजाराचा भाग म्हणून नैराश्य,निरसता (Apathy ) हे दाराशीच दबा
धरून बसलेले असतात. येथे शुभंकराची जबाबदारी वाढते.वेळ आनंदात जावा यासाठी
वेगवेगळ्या उपाययोजना आधीच ठरवून ठेवाव्यात.एकत्र कोडी सोडविणे,युट्युब वर
अनेक चांगले चांगले ओंडीओ,व्हिडीओ उपलब्ध आहेत शुभार्थीची आवड पाहून ते
ऐकणे, पाहणे इ. ह्यांना आयपीएचचे व्हिडीओ,दासबोध,कीर्तने असे
वाध्यात्मिक व्हिडीओ,कवितेचे पान हे आवडतात. मी ते लावत असे.
याशिवाय ओरिगामी इतर हस्तकौशाल्याचेही पाहून करण्यासाठी व्हिडिओ उपलब्ध आहेत ते करू शकता.पेंटिंग,विणकाम चित्रकला करू शकता. फक्त रंगवू शकाल अशी चित्रे असलेली पुस्तकेही मिळतात.ती तर सर्वांसाठीच मन रमवणारी.जुने चित्रपट,जुनी चित्रपटातील गाणी ही सुद्धा आनंद देतात.काही शुभंकर, शुभार्थी बागकामाचा छंद जोपासतात.नामस्मरण,ध्यान,प्राणायाम,व्यायाम या गोष्टीही मन रमवतात. ही जंत्री खूप मोठ्ठी होऊ शकते.महत्वाचा मुद्दा काय तर आपल्याला आनंदी राहायचे आहे नैराश्याला फिरकू द्यायचे नाही.थोड्या दिवसांचा प्रश्न हे भरकन निघून जातील.हे ठसवण्यात आम्ही Whats app कृपेने बर्यापैकी यशस्वी होत होतो.
यातच आमची वेबसाईट बनवणाऱ्या डॉ.अतुल ठाकूर यांनी झुमवर ऑनलाईन मिटिंग घेण्याचा मार्ग सुचविला.मार्च महिन्याच्या शेवटी लॉक डाऊन जाहीर झाला आणि लगेच ८ एप्रिलला पहिली ट्रायल मिटिंग झाली त्यानंतर दोन तीन ट्रायल मिटिंग घेतल्या.आणि ११ मे ला पहिली सभा झाली देखील.हे सर्व हाताळायला शिकवण्यापासून तयारी करायला लागली.या कामात शुभंकर रमेश तिळवे यांनी प्रोत्साहन दिले.वापर कसा करायचा सांगितले. अमेरिकेहून मंडळाच्या अध्यक्ष श्यामलाताई शेंडे प्रत्येक सभेला हजर असत.औरंगाबादहून तिळवे पती पत्नी,इंदूरहून वनिता सोमण,दिल्लीहून जोत्स्ना सुभेदार नियमितपणे हजर असत.सुरुवातीला झूम मोफत वापरत असू. ४० मिनिटांनी बंद होई.पुन्हा चालू करावे लागे.लगेच सर्व हजर होत.बहता बघता सारेजण झूम App सॅवी झाले.झूम मिटिंगमुळे परगावचे तज्ज्ञ बोलावणेही सोपे झाले.
स्मरणिकेचे ८० टक्के काम झाले होते.तीचा फायदा सर्वाना मिळावा असे वाटत होते.यात न्यूरॉलॉजिस्ट चारुलता सांखला यांच्या व्याख्यानाचे श्यामला ताई शेंडे यांनी केलेले शब्दांकन होते.शुभंकर, शुभार्थीनी कष्टाने लिहिलेले अनुभव होते.हे सर्वांपर्यंत पोचावे असे वाटत होते.श्यामलाताईंचे चिरंजीव अनिल शेंडे यांनी स्मरणिका वेबसाईटवर का टाकत नाही असे सुचविले. मजकूर शेवटच्या टप्प्यात होता पण अजून थोडे प्रूफ रीडींग आवश्यक होते. मग विनय दीक्षित नी आम्हाला पीडीएफ स्वरूपात मजकूर पाठवायचा आणि आम्ही दुरुस्त्या करून व्हाट्सअप वर पाठवायचे असे करत चुका दुरुस्त झाल्या. हार्ड कॉपी नसताना असे तपासणे आणि तेही मोबाईलवर हे आमच्या साठी सोपे नव्हते. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत चुका दिसत राहिल्या आणि अगदी आदल्या दिवशीपर्यंत विनयने कंटाळा न करता त्या दुरुस्त करून दिल्या.वेब एडिशनसाठी स्मरणिका तयार झाली.
झूम मिटिंगमुळे घरात दोनतीन चेहरे पाहणार्यांना वेगवेगळे चेहरे दिसू लागले.थोडेफार बोलणे होऊ लागले.मुख्य म्हणजे, प्रत्यक्ष मासिक सभांना परगावचे लोक हजर राहू शकत नसत.त्याना हजर राहता येऊ लागले.माझी मुंबइला राहणारी नणंद अचानक एक दिवशी झूम मिटिंग वर दिसली.हे बरेच दिवस तिला मिटिंगला हजर राहण्याबाबत सांगत होते.तिला पाहून ह्यांना आणि ह्याना पाहून तिला खूपच आनंद झाला.
मासिक सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता.एक अडचण होती.ती म्हणजे काही जणांकडे स्मार्ट फोन नव्हते.whats app वर नसणार्यांना अशा मिटिंग चालू आहेत हेही माहिती नव्हते.हे सर्व कळण्यासाठी त्यांची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी आणि करोनाकाळात आम्ही तुमच्याबरोबर आहोत.सर्व मिळून आलेल्या परिस्थितीशी सामना करू हे सांगण्यासाठी पुण्यातील,परगावच्या सर्व सभासदांना फोन करायचे ठरले.फोनवरून नेहमीप्रमाणे ११ एप्रिलचा ठरलेला मेळावा करोनामुळे रद्द झाला आहे हे सांगावे लागणार होते.दर वर्षी प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेचे काम झाले होते.पण प्रिंटींग शक्य नव्हते.त्यामुळे स्मरणिका ऑनलाईन प्रकाशित होणार होती हेही सांगायचे होते.स्मार्ट फोन घ्यायला प्रवृत्त करायचे होते.हे काम आमची कार्यकर्ती वैशाली खोपडेने चोख पार पाडले.प्रत्येक सभासदांचे सविस्तर अहवाल तिने दिले.या संवादातुन अनेकजण Whats app ग्रुपवर सामील झाले.
Whats app विद्यापीठ म्हणून थोडे हेटाळणीने या साधनाला संबोधले जाते.आम्हाला मात्र या साधनाने मदतीचा हात दिला.ग्रुपने महाष्ट्रातीलाच नाही तर देश परदेशातील शुभंकर, शुभार्थीना जवळ आणण्याचे, आनंदी ठेवण्याचे मोट्ठे काम केले.अनेकांच्या सुप्त कलागुणांना अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ मिळाले.गीता पुरंदरे रोज सकाळी नवनवीन पुष्परचना टाकून रोजजी सकाळ प्रसन्न करू लागल्या.रमेश तिळवे घरतील रोजच्या वस्तूंतून विविध कलाकृती करू लागले.त्यात काय वापरले आहे हे शोधण्यात सभासद रंगू लागले.पार्किन्सन्सच्या गोळ्यांच्या वेष्टनातूनही दागिने ही त्यांची कल्पना तर अफलातून.डॉ.जावडेकर,भूषणं भिसे यांची सुंदर पेंटिंग मन मोहून टाकू लागली.
