Wednesday, 24 July 2024

झाले मोकळे आकाश

                                                        प्रकरण ६

  •                                 झाले मोकळे आकाश

                           आता करोनाचे सावट टळले होते.मनातील भीतीही कमी झाली होती.Vaccine घेतल्याने बाहेर पडण्याचे धाडस गोळा होत होते.

                अंध:कार दूर होऊन आता आकाश मोकळे झाले होते.मंडळाच्या कामासाठी चारी दिशा खुणावत होत्या.वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क वाढत होता.

                      १८ ऑक्टोबर २०२१ ला मुंबई येथील तुलसी ट्रस्टच्या ग्रेसफुल लिविंग या जेष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाअंतर्गत पार्किन्सन्स मित्रमंडळ बद्दल माहिती सांगण्यासाठी मला आमंत्रित केले.मिटिंग ऑनलाईन होती.मुलाखतीचा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवर आला.अनेकांपर्यंत पार्किन्सन आणि मंडळ पोचले.माझ्या मुलाखतीतील नृत्योपाचारा बद्दल ऐकून तुलसीट्रस्टने नृत्यगुरु हृषीकेश पवारचीही मुलाखत घेतली.

                     हृषीकेशने शिरोळे रोड येथे ऑफलाईन डान्स क्लास चालू केला.ऑनलाईन क्लास चालूच होता.आम्हाला बरेच अंतर असल्याने नेहमी जाणे शक्य नव्हते.आम्ही अधून मधून गेलो.प्रत्यक्ष क्लासची रंगत वेगळीच हे लक्षात आले.हृशिकेशच्या वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये भाग घेण्याची संधी शुभंकर, शुभार्थीना मिळत होती.आम्ही दोन कार्यक्रमात सहभागी झालो होतो.ह्यांचा आत्मविश्वास वाढण्यास त्यामुळे मदत झाली.

                    जून २२ मध्ये  पार्किन्सन्समित्रमंडळाची माहिती अनेकांपर्यंत पोचण्याची एक संधी चालून आली.वृद्धांचे पालकत्व या आज २३००० सभासद असलेल्या फेसबुक ग्रुपवर फेसबुक लाईव्ह गप्पा मारता आल्या. यासाठी कार्यकारिणीकडून मी,शुभार्थी तर्फे किरण सरदेशपांडे आणि शुभंकर  प्रतिनिधी म्हणून अनुश्री डेग्वेकर यांनी सहभाग घेतला.गप्पा रंगवण्याचे काम किरण सरदेशपांडे आणि अनुश्रीनी केले.अनेकांनी त्यानंतर संपर्क केला.ग्रुपच्या admin मेधा कुलकर्णी यांनी मंडळाची वेबसाईट आणि युट्युबची लिंक ग्रुपवर देण्यास आणि या आजाराबाबत आणि सपोर्ट गृपबद्दल लेख लिहिण्यास सांगितला.त्यातून बरेच शुभार्थी ग्रुपमध्ये सामील झाले.काही फक्त फेसबुक ग्रुपवर सामील झाले.

                         या काळात आणखी एक महत्वाची घटना घडली.सुरुवातीपासून रामचंद्र करमरकर यांचे घर हेच आमचे ऑफिस होते. जागेचा शोध चालू होता.अव्वाच्या सव्वा किमती मंडळाला परवडणाऱ्या नव्हत्या.'घर देता का घर' ही समस्या भेडसावत होती.आमची समस्या कार्यकारिणी सदस्य सविता ढमढेरेनी सोडवली.भरतनाट्यमंदिरा समोरील त्यांच्या मालकीचा ऑफिस गाळा त्यांनी नाममात्र भाड्याने मंडळास दिला.आमच्या कार्यकारिणीच्या मिटिंग तेथे होऊ लागल्या.
                   २०२२ च्या नवरात्रामध्ये मागच्या वर्षीच्या लेखांची आठवण झाली.या वर्षीही असेच काही करूया असे सर्वांनाच वाटले.आयष्यात दुर्धर प्रसंग/आजार/अघात असे काही होऊनही आपले स्वप्न,कार्य,आयुष्य यशस्वीपणे पुढे नेले अशा विरांगनांनाबद्दल लिहायचे ठरले.आणि अवघ्या दोन दिवसात ठरवून सुद्धा घटस्थापनेपासून दसर्यापर्यंत दहा तेज शलाकांचा प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर ठेवता आला.हे लेख Whats app ग्रुप,फेसबुक कम्युनिटी, वृद्धांचे पालकत्व इ.ठिकाणी प्रसिद्ध झाले.त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.वेदनाच जगण्याचे बळ देते हे या लेखांनी शुभार्थीना सांगितले.यातून नवीन प्रेरणा मिळाली.लेखांइतक्याच प्रत्येक लेखांवरील चर्चानी रात्री जागविल्या नऊ दिवसांचा जागर सिद्ध झाला. 

