Tuesday, 15 February 2022

पालकत्वाची वेगळी तऱ्हा

                                              पालकत्वाची वेगळी तऱ्हा

                  हृषीकेशचा डान्स ग्रुपवर उद्या संध्याकाळी साडे चार वाजता क्लास आहे असा मेसेज आला आणि मी उडालेच.हृषीकेश गेली १२ वर्षे पार्किन्सन पेशंटसाठी डान्स क्लास घेतो लॉकडाऊन नंतर ऑनलाईन क्लास सुरु झाले.सोमवर, बुधवार, शुक्रवार अशी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन बॅचेस असतात. गेले काही दिवस वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवल्याने दोन्ही  बॅच एकत्र केल्या होत्या त्याची खूप धावपळ होत होती.चिंतेत असायचा.तरी तो क्लास बंद करायचा नाही.उलट दोन्ही क्लास एकत्र घेतल्याने सहभागींना इनकन्व्हिनीअन्स होतो याची त्याला खंत वाटत होती.वडिलांच्या तब्येतीतील गुंतागुंत वाढतच होती.

             सोमवार दि. ७ फेब्रुवारीला त्याचे वडिल विठ्ठल बाबुराव पवार यांनी ८० व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.आणि लगेच ९ तारखेला तो क्लास घेत होता.आम्ही त्याला थोडे दिवस क्लास बंद ठेवू म्हटले पण त्याला तो तयार नव्हता. शो मस्ट गो ऑन या त्याच्या स्पिरिटला आम्ही सलाम केला  आणि श्रद्धांजली साठी एक मिनिट उभे राहिलो.यावेळी त्याच्याबरोबर आमचेही डोळे भरून आले.इतके दिवस तो बाबांची मनापासून सेवा करत होता क्लास आणि वडील यांचे सर्व करताना त्याची तारेवरची कसरत होते हे आम्ही पाहत होतो.

              हृषीकेशचे वडील एक्स सर्व्हीसमन होते.निवृत्तीनंतरही टाटामध्ये मेंटेनन्सचे काम करत होते.त्याना डायबेटीस होता आणि २०१८ मध्ये त्यात गुंतागुंतीला सुरुवात झाली.एका छोट्या जखमेचे निमित्त झाले.गुडघ्याखालील उजवा पाय अम्प्यूट करावा लागला.त्यांना चार वेळा इन्शुलीन द्यावे लागत होते. त्याची  आई २४ तास त्यांच्या भोवती असेच.विवाहित बहिणही मुलगा,नवरा, सासू या सर्वांचे पाहून वडिलांच्या सेवेला हजर असायची.तिच्या सासरची मंडळीही कोऑपरेटीव आहेत.या दोघी असल्या तरी त्यांना अंघोळ घालणे,हॉस्पिटलमध्ये नेणे ही कामे हृषीकेशलाच करावी लागत ती तो अतिशय मायेने करत असे.आम्ही त्याला श्रावणबाळ म्हणत असू.याशिवाय त्याना जयपूर फुट बसवल्यावर त्याना चालण्याची सवय होणे, त्यांची चालण्याची  ताकद वाढवणे आणि त्याना स्वावलंबी बनवणे यासाठी तो विशेष कष्ट घेत असे.याबद्दलच्या त्याच्या स्कीलचा आम्हाला अनुभव होताच.

            आपल्या पायावर उभे राहू न शकणाऱ्या शुभार्थीना ( पार्किन्सन पेशंटना ) स्वत: च्या पायावर उभे करणे.खुर्चीशिवाय ७०/७५ मिनिटे स्टेजवर नाचायला लावणे,त्यांचा आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणे,त्यांच्या नैराश्यावर हळुवार फुंकर घालणे हे सर्व तो गेली १२ वर्षे करत आलाच होता.आमच्या पार्किन्सनदिन मेळाव्यात शुभार्थीच्या नृत्याचे प्रात्याक्षिक होत असते.आलेले अतिथी न्यूरॉलॉजिस्ट, मनोविकारतज्ज्ञ असे सर्वच याबद्दल कौतुक करतात. परक्या माणसांसाठी तो एवढे करु शकतो तर स्वत:च्या बाबांना त्यांची  आर्मीची  शिस्त सांभाळत त्यांनी केले यात काहीच नवल नाही. 

             आम्हा शुभंकरांचे ( केअर टेकर ) आपल्या शुभार्थीचे मानसिक स्वस्थ्य सांभाळण्याचे खूप मोट्ठे काम तो करीत असतो.काही दिवस डान्स चुकला तर त्यांचा स्टामीना जाईल ही त्याला काळजी असते. आपल्या वडिलांच्या इतकाच आमचाही तो पालक असतो.गुरु माउली म्हणतात. हा आमचा गुरु असाच आम्हा सर्वांसाठी माउली असतो. 

            अशीही पालकत्वाची वेगळी तऱ्हा.

अधिक माहितीसाठी सोबत हृषीकेशवरील लेखाची लिंक देत आहे.

https://www.parkinsonsmitra.org/?p=2958

No comments:

Post a Comment