उमेश सलगर स्वत: केलेल्या अनेक
पाककृतीचे फोटो टाकू लागले.याशिवाय 'वो भुली दास्ता' हा
राजेंद्रकृष्ण
यांच्या गाण्यांचा रंगतदार कार्यक्रम
त्यांनी
केला.रोज चार गाणी आणि निवेदन असा सात दिवस हा कार्यक्रम होता.त्यानंतर 'प्रेम आणि प्रेमगीते','रात्र सुरांची तुमची आणि आमची',मजरूह सुलतानपुरी यांची गाणी असे कार्यक्रम
सादर केले.आम्ही दोघांनीही हे कार्यक्रम खूप
एन्जॉय केले.सलगरांची एक वेगळीच बाजू सर्वांसमोर आली.असे असले तरी ज्यांना गाण्यात रस नाही अशा अनेकांना इन्फो ग्रुपवर याची अडचण वाटू लागली.संगीत प्रेमिसाठी 'वो भुली दास्ता' असा स्वतंत्र ग्रुप केला.
आत्तापर्यंत फक्त यादीत यांची नावे आहेत एवढाच मंडळाशी संबध असलेल्या व्यक्ती प्रकाश झोतात आल्या.त्यांच्या प्रतिभेच्या नवनवीन अविष्कारांनी ग्रुपला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.त्यांना आलेले प्रतिसादही तेवढ्याच ताकदीचे असत.सोलापूरच्या भूलतज्ज्ञ डॉ.क्षमा वळसंगकर यांच्या कवितेवर संगीतबद्ध झालेला सुरेश वाडकर,प्रियांका बर्वे यांच्या आवाजातील व्हिडीओ युट्युबवर आला.त्यांच्या नवनवीन कविता ग्रुपवर येऊ लागल्या.विविध विषयावर पुस्तके लिहिलेल्या डॉ.विद्या जोशी,छाया फडणीस यांच्याही कविता येऊ लागल्या.किरण सरदेशपांडे यांचे खुसखुशीत प्रतिसाद आणि लक्षणावर नियंत्रण करण्याच्या प्रयत्नाचे फोटो येऊ लागले.ही काही उदाहरणे.याकाळात मित्रमंडळाच्या कामाचा डोलारा.Whats-app ग्रुपने तोलला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
whats app वरील अभिव्यक्ती पाहून
अतुल ठाकूर यांनी महिन्याच्या नियमित सभेबरोबर आठवड्यातून एकदा अनौपचारिक
सभा घ्यावी असे सुचवले.या सभेत शुभंकर,शुभार्थींच्या कलेचा
परिचय,कथा,काव्य,साहित्य,कला,गप्पागोष्टी,यांची रेलचेल असेल.त्यांच्यातील
तज्ज्ञ व्यक्तींचे वेगवेगळ्या विषयावर मनोगत असेल.शुभार्थी,शुभंकर
यांच्यासाठी हा सकारात्मक उर्जेचा स्त्रोत व्हावा अशी अपेक्षा होती.दसर्याच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांच्या मनोगताने सुरु झाला.याला 'भेटू आनंदे' असे नाव देण्यात आले.सुरुवातीला हे महिन्यातून दोनदाही होत.पण आता सर्व स्थिर स्थावर झाल्यावर महिन्यातून एकदाच होतो.
या सर्व सभांचे रेकॉर्डिंग झुमवर होई.अतुल ते युट्युब चॅॅनलवर टाकत. मंडळाचे आधीपासून असलेले युट्युब चॅॅनल आता भरगच्च झाले.अनेकांना त्यातून मंडळाची माहिती समजू लागली.कलागुणांना वाव मिळाल्याने शुभार्थी खुश झाले.त्यांचा आत्मविश्वास वाढला.इतर शुभार्थीना प्रेरणा मिळू लागली.
आमच्याप्रमाणेच थांबलेले जग संभ्रमावस्थेतुन बाहेर पडून आपले मार्ग शोधत होते.यातच एक दिवशी गेली दहा बारा वर्षे आमच्या शुभार्थीना नृत्य शिकवणारे ऋषिकेश पवार यांचा मला फोन आला.त्यांनी आधीपासून नृत्यक्लास करणार्यांचा ऑनलाइन क्लास सुरू केला.नविन लोकांसाठी आता एक नवीन batch त्याला करायची होती.तीर्थळी काका एकटे आले तरी क्लास घेणार असेही त्यांनी मला सांगितले. निवेदन दिल्यावर पुण्यातील लोक आलेच शिवाय नाशिक, औरंगाबाद, मुंबई, बेळगाव, बेंगलोर असे परगावचे शुभंकर, शुभार्थी ही जॉईन झाले. बारा मे पासून हा क्लास चालू झाला.आम्ही दोघेही सामील झालो.डान्सचा क्लास माझ्या मुंबईच्या नणंदेनेही चालू केला. आता भाऊ बहिणीची त्यानिमित्ताने भेट होऊ लागली.
डान्स क्लासमध्ये सुरुवातीला गाण्याच्याच तालावर काही एक्सरसाईज त्यानंतर विविध गाण्यांवर कोरिओग्राफी असे.शेवटी पुन्हा थोडे व्यायाम आणि .सर्वजण हृषीकेश येण्यापुर्वीच तयार असत.तास कसा निघून जाई समजत नसे.थोड्याच दिवसात एका गाण्यावर व्हिडीओ करून देण्याचा होमवर्क दिला.सर्वांनी तो आवडीने केला.आम्ही मुलीकडे असल्याने आम्हाला या सर्वात कोणतीच तांत्रिक अडचण येत नव्हती.हळूहळू नृत्यामुळे ह्यांचा पीडी नियंत्रणात येऊ लागला.तोल सांभाळणे,स्टीफनेस कमी होणे,आत्मविश्वास, मुख्यता आनंद मिळणे.हे फायदे दिसू लागले.
नृत्याप्रमाणे ह्यांचा आवडीचा हास्यक्लबही ऑनलाईन सुरु झाला.विठ्ठल काटेसर आणि सुमन ताई व्यायामाचे प्रकार,प्राणायाम घेत.मकरंद टिल्लू हास्य प्रकार घेत.प्रमोद खोपडे वाढदिवस साजरे करायचे काम करत.ज्यांचा वाढदिवस आहे ते आपला अनुभव सांगत.हजारोनी सभासद असत.महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातून आणि परदेशातूनही लोक सामील झाले.यात विविध वयोगटातले,विविध जातीधर्माचे,शहरी,ग्रामीण भागातले.अत्यंत दुर्गम भागातील ही होते. उच्चपदस्थ,व्यावसायीक, शेतकरी, गृहिणी असे विविध स्तरातले असत.वाढदिवसाचे अनुभव सांगताना ही विविधता सर्वांपर्यंत पोचे.विविधतेतून एकतेचे उत्तम उदाहरण होते.करोनामुळे अनेकांना व्यायामाची संधी उपलब्ध झाली.
याच काळात PDMDS म्हणजे पार्किन्सन डिसीज मुव्हमेंट डीसऑर्डर सोसायटी या मुंबई हॉस्पिटलच्या स्वमदत गटानेही ऑनलाईन मिटिंग सुरु केल्या.त्यांची मिटिंग आठवड्यातून एकदा असे.आम्ही त्या मिटींगमध्ये हजर राहणे सुरु केले.व्याख्यानाबरोबर फिजिओथेरपि,हस्तकला असेही उपक्रम असत. वारली पेंटिंग चा १५ दिवसाचा मोफत वर्ग त्यांनी सुरु केला.पहिले एक ऑनलाईन व्याख्यान झाले आणि नंतर व्हिडीओ पाठवले जाऊ लागले. आम्ही दोघांनीही त्यात सहभाग घेतला.माझ्यापेक्षाही ह्यांनीच तो मनापासून केला.दोन दोन तास ते न कंटाळता पेंटिंग करत.या काळात त्यांचा पार्किन्सन थांबलेला असे.