                        मंडळाचे काम आता अनेकांपर्यंत पोचले होते.इतर संस्थांशी सहभाग वाढत होता. आमच्या घरच्या आघाडीवर केअर टेकर असल्याने मी सहभाग घेऊ शकत होते.आणि तो आला नाही तरी मंडळाचेच कोणी न कोणी मदतीला उभे राहात.यानाही सर्व परिवारच असल्याने मदत घेताना कोणताच संकोच वाटत नसे.

                     डॉ.रोहिणीताई पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धकल्याण  शास्त्राचा ( Gerontology ) संशोधन गट आकारास येत आहे.यात आम्ही सहभागी झालो.११ मार्च २२ ला पहिली मिटिंग झाली.पहिलीच मिटिंग आणि त्या दिवशी नेमका केअर टेकर आला नाही.रोहिणीताई म्हणाल्या, काकांना घेऊन या.मृदुलाच्या गाडीने गेल्याने तिचे ड्रायव्हर गाडीतून उतरताना मदत करायला होते.ह्यांनी मिटिंग एन्जॉय केली.सर्वजण परिचयाचे असल्याने कोणालाच यांच्या असण्याची अडचण वाटली नाही. 
                     १७ सप्टेंबर २२ ला डॉ.मंगलाताई जोगळेकर यांच्या 'काळजीवाहक म्हणून घडताना' या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होणार होते.पुस्तकाची प्रस्तावनाही मी लिहिली होती.डॉक्टर सुजल वाटवे,न्यूरॉलॉजिस्ट श्रीपाद पुजारी,मानसोपचार तज्ज्ञ अरविंद पंचंदीकर असे दिग्गज होते.मला थोडे टेन्शन आले होते.त्या कार्यक्रमादिवशी खूप पाऊस पडत होता.तरी हे आवर्जून कार्यक्रमाला आले.माझ्याबरोबर पुढच्या रांगेत बसले होते.इतर प्रमुख अतिथी आलेले होते त्यांच्याशी ह्यांची ओळख करून देता आली.मी कोठेही बोलणार असले तर माझ्यापेक्षा त्यांनाच आनंद होई.मला टेन्शन असे पण ह्यांना मात्र मी छानच बोलणार अशी खात्री असे.अशावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे  माझ्याबद्दलचे कौतुक मला कामाला चालना देई.

                    रोहिणीताई वृद्धकल्याण शास्त्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करत होत्या.त्यांच्या खडकवासला येथील सनवर्ल्ड वृद्धनिवास येथे त्याचे १८ फेब्रुवारी २३ ला सत्र होते.मला रिसोर्स पर्सन म्हणून बोलावले होते.गाडी पाठवते काकानाही घेऊन या असे रोहिणीताईंनी आवर्जून सांगितले होते.रोहिणी ताईनी ह्यांची आराम करण्याची व्यवस्था केली होती.तेथे पोचल्यावर ह्यांचा ताबा वृद्ध निवासाच्या कर्मचार्यांनी घेतला.गाडीतून उतरल्यावर त्यांना खूप चढ उतार असल्याने व्हीलचेअरवरून नेले.त्यांनी अजिबात आढेवेढे घेतले नाहीत याचे आश्चर्य वाटले.त्यांचा व्हिल्चेअरला असलेला नकार यापूर्वी च्या लेखात आल्याने येथे लिहित नाही.यापूर्वी आम्ही दोघांनी सन वर्ल्डमध्ये एक कोर्स केला होता तेथले वातावरण ह्यांच्या परिचयाचे होते आणि हेही तिथल्या लोकांना.

