पार्किन्सनविषयक गप्पा ८६
साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा.असे म्हणतो.त्याच तालावर शुभंकर, शुभार्थी येती घरा तोची दिवाळी दसरा असे मला म्हणावेसे वाटते.आमच्या घरभेटी कमी झाल्या आणि आमच्याकडे इतर शुभंकर,शुभार्थीनी येण्याचे प्रमाण वाढले.करोनानंतर whatsapp ग्रुपवर अनेक परगावचे लोक आले.झूम मिटिंग,फेसबुक,युट्युबचानल, या सर्वातून परगावचे लोक जोडले गेले.आणि परगावचे लोकही घरी येऊ लागले.दुबईहून मिलिंद जोशी सपत्नीक आले.सोलापूरहून डॉ.वळसंगकर पती पत्नी,कऱ्हाडचे सुर्यकांत पाटील,नागपूरचे अरविंद पाटणकर,मह्द्चे डॉ.तांदळे,दशपुत्र पतीपत्नी पुण्यात आले की एक फेरी असतेच.औरंगाबादचे रमेशभाऊ तर तीर्थळीन्चे लहानपणीचे मित्र.त्यामुळे राहायलाच आले. हे झाले परगावचे.पुण्यातील लिहित बसले तर यादी खूपच मोठ्ठी होईल.प्रत्येकजण आले ते आनंद,प्रेरणा देवून गेले येणाऱ्यानाही वाटले त्याना प्रेरणा मिळाली.प्रत्येकवेळी कोणी येवून गेले की त्याबद्दल लिहावे वाटले पण फार थोड्यावेळा ते जमले.भेटीत तृष्टता मोठी ही भावना मात्र प्रत्येक भेटीनंतर रेंगाळत राहिली.
१० ऑक्टोबरला सांगोल्याच्या डॉ.संजीवनी केळकर येवून गेल्या आणि लिहावे असे प्रकर्षाने वाटले.प्रथम दर्शनीच प्रभाव पडावा असे त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व आहे.मृदू तरी करारी. ४ ते १० ऑक्टोबर त्या पुण्यात असणार होत्या.सर्व दिवस त्यांचे विविध भेटीसाठी पॅक होते.शेवटी आमच्याकडे येण्यासाठी सकाळी साडे आठची वेळ ठरली.ब्रेकफास्ट करत त्यांच्या पार्किन्सनबद्दल, त्यांच्या कामाबद्दल भरपूर गप्पा झाल्या.
त्या तेथील पहिल्या महिला डॉक्टर.पुण्यासारख्या शहरात वाढलेल्या मुलीला छोट्या गावत जाऊन काम करणे कठीण होते.संजीवनीताईंनी हे आव्हान स्वीकारले.फक्त डॉक्टरकीच केली नाही तर 'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान'च्या माध्यमातून गेल्या ४० वर्षाच्या अथक प्रयत्नातून त्यांनी दुष्काळ ग्रस्त सांगोल्याचा कायापालट केला. राष्ट्रभक्त,निष्ठावान,आजूबाजूच्या गावात आदरयुक्त नाव घेतले जाई अशा सासर्यांचा त्याना भक्कम पाठींबा होता.कामावर निष्ठा होती.विशिष्ट ध्येय ठेऊन काम करण्याची तयारी होती.याचे फलित म्हणून अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांच्या कामावर मोहोर उठवली.अशी कर्तुत्ववान स्त्री पार्किन्सन मित्रामुळे आमच्याशी जोडली गेली.
सांगोल्याच्या परिवर्तनाची कहाणी सांगणारी लिंक सोबत देत आहे.ती अधिक बोलकी आहे.त्यांच्या पुरस्कार समारंभाच्या कार्यक्रमाची लिंक ही एकेक करून देत आहे.आता पार्किन्सन झाला तरी त्यांचे काम थांबले नाही.पुढची फळी कामासाठी तयार आहे.त्यांच्या या कामाबद्दल 'भेटू आनंदे' मध्येही जाणून घेणार आहोत.
त्यांच्या बरोबर माया केअरच्या विनिता महाजनही आल्या होत्या.आत्तपर्यंत मायाकेअर ची लिंक अनेकदा whatsapp वर आली होती.पण आज प्रत्यक्ष मायाकेअरची स्वयंसेविका पाहिली.ही संस्था एकट्या दुकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी लागणारी सेवा मोफत पुरवते.www.mayacare,org या वेबसाईटवर संस्थेची माहिती मिळेल.विनिता ताई संजीवनी ताई बरोबर आल्या होत्या.संजीवनी ताई सांगत होत्या मी एकटी येऊ शकले असते पण सर्वाना आता मी एकटी जाणे टाळले पाहिजे असे वाटते.आणि मी त्यांचे ऐकते.
नवरात्र अजून सुरु व्हायचे होते पण त्या आधीच दुर्गा मला दर्शन देऊन गेली होती.
No comments:
Post a Comment