त्या काळात डॉ. अनुराधा करकरे यांच्या 'माइंड जिम' संस्थेने दर महिन्याला एक थीम घेऊन दर शनिवारी ऑनलाईन सभा सुरु केल्या'.शरीर आणि मनाचे नाते',' निवडक मानसोपचार पद्धतीची तोंडओळख', 'कौटुंबिक स्वास्थ्य' ही काही उदाहरणासाठी नावे.
डॉ आनंद नाडकर्णी यांची IPH,यश वेलणकर यांच्या SIPE Mindfulness तर्फेही ऑनलाईन व्याख्याने होत.अश्या कितीतरी संस्था बुद्धीला खाद्य देत होत्या.सकारात्मकाता,मनोबल वाढवत होत्या.रोज कोणती ना कोणती ऑनलाईन सभा असे.ऑनलाईन असल्याने पुण्याशिवाय इतर गावचेही तज्ज्ञ असत.एरवी आम्ही बाहेर पडून ही कधीच ऐकली नसती.'गंगा आली रे अंगणी'.असे झाले होते त्यात आम्ही चिंब भिजत होतो.
आम्ही मुलीकडे असल्याने कोणतीच जबादारी नव्हती.फारसे काम नसे.भाजी निट करून आणि चिरून देणे, कणिक मळणे अशी किरकोळ कामे मी करत असे.करोनाने आम्हाला आराम आणि नातू,लेक जावई यांचा सहवास मिळवून दिला होता.एरवी राहायला बोलावले तर पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम आहे असे निमित्त असायचे. आता घरात बसून ते साध्य होत होते.प्रोजेक्टरवर उत्तम चित्रपट पाहत होतो.खडकी स्टेशनच्या मागे घर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहताना आम्ही लहान होत होतो.दोन बाल्कन्या होत्या.एका बाल्कनीतून फुटबॉल मैदान दिसे. मुले,मोठ्ठी माणसे खेळताना दिसत.घरात डॉक्टर असल्याने तोही आधार होता.आमच्यासाठी तो आयुष्यातला सुवर्ण काळ होता.
एकच अडचण होती. माझा साथीदार पीसी तेथे नव्हता. माझे लिहायचे वांदे होत.इच्छा असली की मार्ग सापडतो.मी मोबाईलवर लिखाण चालू केले.की बोर्ड लहान असल्याने माझी बोटे चुकीच्या अक्षरावर पडत.डिलीट करण्यात अर्धा वेळ जाई.मग मी बोलून लिहिण्याचे तंत्र शिकून घेतले.इतर व्यवधान नसल्याने या काळात माझे जास्तीत जास्त लिखाण झाले.मंडळाचे कार्य करोनामध्ये चालू ठेवणाऱ्या अतुल ठाकूर आणि ह्रषिकेश यांच्याबद्दल लिहिण्याचे कितीतरी दिवस मनात होते.ते या काळात लिहून झाले.अनेक शुभार्थीना फोन झाले.
सगळे छान चालले असले तरी या काळात परिचित,नातवाईक यांचे करोनाने घेतलेले बळी मन विषण्ण करत होते.अशातच काळजी घेऊनही करोनाने आमच्याच घरात प्रवेश केला.राज म्हणजे माझा डॉक्टर जावई ऑफ्रीकेला नोकरीवर रुजू झाला.आणि दुसर्याच दिवशी ह्यांना ताप आला.ताप आला की ह्यांना अजिबात हालचाल करता येत नाही ताप नॉर्मल झाला की हेही नॉर्मल होतात.हे माहित असल्याने इतकी भीती वाटली नाही.तरी एक समस्या निर्माण झाली.त्यांना बाथरुमला जायचे होते. बाथरूम बेडरुमपासून दूर होते.ते बेडपॅन घ्यायला तयार नव्हते. आत्तापर्यंत कधी अशी वेळ आली नव्हती.मी आणि श्रद्धाने त्यांना खुर्चीवर बसवले आणि खुर्ची ओढत ओढत बाथरूम पर्यंत नेली. न्यूरॉलॉजिस्ट हेमंत संत यांची ऑनलाईन Appointment घेतली.त्यांनी दोन तीन दिवस पाहून हॉस्पिटलमध्ये न्यायचे का ठरवू असे सांगितले.दुसरे दिवशी ताप उतरला. आम्ही बिनधास्त झालो .तिसरे दिवशी पुन्हा ताप आला.मुलगी राहते त्या मजल्यावर डॉक्टर होते. त्याच बिल्डींग मध्ये खालीही दोन डॉक्टर होते. पण ते कोणी यायला तयार झाले नाहीत.माझ्या मुलीला त्यांच्या बरगड्यांच्याकडे थोडी घरघर जाणवली.आमच्या फॅमिली डॉक्टरना फोन केला.त्यांनी लगेच एक्सरे काढायला लागेल असे सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात हे सर्व कठीण होते.सह्याद्री हॉस्पिटलमधील न्युरो सर्जन रणजीत देशमुख यांच्यामुळे कोथरूड सह्याद्री मध्ये नेले.ते पूर्ण पणे कोविद हॉस्पिटल होते पण एक रुम इतरांसाठी होती.एक रात्र राहायला लागणार होते.तेथे जाण्यासाठी लागणारे सर्व नियम पाळून मोठ्ठी मुलगी सोनालीने गाडीची व्यवस्था केली.ती,जावई सलील, श्रद्धा आणि आम्ही दोघे.असे खडकीहून कोथरूडला गेलो.मी ह्यांच्याबरोबर राहायच्या तयारीने गेले होते परंतु कोणालाच बरोबर राहता येणार नव्हते.ह्यांचे बोलणे इतराना समजत नसल्याने संवाद कसा होईल असे मला वाटत होते. व्हीलचेअरवरून यांना आत नेले.आम्ही सर्व घाबरलेलो. हे मात्र एखाद्या फॉरेन ट्रीपला निघाल्यासारखे हसत हसत आम्हाला बाय करत होते.
दुसर्या दिवशी चहा आणि ब्रेकफास्टची सोय जवळ राहणारी भाची दीपाली आणि धनंजयने केली.दुसर्या दिवशी कोविद टेस्ट निगेटिव्ह निघाली पण छातीत इन्फेक्शन होते.ते ठीक होईपर्यंत हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार होते.डेक्कन सह्याद्रीला हलवायचे ठरले.अम्ब्युलन्समधून श्रद्धाने त्यांना तेथे नेले.नॉर्मल ward मध्ये ठेवले होते.श्रद्धा त्यांना जेवण घेऊन गेली.कोणी राहिले तरी चालणार होते.हॉस्पिटल प्रोसिजर प्रमाणे पुन्हा कोविद टेस्ट केली Positive निघाली.त्यांना कोविद ward मध्ये हलवले.आता ह्यांच्याशी भेटणे, बोलणे बंद झाले दिवसातून एकदा हॉस्पिटलमधून फोन येणार होता.त्यांच्या पार्किन्सनच्या गोळ्या निट घेतल्या जातील ना याची मला काळजी होती.मी Whats-app वर गोळ्या किती आणि केंव्हा द्यायच्या याचा चार्ट काढून पाठवला.त्यांना काही हवे असले तर त्यांनी बोललेले समजेल का? ही शंका मनात होतीच.रोज १२ नंतर मी हॉस्पिटलच्या फोनची वाट पहायची.त्यावेळी डॉक्टर राउंडला येत आणि त्यानंतर फोन येई.१२ नंतरचे क्षण मला युगा युगासारखे वाटत.आमचे गोल्डन डे संपून अंधार्या खाईत लोटल्यासारखे वाटत होते.सापशिडीच्या खेळात आपण डाव जिंकण्याच्या अगदी जवळ आलो असताना ९९ व्या घरातल्या सापाच्या तोंडात यावे आणि झरकन खाली घसरावे तसे झाले होते.