                  जेवताना ह्यांची सर्वांशी ओळख झाली.अशा भेटी गाठी त्यांना आवडत.मी कुठेही जाण्यास त्यांचे पूर्ण सहकार्य असे.या निमित्ताने त्यांना औटिंग पण झाले.कोविडमधून बाहेर पडल्यावर ह्यांचा मंडळाच्या कामातील सहभाग कमी झाला होता.आणि आता जास्तीत जास्त काम ऑनलाईन असल्याने फार व्यक्तींची गरजही लागत नव्हती.त्यांची हजेरी मात्र सर्वत्र असे.

                   आता त्यांचे वजन खूप कमी झाले होते.ते पाठीत वाकले होते.बसल्यावर मात्र ते अजिबात जाणवत नव्हते.त्याना बोलण्याची समस्या होती पण सामजिक भयगंडाने मात्र त्यांना पछाडले नव्हते.ते शेवटपर्यंत सर्व कार्यक्रमात आनंदाने सहभागी होत.करमरकर काका,पटवर्धनसर आणि हे,आता प्रत्यक्ष कामात नसले तरी त्यांचे कार्यक्रमात असणे हे सर्वांसाठी आनंददायी होते.

             खडकवासल्याच्या कार्यशाळेत सहभागी डॉ,राम दातार यांची ओळख झाली.त्यांच्या 'Learn,Enjoy Donate' असे उद्दिष्ट असलेल्या दुवा संकलन,सहवर्धन केंद्र या संस्थेच्या १८ ऑगस्ट २३ च्या सभेत आशा  रेवणकर यांना पार्किन्सन्स मित्रमंडळाची माहिती सांगण्यास बोलावले होते.त्यावेळी उपस्थितातील अनेकांनी मंडळास देणग्या दिल्या.प्रणिता नार्वाडकर सारखी गुणी शुभार्थी आणि गायिका या सभेतच भेटली.
                  पुन्हा याच संस्थेच्या २ डिसेंबरच्या सभेतही रेवणकर यांना निमंत्रित करण्यात आले.डॉ.दातार आणि त्यांच्या सहकार्यांना मंडळाचे काम आवडल्याने नंतरच्या काळात त्यांच्याशी  मिटिंग झाली.ते मंडळाला काय मदत करु शकतील याबद्दल चर्चा झाली.वर्षभरातील प्रत्यक्ष सभांच्या सभागृहाचे भाडे देण्याचे त्यांनी कबुल केले.पुढील काळात त्यांच्या सहयोगाने आणखी काही प्रकल्प राबविता येतील.
                  बांद्रा येथे पब्लिक फोरम ऑन न्युरो रीहॅबीलीटेशन फ्लो या बांद्रा येथील सेमिनारसाठी मंडळाला निमंत्रित केले.आम्ही कोणी जाणे शक्य नव्हते.मुंबईचे शुभार्थी मोहन पोटे आणि आमचे वेबडिझायनर अतुल ठाकूर यांनी प्रतिनिधित्व केले.

