संघर्षातून स्वप्नपूर्ती - स्वप्नांना पंख नवे
डॉ.वसुधा भंडारे ६७ व्या वर्षी पीएचडी झाल्या.त्यांच्या मुलाने आणि मुलीने वेदश्री कार्यलयात सत्कार समारंभ आयोजित केला होता.माझी प्राध्यापक म्हणून हजेरी होती.अनेकजण त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होते.शिक्षक म्हणून मन अभिमानाने भरून आले होते.हे यश सहजासहजी मिळाले नव्हते त्यामागे खडतर तपस्या होती.स्वप्न पुर्तीसाठीचा संघर्ष होता.
वसुधा ताई अकरावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.बरोबरीच्या मैत्रिणी पुढील शिक्षणासाठी महविद्यालयात गेल्या.वसुधाला मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते.आपले पदवीचे स्वप्न अधुरे राहणार म्हणून खंत होती.आता लग्न करतील ही भीती होती.अशात एका मैत्रिणीने साताऱ्याला नर्सिंगला प्रवेश घेतला.या व्यवसायाबद्दल फारशी माहिती नव्हती.तरी या साडेतीन वर्षाच्या कोर्समध्ये स्टायपांड मिळणार होता.येथे शिक्षणासाठी खर्च नव्हताच उलट कुटुंबाला मदत होणार होती म्हणून प्रवेश घेतला.
कोणतेही काम निगुतीने झोकून देऊन करण्याच्या वृत्तीमुळे यात प्रविण्य मिळवले.दीड वर्षाचा बाॅंड संपला. आणि वर्षभरात लग्न झाले.सुरुवातीला खाजगी आणि नंतर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेत दाखल झाल्या.४६ वर्षे नोकरी केली. पती गरवारे नायलॉन मध्ये होते.आता पुणे हीच कर्मभूमी होती.पदवीचे स्वप्न डोके वर काढत होते.नोकरी,संसार,संसारवेलीवर फुललेली दोन मुले यात स्वप्न मागेच पडले.शिक्षणाची आवड पाठ सोडत नव्हती.तरी योगासन कोर्स,होमिओपॅथी कोर्स असे काहीना काही सुरु होते.
दूरशिक्षण पद्धत सुरु झाली आणि वसुधा सारख्या अनेक वंचितांना शिक्षणाची दारे खुली झाली.पन्नासाव्या वर्षी त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी.ए.अभ्यासक्रमास बिचकतच प्रवेश घेतला.त्या माझ्या संपर्कात आल्या.आपल्यापेक्षाही अधिक वयाचे विद्यार्थी पाहून त्यांचा वयाचा गंड मनातून गेला.दिलेल्या अध्ययन साहित्याच्या आधारे घरी राहून अभ्यास करायचा होता शनिवार, रविवार संपर्क सत्रे असत तेही जमणार होते.
मनात एक खंत होतीच.आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत आपल्या शिक्षणावर खर्च करणे त्यांना लक्झरी वाटत होती.गरवारे नॉयलॉन बंद पडल्याने पतीची नोकरी गेली होती ते छोटी,मोठी कामे करत होते.पण बेताची आर्थिक परिस्थिती त्यांच्या पाचवीलाच पुजली होती.परीचारीकेची नोकरी म्हणजे शिफ्ट ड्युटी,आईकडून मिळालेला दम्याचा वारसा.अशा अनेक अडचणी होत्या.आता स्वप्न हाताशी आल्याने डोंगराएवड्या अडचणी आल्या तरी त्या माघार घेणार नव्हत्या.
त्यांच्या भरगच्च दिनक्रमातूनवेळ काढून त्या मन लाऊन अभ्यास करत होत्या.शंका विचारायला येत होत्या.'मला जमेल ना हो' हे पालुपद मात्र सारखे चालूच असायचे.योग शिक्षक म्हणून काम करणे,नर्सिंगवर व्याख्याने देणे,असे इतर लष्करची भाकरी भाजण्याचे उद्योगही चालूच होते.तिसऱ्या वर्षापर्यंत त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला.त्यांचे स्वप्न आता नजरेच्या टप्प्यात होते.त्या प्रथम श्रेणीत पदवीधर झाल्या.समाजशास्त्रा या विषयात पहिल्या आल्या.पदवीदान समारंभात त्यांना त्यासाठीचे पारितोषिकही मिळाले.
आता त्यांच्या प्रतिभेला बहार आला
होता.कथा, लेख लिहिणे चालूच होते.त्यांच्या सर्व्हिसबुकमध्ये आता पदवीधर
झाल्याची नोंद होणार होती.पगारवाढही होणार होती.आता त्यांच्या स्वप्नाला नवे पंख फुटले.त्यांना एम.ए.करायचे होते.तेही बहिस्थ पद्धतीने करता येणार होते.
No comments:
Post a Comment