संपर्कात येणाऱ्या सर्वाना कोविद टेस्ट करावी लागणार होती.श्रद्धा तर त्यांच्याबरोबर असल्याने ती पॉझिटिव्ह निघेल असे वाटत होते.हाही एक ताण होता. मी,मुलगी आणि नातू यांची आर्मी हॉस्पिटलमध्ये टेस्ट झाली.नशिबाने ती निगेटिव निघाली.संपर्कात आलेल्या इतर सर्वांचीही निगेटिव्ह निघाली.
हॉस्पिटलमधून कधी कधी फोन उशिरा येई.मी मुलीना सारखे तुम्हाला मेसेज आला का विचारत राही.त्या समजावत फोन नाही त्याअर्थी सर्व ठीक आहे.सिरिअस असले तर मात्र लगेच फोन करतातच.त्यांची तब्येत स्थिर असे.ऑक्सिजनही लावावा लागत नसे.विलगीकरण चे पंधरा दिवस असत ते हॉस्पिटल मध्ये ठेवायचे ठरले.(या काळात लेखन हाच माझा आधार होता.)
हॉस्पिटलमधून घरीच आणायचे ठरले.मुलीकडे ऐन वेळी डॉक्टर मिळणे कठीण झाले.आमच्या शेजारीच शेठ कुटुंबीय राहतात.त्यांच्या घरी राजू लीना आणि प्रणिता असे तीन डॉक्टर आहेत.आमची दोन कुटुंबे एक असल्यासारखीच आहेत.हे घरचेच डॉक्टर असल्याने.आम्हाला त्यांचा आधार वाटतो.त्यामुळे हा निर्णय घेतला.करोनामुळे कोणाचे येणे जाणे नको म्हणून मुलीनी सर्व कामे करण्यासाठी २४ तासांची बाई ठेवली.आमच्या नशिबाने त्या आमच्या घरातल्याच होऊन गेल्या.त्या घर तर स्वच्छ ठेवतच शिवाय प्रेमाने चविष्ट खायला करून घालत.मी ह्यांच्याकडे पूर्ण वेळ बघू शकेन असे वाटले.१५ दिवसात ह्यांच्या पार्किन्सनचे काय झाले असेल? याची मनात चिंता होती.ह्यांना घरी आणले तर स्ट्रेचरवरून आत आणावे लागले.स्वत:च्या पायावर उभेही राहता येत नव्हते.माझ्या पोटात खड्डा पडला.चेहऱ्यावरचे हसू मात्र तसेच होते.ते पाहून थोडा धीर आला.हे फायटर आहेत नक्की या अवस्थेतून बाहेर येतील असे वाटले.
त्यांना इन्फेक्शनसाठी गोळ्या दिल्या होत्या त्याचा साईड इफेक्ट म्हणून त्यांना लूज मोशन होत होते.ते थांबवण्यासाठी औषध द्यायची गरज नाही.गोळ्या संपल्या की आपोआप थांबेल असे डॉक्टरांनी सांगितले.आल्या आल्या त्यांना मोशन झाल्यावर ते आवरायचे कसे समजत नव्हते.ते इतके बारीक झाले होते.पुसताना त्वचा फाटेल असे वाटत होते.मी आणि सोनालीने कसेबसे ते केले. डायपर, कॉटन मागविले.ते कसे घालायचे हेही माहित नव्हते.त्यांना स्वत:च्या पायावर उभेही राहता येत नव्हते.पाय घसरायचा.जेवण मात्र जात होते.स्वत: जेवता येत नव्हते.भरवावे लागत होते.हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी ते सर्व कामे स्वत:ची स्वत: करायचे.व्यायाम, प्राणायाम करायचे.तासभर उभे राहून डान्स क्लास करायचे.मुलीचा टेरेस Flat होता.जिना चढून जाऊन तेथे आम्ही चालायचो.१५ दिवसात सर्व बदलले होते.
काही दिवसासाठी केअरटेकर ठेवावा लागेल असे वाटले.लगेच केअर टेकर बोलावला.तो एक दिवस आला आणि दुसरे दिवशी आलाच नाही.पुन्हा दुसरा ब्युरो.सकाळी,दुपारी वेगळे,वेगळे केअरटेकर यायचे.आम्हाला बाहेरचा संपर्क नसलेला २४ तासाचा ब्युरो हवा होता.शेवटी असा मिळाला.अशोक गायकवाड.माझ्या नातवाच्या वयाचा होता.तो एकीकडे बहिस्थ पध्दतीने बी.ए.आणि दुसरीकडे एम.पी.एस.सी.चा अभ्यास करत होता.तो अत्यंत प्रेमाने मनापासून व्यवस्थित काम करत होता.मी समाजशास्त्राची प्राध्यापक होते हे समजल्यावर आणि आमच्याकडे असलेली त्याला उपयुक्त पुस्तके पाहून फारच खुश झाला.ह्यांचे आवरून झाले की तो अभ्यास करत असायचा.
ह्यांना थोडी ताकद आली.व्हीलचेअरवरून घरातल्या घरात फिरवणे सुरु झाले. प्रत्येक छोट्या गोष्टीचे अप्रूप वाटत होते. आम्ही फोटो काढून मुलीना पाठवायचो.स्वत:चे स्वत: जेवायला लागले.स्वयमपाकघरात येऊन बसू लागले.धरून चालवत आणू लागलो.बाथरुममध्ये अंघोळीला नेऊ लागलो.अंघोळ झाल्यावर पूर्वीप्रमाणे जप,गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचणे,प्राणायाम मेडीटेशन चालू झाले. महिन्याभरात आकाशने परीक्षेच्या तयारीसाठी काम सोडले.त्याचा इतका लळा लागला होता.तो जाताना ह्यांना मिठी मारून रडला.काकांच्याक्डून खूप शिकायला मिळाले म्हणाला.त्यांनी विपश्यना केली होती.पण पुढे मेडीटेशन चालू ठेवले नाही.ह्यांचे पाहून तो मेडीटेशन करू लागला.त्यानंतर किरण आला तो CS करत होता.त्यानेही मनापासून काम केले.या मुलांना करोना काळात काम नसल्याने पडेल ते काम करत होते. २४ तास असल्याने खाण्या जेवण्याचा प्रश्न सुटत होता.
दरम्यानच्या काळात आमच्या जवळ असणाऱ्या न्युरोफिजिओथेरपिस्ट अभिलाषा गुंदेशा यांना बोलावले त्यांनी काही व्यायाम सांगितले. त्यांची असिस्टंट रेनिसा व्यायाम करवून घेण्यासाठी येऊ लागली.तिच्याकडे आम्ही यापूर्वीही जात होतो.ह्यांच्याशी तिचे छान जमत होते.यांच्यात भराभर सुधारणा होत होती.चार दिवसातच व्हीलचेअर जाऊन वाकर आला.अभिलाषा आणि रेनिसा दोघीही ह्यांच्या प्रगतीवर खुश होते.आता ते खुर्चीवर बसून डान्स क्लासही करू लागले.सर्व मंडळाच्या झूम मिटिंग पाहणे तर त्यांनी लगेचच सुरु केले होते.करोनाचा जोर कमी झाला होता.बंधनेही शिथिल झाली होती. बागा खुल्या झाल्यावर काही दिवस जेष्ठ नागरिकांना प्रवेश नव्हता.आता तो सुरु झाला.केअर टेकर रोज बागेत फिरायला नेऊ लागला.आता अनेक परिचित भेटू लागले.ह्यांची प्रगती पाहून आता अर्धा वेळ केअर टेकर ठेवण्याचा निर्णय घेतला.