                          आता बऱ्यापैकी सर्वत्र स्थिरस्थावर झाले होते.त्यामुळे प्रत्यक्ष सभा घ्यावी असे सर्वाना वाटत होते.करोनापुर्वी प्रभात रोडच्या नर्मदा हॉल मध्ये मासिक सभा होत.तो हॉल आता निवासी झाला होता.हॉलची शोधाशोध सुरु झाली.हॉलची भाडी खूप वाढली होती.अशातच अचानक न ठरवता प्रत्यक्ष भेटीचा क्षण आला.पहिली प्रत्यक्ष सभा शुभार्थी किरण सरदेशपांडे यांच्या मदतीमुळे ओक ट्रस्ट येथे झाली त्याचे काय झाले,औरंगाबादचे शुभंकर रमेश तिळवे सप्टेंबरमध्ये पुण्यात येणार होते.त्यांनी काही लोक एकत्र भेटू अशी इच्छा व्यक्त केली.whats app वर सात तारखेला मेसेज टाकला. जमायचे कोठे हा प्रश्न सरदेशपांडेनी त्यांचा हॉल मोफत देऊ करून सोडवला. ११ सप्टेंबरला इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये ५५ शुभंकर, शुभार्थी हजर झाले.रमेश तिळवे यांची शुभंकर शुभार्थीना भेटण्याची प्रबळ इच्छा,सुंदर व्यवस्था असलेला ओक ट्रस्टचा हॉल,सरदेशपांडे यांनी sponsor केलेले स्वादिष्ट जेवण,सरदेशपांडे पती, पत्नी आणि टीमचे अगत्य.शरच्चंद्र पटवर्धन आणि रामचंद्र करमरकर या बुजुर्गांची उपस्थिती,शुभंकर,शुभार्थींचा अमाप उत्साह यामुळे कार्यक्रम संस्मरणीय झाला. 

                   रमेश तिळवे ह्यांचे बालपणापासूनचे मित्र. दोघांची उराउरी भेट झाली.करमरकर,पटवर्धन आणि सर्वच जुनी मंदळी दोन वर्षांनी भेटत होती.करोना नंतर जॉईन झालेल्यांना प्रत्यक्ष एकमेकांना पाहण्याची ओढ होती.भेटीत तृष्टता मोठ्ठी असे दृश्य होते.

                   दुसरी प्रत्यक्ष सभा कोजागिरी पोर्णिमेनिमित्त १७ ऑक्टोबरला झाली.यासाठी हॉल शोधण्यासाठी सविता आणि आशाने हॉल शोधण्याची मोहीम काढली.निवारा हॉल फायनल झाला.५०/५५ लोक बसू शकतील असा हॉल घेतला.मध्यवर्ती लोकेशन,फारशा पायऱ्या नसणे,हॉलपर्यंत वाहन जाणे, टाॅयलेट हॉलच्या जवळ असणे,कमोड असणे अशा अनेक सोयी होत्या. 

                 आम्ही जाणीवपूर्वक आयोजित करत असलेला हा पहिलाच कार्यक्रम होता.कार्यक्रमाची माहिती फोनवरून सर्व सभासदांना सांगण्याची पद्धत यावेळीही अवलंबायची होती. Whats app ग्रुपवर मेसेज टाकून फोन करायला कोण तयार आहे विचारल्यावर नव्या दमाच्या विसेक जणांनी नावे दिली.यात तरूण मंडळीही होती.अंजलीने सर्वांच्यात कोणी कुठले फोन करायचे याचे वाटप केले.दुध आणि छोटी डीश द्यायची असल्याने कोण येणार हे विचारायला सांगितले होते सर्वांनी आपापले रिपोर्ट द्यायला सुरुवात केली.आश्चर्य म्हणजे १०४ लोक येणार होते.आम्ही तर ५० लोक मावतील असा हॉल घेतला होता कारण मासिक सभेला साधारण तितकेच लोक यायचे.मृदुलाने लगेच निवाराचा मोठ्ठा हॉल उपलब्ध आहे का विचारले.नशिबाने तो उपलब्ध होता.त्याचे भाडे आमच्या बजेटपेक्षा जास्त होते पण दुसरा काही इलाज नव्हता.सभेला आलेल्या अनेकांनी मंडळाला देणग्या दिल्या आणि आमचा आर्थिक प्रश्न सोडवला.

                      यावेळी नीलिमा बोरवणकर यांनी मान्यवरांच्या मुलाखती दरम्यान घडलेले किस्से सांगून श्रोत्यांचे रंजन केले. तळेगावहून आलेल्या शुभार्थी नारायण फडणीस सर यांनी स्वागतपर गीत आणि समारोप गीत सादर सिंथेसायझर वाजवत सादर केले आणि सर्वाना भाराऊन टाकले.

                       हा कार्यक्रम ठरवला तेंव्हाच १ डिसेंबर ही सहलीची तारीख ठरवली होती.कारण येणारे सभासद नावे नोंदवून पैसे देऊ शकले असते.बँकेत पैसे भरण्याचा पर्याय होताच.येथेही नेहमीचे रेकॉर्ड मोडले.काहींनी त्यादिवशी पैसे भरले काहींनी बँकेत भरले. १०४ आकडा झाला.इंदूरहून वनिता सोमण संभाजीनगरहून रमेश आणि गिरीश तिळवे,बेळगावहून आशा नाडकर्णी आले होते.

                   रमेशभाऊ आणि गिरीश आमच्याकडे रात्री राहायला आले आमच्या दोघांच्यासाठी सहलीबरोबर हा बोनस आनंद होता.आल्या क्षणापासून ह्यांची जबाबदारी रमेशभाऊनी उचलली.

                    गेली दोन वर्षे करोनामुळे सहल गेली नव्हती.सर्वच सहलीसाठी आतुर होते सहलीचे ठिकाण 'जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र मोराची चिंचोली' येथे आयोजित केले होते.आमचे शुभार्थी देवराम गोरडे आण्णा हे या केंद्राचे सर्वे सर्वा.त्यांच्या उदार आदरातिथ्याचा प्रत्यय घेतला.हृषिकेशने स्वत:च्या आईसह हजर राहून दिलेले सरप्राईज सर्वांना आवडले.गोरडे हे डान्सक्लासमधील सहभागी असल्याने त्यांनी आग्रहाने गुरूला निमंत्रित केले होते.

                   निसर्गरम्य वातावरणातील मनोरंजनाची ठिकाणे,मासवडी,पिठले,ठेचा,लापशी असे ग्रामीण भोजन हुरडा पार्टी,शुभार्थी,शुभंकरांनी सादर केलेले विविध गुण दर्शन,खेळ या सर्वामुळे ही सहल सर्वाना सुखावून गेली.पुढचे कितीतरी दिवस सहलीच्या आठवणी व्हाटसअप ग्रुपवर चालू होत्या.त्या काळात सगळे सहभागी जणू पीडी विसरले यापेक्षा सहलीचे यश ते कोणते? 

                     सहलीनंतर लगेच जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त जानेवारीपासूनच वार्षिक मेळाव्याच्या तयारीची सुरुवात झाली.स्मरणिकेसाठी लेख मागवणे,कलाकृती करण्यासाठी शुभार्थीना प्रवृत्त करणे हे सुरु झाले.विशेष म्हणजे फारसे मागे न लागता भराभर शुभंकर, शुभार्थिनी उत्तम लेख पाठविले. कलाकृतीसाठी नावे दिली.भरपूर एन्ट्री आल्या.कलाकृती ठेवायला भाड्याने टेबले मागवायला लागली.

               ९ एप्रिल तारीख ठरली.तीन वर्षानंतर प्रत्यक्ष मेळावा होणार होता. एस.एम. जोशी हॉल बुक झाला होता.पुण्यातील तसेच परगावचे शुभंकर, शुभार्थी आवर्जून हजर होते.या वर्षी प्रथमच सभागृह तुडुंब भरले होते.बाहेर व्हरांड्यात शुभार्थीच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडले होते.प्रदर्शन मांडण्यासाठी आणि इतर कामासाठी स्वयंसेवक म्हणून नेहमीपेक्षा जास्त जण मदतीला आले.यात धावपळ करणारे वर चढून काही बांधू शकणारे गिरीश,शिरीष,क्षितिजा,सोनाली असे तरुणही होते.रमेश तिळवे,त्यांचा मुलगा गिरीश मुद्दाम औरंगाबादहून आले होते तर अतुल ठाकूर मुंबईहून आले होते.

               सुप्रसिद्ध क्रीडावैद्यक तज्ज्ञ हिमांशू वझे हे प्रमुख पाहुणे होते.ते कार्यक्रम सुरु होण्याच्या बरेच आधी आले होते.त्यांनी प्रदर्शन मनापासून पहिले.शुभार्थींच्या कलाकृतीतील विविधता,क्रिएटीविटी याचे खूप कौतुक केले.त्यांच्या दिमतीला डॉ.अमित करकरे होते.