मार्च २१ मध्ये Vaccination चालू झाले यावेळीही Whats app group वर भरपूर चर्चा झाली.Vaccine घ्यावे की घेऊ नये.असा संभ्रम अनेकांच्या मनात होता.कोठे घ्यावे प्रायव्हेट हॉस्पिटल की सार्वजनिक? अनेकांचे Vaccine घेतलेले फोटो येऊ लागले.कोणालाच त्रास झाला नव्हता.सार्वजनिक दवाखान्यातुनही चांगली सेवा मिळत होती.आम्ही दोघांनीही सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये Vaccine घेतले.ह्यांना एका दिवस ताप आला बाकी काही त्रास झाला नाही.
मंडळाच्या पातळीवर मासिक सभा, झूम मिटिंग नियमित चालू होत्या.जानेवारी आल्यावर मेळाव्याचे वेध सुरु होतात.यावर्षी काय करायचे हा प्रश्न होता.ऑनलाईन मेळावा घ्यायचा का? सर्वांनाच हे पटले.अतुलनेही आनंदाने मान्यता दिली.स्मरणिकेचे काय करायचे? त्यासाठी वातावरण अनुकूल नव्हते.२०२० साली स्मरणिका ऑनलाईन प्रकाशित झाली. मासिक हातात घेऊन वाचण्याचा आनंद वेगळाच असतो.त्यामुळे मिटिंग घेऊन कार्यक्रमाची आखणी केली. ती स्मरणिका २०२० आणि २१ ची एकत्र स्मरणिका म्हणून प्रकाशित करायचे ठरले.२०२० ते २०२१ या काळातील कामाचा आढावा त्यात समाविष्ट केला.
या आढाव्यात आयकर विभागाच्या Section 80 G Income tax Act 1961 नुसार पार्किन्सन्स मित्रमंडळास देणगीत सवलत मिळण्यास सुरुवात झाली.ही आनंदाची माहिती देता आली.
ऑनलाईन मेळाव्याची मिटिंग घेऊन कामाची आखणी केली.डॉ.शीरीष प्रयाग यांचेच व्याख्यान ठेवायचे ठरले.त्यांनी 'दोन ध्रुव' असा विषय दिला.पु.ल.देशपांडे आणि तेंडूलकर हे दोन दिग्गज लेखक शेवटच्या काळात प्रयाग हॉस्पिटलमध्ये होते.त्यांचे अनुभव ते सांगणार होते.शुभार्थीना कलाकृतीचे फोटो पाठवायला सांगितले.कलाकृती करणाऱ्या शुभार्थींची माहिती सांगत कलाकृतींचा डिस्प्ले करायचे ठरले.हृषीकेश ऑनलाईन नृत्यासाठी तयारी करत होता.
११ एप्रिल २०२१ चा जागतिक पार्किन्सन्स दिन मेळावा.प्रथमच ऑनलाईन होणार होता आमचे वेबडिझायनर अतुल ठाकूर यांच्या भरवशावर आम्ही हे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस करत होतो.आदल्या दिवशी रंगीत तालीम घेतली तेंव्हा अतुल पुढे बरेच challenges वाढून ठेवले आहेत हे लक्षात आले होते.कार्यक्रमाच्या दिवशी साडेचारला कार्यक्रम सुरू व्हायचा होता दुपारी एक वाजता पुन्हा रंगीत तालीम झाली.अतुलने रात्रभर काम करून बरेच प्रश्न सोडवत आणले होते.पण अजून कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण डॉक्टर दाम्पत्यांचे व्याख्यान हा विषय अधांतरीच होता.आम्ही Ventilator वर आहोत असे वाटत होते.मार्चपासून आमचे सत्वपरीक्षा देणे चालूच होते.
कार्यक्रमाचा आराखडा ठरल होता.त्यानुसार सर्व कामाला लागले होते.स्मरणिका प्रकाशन हा त्यातील एक भाग. हत्ती गेला शेपूट राहिले होते.पण ते बाहेर पडेपर्यंत दमछाक झाली.कोरोना वाढत चाललेला.शासन नियम वेळोवेळी बदलत होते.कधी काय बंद होईल शाश्वती नसल्याने सारखी टांगती तलवार.काही कामे प्रत्यक्ष जाऊनच संगणकासमोर बसून करायला हवी होती.अशातही कोरोनाचा विचार न करता आणि बाहेर पडायचे नाही ही माझी सुचना धाब्यावर बसवून मृदुला आणि आशानी विनयकडे सातत्याने बसून काम पूर्ण केले.
शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन हाही कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो.आम्हाला प्रोत्साहन देणारे, सक्रीय सहभाग असणारे आणि प्रामुख्याने तांत्रिक ज्ञान असणारे उत्साही शुभंकर रमेश तिळवे कलाकृतींचे काम पाहणार होते.ते कोविदाच्या विळख्यात अडकले.कलाकृती गोळा करण्याचे काम मी करु शकत होते.पण तिळवे ज्या तांत्रिक करामती करून गम्मत आणणार होते ते मला जमणारे नव्हते.जबाबदारीच्या ओझ्याखाली आधीच वाकलेल्या अतुलने आपणहून ती जबाबदारी घेतली.
अडचण आली की प्रत्येकवेळी मानसिक हतबलता येत होती.परंतु सतत नवनवीन धक्के देणाऱ्या पार्किन्सन्स मित्रामुळे अडचणीवर मात करायची सवयही झाली आहे.
एप्रिल उजाडला.डॉ.प्रयाग यांचे व्याख्यान हा मेळाव्याचा महत्वाचा भाग होता.त्यांच्याशी संपर्काचे काम आशा रेवणकर करत होती.निमंत्रण पत्रिकेवर विषय काय द्यायचा हे ती विचारणार होती.आता निमंत्रण पत्रिका पोष्टाने जाणारच नव्हत्या.ऑनलाईन पाठवायच्या होत्या,नाहीतर दरवर्षी निमंत्रणे तयार होऊन पोस्टात पडतातही.दोन तारखेला सकाळी आशाचा निरोप आला 'दोन ध्रुव' नाव सांगितले.त्यांच्या पत्नीने नाव सुचविले.त्याही बोलणार आहेत.बाकी नंतर बोलते.तीच्या स्वरावरून मला काळजीच वाटली.
दुपारी मेसेज आला रेवणकरना आयसीयूत ठेवलय.MRI आहे.त्यानंतर MRI नॉर्मल आल्याचाही मेसेज आला.अजून दोन दिवस मुक्काम वाढला असाही मेसेज आला.काय झाले समजत नव्हते.ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.तरी डॉक्टरना मेसेज करत होती.चार तारीख आली.अजून निमंत्रण पत्रिका तयार नव्हती डॉ.प्रयाग. यांच्याशी बोलणे झाल्याशिवाय ती तयार होऊ शकत नव्हती.शेवटी मी आशाला डॉ. प्रयाग यांचा नंबर दे असा मेसेज केला.मृदुलाने निमंत्रण पत्र तयार करण्याचे काम हातात घेतले.कच्चा आराखडा करून डॉ.प्रयाग यांना पाठवला.त्यांचे लगेच उत्तर आल्यावर मृदुलाने तिच्या ओळखीच्या माणसाकडे निमंत्रण पत्रिका करायला दिली.
कार्यक्रमाचे एक आकर्षण हृषीकेश पवारने बसवलेला डान्स
हे असते.मी स्वत: त्याच्या डान्सक्लासमध्ये सहभागी असल्याने त्याला
येणाऱ्या अडचणी मला दिसत होत्या.ऑनलाइनबरोबर रेग्युलर क्लास चालू झाला
होता.सर्व नियम पाळून जवळचे लोक यात सहभागी होत होते.लॉकडाऊनमुळे ते बंद
झाले लाइव्ह कार्यक्रम देण्याची शक्यता राहिली नाही.त्यातच हृषीकेश आजारी
पडला डॉ.नी विश्रांती सांगितली तरी त्याचे ऑनलाईन क्लास घेणे चालूच
होते.इंटरनेटच्या व्यत्ययाने क्लास बुडत होते.त्याला मी म्हणत होते
तब्येतीपेक्षा दुसरे काही महत्वाचे नही तर त्याचे म्हणणे 'We must keep our
spirit high' ९ तारीख आली तरी व्हिडीओ आला नव्हता.आम्ही आधीच्या
कार्यक्रमाचे काही व्हिडीओ काढून ठेवले होते.शेवटी डान्स क्लिप,सहभागींचे
शेअरिंग आणि स्वत:च्या मनोगतासह हृषीकेशचा व्हिडिओ ९ तारखेला रात्री आला..