              वेळेत समारंभ सुरु झाला.यावर्षी शुभार्थी गौरी इनामदारने सूत्र संचालन केले.शुभार्थीने सूत्र संचालन करणे हे प्रथमच होत होते.'चला संवाद साधूया....' या रामचंद्र करमरकर यांनी रुपांतरीत केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शरच्चंद्र पटवर्धन यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे हिमांशू वझे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.आम्ही पाठवलेली स्मरणिका त्यांनी संपूर्ण वाचलेली होती हे त्यांच्या भाषणातून लक्षात आले.एकूणच मंडळाच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.
               त्यांनी 'स्वास्थ्य संयोजन' या विषयावर श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान दिले.श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.कार्यक्रम संपतासंपता प्रेक्षकातून आवाज आला गीता पुरंदरे कोण आम्हाला पहायच्या आहे स्टेजवर बोलवा.गीताताईना स्टेजवर बोलावण्यात आले.रोज Whats app वर पुष्परचना टाकून सर्वांचे मन प्रसन्न करणाऱ्या गीताताईनी त्यांची भरपूर पेंटिंग्ज प्रदर्शनात ठेवली होती.तीही सर्वाना आवडली होती.गीताताई आल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.सर्वांच्या प्रेमानी त्याही भाराऊन गेल्या. 
             यावर्षी आणखी एक नवीन गोष्ट घडली.शुभार्थी शैलजा भागवत यांनी स्वत: पेंटीग केलेल्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या.त्यातून मिळालेले ७५०० रु.मंडळाला देणगी दिले.
            मंडळ स्थापन झाल्यापासून अनेक प्रत्यक्ष सभा झाल्या होत्या.पण करोना नंतर झालेल्या या प्रत्यक्ष सभांची रंगत काही औरच होती.सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,एकमेकांना भेटण्याची असोसी,मंडळासाठी काय करू आणि काय नको अशी कृतज्ञता दाखवणारी भावना,एकमेकांना न मागता मदत करण,सभागृहात जाणवलेली एकरूपता.शब्दात सांगता येणार नाही असे हवेहवेसे  अफलातून रसायन तयार झाले होते.
            त्यामुळे पुढील वर्षाची कामे करण्यासाठी आयोजकांचा उत्साह वाढला होता. 
               