हे सर्व चालू असताना पाच तारखेला आणखी एक धक्का. .मृदुलाचा फोन आला आई सिरीयस आहे मी रत्नागिरीला चाललेय.त्या अवस्थेतत तिने निमंत्रण पत्रिका ज्यांना करायला दिली त्यांचा फोन दिला.या गडबडीत आणखी एक गोष्ट चालली होती.११ एप्रिल जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त आकाशवाणीवर परिक्रमा कार्यक्रमात मंडळाची माहिती सांगणारी मुलाखत होणार होती ते कामही मृदुला पाहत होती.मुलाखतीसाठी मी आणि आशा जाणार होतो त्याबद्दलचे सर्व अपडेट्सही तिने दिले
गौरी लागू मुलाखत घेणार होत्या.त्यांचा फोन नंबर दिला.त्यांनी करोनामुळे घरून फोनवरही मुलाखत देता येईल असे सांगितले होते.आशाला तर आता शक्यच नव्हते.घरून मी एकटीनेच मुलाखत द्यायचे ठरले आकाशवाणी द्वारे अनेकांच्यापर्यंत पार्किन्सन्समित्रमंडळाची माहिती जाणार होती त्यामुळे तेही महत्वाचे होते.
मृदुला कऱ्हाडपार्यंत पोचली आणि तिला आई गेल्याचे कळले.ती खरे तर शनिवारी आईला भेटून रविवारी परत आली होती.आणि पुन्हा लगेच तिला सकाळी जावे लागत होते.त्यातही तिने उरकलेली कामे पाहून तिच्याबद्दलचा आदर आणि प्रेम यांनी माझे मन भरून आले.
त्या दिवशी दुपारी कार्यकारिणीची मिटिंग ठेवली होती.अनेक अडचणीमुळे ती
सारखी पुढे ढकलली जात होती शेवटी मृदुला नसली तरी मिटिंग घ्यायचे
ठरले.कार्यक्रमाला फक्त पाच दिवस राहिले होते,त्यात शनिवार, रविवार पूर्ण
लॉकडाऊन असल्याने शुक्रवारपर्यंत सर्व आवरायला हवे होते.आशा सोमवारीच
हॉस्पिटलधून घरी आली होती रेवणकर आता बरे होते पण पाच दिवस हॉस्पिटलमध्ये
असल्याचा शिण आला होता. त्यामुळे ती खूप थकली होती.
सूत्रसंचालनाचे काम मृदुला करणार होती. मंगळवारी मृदुलालाच्या अनुपस्थितीतच कार्यकारिणी मिटिंग झाली.इतक्या अडचणी येत होत्या तर प्रत्येक कामासाठी A बरोबरच B,C,D असे पर्याय ठेवावे लागले होते.मीटिंग मधून छान सूचना आल्या.दीपाने श्यामला ताईंचे,पटवर्धन सरांचे,प्रार्थना म्हणणाऱ्या पोटे आणि मीनल या शुभार्थीचे, वक्त्यांची ओळख करून देणाऱ्या आशाचे असे सगळे व्हिडिओही घ्यावेत असे सुचविले.ऐनवेळी तांत्रिक अडचण आली तर व्हिडीओ लावता येणार होते.तिने व्हिडीओ कसा असावा याचे बारकावे सांगणारे टीपणही तयार करून दिले.सविताने कार्यक्रमाचा क्रम आणि प्रत्येकाला किती वेळ आहे हे सांगणारी कार्यक्रम पत्रिका तयार केली.
मृदुला मिटींगला नव्हती पण मी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करेन असे तिने
सांगितले.दु:ख विसरून तिच्याकडे असलेली कामे करायला तिने सुरुवात
केली.स्मरणिका तयार झाल्या.प्रयाग डॉक्टरांच्या कडे स्मरणिका आणि बॅनर
पाठवायचे होते. विनयने ते नेऊन दिले.
सर्वाना सांगितल्यानुसार एकेक व्हिडीओ यायला सुरुवात झाली.आता फक्त पटवर्धन यांचा व्हिडिओ यायचा होता.आता परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटत असताना एक जबरदस्त धक्का देणारी घटना घडली.कार्पोरेशनने प्रयाग हॉस्पिटल कोविद वार्ड म्हणून जाहीर केले होते.डॉक्टर पतीपत्नींवर प्रचंड जबाबदारी आणि ताण होता. ते प्रयत्न करणार होते तरीही ११ तारखेला झूम मिटिंग जॉईन करु शकतील का हे त्यानाही सांगता येणे शक्य नव्हते.केंव्हा कोणती इमर्जन्सी येईल हे सांगता येत नव्हते.आमच्या सर्वांचे अवसानच गळाले.
२०२० मध्ये दीपा आणि आशा डॉ.प्रयाग यांच्याकडे ११ एप्रिलच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण द्यायला गेल्या होत्या.त्यांच्या अगत्यपूर्ण वागणुकीने भाराऊन गेल्या होत्या.ते क्रिटीकल केअर तज्ज्ञ असल्याने 'पार्किन्सन्स पेशंट आणि इमर्जन्सी' असा विषय घेऊन गेल्या होत्या डॉक्टर म्हणाले तुमचा हा सोहळा असतो असा विषय कशाला घेता ? मी विषय सुचवू का आणि त्यांनी पूल आणि तेंडूलकर यांच्या आठवणी हा विषय सुचविला.लॉकडाऊन झाला.कार्यक्रम रद्द करावा लागला.नंतर आम्ही ऑनलाईन कार्यक्रम सुरु झाल्यावरही त्याना बोलवायचा प्रयत्न केला पण ते कधी अमेरिकेला गेले.कधी आजारी पडले अशा अडचणी निघत राहिल्या शेवटी या वर्षीच्या ऑनलाईन जागतिक मेळाव्यासाठी त्याना बोलवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो त्यांच्या भाषणाची चातकाप्रमाणे वाट पाहत होतो आणि ही अडचण आली.
डॉक्टरना नाहीच जमले तर इतक्या
कमी वेळात कोणाला विचारायचे.आमच्या हितचिंतक वृद्धशास्त्राच्या
अभ्यासक,कृतीशील लेखिका.रोहिणी ताई पटवर्धन यांची आठवण झाली.त्यांना मी
फोन केला अडचण सांगितली.त्या खानापूरला होत्या तेथे रेंज नसते. त्या
म्हणाल्या तरी मी काहीही करीन आणि हजर राहीन.त्यांच्या आश्वासनाने धीर
आला.पण ही वेळ आली नाही.परंतु इतक्या ऐन वेळी मदतीस तत्पर असलेल्या
रोहिणीताईंच्या बद्दलचा आदर वाढला.
सविताने त्यांना त्यांच्या वेळेनुसार घरून व्हिडीओ करून देण्याचा पर्याय सुचविला.या पर्यानुसार फक्त प्रश्नोत्तरे होणार नव्हती.हॉस्पिटल कोविद वार्ड झाल्याने त्यांच्या मागचा कामाचा व्याप आणि ताण पाहता त्याना वेळ कसा मिळणार असे आम्हाला वाटत होते पण त्यांनी आम्ही रात्री किंवा पहाटे रेकोर्डिंग करू असे सांगितले. नॅशनल,इंटरनॅशनल अशा मोठमोठ्या सेमिनारमध्ये ते सहभागी होत असल्याने त्यांच्याकडे अद्ययावत तांत्रिक यंत्रणा होती आणि ते उत्तमरीत्या हाताळूही शकत होते.मागे Banner लावणे,स्मरणिकेचे प्रकाशन हे सर्व मी व्यवस्थित करीन असे सांगत त्यांनी आम्हाला आश्वस्त केले.
आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता रंगीत तालीम घेतली.आलेले व्हिडिओ ओपन होणे,सलग व्यवस्थित दिसणे यात अडचणी येत होत्या.अतुलनी कलाकृतींचे प्रेझेंटेशन तयार केले होते ते व्यवस्थित होत होते.शक्यतो सर्व गोष्टी लाईव्ह करता येतील का पाहिले गेले.दुसर्या दिवशी पुन्हा सकाळी ११ वाजता रंगीत तालीम घ्यायचे ठरले.तंत्रज्ञान न समजणाऱ्या आम्ही सर्व बायका आणि बेभरवशी तांत्रिक साधने यांच्यासह अतुलला काम करावे लागत होते. को होस्ट असलेला आमचा छोटा मित्र गिरीश कुलकर्णीचा थोडा आधार होता.
अतुलची आता सत्व परीक्षा होती त्यांच्याकडे आलेले व्हिडीओ इनपुट गुणवत्ता
वेगवेगळी होती.इंटरनेट बंद होणे,संगणक hang होणे,संगणक हळू चालणे या
गोष्टी त्यांच्या हातात नव्हत्या.High resolution व्हिडीओज दाखवण्यासाठी लागणारा संगणक त्यांच्याकडे नव्हता.साधनसामग्रीची कमतरता.काही गोष्टी
घ्याव्यात तर त्यावेळी शनिवार रविवार पूर्ण बंद असा कडक आदेश झाला होता.त्यामुळे तेही शक्य नव्हते.या
सगळ्या अडचणीवर त्यांनी संगणक जास्तीत जास्त स्मूथ चालेल यासाठी संगणकावर
कमीत कमी गोष्टी ठेवणे असे काही मार्ग शोधले ११ तारखेच्या रंगीत तालमीत
व्हीडोओ चांगले चालले.अतुलने थोडा जरी माउस हलवला तर व्हिडिओ चालत नव्हता
त्यामुळे कार्यक्रमाच्यावेळी लोकांना आत घेण्याचे काम गिरीशने करायचे
ठरले.अतुल पूर्ण वेळ म्यूट असणार होते.सुत्रसंचलन करणाऱ्या मृदुलाला अतुलला
काही सांगायचे असले तर खाणाखुणांनी सांगावे लागणार होते.त्याचीही रंगीत
तालीम झाली.व्हिडिओ चालेपर्यंत तिला काही तरी ऐनवेळी बोलत राहावे लागणार
होते.हे सर्व तिच्यासाठी आवाहनच होते.
अजूनही पटवर्धन आणि महत्वाचा म्हणजे डॉक्टर प्रयाग यांचा व्हिडीओ यायचा होता.एवढ्यात व्हिडिओ तयार आहे पण सेंड होत नाही असा डॉक्टरांचा मेसेज आला.कोणाला तरी पाठवले तर पेनड्राईव्हवर ते देऊ शकणार होते.त्या दिवशी कडक बंद असल्याने कोणालाही पोलीस सोडत नव्हते.व्हिडीओचे दोन भाग केले तर कदाचित पाठवता येईल असे आशाने सुचविले.आता मात्र आम्ही Ventilator वर होतो आणि याच क्षेत्रातले तज्ज्ञ डॉ.प्रयाग यांच्या हातात सर्व होते.शेवटी दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान व्हिडिओ अतुलकडे सेंट झाला.अतुलने सांगितले व्हिडिओ लोड व्हायला बराच वेळ लागेल त्यामळे दुसरे काही सांगू नका.याच दरम्यान पटवर्धन यांचा व्हिडिओ मी अतुलकडे पाठवला होता.पटवर्धन यांनी मेल वर लिखित मजकूरही पाठवला होता.अडचण आल्यास तो कोणीतरी वाचावा असे सांगितले होते.ते काम अंजलीकडे सोपवण्यात आले.
पावणे दोनच्या दरम्यान अतुलचा डॉक्टरांचा व्हिडीओ लोड झाल्याचा मेसेज आला.पटवर्धन यांचा एक व्हिडिओ लोड झाला होता. एक ओपनच होत नव्हता.कार्यक्रम होइपर्यंत कोणाच्याच जीवात जीव नव्हता.साडेचारला कार्यक्रम सुरु होणार होता.आम्ही चारलाच झूमवर हजर झालो.डॉक्टर द्वयीचा व्हिडीओ थोडासा लावून पहिला चांगलाच चालत होता.वेळेवर मिटिंग सुरु झाली.आम्ही श्वास रोखून पाहत होतो.पहिल्या प्रार्थना,श्यामाताईंचे मनोगत व्यवस्थित झाले.पटवर्धन यांचे मनोगत वाचणारी अंजलीला ऐनवेळी तांत्रिक अडचण आली आणि प्रसंगावधान वापरून अतुलने लोड झालेला पटवर्धन यांचा व्हिडीओ लावला.
सर्व व्यवस्थित चालले होते आता डॉक्टर शिरीष आणि आरती प्रयाग
यांचे आगमन झाले.त्यांनी स्मरणिकेचे प्रकाशन केले.त्यांच्या मागचा बॅनर
सुंदर दिसत होता.पु.ल.देशपांडे आणि विजय तेंडुलकर या दोन दिग्गजांचा शेवटचा
काळ प्रयाग हॉस्पिटलमध्ये गेला.डॉक्टर आरती यांनी त्यांच्यावर
बोलण्यासाठी दोन ध्रुव हे सार्थ नाव सुचविले होते. दोन परस्पर भिन्न
व्यक्तीमत्वांचा प्रयाग दाम्पत्यावर झालेला परीस स्पर्श हळुवारपणे उलगडला
जात होता.आता विचार करताना वाटते हॉस्पिटलमध्ये एवढी गडबड चालू असताना
त्याना एकमेकाशी चर्चा करायला वेळही मिळाला नसेल तरी एकमेकांच्यात पूर्ण
समन्वय असलेले, सूत्रबद्ध,नेमके,दोन धृवांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा उलगडून
दाखवणारे हजारो ऐकणार्यांवर गारुड करणारे वक्तव्य डॉक्टर दाम्पत्याना कसे
काय शक्य झाले.तेही तेवढेच दिग्गज आहेत म्हणूनच.महाराष्ट्र सरकारने
पु.लं.च्या शेवटच्या दिवसात सरकारी खर्चाने जगातल्या कोणत्याही देशात
उपचारासाठी जाण्याची तयारी दाखवली होती पण सुनीता बाईनी माझा शिरीषवर पूर्ण
विश्वास आहे आम्ही येथे समाधानी आहोत असे उत्तर दिले.यापेक्षा हॉस्पिटल,
आणि डॉक्टर यांच्यासाठी मोट्ठे प्रमाणपत्र कोणते असू शकते? पुर्ण वेळ दोघे
डॉक्टर आपल्यासमोर बसून गप्पा मारत आहेत असेच वाटत होते.गप्पांच्या शेवटी
ते भावूक झाले. ऐकणाऱ्या सर्वांना त्यांनी भावूक केले.(व्याख्यान
युट्युबवर आहे.ते मुळातूनच ऐकाव )
हा कार्यक्रम आम्ही दोघे शेजारी बसून ऐकत होतो,पाहत होतो.कार्यक्रम संपला तेंव्हा आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होते. इतका वेळ आपण शेजारी आहोत याचे भान नव्हते.सर्वांचीच अशी अवस्था असणार.