            १३ ऑगस्ट 'Lady with the magic hand' नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ.सुरभी धनावला यांचे निवारा सभागृहात व्याख्यान झाले.प्रार्थनेने सभेची सुरुवात झाली.डॉ.सुरभी या न्युरोफिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोथेरपिस्ट आहेत.निसर्गोपचार आणि मसाज थेरपी यांचा पारंपारिक वारसा त्यांच्याकडे असल्याने त्यांनी आधुनिक आणि पारंपारिक पद्धतीची सांगड घालून स्वत:ची उपचार पद्धती विकसित केली आहे.याआधारे त्यांनी रीजीडीटी,कंप,भास,फ्रीजिंग अशा पार्किन्सनच्या लक्षणावर प्रात्यक्शिकासह व्याख्यान दिले.प्रात्यक्षिकासाठी अनेक शुभार्थी पुढे आले.हेही पुढे आले.
                   यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा होनप,अंजली महाजन यांनी कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी खूप कष्ट घेतले.शुभार्थीनीही भरभरून प्रतिसाद दिला.सविता बोर्डे औरंगाबादहून आणि फडणीस सर तळेगावहुन आले होते.कार्यक्रमात विविधता होती.पार्किन्सन्सही त्रास द्यायचे विसरून थक्क होऊन पाहत असावा.
          शेवटी सैराटमधील गाण्यावर उपस्थितातील जवळजवळ सर्वांनी डान्स केला.हे दृश्य अवर्णनीय होते.'पार्किन्सनसह आनंदाने जगूया' हे ब्रीद प्रत्यक्षात उतरताना दिसत होत
            नंतर कुर्तकोटी यांच्या वाढदिवसानिमित्त सरोजिनी ताईनी करदंट आणि मटारच्या करंज्या दिल्या.केशरी दुधही होते. सर्वांप्रमाणे ह्यांनी कार्यक्रम एन्जोय केला.करंजी आवडीने खाल्ली.सर्व लोक भेटल्याने हे खुश होते.आमचा केअर टेकर नवनाथला सांगून मित्र मंडळीना बोलावून प्रेमाने हातात हात घेउन हसत होते.कुर्तकोटीही  नेहमीप्रमाणे हसतमुख चेहऱ्याने सर्वांशी संवाद साधत होते. 
              या दोघांचा मंडळातील शेवटचा सहभाग असे कोणालाच वाटले नव्हते.खरे तर यावर्षीच्या एप्रिलच्या पार्किन्सदिनानिमित्तच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी हे दोघे उत्सुक होते.पण ते व्हायचे नव्हते. हृषीकेशची विद्यार्थिनी तन्विने या दोघांना डान्स परफॉरमन्स डेडीकेट केला.
             दिवाळी पूर्वी आम्ही न्यूरॉलॉजिस्ट हेमंत संत यांना भेटून आलो.त्याच गोळ्या चालू ठेवल्या ह्यांचा पार्किन्सन आता ६० टक्के झाला होता.
             लगेच दिवाळी आली.फारच मजेत गेली. अनेक सुहृद,नातेवाईक भेटून गेले.भाऊबिजेपर्यंत सर्व दिवस उत्तम पार पडले. दुसरे दिवशी भाऊ,भाची आले होते.अनेक जुन्या आठवणी काढत हसत खेळत दिवस गेला.पण ही वादळापुर्विचीच शांतता ठरली.
           त्या दिवशी क्रिकेट मॅच होती.ती पाहात हे बसले.जेवायची वेळ झाली.ह्याना टीव्ही पाहात जेवणे अजिबात आवडायचे नाही म्हणून जेवायला आत नेत होते. तर उठलेले एकदम हे खुर्चीत बसले.मी लगेच शेजारीच राहणाऱ्या डॉक्टरना बोलावले.ब्लड प्रेशर खूपच लो झाले होते. लगेच अम्ब्युलन्सची वाट न पाहता डॉक्टरांच्या गाडीनेच हॉस्पिटल मध्ये नेले.सर्व प्रक्रिया सुरु झाल्या.छातीचा एक्सरे नॉर्मल आला.इन्फेक्शन नाही म्हणून हायसे वाटले,आयसीयूमध्ये  नेताना सोनाली आली आहे.मी नवनाथ आहोत.मी त्याना सांगत होते.हसऱ्या चेहऱ्याने ते ऐकत होते.सलाईन दिले की ते ठीक होतील सकाळी घरी सोडतील.असे डॉक्टर म्हणाले.
          आयसीयूमध्ये उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता.आम्हाला आणि पार्किन्सन्सलाही चकवत त्यांनी शांतपणे निरोप घेतला.
             आमचे संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन त्याना आनंदी गोपाळ म्हणत.हे लिहिताना मला आनंद सिनेमातील संवाद आठवतो.'आनंद मरा नही,आनंद मरते नही' ह्यांच्या बाबत अगदी खरे आहे.शेवटच्या क्षणापर्यंत ते आनंदी राहिले.
             २००९ मध्ये पार्किन्सन्स दिन मेळाव्यात केलेल्या भाषणात ते म्हणाले होते, " जीवनात आनंद लुटायचा असेल तर तुम्ही दुसऱ्याला आनंदी कसे करता येईल हे पहा. म्हणजे तो आनंदी झालेला  पाहताना  मिळणारा आनंद दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने तसा मिळणार नाही.
      It is not to be taught but to be experienced." जणू  हा आनंदाचा ' मंत्र ' त्यांनी  त्या दिवशी दिला! स्वत:ही शेवटपर्यंत जपला. आम्ही दोघांनी मिळून हा अनुभवला असल्याने त्यांचा वसा माझ्याकडून चालूच राहील, मंडळातील इतरांच्याकडून ही चालूच राहील.
                त्यात  अधिक भर घातली जाईल. त्याचे हस्तांतरण पुढच्या शुभार्थींकडे होईल. हे अविरत चालू राहील.हे व्यक्ती न राहता  विचार बनतील.