एकुणात आमचा ऑनलाईनचा पहिला प्रयोग यशस्वी झाला होता.काही तासापूर्वी आम्ही Ventilator वर आहोत असे वाटत होते.परंतु डॉ.शिरीष आणि डॉ.आरती प्रयाग यांनी आम्हाला अलगद Ventilator वरून थेट विश्वाच्या अंगणात आणून सोडले होते.आणि आम्ही मस्त रसपान केले.
आत्तापर्यंत कधीही न आलेली या थोर व्यक्तींची
ऐतिहासीक आणि मराठीभाषेचे लेणे ठरावी अशी माहिती हजारो लोकांच्यापर्यंत
पोचली. ती पोचवण्याचे आम्ही माध्यम झालो हे आमच्यासाठी अभिमानाचे होते.यावर
कडी म्हणजे कार्यक्रमानंतर डॉक्टर दाम्पत्यांचा आम्हाला मनोगत व्यक्त
करण्यासाठी व्यासपीठ दिलेत त्याबद्दल धन्यवाद असे सांगणारा फोन आला कोणतीही
मदत लागली तर आम्ही दोघे केंव्हाही तयार आहोत असे सांगणारी पुस्तीही
त्यांनी जोडली.आधीच भारावून गेलेली आशा, अनेक वर्षांची ओळख असल्याप्रमाणे
आतापर्यंत आलेला सर्व ताण,आम्हाला येणाऱ्या अडचणी त्यांच्यापुढे सांगून
मोकळी झाली.या समारंभामुळे दोन थोर व्यक्तिमत्वे आमच्या परिवारात सामील
झाली हे केवढे मोट्ठे फलित.यात मोट्ठे श्रेय अतुलचे होते.पण त्याने 'इदं न मम' म्हणत परमेश्वराची कृपा असे उत्तर दिले.
कितीतरी दिवस या सुखद आठवणी सर्वांच्याच मनात रेंगाळत होत्या.तरी एप्रिल मधील भेटू आनंदे सभा घेण्यास आम्ही सज्ज होतो.सातत्याने सभा चालू राहिल्या.झूम मिटिंग आमचा सेमिनार हॉल झाला. झूम मिटिंग,ती जॉईन करता आली नाही तर युट्युबवर व्हिडीओ पाहणे आणि त्यानंतर Whats app वर त्यावरील उपयुक्त चर्चा,भरभरून कौतुक यामुळे बघता बघता परिवार मनाने जोडला गेला.घराच्या दिवाणखान्यात बसून मोकळेपणी चर्चा करावी तसा,Whats app वर संवाद होऊ लागला.हा अनौपचारिक संवाद हीच आता आमची ताकद होऊ लागली.इतरांना मात्र वाटते या मागे कार्यकारिणी स्त्री सदस्य आहेत.
हाच मुद्दा धरून नवरात्राच्या दरम्यान पर्किन्सन्समित्रमंडळाची स्त्री शक्ती असे आम्हीच एकमेकींविषयी लिहिले.नवीन सभासदांना कार्यकारिणीची ओळख व्हावी हा हेतू होता.हे लिहिले तरी आम्हाला, आमच्या मागे पुरुषशक्ती आहे वेबसाईट झूम मिटिंग,युट्युब या सर्वाची धुरा समर्थपणे हाताळणारे अतूल ठाकूर, यादी अद्ययावत करणे.सभासदांच्या वाढदिवसाला अनिमेशनच्या सहकार्याने आकर्षक शुभेच्छा देणे अशी कामे करणारे रमेश तिळवे,whats app चे admin,तांत्रिक सल्लागार मयुर श्रोत्रीयमहत्वाचे म्हणजे आम्ह्या पाठीवर वेळोवेळी कौतुकाची थाप देणारे संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन,मंडळाच्या कामात मोठ्ठा वाट असणारे रामचंद्र करमरकर. अशी काही नावे सांगता येतील.तसेच सर्व शुभंकर शुभार्थीची शक्ती आहे.याची जाणिव होती आणि आहे.तसेच 'I am because we are' हे उबंटू तत्त्वज्ञान मंडळाकडून होणार्या कामासाठी लागू आहे अशीही धारणा आहे.
आता २२ सालच्या मेळाव्याचे वेध लागले.वातावरणातील भीती थोडी कमी होत होती.नेहमीप्रमाणे स्मरणिकेसाठी लेख मागवणे सुरु झाले.अनेक शुभंकर, शुभार्थीनी लेख पाठविले.या वर्षीच्या स्मरणिकेतील बहुसंख्य लेख त्यांचेच होते.मासिक सभा, भेटू आनंदे, हे ऑनलाईन कार्यक्रम आणि whats app मुळे जे उत्साहाचे,आनंददायी वातावरण तयार झाले होते त्यामुळे सर्वांची उमेद वाढली होती.त्याचे प्रतिबिंब या लेखातून स्पष्ट दिसत होते.या काळात आमचे प्रिंटर विनय दीक्षित यांची खूप मदत झाली.वातावरण निवळले असले तरी जेष्ठ नागरिकांनी थोडी काळजी घ्यायला पाहिजे असे वाटत होते.आम्ही काम करणारे सगळेच जेष्ठ.बरेच लेख ऑनलाईन पाठवले.काही लिखीत लेख आणणे,प्रुफे तपासायला घरी आणून देणे हे काम विनयनी केले.बाहेर जाण्याचे धाडस करून शेवटचा हात फिरवण्यास आशा,मृदुला जात होत्या.
वातावरण निवळले होते हॉल मोकळे झाले होते. मास्क बांधून कार्यक्रम केले जात होते.एकूण परीस्थिती पाहून आणि आपल्या सभासदांच्या सुरक्षिततेचा विचार करून आम्ही कार्यक्रम ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला.
मागील वर्षी प्रमाणेच शुभार्थींच्या कलाकृती,नृत्य,स्मरणिका प्रकाशन हे असणार होते.प्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांची मजेत कसे जगायचे या विषयावर मृदुला कर्णी या मुलाखत घेणार होत्या.२०२१ च्या अनुभवाने आता आम्हाला आत्मविश्वास आला होता.तरी एक अडचण आलीच हृषिकेशचे पहिले निवेदन ऐकू आले आणि डान्स परफॉर्मन्सला तांत्रिक अडचण आली.हे वगळता २०२२ कार्यक्रम छानच झाला.
आता स्मरणिका पाठवण्याचे काम होते.प्रत्यक्ष सभा असली की उपस्थित सर्वाना तेथेच स्मरणिका दिल्या जातात. ऑनलाईन सभा झाल्याने सर्व सभासदांना स्मरणिका पाठवायच्या होत्या. यावेळी कुरिअर सर्व्हीसकडे हे काम सोपवले.
आता करोनाचे सावट टळले होते.सर्वांनी Vaccine घेतल्याने बाहेर पडण्याचे धाडस गोळा झाले होते.प्रत्यक्ष भेटण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.पुढील प्रकरणात त्याबद्दल लिहिले आहेच.
एकूण करोना काळाबद्द्ल थोडक्यात सांगायचे म्हणजे करोनाने उच्छाद मांडला होता तरी आमच्यासाठी तर ही इष्टापत्तीच ठरली होती.त्या काळाने दिलेली देणगी करोना मिटिंग अजूनही चालू आहेत.परगावच्या लोकांना,बेड रीडन लोकांना,उन, पाउस, दंगली,रस्ता रोको यांची अडचण न येणाऱ्या या मिटिंग आता आमच्या करयचा अविभाज्य भाग झाल्या आहेत.घ्यायचा तर अनेक चांगल्याच गोष्टी घडल्या मंडळासाठी हा टेक ऑफ पिरिएड म्हणावयास हरकत नाही.
No comments:
Post a Comment