                                                                                                                                                                                                                    

Friday, 5 July 2024

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ९३

                                              पार्किन्सन्स विषयक गप्पा -  ९३

                      आमच्या whats app ग्रुपवर रोज सकाळी गीताताई पुरंदरे नवनवीन आकर्षक पुष्परचना टाकतात.सर्वांचीच सकाळ प्रसन्न होते.मीही ती पुष्परचना  लगेच आमच्या फेसबुक ग्रुपवर टाकते. तेथेही त्यांचे बरेच चाहते आहेत.गीताताईंचा विशेष म्हणजे एकदा रचना करून झाली की त्या लोकार्पण करतात.कॉपीराईट वगैरे भानगड नाही.कोणीही कोठेही टाका त्यांची परवानगी असते.अगदी हल्लीहल्ली त्यांनी त्यावर गीता लिहायला सुरु केले आहे.हे सुद्धा त्यांना नक्की कोणीतरी सुचविले असले पाहिजे.

                    रविवारी मात्र पुष्परचना आलीच नाही.मी थोड्या थोड्या वेळाने सारखे पुष्परचना आलीय का पाहत होते.दुपार उलटून गेलीतरी आली नव्हती.काय झाले असेल? मला थोडी काळजी वाटू लागली.फोन केला तर फोन उचलला जात नव्हता.शेवटी संध्याकाळी ती आली. आणि त्याबरोबर एक थक्क करणारी माहिती.

                 " आज आळंदी ते पुणे ३० किलोमीटरचा टप्पा पार पडला सकाळी सहाला निघालो होतो.चार वाजता पुण्याला पोचलो."पुण्याला आल्या आल्या थोड्या वेळातच. त्यांनी पुष्परचना टाकली होती.

               मला इंदूरहून येऊन दोनदा आळंदी पुणे वारी करणाऱ्या शुभार्थी वनिता सोमण आठवल्या. त्यांनी उत्तर वाहिनी नर्मदा प्रदक्षिणाही केली होती.यात एका दिवसात २५ किलोमीटर चालायचे असते.

             औरंगाबादच्या शुभार्थी सविता बोर्डेने ब्रम्हगिरी प्रदक्षिणा केली होती.

            गौरी इनामदारनी अमेरिकेत असेच अवघड ट्रेक केले होते.

              अरुण सुर्वे पुणे ते भीमा शंकर पायी गेले होते. 

या सर्व शुभार्थीच्या जिद्दीचे आणि पार्किन्सनलाही तोंडात बोट घालायला लावणाऱ्या कर्तुत्वाचे नेहमीच कौतुक आणि अभिमानही वाटला आहे.

              माझी काळजी दूर झाली होती.माझा मिस कॉल पाहून गीताताईंचा फोन आला.त्या सांगत होत्या मी सर्व वारी पायी करणार आहे.बरोबर त्यांची बहीणही होती.हे ऐकून तर स्तिमितच झाले. मला अनेक प्रश्न पडले.त्यांचे पती विश्वासरावही पार्किन्सन पेशंट आहेत.ते एकटे राहणार का सांगलीला? माझा प्रश्न ऐकून त्या म्हणाल्या, हो.बाई आहे स्वयंपाक करणारी आणि तसा ह्यांनाही येतो करता. थोडक्यात त्यांना काही  प्राब्लेम नव्हता. 

              गीता ताईंनी रोज १० किलोमीटर चालून वारीसाठी सराव केला होता.त्यांची खूप दिवसाची इच्छा पूर्ण होत होती  म्हणून त्या आनंदात होत्या.एकदा पुणे सासवड टप्प पूर्ण झाला की सर्व सोपच आहे.त्या अगदी  सहजपणे सांगत होत्या.त्यांचा तो टप्पा आता पार पडला आहे.सर्वांच्या मागणीवरून त्या वारीचे अपडेट आणि फोटो पाठवत आहेत.आमच्यासारखे घरबसे फोटो पाहून आनंद लुटणे आणि त्यांचे भरभरून कौतुक करणे एवढेच करू शकतो. 

               त्यांनी १५ दिवसांच्या पुष्परचना करून बरोबर घेतलेत. रेंज असली तर टाकणार  आहेत.गीताताई तुम्हाला सलाम!